लोकमान्य
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वेगवेगळ्या मंडपांत तो फिरत होता. त्याच्या वेशभूषेमुळे तो इतरांच्या नजरेत लगेच भरत होता.
टिपिकल पुणेरी वेश होता त्याचा . शुभ्र पांढरे धोतर, लांबलचक सदरा, खांद्यावर उपरणे, हातात काठी, आणि डोक्यावर पुणेरी पगडी. चेहरा लक्षात राहील असा; पण जास्त भीतीदायक होती ती त्यांची करडी नजर. जाड झुपकेदार मिशा, भव्य कपाळ . सर्व काही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देत होतं.
ते अस्वस्थपणे समोर दिसेल त्या गणपती मंडपात जात होते. गणेशाच्या मूर्तीकडे बारकाईने पाहत, कधी नाराजीने काठी आपटत ते ताडताड निघून जात. त्यांच्या देहबोलीतली अस्वस्थता पाहून मंडपातील मखरात बसलेला तोही गोंधळून जात होता.
आताही ते एका मंडपातून नाराजीने बाहेर पडत होते, इतक्यात समोरून एक तरुण आला.
"सर, काय झालं? इतक्या रागावलेल्या चेहऱ्याने बाहेर का पडताय? काही प्रॉब्लेम आहे का?"
तो मंडप एका सुप्रसिद्ध मंडळाचा होता.
"रागावू नको तर काय करू? आत शिरूच देत नाहीत कार्यकर्ते. म्हणतात, ‘लाइन लावा’. सगळे रांगेतूनच येतात म्हणे!" ते संतापाने म्हणाले.
"बरोबर आहे ना. नियमच आहे तो. रांग न लावली तर गोंधळ उडेल. लाखो लोक येतात इथे दर्शनाला." तरुण हसत म्हणाला. हसताना त्याचा कोपऱ्यावरचा तुटका दात उठून दिसत होता.
"म्हणजे तुलाही बाहेर काढलंय तर ! पण मग मंडपाच्या मागून जे थेट मूर्तीच्या पायाजवळ जातात, ते कोण ?" करडी नजर रोखून त्यांनी विचारलं.
तरुण थोडा चपापला.
"मी इथला कार्यकर्ता आहे. विनायक नाव माझं. ती लोक मोठी माणसं आहेत. त्यांना रांगेत उभं करायचं कसं? त्यांचा वेळ देशासाठी महत्त्वाचा आहे," तो हळू आवाजात म्हणाला.
"त्यांच्या घरीही गणपती बसले असतील ना? मग इथे का येतात? पाहा त्या बिचाऱ्याला .तीन तास लहान मुलाला घेऊन रांगेत उभा आहे. आता दर्शनाला येईल तर पाच सेकंदही थांबू देणार नाहीत, हात धरून बाहेर काढतील." त्यांनी गर्दीकडे बोट दाखवलं.
"मी करतो त्याच्यासाठी काहीतरी," असं म्हणून विनायक त्या दिशेने गेला.
"अशा किती जणांची मदत करणार तू? कित्येक स्त्रियांना ढकलून बाजूला केलं जातं, त्यासाठी काही करणार का?" पुन्हा करडी नजर रोखून त्यांनी विचारलं.
विनायक गप्प बसला.
"यासाठीच का आम्ही घरातील गणपती बाहेर काढून सार्वजनिक केला ?" ते पुटपुटत पुढे निघाले. विनायकही मागून गेला.
"आता कुठे येतोस मागेमागे?"
"मलाही काही काम नाही. येतो तुमच्यासोबत, लोकमान्य."
ते चमकले.
"तू ओळखलंस मला? अजूनही माझी ओळख आहे तर!" ते हलकेसे हसले.
"तुम्हाला कोण विसरेल, लोकमान्य! हा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय, ते तुमच्यामुळेच."
"माझ्यामुळे? मी ज्या हेतूने सुरू केला तो हेतू आता कुठे दिसतोय? मी घरातून बाहेर काढला गणपती, जनजागृतीसाठी. रात्रभर व्याख्यानं, कथाकथन, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं गुणगान, बालगंधर्वांची नाटकं… बाबासाहेबांची व्याख्याने काय दिवस होते ते!" लोकमान्य आठवणीत रंगले.
"बरोबर आहे, पण आता गर्दी एवढी असते की असं काही करणं अवघड आहे. शिवाय सेलिब्रिटींच्या कार्यक्रमांचं वेड आलंय. सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न आहे."
ते बोलता बोलता एका गल्लीत गेले. छोटा मंडप दिसला. शांतता होती. काही कार्यकर्ते कॅरम खेळत होते; काही झोपून मोबाईल पाहत होते. दर्शनाला कोणीच नव्हतं.
"इथे तर विरुद्ध परिस्थिती आहे. उंदीर आरामात नैवेद्य खातोय; कुणाला पर्वा नाही! इथे कार्यक्रम करायला काय हरकत आहे? आपल्याच भागात किती होतकरू कलाकार आहेत. त्यांनाच सेलिब्रिटी बनवा! पण मनावर घ्यायला हवं ना." लोकमान्यांचा आवाज चढला.
"जग बदलतंय, तसे उत्सवही बदलतील. पण सामाजिक कर्तव्यं विसरलेली नाहीत अजून. जमा होणारा पैसा लोककल्याणासाठी वापरला जातोय." विनायक समजावत म्हणाला.
"खरं आहे. चला, पहाट होतेय. निघतो मी."
"मला एखाद्या मंडपापर्यंत सोबत चला."
ते हसले.
एका मंडपाजवळ पोहोचल्यावर अचानक त्यांनी विचारलं
"तुला घरातून बाहेर काढून सार्वजनिक बनवलं, त्याचं दुःख नाही ना?"
विनायक थोडा चिडून म्हणाला —
"कधी घराबाहेर काढलंत तुम्ही? तुम्ही खरंच स्वतःला लोकमान्य समजता का?"
ते पुन्हा हसले आणि वळून चालू लागले.
त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे विनायकाने नम्रपणे नमस्कार केला.
मंडपात शिरल्यावर उंदीर बोलला "आता काय, रात्रीची गस्त सुरू केलीत का? कंटाळा येतो म्हणून कोणासोबतही फिरायला जाता का ?"
तो चिडून म्हणाला "तोंड सांभाळून बोल, मूषका. लोकमान्य होते ते. आज खरंच इथे येण्याचं सार्थक झालं."
"पण म्हणून इतकं भ्यायचं का त्यांना? मान खाली घालून किती हळू आवाजात बोलत होता, निघताना पाया पडला. शेवटी मानवच आहेत ते."
तो गंभीर होत म्हणाला " काही माणसं कर्तृत्वानं देवापेक्षाही मोठी होतात. त्यांच्या नजरेला नजर दिली की आपोआपच मान झुकते. असं सहवास लाभणं हे भाग्यच. पण त्यांच्यापासून स्वतःला लपवू शकलो नाही, हे कायम लक्षात राहील."
No comments:
Post a Comment