Monday, September 21, 2026

वालथू वशथे कल्लन्न*

*वालथू वशथे कल्लन्न*

अँथनी हा हुशार पण भ्रष्ट पोलीस अधिकारी आहे. सध्या त्याचे आणि त्याचा मुलगा फिलिप याचे संबंध ताणले गेले आहेत, म्हणून दोघेही थेरपी घेत आहेत. एका तरुण मुलीची केस तो हुशारीने तिच्यावरच उलटवतो आणि हा धक्का सहन न झाल्याने ती मुलगी आत्महत्या करते. आयरीन सॅम्युअल नावाची सामाजिक कार्यकर्ती अँथनीविरुद्ध तक्रार करते.

एका वर्षानंतर आयरीन आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी गावी येते. तिचे वडील सॅम्युअल सायबर सिक्युरिटीमधील तज्ज्ञ आहेत. त्यांना भेटून गेल्यानंतर आयरीन गायब होते आणि काही दिवसांनी तिचे प्रेत सापडते.

आयरीनच्या खुनामागे कोणाचा हात असेल? सॅम्युअल सत्य शोधून काढतो. तो सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ असल्यामुळे अत्यंत शांतपणे खुन्याभोवती आपले जाळे विणतो. दर वेळी तो अँथनीसाठी काही छोटे पुरावे मागे सोडतो. ते पुरावे एकत्र केल्यावर आपल्यासमोर एक वेगळीच कथा उभी राहते.

अत्यंत साधी, संथ आणि हिंसाविरहित असलेली ही सूडकथा शेवटपर्यंत आपल्याला गुंतवून ठेवते. खुनी कोण असेल याची कल्पना आपल्याला येते, पण शेवटच्या क्षणी वेगळीच व्यक्ती आपल्यासमोर उभी राहते.

हा चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

रिचर सीझन ४

Reacher – Season 4

रिचर सीझन ४

मेट्रोच्या एका कोपऱ्यात बसलेली ती स्त्री रिचरला संशयास्पद वाटली. ती अस्वस्थ दिसत होती. आपल्या स्वभावानुसार रिचर तिच्यापाशी गेला. त्या वेळी मेट्रोत मोजकीच माणसे होती. तिचे नाव अ‍ॅना होते. रिचर पोलीस असल्याचे कळताच तिने बॅगेतून बंदूक काढली आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली.

या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी तामरा ग्रीनकडे होती. तपासादरम्यान अ‍ॅना एफबीआयमध्ये काम करत होती, हे समोर आले. तिला एक मोठा मुलगा आहे आणि जेकब नावाचा भाऊ आहे, जो पोलीस आहे.

पोलीस स्टेशनबाहेर पडताच काही गुंड रिचरकडे पेनड्राइव्हची विचारणा करतात. अ‍ॅनाने मरण्यापूर्वी एक पेनड्राइव्ह रिचरकडे दिला असावा, असा त्यांना संशय असतो.

पण त्या पेनड्राइव्हमध्ये असे काय आहे, ज्यासाठी लोकांच्या हत्या होत आहेत? रिचर त्या पेनड्राइव्हचा शोध घेण्याचे ठरवतो. त्यासाठी तामरा ग्रीन आणि जेकब त्याच्या मदतीला येतात. मात्र, हे प्रकरण वाटते तितके सोपे नसते.

इंडोनेशियातून आलेल्या दोन स्त्रियाही त्या पेनड्राइव्हच्या शोधात असतात. त्यांनीच अ‍ॅनाकडे तो पेनड्राइव्ह मागितला होता.

या पेनड्राइव्हचा संबंध आता जॉन सॅम्पसनशी जोडला जातो. जॉन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उभा आहे. तो पूर्वी स्पेशल फोर्समध्ये होता आणि त्याने इंडोनेशियात काही वर्षे काम केले होते.

प्रकरण वाटते त्याहूनही अधिक गुंतागुंतीचे आणि गंभीर आहे. या सगळ्यामागचे रहस्य रिचर उलगडू शकेल का? पेनड्राइव्हमध्ये नेमके काय दडले आहे? आणि या सगळ्या घटनांचा जॉन सॅम्पसनशी काय संबंध आहे? हे जाणून घेण्यासाठी सिरीज पाहावी लागेल.

ली चाइल्ड यांच्या जॅक रिचर या व्यक्तिरेखेवर आणि *Gone Tomorrow* या पुस्तकावर आधारित अप्रतिम सिरीज!

**प्राइम व्हिडिओवर हिंदी भाषेत उपलब्ध.**

Thursday, September 17, 2026

आत्महत्या

आत्महत्या

दत्तगुरू गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जनार्दन कवठेकर फारच हौशी माणूस. आपला गणपती सगळ्यात वेगळा असावा, असेच त्यांना वाटे आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही झाले होते. दरवर्षी काहीतरी वेगळेपणा आणून गणेशोत्सव साजरा करीत. उंच मूर्ती, भव्य मिरवणुका, विविध देखावे, चलचित्रे, ह्या सगळ्या त्यांच्याच कल्पना. हल्ली बाप्पाचे आगमन आठवडाभर आधीच करायचे, हीदेखील त्यांचीच कल्पना.

यावर्षीही काहीतरी भव्यदिव्य करायचे, हे त्यांच्या डोक्यात होते आणि त्याची तयारीही त्यांनी सुरू केली होती.

“ह्या जनार्दनभाऊंमुळे आपल्याला आठवडाभर आधीच खाली जायला मिळतं, बघ,” उंदीर बॅग भरत म्हणाला.

“आणि जाऊन करतोस काय? त्या रिकाम्या मंडपात एकटाच रात्रभर बसून असतोस. मूर्तिकाराला वेळ मिळेल तसा तुझा मेकअप करून जातो. कार्यकर्ते गप्पा मारत, पत्ते-कॅरम खेळत बसतात आणि तू घोरत पडलेला असतोस,” तोही आपली बॅग भरत संतापाने म्हणाला.

“पण आता तुमच्या आठवडाभर आधी जाण्याची चर्चा इथे होऊ लागलीय. या वर्षी दुर्गामातेनेही तीन दिवस आधी जाण्याची परवानगी मागितली आहे, असे ऐकून आहे,” इकडे-तिकडे पाहत उंदीर कुजबुजला.

“होय, तिचीही पाळी येईल. पण ती आपल्या इतकी सहनशील नाहीये. वेडेवाकडे प्रकार ती खपवून घेणार नाही,” तो सोंड हलवीत हसून म्हणाला. “पण यावर्षी जनार्दन कवठेकर मला कोणत्या रूपात दाखवतील, याची उत्सुकता आहे.”

आज त्याच्या आगमनाचा दिवस होता. दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त गर्दी दिसत होती. त्याच्या नावाचे टी-शर्ट, हातातील बँड, गळ्यातील मोठे लॉकेट विक्रीला ठेवले होते. यावर्षी मंडळाला प्रायोजकही भरपूर मिळाले होते, असे दिसत होते.

बंद मंडपात तो बसला होता. समोर मूर्तिकार त्याचा मेकअप करत होता. मात्र काम काही मनासारखे होत नव्हते, असेच वाटत होते.

शेवटी, “मुहूर्त निघून जातोय!” असे जनार्दन कवठेकर ओरडून म्हणाले आणि तो चमकला.

“मला मंडपातून बाहेर काढण्यासाठी मुहूर्त कधीपासून सुरू झाला?”

इतक्यात पडदा उघडला आणि त्याचा जयजयकार सुरू झाला. त्याचे दर्शन होताच उंदीर चमकला आणि जोरजोरात हसू लागला.

“साहेब, आजवर इतके अवतार घेऊन दुर्जनांचा नाश केलात. प्रत्येक वेळी मी तुमच्या मागे लपून तुमचे पराक्रम पाहिले. पण स्त्री-अवतारात तुम्ही कधी आणि कोणता पराक्रम केलात, ते सांगा?” असे म्हणत तो हसून गडाबडा लोळू लागला.

होय, यावर्षी जनार्दन कवठेकरच्या सुपीक डोक्यातून स्त्रीवेष धारण करून राक्षसाचा संहार करणारी मूर्ती बनवली होती. ती मूर्ती गरुडावर उभी होती आणि गरुड गोल पृथ्वीवर उभा होता.

“देवा, असे तुम्हाला जवळजवळ वीस दिवस उभे राहायचे आहे, लक्षात ठेवा,” प्रसादाचा तुकडा झेलून तोंडात टाकत उंदीर म्हणाला.

“अरे, आता तर हद्दच झाली! आता तर ही माणसे पौराणिक कथाच बदलू लागली आहेत. स्वतःच्या मर्जीने काहीही करू लागलेत. यांना योग्य वेळीच वठणीवर आणायला हवे,” तो संतापून म्हणाला.

त्याच्या आगमनाच्या मिरवणुकीत ढोल-ताशा पथक, बँड, लेझीम पथक, इतकेच काय, तर डीजेही वाजत होता. रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाला होता. सगळीकडे गोंधळाचे वातावरण होते.

त्याला तर संतापाने काय करू, असे झाले होते. अचानक त्याची नजर कोपऱ्यातील शाळेतील विद्यार्थ्यांवर गेली. आवाजाच्या गोंधळामुळे ती मुले भांबावून गेली होती. काही पालकांनी आपल्या दोन्ही हातांनी मुलांचे कान बंद केले होते.

अचानक एक तरुण डीजेच्या स्टेजवर चढून गेला आणि काही कळायच्या आत त्याने डीजेचा आवाज वाढविला.

आवाज वाढताच बाप्पाची मूर्ती खाली कोसळली.

“आतापर्यंत मनुष्य आत्महत्या करतात, असे ऐकून होतो. काहींना तर पाहिलेही होते. पण देवाने आत्महत्या करताना पहिल्यांदाच पाहिला मी!” उंदीर छद्मी हसत म्हणाला.

“मग काय करू? यांना शिक्षा करू?”

“अरे, वेडी भक्ती करतात ती माझ्यावर. त्यामुळे त्यांना ते स्वतःलाच कळत नाही की काय करतात. त्यांना असाच झटका द्यावा लागतो,” तो दुःखाने म्हणाला.

“तरी बरं, तुमच्या पडण्याने कोणी जखमी झाले नाही. तुमची जास्तच तोडामोड झाली, म्हणा. त्यामुळे यावर्षी इथे मुक्काम होणे कठीण दिसतंय. दुसरीकडे जाऊ,” उंदीर हात देऊन त्याला उठवीत म्हणाला.

“कोणी जखमी होणार नाही, याचीच काळजी घेऊन पडलो मी. कसेही असले, तरी माझेच भक्त आहेत ते. त्यांना शिक्षा होईल इतपत अपराध ते करत नाहीत. पण यातून काहीतरी बोध घ्यावा, हीच इच्छा.”

तो क्षणभर थांबला आणि म्हणाला,

“त्या डीजेच्या आवाजाने माझ्या मोठ्या कानांचे पडदेही फाटतील, तर इतरांची काय अवस्था होईल?”

असे म्हणत तो उंदरावर स्वार झाला.

श्री.किरण कृष्णा बोरकर

Tuesday, September 15, 2026

FAUDA 5

FAUDA 5

**फौंदा सीझन ५**

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासकडून इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागली गेली. शेकडो दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले आणि अनेक नागरिक मृत्युमुखी पडले. यामध्ये स्पेशल फोर्सच्या अधिकाऱ्याचे  इलीचे  संपूर्ण कुटुंब मारले गेले. त्याचे सहकारी डोरोन आणि स्टीव्ह यांनी सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. आजही इस्रायलमध्ये हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो.

या घटनेमुळे डोरोन, स्टीव्ह आणि इली हे तिघेही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेले आहेत. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. पण एके दिवशी इलीचा मित्र त्याला, इलीच्या कुटुंबावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचा फोटो दाखवतो. तो दहशतवादी सध्या फ्रान्समध्ये एक हॉटेल चालवत असल्याची माहिती मिळते. आपल्या कुटुंबाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इली फ्रान्सला जातो. डोरोन त्याला थांबवण्याचा, सावध करण्याचा प्रयत्न करतो, पण इली ऐकत नाही.

फ्रान्समध्ये इली त्या दहशतवाद्याची आणि त्याच्या साथीदाराची हत्या करतो. त्यांचा जुना साहेब गाबी, इलीला परत आणण्यासाठी डोरोनला फ्रान्सला पाठवतो, पण परिस्थिती आणखी चिघळते. त्यांचा साथीदार स्टीव्हसुद्धा मदतीसाठी फ्रान्सला येतो. मरण्यापूर्वी तो दहशतवादी आपल्या आणखी एका साथीदाराचे नाव सांगतो — जो आता प्रत्यक्षात इस्रायलसाठी दुहेरी एजंट (डबल एजंट) म्हणून काम करत असतो.

रागाच्या भरात डोरोन त्याला ठार मारतो, पण त्याच्याकडे एक फार मोठे गुपित असते — फ्रान्समध्ये हमासने इस्रायलविरुद्ध एक मोठा कट रचलेला असतो, जो ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यापेक्षाही जास्त भयानक असणार असतो. ती योजना नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी डोरोन आणि इली खोट्या नावाने त्या संघटनेत घुसखोरी करतात.

अशी कोणती योजना आहे, जी ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यापेक्षाही जास्त भयानक ठरेल?

नेटफ्लिक्सवरील अत्यंत लोकप्रिय अशा 'फौदा' मालिकेचा हा पाचवा सीझन नेहमीप्रमाणेच थरारक आहे. हा सीझन हिंदी भाषेत असला, तरी सुमारे ५०% संवाद हिब्रू आणि इंग्रजी भाषेत आहेत. मात्र फौदाच्या चाहत्यांना हा सीझन नक्कीच आवडेल.

परिक्षा


परिक्षा

या वर्षीची राष्ट्रीय शिक्षण परीक्षा गणेशोत्सव काळातच जाहीर झाली होती.पण त्याचा आशुतोष पराडकरवर काहीच फरक पडणार नव्हता.मागच्या वर्षी परीक्षेचा फॉर्म भरून आल्यावर त्याने बाप्पाच्या पुढ्यात हात जोडले होते आणि वर्षभर फक्त अभ्यास करेन  बाकी काहीही करणार नाही तेव्हा मला सांभाळून घ्यायची जबाबदारी तुझीच आहे .लक्ष ठेव असे बोलून मोकळा झाला होता.अर्थात त्यानेही तेव्हा सवयीनुसार तथास्तु बोलून मोकळा झाला होता . त्याचे तथास्तु ऐकून उंदराने मात्र कपाळावर हात मारून घेतला होता .

सर , हे मात्र अति होतेय.वर्षभर अभ्यास करणार असेही बोलतो आणि लक्ष ठेवा ,सांभाळून घ्या ,पास करा असाही दम देतो आपल्याला .नक्की काय म्हणायचे याला.अभ्यास केला तर पास होणारच ना ? हे झेन झी आपल्याला कधी आणि कसे शब्दात अडकवतील सांगता येत नाही .तो दात कोरत म्हणाला.

अरे आशुतोष चांगला मुलगा आहे आणि हुशार ही .तरीही त्याची आपल्यावर श्रद्धा आहे .आणि कोणत्याही परीक्षेला जाताना आपल्याला नमस्कार करून जायची पद्धतच आहे . बोलला असेल तो .त्याला आपल्या आशीर्वादाची गरज भासणार नाही नक्की .आणि तसाही तो फारसा उत्सुक नसतो आपले गुणगान करायला . सोड ,  आपण आपली तयारी करू .असे बोलून त्याने डोळे मिटले.

खरे तर राष्ट्रीय परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात .यातूनच पुढे चांगल्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होतो. विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करतात  आणि यांच्याकडे येऊन आशीर्वाद ही मागतात.हा कोणालाच नाराज करीत नाही सर्वाना तथास्तु बोलून मोकळा होतो..जो मनापासून मेहनत करेल तो पास होणारच .

मंदार कानडे राष्ट्रीय परीक्षेच्या कार्यालयात क्लार्क होता.कनिष्ठ कर्मचारी पदावर असल्यामुळे त्याच्याकडे फारसे कोणी लक्ष देत नसे . वरून साधा आणि भोळा दिसणारा मंदार आतून पक्का बेरकी होता .स्मार्टफोनच्या युगात अजूनही बटनाचा फोन वापरत होता . सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर टेबलावरच्या गणपतीची पूजा करायची आणि मान खाली घालून कामाला सुरवात करायची हाच दिनक्रम .

त्या दिवशीही आल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची पूजा केली आणि हळूच आजचे काम यशस्वीपणे पार पडू दे बाप्पा असे मनात म्हणाला .त्यानेही नेहमीप्रमाणे तथास्तु म्हटले आणि पटकन जीभ चावली.

का ? आता का जीभ चावली ? तो काय करणार आहे ते माहीत आहे ना तुम्हाला ? दिसतो साधा पण काय धंदे करतो ते आपल्याशिवाय कोणालाच माहीत नसेल ." उंदीर चिडून शेपटी आपटत म्हणाला .

अरे लक्षातच आले नाही बघ.कोणी काही मागितले की तथास्तु बोलायची सवय जात नाही बघ .पण याला यावर्षी काहीही करून थांबविले पाहिजे .तो डोळे मिटून विचार करीत पुटपुटला.

होय , मंदार कानडे राष्ट्रीय परीक्षेचे पेपर आधीच काही मोठ्या क्लासेस ला विकायचा धंदा करणार होता .यावर्षी त्याला ही संधी चालून आली होती .कधी नव्हे ती सेफची चावी त्याच्याकडे आली होती . 

पेपर फुटणार नाही याची खात्री सर्वाना होती .कारण त्या पेपरचे फोटो काढले तरी आज ना उद्या कळणार होते .झेरॉक्स काढणे ही धोकादायक होते  आणि मंदार कानडे साधा फोन वापरत होता आणि त्याने आपले काम सोडून दुसऱ्या कामात लक्ष दिले नव्हते .त्यामुळे संचालक बिनधास्त होते.

मंदार जेव्हा जेव्हा सेफ उघडत होता तेव्हा तो काही प्रश्न आपल्या डायरीत लिहून ठेवत होता .उद्या काही बोंबाबोंब झाली तर कोणताही पुरावा सापडणार नाही अशी काळजी घेत होता. अश्या तऱ्हेने संपूर्ण पेपर  लंच टाईमला बाप्पाच्या फोटोसमोरच आपल्या डायरीत लिहून काढला होता.

बघा तुमचा तथास्तु बोलण्याचा परिणाम ? छान ,आपल्या समोरच पेपर लिहून काढतोय. आता हा पेपर विकून लाखो रुपये कमवेल. देवा काहीतरी करा " उंदीर हात जोडत म्हणाला .

अरे मी काय करू ? मी देव आहे जादूगार नाही .मी काही चमत्कार करू शकत नाही " तो आपली सोंड फिरवत मिस्कीलपणे म्हणाला .

संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडताना मंदारने आठवणीने ती डायरी सोबत घेतली . गणेशोत्सव जवळ आल्यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते.हल्ली बरीच मंडळे आठवडाभर आधीच त्याला मंडपात घेऊन येत होते .बाप्पाचा आगमन सोहळा असे बॅनर ठिकठिकाणी लावून जल्लोषात स्वागत करीत होते अर्थात हे त्याला आवडत नव्हते .त्याच्या सुट्टीची चर्चा देवलोकात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत होती.तोही कंटाळला होता पुढे तर आपण इथे यायचे नाही या निर्णयावर येऊन ठेपला होता.

मंदार कानडे घाईघाईत स्टेशनकडे निघाला होता .रस्त्यातच एका बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक चालली होती.भक्तगण मोठ्या उत्साहात नाचत होते .मध्येच एकाने मंदारच्या हातात राजगिर्याच्या  दोन लाडूची कागदी पिशवी दिली.बाप्पाचा प्रसाद हातात घेऊन त्याने बाप्पाकडे पाहून हात जोडले आणि क्षणभर का होईना बाप्पा आपल्याकडे बघून हसतोय याचा भास झाला . तो घाईघाईने स्टेशनमध्ये शिरला आणि लोकलने घरी आला . 

घरी येताच त्याने हातातील बॅग टेबलवर ठेवील ,बाजूला रस्त्यात मिळालेला बाप्पाचा प्रसाद ठेवला त्याबाजूला आपली महत्वाची डायरी ठेवली आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये शिरला . त्याला फ्रेश व्हायला नेहमीच वेळ लागत होता .यावेळीही त्याने आपला वेळ घेतला आणि बाहेर आला .

बाहेर येताच समोरचे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला .कपाळावर हात मारून त्याने जमिनीवर बसकण मारली आणि रडू लागला .समोरच्या टेबलवर दोन उंदीर राजगिऱ्याचे  लाडू आणि त्याची डायरी कुरतडून खात होते .


Wednesday, September 9, 2026

Mousetrap

माउसट्रॅप
Mousetrap

जो मून जे हा एक प्रसिद्ध लेखक. त्याने लिहिलेलं द रॅट हे पुस्तक प्रचंड गाजलेलं आहे. आता त्याच्या या पुस्तकाचा दुसरा भाग येणार असतो; मात्र त्याआधीच जो मून जे अचानक गायब होतो.

जो मून जे एका आलिशान फ्लॅटमध्ये एकटाच राहतो. तो कधीही घराबाहेर पडत नाही. तो फक्त यू मिनला भेटतो. यू मिनच त्याचे सर्व व्यवहार पाहतो. विशेष म्हणजे, हा फ्लॅटदेखील यू मिनच्याच नावावर असतो.

एके दिवशी अचानक त्याचा फ्लॅट परस्पर विकला जातो. त्याचा फोन बंद होतो आणि त्याला घराबाहेर काढलं जातं. तो आपल्या मित्राला, यू मिनला शोधण्याचा प्रयत्न करतो; पण त्याच्याशी संपर्क होऊ शकत नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात येतं. मात्र, आपणच खरा जो मून जे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे एकही ठोस पुरावा नसतो.

सन याँग हा पोलीस अधिकारी. त्याला एका खबऱ्याकडून जो मून जेच्या फ्लॅटमध्ये एक संशयित असल्याची माहिती मिळते. मात्र, तिथे जो मून जेच राहत असतो.

दरम्यान, जो मून जे पुन्हा शहरात परतल्याची माहिती नो जाला मिळते. नो जा हा एकेकाळी सावकार असतो. जो मून जेने त्यालाही फसवलेलं असतं आणि त्यामुळे तो त्याच्या शोधात असतो.

पण या सगळ्या खेळात आणखी एक ट्विस्ट आहे. बाहेर आणखी एक व्यक्ती स्वतःला खरा जो मून जे असल्याचं सांगत असतो. तो दुसऱ्या जो मून जेलाच आपल्या इशाऱ्यावर नाचवत असतो.

हा सगळा खेळ म्हणजे उंदराला सापळ्यात अडकवण्याचा एक धक्कादायक डाव आहे. खरा जो मून जे कोण? आणि तोतया कोण? कोण कुणाला फसवतंय? या प्रश्नांची उत्तरं शोधताना ही कथा उत्कंठा आणि रहस्याचा ताण सतत वाढवत राहते.

कारण या खेळात एकच नियम आहे—जो जिवंत राहील, तोच खरा जो मून जे म्हणून पुढचं आयुष्य जगेल!

माउसट्रॅप ही ओळख, फसवणूक, रहस्य आणि अस्तित्वाच्या संघर्षाभोवती फिरणारी उत्कंठावर्धक थरारक मालिका आहे. शेवटपर्यंत नेमका खरा जो मून जे कोण आहे, याचा अंदाज लावणं कठीण जातं.

नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत उपलब्ध असलेली, कुटुंबासोबत पाहता येईल अशी ही थरारक सिरीज आहे.

Sunday, September 6, 2026

नथिंग टू लूज

नथिंग टू लूज

ली चाईल्ड

अनुवाद : उदय कुलकर्णी
मेहता पब्लिशिंग हाऊस

ली चाईल्ड यांचा जॅक रिचर एका नव्या कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. ‘होप’ आणि ‘डिस्पेअर’ ही एकमेकांना खेटून असलेली दोन गावे. होपमध्ये शांतता आहे, तर डिस्पेअर हे एका व्यक्तीच्या मर्जीवर चालणारे गाव आहे.

रिचरच्या भटक्या स्वभावामुळे तो डिस्पेअरमध्ये पोहोचतो. गावातील एकमेव हॉटेलमध्ये कॉफी पिण्यासाठी तो थांबतो; मात्र तिथे उपस्थित असलेले प्रत्येकजण त्याच्याकडे संशयाने पाहू लागतो. जणू काही तो या गावात नकोसाच आहे.

पोलिस त्याला पकडून कोर्टात उभे करतात आणि न्यायाधीश त्याला ‘भटका’ ठरवून गावाबाहेर जाण्याचा आदेश देतात. रिचरसाठी हे सगळेच विचित्र असते.

या गावात मेटल रीसायकलिंगचा एकमेव मोठा प्लांट आहे. गावातील जवळपास सर्वच लोक या प्लांटमध्ये नोकरी करतात. प्लांटच्या सुरक्षेसाठी मिलिटरीचा एक छोटा तळही तिथे आहे.

थरमन हा या प्लांटचा मालक. तो दररोज संध्याकाळी आपल्या खासगी विमानाने गावाबाहेर जातो आणि मध्यरात्री परततो.

रिचरला मात्र काही गोष्टी खटकतात. गावात एखाद्या परक्या व्यक्तीला राहू का दिले जात नाही? प्लांटमध्ये नेमके काय चालले आहे? या सगळ्यामागे कोणते रहस्य दडले आहे?

होपमधील एका तरुण महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने रिचर या प्रश्नांची उत्तरे आणि त्यामागचे सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो.

पण त्या प्लांटमध्ये असे काय सुरू आहे, जे रिचरच्या जीवावरही बेतू शकते?

ली चाईल्डच्या जॅक रिचर मालिकेतील ही एक भन्नाट, रहस्यमय आणि उत्कंठावर्धक कादंबरी आहे.

Saturday, September 5, 2026

NEWTON'S 3RD LAW

NEWTON'S 3RD LAW

न्यूटनचा तिसरा नियम

“प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते.” हा न्यूटनचा तिसरा नियम. हाच नियम आपण केलेल्या कर्मालाही लागू पडतो, असे या चित्रपटातून दाखवून दिले आहे.

चित्रपटात दोन घटना समांतरपणे घडताना दिसतात.

विनयला रात्री तीन वाजता एक फोन येतो. घरात रात्रभर आई-वडिलांचे भांडण सुरू असते. त्या भांडणाला कंटाळून तो फोन घेऊन गच्चीवर जातो आणि गच्चीवरून पडून त्याचा मृत्यू होतो.

या प्रकरणाचा तपास पोलीस ऑफिसर वासुदेव करत असतो. हा मृत्यू आत्महत्या किंवा अपघात नसून खून आहे, असे सिद्ध करून तो विनयच्या वडिलांना अटक करतो.

मात्र, विनयचे वागणेही संशयास्पद असते. तो जास्त दारू प्यायल्यानंतर काही गोष्टी विसरतो. हल्लीच तो घरात एका वस्तूचा शोध घेत असतो; मात्र ती वस्तू त्याला सापडत नाही. त्याचा एकमेव मित्र कार्तिक रोज पब्लिक टेलिफोनवरून त्याला फोन करत असतो. विशेष म्हणजे, विनयच्या मोबाईलवर आलेला शेवटचा फोन कुप्रसिद्ध माफिया मर्क्युरीचा असतो.

मग विनय आणि मर्क्युरीचा नेमका काय संबंध असतो? हा प्रश्न चित्रपट पाहताना सतत मनात राहतो.

दुसरीकडे, ज्योतीचा नवरा विष्णू दुसऱ्या गावात काम करत असतो. त्यांना श्राव्या नावाची छोटी मुलगी असते. विष्णूचा फॅक्टरीत झालेल्या अपघातात मृत्यू होतो. ही बातमी ऐकल्यानंतर ज्योती श्राव्याला घेऊन रात्रीच गावाकडे निघते; मात्र वाटेत तिचाही अपघाती मृत्यू होतो आणि श्राव्या पोरकी होते.

दरम्यान, वासुदेव विनयचे नेमके कोणाशी संबंध होते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. तपासाची दिशा पुढे जात असताना तो कार्तिकला अटक करतो आणि त्यातून एक असे भयानक सत्य समोर येते, ज्याची कल्पनाही आपण केलेली नसते.

२ तास १५ मिनिटांचा हा चित्रपट आपल्याला जागेवरून हलू देत नाही. एकामागून एक घडणाऱ्या अनपेक्षित घटना पाहून आपण अक्षरशः हादरून जातो. चित्रपट जसजसा पुढे जातो, तसतसे नक्की कोणावर विश्वास ठेवायचा, हेच कळेनासे होते.

चित्रपटात जगपती बाबू, रवी वर्मा, श्रीनिवास आणि सुमंत यांसारख्या दमदार कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे.

हा चित्रपट Netflix वर हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

रहस्य, थरार आणि अनपेक्षित ट्विस्ट आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे.

Tuesday, August 25, 2026

चेसिंग टुमारो

चेसिंग टुमारो

लेखक : सिडनी शेल्डन / टिली बॅगशॉ
अनुवाद : मेघना जोशी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

ज्यांनी ‘इफ टुमारो कम्स’ ही कादंबरी वाचली असेल, त्यांना ‘चेसिंग टुमारो’मधील पात्रे नक्कीच ओळखीची वाटतील. हे पुस्तक ‘इफ टुमारो कम्स’ या कादंबरीचा उत्तरार्ध किंवा दुसरा भाग आहे.

ट्रेसी आणि जेफ लग्न करून आपले आयुष्य शांतपणे जगत आहेत. जेफ ब्रिटिश म्युझियममध्ये कामाला आहे. दोघांनीही चोरीची कामे सोडून दिली आहेत. मात्र, भूतकाळ कधीच तुमची पाठ सोडत नाही.

एका गैरसमजातून ट्रेसी आणि जेफ वेगळे होतात. ट्रेसी त्याच्या आयुष्यातून दूर निघून जाते. या घटनेला तब्बल नऊ वर्षे उलटली आहेत. आता ट्रेसीला निकोलस नावाचा मुलगा आहे.

दरम्यान, शहरात वेश्यांचे अतिशय क्रूरपणे खून होत आहेत. या महिलांचा एकमेकींशी काहीही संबंध नाही. इंटरपोलचा अधिकारी जीन या खुनांचा तपास करत आहे. तपास करताना त्याच्या लक्षात एक विचित्र गोष्ट येते. प्रत्येक खुनाच्या चोवीस तास आधी शहरात मोठ्या किमतीच्या जवाहिरांची आणि मौल्यवान वस्तूंची चोरी झालेली असते.

या चोरींचा आणि खुनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचा शोध जीन घेण्यास सुरुवात करतो आणि या तपासात ट्रेसीचे नाव समोर येते.

जीन तपास पुढे नेत असताना त्याला जेफवर संशय येतो. मात्र, ट्रेसीला खात्री आहे की जेफ किंवा ती स्वतः या खुनांमागे असू शकत नाहीत. मग या सगळ्यामागे कोण आहे? ट्रेसी आणि जेफचा असा कोण शत्रू आहे, जो त्यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे?

या प्रश्नांची उत्तरे शोधताना कथा अधिकाधिक गुंतत जाते आणि वाचकाची उत्कंठा शेवटपर्यंत कायम राहते.

‘चेसिंग टुमारो’ हे पुस्तक ‘इफ टुमारो कम्स’पेक्षा अधिक रोमांचक, थरारक आणि चित्तथरारक वाटते. रहस्य, गुन्हेगारी, नातेसंबंध आणि सतत वाढत जाणारी उत्कंठा यामुळे हे पुस्तक वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

Friday, August 21, 2026

वधानधी

Vadhandhi – वधानधी

“पोलीस असणे हा एक शापच आहे,” असे सिनियर इन्स्पेक्टर मुसा रझा केसचा तपास पूर्ण झाल्यानंतर म्हणतो. हीच भावना या मालिकेच्या संपूर्ण कथेला एक वेगळी खोली देते.

मुसा रझा हा एक प्रामाणिक पोलीस अधिकारी आहे. नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणे आणि त्यासाठी आपल्या नोकरीचीही पर्वा न करणे, हा त्याचा स्वभाव. तो अतिशय शांतपणे वागतो आणि समोरच्या व्यक्तीशी नेहमी आदराने बोलतो. कदाचित त्याच्या याच स्वभावाचा परिणाम म्हणून त्याची पोस्टिंग एका छोट्या गावात केली जाते, जिथे फारशा सुविधाही उपलब्ध नाहीत.

या गावातून नॅशनल हायवे जाणार असतो; मात्र अनेक गावकऱ्यांचा त्याला विरोध असतो. हायवेसाठी होणाऱ्या भूमिपूजनाच्या वेळी खोदकाम सुरू असताना तिथे एक मानवी सांगाडा सापडतो. हा सांगाडा नेमका कोणाचा आहे, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसते.

एसपी राधिका नायर मुसा रझाला या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी सोपवतात. मुसा रझा अवघ्या दोन दिवसांत त्या सांगाड्याची ओळख पटवतो आणि हे प्रकरण तामिळनाडूमधील मणी नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. या प्रकरणात मणीला आधीच दोषी ठरवून शिक्षा झालेली असते.

मुसा रझा मणीला भेटतो. मात्र मणी या गुन्ह्यात निरपराध असल्याचा संशय त्याला येतो. त्याचे वरिष्ठ अधिकारी डीएनए रिपोर्ट येण्याची वाट न पाहताच मणीला दोषी ठरवून मोकळे होतात आणि मणीला शिक्षा होते.

मात्र नंतर आलेल्या डीएनए रिपोर्टमध्ये प्रेतावर तिसऱ्या व्यक्तीचा डीएनए सापडतो आणि संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळते. या अहवालामुळे सर्वांनाच धक्का बसतो. मुसा रझा आपल्या प्रयत्नांनी केस पुन्हा उघडतो आणि नव्याने तपासाला सुरुवात करतो.

मणीची प्रेयसी आणि त्याची बहीण या दोघींचाही खून झालेला असतो आणि हे खून मणीनेच केले आहेत, असे सर्वांना वाटत असते. मात्र मणी स्वतः याबाबत काहीही बोलण्यास तयार नसतो.

या तपासादरम्यान एसपी राधिका नायर आणि मुसा रझा या दोघांवरही वरिष्ठांकडून प्रचंड दबाव असतो. संशयाच्या भोवऱ्यात येणाऱ्या व्यक्तींच्या डीएनए चाचण्या केल्या जातात; मात्र प्रत्येक वेळी अहवाल निगेटिव्ह येतो आणि संशयित सुटत जातात.

अनेक अनपेक्षित वळणे घेत हा तपास मुसा रझाची अक्षरशः परीक्षाच घेत राहतो. प्रत्येक नव्या धाग्याबरोबर गूढ अधिकच वाढत जाते. शेवटी या प्रकरणाचे सत्य बाहेर येते आणि ते सर्वांसाठीच धक्कादायक ठरते.

पहिल्या सीझनचा दुसऱ्या सीझनशी कोणताही संबंध नाही. दोन्ही सीझनमध्ये स्वतंत्र तपासकथा आहेत. दुसरा सीझन अतिशय संथपणे पुढे सरकतो; मात्र त्याच वेळी तो प्रेक्षकांची उत्कंठा सातत्याने वाढवत राहतो. कथा घाईघाईने पुढे नेण्याऐवजी प्रत्येक पात्र, प्रसंग आणि तपासातील बारकावे हळूहळू उलगडले जातात.

एस. ससीकुमार यांनी इन्स्पेक्टर मुसा रझाची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली आहे. त्यांचा मुसा रझा हा नेहमीच्या आक्रमक पोलिस अधिकाऱ्यापेक्षा वेगळा वाटतो. तो समोरच्याला धमकावण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अनेक प्रसंगी तो पोलीस अधिकारी कमी आणि समुपदेशक अधिक वाटतो. हेच या मालिकेच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.


 वधानधी’ ही संथ गतीने पुढे जाणारी, पण रहस्य आणि उत्कंठा कायम ठेवणारी तपासकथा आहे. सत्य शोधण्याच्या प्रवासात एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याला कोणत्या मानसिक आणि व्यावसायिक संघर्षांना सामोरे जावे लागते, हे मालिका प्रभावीपणे दाखवते.

‘ही सिरीज  प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

Tuesday, August 11, 2026

उयीर

Uyir – उयीर

एसआय अजीब प्रोबेशनवर असतो. लहानपणी रेल्वेने प्रवास करताना त्याची बहीण अचानक हरवलेली असते. तिचा आजपर्यंत काहीही शोध लागलेला नसतो. बहिणीच्या हरवण्याची ही रुखरुख अजूनही अजीबच्या मनात कायम असते.

आता अजीबची एका छोट्या गावातील पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती झालेली असते. एके दिवशी एका विहिरीत महिलेचा मृतदेह सापडल्याची बातमी पोलिसांना मिळते. प्रथमदर्शनी तिने आत्महत्या केली असावी, असेच सर्वांना वाटते.

नेहमीच्या प्रक्रियेनुसार पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवली जाते. मृत महिलेचे नाव शोभा असल्याचे समजते. तिला दोन मुले आणि नवरा असल्याची माहिती मिळते. पोलिस तिच्या नवऱ्याचा शोध घेतात आणि त्याच्याकडे मृतदेह सोपवतात. आपली मुले बहिणीकडे असल्याचे सांगून तो मृतदेह घेऊन जातो.

मात्र, त्यानंतर डॉक्टरांकडून धक्कादायक माहिती मिळते—शोभाने आत्महत्या केलेली नसून तिचा खून झालेला असतो!

या खुलाशामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरते. त्यातच शोभाचे नातेवाईक पुढे येतात आणि एक धक्कादायक सत्य सांगतात. राजू हा शोभाचा नवरा नाही आणि तिची मुलेही त्यांच्या बहिणीकडे नाहीत.

वरिष्ठ अधिकारी पोलिसांना चोवीस तासांच्या आत शोभाचा कथित नवरा राजू याला अटक करण्याचे आदेश देतात. पोलिस राजूचा माग काढतात आणि अखेर त्याला अटक करतात.

पण आता एक मोठा प्रश्न उभा राहतो—शोभाची मुले कुठे आहेत?

इथून एका वेगळ्या तपासाला सुरुवात होते.

पोलिसांच्या मते, खुन्याला अटक झाली म्हणजे त्यांची जबाबदारी संपली. मात्र, एसआय अजीबला या मुलांचा शोध घेणे ही आपलीही जबाबदारी वाटते. कारण त्याला स्वतःच्या बहिणीची आठवण येत असते. आपल्या बहिणीप्रमाणे या मुलांचीही अवस्था होऊ नये, यासाठी तो त्यांना शोधून काढण्याचा निर्धार करतो.

पण अजीबसमोरचे आव्हान सोपे नसते. “ही मुले सापडणारच नाहीत. अशी मुले कधीच सापडत नाहीत, असा इतिहास आहे,” असेच त्याला आजूबाजूचे लोक सांगत असतात.

मग कुठे असतील ती मुले?
अजीब त्यांना शोधून काढू शकेल का?
आणि या मुलांचा शोध घेताना अजीबच्या स्वतःच्या भूतकाळातील जखम पुन्हा उघडेल का?

सुरुवातीला साधा आणि सरळ वाटणारा खुनाचा तपास पुढे एका वेगळ्याच भावनिक पातळीवर पोहोचतो. मुलांचा शोध घेताना अजीबची स्वतःच्या हरवलेल्या बहिणीशी जोडलेली भावनिक नाळ अधिक घट्ट होत जाते आणि कथा प्रेक्षकांना अक्षरशः हेलावून टाकते.

‘Uyir – उयीर’ हा चित्रपट हिंदी भाषेत हॉटस्टारवर पाहता येतो.

Tuesday, August 4, 2026

कॉन सिटी

Con City 

कॉन सिटी

एका छोट्याशा गावात सर्वना आपल्या पत्नी मित्रा अपंग मुलगा जीवा, मेव्हणा जॅकी आणि आई जानकीसोबत साधं आणि सुखी आयुष्य जगत असतो. सर्वना एक छोटंसं हॉटेल चालवतो. तो फारसा बोलत नाही आणि त्याच्या कुटुंबातही संवाद काहीसा कमीच आहे.

त्याचा मुलगा जीवा व्हीलचेअरवर बसून दररोज शाळेत जातो. आयुष्य अगदी शांतपणे सुरू असताना अचानक एक दिवस सर्व काही बदलून जातं...

जीवा शाळेतून घरीच परतत नाही!

कुटुंबीय त्याचा शोध घेण्यास सुरुवात करतात. त्यानंतर शाळेतील सीसीटीव्ही फुटेज समोर येतं. त्यामध्ये एक व्यक्ती जीवाला सोबत घेऊन जाताना स्पष्टपणे दिसते.

पण त्या व्यक्तीचा चेहरा पाहताच सर्वना आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकते!

कारण तो अनोळखी नसतो... तो त्यांच्या भूतकाळाशी जोडलेला असतो.


जीवाचं अपहरण नेमकं का करण्यात आलं?
अपहरणकर्त्याचा सर्वनाच्या कुटुंबाशी काय संबंध आहे?
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जीवाला सुखरूप परत मिळवण्यासाठी या कुटुंबाला नेमकं काय करावं लागणार आहे?

अपहरणकर्ता सर्वना आणि त्याच्या कुटुंबासमोर एक अशक्यप्राय काम ठेवतो. हे काम पूर्ण करण्याची क्षमता फक्त सर्वना आणि त्याच्या कुटुंबाकडेच आहे.

जर त्यांनी हे काम यशस्वीपणे पूर्ण केलं, तर अपहरणकर्त्याला आयुष्यभर बसून खाईल एवढी प्रचंड रक्कम मिळणार आहे.

पण हे काम जितकं धोकादायक आहे, त्याहूनही भयानक आहे त्यामागचं सत्य...

कारण या संपूर्ण खेळाचा संबंध सर्वना आणि त्याच्या कुटुंबाच्या भूतकाळाशी आहे.

आता सर्वना आणि त्याचं कुटुंब या रहस्यमय चक्रातून बाहेर पडू शकेल का? की परिस्थिती त्यांना आणखी खोलवर घेऊन जाईल?

जीवा सुखरूप घरी परत येईल का? आणि या सगळ्यामागे नेमकं कोण आहे?

सुरुवातीला अतिशय साधी, सरळ आणि संथ गतीने पुढे जाणारी ही कथा जसजशी पुढे सरकते, तसतशी तिचा वेग वाढत जातो. त्यानंतर एकामागून एक असे अनपेक्षित ट्विस्ट समोर येतात, जे प्रेक्षकांना अक्षरशः धक्का देतात.

चित्रपटात अर्जुन दास, अन्ना बेन आणि योगी बाबू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कॉन सिटी हा रहस्य, थरार आणि भूतकाळातील गूढ घटनांनी भरलेला चित्रपट आहे. हा चित्रपट  नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत पाहता येतो.

जर तुम्हाला रहस्य आणि थरारक कथा आवडत असतील, तर हा चित्रपट नक्कीच एकदा पाहायला हरकत नाही.

Thursday, July 30, 2026

रॉ हिटमॅन

रॉ हिटमॅन
लेखक: एस. हुसेन झैदी
अनुवाद: उल्का राऊत
प्रकाशक: मंजुल पब्लिशिंग हाऊस

सप्टेंबर २०११ मध्ये उत्तराखंडमधील नैनितालजवळील भोवालीच्या जंगलात कुप्रसिद्ध गँगस्टर राजेंद्र (राजू) परगई आणि अमित आर्य यांची निर्घृण हत्या झाली. ही हत्या भारत सरकारच्या एका गुप्त संघटनेने घडवून आणल्याची चर्चा होती. ही मोहीम पार पाडणारा एजंट 'लिमा' असल्याचे सांगितले जात होते. या घटनेने संपूर्ण उत्तराखंड हादरून गेला. राजू परगईचे अनेक प्रभावशाली राजकारण्यांशी संबंध असल्याच्याही चर्चा रंगल्या.

दुसऱ्याच दिवशी लक्ष्मण उर्फ 'लकी' बिष्ट या एनएसजी (NSG) कमांडोला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. लकीने इस्रायलमध्ये विशेष कमांडो प्रशिक्षण घेतले होते आणि अनेक धोकादायक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या होत्या. तो तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या सुरक्षा पथकातही कार्यरत होता.

राजू परगई आणि अमित आर्य यांच्या हत्येचा आरोप लकीवर ठेवण्यात आला.

खरोखरच एजंट 'लिमा' बनून लकीने या दोघांचा खून केला होता का? जर तसे असेल, तर सरकारने त्याला तब्बल पाच वर्षे तुरुंगात का ठेवले? त्याला सतत वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये का हलविण्यात आले? गुप्तचर संस्था त्याच्या बाबतीत मौन का बाळगत राहिल्या? आणि देशासाठी अनेक धोकादायक मोहिमा पार पाडणाऱ्या एका कमांडोला पोलिसांकडून इतकी अपमानास्पद वागणूक का देण्यात आली?

प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर आधारित हे पुस्तक या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत वाचकाला शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवते.

Monday, July 20, 2026

द किल लिस्ट

द किल लिस्ट
लेखक : फ्रेडरिक फोरसाइथ
अनुवाद : बाळ भागवत
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

वॉशिंग्टनमधील एका अतिगोपनीय ठिकाणी एक छोटीशी यादी सुरक्षित ठेवलेली आहे. त्या यादीत अशा कुप्रसिद्ध व्यक्तींची नावे असतात, ज्यांना अटक करून न्यायालयात उभे करण्याऐवजी थेट ठार मारण्याचे आदेश दिलेले असतात. ही 'किल लिस्ट' दर मंगळवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पाहणीनंतर अद्ययावत केली जाते.

यावेळी या यादीत एका नव्या नावाची भर पडली आहे. पण तो नेमका कोण आहे? तो कुठे राहतो? त्याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल कोणालाच काहीच माहिती नाही. एवढेच नव्हे, तर जगातील कोणत्याही देशाच्या गुप्तचर संस्थेकडे त्याचा साधा फोटोदेखील उपलब्ध नाही. सर्वांनी त्याला 'प्रीचर' हे टोपणनाव दिले आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून तो जहाल आणि चिथावणीखोर भाषणे देऊन तरुण मुस्लिमांना कट्टरतेकडे प्रवृत्त करतो. त्याच्या प्रभावामुळे अमेरिकेत आठ, तर ब्रिटनमध्ये पाच आत्मघातकी हल्ले घडले आहेत. या हल्ल्यांत राजकारणी, लष्करी अधिकारी आणि उद्योगपती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा बळी गेला आहे.

टोसा ही अशी गुप्त संस्था आहे, जी किल लिस्टमधील व्यक्तींना शोधून त्यांचा कायमचा बंदोबस्त करते. आता प्रीचर हेच त्यांचे प्रमुख लक्ष्य आहे. ट्रॅकर हा टोसाचा सर्वात कुशल शिकारी आहे. त्याचे खरे नाव आणि पद फारच मोजक्या लोकांना माहीत आहे. एरियल हा संगणक क्षेत्रातील एक अफलातून हॅकर आहे. घरातील पोटमाळ्यावर बसून तो जगातील कोणत्याही संगणक प्रणालीमध्ये घुसखोरी करू शकतो. प्रीचरचा माग काढण्यात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

हातात कोणताही ठोस पुरावा नसताना ट्रॅकर प्रीचरचा शोध घेऊन त्याला ठार मारू शकेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना वाचक एका जबरदस्त थरारक, वेगवान आणि उत्कंठावर्धक प्रवासात ओढला जातो. शेवटच्या पानापर्यंत हा थरार वाचकाची उत्सुकता कायम ताणून धरतो.

Monday, July 6, 2026

द सिम्पल ट्रूथ ... डेव्हिड बॉल्डची


द सिम्पल ट्रूथ ... डेव्हिड बॉल्डची 

अनुवाद ...सुधाकर लवाटे

मेहता पब्लिशिंग हाऊस

रुफस हार्म्स गेल्या पंचवीस वर्षांपासून फोर्ट जॅक्सनच्या मिलिटरी तुरुंगात एका लहान मुलीची हत्या करण्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगतोय.तो प्रचंड देहाचा  काळा उंच  आहे. आता त्याची स्मरणशक्ती गेलीय पण त्याला तो प्रसंग आठवतोय.  लहान भाऊ जोश  त्याला नियमितपणे भेटायला येतो .

आज त्याला मिलिटरी कडून एक पत्र आलंय .ज्या पत्राने त्याच्या आयुष्याची दिशा बदलली जाणार आहे .ते पत्र वाचून त्याने वकिल रायडरला फोन करून भेटायला बोलावले. रायडरला भेटायला बोलावताना त्याने काही सूचना केल्या .तो येताच अत्यंत शिताफीने ते पत्र त्याला दिले आणि एकदम सुप्रीम कोर्टात अपील करण्यास सांगितले.

ते पत्र वाचून रायडर ही हादरला .त्याने सुप्रीम कोर्टात अपील केले.  कोर्टात  क्लार्क मायकेल फिस्कने ते अपील वाचले आणि पुढे पाठवायच्या आधी त्याने रुफसला भेटायचे ठरविले.

मायकेल रुफसला भेटताच त्याचे मरण निश्चित आहे हे रुफसला कळले . कारण आता रुफसवर कोणतरी करडी नजर ठेवून होता.त्याच्या प्रत्येक हालचाली आणि संवाद टिपले जात होते .पत्रात काय आहे हे रुफसच्या शत्रूंना कळले आणि त्यांनी मायकेलचा खून केला .रायडर आणि त्याच्या पत्नीला देखील ठार करण्यात आहे .

मायकेलचा भाऊ जॉन पूर्वी पोलिसात होता. पण आता तो बचाव पक्षाचा वकील म्हणून काम करतोय.  त्याला मायकेलच्या मृत्यूची बातमी कळली आणि निरीक्षण करताना तो खून आहे असे समजले .तो शोध घेताना रुफसच्या नावापाशी पोचला आणि सुरू झाला एक रहस्यमय तपास.

रुफसचे अपील कोर्टात जाऊ नये आणि त्यासाठी वाटेल ते करायचे यासाठी काहीजण प्रयत्न करतायत .ती माणसे शक्तिशाली आहेत.

त्या पत्रात  असे काय आहे ? ज्यासाठी काहीजणांचा निर्दयपणे खून झालाय .जॉन फिस्कवर हल्ला झालाय. रुफसला मारण्याचे प्रयत्न केले जातायत .

एक थरारक वेगवान कादंबरी.

Thursday, July 2, 2026

SAMPRADAYINI SUPPINI SUDDAPOOSANI

SAMPRADAYINI SUPPINI SUDDAPOOSANI
संप्रदायिनी सुप्पीनी सुद्दापुसनी 
श्रीराम छोट्या गावात पंचायत सेक्रेटरी आहे..अतिशय साधा , शांत , प्रामाणिक आणि लोकांच्या भल्याचाच विचार करणारा . पण त्याचा मुलगा  आणि बायको त्याच्या विरुद्ध स्वभावाच्या. .मुलगा मिट्टू सतत रील बनविण्यात आणि लोकांच्या खोड्या काढण्यात मग्न तर बायको उत्तरा भांडखोर  , मारहाण करणारी .
गावात नवीन आलेला इंस्पेक्टर विक्रम भ्रष्ट्र  ऑफिसर आहे शिवाय त्याला बायकांचे वेड आहे.त्याचे आणि श्रीरामचे भर रस्त्यात भांडण झाले आणि त्याचाच अपमान मनात ठेवून तो संध्याकाळी श्रीरामच्या  घरी येतो. तिथे मिट्टू रील बनवायला त्याची बंदूक घेतो आणि त्यातून विक्रमचा खून होतो.
घरी आल्यावर श्रीरामला सगळी परिस्थिती कळते आणि तो हादरतो. उत्तरा त्याला शव लपविण्याची विनंती करते आणि दोघेही त्याचे मृत शरीर लपविण्याच्या प्रयत्नात शहराबाहेर पडतात.यासाठी श्रीराम शेजाऱ्याची गाडी घेतो .पण त्या गाडीत एक महत्वाची गोष्ट आहे जी एका मंत्र्याला हवीय.त्याची माणसे श्रीरामच्या मागावर निघाली आहेत. इंस्पेक्टर विक्रम ड्युटीवर नाही म्हणून एक पोलीस अधिकारी त्याच्या शोधात आहे .तोही श्रीरामच्या मागावर आहे..श्रीरामला विक्रमच्या मृत शरीराची विल्हेवाट लावायची आहे त्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी जातोय पण प्रत्येक वेळी काहीतरी अडचण येतेय.
शेवटी श्रीराम प्रेताची विल्हेवाट लावतो आणि सुटकेचा श्वास सोडणार इतक्यात एक निनावी फोन येतो आणि समोरचा श्रीरामला ब्लॅकमेल करू लागतो.
काय करेल श्रीराम ? काहीही करून त्याला आपल्या कुटुंबाला यातून सोडवायचे आहे .तो ब्लॅकमेलरला शोधून काढेल ? 
प्रथदर्शीनी हा एक गंभीर  चित्रपट असेल असे वाटते पण पुढे पुढे तो विनोदी रहस्यमय वाटेवर वळतो.चित्रपट शेवटपर्यंत आपल्याला हसवत खिळवत ठेवतो .
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, June 27, 2026

इलेव्हन्थ अवर

इलेव्हन्थ अवर

लेखक : एस. हुसैन झैदी
प्रकाशक : रोहन प्रकाशन

१९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांचा आरोप पुराव्यानिशी पाकिस्तानवर करण्यात आला होता. त्या कटामागील सत्य आणि त्यातील उरलेल्या धाग्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस सुपरिटेंडंट विक्रम सिंग आणि एनआयएचे अधिकारी मिर्झा तब्बल नऊ वर्षांपासून प्रयत्न करत आहेत.

आज पाकिस्तानचे उच्चायुक्त भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. नेहमीप्रमाणे ते राजकीय भाषेत गोलमोल उत्तरे देतात आणि संतापलेल्या विक्रम सिंगकडून त्यांना सणसणीत कानाखाली बसते. या घटनेनंतर विक्रमचे निलंबन निश्चित मानले जाते.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी विक्रमने पकडलेले इंडियन मुजाहिद्दीनचे पाच खतरनाक दहशतवादी भोपाळच्या तुरुंगातून पळून जातात. त्याच वेळी लक्षद्वीपला निघालेल्या तीस पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका क्रूझचे सोमालियन चाच्यांकडून अपहरण होते.

पोलीस दलातील काही मोजक्याच अधिकाऱ्यांना एक गुपित माहिती असते—१९९३ च्या बॉम्बस्फोटांमधील काही दारुगोळा अजूनही कुठेतरी लपवून ठेवलेला आहे आणि तो कधीही वापरला जाऊ शकतो. विक्रम आणि मिर्झाला संशय आहे की आता तो दारुगोळा वापरण्याची वेळ आली आहे.

क्रूझचे अपहरण, तुरुंगातून पळून गेलेले दहशतवादी आणि मुंबईवर घोंगावणारे संकट यांचा एकमेकांशी नक्कीच संबंध आहे; मात्र या सर्वांना जोडणारा पुरावा त्यांच्या हाती नाही.

अपहरणकर्त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?
त्या पाच अतिरेक्यांना तुरुंगातून कोणी पळवून नेले?
त्यांचा अंतिम उद्देश काय आहे?
आणि या संपूर्ण कटाचा शेवट कसा होणार?

'इलेव्हन्थ अवर' ही शेवटच्या पानापर्यंत वाचकाला खिळवून ठेवणारी, वेगवान आणि थरारक रहस्यकादंबरी आहे.

DRIDAM

ड्रीदम (DRIDAM) – अंगावर काटा आणणारे रहस्य

विजय राधाकृष्णनची सब-इन्स्पेक्टर म्हणून पहिलीच नियुक्ती कुझीनीलम या छोट्या गावात होते. त्या पोलीस स्टेशनमध्ये दोन महिला पोलीस कर्मचारी आणि चार हवालदार आहेत. गाव शांत असून तिथे फारसे गुन्हे घडत नाहीत.

मात्र, काही दिवसांतच एका व्यक्तीच्या खाजगी जमिनीवर एक मृतदेह सापडतो आणि गावात खळबळ उडते. त्यानंतर काही दिवसांनी गावातील पतपेढी लुटली जाते. नवीन नियुक्त झालेल्या विजयसाठी हा मोठा धक्का असतो. पोलीस स्टेशनमध्ये कोणताही वरिष्ठ निरीक्षक नसल्याने तपासाची संपूर्ण जबाबदारी विजयवर येते.

दरम्यान आणखी दोन खून होतात. हे तिन्ही खून एकाच व्यक्तीने केले असावेत, असा विजयला संशय येतो. तपास पुढे सरकत असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात आणि खरे गुन्हेगार कोण आहेत हे समजल्यावर विजय हादरून जातो.

सुरुवातीला अतिशय शांत वाटणारा हा चित्रपट पुढे वेगवान होत जातो आणि प्रेक्षकांना अनपेक्षित धक्के देत राहतो. रहस्य आणि थरार आवडणाऱ्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा.

हा चित्रपट हिंदी भाषेत वर उपलब्ध आहे.

Tuesday, June 23, 2026

धर्म एक कादंबरी


धर्म  एक कादंबरी ....समर

समर पब्लिकेशन 

धर्म म्हणजे काय ? युधिष्ठिराचा धर्म खरा ? तो कधीच अधर्माने वागला नाही का ? कर्ण ,एकलव्य , आणि अश्वत्थामा  धर्माचा खरा अर्थ शोधायला बाहेर पडले आहेत. अश्वत्थामाने अधर्माने वागून झोपेत असलेल्या पांडव कुळाचा नाश केलाय.त्याच्या मते वडील द्रोणाचार्यांना अधर्माने वागूनच वध केलाय.तर एकलव्याला काहीच न शिकवता केवळ तो अर्जुनाच्या वरचढ होऊ नये म्हणून गुरुदक्षिणा रूपाने त्याचा अंगठा मागून घेतला. कर्णाने द्रौपदी वस्त्रहरणात बघ्याची भूमिका घेऊन अधर्माची साथ दिली असा आरोप आहे.

आता ते तिघेही एकत्र येऊन धर्माचा खरा अर्थ शोधायला कोकणातील पचवणी गावात आले.हे गाव जणू संताचे गाव म्हटले जाते. इथली सर्व माणसे सदाचारी आणि धार्मिक आहेत.

गावात आल्यावर तिघेही आपल्या सोयीनुसार काम शोधतात .आणि त्यांना काही अश्या व्यक्ती भेटतात त्यामुळे त्यांच्या मनातील गोंधळ वाढतो.

खरोखर या तिघांना धर्माचा कळेल का ?? की अजून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होईल ?

Saturday, June 20, 2026

आय विल फाईड यु

I Will Find You
 आय विल फाईड यू
डेव्हिड बुरोजस बोस्टनच्या  तुरुंगात गेली पाच वर्षे शिक्षा भोगतोय. त्याच्यावर आपल्याच  चार वर्षाच्या मुलाची मॅथ्यूची  बेसबॉल बॅटने हत्या केल्याचा आरोप आहे.या घटनेमुळे त्याची डॉक्टर पत्नीही सोडून गेलीय आणि दुसरे लग्न केलंय.  डेव्हिडचा बाप रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे. 
आज पाच वर्षानंतर डेव्हिडला भेटायला त्याची पत्रकार मेव्हणी  रचेल मिल्स तुरुंगात आलीय. तिच्याकडे एक फोटो आहे आणि त्या फोटोत कोपऱ्यात दिसणारा मुलगा मॅथ्यू सारखा दिसतो .कारण मॅथ्यूच्या गालावर जी जन्मखूण आहे तीच त्या मुलाच्या गालावर आहे आणि वयाने सारखे आहेत. मॅथ्यू जिवंत आहे असा रचेलला संशय आहे.
ती भेटून गेल्यावर डेव्हिडवर खुनी हल्ला होतो .तुरुंगातील एक ऑफिसर डेव्हिडवर पहिल्या दिवसापासून नजर ठेवून आहे . तुरुंगाचा वॉर्डन डेव्हिडच्या वडिलांचा मित्र आहे. पोलीस ऑफीसरही डेव्हिडला मारायचा प्रयत्न करतो .  शेवटी वॉर्डन डेव्हिडला तुरुंगातून पळण्यास मदत करतो.
डेव्हिड रचेलच्या मदतीने मॅथ्यूचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तो ज्यांच्याकडे जातो त्यांची हत्या होते आणि आरोप डेव्हिडवर ठेवला जातो.
एफबीआय आणि बोस्टन पोलिसांना चकवून डेव्हिड आपल्या मुलाला  शोधेल का ?
अतिशय उत्कंठावर्धक आणि रहस्यमय थरारक अशी सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Thursday, June 18, 2026

राख

राख (RAAKH)

1978 साल. दिल्लीतील सुखवस्तू अरोरा कुटुंब. कुटुंबात दोन मुले आहेत—सोळा वर्षांची सुमन आणि तिचा तेरा वर्षांचा धाकटा भाऊ साहिल. आज सुमनचा नॅशनल रेडिओवर गाण्याचा कार्यक्रम असतो. ती साहिलला सोबत घेऊन रेडिओ केंद्राकडे निघते. घरी आई-वडील तिचे गाणे ऐकण्यासाठी रेडिओसमोर उत्सुकतेने बसलेले असतात; मात्र कार्यक्रमात सुमनचे गाणे प्रसारितच होत नाही. चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर येते—सुमन आणि साहिल रेडिओ केंद्रावर पोहोचलेलेच नसतात.

दोघांचाही कुठेच पत्ता लागत नसल्याने हे प्रकरण सब-इन्स्पेक्टर जयप्रकाश जाटव याच्याकडे सोपवले जाते. नुकताच सेवेत दाखल झालेला जयप्रकाश हा एका निवृत्त कॉन्स्टेबलचा मुलगा असतो. तो तपासाला सुरुवात करतो आणि काही दिवसांतच दोन्ही मुले जंगलात मृतावस्थेत आढळतात. त्यांच्या शरीरावर असंख्य वार करून अत्यंत अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आलेली असते.

याच काळात दिल्लीत फॉरेन्सिक लॅबची सुरुवात झालेली असते. या लॅबमधून मिळालेल्या पुराव्यांमुळे पोलिसांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळते.

दरम्यान, मुंबईत रज्जो आणि बाबू हे दोन सराईत गुन्हेगार घरफोड्या करत असतात. एका घरात चोरी करून ते फरार होतात. त्यांच्या मार्गात जो कोणी येतो, त्याची ते निर्दयपणे हत्या करतात. तपास पुढे सरकत असताना जयप्रकाशला या दोघांच्या गुन्ह्यांची आणि त्यांनी केलेल्या खुनांच्या मालिकेची माहिती मिळते.

सत्य शोधण्याच्या निर्धाराने जयप्रकाश आपल्या वरिष्ठांचा रोष पत्करतो. तो रज्जो आणि बाबू यांचा माग काढत मुंबईपर्यंत पोहोचतो. मात्र वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न केल्यामुळे त्याला निलंबित करण्यात येते. तरीही तो हार न मानता खुन्यांच्या शोधात राहतो आणि प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू ठेवतो.

दिल्लीत 1978 साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ही मालिका मानवी स्वभावातील क्रूरता, विकृती आणि अमानुषता यांचे भयावह दर्शन घडवते. त्याचबरोबर माणुसकी, संवेदनशीलता आणि चांगुलपणाचे पैलूही प्रभावीपणे उलगडते.

या मालिकेत अली फाजल यांनी सब-इन्स्पेक्टर जयप्रकाश जाटव यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच  सोनाली बेंद्रे, अमीर बशीर, रमणदीप यादव, आकाश माखीजाआणि राकेश बेदी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

प्राईम व्हिडिओवर उपलब्ध असलेली ही आठ भागांची हिंदी मालिका गुन्हेगारी तपास, थरार आणि वास्तववादी कथानक आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी निश्चितच पाहण्यासारखी आहे.

Thursday, June 11, 2026

टीच यु अ लेसन





टीच यू अ लेसन (Teach You a Lesson)

कोरियामध्ये विद्यार्थ्यांना खूपच सवलती आणि अधिकार दिले गेले आहेत. अनेक कायदे त्यांच्या बाजूने आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांवर हात उचलू शकत नाहीत किंवा त्यांच्यावर मोठ्याने ओरडूही शकत नाहीत. पालक समितीचीही शिक्षकांना सतत भीती वाटत असते, कारण पालक शिक्षकांविरुद्ध शिक्षण मंत्रालयाकडे तक्रार करू शकतात, तसेच त्यांच्यावर खटलेही दाखल करू शकतात.

या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेक शाळांमध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. ड्रग्जचा वापर आणि पुरवठा गुप्त मार्गाने वाढत आहे. मोठ्या शाळांमध्ये रॅगिंगचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षणमंत्री चॉई गॅंग-सिओ "एज्युकेशन राइट्स प्रोटेक्शन ब्युरो" (ERPB) या विशेष विभागाची स्थापना करतात.

या विभागाचा प्रमुख म्हणून स्पेशल फोर्सचा माजी अधिकारी ना व्हा-जीन याची निरीक्षकपदी नियुक्ती केली जाते. त्याला सहाय्यक म्हणून स्पेशल फोर्समधून आलेली हान रिम ही तरुणी असते.

शाळांमधील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी ERPB ची स्थापना करण्यात आलेली असते. या विभागाला अमर्याद अधिकार देण्यात आलेले असतात. दहा भागांच्या या मालिकेत प्रत्येक भागात वेगवेगळी प्रकरणे समोर येतात; मात्र सर्व भागांना जोडणारा एक समान धागा संपूर्ण कथेत कायम राहतो.

एका भागात रॅगिंग करणारा एक विद्यार्थी आत्महत्या करतो. त्यामागील कारणांचा शोध घेतला जातो. तर दुसऱ्या भागात, आपल्या मुलाबाबत अतिशय काळजी करणाऱ्या एका आईच्या सततच्या दबावामुळे त्या मुलाची वर्गशिक्षिका आत्महत्येचा प्रयत्न करते.

एका विद्यार्थ्याला वैद्यकीय शिक्षणात प्रवेश मिळावा म्हणून त्याची आई त्याला ड्रग्ज देऊन अभ्यास करण्यास भाग पाडते. त्याचबरोबर पालक समितीच्या अध्यक्षांना विविध भेटवस्तू देऊन त्यांना आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न करते.

एका शाळेतील हुशार आणि अव्वल क्रमांकाच्या विद्यार्थ्याने सर्वांत लोकप्रिय शिक्षकावर हात उचलल्यामुळे त्याचीच बदनामी होते. मात्र त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे सत्य उलगडत जाते.

सोशल मीडियाचा वापर करून काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांची बदनामी करतात आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करतात. तरीही संबंधित विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही; उलट समाजात शिक्षकांचीच प्रतिमा खराब होते.

किशोरवयीन विद्यार्थ्यांना कायद्याकडून मिळणाऱ्या संरक्षणाचा गैरफायदा घेत काही विद्यार्थी चोरी, ड्रग्ज विक्री आणि इतर गुन्हे करतात. पकडले गेल्यावर केवळ माफी मागून ते सहज सुटतात.

या सर्व प्रकरणांचा ERPB यशस्वीपणे तपास करून त्यांची उकल करते. मात्र या विभागाला विरोध करणारे काही प्रभावशाली लोकही असतात. ते सतत ERPB विरुद्ध कारवाया करून या युनिटला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. अखेरीस ते या विभागाला बंद करण्यातही यशस्वी होतात; पण त्यानंतर घडणाऱ्या घटनांमुळे कथेला एक वेगळेच वळण मिळते.

विद्यार्थ्यांच्या समस्या, शिक्षकांची हतबलता, राजकारणी आणि उद्योगपतींचा शाळांमधील हस्तक्षेप, तसेच कायद्याच्या संरक्षणामुळे मनमानी करणारे विद्यार्थी अशा अनेक गंभीर विषयांवर ही मालिका भाष्य करते. त्यामुळे ही कथा कुठेतरी भारतीय शिक्षण व्यवस्थेतील समस्यांशीही नाते सांगताना दिसते.

प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी आवर्जून पाहावी अशी ही उत्कृष्ट मालिका आहे. ही मालिका नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे. 

द इनोसंट मॅन

 द इनोसंट मॅन ....जॉन ग्रिशम
अनुवाद ...संजय गडकरी 
मेहता पब्लिशिंग हाऊस
अडा हे ओक्लाहोमामधील छोटे गाव .गावातील सर्व एकमेकांना ओळखत. रॉन विल्यम्सन त्याच गावात लहानाचा मोठा झाला . तो बेसबॉलचा स्टार खेळाडू .राष्ट्रीय संघात तो निवडला जाणार याची सर्वांना खात्री होती.पण ती प्रसिद्धीच त्याच्या डोक्यात गेली. दारू ,ड्रग ,बायका यात गुरफटून त्याने आपल्या कारकीर्दीची  वाट लावली . शरीरावर आणि मनावर परिणाम होऊन तो अडाला परत आला .
तो परत येताच पुन्हा त्याचे रंगील आयुष्य सुरू झाले. डेबि कार्टर अडातील स्थानिक बारमध्ये वेट्रेस होती. एके दिवशी तिच्यावर बलात्कार होऊन खून झाला . पोलिसांनी पाच वर्षे प्रयत्न करून रॉन विल्यम्सनला अटक केली. खरे तर पोलिसांकडे  फारसे पुरावे नाहीत .त्यांनी केवळ स्थानिक खबऱ्यांच्या साक्षीने त्याला अटक केलीय आणि दोषी ठरविण्यात येऊन मृत्युदंडाची शिक्षाही फर्मावली आहे.
आपण निर्दोष आहोत हे फक्त रॉनीलाच माहीत होते . आता तो मृत्युदंडाच्या शिक्षेची पूर्तता होण्याची वाट पाहत तुरुंगात नरकयातना भोगतोय.
 एका सत्यघटनेवर आधारित अस्वस्थ करणारी कादंबरी.

Monday, June 8, 2026

spider noir

Spider noir
स्पायडर नोइर
बेन रिली वृद्ध खाजगी गुप्तहेर . छोटी छोटी प्रकरणे तो हाताळतो.एके काळी तो सैन्यात मेजर होता.फ्रान्समध्ये त्याने जर्मन हॉस्पिटलमधून आपले काही सैनिक सोडवले होते.त्या सैनिकांवर विविध प्रयोग चालू होते.त्यातीलच एक सैनिक त्याच्या हाताला चावला.बरे होताच त्याला आपल्यातील शक्तीची जाणीव झाली.तो स्पायडरमॅन बनला होता.नंतर त्याने सुपरहिरो बनून अनेकांचे प्राण वाचविले. पण त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्याने हे सर्व सोडून सामान्य गुप्तहेराचे जीवन जगू लागला.
पण आता  हॉस्पिटलमधून वाचविलेल्या मित्राच्या सुपरपॉवर जागृत झाल्यात. पण शहरातील काही व्यक्ती आहेत जे ह्या सुपर हिरोला आपल्या ताब्यात ठेवू पाहतायत.  एक जर्मन डॉक्टर गेली अनेक वर्षे एका  औषधाचा शोध घेतेय जे घेतल्यावर त्यांच्यातील सुपर पॉवर नष्ट होतील.
बेन पुन्हा सुपरहिरो बनून आपल्या मित्रांना वाचवेल का ?
निकोलस केज सारखा मातब्बर अभिनेता पहिल्यांदाच या सिरीज द्वारे ओटीटी क्षेत्रात पदार्पण करतोय.
ही सिरीज ब्लॅक ऍण्ड व्हाईट आणि रंगीत अश्या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
सिरीज हिंदी भाषेत प्राईम व्हिडिओवर आहे.

कारा

कारा

Kara

कारासामी उर्फ कारा हा हाडाचा चोर आहे. चोरी आणि घरफोडी याशिवाय त्याला दुसरे काहीच करता येत नाही. आपल्या आयुष्यातील शेवटची चोरी करण्यासाठी तो एका आमदाराच्या घरात शिरतो; पण दुर्दैवाने तो पकडला जातो.

या चोरीच्या तपासाचे श्रेय मिळवण्यासाठी डीएसपी भारतन पुढे येतो. काराकडून आपल्या मनाप्रमाणे कबुली मिळवण्यासाठी तो त्याच्यावर दबाव आणतो. मात्र, मारहाण करून कारा तेथून पळून जातो.

या घटनेला सहा महिने उलटतात. आता कारा आपल्या पत्नीसोबत एका हॉटेलमध्ये मजुरी करत असतो. त्याचे स्वतःचे हॉटेल सुरू करण्याचे स्वप्न असते. गावात त्याच्या वडिलांकडे आठ एकर जमीन असते; पण सोळा वर्षांचा असतानाच तो वडिलांचे पैसे चोरून घरातून पळून आलेला असतो. त्यामुळे आता पुन्हा कोणत्या तोंडाने वडिलांकडे जायचे, हा प्रश्न त्याला सतावत असतो.

तरीही, जमीन विकून त्या पैशांत हॉटेल सुरू करण्याचा विचार करून तो गावाकडे परतण्याचा निर्णय घेतो. अनेक वर्षांनी मुलाला पाहून त्याचे आई-वडील आनंदित होतात; पण वडिलांनी जमीन गहाण ठेवून कर्ज घेतल्याचे कळताच कारा निराश होतो.

काराचा खरा हेतू समजताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसतो आणि त्यातच त्यांचे निधन होते. मृत्यूपूर्वी त्यांची इच्छा असते की, आपल्या पूर्वजांच्या शेजारी त्यांचे दफन व्हावे. कारा आणि गावकरी त्यांचे दफन करण्यासाठी जातात; पण बँकेचे अधिकारी ती जमीन ताब्यात घेतल्याचे सांगून दफन करण्यास परवानगी देत नाहीत.

नाईलाजाने काराला आपल्या वडिलांचे पार्थिव सरकारी शवागृहात ठेवावे लागते. मात्र, सात दिवसांच्या आत मृतदेह नेला नाही तर त्याच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी सूचना त्याला दिली जाते.

आता वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी काराकडे फक्त सात दिवस उरलेले असतात. ज्या बँकेकडून कर्ज घेतलेले असते, त्या बँकेने अनेक शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात अडकवलेले असते. कर्जाच्या फॉर्ममध्ये अनेक गुंतागुंतीच्या अटी असतात, ज्या शेतकऱ्यांना ना वाचता येतात, ना समजतात.

“मला फक्त घरफोडी करता येते… मग बँक लुटणे हाच एकमेव मार्ग आहे,” असे म्हणत कारा बँक लुटण्याची योजना आखतो.

पण बँक लुटणे इतके सोपे असते का?

डीसीपी भारतनला या योजनेचा सुगावा लागतो आणि जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. तो पुन्हा काराच्या मागावर निघतो.

कारा आपल्या वडिलांचे कर्ज फेडून त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकेल का?

त्याच्या हातात फक्त सात दिवस आहेत.

Dhanush ने नेहमीप्रमाणे संयमित आणि प्रभावी अभिनय केला आहे. चित्रपटात फारशी हाणामारी नसली, तरी कथा वेगाने पुढे सरकते आणि प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवते.

हा चित्रपट हिंदी भाषेत Netflix वर उपलब्ध आहे.

लेडी जल्लाद

आराचर  (मल्याळी ) ... के.आर. मीरा
लेडी जल्लाद .….रेश्मा कुलकर्णी- पाठारे 
मेहता पब्लिशिंग हाऊस
भारतात पश्चिम बंगालमध्ये नऊ वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जतीनचंद्रला लहान मुलीवर बलात्कार आणि खुनाचा आरोप सिद्ध झाल्यावर सरकारने कोणाच्याही विरोधाला न जुमानता फाशीची शिक्षा जाहीर केली होती.
फणीभूषण ग्रद्धा मलिक सरकारी अधिकृत जल्लाद आहे.आता तो 88 वर्षाचा आहे.तो राहतोही स्मशानाच्या वाटेवर, जिथून सगळ्या अंत्ययात्रा जातात.त्याचे चहाचे दुकानही आहे.अंत्यसंस्कार झाल्यावर सगळे तिथेच चहा पितात. 
जल्लाद मलिकच्या घराण्याला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे .असे फणीभूषण  ग्रद्धा मलिक अभिमानाने सांगतो. त्याने आता पर्यंत चारशे एकावन्न जणांना फाशी दिलेय असेही सांगतो.तो हुशार आणि स्वार्थी आहे.आपल्या शिवाय सरकारला पर्याय नाही हे त्याला पक्के माहितीय म्हणूनच त्याने सरकारला वेठीस धरून काही मागण्या केल्यात.यात आपल्या मुलीला चेतना ग्रद्धा मलिकला अधिकृत जल्लादाची नेमणूक करावी.फाशीची रक्कम वाढवून देण्यात यावी .अश्या  मागण्या आहेत.
चेतना बावीस वर्षाची तरुणीतिच्या रक्तातच जल्लाद असल्याने तिला कुशलतेने गाठ मारता येते.  आपले घराणे जल्लादाचे असल्याने त्यांच्या आयुष्यावर होणारे परिणाम तिने भोगले आहे .ती उत्कृष्ट जल्लाद बनेल याची खात्री तिच्या बापाला आहे.
संजीवकुमार मित्रा एका न्यूज चॅनेलचा वार्ताहर .लेडी जल्लाद चेतना मलिकचा आपल्या वाहिनीला कसा फायदा होईल याचाच विचार त्याच्या डोक्यात सतत चालू आहे.त्यासाठी त्याने चेतना आणि फणी मलिकला हाताशी धरले आहे.त्याच्या वाहिनीवर रोज चेतानाची मुलाखत चालू आहे.
ग्रद्धा मलिक कुटुंबात कित्येक शतकातील फाशी आणि जल्लादाच्या कथा आहेत.त्या संदर्भानुसार आपल्या समोर येतात .जतीनचंद्रला फाशी जाहीर  झाल्यापासून ते फाशी देईपर्यंतचा काळ या पुस्तकात लिहिला गेलाय. या  संपूर्ण पुस्तकात  मृत्यू जाणवत राहतो.तो कसा असतो याची जाणीव सतत आपल्याला वाचताना होत असते तरीही आपण ते पुस्तक हातातून सोडवत नाही.आपण ते वाचत राहतो. अंगावर काटा आणत मृत्यू अनुभवत राहतो. 
यात अनेक  पात्रे भेटतात .बहुतेक पात्रे स्वार्थी आहेत. चेतना या सर्वांना सामोरी जात आपले कर्तव्य पार पडेल का ?


Friday, May 29, 2026

शोध

शोध 
मुरलीधर खैरनार
राजहंस प्रकाशन 
छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली ती पूर्ण सुरक्षित आणि अचूक योजना आखून .यावेळी त्यांच्याकडे प्रत्येक व्यापाऱ्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची आणि ठिकाणांची माहिती होती .त्यामुळे अतिशय कमी वेळात जास्त लूट मिळाली.ती लूट त्यांनी बाराशे जनावरांवर लादली आणि लुटीचे दोन भाग करून दोन मार्ग आखले. 
एक लूट ठरल्या मार्गावरून स्वराज्यात पोचली.दुसऱ्या लुटीचे जबाबदारी गोंदाजी नारो या दोन हजारी घोडदळाच्या सरदारकडे होती.त्याच्याकडे सुमारे सात हजार जनावरांच्या पाठीवर लादलेली लूट होती.ती घेऊन तो नाशिकमार्गे  स्वराज्याकडे निघाला होता. दाऊदखानाचे मुगल शिपाई सगळ्या मार्गावर त्याच्या मागावर होते. तो त्यांच्याशी लढत पुढे सरकत होता शेवटी जखमी होऊन मुघलांच्या हाती सापडला .पण शेवटपर्यंत सात हजार जनावरांवर लादलेला खजिना मुघलांना सापडला नाही.
केतकी देशपांडे ,शौनक , निनाद  फेसबुक माध्यमातून मित्र झालेले.सर्वांना इतिहासाची आवड त्यामुळे एकत्र आले .इंग्लंडला राहणारी क्लारा रेंजर त्यांची मैत्रीण.ती इतिहासात डॉक्टरेट करत होती आणि कामानिमित्त त्यांना भेटणार होती.तिचे पूर्वज एकेकाळी ईस्ट इंडिया कंपनीत कामाला होते . त्यावेळी मुघलांनी त्यांना एका छाप्यात पकडले आणि त्यांची रवानगी औरंगाबादच्या तुरुंगात झाली .तुरुंगात त्यांना गोंदाजी भेटला.जखमी अवस्थेतील गोंदाजी फार काळ जगू शकणार नाही याची कल्पना दोघांनाही होती.मरताना गोंदाजीने एका कापडावर लिहिलेला निरोप त्यांच्या हाती दिला आणि हा तुकडा कसाही करून शिवाजी महाराजांपर्यंत  पोचवा अशी विनंती केली .दुर्दैवाने  रेंजर तो निरोप महाराजांपर्यंत पोचवू शकले नाहीत आणि ते इंग्लंडला परत गेले.
क्लाराकडे तो कापडाचा तुकडा होता आणि तो मेसेज काय आहे याची उकल तिला मित्रांना भेटून करायची आहे.
सुरतमधील एक प्रसिद्ध व्यापारी घराणेही या लुटीत संपूर्णपणे लुटल गेलंय. त्यांना आपली संपत्ती परत नकोय पण त्यातील एक महत्वाची मौल्यवान वस्तू परत हवीय.त्यासाठी त्यांनी आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला ती वस्तू शोधण्याची जबाबदारी दिलीय .त्या व्यक्तीला खोजनार म्हणतात.आज त्या घराण्याचा अठरावा खोजनार ती वस्तू शोधतोय.गोंदाजीने लपवलेल्या खजिन्यात ती वस्तू आहे याची खोजनारला खात्री आहे.
आबाजी स्कायलार्क कंपनीला हाताशी धरून तो खजिना शोधतायत. स्कायलार्क कंपनीचा सीइओ जयंत आबाजीला सगळी मदत देतोय.आबाजी हुशार आणि खुनशी आहेत.खजिन्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला ते संपवितात. त्यांची नजर क्लारावर गेलीय.तिच्याकडे असलेला तो निरोपाचा तुकडा त्यांना हवाय आणि त्यासाठी त्यांनी क्लाराचाही खून केलाय ,त्याचा आळ केतकी ,निनाद आणि शौनकवर आलाय. मुंबई पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
काय आहे या खजिन्याचे रहस्य जे शिवाजी महाराजांपर्यंत शेवटपर्यंत पोचले नाही.मोरोपंत पिंगळे दहा वर्षे नाशिकच्या  कड्याकपारीत तो खजिना शोधत होते. 
आबाजीना काही धागेदोरे मिळाले आहेत तर शौनक आणि केतकीच्या हातात ही काही पुरावे लागले आहेत .पण खरोखरच हा खजिना अस्तित्वात आहे का ? 
असेल तर त्यापर्यंत नक्की कसे पोचायचे ? 
मुरलीधर खैरनारानी अतिशय अचूकपणे याचा शोध घेतला आहे.हा शोध वाचताना आपण पूर्णपणे त्यात गुंतून जातो.  

Friday, May 22, 2026

Kaattaan

Muthu Alias Kaattaan
मुथु उर्फ कत्तन
तामिळनाडूतील छोट्या गावातील पोलीस स्टेशन लवकरच बंद होऊन सर्व पोलिसांची बदली शहरात होणार आहे.तिथे सर्व पोलीस स्थानिक आहेत. एका हवालदाराच्या तर पाच हजार बकऱ्या आहेत. गावात काहीतरी गुन्हा व्हावा यासाठी सर्व पोलीस कामाला लागले आहेत.
त्याचवेळी एका मुलाला गावाच्या बाहेर टेकडीवर एका माणसाचे मुंडके सापडते. मुंडक्याच्या शेजारी  काही पैसेही आहेत  .जो कोणी आपले अंत्यसंस्कार करेल त्याला हे पैसे द्यावेत अशी चिट्ठी त्यात असते.पण त्याचे धड कुठेही सापडत नाही.
गावातील सर्व पोलीस यंत्रणा तपासाला लागते .मुळात त्या शीराची ओळख पटायची आहे .त्याचे धड शोधायचे आहे.
त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्नात पोलिसांचा प्रवास सुरु होतो.त्या व्यक्तीचे नाव मुथु असल्याचे कळते आणि तुकड्या तुकड्यात त्याची ओळख होत जाते. शेवटी त्या मुथुची सलग कहाणी उलगडली जाते.
कोण आहे हा मुथु ? कोणी त्याचा खून केलाय ?? त्याबद्दल फार कोणाला माहीत नाही.जे त्याला ओळखतात ते फक्त काही काळ त्याच्यासोबत राहिले आहेत .
मुथु एक रहस्य आहे . 
एक थरारक रहस्यमय तपास आपली उत्सुकता ताणून धरते .
विजय सेथुपती निर्मित ह्या सिरीजमध्ये  त्यानेच मुथुची प्रमुख भूमिका केली आहे.सिरीजचे कथानक खूप चांगले आहे .
हॉटस्टारवर हिंदी भाषेत ही सिरीज आहे .

Monday, May 18, 2026

कालिदास 2

कालिदास 2
Kaalidas 2
त्या मोठ्या हाऊसिंग कॉलीनीत नववर्षाचा कार्यक्रम चालू असताना चार वर्षाची मुलगी गायब होते. इंस्पेक्टर कालिदास तिथे तपासासाठी पोचतो.त्याचा तपास चालू असताना डीसीपी वैष्णवी चार्ज घेते.वैष्णवी कालिदासचा तिरस्कार करते.  तपासात संशय स्टिफनवर जातो. स्टिफन प्रसिद्ध वकिल नटराजनचा सहाय्यक आहे.ते ताबडतोब स्टिफनला सोडवतात. कालिदासला स्टिफन खून करेल याची खात्री नाही पण वैष्णवीला खात्री आहे.
त्याच वेळी कॉलनीत अजून एका मुलीचा खून होतो .सर्वजण पुन्हा स्टिफनवर संशय घेतात.काही वर्षांपूर्वी अश्याच खुनाच्या आरोपातून स्टिफनला नटराजनने सोडविलेले असते .एका तरुण मुलीच्या साक्षीने स्टिफन यातून सुटलेला असतो.
स्टिफनवर चुकीचे आरोप लावले म्हणून वैष्णवी आणि कालिदासला या केस मधून बाहेर काढले जाते .पण कालिदास खरा खुनी शोधून काढतो .
पण कालिदासने पकडलेला खरोखरच खुनी आहे का ? शेवटच्या क्षणी कालिदासला काही अनपेक्षित हादरे बसतात आणि तो चक्रावून जातो.
हा जरी  दुसरा भाग असला तरी पहिल्या भागाशी काही संबंध नाही.त्यामुळे  एकदम दुसरा भाग  बघितला तरी चालेल.
चित्रपट प्राईम व्हिडिओ वर हिंदी भाषेत आहे.

Sunday, May 17, 2026

द हिडन हिंदू

द हिडन हिंदू ( भाग पहिला )
अक्षत गुप्ता 
अनुवाद ..मुक्ता देशपांडे 
मेहता पब्लिशिंग हाऊस
अंदमान निकोबारमधील अनेक बेटांपैकी एका बेटावर  त्या गुप्त मोहिमेच्या टीमने अघोरी साधूला बंदिवान केले आहे. या गुप्त टीममध्ये दोन शास्त्रज्ञ, एक कॉम्प्युटर हॅकर तरुणी,  एक मानसोपचार तज्ञ स्त्री डॉक्टर , वीरभद्र नावाचा प्रमुख सिक्युरिटी ऑफिसर आहे.
त्या अघोरी साधूची  चौकशी करण्यासाठी ती टीम एकत्र  आली आणि त्यांना हादरून टाकणारी महिती मिळत गेली.
तो अघोरी साधू स्वतःला ओम शास्त्री म्हणवतो .पण त्याची अनेक नावे आहेत.तो स्वतःला सुषेण ,विदुर ,संजय म्हणवून घेतो.चारही युगात त्याचा संचार होता असे सांगतो.सध्या तो परशुराम आणि अश्वस्थामा यांच्या शोधात आहे.
त्यांच्याकडची गुपिते सर्वांना चक्रावून सोडणारी आहेत. त्याच्याकडे असे काही रहस्य आहेत ज्याचा शोध अनेक युगात घेतला जातोय.ओम शास्त्रीने ती रहस्य जपून ठेवली आहेत पण आता ती शत्रूच्या हाती लागली आहेत.
काय आहेत ही रहस्य ? युगानुयुगे ओम शास्त्रीच्या मागावर कोणते शत्रू आहेत ? ही रहस्य जगात प्रसिद्ध झाली तर किती हाहाकार उडेल याची कल्पनाही ओम शात्री करू शकत नाही .
अक्षत गुप्ताच्या द हिडन हिंदू या तीन भागाच्या पुस्तकाचा भाग पहिला

कर्तव्य

कर्तव्य 
Kartavya
कर्तव्य ....एक अस्वस्थ करणारा अनुभव
आज इन्स्पेक्टर पवन मलिक चाळीसावा वाढदिवस. झारखंडच्या   छोट्या झामली गावातील रेल्वे स्टेशनवर आपल्या सहकारी मित्रांसोबत साजरा करतोय. हवालदार अशोक त्याचा खास मित्र . ते स्टेशनवर एका पत्रकार महिलेला संरक्षण द्यायला आलेत.
अध्यात्मिक गुरू आनंद  श्री गावात प्रतिष्टित व्यक्ती आहेत. लहान मुलांचा ते बेकायदेशीरपणे वापर करतात असा आरोप त्या महिला पत्रकाराचा आहे आणि त्यासाठीच ती गावात आलीय.
पण रस्त्यात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होतो.पवन एका हल्लेखोराला मारतो तर एक निसटून जातो. पण पत्रकार महिलेला वाचवू शकत नाही.
पळून गेलेला हरपाल एक सोळा वर्षाचा मुलगा आहे .पुरावा नष्ट करण्यासाठी आनंद श्रीची माणसे  त्या मुलाच्या मागावर आहेत.
पवन त्या मुलाला संरक्षण देतो .पण त्याच्यावरही दबाव आहे. सगळे पोलीस नेते आनंद श्री चे भक्त आहेत.
त्याचा भाऊ दुसऱ्या जातीतील मुलीसोबत पळून गेलाय.पवनचा बाप कट्टर जातीवादी आहे.तो स्वतःच्या हाताने दोघांना ठार करेल याची पवनला खात्री आहे.आता भावाच्या संरक्षणाची जबाबदारी ही त्याच्यावर आहे.
वरिष्ठ त्याच्यावर महिला पत्रकाराची केस बंद करण्यासाठी दबाव टाकतात .त्यासाठी ते हरपालला  ठार मारण्याची ऑर्डर देतात. पवन चारही बाजूने यात दाबला गेलाय. 
तो हरपालला वाचविण्यासाठी आनंद श्री सोबत समजोता करतो आणि त्याला अशोकसोबत  अज्ञात ठिकाणी पाठवतो .
पण नंतर काही अश्या गोष्टी घडतात त्या ऐकून पवन हादरून जातो.
पवन परिस्थितीला शरण जाईल की त्याविरुद्ध उभे राहण्याचे ठरवेल ?
सैफ अली खान पवनच्या भूमिकेसाठीच तयार झालाय. हतबल असहाय आणि नंतर संतापाने पेटून उठणारा पवन  अप्रतिम आहे. 
दिल्ली क्राईमच्या तीनही सिझनमध्ये गाजलेली रसिका दुग्गल पवनच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.तर झाकीर हुसेन आणि संजय मिश्रा नेहमीसारखेच अप्रतिम .
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Thursday, May 14, 2026

लिजंडस

Legends
लिजंडस
1990 च्या सुमारास इंग्लंडमध्ये अंमली पदार्थांचे प्रमाण वाढले होते. यात काही मंत्र्यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या  मुलांचा बळी गेला होता.पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा उतरता काळ सुरू झाला होता म्हणून त्यांनी अंमली पदार्थांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची घोषणा केली. त्यांनी यासाठी कस्टमला जबाबदार धरले. इंग्लंडमध्ये ड्रग कसे येते ? याचा छडा लावायची आज्ञा दिली.
पण कस्टम खाते कमकुवत होते .त्यांना फारसे अधिकार ही नव्हते. पण ब्लेकचा आपल्या लोकांवर विश्वास होता. त्याने ऑफिसर डॉनला एक गुप्त टीम बनवायला सांगितले. या टीमला कोणतेही फायदे मिळणार नव्हते ना मेडल . या गुप्त मोहिमेसाठी फारसे पैसे ही मंजूर केले नव्हते.सर्व काही स्वतःच्या जबाबदारी वर करायचे होते. 
कस्टमच्या वीस हजार कर्मचाऱ्यात कोणतरी असे असतील जे देशाचा विचार करून काम करत असतील असे डॉनला वाटते आणि तो हवी तशी माणसे शोधायचा सुरवात करतो .शेवटी त्याला दोन पुरुष आणि दोन स्त्रिया या कामगिरीसाठी योग्य वाटतात. त्यांना कमी दिवसात अतिशय तुटपुंजे ट्रेनिंग देऊन या कामगिरीसाठी तयार केले जाते.
इंग्लंडमध्ये ड्रग पाकितानातून अफगाणिस्तान , इराण ,तुर्की असा प्रवास करत येते. दोन ड्रग माफिया यामध्ये सक्रिय आहेत. डॉन आपल्या टीमचे दोन भाग करून त्या दोन्ही माफियांच्या मागावर राहतो.
एकूण दोन टन माल पाकिस्तानातून समुद्रमार्गे  येणार आहे. तो माल पकडण्यात डॉनची टीम यशस्वी होईल ?
या सहा भागाच्या सिरीजमध्ये अजिबात हिंसा नाही .ना गोळीबार ,ना बेफाम पाठलाग .माफिया आणि कस्टम आपापल्या प्लॅनिंगनुसार चालले आहेत. इथे कोणी हाणामारी करणारा हिरो नाही खलनायक नाही. पण संपूर्ण सिरीज तणावपूर्ण आहे.आपण ही सिरीज पूर्ण होत नाही तोपर्यंत उठू शकणार नाही . 
नेटफ्लिक्सवर ही सिरीज हिंदी भाषेत आहे. नक्की पहा.

Monday, May 11, 2026

व्हेक्टर

व्हेक्टर .....रॉबिन कुक 
अनुवाद ..डॉ. प्रमोद जोगळेकर
मेहता पब्लिशिंग हाऊस
अमेरिकेच्या मॅनहटन शहरातील गालिचा विक्रेता जेसन पपारिसला पोस्टाने एक बंद लिफाफा आला. नेहमीप्रमाणे त्याने ते फोडले आणि त्यातून पावडर बाहेर पडली .तो शिंकेने आणि खोकल्याने हैराण झाला आणि दोन दिवसाने तो मृत्यू पावला.
डॉ. जॅक स्टेपलटन शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहे. त्याला अवघड केसेसचे पोस्टमार्टेम करणे आवडते.जैविक शास्त्राचा तो अभ्यासक आहे.जेसनचे पोस्टमार्टेम करताना तो अँथ्राक्सच्या जैविक अस्त्राचा बळी आहे हे समजते.अमेरिकेच्या इतिहासात मोजून बोटावर मोजता येतील एव्हढ्याच अँथ्राक्सच्या केस झाल्यात .तो  या गोष्टीचा छडा लावायचा ठरवतो.
युरी टॅक्सी ड्रायव्हर आहे.तो राशियातून आलाय .तिथे तो जैविक अस्त्रांच्या कारखान्यात काम करायचा. रशियाने जैविक अस्त्रे बनविण्याचे बंद केल्यामुळे तो अमेरिकेत पळून आलाय आणि टॅक्सी चालवतोय.तो ज्यू द्वेष्टा आहे. अमेरिकेत अजूनही काही नाझीवादी तरुण आहेत .त्यांची पीपल आर्मी नावाची संघटना आहे.फेडरल बिल्डिंग या शासकीय इमारतीत जैविक हल्ला करून हजारो लोकांची हत्या करण्याचा त्यांचा प्लॅन आहे त्यासाठी युरी अँथ्राक्सची पावडर बनवतो  आहे. 
डॉ .जॅक अँथ्राक्सच्या जिवाणूंचा माग घेताना अनेक गोष्टी त्याच्यासमोर येतात आणि तो स्वतः संकटात सापडतो. 
पीपल आर्मीचा जैविक हल्ला यशस्वी होईल का ? सत्य काय आहे हे डॉ. जॅक शोधून काढेल ला ? जैविक हल्ल्यावर आधारलेली एक थरारक कहाणी आपल्याला शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवते.

Sunday, May 10, 2026

एकटेपणा

एकटेपणा
आज ऑफिसला निघायला थोडा उशीरच झाला .एकदा वेळ चुकली की पुढचे सगळेच गणित बिघडते हा आतापर्यंतचा अनुभव होताच.आता  नेहमीची लोकल चुकणार , पुढे बस चुकणार ऑफिसचा लेटमार्क पडणार , ह्या गोष्टी होणारच होत्या म्हणून आता आरामातच जाऊ असा विचार करीत अण्णाच्या टपरीवर चहासाठी थांबलो.
"काय भाऊ आज उशीर झाला का "? थोडा ओळखीचं आवाज कानावर येताच चमकलो आणि वळून पाहिले तर  मागे अनिकेत सिगारेट पीत उभा होता. 
अनिकेत माझ्याच विंगमध्ये भाड्याने राहायला आला होता .त्याचे गाव किंवा कुटुंबाविषयी माहिती नव्हती. कधी कधी जिममध्ये जाताना दिसायचा तर कधी रात्री उशिरा बाहेर पडताना दिसायचा.पण पाहिल्यावर ओळखीचा हात दाखवायचा. त्याच्याकडे पाहून बॅचलर लाईफ छानपैकी उपभोगतोय असे वाटते.
"आज इथे "? मी थोड्या आश्चर्याने विचारले.
" मी यावेळी इथेच असतो .आज तुम्हाला उशीर झाला बहुतेक ."हातातली सिगारेट ऑफर करीत तो म्हणाला .
मी नम्रपणे नकार देत माझ्या हातातील कटिंग त्याला दिली. 
आम्ही बाकड्यावर बसून गप्पा मारू लागलो.त्यातून कळले अनिकेत साधारण सदतीस वर्षाचा होता.मुंबईत एका मल्टी नॅशनल कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाला होता .
एका छोट्या शहरातून तो मुंबईत बदलीवर आला होता.तीन चार वर्षांनंतर पुन्हा प्रमोशनवर बदली होऊन दुसरीकडे जाईल असे म्हणत होता.
मी हातातील सिगारेटकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तसा हसला ."टाईमपास . कधी कधी कंटाळा आला की एखादी ओढतो.तर महिन्यातून एकदा ड्रिंक.एकटाच राहत असल्यामुळे कधी कधी एकटेपणा वाटतो तेव्हा यांची साथ घ्यावी लागते .असे त्याचे म्हणणे.
"लग्न कधी करणार "? मी सहज स्वरात विचारले.तसा तो गंभीर झाला .
सहा वर्षे झाली तो लग्नासाठी प्रयत्न करतोय पण काही गोष्टी जुळून येत नाहीत असे सांगून गप्प बसला. अशीच एक दोन वर्षे निघून गेली की पुढे लग्न जुळणारच नाही याची खात्री होती त्याला .
"भाऊ सगळे प्रकार आजमावले मी .सगळ्या अँपवर माझे नाव आहे .मूळ गावात मोठे घर आहे .तिथे आईवडील राहतात.लग्न झाले की तिथेच बदली नंतर प्रमोशन न घेता बायको आणि आई वाडीलांसोबत तिथेच राहीन .पण बऱ्याच मुलींना ते पसंत नाहीय .काहींना वेगळेच राहायचे तर काहींना स्वतःचे शहर सोडायचे नाही ,काहींना त्यांच्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी असलेला हवाय. तर काहींना काही काळ लिव्ह इन राहून पुढे लग्न करायचे की नाही हे ठरवायचे आहे. एकूण काय आता लग्न या गोष्टीवर विश्वास उडत चाललाय त्याचा.
" भाऊ , आता ठीक आहे हो .आईवडील , भाऊ बहीण सोबतीला आहेत.पण हे किती दिवस चालणार .आईवडील जिवंत आहेत तो पर्यंत ते माझी आणि मी त्यांची काळजी घेईन.भाऊ बहीण उद्या स्वतंत्र राहतील.पण  हे असे पुढे एकटे राहणे कठीण होणार आहे.त्याच्या बोलण्यातून भविष्याची चिंता स्पष्ट दिसत होती.
एकटेपणा आज ना उद्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणार हे नक्की .पण ज्यांना कुटुंब आहे त्यांच्या आयुष्यात फार काळ नसतो ज्यांना कुटुंब नाही त्यांच्यासाठी मोठा आणि भीषण असतो .
मला अनिकेतविषयी वाईट वाटले.इतका सरळ साधा मुलगा पण लग्न होत नाही म्हणून दुःखी .यावर काहीतरी उपाय काय ? असा विचार करताना अचानक केके आठवला .
केके उर्फ कमलाकर कदम हा माझा जुना मित्र .त्याच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर उपाय  आहे असे तो म्हणतो आणि बऱ्यापैकी ते खरे आहे. याचा अनुभव मी घेतला आहे.अनिकेत आणि केके ची एकदा भेट घडवून आणावी असे मी ठरविले आणि अनिकेत पटकन तयार झाला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी अनिकेतला घेऊन केकेच्या ऑफिसमध्ये शिरलो. दहा बाय दहा च्या खोलीत केकेने  ऑफिस  थाटले होते. खोलीत एक टेबल ,समोर चार खुर्च्या कोपऱ्यात पाण्याचा माठ होता. केके नेहमी सारखा लॅपटॉप समोर ठेवून बसला होता.
मला पाहताच "काय भाऊ !अशी नेहमीप्रमाणे आरोळी ठोकली आणि अनिकेतला आमचे संबंध कसे आहेत हे स्पष्टपणे दाखवून दिले.
त्याने ऑफर केलेली सिगारेट मी नम्रपणे नाकारून अनिकेतची ओळख करून दिली आणि  अनिकेतने त्याचा प्रॉब्लेम सांगितला. त्याचे ऐकत असताना केके मध्येच निराशेने मान हलवत होता.थोडक्यात केके कडे ही उपाय नाही असेच दिसत होते.
"अनिकेत , मी लग्न जुळवत नाही आणि माझ्या अनुभवाने तुझे लग्न जुळले थोडे कठीण आहे. हल्ली लग्न जुळवताना दोन्हीकडून बऱ्याच अपेक्षा असतात.  उच्च शिक्षणामुळे दोन्ही बाजूला चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असतात पण आपल्यावर समोरचा वरचढ होऊ नये ,अपेक्षा ठेवू नये असेच त्यांना वाटते . मुलींना पारंपरिक कामे करायची नसतात तर मुलांना ती आपल्या अधिकारात राहावी असे वाटत असते."
" थोडक्यात ह्याचे लग्न होणार नाही असे तुझे म्हणणे आहे तर" ? मी चिडूनच विचारले.
" अरे भाऊ ,चिडू नकोस .मी सत्य सांगितले.पुढे मिलेळही कोणीतरी याला अपेक्षित असणारी मुलगी" केके हसत म्हणाला.
" बरे मला सांग ,तुला लग्न का करायचे आहे "? केके थोडा सिरीयस होऊन म्हणाला. "हे बघ भारतीय समाज व्यवस्था ,लग्न संस्था , यावर बोलू नकोस ,स्पष्ट उत्तर दे"  केकेने अनिकेतला विचारले .
" का म्हणजे ? एक कुटुंब असावे ,साथीदार असावी जीच्यापाशी मोकळेपणाने बोलता येईल ,सुख दुःख शेयर करता येईल ,शारीरिक सुख मिळेल.आई वडिलांची काळजी घेईल .मूल जन्माला घालून कुटुंब वाढविता येईल. एकमेकांची काळजी घेण्यासाठी आजारपणात साथ देण्यासाठी आणि मुख्य म्हणजे दोन कुटुंबे एकत्र येऊन नातेवाईल मित्र मंडळी वाढतील ." अनिकेतने उत्तर दिले.
" मग त्यासाठी लग्नच करायला हवे का "? केके नवीन सिगारेट पेटवित म्हणाला.
" अरे उद्या तो आजारी पडला तर कोण बघेल त्याला ?  त्याला मनातील काही बोलायचे असेल तर कोणाशी बोलेल. आपल्याला मूल असावे असे प्रत्येकाला वाटते त्यालाही वाटत असेल . शारीरिक गरज कुठे पूर्ण करेल तो ?" मी पुन्हा चिडून म्हणालो.
" थांब तू बोलू नकोस " .मला हाताने इशारा करीत केके म्हणाला ." माझ्याकडे लग्नासाठी कोणी मुलगी नाही पण मी दुसऱ्या मार्गाने  याच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतो.याची मदत करू शकतो .अर्थात यासाठी पैसे पडणारच ."
" झाले ,इथेही तुझा धंदा सुरूच " मी हात जोडीत म्हणालो.
" काय हरकत आहे ? चला तुम्ही प्रश्न विचारा. मी उत्तर देतो ". केके टेबलवर हात मारीत म्हणाला .
" ठीक आहे . उद्या ह्याला सकाळी पाच वाजता उठून बाहेरगावी जायचे आहे .त्याला सकाळी उठवून  चहा नाश्ता  हवाय .कपडे इस्त्री करून हवेत.आता तो काय करेल ."
" मिळेल . तुम्ही मनात आणा ते तुम्हाला मिळेल त्यासाठी बायको कशाला हवी ? हा एक नंबर आहे तिथे फोन कर .रात्री एक माणूस तुझे इस्त्रीचे कपडे घरून घेऊन जाईल. तुला सकाळी काय काय हवेय ते विचारेल.सकाळी पाच वाजता तुझ्या घराची बेल मारेल , दरवाजा उघडशील तेव्हा गरम चहा आणि नाश्ताचे पार्सल, इस्त्रीचे कपडे हातात देऊन जाईल.तुला आंघोळ घालायची असल्यास तीही घालेल .चालेल तुला" .केकेने एक नंबर त्याच्या हातात देऊन सांगितले.
" ते सर्व ठीक पण शारीरिक सुखाचे काय "? मीही टेबलवर हात मारून विचारले .
" याच नंबरवर फोन करून पाहिजे ते सांगायचे तुझ्या इच्छेप्रमाणे स्त्री पुरुष मिळतील." पुन्हा केके शांतपणे म्हणाला .
" काहीही काय , केके तू चक्क धंदा करू लागलास." मी चिडलो.
" अरे नाही रे .ह्या  अनिकेतला जश्या गरजा आहेत तश्या समाजात काही स्त्रिया मुलीना ही आहेत ज्या असा प्रॉब्लेम फेस करतायत .मी फक्त त्यांना एकत्र आणतो.अरे भाऊ मी एक कंपनी चालवतो." केके  हसत म्हणाला 
" म्हणजे "
" हे बघ परदेशात जसा इमर्जन्सीसाठी एक नंबर असतो तसा माझ्या कस्टमरला मी एक नंबर देतो .ह्या नंबरवर तुम्हाला पाहिजे त्या सेवा मिळतील .अगदी पाहिजे त्या " केके हसत म्हणाला.आता अनिकेतसोबत  मीही आश्चर्यचकित झालो.
 " समजा मी आजारी पडलो किंवा अपघात झाला तरी मला मदत मिळेल का ? मी  कुतूहलाने विचारले.
" होय ,तुम्हाला कोणतीही मदत मिळेल.तुम्ही योग्य चार्ज भरून एका फॉर्ममध्ये आपली माहिती अपलोड करायची .यात तुमचे आधार पॅन कार्ड असतीलच पण वजन , उंची , रक्त गट आणि इतर माहिती असेल .इमर्जन्सी म्हणून तुम्हाला हाच मोबाईल नंबर द्यावा लागेल.उद्या तुम्हाला अपघात झाला तर या नंबरवर फोन केला तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उत्तम उपचार केले जातील.चोवीस तास आमचा माणूस तुमच्याजवळ बसून असेल .तुम्हाला गप्पा मारायला मैत्रीण हवी असेल तर तीही तुम्हाला मिळेल. पण या सर्व गोष्टींना पैसे पडतील." केके हात वर करून म्हणाला.
" भाऊ , खरे तर ही कंपनी वृद्धांसाठी सुरू केलीय.त्यांच्याशी गप्पा मारायला .मेडिकल मदत करायला.त्यांना फिरायला घेऊन जायला. सर्व गोष्टींसाठी  एकच कॉन्टॅक्ट असावा म्हणून सुरू केली.पण हल्ली काही विधुर ,घटस्फोटीत ,सिंगल व्यक्तींनी ही सेवा घेण्यास सुरुवात केली आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे."
" पण यासाठी लागणारे मनुष्यबळ कोठून आणतोस ? मी नेहमीचा प्रश्न विचारला.
" आपल्याकडे पोरांची कमी आहेत का ? आणि यासाठी फार शिक्षणाची गरज नाही. आम्ही योग्य ते शिक्षण त्यांना देतो आणि स्मार्ट फोन तर सर्वांना वापरता येतो.फक्त मेहनत करण्याची तयारी  पाहिजे." केके चहाचा घोट घेत म्हणाला.
" अनिकेतराव तुम्ही आमची सेवा घ्या .तुम्हाला गप्पा मारायला ,जेवायला कंपनी पाहिजे तर सांगा .काय सांगावे त्यातील एकीशी तुमची मैत्री होईल आणि कदाचित लग्न ही होईल .पण नाही झाले तरी गरजेच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू याची खात्री मी देतो."  असे बोलून त्याने माहितीपत्रक अनिकेतला मेल केला.
केके तुझ्या डोक्यात काय काय येईल ते सांगता येणार नाही पण ज्यांच्याकडे पैसे आहेत पण सोबतीला माणूस नाही अश्यांसाठी हे खूपच उपयोगी आहे.धन्य आहेस तू .मी हात जोडून मनापासून  केकेला  धन्यवाद दिले.
अनिकेत केकेची सेवा नक्की घेणार यात काहीच शंका नव्हती.
श्री.किरण कृष्णा बोरकर

Saturday, May 9, 2026

द मिसिंग

द मिसिंग ....ख्रिस मुनी
अनुवाद ...नारायण पै
मेहता पब्लिशिंग हाऊस
 साधारण चोवीस वर्षांपूर्वी मेलनी, स्टेफी आणि डार्बी  निर्जन जागी बियर पीत होत्या . त्याचवेळी एका स्त्रीची गळा दाबून हत्या होताना त्यांनी पाहिली. त्यांनी  911 ला फोन केला पण पोलिसांना काही सापडले नाही. उलट खुन्याच्या हातून स्टेफी  मारली गेली आणि मेलनी बेपत्ता झाली .हल्लेखोर काही दिवसांनी मारला गेला असे जाहीर करण्यात आले.
 आता डार्बी मॅकोर्मीक पोलीस अधिकारी झालीय. एका गुन्हा घडलेल्या जागी तिला एक तरुण मुलगी सापडते.ती अतिशय घाबरलेली आणि बरेच दिवस कैदेत असलेली वाटते. तिच्याविषयी तपास करताना अजून एक मुलगी त्या मुलीसोबत होती असे डार्बीला कळते. पण या तपासात पुढे काय काय सापडेल याची कल्पना डार्बीला नसते आणि जेव्हा कळते तेव्हा ती हादरून जाते.
गेल्या वीस वर्षांत अनेक महिला आणि तरुणींचे अपहरण झालेय. यात जे अपराधी आहेत त्यांचा संबंध डार्बी आणि तिच्या बेपत्ता मैत्रिणींशी आहे . तो खुनी अजूनही डार्बीला शोधतोय .तर  आजही डार्बी मेलनीचा शोध  घेतेय. 
कोण आहे या खुनाच्या आणि अपहरणाच्या मालिकेचा सूत्रधार ? डार्बी या प्रकरणाच्या मुळाशी जाईल का ? यात अनेक धक्कादायक अनपेक्षित वळणे आहेत .खुनी अतिशय हुशार आहे आणि तो पोलिसांच्या एक पाऊल पुढेच आहे .पण शेवटी एक चूक त्याला महागात पडणार आहे.

Monday, May 4, 2026

बेअर आयलंड

बेअर आयलंड ..ऍलिस्टर मॅक्लिन
अनुवाद ..अशोक पाध्ये 
मेहता पब्लिशिंग हाऊस
मॉर्निंग रोज खरे तर एक जुनाट मासेमारीसाठी वापरण्यात येणारे मोठे जहाज .पण आज ते एका चित्रपट संस्थेच्या युनिटला आर्टिक महासागरातील एका बर्फाच्छादित बेटाकडे निघाले होते. त्या बेटाचे नाव बेअर आयलंड होते. बेटावर मानवी वस्ती नव्हतीच.ते ओसाड होते.दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी त्या बेटाचा वापर केला होता अशी अफवा होती.आज ते बेट नार्वेच्या ताब्यात होते.
कॅप्टन इम्री बोटीचा कॅप्टन होता. जहाजावर डॉक्टर मार्लो सर्वांच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी होता. प्रवासात त्या युनिटमधील एक जण अन्न विषबाधेने मृत्यू पावला .पण तो अपघात नसून खून आहे हे डॉक्टरच्या लक्षात आलेय. नंतर अजून दोन व्यक्ती विषबाधेने मरण पावतात.या जहाजावर एक खुनी आहे हे डॉक्टरच्या लक्षात येते.
पुढे बेअर आयलंडला पोचल्यावर अजून काहीजण मृत्यू पावतात.या सगळ्यांचे खून कोणीतरी जाणीवपूर्वक करतेय हे डॉक्टरच्या लक्षात येतेय..या ओसाड बेटावर चित्रपटाच्या शूटिंगचे काय कारण असावे ? अजून कितीजणांचा खून होणार होणार आहे ?
शेवटपर्यंत ताणून धरलेला रहस्यमय थरार आपल्याला खिळवून ठेवतो.

Thursday, April 30, 2026

अपेक्स

Apex
अपेक्स
साशा आणि टॉमी  नवरा बायको  उत्कृष्ट गिर्यारोहक आणि ट्रेकर . नॉर्वेत उंच कड्यावर ट्रेकिंग करताना टॉमीचा अपघाती मृत्यू होतो आणि साशा एकटी पडते.
या घटनेला 5 वर्षे उलटून गेलीय.आता साशा एकटीच ट्रेकिंगला जाते.सध्या ती ऑस्ट्रेलियात आलीय.ऑस्ट्रेलियात त्या भागात भयानक जंगल , जोरात वाहणाऱ्या नद्या आणि उंच कडे आहेत . रस्त्यात फॉरेस्ट ऑफिसर म्हणवून घेणारा बेन तिला योग्य रस्ता दाखवायला मदत करतो.
साशा तिथे ट्रेकिंग करते .जोरात वाहणाऱ्या नदीतून नौका चालवते. रात्री तंबूत झोपते.पण सकाळी उठल्यावर आपले सामान चोरीला गेलंय हे लक्षात येते. ते शोधत असताना तिला बेन दिसतो.बेन तिला जेवण देतो .पण आपले सामान बेनने चोरले आहे हे तिच्या लक्षात येते तोपर्यंत उशीर झालेला असतो.बेन तिला बांधून ठेवतो .थोड्या वेळाने तिला जंगलातून पळायची संधी देतो आणि शस्त्र घेऊन तिच्या मागावर निघतो. 
आता सुरू झालाय शिकारीचा खेळ.बेन शिकारी आहे तर साशा शिकार .आपला ट्रेकिंगचा सगळा अनुभव पणाला लावून साशाला त्या  अनोळखी घनदाट  जंगलातून स्वतः चा जीव वाचवत बाहेर पडायचे आहे तर बेनला हे जंगल पूर्णपणे माहीत आहे.तो साशाच्या दोन पावले पुढेच आहे.
साशा बेनला चकमा देऊन जंगलातून बाहेर पडेल का ? असे काय रहस्य बेनकडे आहे त्यामुळे तो साशाच्या जीवाशी खेळ खेळतोय.
चित्रपटाचे चित्रीकरण सुंदर आहे.जंगल आपल्या अंगावर येते. 
चित्रपटात साशा आणि बेन या दोनच प्रमुख व्यक्तिरेखा आहेत .
संपूर्ण चित्रपट आपल्याला श्वास रोखून पहायला लावतो.चित्रपट नेटफ्लिक्स वर हिंदी भाषेत आहे.