Sunday, September 21, 2025

Ice Road

Ice Road : Vengeance
आईस रोड : वेंगेअन्स
माईक एक उत्तम गिर्यारोहक .त्याचा लहान भाऊ सैनिक  आणि उत्तम  गिर्यारोहक होता. पण इराण युद्धात मारला गेला. आपल्या अस्थी माउंट एव्हरेस्टवर विसर्जित कराव्या हीच त्यांची अंतिम इच्छा होती.आपल्या भावाची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी माईक नेपाळला येतो.
रुद्र यश एक  स्थानिक गुंड. कोदारी गावात लोकांच्या जमिनी हडपून मोठे धरण  बांधायचे त्याची योजना आहे.पण जमीन गणेश रायच्या नावावर आहे. गणेश रायचा धरणाला विरोध आहे .
माईक लोकल गाईड धानीच्या मदतीने एव्हरेस्ट टूर ठरवितो .त्यासाठी तो किवी एक्सप्रेसच्या बसमध्ये बसतो . गणेश रायचा मुलगा विजय रायही बसमध्ये चढतो .पण रस्त्यात यशचे गुंड हल्ला करतात आणि त्याच्यासकट बस ताब्यात घेतात .
आता सुरू होतो एक अप्रतिम थरारपट .धानी गाईड होण्यापूर्वी सैन्यात होती.ती आणि माईक विजयला गुंडांच्या तावडीतून सोडवतात आणि चीन बॉर्डरच्या दिशेने निघतात. चीन बॉर्डर पार केल्यावर ते सुरक्षित होतील पण प्रवास  खडतर आणि धोकादायक आहे. त्यात मागावर गुंड आणि नेपाळ पोलीसही आहेत. बसही जुनी आहे .माईक आणि धानी विजयला घेऊन चीन बॉर्डर पार करतील का ?
लियाम निसन माईकच्या प्रमुख भूमिकेत आहे. एक जीवघेणा पाठलाग आणि अप्रतिम थरार पाहायचा असेल तर प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत असलेला हा चित्रपट चुकवू नका.

Monday, September 1, 2025

लोकमान्य

लोकमान्य
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वेगवेगळ्या मंडपांत तो फिरत होता. त्याच्या वेशभूषेमुळे तो इतरांच्या नजरेत लगेच भरत होता.
टिपिकल पुणेरी वेश होता त्याचा . शुभ्र पांढरे धोतर, लांबलचक सदरा, खांद्यावर उपरणे, हातात काठी, आणि डोक्यावर पुणेरी पगडी. चेहरा लक्षात राहील असा; पण जास्त भीतीदायक होती ती त्यांची करडी नजर. जाड झुपकेदार मिशा, भव्य कपाळ . सर्व काही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देत होतं.
ते अस्वस्थपणे समोर दिसेल त्या गणपती मंडपात जात होते. गणेशाच्या मूर्तीकडे बारकाईने पाहत, कधी नाराजीने काठी आपटत ते ताडताड निघून जात. त्यांच्या देहबोलीतली अस्वस्थता पाहून मंडपातील मखरात बसलेला तोही गोंधळून जात होता.
आताही ते एका मंडपातून नाराजीने बाहेर पडत होते, इतक्यात समोरून एक तरुण आला.
 "सर, काय झालं? इतक्या रागावलेल्या चेहऱ्याने बाहेर का पडताय? काही प्रॉब्लेम आहे का?"
तो मंडप एका सुप्रसिद्ध मंडळाचा होता.
 "रागावू नको तर काय करू? आत शिरूच देत नाहीत कार्यकर्ते. म्हणतात, ‘लाइन लावा’. सगळे रांगेतूनच येतात म्हणे!" ते संतापाने म्हणाले.
 "बरोबर आहे ना. नियमच आहे तो. रांग न लावली तर गोंधळ उडेल. लाखो लोक येतात इथे दर्शनाला." तरुण हसत म्हणाला. हसताना त्याचा कोपऱ्यावरचा तुटका दात उठून दिसत होता.
 "म्हणजे तुलाही बाहेर काढलंय तर ! पण मग मंडपाच्या मागून जे थेट मूर्तीच्या पायाजवळ जातात, ते कोण ?" करडी नजर रोखून त्यांनी विचारलं.
तरुण थोडा चपापला.
"मी इथला कार्यकर्ता आहे. विनायक नाव माझं. ती लोक मोठी माणसं आहेत. त्यांना रांगेत उभं करायचं कसं? त्यांचा वेळ देशासाठी महत्त्वाचा आहे," तो हळू आवाजात म्हणाला.
 "त्यांच्या घरीही गणपती बसले असतील ना? मग इथे का येतात? पाहा त्या बिचाऱ्याला .तीन तास लहान मुलाला घेऊन रांगेत उभा आहे. आता दर्शनाला येईल तर पाच सेकंदही थांबू देणार नाहीत, हात धरून बाहेर काढतील." त्यांनी गर्दीकडे बोट दाखवलं.
 "मी करतो त्याच्यासाठी काहीतरी," असं म्हणून विनायक त्या दिशेने गेला.
 "अशा किती जणांची मदत करणार तू? कित्येक स्त्रियांना ढकलून बाजूला केलं जातं, त्यासाठी काही करणार का?" पुन्हा करडी नजर रोखून त्यांनी विचारलं.
विनायक गप्प बसला.
"यासाठीच का आम्ही घरातील गणपती बाहेर काढून सार्वजनिक केला ?" ते पुटपुटत पुढे निघाले. विनायकही मागून गेला.
 "आता कुठे येतोस मागेमागे?"
 "मलाही काही काम नाही. येतो तुमच्यासोबत, लोकमान्य."
ते चमकले.
 "तू ओळखलंस मला? अजूनही माझी ओळख आहे तर!" ते हलकेसे हसले.
 "तुम्हाला कोण विसरेल, लोकमान्य! हा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय, ते तुमच्यामुळेच."
 "माझ्यामुळे? मी ज्या हेतूने सुरू केला तो हेतू आता कुठे दिसतोय? मी घरातून बाहेर काढला गणपती, जनजागृतीसाठी. रात्रभर व्याख्यानं, कथाकथन, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं गुणगान,  बालगंधर्वांची नाटकं…  बाबासाहेबांची व्याख्याने काय दिवस होते ते!" लोकमान्य आठवणीत रंगले.
"बरोबर आहे, पण आता गर्दी एवढी असते की असं काही करणं अवघड आहे. शिवाय सेलिब्रिटींच्या कार्यक्रमांचं वेड आलंय. सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न आहे."
ते बोलता बोलता एका गल्लीत गेले. छोटा मंडप दिसला. शांतता होती. काही कार्यकर्ते कॅरम खेळत होते; काही झोपून मोबाईल पाहत होते. दर्शनाला कोणीच नव्हतं.
 "इथे तर विरुद्ध परिस्थिती आहे. उंदीर आरामात नैवेद्य खातोय; कुणाला पर्वा नाही! इथे कार्यक्रम करायला काय हरकत आहे? आपल्याच भागात किती होतकरू कलाकार आहेत. त्यांनाच सेलिब्रिटी बनवा! पण मनावर घ्यायला हवं ना." लोकमान्यांचा आवाज चढला.
 "जग बदलतंय, तसे उत्सवही बदलतील. पण सामाजिक कर्तव्यं विसरलेली नाहीत अजून. जमा होणारा पैसा लोककल्याणासाठी वापरला जातोय." विनायक समजावत म्हणाला.
 "खरं आहे. चला, पहाट होतेय. निघतो मी."
 "मला एखाद्या मंडपापर्यंत सोबत चला."
ते हसले.
एका मंडपाजवळ पोहोचल्यावर अचानक त्यांनी विचारलं 
 "तुला घरातून बाहेर काढून सार्वजनिक बनवलं, त्याचं दुःख नाही ना?"
विनायक थोडा चिडून म्हणाला —
 "कधी घराबाहेर काढलंत तुम्ही? तुम्ही खरंच स्वतःला लोकमान्य समजता का?"
ते पुन्हा हसले आणि वळून चालू लागले.
त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे विनायकाने नम्रपणे नमस्कार केला.

मंडपात शिरल्यावर उंदीर बोलला  "आता काय, रात्रीची गस्त सुरू केलीत का? कंटाळा येतो म्हणून कोणासोबतही फिरायला जाता का ?"
तो चिडून म्हणाला  "तोंड सांभाळून बोल, मूषका. लोकमान्य होते ते. आज खरंच इथे येण्याचं सार्थक झालं."
 "पण म्हणून इतकं भ्यायचं का त्यांना? मान खाली घालून किती हळू आवाजात बोलत होता, निघताना पाया पडला. शेवटी मानवच आहेत ते."

तो गंभीर होत म्हणाला " काही माणसं कर्तृत्वानं देवापेक्षाही मोठी होतात. त्यांच्या नजरेला नजर दिली की आपोआपच मान झुकते. असं सहवास लाभणं हे भाग्यच. पण त्यांच्यापासून स्वतःला लपवू शकलो नाही, हे कायम लक्षात राहील."

© श्री.किरण कृष्णा बोरकर