Thursday, April 30, 2026

अपेक्स

Apex
अपेक्स
साशा आणि टॉमी  नवरा बायको  उत्कृष्ट गिर्यारोहक आणि ट्रेकर . नॉर्वेत उंच कड्यावर ट्रेकिंग करताना टॉमीचा अपघाती मृत्यू होतो आणि साशा एकटी पडते.
या घटनेला 5 वर्षे उलटून गेलीय.आता साशा एकटीच ट्रेकिंगला जाते.सध्या ती ऑस्ट्रेलियात आलीय.ऑस्ट्रेलियात त्या भागात भयानक जंगल , जोरात वाहणाऱ्या नद्या आणि उंच कडे आहेत . रस्त्यात फॉरेस्ट ऑफिसर म्हणवून घेणारा बेन तिला योग्य रस्ता दाखवायला मदत करतो.
साशा तिथे ट्रेकिंग करते .जोरात वाहणाऱ्या नदीतून नौका चालवते. रात्री तंबूत झोपते.पण सकाळी उठल्यावर आपले सामान चोरीला गेलंय हे लक्षात येते. ते शोधत असताना तिला बेन दिसतो.बेन तिला जेवण देतो .पण आपले सामान बेनने चोरले आहे हे तिच्या लक्षात येते तोपर्यंत उशीर झालेला असतो.बेन तिला बांधून ठेवतो .थोड्या वेळाने तिला जंगलातून पळायची संधी देतो आणि शस्त्र घेऊन तिच्या मागावर निघतो. 
आता सुरू झालाय शिकारीचा खेळ.बेन शिकारी आहे तर साशा शिकार .आपला ट्रेकिंगचा सगळा अनुभव पणाला लावून साशाला त्या  अनोळखी घनदाट  जंगलातून स्वतः चा जीव वाचवत बाहेर पडायचे आहे तर बेनला हे जंगल पूर्णपणे माहीत आहे.तो साशाच्या दोन पावले पुढेच आहे.
साशा बेनला चकमा देऊन जंगलातून बाहेर पडेल का ? असे काय रहस्य बेनकडे आहे त्यामुळे तो साशाच्या जीवाशी खेळ खेळतोय.
चित्रपटाचे चित्रीकरण सुंदर आहे.जंगल आपल्या अंगावर येते. 
चित्रपटात साशा आणि बेन या दोनच प्रमुख व्यक्तिरेखा आहेत .
संपूर्ण चित्रपट आपल्याला श्वास रोखून पहायला लावतो.चित्रपट नेटफ्लिक्स वर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, April 29, 2026

द स्टोनहेंज लेगसी

द स्टोनहेंज लेगसी ...सॅम ख्रिस्टर
अनुवाद ..अशोक पाथरकर
मेहता पब्लिशिंग हाऊस
प्रा. नाथानिएल चेस जगप्रसिद्ध पुराणवास्तू संशोधक .एके सकाळी त्यांनी आपल्या बंगल्यात डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने आपला मुलगा गिडीयनसाठी चिट्ठी लिहून ठेवली.
स्टोनहेंज इंग्लंडमधील महत्वाचे प्राचीन स्मारक आणि पर्यटन स्थळ आहे . नाथानिएल चेस हजारो वर्षे जुना असलेल्या एका पंथाचे सभासद होते.असे म्हणतात स्टोनहेंज येथील जुन्या दगडांवरून वाहिलेले पाणी अंगावर घेतल्यास अनेक व्याधी बऱ्या होतात. तो पंथ त्या जागेचे गुप्तपणे रक्षण करतो पण त्यासाठी ते नरबळी ही देतायत .
यावेळी त्यांनी नरबळीसाठी व्यक्ती निवडली आहे ती चुकून अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षाची मुलगी केटलीन आहे.तिच्यासोबत असणारा तिचा बॉयफ्रेंड जॅक टिबरलँड झटापटीत मारला गेलाय.
इथे गिडीयनवर पाळत ठेवली जातेय.त्याच्या घराची झडती घेतली गेलीय .आग लावली गेली.या घटनेची चौकशी करण्यासाठी मेगन बेकर या स्त्री अधिकारीची नेमणूक झालीय.
घरात लागलेल्या आगीच्या प्रकरणाचे धागेदोरे केटलीनच्या अपहारणाकडे नेतात .
या पंथात फार मोठी लोक गुंतलेली आहेत.बेकर कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही .उलट तिलाच आता दुसऱ्या डिपार्टमेंटला प्रमोशनवर पाठविले जाणार आहे.
तरीही बेकर केटलीनची सुटका करेल का ? 
पाच हजार वर्षांपासून चालत आलेल्या प्रथेला बेकरमुळे धक्का बसेल का ?

Tuesday, April 28, 2026

टोस्टर

Toaster
टोस्टर
रमाकांतचे परफ्यूमचे दुकान आहे. घरी बायको आहे.तसा रमाकांत खूप चांगला आहे पण अतिशय कंजूस आहे. इतका कंजूस की सकाळचा ब्रेकफास्ट तो आपल्या घरमालकिणीकडे  डिसोझा बाई कडे करतो. दुपारचे जेवण कोणत्याही अन्नछत्रात करतो. डिसोझाबाईचा मुलगा ग्लेन व्यसनी आहे.त्याच्याकडे आमदार आमरेचे काही व्हिडिओ आहेत.
एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नात रमाकांत गिफ्ट म्हणून 5000 रु चा टोस्टर घेतो. पण दुसऱ्या दिवशी ते लग्न मोडते आणि ते सर्व गिफ्ट अनाथाश्रमात देऊन टाकतात. आपले गिफ्ट फुकट गेले म्हणून रमाकांत चिडतो आणि त्या अनाथाश्रमातून तो टोस्टर चोरून डिसोझाबाईकडे ठेवतो.ग्लेन त्या टोस्टरमध्ये आमदाराच्या व्हिडिओचे मेमरी कार्ड लपवतो. 
दुर्दैवाने डिसोझा बाई मरण पावते .तिच्या घरातून टोस्टर चोरताना रमाकांत आणि ग्लेनची झटपट होते आणि ग्लेनचा मृत्यू होतो.
त्या घटनेचा व्हिडिओ फेरवानी मॅडम काढून रमाकांतला ब्लॅकमेल करू लागते. इंस्पेक्टर बालगोंडे आमदाराचा माणूस आहे .त्याला ते व्हिडिओ हवे आहेत आणि मेमरी कार्ड त्या टोस्टरमध्ये आहेत याची खात्री आहे.
रमाकांत चारीबाजूने अडकला आहे.तो यातून जितके बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तितकाच अडकत जातो.
राजकुमार राव रमाकांतच्या मुख्य भूमिकेत आहे तर साथीला सन्या मल्होत्रा ,अर्चना पुरन सिंह , उपेंद्र लिमये आहेत.छोट्या भूमिकेत जितेंद्र जोशीने  रंग भरले आहेत.
कॉमेडी थ्रिलर प्रकारातील हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, April 25, 2026

गरुडन

Garudan
गरुडन 
कॉलेज गॅदरिंगची प्रॅक्टिस संपवून तेरेसा घरी जायला निघते आणि तिच्यावर अत्याचार होऊन प्रचंड मारहाणही होते.जखमी अवस्थेत ती सलाम कॅपरीला सापडते आणि तो त्या नराधमालाही पाहतो. 
तेरेसा कोमात जाते .डीसीपी हरीश माधवकडे हे प्रकरण सोपविले जाते.हरीश माधव हुशार आणि प्रामाणिक आहे.  तो आरोपीला पकडतो .आरोपी आहे तिच्याच कॉलेजमधील एक प्रोफेसर निशांत कुमार.
निशांत कुमार चे डीएनए मॅच होतात आणि सलाम कॅपरीही त्याला ओळखतो. सर्व पुरावे निशांत कुमारच्या विरुद्ध असतात .आरोप सिद्ध होऊन त्याला सात वर्षाची शिक्षा होते.
सात वर्षानंतर निशांतकुमार तुरुंगातून बाहेर पडतो .त्याने तुरुंगातून कायद्याची पदवी घेतलेली असते.तो आता वकील बनला आहे. पण आता त्याला समाजात गुन्हेगार म्हणूनच पाहिले जाते.त्याची पत्नी आणि मुलगी दुरावले जातात.
 डीसीपी हरीश निवृत्त होतोय.त्याला आपल्या सर्व्हिस फंडातून जे पैसे मिळणार त्यातून मुलाचे परदेशात शिक्षण करायचे आहे. तो निवृत्त होताच निशांत आपली केस पुन्हा ओपन करतो आणि स्वतःचे निरापराधित्व सिद्ध करतो आणि समाजात पुन्हा मानाचे स्थान मिळवतो इतकेच नव्हे तर तो हरिशकडून ऐंशी लाखाची नुकसानभरपाई  घेण्याची  कोर्टाकडून ऑर्डर काढतो. या सर्व प्रकारामुळे हरीश खचून जातो आणि अधिक चुका करतो.
निशांतच अपराधी आहे हे हरीशला माहीत आहे पण आता समाजाची सहानुभूती निशांतला आहे.एक मोठा वकील म्हणून त्याचे नाव झालेय.समाज आता हरीशला अपराधी समजतोय.
निशांतने कोणत्या योजना आखून स्वतःला निरपराधी सिद्ध केलंय आणि त्याला कोणी साथ दिलीय हे हरीशला शोधून काढायचे आहे पण आता तो एकटा पडलाय.तरीही तो स्वतःला सिद्ध करेल का ?
खरोखर निशांत अपराधी आहे की हरीशचा तपास चुकीचा होता ??
शेवटपर्यंत श्वास रोखून ठेवणारा हा चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.-

Sambhavam adyayam onnu

Sambhavam adyayam onnu
(Incident chapter one )
केरळ आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवर घनदाट जंगल आहे.ते जंगल फारच गूढ आणि अतर्क्य गोष्टीने भरलेले आहे असे म्हणतात ..जंगलात एक कावळ्याची मोठी दगडी मूर्ती आहे पण कावळेमात्र दिसत नाहीत. पोलीस अधिकारी आनंदची बदली केरळ बॉर्डर वर झालीय.नुकतीच त्याला मुलगी झालीय.जंगलातून पोलीस स्टेशनला जाताना एक जखमी पोलीस अधिकारी  त्यांच्या गाडीला धडकतो .तो त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करतो इतक्यात त्याच्या युनिटला अजून एक बॉडी सापडते.आणि त्यांना सापडलेल्या वॉकी टॉकीमधून अजून एका जखमी ऑफिसरचा आवाज ऐकू येतो.
आनंद आणि त्याचे दोन साथीदार त्याचा शोध घ्यायला जंगलात शिरतात.त्या जखमी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना  तामिळनाडू पोलीस स्टेशनला अधिकारी आपल्याकडे या नावाचे कोणीच पोलीस अधिकारी नाहीत असे सांगतो पण वॉकी टॉकी वरून त्याचा आवाज आणि पूर्ण नाव ऐकताच तो हादरतो. तो त्या तिघांनाही तपास सोडून त्या जंगलातून पळून जायची सूचना करतो.
आता सुरू होतो एक भयानक पाठलाग.आनंद आणि त्याच्या साथीदारांना जंगलातून बाहेर पडणे मुश्किल झालंय. ते कोणत्याही दिशेने गेले तरी पुन्हा त्याच जागी येतात.आनंदचे दोन्ही साथीदारही मारले जातात.
शेवटी आनंद त्या जंगलातून बाहेर पडतो पण बाहेरचे दृश्य पाहून हादरून जातो.
काय आहे नक्की प्रकार ? हा कसला चक्रव्यूह आहे ज्यात आनंद पुन्हा पुन्हा गुरफटून जातोय.
अंगावर काटा आणणारे आणि आपल्याला त्यात गुरफटवून टाकणाऱ्या ह्या जंगलात नक्की काय घडतंय .
हॉटस्टारवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे .नक्की पहा.

Thursday, April 23, 2026

द रॅकेटिअर

द रॅकेटिअर ....जॉन ग्रिशम 
अनुवाद..अशोक पाथरकर 
मेहता पब्लिशिंग हाऊस
अमेरिकेच्या इतिहासात चार न्यायाधीशांचे खून झालेले असतात .त्यात जज फॉसेट यांचा ठावठिकाणा लागत नाही तेव्हा सगळेच हादरतात .दोन दिवसांनी त्याचा मृतदेह जंगलातील कॅबिनमध्ये आढळतो.बाजूला त्यांची सेक्रेटरी ही मृतावस्थेत असते आणि तिजोरी उघडी असते.
माल्कम बॅनिस्टर फेडरल तुरुंगात दहा वर्षांची शिक्षा भोगत असतो.त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय तो. त्यातील पाच वर्षे संपली आहेत.जज फॉसेटचा खून कोणी केलाय ते त्याला माहितीय पण त्यासाठी अमेरिकेच्या कायद्यातील कलम 35 चा आधार घ्यायचे ठरविले आहे.हे कलम वापरून तो स्वतःची सुटका करून घेऊ शकेल.पण त्यासाठी त्याने जज फॉसेटचा खुनी कोण हे पुराव्यानिशी सांगितले पाहिजे.
एफबीआय माल्कमच्या सर्व अटी मान्य करते तेव्हा माल्कम खुन्याचे नाव सांगतो.त्या खुन्याला अटक होऊन त्याच्यावर खटला सुरू होतो आणि माल्कम साक्षीदार संरक्षण योजनेखाली नवीन नाव ओळख घेऊन तुरुंगाबाहेर पडतो आणि एफबीआयच्या डोळ्यात धूळ फेकून फरार होतो.
काय आहे माल्कमची खरी योजना ? खरेच त्याने जज फॉसेटच्या खऱ्या खुन्याचे नाव सांगितले आहे ? एक अतिशय काळजीपूर्वक आणि दीर्घकाळ आखलेली योजना खरेच यशस्वी होईल.
सत्य काय आहे हे कळताच आपणही हादरून जातो.

Monday, April 20, 2026

फिस्ट ऑफ गॉड

फिस्ट ऑफ गॉड ...फ्रेडरिक फोरसीथ
अनुवाद ....अनिल काळे
मेहता पब्लिशिंग हाऊस
2 ऑगस्ट 1990 साली इराकच्या बलाढय सैन्य कुवेतमध्ये शिरलं आणि केवळ सहा तासात त्यांनी कुवेतवर ताबा मिळवला. कुवेत मुक्त करण्यासाठी अमेरिका ब्रिटन देशाच्या संयुक्त फौजांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.सद्दाम हुसेनच्या मनात काय चालू आहे हेच ब्रिटन आणि अमेरिकेला माहीत नाही.तो कुवेत बाबत काय निर्णय घेणार याचीही कल्पना त्यांना नाही .परदेशी नागरिकांवर कुवेतमध्ये कडक नजर ठेवली जातेय. त्यांना असा माणूस पाहिजे जो अरब दिसेल,अरबी भाषा बोलेल.
योगायोगाने ब्रिटिश सैन्यात मेजर माईक मार्टिन आहे जो स्पेशल फोर्समध्ये कमांडो आहे.अनेक घातक मोहिमा त्याने यशस्वी केल्यात.त्याचे पूर्वज भारत आणि इराकमध्ये होते त्यामुळे तो अरब दिसतो आणि अरबी भाषा ही बोलतो. तो बगदादमध्ये लहानाचा मोठा झालाय. त्याचा भाऊ टोनी मार्टिन अरब भाषेचा अभ्यासक आहे.
मेजर मार्टिन कुवेतमध्ये शिरतो .तिकडच्या कुवेती बंडखोरांना इराकी सैन्याविरुद्ध लढण्याचे शिक्षण देतो.बंडखोरांना शस्त्रे पुरवितो .कुवेतमधील इराकी सैन्याच्या हालचाली कळवतो.
मोसादकडे सद्दामच्या बातम्या पुरविणारा एक व्यक्ती आहे असे ब्रिटन आणि अमेरिकेला कळते.स्वतःला जेरीको म्हणवणारी व्यक्ती भरपूर पैश्याच्या मोबदल्यात अचूक बातम्या पुरविते. तिची बातमी देण्याची विशिष्ठ पद्धत आहे.त्यामुळे कोणीही तिचा माग काढू शकत नाही. ती इराकमध्ये आहे .छोट्या चिट्ठीद्वारे ती संपर्क करत असते.
आता ब्रिटन आणि अमेरिकेला जेरीकोकडून बातम्या हव्यात. त्यासाठी वाटेल तितके पैसे मोजायला तयार आहेत.  त्यांनी या कामी पुन्हा मेजर माईक मार्टिनची निवड केलीय.
एक दिवस अचानक इंग्लडमध्ये एक संदेश पकडला गेला.त्यात कुब्त - उल- अल्ला नावाच्या शस्त्राचा उल्लेख होता.हे शस्त्र संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याला पुरून उरेल असा संदेश होता. 
मेजर मार्टिनला आता या शस्त्राची माहिती काढून त्याचा ठिकाणा सैन्याला द्यायचा आहे.
कुब्त - उल - अल्ला याचा अर्थ अल्लाचा ठोसा असा होतो.
खरच असे शस्त्र सद्दाम हुसेनकडे आहे ? त्याच्या जोरावरच त्याने कुवेतवर हल्ला करून अमेरिका ब्रिटनशी युद्ध पुकारले ? 
या सर्वांची उत्तरे शेवटच्या काही पानात मिळतील त्यासाठी ही कादंबरी पूर्ण वाचायला हवी.

Tuesday, April 14, 2026

शार्लटन्स

शार्लटन्स ....रॉबिन कुक
अनुवाद....उज्वला गोखले 
मेहता पब्लिशिंग हाऊस
शार्लटन्स म्हणजेच भोंदू .मेडिकलमध्ये भोंदू अर्थात खोट्या डॉक्टरांना शार्लटन्स म्हटले जाते. 
बोस्टनमधील  बोस्टन मेमोरियल हॉस्पिटल म्हणजेच बीएमएच सुप्रसिद्ध आणि अत्याधुनिक हॉस्पिटल आहे. आज त्या हॉस्पिटलमध्ये ब्रूस व्हिन्सेंटचे एक छोटे हर्नियाचे ऑपरेशन होणार होते.ब्रूस हॉस्पिटलचा स्टाफ होता.तो पार्किंगमध्ये कामाला होता.त्यामुळे जवळपास प्रत्येक डॉक्टर आणि स्टाफशी त्याची ओळख होती.त्याच्या हसऱ्या आणि मनमिळावू स्वभावामुळेच डॉ. मॅसनसारखे बिझी आणि अनुभवी डॉक्टर त्याची शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले होते.
पण  दुर्दैवाने छोट्या चुकीमुळे ब्रूसचा ऑपरेशन टेबलवरच मृत्यू झाला होता. त्याला अँनेस्थेशिया देणारी डॉ एवा लंडनमुळेच त्याचा मृत्यू झालाय असा डॉ. मॅसन आरोप करतात.अर्थात यात डॉ. एवाची काहीच चूक नाही असे चीफ रेसिडन्स डॉक्टर नोहा रोथॅजर सांगतो. पुढे मिटिंगमध्येही तो तिची बाजू घेतो. 
पण काही अंतराने अजून दोन पेशंट ऑपरेशन टेबलवरच मृत्यू पावतात. दोन्हीवेळा डॉ. एवा लंडन अनेस्थेशिया देण्यासाठी हजर असते .टेक्निकली यात तिचा काहीच दोष नसतो .हे सगळेच डॉक्टर मान्य करतात . आपत्कालीन स्थितीत जे काही करायचे असते ते सर्वांनीच केले होते.
डॉ. नोहा आणि डॉ. एवा एकमेकांच्या प्रेमात पडतात.पण कधी कधी डॉ. एवा अचानक काही दिवसांसाठी गायब होत असते.ती वॉशिंग्टन येथे एका संस्थेसाठी काम करते असे नोहाला सांगते.  डॉ. एवा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. आभासी जगात वावरणे तिला आवडते.
तिला चौकशीतून वाचविताना डॉ. नोहावर स्वतःची नोकरी गमावण्याची पाळी येते.तो डॉ. एवाची माहिती काढायला एक खाजगी गुप्तहेर नेमतो पण त्याचीही हत्या होते.डॉ. नोहावर कोणतरी पाळत ठेवतोय.त्याचा कॉम्प्युटर आणि मोबाईल हॅक केलाय. आता तर काहीजण त्याला मारायला निघालेत.
काय आहे हे प्रकरण ?? डॉ एवा नक्की कोण आहे ? सगळी कागदपत्रे तर ती एक कुशल आणि अनुभवी डॉक्टर आहे हेच सिद्ध करतात.पण आता डॉ नोहावर स्वतःला सिद्ध करायची वेळ आलीय.तो यशस्वी होईल का ??
रॉबिन कुक यांनी त्यांच्या हातखंडा  वैद्यकीय विषयांवर  ही थरारक कादंबरी लिहिली आहे जी आपल्याला शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवते .

Thursday, April 9, 2026

शिवनेत्र बहिर्जी खंड २

शिवनेत्र बहिर्जी खंड २..... प्रेम धांडे
रुद्र एंटरप्रायझेस
स्वराज्याचा  गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या योगदानाची माहिती देणारे हे पुस्तक. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात घडणाऱ्या सत्य घटना आणि त्या यशस्वी करण्यामागे बहिर्जी नाईक यांच्या हेरखात्याची कामगिरी यावर हे पुस्तक आहे.
लेखकाने यात आपली कल्पनाशक्ती वापरली आहे हे तो पहिल्यांदाच स्पष्ट करतो. मोहिमा यशस्वी होण्यासाठी हेरखातेही प्रबळ असावे लागते आणि राजांचे डावपेच या हेरखात्यांवर अवलंबून असायचे.बहिर्जीने गेली अनेक वर्षे आपले हेर संपूर्ण भारतात पेरून ठेवले होते.ते हेर सगळीकडे असू शकतात .अगदी आदिलशहा बडी बेगमची प्रमुख दासी अंगरक्षक मर्जीना बहिर्जी नाईकची हेर होती असे म्हटले जाते. 
शिवनेत्र बहिर्जीचे एकूण चार खंड आहेत.
या दुसऱ्या खंडात त्यांनी अफजलखानाचा वध, पन्हाळगडावरून सुटका, शाहिस्तेखानावर स्वारी या मोहिमेत बहिर्जी नाईक आणि त्याच्या हेरखात्याने किती मोलाचे कार्य केले होते याची माहिती आहे. 

Wednesday, April 8, 2026

मृत्युंजय

Mrithyunjay
मृत्युंजय
जय एका वृत्तपत्रात नोकरीला आहे.तो पत्रकार नाही तर जाहिरात आणून द्यायचे काम करतो.पण ते काम थोडे विचित्र आहे.एखादी व्यक्ती मृत्यू पावली की तो तिथे जातो.तो हुशार आहे आणि त्याची मेमरी शार्प आहे.आपल्या कुशाग्र निरीक्षणशक्तीने तो मयताची सगळी माहिती काढतो.गरज पडल्यास मयताला खांदा देतो . त्यांच्या घरी चहापाणीही देतो आणि थोड्या वेळात त्याच्या श्रद्धांजलीची ऍड देण्यास नातेवाईकांना प्रवृत्त करतो.
आजही तो एका अंत्यसंस्कारासाठी आलाय. अच्युत शर्माचा एका अपघातात मृत्यू झालाय. त्याच्या मागे सात वर्षाची मुलगी आहे.तिला पाहून जय मनातून हलतो .काही दिवसांनी अजून एक मृत्यू पावतो.जय तिथेही जातो आणि मयताकडे बघून असे जाणवते अच्युत आणि या मयताचा अपघात एकसारखा आहे.
अच्युत एका बँकेत कामाला होता आणि बँक घोटाळ्यासंबंधित एक महत्वाचा साक्षीदार होता. अच्युत आणि दुसऱ्या व्यक्तीचा अपघात नसून खून झालाय हे जयला कळते पण पोलीस अधिकारी सीता यावर विश्वास ठेवत नाही . खुनी एक प्रोफेशनल किलर आहे .त्याचे कोठेही रेकॉर्ड नाही.तो अपघाती मृत्यू दाखविण्यात पटाईत आहे. 
जय त्याला शोधण्याचे ठरवतो पण त्याचवेळी किलरला जयविषयी कळते आणि तो जयच्या मागे लागतो .तोही जय इतकाच हुशार आहे.
आता सुरू झालाय बुद्धिबळाचा एक भयानक खेळ.यात जो हुशार ठरेल तोच जिवंत राहणार हे नक्की.बघू कोण जिंकतेय .
 खुर्चीवर खिळवून ठेवणारा शह काटशाहाचा खेळ पाहायचा असेल तर नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेतील मृत्युंजय चुकवू नका.

Sunday, April 5, 2026

सिकॅमोर रो

सिकॅमोर रो .....जॉन ग्रिशॅम
अनुवाद...सुदर्शन आठवले 
मेहता पब्लिशिंग हाऊस
सेथ हबर्डने अतिशय शांत डोक्याने आणि व्यवस्थित प्लॅन करूनच आत्महत्या केली होती.आपल्या आत्महत्येनंतर पुढे काय कृती करायची तेही स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवले होते.ते अफाट संपत्तीचे मालक होते. त्यांचे दोन घटस्फोट झाले होते.मुले होती.
पण ते एकटेच आपल्या मोठ्या इस्टेटीत राहत होते.कित्येक वर्षे त्यांनी मुलांशी संबंध ठेवले नव्हते.नाही म्हणायला त्यांना एक भाऊ होता पण तोही अनेक वर्षे बेपत्ता होता. 
 कृष्णवर्णीय लेटी लॅग ही त्याची  मोलकरीण. सेथ हबर्डना कर्करोग होता.ते फार काळ जगणार नव्हते .आजारपणात लेटीच त्यांची सेवा करत होती.मिसिसिपी राज्यात अजूनही गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय असा भेदभाव चालूच होता.
जेक ब्रिगन्स वकील होता.तो फक्त सेथ हबर्डचे नाव ऐकून होता. तो प्रत्यक्षात त्यांना कधीही भेटला नव्हता.आत्महत्येच्या दुसऱ्या दिवशी त्याला पत्र आले. तो सेथ हबर्डचे पत्र वाचून आश्चर्यचकित झाला.सेथ हबर्डने त्यांच्या मृत्यूपत्राची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती. 
पण मृत्युपत्र वाचून तो हादरला.मृत्यूपत्रात हबर्ड यांनी आपली 90% मालमत्ता लेटी लॅगच्या नावावर केली होती तर 5%आपला बेपत्ता भाऊ आणि 5%चर्चला दिली होती.साधारण पंचवीस दशलक्ष डॉलर एकूण मालमत्ता होती असा अंदाज सगळ्यांना होता.
90% मालमत्ता एका कृष्णवर्णीय मोलकरणीला मिळणार हे कोणालाच मान्य होणार नव्हते. हबर्डचे कुटुंबीय कोर्टात जाणार हे नक्की.आता संघर्ष अटळ होता. यात जेकची कसोटी लागणार होती.आधीच तो कृष्णवर्णीयांचा  वकील म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या समोर कोणती संकटे कशी उभी राहतील याची त्याला काहीच कल्पना नव्हती.पण त्याच्यावर मृत्युपत्राचे पालन करण्याची जबाबदारी होती आणि तो प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडणार होता.
 समोर फारच तगड्या वकिलांची टीम आहे. तो त्यांच्यासमोर उभा राहू शकेल ? लेटी लॅगला मृत्युपत्राप्रमाणे तिचा हिस्सा मिळेल का ? एक उत्कंठावर्धक कोर्टरूम नाट्य वाचायला हवेच .

सिकॅमोर रो

सिकॅमोर रो .....जॉन ग्रिशॅम
अनुवाद...सुदर्शन आठवले 
मेहता पब्लिशिंग हाऊस
सेथ हबर्डने अतिशय शांत डोक्याने आणि व्यवस्थित प्लॅन करूनच आत्महत्या केली होती.आपल्या आत्महत्येनंतर पुढे काय कृती करायची तेही स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवले होते.ते अफाट संपत्तीचे मालक होते. त्यांचे दोन घटस्फोट झाले होते.मुले होती.
पण ते एकटेच आपल्या मोठ्या इस्टेटीत राहत होते.कित्येक वर्षे त्यांनी मुलांशी संबंध ठेवले नव्हते.नाही म्हणायला त्यांना एक भाऊ होता पण तोही अनेक वर्षे बेपत्ता होता. 
 कृष्णवर्णीय लेटी लॅग ही त्याची  मोलकरीण. सेथ हबर्डना कर्करोग होता.ते फार काळ जगणार नव्हते .आजारपणात लेटीच त्यांची सेवा करत होती.मिसिसिपी राज्यात अजूनही गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय असा भेदभाव चालूच होता.
जेक ब्रिगन्स वकील होता.तो फक्त सेथ हबर्डचे नाव ऐकून होता. तो प्रत्यक्षात त्यांना कधीही भेटला नव्हता.आत्महत्येच्या दुसऱ्या दिवशी त्याला पत्र आले. तो सेथ हबर्डचे पत्र वाचून आश्चर्यचकित झाला.सेथ हबर्डने त्यांच्या मृत्यूपत्राची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती. 
पण मृत्युपत्र वाचून तो हादरला.मृत्यूपत्रात हबर्ड यांनी आपली 90% मालमत्ता लेटी लॅगच्या नावावर केली होती तर 5%आपला बेपत्ता भाऊ आणि 5%चर्चला दिली होती.साधारण पंचवीस दशलक्ष डॉलर एकूण मालमत्ता होती असा अंदाज सगळ्यांना होता.
90% मालमत्ता एका कृष्णवर्णीय मोलकरणीला मिळणार हे कोणालाच मान्य होणार नव्हते. हबर्डचे कुटुंबीय कोर्टात जाणार हे नक्की.आता संघर्ष अटळ होता. यात जेकची कसोटी लागणार होती.आधीच तो कृष्णवर्णीयांचा  वकील म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या समोर कोणती संकटे कशी उभी राहतील याची त्याला काहीच कल्पना नव्हती.पण त्याच्यावर मृत्युपत्राचे पालन करण्याची जबाबदारी होती आणि तो प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडणार होता.
 समोर फारच तगड्या वकिलांची टीम आहे. तो त्यांच्यासमोर उभा राहू शकेल ? लेटी लॅगला मृत्युपत्राप्रमाणे तिचा हिस्सा मिळेल का ? एक उत्कंठावर्धक कोर्टरूम नाट्य वाचायला हवेच .