Wednesday, March 27, 2024

Abraham Ozler

Abraham Ozler
अब्राहम ओझलर
एसीपी अब्राहम ओझलर सुट्टीसाठी बाहेरगावी जातो आणि तिथे एका फेक कॉलमुळे बायको आणि छोटी मुलगी नाहीशी होते. आता त्या गोष्टीला तीन वर्षे उलटली आहेत.अब्राहम एका कैद्याकडून आपल्या कुटुंबाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो पण यश मिळत नाही.
एके रात्री रस्त्यावरील अपघातात एक तरुण जखमी होतो. ऍम्ब्युलन्स त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते .तो तिथे बरा होत असतानाच कोणीतरी त्याची हत्या करतो.
 तपासाची जबाबदारी अब्राहम ओझलरवर येते.काही दिवसांनी अजून एक खून होतो.यावेळी ही एका तरुणाला चक्कर येते म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले जाते आणि सिटीस्कॅन होत असताना त्याला ठार मारले जाते. खून करणारा एक डॉक्टर आहे हे ओझलर ओळखतो आणि त्याला साथ देणारा दुसरा व्यक्ती आहे असे दिसून येते. मीडिया या खुन्याला बर्थ डे किलर असे नाव देते.
ओझलर खऱ्या खुन्याना शोधून काढेल का ?? या खुनामागे काय कारण असेल ? या प्रकरणाचा तपास करताना ओझलरला आपल्या कुटुंबाचा पत्ता लागेल का ?? 
जयराम ओझलरच्या प्रमुख भूमिकेत आहे .तर सुपरस्टार ममूटी छोट्या पण महत्वपूर्ण भूमिकेत आहे .चित्रपट शेवटपर्यंत उत्कंठा ताणून धरतो आणि याचा दुसरा भाग येईल हे सूचित करतो.
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

Sunday, March 24, 2024

रेड आय

Red Eye
रेड आय
लिसा  मियामीत लक्स अटलांटिक  हॉटेलमध्ये कामाला आहे.ती आजीच्या अन्यसंस्कारानंतर रेड आयच्या फ्लाईटने मियामीला परतत होती.त्याचवेळी तिची ओळख जॅक रिपनरशी झाली.योगायोगाने तिला जॅकच्या शेजारचीच सीट मिळाली.गप्पा मारताना जॅक तिला सांगतो की तो एक टेररिस्ट आहे आणि तिचे वडील त्याच्या निशाण्यावर आहे .त्याने सांगितलेले ऐकले नाही तर त्याची माणसे तिच्या वडिलांना ठार करतील.
नाईलाजाने लिसा हॉटेलमध्ये फोन करून होमलँड सिक्युरिटीचे डेप्युटी सेक्रेटरी किफची हॉटेलची रूम बदलते. आता तिला जॅकपासून सुटका करायची आहे आणि तिला या घटनेची माहिती किफपर्यंत पोचवून त्याचे प्राण ही वाचवायचे आहेत शिवाय वडिलांची  घराबाहेर असलेल्या  गुंडांपासून सुटकाही करायची आहे.आता ती विमानात जॅकच्या शेजारी त्याच्या नजरेखाली आहे. ती यातून स्वतःची कशी सुटका करेल .
अतिशय थरारक ,उत्कंठावर्धक चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, March 23, 2024

द जंटलमेन

The Gentlemen
द जंटलमेन
इडी हॉर्निमन शाही नवाब घराण्यातील आहे.पण तो सैन्यात  कॅप्टन म्हणून काम करतो.
एके दिवशी वडील खूप आजारी असल्याची बातमी घेऊन त्यांचा वकील येतो.वडिलांची शेवटची इच्छा म्हणून तो भेटायला जातो.त्याला भेटून वडील प्राण सोडतात.मृत्युपत्रात इडीला अजिबात रस नसतो .त्यांच्यामते मोठा भाऊ फ़ेड्री आता नवाब बनणार असतो पण अनपेक्षितपणे सर्व संपत्ती आणि नवाबपद इडीच्या नावावर होते.
 नबाब हॉर्निमन यांची शाही हवेली आणि पंधरा हजार एकर जमीन असते.पण तरीही त्यांची परिस्थिती चांगली नाही असे इडीला आढळते.
मग त्याला सुसी ग्लास भेटते. ती त्यांची जागा भाड्याने घेऊन त्यात अंमली पदार्थ तयार करतेय आणि त्याचे ठरलेले भाडे दरवर्षी देते. 
इडीसाठी ही बातमी खूपच धक्कादायक असते. त्यातच मोठा भाऊ फेड्री मोठ्या कर्जात बुडालेला असतो .त्या कर्जासाठी गुंड माफिया त्याच्या मागे लागलेले आहेत.
सुसी ग्लास याबाबतीत इडीला मदत करायची तयारी दाखविते. पण प्रकरणाला वेगळीच वळणे लागत जातात.जितक्या वेळा इडी त्या जागेतून सुसी ग्लासला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो त्यात्यावेळी वेगळ्याच अडचणी इडीसमोर उभ्या राहतात तर कधी सुसी अडचणीत सापडते.
शेवटी इडी शेवटचा डाव खेळतो .तो त्यात यशस्वी होईल का ???
संथ  पण थ्रिलर आणि नावसारखीच जंटलमेन असणारी सिरीज हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.पुढे काय होईल याची प्रत्येक भागात उत्कंठा वाढत जाते.

Thursday, March 21, 2024

ray

Ray
रे
जगप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे केवळ उत्कृष्ट दिग्दर्शक नव्हते तर उत्तम रहस्यकथाकार ,गूढकथाकार होते.त्यांची फेलुदा पुस्तक सिरीज तर प्रसिद्ध आहे. यावेळी रे नावाच्या सिरीजमध्ये त्यांच्या चार कथा आहेत.
1 फॉरगॉट मी नॉट ...सुप्रसिद्ध तरुण बिझनेसमन इप्सित नायरला पार्टीत एक सुंदर तरुणी भेटते.ती तरुणी त्याला काही वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये तिच्या सहवासात घालवलेल्या दिवसांची आठवण करून देते .आपल्या प्रखर स्मरणशक्तीवर विश्वास असलेल्या इप्सितला ही घटना मात्र आठवत नसते.पण हळूहळू अचानक भेटलेले मित्र त्याला या गोष्टीची आठवण करून देतात तेव्हा तो पुन्हा चक्रावतो. खरोखरच ती घटना घडलीय ? मग त्याला आठवत का नाही ? 
2 बहुरूपीया....इंद्रशीष एक मामुली क्लार्क .तसा तो पार्ट टाईम रंगभूषाकार आहे. गरिबीत राहत असताना त्याला आपल्या लांबच्या आजीकडून भरपूर संपत्ती मिळते आणि त्यासोबत एक रंगभूषेचा ग्रंथ .त्या ग्रंथाच्या मदतीने तो आपले रूप बदलून मनातील इच्छा पूर्ण करतो .एक दिवस तो रस्त्यावरच्या पीरबाबाला चॅलेंज करायला जातो .मग...??
3 हंगामा है क्यो बरपा.. मुसाफिर अली प्रसिद्ध गजल गायक.त्या दिवशी तो ट्रेनच्या पहिल्या वर्गातून भोपाळवरून दिल्लीला जात होता.बेग त्याचा सहप्रवासी .मुसाफिर अली  त्याला ओळख दाखवितो पण बेग त्याला ओळखत नाही .बेग पूर्वीचा कुस्तीगीर आहे.पण दारासिंह विरुद्ध कुस्ती खेळून आपली कारकीर्द संपली असे सांगतो . आता तो क्रीडा पत्रकार आहे. बोलता बोलता दहा वर्षांपूर्वी असाच प्रवास करताना आपले एक खास घड्याळ सहप्रवाश्याने चोरले असे सांगतो . ते ऐकून मुसाफिर अली घाबरतो आणि भूतकाळात जातो .काय आहे मुसाफिर अली चा भूतकाळ ?
4 स्पॉटलाईट...विक्रम अरोरा सुपरस्टार आहे.एका शहरात तो शूटिंगसाठी आलाय. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्याच्यासाठी  स्पेशल सुईट अर्रेंज केलाय. पण मध्येच दीदीने प्रवेश केला .आता तो मागे पडला आणि शहरात फक्त दीदीचा जयजयकार चालू झालाय .पहिल्यांदाच विक्रमकडून त्याचा स्पेशल सुईट काढून तो दीदीला दिला.फिल्मचा निर्माता ही दिदीचा आशीर्वाद घेतोय.दीदी त्या हॉटेलात थांबलीय म्हणून तिथे नॉनव्हेज बनविले जात नाही.दीदीसाठी स्विमिंग पूल राखून ठेवला गेलाय .जिम ही फक्त दीदीसाठी आहे.हे सगळे पाहून विक्रम चिडलाय.दीदीमुळे आज त्याला कोणीही विचारत नाही. इतकेच काय त्याचे शूटिंग ही दीदीच्या संमतीशिवाय ओके होत नाही .तो संतापून दीदीला भेटायला जातो आणि त्याला अनपेक्षित धक्का बसतो ..
अली फझल, के के मेनन , मनोज वाजपेयी ,हर्षवर्धन कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चार वेगवेगळ्या कथा असलेली आणि चारच भागात असलेली ही सिरीज तुम्हाला धक्के देत राहील .नेटफिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Wednesday, March 20, 2024

DAMSEL

दमसेल
राजा आणि ड्रॅगनच्या लढाईत राजाची सर्व माणसे मारली गेली .ड्रॅगनने राजाला जिवंत सोडले पण त्याच्याशी एक तह केला .
गेली अनेक वर्षे राजा तह पाळतोय. 
एलोडी एका छोट्या राज्याची राजकुमारी .तिचे राज्य खूपच गरिब आहे. राज्य चालवायला त्यांच्याकडे पैसे नाहीत .म्हणून राजा राजकुमारी एलोडीचे लग्न त्या राज्याच्या राजपुत्राशी ठरवितो. त्याबदल्यात त्याला पुष्कळ सोने आणि पैसे मिळणार असतात.
एलोडीचे लग्न ठरते आणि एक जुनी प्रथा पार पाडण्यासाठी ते डोंगरात उंच जातात.तेथे विधी चालू असताना राजकुमार कपटाने एलोडीला खोल भुयारात फेकून देतो. 
भुयारात अनेक गुप्त मार्ग असतात त्यात ड्रॅगन राहतोय .आणि तहाप्रमाणे राजा त्याला नेहमी एका तरुणीची बळी देतोय. यावेळी तो बळी एलोडीचा आहे.
पण एलोडी शूर आहे .तो ड्रॅगनशी लढेल का ?? त्या खोल भुयारातून कशी बाहेर पडेल ? 
एका तरुणीचा ड्रॅगनशी होणारा थरारक सामना पाहायचा असेल तर  नेटफ्लिक्सवर दमसेल हिंदी भाषेत नक्की पहा.

मर्डर मुबारक

Murder Mubarak
मर्डर मुबारक 
द रॉयल दिल्ली क्लब हा दिल्लीतील उच्चभ्रू लोकांचा क्लब आहे. तिथे काही करोड रुपयांची मेम्बरशीप फी आणि वीस वर्षे वेटिंग आहे. आता लवकरच या क्लबच्या प्रेसिडन्टपदासाठी निवडणूक जाहीर झालीय. या साठी सुप्रसिद्ध नटी शेहनाझ नुरानी आणि राजे रणविजय सिंह यांनी आपली नावे दिलीत.
पण एक दिवस सकाळी ट्रेनर लिओ जिमखान्यात मृतावस्थेत सापडतो. एसीपी भवानीसिंह वर या प्रकरणाचा शोध घेण्याची जबाबदारी येते.त्याला इंस्पेक्टर पदम सहाय्य करणार.
भवानीसिंह खूपच शांत हसतमुख पण अतिशय हुशार आहे. तो लिओचा मृतदेह पाहताच सांगतो हा अपघात नसून खून आहे.
आता सुरू होतो या खुनाचा तपास. चौकशी करताना भवानीसिंहला कळते की लिओ क्लबमधील बर्याचजणाना ब्लॅकमेल करून त्यांना एका अनाथाश्रमात पैसे द्यायला भाग पाडतोय.त्याचा पर्सनल टॅब ही नाहीसा झालाय आता क्लबमधील प्रत्येकजण संशयित आहेत. पण सर्वच प्रतिष्ठित आणि नावाजलेले लोक आहेत.
भवानीसिंह प्रत्येकाची कसून चौकशी करतो.त्याला मदत करायला बांबी तोडी आणि काशी डोग्रा पुढे येतात.बांबी आणि  काशीचे एकमेकांवर प्रेम आहे पण तीन वर्षांपूर्वी बांबीचा नवरा एका अपघातात मरण पावला आणि त्याचे प्रेत अजूनही सापडले नाही.तर काशी वकील आहे.तो गरिबांच्या केस लढतो.
भवानी सिंहला फक्त दहा दिवसांत हे प्रकरण सोडवायचे आहे.तो खऱ्या खुन्याला पकडेल का ?
अगाथा ख्रिस्ती स्टाईलची एक अनोखी अनपेक्षित धक्के देणारी खून कथा 
पंकज त्रिपाठीने नेहमीच्या पद्धतीने एसीपी भवानीसिंहची भूमिका साकारली आहे.पण आता त्याला त्याच त्याच इमेजमध्ये पाहायला कंटाळा येतो. बावळट दिसणारा शुद्ध हिंदी बोलणारा, चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून वावरणारा भवानी सिंह आपल्याला यामुळे परिचित वाटतो. पण चित्रपटात बाकी स्टारकास्ट खूपच मोठी आणि सुप्रसिद्ध आहे .
सारा अली खानची बांबी उच्चभ्रू दिसते .तर विजय वर्मा काशी सहज करतो.बाकी लोकांत संजय कपूर, डिंपल कपाडिया, करिष्मा कपूर , आहेत.
चित्रपट नेटफिक्सवर आहे.

Sunday, March 17, 2024

Merry Christmas

Merry Christmas
मेरी क्रिस्तमस
अल्बर्ट आणि मारियाची भेट अगदी योगायोगाने झाली. ख्रिस्तमसच्या आधीची संध्याकाळ होती.अल्बर्ट सात वर्षांनी मुंबई आला होता.तो दुबईला असतो असे सगळ्यांना सांगतो. संध्याकाळी एकटाच फिरताना एका रेस्टोरांटमध्ये दारू प्यायला बसला.
योगायोगाने मारिया तिथे आपल्या पाच वर्षांच्या मुलीला घेऊन एकासोबत डेटवर आली होती.पण त्या मुलीला पाहून तिचा मित्र पळून गेला आणि तिला निरोप द्यायची जबाबदारी अल्बर्टला दिली.अल्बर्टने मारियाला तो निरोप दिला.नंतर तो चित्रपट पाहायला गेला योगायोगाने मारिया मुलीला घेऊन त्याच चित्रपटगृहात आली.तिथेच ते थोडे बोलले आणि एकत्रच बाहेर पडले.
घराजवळ येताच मारियाने त्याला ड्रिंकची ऑफर केली.अल्बर्ट तिच्या घरी आला आणि बोलताना कळले की तिच्या नवऱ्याचे बाहेर अफेअर आहे.तो वेगळा राहतोय .हिची  खाली तळमजल्यावर बेकरी आहे. ते ड्रिंक घेतात.मारिया मुलीला झोपवते आणि त्याच्यासोबत पुन्हा बाहेर फिरायला बाहेर पडते.ते बाहेर फिरून पुन्हा घरी येतात तेव्हा खुर्चीत तिचा नवरा मरून पडलेला असतो. त्याने आत्महत्या केली असे दिसून येते.
अल्बर्ट पोलिसांना फोन करून निघून जायचे ठरवितो .कारण विचारल्यावर तो जेलमधून सात वर्षांनी बाहेर पडला असे सांगतो .त्यामुळे पोलीस मारियावरही संशय घेतील असे सांगतो.मारिया त्याला निघून जायला सांगते.
अल्बर्ट बाहेर येतो खाली कॉफी पिताना पुन्हा मारिया मुलीसोबत घराबाहेर पडताना दिसते.तो तिचा पाठलाग करतो .ती चर्चमध्ये जाते.चर्च संपताच बाहेर पडताना तिला चक्कर येते तेव्हा मदतीला जयबाबू येतो.तो अल्बर्टच्या मदतीने तिला घरी सोडतो. घरी येताच अल्बर्ट हादरतो.मारियाच्या नवऱ्याचे प्रेत गायब झालेले असते.पुन्हा ते तिघंही ड्रिंक करतात. त्याचवेळी मारिया आपल्या हातातील घड्याळ चर्चमध्ये पडल्याचे सांगते. ते आणायला ती जय बाबूला सोबत घेते.रस्त्यात अल्बर्टला ही सोडू असे सांगते.
अल्बर्ट रस्त्यात उतरून पुन्हा तिच्या घरी जातो आणि लपून बसतो.थोड्या वेळाने जयबाबू आणि मारिया घरी येतात आणि समोर नवऱ्याचे प्रेत पाहून हादरते.तिच्या नवऱ्याने आत्महत्या केलेली असते.जयबाबू पोलिसांना फोन करून बोलावतो आणि काय घडले ते सांगतो. इंस्पेक्टर शण्मुगराजन या प्रकरणाचा तपास करण्याचे ठरवितो .
हळूहळू या प्रकरणाची धक्कादायक माहिती बाहेर येते.
मारियाच्या नवऱ्याने खरोखरच आत्महत्या केलीय. त्याची बॉडी मध्येच गायब कशी झाली ?
पाहिले पन्नास मिनिटे संथ चालणारा हा चित्रपट थोडा कंटाळवाणा वाटू लागतो पण नंतर तुम्हाला जागेवरून उठू देणार नाही.मोजकेच कलाकार ,1980 सालातील मुंबई ,त्यावेळी असणारे ख्रिस्तमसचे वातावरण कॅटरिना कैफ आणि विजय सेथुपतीचा अभिनय यात आपण गुंतून जातो.जयबाबूच्या भूमिकेत संजय कपूर आहे तर इन्स्पेक्टर शनमुगराजनच्या  छोट्या भूमिकेत विनय पाठक छाप पाडून जातो.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत हा चित्रपट आहे.