Showing posts with label चित्रपट परिक्षण. Show all posts
Showing posts with label चित्रपट परिक्षण. Show all posts

Tuesday, August 11, 2026

उयीर

Uyir – उयीर

एसआय अजीब प्रोबेशनवर असतो. लहानपणी रेल्वेने प्रवास करताना त्याची बहीण अचानक हरवलेली असते. तिचा आजपर्यंत काहीही शोध लागलेला नसतो. बहिणीच्या हरवण्याची ही रुखरुख अजूनही अजीबच्या मनात कायम असते.

आता अजीबची एका छोट्या गावातील पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती झालेली असते. एके दिवशी एका विहिरीत महिलेचा मृतदेह सापडल्याची बातमी पोलिसांना मिळते. प्रथमदर्शनी तिने आत्महत्या केली असावी, असेच सर्वांना वाटते.

नेहमीच्या प्रक्रियेनुसार पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवली जाते. मृत महिलेचे नाव शोभा असल्याचे समजते. तिला दोन मुले आणि नवरा असल्याची माहिती मिळते. पोलिस तिच्या नवऱ्याचा शोध घेतात आणि त्याच्याकडे मृतदेह सोपवतात. आपली मुले बहिणीकडे असल्याचे सांगून तो मृतदेह घेऊन जातो.

मात्र, त्यानंतर डॉक्टरांकडून धक्कादायक माहिती मिळते—शोभाने आत्महत्या केलेली नसून तिचा खून झालेला असतो!

या खुलाशामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरते. त्यातच शोभाचे नातेवाईक पुढे येतात आणि एक धक्कादायक सत्य सांगतात. राजू हा शोभाचा नवरा नाही आणि तिची मुलेही त्यांच्या बहिणीकडे नाहीत.

वरिष्ठ अधिकारी पोलिसांना चोवीस तासांच्या आत शोभाचा कथित नवरा राजू याला अटक करण्याचे आदेश देतात. पोलिस राजूचा माग काढतात आणि अखेर त्याला अटक करतात.

पण आता एक मोठा प्रश्न उभा राहतो—शोभाची मुले कुठे आहेत?

इथून एका वेगळ्या तपासाला सुरुवात होते.

पोलिसांच्या मते, खुन्याला अटक झाली म्हणजे त्यांची जबाबदारी संपली. मात्र, एसआय अजीबला या मुलांचा शोध घेणे ही आपलीही जबाबदारी वाटते. कारण त्याला स्वतःच्या बहिणीची आठवण येत असते. आपल्या बहिणीप्रमाणे या मुलांचीही अवस्था होऊ नये, यासाठी तो त्यांना शोधून काढण्याचा निर्धार करतो.

पण अजीबसमोरचे आव्हान सोपे नसते. “ही मुले सापडणारच नाहीत. अशी मुले कधीच सापडत नाहीत, असा इतिहास आहे,” असेच त्याला आजूबाजूचे लोक सांगत असतात.

मग कुठे असतील ती मुले?
अजीब त्यांना शोधून काढू शकेल का?
आणि या मुलांचा शोध घेताना अजीबच्या स्वतःच्या भूतकाळातील जखम पुन्हा उघडेल का?

सुरुवातीला साधा आणि सरळ वाटणारा खुनाचा तपास पुढे एका वेगळ्याच भावनिक पातळीवर पोहोचतो. मुलांचा शोध घेताना अजीबची स्वतःच्या हरवलेल्या बहिणीशी जोडलेली भावनिक नाळ अधिक घट्ट होत जाते आणि कथा प्रेक्षकांना अक्षरशः हेलावून टाकते.

‘Uyir – उयीर’ हा चित्रपट हिंदी भाषेत हॉटस्टारवर पाहता येतो.

Friday, May 22, 2026

Kaattaan

Muthu Alias Kaattaan
मुथु उर्फ कत्तन
तामिळनाडूतील छोट्या गावातील पोलीस स्टेशन लवकरच बंद होऊन सर्व पोलिसांची बदली शहरात होणार आहे.तिथे सर्व पोलीस स्थानिक आहेत. एका हवालदाराच्या तर पाच हजार बकऱ्या आहेत. गावात काहीतरी गुन्हा व्हावा यासाठी सर्व पोलीस कामाला लागले आहेत.
त्याचवेळी एका मुलाला गावाच्या बाहेर टेकडीवर एका माणसाचे मुंडके सापडते. मुंडक्याच्या शेजारी  काही पैसेही आहेत  .जो कोणी आपले अंत्यसंस्कार करेल त्याला हे पैसे द्यावेत अशी चिट्ठी त्यात असते.पण त्याचे धड कुठेही सापडत नाही.
गावातील सर्व पोलीस यंत्रणा तपासाला लागते .मुळात त्या शीराची ओळख पटायची आहे .त्याचे धड शोधायचे आहे.
त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्नात पोलिसांचा प्रवास सुरु होतो.त्या व्यक्तीचे नाव मुथु असल्याचे कळते आणि तुकड्या तुकड्यात त्याची ओळख होत जाते. शेवटी त्या मुथुची सलग कहाणी उलगडली जाते.
कोण आहे हा मुथु ? कोणी त्याचा खून केलाय ?? त्याबद्दल फार कोणाला माहीत नाही.जे त्याला ओळखतात ते फक्त काही काळ त्याच्यासोबत राहिले आहेत .
मुथु एक रहस्य आहे . 
एक थरारक रहस्यमय तपास आपली उत्सुकता ताणून धरते .
विजय सेथुपती निर्मित ह्या सिरीजमध्ये  त्यानेच मुथुची प्रमुख भूमिका केली आहे.सिरीजचे कथानक खूप चांगले आहे .
हॉटस्टारवर हिंदी भाषेत ही सिरीज आहे .

Tuesday, July 29, 2025

ट्रिगर

Trigger
ट्रिगर 
जेव्हा सगळीकडे अराजकता माजते तेव्हा बंदूक हातात घ्यावीशी वाटते आणि तीच बंदूक तुम्हाला कुरियरद्वारे दारात आली तर..?
कॉलेजमध्ये काही ठराविक मुलांवर रॅगिंगचालू आहे.त्याने सरांकडे तक्रार केली आहे पण त्याचा काहीच उपयोग नाही. हातात बंदूक आली तर सगळ्यांना ठार मारीन असे त्याला वाटत असते.
हॉस्टेलमध्ये राहणार तरुण आजूबाजूच्या रूममधून चाललेल्या गोंगाटाला कंटाळला आहे. त्याचा अभ्यास होत नाही.उलट  त्यालाच मारहाण होते.बंदूक हाती आली की सगळ्यांना ठार मारायची त्याची इच्छा आहे.
पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने एका कंपनीत पैसे गुंतविले आणि ती कंपनी बंद झाली .इच्छा असूनही पोलीस अधिकारी कायद्याने त्यांना शिक्षा करू शकत नाही .तो बंदूक घेऊन त्यांना मारायला जातो.
कोरियात सामान्य नागरिकांना बंदूक वापरण्यास बंदी आहे. ली डो पूर्वी सैन्यात होता.बंदुकीचा उपयोग/ दुरुपयोग त्याला माहितीय म्हणून पुन्हा कधीही बंदूक न उचलण्याची शपथ घेतलीय आणि आता पोलिसात साधा ऑफिसर म्हणून राहतोय. शहरात एका हॉस्टेलमध्ये प्रचंड गोळीबार होतो तेव्हा तिथे जाऊन चौकशी करताना काडतूसाचा मोठा साठा आढळतो.अधिक चौकशी करताना कोरियात अनेकांना अश्या बंदूक फ्रिमध्ये मिळाल्यात असे कळते.
मून बॅक या सर्व करस्थानाचा मुख्य सूत्रधार आहे. तो सर्वाना फुकट बंदूक वाटतो. समाजात क्रांती होईल असा त्याचा विश्वास आहे..अन्याय दूर करण्यासाठी बंदूक वापरावीच लागेल असे त्याला सिद्ध करायचे आहे.
खरोखरच बंदुकीच्या जोरावर अन्याय दूर होईल ?
ली डो हे सर्व थांबविण्यासाठी पुन्हा बंदूक हाती घेईल ?
एक अस्वस्थ करणारी ही कोरियन सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Monday, February 24, 2025

झिरो डे

Zero Day
झिरो डे
एका शांत दिवशी अमेरिकेवर एक सायबर हल्ला होतो.हा हल्ला फक्त एकच मिनिट होता.पण त्यात अमेरिकेची सगळी यंत्रणा कोलमडून पडली.ट्रान्सपोर्ट, बँक व्यवहार ,मोबाईल सेवा यावर मोठा परिणाम झाला.यात झालेल्या विविध अपघातात सुमारे साडेतीन हजार अमेरिकन नागरिक मृत्यू पावले.
अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ताबडतोब झिरो डे कमिशनची घोषणा केली.माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज मुलेन जे आता एक शांत निवृत्त जीवन जगतायत त्यांची या कमिशनचे प्रमुख म्हणून निवड झाली. त्यांना अमर्याद अधिकार दिले गेले.
पण त्यांनी यात यशस्वी होऊ नये यासाठी प्रयत्न करणारे ही काहीजण आहेत.मुलेनची मुलगी सिनेटर आहे पण तिही वडिलांच्या विरुद्ध आहे . शत्रू देशावर या घटनेची जबाबदारी टाकावी म्हणून मुलेनवर दबाव येतोय.पण तो सर्वाना पुरून उरतो.
जसजसा मुलेन या प्रकरणाच्या मुळाशी जातो तसे अनेक अनपेक्षित धक्के मिळतात.
सायबर क्राईमवर अतिशय थरारक सिरीज तुम्हाला सहा भाग संपेपर्यंत खिळवून ठेवते.
रॉबर्ट डी निरो सारखा कसलेला कलाकार जॉर्ज मुलेनच्या प्रमुख भूमिकेत आहे.वयानुसार त्याने या भूमिकेला न्याय दिलाय.
नेटफ्लिक्सवर ही सिरीज हिंदी भाषेत आहे.

Tuesday, July 4, 2023

रस्ट क्रीक

रस्ट क्रीक 
RUST CREEK
स्वायर स्कॉट एक कॉलेज तरुणी .उत्कृष्ठ खेळाडू.तिला वॉशिंग्टनमधून एका मोठ्या कंपनीतून इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आलेय. ती एकटीच कारने वॉशिंग्टनला निघालीय.थँक्सगिविंगचे दिवस असल्याने सगळीकडे ट्रॅफिक जॅम आहे म्हणून ती फोनमधील जीपीएसच्या मदतीने दुसरा मार्ग पकडते आणि दाट जंगलात जाऊन पोचते.
आता ती अश्या जागी पोचते जिथून मनुष्यवस्ती अजिबात दिसत नाही.ती जीपीएसचा नाद सोडून नकाशा काढते. इतक्यात बाजूने एक गाडी जवळ येऊन थांबते.त्यात दोन तरुण असतात.ते दोघेही भाऊ असल्याचे तिला सांगतात आणि मदतीची तयारी दाखवितात.स्कॉटला त्यांची वागणूक न पटल्याने ती नकार देते तेव्हा तिच्यावर हल्ला करतात.
स्कॉटच्या पायाला सुरा लागून ती जखमी होते पण ते भाऊही जखमी होतात. स्कॉट त्यांच्यापासून दूर जंगलात पळते.ते दोघेही तिच्या मागे लागतात.ती त्यांना शिताफीने चकमा देते पण जखमी आणि उपाशी असल्यामुळे बेशुद्ध पडते .
पुढे काय ?? 
ते तरुण तिला पुन्हा पकडतील का ? 
का ते तिच्या मागे लागले ??
पोलीस तिला शोधून काढतील का ??
एक थरारक अनुभव घ्यायचा असेल तर नक्की पहा.
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.