Idli kadai
इडली कढई
त्या छोट्या गावात शिवनेसनचे छोटे इडलीचे दुकान होते.तो आणि त्याची पत्नी पहाटे तीनला उठून इडलीची तयारी करायचे आणि दुकानात जायचे. कधी कधी शाळेला सुट्टी असली की छोटा मुरुगनही त्याच्या सोबत जायचा. शिवनेसन आपल्या कामात प्रामाणिक होता.इडलीच्या क्वालिटीत तो कोणतीही तडजोड करत नव्हता म्हणूनच गावात त्याला मान आणि इडलीची चर्चा होती.
मुरुगन मोठा झाला तेव्हा त्याने वडिलांचा व्यवसाय वाढविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण शिवनेसनने त्याचे काहीही ऐकले नाही.शेवटी कंटाळून मुरूगन बँकॉकला गेला आणि त्याचे आईवडील त्या गावातच इडलीचे दुकान चालवत राहिले.
आज मुरुगन एका मोठ्या फूड कंपनीत कामाला आहे .त्या कंपनीचा मालक विष्णूवर्धनच्या मुलीशी मीराशी त्याचे लग्न ठरले आहे. पण मीराचा भाऊ अश्विन त्याचा द्वेष करतोय.
साखरपुड्याच्या दिवशीच शिवनेसनच्या मृत्यूची बातमी येते आणि मुरुगन अंत्यसंस्कारासाठी गावी येतो.आपल्या मृत्यूनंतर हे दुकान कोणालाही न विकता ते मुरुगनने चालवावे अशी त्यांची इच्छा होते .तर बँकॉकला त्याच्या लग्नासाठी जगभरातून मोठी लोक येणार आहेत त्यामुळे लग्न पुढे ढकलू नये अशी विष्णुवर्धनची इच्छा आहे. पण काही दिवसात मुरुगनची आई ही मरण पावते.
गावातील दुकानदार मरीयास्वामीला ते इडलीचे दुकान हवे आहे .त्यासाठी तो दुप्पट किंमत द्यायला तयार आहे . मुरुगनची बालपणाची मैत्रीण कायल त्याच्या आईवडिलांचा सांभाळ करत होती . ह्या दुकानाचा वारसा मुरुगनने चालू ठेवावा अशी तिचीही इच्छा आहे.
शेवटी अखेरच्या क्षणी मुरुगन दुकानाच्या विक्रीचा व्यवहार मोडतो आणि स्वतः दुकान चालविण्याचे ठरवतो .त्यासाठी तो मिराशी लग्न मोडतो.
हे ऐकून अश्विन चिडतो आणि स्वतः गावात दाखल होतो.
पुढे काय होणार. ते बघण्यासारखे आहे.
अतिशय सुंदर आणि आणि काळजाचा ठाव घेणारा हा चित्रपट आपल्याला भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवतो. हळूहळू गावाच्या मातीशी आणि माणसांशी जुळत जाणारे मुरुगनचे नाते आणि अश्विन ,विष्णूवर्धनला समजावणे हे बघण्यासारखे आहे.
खरे तर यात कोणीही खलनायक नाही .जो तो आपल्या बाजूने योग्य आहे आणि स्वतःची प्रतिष्ठा सांभाळायचा प्रयत्न करतायत .
मुरुगनसाठीच धनुष बनलेला आहे.अतिशय शांत ,संयमी भूमिका त्याने केलीय.कायल बनून नित्या मेननने त्याला योग्य साथ दिलीय. बाकी सत्यराज ,शालिनी पांडे, अरुण विजय आपल्या जागी योग्य आहे.
No comments:
Post a Comment