Wednesday, May 10, 2017

रुद्रतेज .....डॉ. चंद्रशेखर चिंगरे .

रुद्रतेज .....डॉ. चंद्रशेखर चिंगरे .
एक नेहमीचीच  राजा राणी राजपुत्राची कहाणी . यासारख्या कादंबऱ्या गो ना दातार ,शशी भागवत यांनी लिहिल्या आहेत . नाथमधव यांची वीरधवल ही याच पठडीतील .
एक क्रूर मेव्हणा आपल्या बहिणीला आणि राजाला ठार करून त्याचे राज्य आपल्या ताब्यात घेतो .राजाचा मुलगा यातून वाचतो आणि मोठा होऊन सूड घेतो . यात सर्व काही आहे . रहस्य ,शृंगार,भावनिक गुंता, घनघोर लढाई ,मांत्रिक,जादूटोणा ,भूत पिशाच्च .मनोरंजन करणारी ही कादंबरी आपल्याला बालपणात घेऊन जाते .

Friday, May 5, 2017

असाध्य ते साध्य

असाध्य ते साध्य ....लुईस गार्डन पग ... अनुवाद ..मोहन गोखले
  लेखकाने ब्रिटनच्या स्पेशल एअर सर्विस मध्ये पाच वर्षे सेवा केली .त्या काळात त्यांनी अनेक दुर्गम भागात गिर्यारोहण आणि धोकादायक ठिकाणी पोहण्याचे विक्रम केले .उत्तर ध्रुवावरील समुद्रात उणे १.७ से. पाण्याच्या तापमानात एक किलोमीटर पोहून जाण्याचा विक्रम त्यांनी १५ जुलै २००७ रोजी केला . हा केवळ एक विक्रम नव्हता तर साक्षात मृत्यूला मारलेली मिठी होती . पृथ्वीवरील सर्वात थंड पाण्याच्या समुद्रात एक किलोमीटर अंतर पोहून जायला साधारण वीस मिनिटे लागतात . केवळ शारीरिक ताकद नाही तर उत्तम मानसिक तयारीची गरज होती . आपले ध्येय कितीही  अडथळे आले तरी कसे पूर्ण करायचे ते हे पुस्तक वाचून कळते . अतिशय सुंदर आत्मचरित्र .

भावना

भाईचे रिपोर्ट हातात आल्यापासून अवि अस्वस्थ होता . घरी जाऊन  काय उत्तरे द्यावीत हेच त्याला सुचत नव्हते . शेवटी नाईलाजाने घरात शिरला . भाई पलंगावर टेकून बसले होते .घरात कोणीच नव्हते. तो बाजूला बसला .
"बोल ,भाई त्याच्या चेहऱ्याकडे पाहत बोलले .
"तुझा आजार गंभीर आहे", घशातील आवंढा परतवत अवि बोलला .
क्षणभर वेदनेची चमक भाईंच्या डोळ्यात येऊन नाहीशी झाली .
"आणि हे सांगायची जबाबदारी नेहमीप्रमाणे तुझ्या अंगावर आली" . भाई हसत बोलले. पण त्यांच्या हसण्यामागील वेदना लपली नाही.
"तुला काही वाटत नाही का ?? अवि काळजीने बोलला.
" तुला काही वाटते का" ?? भाईंनी गंभीर होत म्हटले.
"अरे ब्याऐंशी चालू माझे .उत्तरार्ध चालू झालाय. आता काय वाटायचे ?? आणि तसेही आपण आपल्या भावना एकमेकांपासून लपवातच राहिलो नाही का ?? तू तर दगड म्हणूनच प्रसिद्ध  मित्राची आई वारली तिच्या प्रेताला जातो आणि मित्राला मुलगी झाली तिला बघून येतो असे एकाच टोनमध्ये बोलणार माणूस तू . आज तू का असा वागतोस ??. अवि  नुसताच हसला .
" अवि, भावना व्यक्त करायला शिक ",.हात हातात घेऊन भाई म्हणाले ." काळजी करू नकोस."
हायसे वाटून अवि उठला. मनावरचे ओझे उतरल्यासारखे वाटले शेवटी बाप तो बापच .
रात्री जेवल्यावर अवि निखिल ला घेऊन आईस्क्रीम खाण्याच्या निमित्ताने घर बाहेर पडला . निखिल बारावीला होता .घरात काय चालू आहे याकडे त्याचे लक्ष नव्हते .अभ्यास तो आणि मित्र यातच रमून गेलेला .कट्ट्यावर दोघे बसले .
"निखिल आजोबा आजारी आहेत ",. मी त्याच्याकडे पाहत म्हटले .
"माहितीय ,"त्याने मान न उचलता उत्तर दिले .
"तसे नाही ते खूप खूप आजारी आहेत", . माझ्या बोलण्यातील बदल ऐकून तो चमकला .त्याने माझ्याकडे पाहिले .क्षणभर त्याचा चेहरा रडवेला झाला .
",म्हणजे ते बरे होणार नाहीत का ?? पप्पा तुम्ही आहात ना ? तरीही काही करू शकत नाही का ?? त्याच्या स्वरात अविश्वास दिसत होता . नकळत दोन अश्रू त्याच्या डोळ्यातून बाहेर आले .क्षणाक्षणाला त्याच्या चेहऱ्यावर बदल घडून येत होते .
अविने  त्याच्या पाठीवर हात ठेवला ",काळजी करू  नकोस. करू काहीतरी .मी आहे ना "?? तसा त्याचा चेहरा फुलला .  त्याचा तो फुललेला चेहरा पाहून अविला  भाईची आठवण झाली . त्याचा  मुलगा भावना व्यक्त करायला शिकला होता .

Tuesday, May 2, 2017

स्पर्धा

मी आणि विक्रम नेहमीप्रमाणे चहाच्या टपरीवर बसलो होतो .तोच समोरून घाईघाईत चिंतन गेला . जाताजाता आमच्याकडे पाहून नुसता हात हलविला . मी आश्चर्याने विक्रमला विचारले  "काय रे, हा चिंत्या हल्ली असतो कुठे ? फारच घाईत दिसतो" ??
"माहीत नाही यार ,पण  रोज घरात लावण्या वाजत असतात .आणि चिंगी तर हल्ली दिसतच नाही बाहेर",
चैताली उर्फ चिंगी म्हणजे चिंतनची सात वर्षाची मुलगी .  हुशार ,चुणचुणीत आणि नकलाकार . टीव्ही समोर उभी राहून जसेच्या तसे नृत्य करणारी . "काहीतरी गडबड आहे बुवा, मी चिंतेच्या स्वरात म्हटले.
" चल उद्या घरी जाऊ त्याच्या ",विक्रमने उद्याचा प्लॅन जाहीर केला आणि विषय संपवला .
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी विक्रमला घेऊन त्याच्या घरी धडकलो . वहिनीने कपाळावर आठ्या पाडत स्वागत केले .आमचे घरी येणे तिला तितके रुचले नाही . तर चिंतनने हसून स्वागत केले . घरात एका कोपऱ्यात घुंगरू पडले होते .लहान तयार पद्धतीच्या नऊवारी साड्या होत्या  आणि चिंगी हातात टॅब घेऊन यु ट्यूब वर लावणी बघत होती . तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता .वहिनी तिच्याकडे पाहून बोलल्या ",हा आता हावभाव सुरू कर ",. तशी चिंगी उठली आणि आरशासमोर उभी राहून ,ओठ चावू लागली ,ओठावरून जीभ फिरवू लागली ,पापण्यांची फडफड करू लागली .
"देवा !!!  विक्रम आणि मी तरुणपणी ह्याप्रकारचे बरेच अनुभव घेतले असल्यामुळे हादरलोच .
"नाही अजून उठावदार होऊ दे" ,वहिनी ओरडल्या . आणि टॅब मधून विडिओ काढून दाखविले.
"चिंत्या काय चालले हे ?? मी थोड्या रागातच विचारले.
" अरे काही नाही एका वाहिनीवर लहान मुलांच्या लावणी स्पर्धेचा शो चालू होतोय . चिंगी छान डान्स करते म्हणून म्हटले तिला भाग घ्यायला लावू . त्याचीच तयारी करून घेतोय तिच्याकडून ". असे बोलून चिंगीला म्हणाला ",चल काकांना डान्स करून दाखव चिंगी" .
अतिशय नाईलाजाने  चिंगी तयार झाली . वहिनीने खुश होऊन एक लावणी सुरू केली आणि चिंगीने डान्स . खरेच सांगतो हो मन मारून पोरगी नाचत होती . विक्रमने तर डोळे मिटून घेतले तर चिंतन आणि वहिनी तिला अजून प्रोत्साहन देऊ लागले . एकदाची लावणी संपली आणि चिंगीच्या चेहऱ्यावर सुटकेचा भाव आला .
" तेव्हाच  हल्ली चिंगी दिसत नाही  बाहेर खेळताना". विक्रम थोड्या छद्मीपणे बोलला .
"हो ,वहिनीही तेव्हडयाच  ठसक्यात बोलल्या", काय मिळते त्या मुलांच्यात खेळून. त्यापेक्षा नाचाची प्रॅक्टिस करते  . त्यातूनच काहीतरी मिळेल नाहीतर वाया जातील गुण ".
मग कशी प्रॅक्टिस चालू आहे"?? मी कौतुकाने विचारले . तसा चिंतन उत्साहाने पुढे झाला", अरे  सकाळी सहा वाजता उठते मग अर्धा तास योगा त्या नंतर शाळेत जाते. शाळेतून येताच डान्सची प्रॅक्टिस सुरू करते मग संध्याकाळी डान्सच्या टीचरकडे जाते. तिथे प्रॅक्टिस करते . रात्री घरी येते यु ट्यूब वर विविध प्रकारच्या लावणी नृत्याचे विडिओ बघते त्याची आरश्यात बघून प्रॅक्टिस करते आणि झोप आली की झोपून जाते . तसे बघायला गेलं तर दिवस कमीच पडतो ,पण चिंगीचा उत्साह भारी आहे हो ."
दोघांच्याही चेहऱ्यावर कौतुक ओसंडून वाहत होते तर चिंगीच्या डोळ्यावर झापड येत होती . आम्ही हातातील खाऊ चिंगीकडे दिला आणि म्हटले" खाऊन टाक पटकन.
तश्या वहिनी म्हणाल्या ",आता नको ,वजन  वाढेल तिचे .काही दिवस तिच्या खाण्यावर कंट्रोल ठेवलाय आम्ही ".
हताश होऊन आम्ही निघालो इतक्यात चिंगीचा आवाज ऐकू आला", मम्मी छोटा भीम लावू का ?? "काही नको त्या फालतू सिरीयल ,इतर मुलांसारखे बिघडायचे आहे का तुला .झोप आली असेल तर गप झोप .

Saturday, April 29, 2017

अ गोल्डन एज

अ गोल्डन एज ...तहमिमा अनम  तेच दिन सोनेरी ...अनुवाद  भारती पांडे 
पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या  बांगलादेशाच्या स्वातंत्र्य संग्रामची ही कहाणी .१९७१ साली  रेहना आणि तिची दोन मुले ,जी स्वातंत्रसंग्रामात आघाडीवर आहेत त्यांच्याभोवती ही कहाणी फिरते .अश्या संग्रामात कुटुंबाला किती यातना भोगाव्या लागतात किती जणांना आहुती द्यावी लागते ,याचे प्रभावी चित्रण लेखिकेने केले आहे.
  द कोस्टा फर्स्ट नोव्हेल अवॉर्ड आणि द गार्डीयन फर्स्ट बुक अवॉर्ड यांच्या यादीत स्थान मिळवलेली अव्वल दर्जाची कादंबरी .
भारतीय स्वातंत्रलढ्यातही अश्या कित्येक कहाण्या आहेत ज्या अजूनही बाहेर आल्या नाहीत .

Thursday, April 27, 2017

अ डेलिकेट त्रुथ ...

अ डेलिकेट त्रुथ ...जॉन ली कॅरे .अनुवाद उषा तांबे
ऑपरेशन वाइल्डलाईफ ???? काय आहे हे ऑपरेशन ज्याची खबर यात सामील असलेल्या परराष्ट्र मंत्र्याच्या खाजगी सचिवालाही माहीत नाही .आणि एकमेकांशी संबंध नसलेली भविष्यात ही संबंध येणार नाही अशी माणसे यासाठी निवडली गेली आहेत .जिब्राल्टर या ब्रिटिशांच्या महत्वाच्या ठाण्यावर ही दहशतविरोधी मोहीम पार पडते .शस्त्र खरेदी विक्री करणाऱ्या दलालांवर ही कारवाई असते . अतिशय गुप्त असे कारवाईचे  स्वरूप असते .पण अचानक तीन वर्षांनी ही कारवाई उघडकीस येते आणि खाजगी सचिव या प्रकरणाने हादरून जातो .खरे तर हे पुस्तक अतिशय गुंतागुंतीचे आहे .सावधपणे आणि लक्ष देऊन वाचल्यास यातील रहस्य अनुभवता येते .विसाव्या शतकातील उत्तरार्धात ब्रिटनमधील सर्वात महत्वाचा कादंबरीकार असे जॉन ली कॅरेला म्हटले जाते .

Monday, April 24, 2017

सेमिनार

सेमिनार अटेंड करताना समोरची स्त्री कितीही सुंदर आणि टंच असली तरी झोप काही आवरत नाही . हाच अनुभव मी घेत होतो .
बरे ज्या विषयावर हा सेमिनार होता त्याचा आणि माझा काहीच संबंध नव्हता . पण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भरपूर नाश्ता ,दुपारचे जेवण जेवून आता मला सुस्ती आली होती . ह्या सेमिनार मुळे बऱ्याच जणांचा फायदा होणार असला तरी मला काहीच फायदा होणार नव्हता . खरेच अश्या सेमिनार बैठकीतून काय मिळते . शेवटी निर्णय हे परिस्थिती नुसार घ्यावे लागतातच . बैठक ,प्रवचन या गोष्टीला आता सेमिनार असे गोंडस नाव दिले गेले . आपण कसे वागावे ,कसे बोलावे हे समोरील व्यक्ती अधिकारवाणीने आपल्याला सांगत असतो . पूर्वी दाढी वाढवून गळ्यात हार घालून भारतीय बैठकीवर बसलेला साधू किंवा बुवा असायचा आता त्याची जागा सूट बूट घालून चकाचक गुळगुळीत चेहरा असणाऱ्या माणसाने घेतली आहे . तर कधी कधी सुंदर स्त्री आपल्या गोड आवाजात बोलत असते . मुख्य म्हणजे सगळे आपल्याला माहीत असते पटत ही असते पण ते दुसऱ्याच्या तोंडून ऐकायला काही काळ बरे वाटते ,जेवण झाल्यावर ह्या गोष्टी ऐकता ऐकता कधी झोप येते ते कळत नाही . माझा मुद्दा असा होता कोणत्या सेमिनार ,ट्रेनिंग साठी कोणती योग्य व्यक्ती असावी . एखादा मेन्टेनन्सचा असेल तर त्याला मशीनचे ट्रेनिंग द्यावे की तत्त्वज्ञानाच्या सेमिनारमध्ये बसवावे . किंवा hr वाला असेल तर त्याला कोणत्याही ट्रेनिंग ला पाठवावे का ?आता ह्या सेमिनारवरून आल्यानंतर मी थोडाच शिव्या देऊन काम करायचे थांबविणार आहे ???😊😊
(C) श्री.किरण बोरकर