Thursday, February 27, 2025

oppam

Oppam
DREAMER
अप्पम /ड्रीमर
जयरामन जन्मतः आंधळा.गावी त्याचे घर गहाण आहे. लहान बहिणीचे लग्न करायचे आहे. तो शहरात एका उच्चभ्रू सोसायटीत लिफ्टमन चे काम करतोय.तो आंधळा असला तरी त्याचे नाक आणि कान व नाक तीक्ष्ण आहेत. सोयायटीत सगळ्यांचा तो लाडका आहे. निवृत्त न्यायाधीश कृष्णमूर्तीचा जयरामनवर खूपच विश्वास आहे.त्यांची उटीत शिकणारी एक अनौरस मुलगी नंदिनीची जबाबदारी त्यांनी जयरामनला दिलीय.
काही वर्षांपासून कृष्णमूर्ती वासुदेव नावाच्या व्यक्तीच्या शोधात आहेत. वासुदेव तुरुंगात शिक्षा भोगून बाहेर आलाय. आता केरळमध्ये विविध ठिकाणी खून होतायत. पोलिसांना त्याचे कोणतेही पुरावे सापडत नाहीत.पण एक दिवशी सोसायटीत लग्न समारंभ चालू असताना न्यायमूर्ती कृष्णमूर्ती चा खून होतो .
जयरामन आणि खुन्याची झटापट होते त्यावरून तो खुनी कसा असेल याची जयरामनला कल्पना असते.तो खुनी आता जयरामनच्या मागावर असतो.
त्याला जयरामनकडून काहीतरी महत्वाचे हवेय.जयरामनला याची कल्पना आहे .तो त्या खुन्याला चकमा देईल का ??
शहरात घडणाऱ्या खुनांशी जयरामनचा काही संबंध आहे का ? 
मल्याळम सुपरस्टार मोहनलालने जयरामनची भूमिका केलीय.
प्रियदर्शन चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
चित्रपट ड्रीमर नावाने युट्यूबवर हिंदी भाषेत पाहायला मिळेल.

Monday, February 24, 2025

झिरो डे

Zero Day
झिरो डे
एका शांत दिवशी अमेरिकेवर एक सायबर हल्ला होतो.हा हल्ला फक्त एकच मिनिट होता.पण त्यात अमेरिकेची सगळी यंत्रणा कोलमडून पडली.ट्रान्सपोर्ट, बँक व्यवहार ,मोबाईल सेवा यावर मोठा परिणाम झाला.यात झालेल्या विविध अपघातात सुमारे साडेतीन हजार अमेरिकन नागरिक मृत्यू पावले.
अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ताबडतोब झिरो डे कमिशनची घोषणा केली.माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज मुलेन जे आता एक शांत निवृत्त जीवन जगतायत त्यांची या कमिशनचे प्रमुख म्हणून निवड झाली. त्यांना अमर्याद अधिकार दिले गेले.
पण त्यांनी यात यशस्वी होऊ नये यासाठी प्रयत्न करणारे ही काहीजण आहेत.मुलेनची मुलगी सिनेटर आहे पण तिही वडिलांच्या विरुद्ध आहे . शत्रू देशावर या घटनेची जबाबदारी टाकावी म्हणून मुलेनवर दबाव येतोय.पण तो सर्वाना पुरून उरतो.
जसजसा मुलेन या प्रकरणाच्या मुळाशी जातो तसे अनेक अनपेक्षित धक्के मिळतात.
सायबर क्राईमवर अतिशय थरारक सिरीज तुम्हाला सहा भाग संपेपर्यंत खिळवून ठेवते.
रॉबर्ट डी निरो सारखा कसलेला कलाकार जॉर्ज मुलेनच्या प्रमुख भूमिकेत आहे.वयानुसार त्याने या भूमिकेला न्याय दिलाय.
नेटफ्लिक्सवर ही सिरीज हिंदी भाषेत आहे.

Tuesday, February 4, 2025

द सिक्रेट ऑफ शिलेदार

द सिक्रेट ऑफ शिलेदार 
The Secret Of The Shiledars
ज्यांनी डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांचे प्रतिपश्चंद्र पुस्तक वाचले असेल त्यांना ही सिरीज पटकन संपल्यासारखी वाटेल.खजिन्याचा शोध घेणे ही सोपी गोष्ट नाही त्यात जर छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना असेल तर फारच कठीण काम.
असाच एक खजिना शिलेदार बहिर्जी नाईक यांनी लपवून ठेवला आहे आणि त्याच्या रक्षणासाठी काही शिलेदारांची नेमणूक केली होती.हे शिलेदार पिढ्यानपेढ्या त्या खजिन्याचे रक्षण करतायत. ह्या खजिन्यापर्यंत पोचण्यासाठी अनेक कोड ,चिन्हे आणि अनेक गुप्त मार्ग आखले गेले आहेत.
डॉ. रवी हा आताच्या काळातील खजिन्याचा शिलेदार आहे . पण त्याला याविषयी काहीच माहिती नाही . त्याच्यामागे ह्या खजिन्याच्या शोधात असणारे अनेकजण लागले आहेत.
काय आहे या खजिन्याचे रहस्य . डॉ. रवी ते गुपित शाबूत ठेवेल का ?
पुस्तक वाचताना जो रोमांचकारी अनुभव येतो तो अनुभव ही सिरीज पाहताना येत नाही .उलट ही सिरीज पटकन संपल्यासारखी वाटते. दिग्दर्शकाला लेखकाशी चर्चा करून अजून पटकथेची जोड देऊन सिरीज वाढवता आली असती किंवा त्याने हा एक चित्रपट बनवला असता तरी चालले असते. 
राजीव खंडेलवाल मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे .तर सई ताम्हणकर नुसती शोभेची बाहुली आहे. एक नायिका नायिकेसोबत असावी म्हणून ती आहे .तिच्याजागी एखादा पुरुष असता तरी चालले असते. तिला फक्त सतत फ्रेममध्ये राहायचे काम आहे.तिला फारसे संवाद नाहीत एक दोन एक्शन सीन आहेत. एका चांगल्या अभिनेत्रीला वाया घालवल्याचे दुःख वाटते.
बाकी दिलीप प्रभावळकर , नंदू माधव छोट्या भूमिकेत चमकले आहेत.आशिष विद्यार्थी ला मोठी भूमिका आहे.
खजिन्यावर आधारित बरीच पुस्तके आहेत .शोध ,विश्वस्त , कालचक्राचे रहस्य , अश्विन संघीची पुस्तके .यावर चांगल्या थरारक वेब सिरीज होऊ शकतात.
आदित्य सरपोतदार यांनी एक मराठी कलाकृती राष्ट्रीय पातळीवर नेली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन
ही सिरीज हॉटस्टारवर मराठी हिंदी आणि इतर भाषेत आहे.