मराठी भाषादिन
तसा तो साहेबांचा कट्टर भक्त.कोणत्याही आंदोलनाला .. सभेला...दोन पावले नेहमीच पुढे. दोन तीन केसेस अंगावर अभिमानाने मिरवत होता.तारखेला मोठ्या उत्साहात कोर्टात हजरही असायचा.
कालच वरून आदेश आला होता.उद्या मराठी भाषा दिवस आहे.सगळ्यांशी मराठीतच बोलायचे . जो इतर भाषेत बोलेल त्याला फटकवा.साल्याना कळू दे आपली ताकत... ..
मग काय.... हा चार इंच छाती पुढे काढीतच घरी आला. येता येता "क्यू साब कैसे हो...."?? विचारणाऱ्या कोपऱ्यातल्या पानवाल्याला खुन्नस दिली.
"कल मराठीमें बोलो.."असा दम देऊन घरी आला . आत शिरताच बायकोचे फोनवर बोलणे कानावर आदळले.
"ऐसा कैसा डायरेक्ट एक रुपया बढाया .. पैसा क्या झाड पे लगता है .हम दुसरा इस्त्रीवाला देखेगा..."हे ऐकून त्याचे टाळले सरकले.
फोन ठेवताच बायकोने सांगितले इस्त्रीवाल्याने एक रुपया वाढविला आहे .
"ठीक आहे उद्या बघतोच त्याला... .." तो जोशात म्हणाला.
"उद्या का ...?? आज का नको ..?? तिने विचारले.
"उद्या साहेबांचा आदेश आहे. आज नाही ..."तो तिला कोड्यात टाकून बाथरूममध्ये शिरला.
फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा छोटी धावत आली."पपा टीचर म्हणाली..कम टूमारो विथ न्यू मराठी पोएम...मला मराठी पोएम शिकवा...
"आयला त्या टीचरच्या.... मराठी कविता ही इंग्लिशमध्ये मागते . उद्या बघतोच तिलाही .."असे मनात म्हणत तिला एक मराठी कविता शिकवली .
दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तोच दारातील पाववाल्याच्या आवाजाने.
"पाव... पाववाला लेलो पाव.." असे ओरडणार्या पाववाल्याच्या आवाजाने साहेबांचा आदेश आठवला आणि त्याच तिमिरीत त्याने त्याच्या कानाखाली आवाज काढला.
"मराठीत बोल .. ...तो रागात म्हणाला .
बायकोने धावत येऊन मागे ओढले तसा पाववाला पळून गेला.
" आता लेकीला काय देऊ खायला ...?? ती चिडून म्हणाली.
"चपाती दे.... "तो ठेक्यात म्हणाला.
"जा...दळण घेऊन या..."तीही ठसक्यात म्हणाली. "मराठीसाठी काय पण....." असे म्हणत तो खाली उतरला.
समोरच्या चक्कीवाल्याकडे पीठ दे आमचे असे म्हणतात.... वो बाद में आवो अभी हुवा नही... असे उत्तर येताच त्याच्या हात वर झाला आणि खाणकन त्या चक्कीवाल्याच्या गालावर आदळला.
"मराठीत बोल ..."असे बोलून तो बाहेर पडला.
दुपार होईपर्यंत त्याचे हेच चालू होते .अनेक टॅक्सीवाले ...भाजीवाले.. त्याने पळवून लावले.
खुश होऊन तो घरी जेवायला आला. पण ताटात ऑम्लेट आणि भात पाहताच टाळके सरकले .
"हे काय ..?? वार कोणता ..?? तू देतेस काय ...?? मासे कुठेयत ..?? कालवण कुठेय...?? त्याने चिडून विचारले.
"त्या मासेवाल्याला हिंदीत बोलतो म्हणून मारून पळवलेत. बाजारात कोळीन घासाघीस करत नाही . जे बोलेन त्या पैशात मासे घेऊन जा म्हणते .. आपल्याला कुठे परवडतेय..दारातील मासेवाला स्वतात देतो.आज खा ऑम्लेट.. पोरगी पण तेच घेऊन गेलीय डब्यात.... ."बायको चिडून म्हणाली.
मुकाट्याने जेवून तो बाहेर पडला. खाली नाक्यावर उभा असताना एक मध्यमवयीन जोडपे त्याच्याजवळ येऊन उभे राहिले.त्यांच्याबरोबर साधारण सहा वर्षाची मुलगी होती.
"भाईसाब.... ये सरकारी हॉस्पिटलमें कैसे जाते है बताओगे ...?? त्याला परत आदेश आठवला . चिडून त्याने त्या माणसाची कॉलर पकडली.
"मराठीत बोल ...."?? त्याचा आवेश पाहून त्याच्याबरोबरची स्त्री घाबरली.तिने त्याचे पाय पकडले आणि रडत म्हणाली "माफ करो भैय्या ... आजही बाहरगाव से आये है .इस बच्चीके इलाज के लिये . हमे मराठी नही आती....."ती हात जोडून त्याची विनवणी करू लागली तसा तो थंड झाला . शरमेने त्याची मान खाली गेली . त्याने ताबडतोब त्यांच्यासाठी टॅक्सी शोधण्यास सुरवात केली.एक दोन टॅक्सीवाल्याना त्याने थांबविण्याचा प्रयत्न केला . पण त्याचे ऐकून कोणीच टॅक्सीवाला थांबायला तयार नव्हता . चिडून तो एका टॅक्सीच्या समोर थांबला .
"हॉस्पिटल चलोगे...." असे चिडून म्हणताच टॅक्सीवाल्याने मान डोलावली . त्यांना टॅक्सी बसवून ड्रायव्हरला हॉस्पिटलचा पत्ता सांगितला . निघताना त्या स्त्रीने हात जोडून "शुक्रिया भैय्या ...."असे म्हणताच डोळ्यातील अश्रू पुसत तो माघारी वळला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर
No comments:
Post a Comment