Wednesday, October 29, 2025

bhadrakaali

भद्रकाली
Bhadrakaali
अभ्यंकर श्रीनिवास राजकारणाततील किंग समजला जातो. त्याला पाठीमागून सर्व सूत्रे हलवायला आवडतात.पण त्याचीही काळी बाजू आहेच.
किट्टू त्याच्याकडे लहानपणापासून कामाला होता.घरातील छोटी मोठी कामे करत मोठा झाला .तो अनाथ आहे .त्याच्या आईने आत्महत्या केली होती अशी पोलीस दप्तरी नोंद आहे.
आता किट्टू मोठा होऊन एक एजंट झालाय. जी कामे कोणी करू शकत नाही अशी कामे तो करतो.यात त्याला भरपूर कमिशन मिळते. तो कोणत्याही ऑफिसरची बदली त्यांना पाहिजे त्या ठिकाणी करू शकतो.करोडो रुपयांचे जमिनीचे व्यवहार करतो.कॉलेजमध्ये ऍडमिशन करतो.
केंद्रीय मंत्री लताचा भाऊ मूर्ती किट्टूला जपानचा प्रोजेक्ट होणारी तीनशे एकर जमीन स्वतःच्या नावावर करण्याचे काम देतो . त्याबदल्यात तो दोनशे कोटी  कमिशन देण्याचे वचन देतो.
किट्टू एक मोठी योजना बनवतो आणि जमीन मूर्तीच्या नावावर होते.पण ह्यामागे काहीतरी घडलंय असा संशय लताला येतो आणि ती अभ्यंकरला सांगते.
अभ्यंकर या घटनेची चौकशी करतो आणि किट्टूचे नाव समोर येतो.आपला नोकर यामागे आहे हे समजताच अभ्यंकर हादरतो आणि तो हात धुवून किट्टूच्या मागे लागतो. अधिक तपास करताना जवळजवळ सहा हजार कोटींचा घोटाळा किट्टूने केलाय असे निष्पन्न होते .
किट्टू आणि त्याच्या साथीदारांना अटक होते प्रचंड मारहाण होते त्याच्यावर दीडशेपेक्षा जास्त केसेस केल्या जातात. शेवटी नाईलाजाने किट्टू त्यांना पैसे कुठे दडवले आहे ते सांगून स्वतःची आणि साथीदारांची जामीनावर सुटका करून घेतो. त्याची पत्नीही आता गरोदर आहे त्याला तिचीही काळजी आहे.
किट्टूला रोज वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागते .त्याचा पूर्ण दिवस त्यातच निघून जातोय. त्याच्यावर पोलिसांची ,अभ्यंकरच्या गुंडांची नजर आहे .आता त्याला काहीच करता येत नाही.
पण आता योग्य वेळ आलीय किट्टूला स्वतःची खेळी करायची .त्याने याची तयारी फार पूर्वीपासूनच केलीय.
किट्टू या सर्वांना कसे उघडे पाडतो हे बघण्यात वेगळीच मजा आहे.
हा एक बुद्धिबळाचा खेळ आहे यात कधी किट्टू माघार घेतो तर कधी अभ्यंकर .पण ते पुन्हा एकमेकांवर बाजी पलटविण्याचा प्रयत्न करतात.यात विजय कोणाचा  आणि कसा होतो हे बघण्यासारखे आहे.
यात हाणामारी ,रक्तपात नाही फक्त चातुर्य आहे ,योजना आहेत ,पैश्याचा खेळ आहे ,राजकारणातील डावपेच आहे.
विजय अँटनी किट्टूच्या प्रमुख भूमिकेत आहे. विजय अँटनीचा स्वतःचा प्रेक्षकवर्ग आहे आणि त्याच्या भूमिकाही वेगळ्याच प्रकारच्या असतात .
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.ज्यांना हाणामारी नको पण थ्रिलर आवडत असेल त्यांनी नक्कीच पहावा., 

Tuesday, October 28, 2025

Thanal

Thanal
टनल 
7 जुलैला काही बॅंक लुटणाऱ्या तरुणांचे पोलिसांकडून एन्काऊंटर होते. पोलीस ऑफिसर रामकृष्णन त्या पाचही चोरांना गोळ्या घालून ठार मारतो .पण पुढच्याच वर्षी 7 जुलैला रामकृष्णन आणि काही पोलीस मारले जातात.
आज 7 जुलै आहे. अकिलन रंगनाथन आणि काही काही तरुण कॉन्स्टेबल पदावर जॉईन होण्यासाठी  कुमार नगर पोलीस स्टेशनला  आलेत.
अकिलनच्या आईचे ऑपरेशन आहे आणि त्यासाठी लागणारे पैसे त्यांनी बँक लॉकरमध्ये ठेवले आहेत.जॉइनिंग लेटर हातात पडल्यावर बँकेत जाऊन पैसे काढतो असा निरोप तो वडिलांना देतो .पण सिनियर पोलीस ऑफिसर अजून आलेले नाही म्हणून सर्वांना बाहेर थांबवून ठेवण्यात येते आणि थोड्या वेळाने त्यांना विभागात गस्त घालण्यासाठी पाठविले जाते.
ते जिथे गस्त घालतात तिथे झोपडपट्टी आहे .अचानक एक व्यक्ती जमिनीखालच्या गटारातून बाहेर येते आणि त्यांना त्यांना पाहून त्या झोपडपट्टीत शिरते.सर्वजण त्याच्यामागे त्या झोपडपट्टीत शिरतात .आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या झोपडपट्टीत मनुष्यवस्ती दिसत नाही .  झोपडपट्टीच्या मध्यभागी काही कामगार चर्चा करीत असतात त्यांना हटकताच ते  सर्व कॉन्स्टेबलवर  हल्ला करतात आता जीव वाचवायची पाळी पोलिसांवरच येते.
त्या झोपडपट्टीच्या गल्लीबोळातून अकिलन आणि इतर कॉन्स्टेबल पळत राहतात .स्वतःचा जीव वाचवताना अकिलनला भुयारी मार्गाचा नकाशा सापडतो आणि त्यांचे जॉइनिंग लेटरही तिथेच सापडतात.
नकाशात असलेला भुयारी मार्ग त्या भागातील सर्व बँकांच्या खालून जात असतो.त्या विभागातील सर्व बँक एका रात्रीच लुटण्याचा प्लॅन आहे हे अकिलनला  समजते .आणि त्याची प्रेयसीचेही या गुंडांनी अपहरण केले आहे असे समजते.
आपल्या आईच्या ऑपरेशनसाठी जमा केलेले पैसेही लुटले जाणार या विचाराने अकिलन हादरतो. आपले जॉइनिंग लेटरही इथे कसे ? आणि आपल्या प्रेयसीला का आणले आहे हेही त्याच्या लक्षात येत नाही .
कोण आहेत हे बँक लुटणारे गुंड ?अकिलन आणि त्यांचा काय संबंध ? अकिलन त्यांचा डाव उधळून लावेल का ? 
एक चक्रावून टाकणारी एका रात्रीत घडणारी आणि आपला श्वास रोखून ठेवणारी कथा .
चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे.

Sunday, October 26, 2025

द स्पाय

The Spy
द स्पाय
मोसादचा गुप्तहेर एली कोहेनच्या जीवनावर आधारित ही सिरीज आपल्याला गुप्तहेरच्या जीवनात घेऊन जाते.
देशभक्त एली कोहेन आपल्या बायकोला आणि कुटुंबियांना सोडून सीरियामध्ये गुप्तहेर म्हणून दाखल होतो.त्याआधी त्याने सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेतले असते. हळूहळू तो सीरियाच्या राजकीय वरिष्ठ वर्तुळात प्रवेश करतो.तो इतका पुढे जातो की सिरियाचे राष्ट्राध्यक्ष त्याला संरक्षण मंत्री करायचे ठरवितात .पण शेवटी एक साधी चूक आणि अति आत्मविश्वास त्याला नडतो.
त्याने इस्त्रायलला अतिशय महत्त्वाची माहिती पुरवली आणि त्याचा भरपूर फायदा इस्त्रायल सिरियाचे सहा दिवसाचे युद्ध झाले त्यात झाला.
ही सिरीज अतिशय उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारी आहे. एका गुप्तहेराचे जीवन अतिशय जवळून दाखविले आहे.शत्रूच्या गोटात शिरून योग्य माहिती मिळवणे किती धोकादायक आणि धाडसाचे असते हे ह्या सिरीजमध्ये दाखविले आहे.
नेटफ्लिक्सवर ही सिरीज हिंदी भाषेत आहे.

Monday, October 13, 2025

केदारनाथ १७जून

केदारनाथ १७ जून
डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे
एलोरा पब्लिकेशन 
१७ जून २०१३ साली केदारनाथ येथे महापूर आला .ढगफुटी झाली .संपूर्ण गावे नष्ट झाली. वादळी पावसाने समोर येईल त्याला नष्ट करून टाकले.
हा जीवघेणा प्रवास आहे या महापुरात वाचलेल्या डॉ. सिद्धार्थ या मानसोपचारतज्ञाचा. त्याने जगण्यासाठी  केलेली धडपड पाहून अंगावर काटा येतो.
डॉ. सिद्धार्थ पुण्यातील प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ .लग्नानंतर बरीच वर्षे त्यांना मूल झाले नाही .शेवटी त्याच्या बायकोने मूल झाले तर तुला एकत्र भेटायला येऊ असा नवस केदारनाथला केला आणि त्यांना मुलगा झाला.
आज ते एकत्र केदारनाथला निघाले.डॉ. सिद्धार्थच्या मित्राने श्रेयसने त्यांची सर्व व्यवस्था केलीय.श्रेयस भारतीय सैन्यात अधिकारी असल्यामुळे सर्व व्यवस्था उत्तम आहे.श्रेयस ही त्याच्या पत्नीला आणि मुलाला घेऊन सिद्धार्थ सोबत आहे.श्रेयसचा मुलगा सहा वर्षाचा असून त्याला ऑटीझम आहे.
केदारनाथला रात्रभर पाऊस पडत होता .मंदाकिनी नदीला पूर आला आणि तिने रौद्र रूप धारण केले. त्यात सिद्धार्थ आणि श्रेयस राहत असलेले हॉटेल ही वाहून गेले.सिद्धार्थ आणि त्याची पत्नी आणि मुलगा एकमेकांच्या मिठीत राहिले आणि वाहून गेले.
जाग आली तेव्हा सिद्धार्थ एका चिखलात अडकून बसला होता.आजूबाजूला फक्त प्रेतच दिसत होती. अचानक सिद्धार्थला त्या चिखलात ओळखीचा चेहरा दिसला .तो श्रेयसच्या सहा वर्षाच्या मुलाचा होता.आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो मुलगा जिवंत होता.
त्याला घेऊन डॉ सिद्धार्थचा स्वतः ला सुरक्षित ठेवण्याचा जीवघेणा प्रवास सुरु होतो.
डॉ. सिद्धार्थ त्या छोट्या मुलाला घेऊन सुरक्षित ठिकाणी जाईल का ? त्यांना वाचवायला कोण येईल का ??
हा प्रवास  अतिशय जिवाघेणा आणि अंगावर काटा आणणारा आहे. देवभूमी म्हणून ओळखले जाणारे सुंदर केदारनाथ आता फक्त चिखलमय झाले आहे .हजारो प्रेते तेथे कुजत पडली आहेत.दूरवर कुठेही माणूस दिसत नाही .पूर आलाय पण पाणी पिण्यायोग्य नाही.खायला अन्न नाही.अंग झाकायला कपडे नाहीत त्यात जिथे जखमा झाल्यात त्या सडू लागल्या आहेत. डॉ. सिद्धार्थपुढे परिस्थितीला शरण जाण्यावाचून पर्याय नाही .पण त्या मुलासाठी  त्याला जिवंत राहायचे आहे .
एक जिवाघेणा प्रवास अनुभवण्यासाठी केदारनाथ १७ जून नक्की वाचा.

Sunday, October 12, 2025

शोध प्राचीन हेरगिरीचा

शोध प्राचीन हेरगिरीचा
वरुण ते बहिर्जी.... रवी आमले
मनोविकास प्रकाशन 
भारतीय इतिहासात हेरगिरी विभाग महत्वाचा आहे.अगदी चाणक्यनीतीमध्ये गुप्तचर कसे असावे त्याचा वापर कसा करावा याचे वर्णन केले आहे.शिवरायांच्या कारकिर्दीत हेरगिरी प्रमुख खाते होते .गुप्तचर विभागाचा प्रमुख बहिर्जी नाईक हा छत्रपती शिवाजी महाराजांना डायरेक्ट रिपोर्ट करायचा . पण शिवरायांची हेरव्यवस्था कशी होती ?  त्यांचे गुप्तचर कसे होते ? गुप्तचर विभागाची व्याप्ती कशी होती ? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळतील.आणि ही उत्तरे शोधताना आपल्याला प्राचीन काळात जावे लागते .वरुण हा पुराण काळातील पहिला हेर समजला जातो.
रवी आमले यांचा गुप्तहेर विभागावर  प्रचंड अभ्यास आहे .त्यांचे रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा हे पुस्तक खूपच प्रसिद्ध आहे .
भारतीय गुप्तचर यंत्रणेचा प्राचीन इतिहास वाचायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा .