Saturday, November 29, 2025

आर्यन

Aaryan
आर्यन
त्या प्रसिद्ध चॅनेलवर  लाईव्ह मुलाखत द्यायला एक मंत्री अचानक नकार देतो आणि ऐनवेळी वादग्रस्त चित्रपट नायक मुलाखतीला येतो. नयना त्याला अडचणीत आणणारे प्रश्न विचारते पण त्यापेक्षा जास्त प्रश्न प्रेक्षकांमधून येतात.प्रश्न विचारणारा एक मध्यमवयीन पांढरी दाढीवाला मनुष्य स्टेजवर हातात बंदूक घेऊन प्रवेश करतो.
तो स्वतःचे नाव अझगर सांगत एक लेखक असल्याची ओळख करून देतो .त्याची पुस्तके समाजाने नाकारली आहेत असे त्याचे म्हणणे.पण यापुढे उद्यापासून पाच दिवस रोज एक व्यक्ती मृत्यू पावेल असे सांगून स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या करतो.
आरोपीच मेलाय असे समजून पोलीस गाफील होतात. कोण मृत्यू पावणार याची नावे ही जाहीर झालेली नसतात.पण दुसऱ्या दिवशी सर्व टीव्ही चॅनेलवर  सिरीयल चालू असताना त्याचा व्हिडिओ झळकतो .यापुढील एका तासात अशोकचा  मृत्यू होईल असे सांगतो.बरोबर आठ वाजता एक अधू असलेला सिक्युरिटी गार्ड टेलिफोन बूथमधून फोन लावतो आणि बॉम्बस्फोटात मरण पावतो. त्याचे नाव अशोक असते.
डीसीपी नांबीला या प्रकरणाचा तपास करण्याची ऑर्डर मिळते. त्याचा तपास चालू असताना दुसऱ्या दिवशी रजिया नावाच्या स्त्रीचा मृत्यू होईल असा व्हिडिओ अझगर सगळ्यांना पाठवतो .एका भरतनाट्यम नृत्याच्या कार्यक्रमात मुख्य नर्तिका अचानक कोसळते .तिचे नाव रजिया असून तिच्यावर विषप्रयोग झालेला असतो.
डीसीपी नांबीच्या पुढे हे प्रकरण सोडवायचे मोठे आव्हान आहे .पाच मृत्यूपैकी दोन झाले आहेत आता कमीतकमी एकाला तरी वाचवायचे असा निश्चय तो करतो .
या प्रकरणाचा तपास करताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात.समाजाचा एक दुर्लक्षित भाग ही समोर येतो .
नम्बी किती जणांना वाचवेल. तो या खुनामागची कारणे शोधून काढेल का ? अझगरच्या अप्रकाशित आर्यन पुस्तकात नक्की काय आहे ?
शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारा आणि अनपेक्षित धक्का देणारा हा चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे. ज्यांना रहस्य ,मर्डर मिष्ट्री आवडते त्यांनी नक्की पहावा .
विष्णू विशाल नम्बी ,तर सेलवाराघवन अझगरच्या भूमिकेत आहेत.

Friday, November 21, 2025

dilhi crime 3

Delhi Crime 3
दिल्ली क्राईम 3
वर्तिका चतुर्वेदीची ट्रान्स्फर आसामला होते.कदाचित मागच्या केसचा हा परिणाम आहे. तिला एका आर्म ट्रान्सपोर्टची टीप मिळते. पण त्यात शस्त्रे नसून तरुण मुली असतात. हा ट्रक दिल्लीला जात होता.वर्तिका या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरविते. त्यासाठी ती वरिष्ठ अधिकाऱ्यानाही नाराज करते.
दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलच्या दारात एक तरुणी दोन वर्षांच्या मुलीला जखमी अवस्थेत सोडून जाते. ती केस एसीपी नीती सिहकडे आलीय.
अधिक तपास करताना दिल्लीत आणि हरयाणात मोठ्या प्रमाणात महिलांना विकले जातेय असे उघडकीस येते. 
दिल्ली सरकार टास्क फोर्स बनवते.यात पुन्हा वर्तिका चतुर्वेदी ,इन्स्पेक्टर भूपींदरसिंह, नीती सिंह आणि इतर अधिकारी एकत्र येतात आणि एका मोठ्या करस्थानाचा तपास सुरू होतो.
सिजन एक आणि दोन प्रमाणेच हा तिसरा सिजन थरारक आणि उत्कंठावर्धक आहे.यात हुमा कुरेशी मुख्य खलनायिका आहे. तर शेफाली शाह ,राजेश तेलंग, रसिका दुगल आपल्या नेहमीच्या भूमिकेत रंग आणतात.
सहा भागात असणारी ही सिरीज एका बैठकीत बघण्यासारखी आहे.

Thursday, November 20, 2025

ऑपरेशन ब्लू स्टार

ऑपरेशन ब्लू स्टार जसं घडलं तस
ले. जन. के. एस. ब्रार
अनुवाद ..भगवान दातार 
रोहन प्रकाशन 
पाने १५२
किंमत 195 रु
ऑपरेशन ब्लू स्टार ही जगातील सर्वात वादग्रस्त आणि दुर्दैवी लष्करी कारवाई होती असे म्हटले जाते.पण खरोखरच ही कारवाई आवश्यक होती का याचे उत्तर होय असेच आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ही कारवाई रोखण्याचे प्रयत्न केले.चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या .पण संत भिद्रनवाले आणि लोंगोवाल गटात दोन मतप्रवाह होते.
अखेरच्या क्षणी ले. जन. के. एस. ब्रार याना मीरतवरून दिल्लीला बोलावण्यात आले तेव्हा ते मनिलाला जाण्याची तयारी करत होते.
ब्रार स्वतः शीख होते. कारवाईची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.सुवर्णमंदिरात पाचशेशीख अतिरेकी असावेत असा अंदाज होता.त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. लष्करातून निवृत्त झालेले मेजर जनरल शाबेग सिंग संत भिद्रनवालेचा उजवा हात होता.त्याला प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव असल्यामुळे आतून योग्य मोर्चा बांधणी केली होती.तर भारतीय लष्कराच्या मर्यादा तोकड्या होत्या. तुमच्यावर गोळ्या झाडल्या तरी चालेल पण हरमंदिर साहेब च्या दिशेने एकही गोळी झाडायची नाही असा भारतीय लष्कराला थेट आदेश होत्या . त्यामुळे प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी होत असताना आपल्या जवानांनी जो संयम दाखवला तो कौतुकास्पद आहे.
प्रत्यक्ष कारवाईला सुरवात झाली त्यानंतर भारतीय सैन्याचे सगळे अंदाज आणि प्लॅनिंग चुकत गेले.अतिरेक्यांकडे रॉकेट लॉन्चर होते तसेच ते मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक शस्त्रे घेऊन बसले होते.
दोन दिवस चालेल असा अंदाज असणारी कारवाई प्रत्यक्षात चार ते पाच दिवस चालली.लेखक स्वतः या कारवाईचे प्रमुख असल्यामुळे त्यानी अत्यंत अचूक आणि तटस्थपणे या कारवाईचे वर्णन केले आहे.
हे पुस्तक भारतीयांच्या मनातील सगळे गैरसमज दूर करते.
 हे थरारक पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे.

Wednesday, November 12, 2025

बारामुल्ला

Baramulla
बारामुल्ला
काश्मीर अजूनही अशांतच आहे. त्यात बारामुल्ला गाव जास्तच संवेदनशील गाव.या गावातच काही लहान मुले अचानक गायब होऊ लागली.एक मुलगा तर जादूगाराच्या पेटीत शिरला आणि तिथून बाहेर पडलाच नाही .स्वतः जादूगार ही हैराण आहे तो गेला कुठे म्हणून .तर दुसरा होडीतून गायब झालाय .
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल ऑफिसर रिदवान सय्यदची नेमणूक झालीय. सध्या रिदवान आपली बायको ,मुलगी ,आणि मुलगा याना घेऊन एका मोठ्या हवेलीत राहतोय. तो या प्रकरणात पूर्ण गुंतून गेलाय त्यामुळे घरी त्याचे फार लक्ष नाही.
त्याचा सहा वर्षाचा मुलगा अयानला हवेलीतील बंद खोलीचे आकर्षण आहे.त्या खोलीतून वेगवेगळे आवाज येतायत .कधी लहान मुलाच्या खेळण्याचे तर कधी रडण्याचे .मोठी मुलगी नुरीला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो तर कधी घाणेरडा वास येतोय.
एक दिवस नुरीही अचानक गायब होते .ती हवेलीतच आहे असे रिदवानची पत्नी जीव तोडून सांगतेय पण तो लक्ष देत नाही. तपास करताना त्याच्या हाती खालिद लागतो आणि एका रहस्याचा उलगडा होतो .
एक सुपरनॅचरल , थ्रिलर , काश्मीरची परिस्थिती थोडक्यात मांडणारा ,थोडा भीतीदायक  असा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .एकदा पाहायला हरकत नाही.

Tuesday, November 11, 2025

The Clibers

The Climbers
द क्लिंबर्स
एव्हरेस्टवर चढाई करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न आहे. जगातील सर्वात मोठ्या शिखरावर पोचून आपल्या देशाचे नाव उंचावणे ही इच्छा प्रत्येकाची असते.आजही अत्यानुधिक उपकरणांच्या काळातही एव्हरेस्टवर पोचणे सर्वात खडतर आणि कठीण समजले जाते. तर मग 1960 साली काय परिस्थिती असेल ?
चीनच्या गिर्यारोहकांची एक तुकडी एव्हरेस्ट शिखराच्या दिशेने चालू लागली . जसजसे शिखर जवळ येत होते तसतसे वातावरण बदलू लागले .अचानक निसर्गाचे रूप बदलले एक जीवघेणे वादळ त्यांच्या दिशेने येऊ लागले. या वादळात ग्रुप कॅप्टन मरण पावला तर फोटोग्राफरला वाचवताना कॅमेरा खोल दरीत पडला. शेवटी फॅन ऊझु ,फोटोग्राफर  क्यू सोंगीन आणि एक सहकारी एव्हरेस्टवर पोचले. पण दुर्दैवाने त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता.आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक संघटनेने चीनचा दावा फेटाळला आणि त्यांची नाचक्की झाली.
1971 साली पुन्हा एकदा चीनने नवीन तुकडी एव्हरेस्टवर पाठविण्याचा निर्णय घेतला. आता फांग ऊझो एका बॉयलर हाऊसमध्ये काम करतोय  .त्याला पुन्हा टीम लीडरची जबाबदारी देण्यात आलीय.चीन सरकारचा या मोहिमेला पूर्ण पाठिंबा आहे.
यावेळी फांग ऊझु आणि त्याची टीम एव्हरेस्टवर पोचतील का ?
एक श्वास रोखून ठेवणारा अनुभव घ्यायचा असेल तर प्राईम व्हिडिओवर नक्की पहा.
एव्हरेस्टवर चढाईचे  ,मध्येच येणारे जीवघेणे वादळ ,त्याला सामोरी जाणारी गिर्यारोहकांची टीम, याचे अप्रतिम  चित्रीकरण यात आहे.
ज्यांना थ्रिलर चित्रपट आवडत असेल त्यांनी हा चित्रपट नक्की पहावा.
चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे.

Sunday, November 2, 2025

इडली कढई

Idli kadai
इडली कढई
त्या छोट्या गावात शिवनेसनचे छोटे इडलीचे दुकान होते.तो आणि त्याची पत्नी पहाटे तीनला उठून इडलीची तयारी करायचे आणि दुकानात जायचे. कधी कधी शाळेला सुट्टी असली की छोटा मुरुगनही त्याच्या सोबत जायचा. शिवनेसन आपल्या कामात प्रामाणिक होता.इडलीच्या क्वालिटीत तो कोणतीही तडजोड करत नव्हता म्हणूनच गावात त्याला मान आणि इडलीची चर्चा होती.
मुरुगन मोठा झाला तेव्हा त्याने वडिलांचा व्यवसाय वाढविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण शिवनेसनने त्याचे काहीही ऐकले नाही.शेवटी कंटाळून मुरूगन बँकॉकला गेला आणि त्याचे आईवडील त्या गावातच इडलीचे दुकान चालवत राहिले.
आज मुरुगन एका मोठ्या फूड कंपनीत कामाला आहे .त्या कंपनीचा मालक विष्णूवर्धनच्या मुलीशी मीराशी त्याचे लग्न ठरले आहे. पण मीराचा भाऊ अश्विन त्याचा द्वेष करतोय.
साखरपुड्याच्या दिवशीच शिवनेसनच्या मृत्यूची बातमी येते आणि मुरुगन  अंत्यसंस्कारासाठी गावी  येतो.आपल्या मृत्यूनंतर हे दुकान कोणालाही न विकता ते मुरुगनने चालवावे अशी त्यांची इच्छा होते .तर बँकॉकला त्याच्या लग्नासाठी जगभरातून मोठी लोक येणार आहेत त्यामुळे लग्न पुढे ढकलू नये अशी विष्णुवर्धनची इच्छा आहे. पण काही दिवसात मुरुगनची आई ही मरण पावते.
गावातील  दुकानदार मरीयास्वामीला ते इडलीचे दुकान हवे आहे .त्यासाठी तो दुप्पट किंमत द्यायला तयार आहे . मुरुगनची बालपणाची मैत्रीण कायल त्याच्या आईवडिलांचा सांभाळ करत होती . ह्या दुकानाचा वारसा मुरुगनने चालू ठेवावा अशी तिचीही इच्छा आहे.
शेवटी अखेरच्या क्षणी मुरुगन दुकानाच्या विक्रीचा व्यवहार मोडतो आणि स्वतः दुकान चालविण्याचे ठरवतो .त्यासाठी तो मिराशी लग्न मोडतो.
हे ऐकून अश्विन चिडतो आणि स्वतः गावात दाखल होतो.
पुढे काय होणार. ते बघण्यासारखे आहे.
अतिशय सुंदर आणि आणि काळजाचा ठाव घेणारा हा चित्रपट आपल्याला भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवतो. हळूहळू गावाच्या मातीशी आणि माणसांशी जुळत जाणारे मुरुगनचे नाते आणि अश्विन ,विष्णूवर्धनला समजावणे हे बघण्यासारखे आहे.
खरे तर यात कोणीही खलनायक नाही .जो तो आपल्या बाजूने योग्य आहे आणि स्वतःची प्रतिष्ठा सांभाळायचा प्रयत्न करतायत .
 मुरुगनसाठीच धनुष बनलेला आहे.अतिशय शांत ,संयमी भूमिका त्याने केलीय.कायल बनून नित्या मेननने त्याला योग्य साथ दिलीय. बाकी सत्यराज ,शालिनी पांडे, अरुण विजय आपल्या जागी योग्य आहे.
संपूर्ण कुटुंबाने सोबत बसून पहावा असा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.