Wednesday, December 24, 2025

Nobody 2

Nobody 2
नोबडी 2
ज्यांनी नोबडी पाहिलाय त्यांना हच मॅनसेल कोण आहे हे माहीतच असेल.आता तर त्याच्या घरच्यांनाही कळलंय .पण अजूनही त्यांचे आयुष्य निरसच आहे.हचला अधूनमधून  त्याची कामे मिळतच असतात .त्याच्यावर खूप मोठे कर्ज असल्यामुळे तो ही कामे करतोय.तो मुळातच कुशल आणि प्रशिक्षित मारेकरी आहे. 
आता त्याला कुटुंबाला घेऊन पिकनिकला जायचे आहे.यामुळे आपल्या कुटुंबाशी दुरावत चालले संबंध परत जुळतील अशी आशा आहे. तो बॉसशी भांडून सुट्टी घेतो आणि कुटुंबाला घेऊन प्लमरवीला येथील विस्कॉसीन पार्कमध्ये जातो.
पण नेहमीप्रमाणे तिथेही त्याचे एका व्यक्तीशी भांडण होते आणि ती व्यक्ती तेथील डॉन असते. हच नंतर त्यांची माफी मागायला जातो पण आता ते प्रकरण फारच पुढे गेलंय. 
पहिल्या भागाप्रमाणे आताही हच त्या डॉनचे पैसे आणि ड्रग जाळून टाकतो तेव्हा त्या मालाची मालकीण आणि संपूर्ण शहरावर राज्य करणारी लेंडीना आपल्या साथीदारांसह हच आणि त्याच्या कुटुंबियांच्या मागे लागते.
पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भाग ही हाणामारीने आणि भरपूर रक्तपाताने भरलेला आहे. पण हा चित्रपट पाहताना मजा येते ,त्यासाठी पहिला भाग पाहावा लागेल .
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

Thursday, December 18, 2025

The Price Of Confession

The Price Of Confession
आहान यून सून आपल्या पतीसोबत सुखाने संसार करत होती. दोघेही आर्ट शिक्षक होते.पण एके दिवशी तिच्या नवऱ्याचा खून झाला आणि आरोपी म्हणून तिलाच अटक केली .तिला कोर्टात कबुलीजबाब द्यावा लागला आणि  तिची रवानगी तुरुंगात झाली.
मो युन आपल्याच टीचर पतिपत्नीची विष देऊन हत्या करते आणि शांतपणे पोलिसांच्या स्वाधीन होते.तिची आणि युन सूनची काळकोठडी बाजूबाजूलाच असते . युन सून समोर  मो युन एक प्रस्ताव ठेवते.तिच्या पतीच्या हत्येची जबाबदारी मी घेईन त्याबदल्यात तुरुंगातून सुटल्यावर युन सूनने आपले एक काम करावे.
युन सूनचा होकार येताच मो युन योजना बनवून कोर्टात आपण युन सूनच्या पतीची हत्या केल्याचे कबूल करते आणि पुराव्यानुसार कबुलीजबाब ही देते.
युन सून तुरुंगातून जामीनावर बाहेर येते.पण पोलिसांनी तिच्या पायात जीपीएस ट्रॅकर बांधला आहे . 
आता तिला मो युनने सांगितलेले काम पूर्ण करायचे आहे .ते काम नाही केले तर कोर्टात मो युन कबुलीजबाब फिरवेल आणि युन सूनला पुन्हा तुरुंगात जावे लागेल.
बारा भागाची ही सिरीज आपल्याला एका बैठकीत संपवावीशी वाटेल इतकी थरारक आणि श्वास रोखून ठेवणारी आहे.
ही सिरीज अतिशय शांत आहे.यात हिंसाचार अजिबात नाही .पण पुढे काय घडणार याची उत्सुकता ताणून धरते.
नेटफ्लिक्स ही कोरियन सिरीज हिंदीत आहे.

Monday, December 15, 2025

शोध दहशतवादाचा


शोध दहशतवादाचा ..पुरुषोत्तम महाले
संपादन ..डॉ. अभिजित महाले
अक्षर प्रकाशन
11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कमधील ट्वीन टॉवर अलकायदा आत्मघातकी पथकाने विमानाच्या साहाय्याने जमीनदोस्त केले आणि बलाढ्य अशा अमेरिकेलाही आपण हादरा देऊ शकतो हे दाखवून दिले. ह्या पुस्तकाची सुरवात ट्वीन टॉवरवर विमाने आदळली त्यापासून सुरू होते आणि 14 मार्च 2012 ला ओसामा बीन लादेनचा खतमा झाला तिथे संपते.
हल्ला झाला तेव्हा अमेरिकेच्या गुप्तचर विभागात आणि सरकार दरबारी कशा हालचाली सुरू झाल्या . ते कसे गोंधळून गेले.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश त्यावेळी फ्लोरिडा येथे होते आणि त्यांना एका सुरक्षित ठिकाणी हलविले गेले. त्यामुळे त्यांची जनतेतील प्रतिमा डागाळली गेली.
यात फक्त 9/11 चा हल्ला हाच विषय आहे. डिक क्लार्क यांनी सीआयए, एनएससी, एफबीआय आणि सर्व महत्वाच्या विभागांना  काहीतरी भयंकर घडणार आहे असे आधीच सांगून सावध केले होते पण कोणीही त्यांचे ऐकले नाही.बुश यांची भेटही होत नव्हती.ओसामा बीन लादेन आणि अलकायदा यांच्यापासून अमेरिकेला सर्वात मोठा धोका आहे असेही त्यांनी सांगितले होते पण काहीजणांना अलकायदाविषयी माहितीच नव्हती . 
बुश याना सर्व खापर इराकवर फोडायचे होते. त्यांच्यासाठी इराक हाच मोठा शत्रू होता .
9/11/2001 ते 14 /3/2012 या कालावधीत काय घडले ते वाचायचे असेल तर हे पुस्तक वाचायलाच लागेल.

Wednesday, December 10, 2025

स्टिफन

Stephen
स्टिफन
स्टिफनने  नऊ तरुणींचे खून केले .शेवटी पोलिसांना खुनी कोण हे कळले आणि त्यांनी सापळा रचला .पण स्टिफन स्वतःहून पोलिसांना शरण आला.
संपूर्ण जनमत स्टिफन विरुद्ध होते .पोलिसांनी स्टिफनला कोर्टात उभे केले.स्टिफनने वकिलाला नकार दिला.न्यायाधीशांनी स्टिफनची मानसिक स्थिती चेक करण्याची ऑर्डर दिली.
सीमा मानसोपचारतज्ञ आहे.स्टिफनच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्यासाठी तिची नेमणूक झालीय.स्टिफन तिला संपूर्ण सहकार्य करतोय. पण काहीतरी गडबड आहे असेच तिला वाटतेय.
मायकल या तपासाचा मुख्य पोलीस अधिकारी आहे.त्यालाही वाटतेय काहीतरी चुकतेय.स्टिफन स्वतःहून शरण आलाय आणि तो पोलिसांना ,डॉक्टरला सहकार्य करतोय हे त्यालाही खटकतय.
सीमा आणि मायकल एकत्र येऊन या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरवितात. तपासाअंती स्टिफन मनोरुग्ण आहे असे सीमा कोर्टात सांगते .
पण सत्य काही वेगळेच आहे.
काय आहे स्टिफनचे सत्य ? त्याने नक्की किती आणि कोणाचे खून केलेत ? त्यामागे नक्की हेतू काय आहे ?
कदाचित दुसऱ्या भागात आपल्याला संपूर्ण सत्य कळेल .पण आता जे आपल्याला कळले ते हादरविणारे आहे .
गोमटी शंकर स्टिफनच्या प्रमुख भूमिकेत आहे.
उत्कंठा वाढविणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Monday, December 8, 2025

dies irae

DIES IRAE
डायस इराई
रोहन एक आर्किटेक्ट .त्याची स्वतःची फर्म आहे.आलिशान बंगल्यात एकटाच राहतो. सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत खेळतो ,पार्टी करतो .एक छान आयुष्य जगतोय.
कनी भरतनाट्यम डान्सर .ती रोहनची क्लासमेट होती.काहीकाळ रोहनच्या प्रेमात होती.रोहनच्या आयुष्यात काही तरुणी आल्या त्यातील ती एक . अचानक तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.तिच्या आत्महत्येचे कारण माहीत नाही.
रोहनला ही गोष्ट कळली आणि तो मित्राला सोबत घेऊन तिच्या घरी गेला.तिच्या भावाला किरणला भेटला.किरण अस्वस्थ वाटत होता. 
रोहन घरी आला पण आपल्या घरात कोणीतरी आहे असा त्याला भास होऊ लागला.आपल्या मनातून कनी जात नाही म्हणून असे भास होत असतील असे तो समजून चालत होता पण ते भास वाढू लागले .त्याच्यावर कोणतरी हल्ला करतोय असे वाटू लागले .
नाईलाजाने त्याने कनीचे शेजारी मधूला जाऊन भेटला .सोळा दिवस आत्मा पृथ्वीवर फिरत असतो कदाचित त्याचा त्रास होत असेल असे मधू सांगतो .
तरीही रोहनचे भास कमी होत नाहीत.आता तर त्याच्यासमोर किरणवर जीवघेणा हल्ला होतो .हल्ला करणारा रोहनला दिसत नाही. पण या हल्ल्यामागे कनी नक्की नाही याची खात्री रोहन आणि मधूला पटते.ते कनीच्या आत्महत्येची कारणे शोधायचा प्रयत्न करतात आणि एका भयानक सत्य त्यांच्यासमोर येते.
सुपरस्टार मोहनलालचा मुलगा प्रणव मोहनलाल यात रोहनच्या प्रमुख भूमिकेत आहे.अतिशय संयमित अभिनय केला आहे. संपूर्ण चित्रपटात त्याचाच वावर आहे आणि आपणही त्याच्यासोबत असतो.
थ्रिलर आणि हॉरर प्रकारातील हा चित्रपट आपला श्वास रोखून धरायला लावतो. चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.