Monday, June 8, 2026

spider noir

Spider noir
स्पायडर नोइर
बेन रिली वृद्ध खाजगी गुप्तहेर . छोटी छोटी प्रकरणे तो हाताळतो.एके काळी तो सैन्यात मेजर होता.फ्रान्समध्ये त्याने जर्मन हॉस्पिटलमधून आपले काही सैनिक सोडवले होते.त्या सैनिकांवर विविध प्रयोग चालू होते.त्यातीलच एक सैनिक त्याच्या हाताला चावला.बरे होताच त्याला आपल्यातील शक्तीची जाणीव झाली.तो स्पायडरमॅन बनला होता.नंतर त्याने सुपरहिरो बनून अनेकांचे प्राण वाचविले. पण त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्याने हे सर्व सोडून सामान्य गुप्तहेराचे जीवन जगू लागला.
पण आता  हॉस्पिटलमधून वाचविलेल्या मित्राच्या सुपरपॉवर जागृत झाल्यात. पण शहरातील काही व्यक्ती आहेत जे ह्या सुपर हिरोला आपल्या ताब्यात ठेवू पाहतायत.  एक जर्मन डॉक्टर गेली अनेक वर्षे एका  औषधाचा शोध घेतेय जे घेतल्यावर त्यांच्यातील सुपर पॉवर नष्ट होतील.
बेन पुन्हा सुपरहिरो बनून आपल्या मित्रांना वाचवेल का ?
निकोलस केज सारखा मातब्बर अभिनेता पहिल्यांदाच या सिरीज द्वारे ओटीटी क्षेत्रात पदार्पण करतोय.
ही सिरीज ब्लॅक ऍण्ड व्हाईट आणि रंगीत अश्या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
सिरीज हिंदी भाषेत प्राईम व्हिडिओवर आहे.

कारा

कारा

Kara

कारासामी उर्फ कारा हा हाडाचा चोर आहे. चोरी आणि घरफोडी याशिवाय त्याला दुसरे काहीच करता येत नाही. आपल्या आयुष्यातील शेवटची चोरी करण्यासाठी तो एका आमदाराच्या घरात शिरतो; पण दुर्दैवाने तो पकडला जातो.

या चोरीच्या तपासाचे श्रेय मिळवण्यासाठी डीएसपी भारतन पुढे येतो. काराकडून आपल्या मनाप्रमाणे कबुली मिळवण्यासाठी तो त्याच्यावर दबाव आणतो. मात्र, मारहाण करून कारा तेथून पळून जातो.

या घटनेला सहा महिने उलटतात. आता कारा आपल्या पत्नीसोबत एका हॉटेलमध्ये मजुरी करत असतो. त्याचे स्वतःचे हॉटेल सुरू करण्याचे स्वप्न असते. गावात त्याच्या वडिलांकडे आठ एकर जमीन असते; पण सोळा वर्षांचा असतानाच तो वडिलांचे पैसे चोरून घरातून पळून आलेला असतो. त्यामुळे आता पुन्हा कोणत्या तोंडाने वडिलांकडे जायचे, हा प्रश्न त्याला सतावत असतो.

तरीही, जमीन विकून त्या पैशांत हॉटेल सुरू करण्याचा विचार करून तो गावाकडे परतण्याचा निर्णय घेतो. अनेक वर्षांनी मुलाला पाहून त्याचे आई-वडील आनंदित होतात; पण वडिलांनी जमीन गहाण ठेवून कर्ज घेतल्याचे कळताच कारा निराश होतो.

काराचा खरा हेतू समजताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसतो आणि त्यातच त्यांचे निधन होते. मृत्यूपूर्वी त्यांची इच्छा असते की, आपल्या पूर्वजांच्या शेजारी त्यांचे दफन व्हावे. कारा आणि गावकरी त्यांचे दफन करण्यासाठी जातात; पण बँकेचे अधिकारी ती जमीन ताब्यात घेतल्याचे सांगून दफन करण्यास परवानगी देत नाहीत.

नाईलाजाने काराला आपल्या वडिलांचे पार्थिव सरकारी शवागृहात ठेवावे लागते. मात्र, सात दिवसांच्या आत मृतदेह नेला नाही तर त्याच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी सूचना त्याला दिली जाते.

आता वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी काराकडे फक्त सात दिवस उरलेले असतात. ज्या बँकेकडून कर्ज घेतलेले असते, त्या बँकेने अनेक शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात अडकवलेले असते. कर्जाच्या फॉर्ममध्ये अनेक गुंतागुंतीच्या अटी असतात, ज्या शेतकऱ्यांना ना वाचता येतात, ना समजतात.

“मला फक्त घरफोडी करता येते… मग बँक लुटणे हाच एकमेव मार्ग आहे,” असे म्हणत कारा बँक लुटण्याची योजना आखतो.

पण बँक लुटणे इतके सोपे असते का?

डीसीपी भारतनला या योजनेचा सुगावा लागतो आणि जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. तो पुन्हा काराच्या मागावर निघतो.

कारा आपल्या वडिलांचे कर्ज फेडून त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकेल का?

त्याच्या हातात फक्त सात दिवस आहेत.

Dhanush ने नेहमीप्रमाणे संयमित आणि प्रभावी अभिनय केला आहे. चित्रपटात फारशी हाणामारी नसली, तरी कथा वेगाने पुढे सरकते आणि प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवते.

हा चित्रपट हिंदी भाषेत Netflix वर उपलब्ध आहे.

लेडी जल्लाद

आराचर  (मल्याळी ) ... के.आर. मीरा
लेडी जल्लाद .….रेश्मा कुलकर्णी- पाठारे 
मेहता पब्लिशिंग हाऊस
भारतात पश्चिम बंगालमध्ये नऊ वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जतीनचंद्रला लहान मुलीवर बलात्कार आणि खुनाचा आरोप सिद्ध झाल्यावर सरकारने कोणाच्याही विरोधाला न जुमानता फाशीची शिक्षा जाहीर केली होती.
फणीभूषण ग्रद्धा मलिक सरकारी अधिकृत जल्लाद आहे.आता तो 88 वर्षाचा आहे.तो राहतोही स्मशानाच्या वाटेवर, जिथून सगळ्या अंत्ययात्रा जातात.त्याचे चहाचे दुकानही आहे.अंत्यसंस्कार झाल्यावर सगळे तिथेच चहा पितात. 
जल्लाद मलिकच्या घराण्याला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे .असे फणीभूषण  ग्रद्धा मलिक अभिमानाने सांगतो. त्याने आता पर्यंत चारशे एकावन्न जणांना फाशी दिलेय असेही सांगतो.तो हुशार आणि स्वार्थी आहे.आपल्या शिवाय सरकारला पर्याय नाही हे त्याला पक्के माहितीय म्हणूनच त्याने सरकारला वेठीस धरून काही मागण्या केल्यात.यात आपल्या मुलीला चेतना ग्रद्धा मलिकला अधिकृत जल्लादाची नेमणूक करावी.फाशीची रक्कम वाढवून देण्यात यावी .अश्या  मागण्या आहेत.
चेतना बावीस वर्षाची तरुणीतिच्या रक्तातच जल्लाद असल्याने तिला कुशलतेने गाठ मारता येते.  आपले घराणे जल्लादाचे असल्याने त्यांच्या आयुष्यावर होणारे परिणाम तिने भोगले आहे .ती उत्कृष्ट जल्लाद बनेल याची खात्री तिच्या बापाला आहे.
संजीवकुमार मित्रा एका न्यूज चॅनेलचा वार्ताहर .लेडी जल्लाद चेतना मलिकचा आपल्या वाहिनीला कसा फायदा होईल याचाच विचार त्याच्या डोक्यात सतत चालू आहे.त्यासाठी त्याने चेतना आणि फणी मलिकला हाताशी धरले आहे.त्याच्या वाहिनीवर रोज चेतानाची मुलाखत चालू आहे.
ग्रद्धा मलिक कुटुंबात कित्येक शतकातील फाशी आणि जल्लादाच्या कथा आहेत.त्या संदर्भानुसार आपल्या समोर येतात .जतीनचंद्रला फाशी जाहीर  झाल्यापासून ते फाशी देईपर्यंतचा काळ या पुस्तकात लिहिला गेलाय. या  संपूर्ण पुस्तकात  मृत्यू जाणवत राहतो.तो कसा असतो याची जाणीव सतत आपल्याला वाचताना होत असते तरीही आपण ते पुस्तक हातातून सोडवत नाही.आपण ते वाचत राहतो. अंगावर काटा आणत मृत्यू अनुभवत राहतो. 
यात अनेक  पात्रे भेटतात .बहुतेक पात्रे स्वार्थी आहेत. चेतना या सर्वांना सामोरी जात आपले कर्तव्य पार पडेल का ?