Thursday, July 13, 2017

बजेट

चपलेचा अंगठा तुटताच अजयने खच्चून शिवी दिली .एका क्षणात त्याला बँकेतील बॅलन्स ,खिशातील पैसे ,घरातील कपाटातील पैसे डोळ्यासमोर आले.
"च्यायला!!...या महिन्याच्या बजेटमध्येही नवीन चपला बसत नाहीत". हेच वाक्य तो चार महिन्यांपूर्वी दुसऱ्या पायातील चपलेचा अंगठा तुटला तेव्हाही बोलला होता.त्या पाच रुपयाचे फेव्हीक्विक फक्त स्वतःसाठी निर्माण केले आहे असेच त्याला वाटत होते.
"हा पण तुटला का"?? निहार हसत म्हणाला."आतातरी नवीन घ्या पपा.किती दिवस ती वापरणार??कंपनीवाल्यानीही हे प्रॉडक्ट बंद केले असेल . तुमच्याकडे आहे असे कळले तर सत्कार करतील तुमचा".
"राहू दे रे .कोण बघतेय मला आणि पावसाळा संपला की तुला नवीन शूज घ्यायचे आहेत तेव्हा घेईन मी . त्यामहिन्याच्या बजेटमध्ये बसवू" असे बोलुन अजय हसला.
"ओके!! तुम्ही ऐकणार नाहीत .चला मला प्रोजेक्टसाठी सामान घेऊन द्या . तुमच्या महिन्याच्या शैक्षणिक बजेटमधले पैसे काढा."निहारने ऑर्डर सोडली.
"हो !! हो ! ते घेऊ चल काय पाहिजे ते घे त्यात हयगय नको."
थोड्यावेळाने दोघेही सामान घेऊन घरी निघाले .रस्त्यात विक्रम समोर आला."अज्या !!!..नेहमीप्रमाणे जोरात आरोळी ठोकत त्याने मिठीच मारली आणि निहारला टपल्या.
"बरे सापडलास ,चल बसूया."ते ऐकून अजयने चेहरा वाकडा केला ",नाही जमणार रे..बजेट कोसळलय .ही बघ चप्पल तुटलीय त्याला पैसे नाहीत "चेहरा पडून अजय बोलला.
"हॅट...!! च्यायला ,नेहमी रड तू "विक्रम हसून म्हणाला ..
"बाबारे.जा तू "असे बोलून अय ने हाथ जोडले .
पुढे आल्यावर निहार हळूच म्हणाला", जायचे ना पप्पा तेव्हढाच विरंगुळा.नाहीतरी कुठे जातच नाही हल्ली .
"अरे नको रे .या महिन्यात सोनाली आतेच्या नातीचे बारसे आहे. तिलाही काहीतरी द्यायला पाहिजे ना ?? हे असे अनपेक्षित येते त्यासाठीही आपत्कालीन बजेट ठेवावे लागते .
ते घरी आले तेव्हा जया जणू त्याची वाट बघत असल्यासारखीच बसली होती . "आहो उद्या  बाबू सवंतांच्या मुलीचे लग्न आहे काहीतरी आहेर द्यायला पाहिजे" तिनेऑर्डर सोडली
"अरे त्याच्या मुलीच्या लग्नाला तर विरोध होता ना बाबुचा??मग हे अचानक कसे ???? त्याने आश्चर्याने विचारले .
"तिने पळून जाऊन लग्न केलेय.मग ह्यांना आता स्वीकारावेच लागेल . उद्या हजार रुपये तरी द्या आहेर आणि इतर गोष्टींना"असे बोलून ती आत गेली.
अजय निहारकडे बघून ओशाळवाने हसला .निहारने काही न बोलता मान डोलावली .बाहेर जाऊन त्याने पप्पांची चप्पल आत आणली . प्रोजेक्टच्या सामानातून पाच रुपयाचे फेव्हीक्विक काढून चप्पल चिकटवून अजयच्या हाती दिली.
"अरे!!. हे तू इथे का वापरले आता तुला काय आहे ?? अजय चिडून बोलला.
"हे तुमच्यासाठीच घेतले पप्पा.शैक्षणिक बजेटमध्ये तुम्ही कधीच कपात करीत नाही म्हणून त्यातून मी हे घेतले" आणि बॅगेमधून  हजार रुपये काढून अजयच्या हाती दिले", हे घ्या सोनाली आतेच्या नातीसाठी आपल्याकडून गिफ्ट .मे महिन्यात मी एका चित्रकलेच्या स्पर्धेत भाग घेतला होता त्याचे तिसरे बक्षीस मला मिळाले .तुम्हाला सांगणार नव्हतो पण तुमचे बजेट कसे कोसळते हे आज मी बघितले .आणि आतेची नात म्हणजे माझी भाचीच की .तिच्यासाठी मलाही काहीतरी करू दे की."
डोळ्यातील पाणी थोपवत अजय एक हातात चप्पल आणि दुसऱ्या हातातील हजार रुपायांकडे पाहत बसला .

@ किरण बोरकर

Tuesday, July 11, 2017

गेट टूगेदर

आज सकाळी उठल्यावर तिचा मूड बघून त्याला आनंद झाला . छान गुणगुणत तिची तयारी चालली होती .काल तिच्या शाळेतील मैत्रिणींचे गेट टूगेदर होते आणि ह्याने आग्रह करून तिला पाठविले होते .तशी ती शाळेत प्रसिद्ध कधीच नव्हती.त्यामुळे आधी नाहीच जाणार म्हणून बोलत होती.पण त्याच्या आग्रहापुढे काहीच चालले नाही . त्याचा नाराज चेहरा ती कधीच बघू शकत नव्हती .रात्री घरी आली तेव्हा तो झोपून गेला होता.
"काय मॅडम" ?? आज खुश दिसतायत "?? त्याने अंथरुणातूनच विचारले .तशी ती वळली आणि गोड हसत त्याला थँक्स म्हणाली.
"कशासाठी" ??त्यानं  गोंधळून विचारले.
" कालची माझी संध्याकाळ अविस्मरणीय केल्याबद्दल".तिने त्याचा हात हाती घेऊन उत्तर दिले. "अरे वा!!..काय काय मजा केली  काल "??त्याने कौतुकाने विचारले.
"आहो पंधराजणीजमलो होतो.काहीजणींना तर मी ओळखलेच नाही . किती बदल झाला आहे त्यांच्या चेहऱ्यात आणि राहणीमानात .बऱ्याच जणी स्वतःच्या गाडीतून आल्या होत्या दोघींचा तर शोफर होता . श्रीमंती तर ओसंडून वाहत होती चेहऱ्यावरून .मला बघून सर्व खुश झाल्या.म्हणतात तुझ्या चेहऱ्यात काही बदल नाही आहे तसाच आहे निरागस .कसेतरीच झाले मला"ती त्या विश्वात जाऊन बोलत होती.
तो क्षणात गंभीर झाला."सॉरी मी तुला नाही पाठवायला पाहिजे होते तिथे ??
त्याचा चेहरा पाहून ती हळहळली.खांद्यावर हात ठेवून म्हणाली",असे का म्हणतोस"? .उलट तिथे जाण्याने माझा आत्मविश्वासअजून वाढला.अरे सर्व जणी आपले वैभव दाखविण्यासाठी आलेल्या . पैश्याच्या नादात आपला मूळ स्वभावच विसरून गेल्या होत्या त्या .ती रश्मी आपटे ,एके काळची ब्यूटीक्वीन आज चारही बाजूने सुटलीय .म्हणते घरातून बाहेर पडत नाही .सर्व काही जागेवर येते .आणि माझ्याकडून पुस्तके घेऊन जाणारी जया तर आता बघायलाही तयार नाही . आज त्यामुळे बदललेली मने तरी दिसली . खूप गप्पा मारल्या आम्ही त्या सर्वांकडे एक गोष्ट समान होती तो म्हणजे भरपूर पैसा न संपणारा वेळ .मध्येच कधीतरी दिसणारा नवरा  आणि वर्षातून एक पिकनिक .आणि माझ्याकडे सर्व विरुद्ध होते .पैश्याची चणचण आहे. तोच चेहरा तोच शरीराचा आकार आकार,सतत आजूबाजूला वावरणारा नवरा ,पटकन संपणारा दिवस ,आणि आजूबाजूला कधीही मदतीला तयार असणारी भरपूर माणसे .मी अजूनही नातेवाईकांना ,मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटते ऐकून खूपच आश्चर्य वाटले त्यांना "असे म्हणून खो खो हसू लागली .
तिचा तो निरागस चेहरा पाहुन त्याच्या छातीत कळ उठली ."मी तुला फार काही देऊ शकत नाही ".तो मान खाली घालुन म्हणाला.
"अरे वेड्या असे का म्हणतोस.हेच तर तू देतोस ज्याची माझ्या मैत्रिणी आपल्या नवऱ्याकडून आतुरतेने वाट पाहतायत .पैसे कमावण्याच्या नादात ते ह्या गोष्टी विसरूनच गेल्यात बघ .आणि माझ्यासारखी कोण पहिली की त्यांना असूया वाटते .आज खरे तर मी त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे . माझी माणसे मला फुलासारखी जपतात यापेक्षा दुसरे सुख नाही .तिच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळून गेल्याच भास झाला .लटके रागावून त्याला म्हणाली ",चला उठायचे नाही का ?? की माझ्या सुंदर चेहऱ्याकडे बघतच दिवस भरणार आहेस ???

@ किरण बोरकर

Sunday, July 9, 2017

आयसिसच्या जबड्यातून सुटका ....रंगा दात

आयसिसच्या जबड्यातून सुटका ....रंगा दाते
एखादी सत्यकथा असेल म्हणून वाचायला घेतले तर साधी मनोरंजन आणि करमणूक करणारी कादंबरी निघाली .भारतीय गरीब तरुणी शबानाला नोकरीच्या निमित्ताने दुबईला नेण्यात येते आणि तिथून तिला सिरीयात विकण्यात येते .तिच्याबरोबर जिहादच्या नावाखाली फसगत झालेले दोन तरुण आणि बांगलादेशी तरुणी असे चारजण आयसिसच्या विळख्यातून आपली कशी सुटका करून घेतात याची ही काल्पनिक कथा .

Friday, July 7, 2017

भाडेकरू

काहीश्या संभ्रमित अवस्थेत मी विक्रमच्या घरात शिरलो.मला पाहून विक्रम खुश झाला.पण रिकाम्या हाताकडे पाहून एक रागीट कटाक्ष टाकून वहिनीला मी आल्याची वर्दी दिली.
"रिकाम्या हाताने कोणाकडे जाऊ नये ",त्याने अक्कल पाजळली .
मी लक्ष दिले नाही.माझा चेहरा पाहून विक्रम समजला. "भाऊ काय झाले ?चमत्कार झाल्यासारखा का चेहरा झालाय "??
"विक्रम तुझ्या मजल्यावर एक नवी मुलगी आलीय का??  तसा विक्रम चमकला .किचनमध्ये पाहून हळूच म्हणाला", पाहिलीस का तिला .?? मस्त आयटम आहे ना ?? अजून दोन आहेत . एकापेक्षा एक टकाटक आणि हातावर टाळी दिली .
"झाले का तुझे सुरू ?? मी चिडूनच बोललो.
"अरे हल्लीच आल्या.तिघी दामलेच्या फ्लॅटमध्ये . जाम भारी आहेत त्या . त्यांचे वागणे बघूनच बिल्डिंग मधले सर्व दबून असतात".
  इतक्यात नाना आत शिरले . बहुतेक मला पाहूनच चहाची सोय झाली असे वाटले त्यांना . नाना विक्रमचे शेजारी . निवृत्त त्यामुळे रिकामेच . आमचे चेहरे पाहूनच त्यांना कळले कोणता विषय चालू आहे .विक्रमने मुकाटपणे आत जाऊन",एक चहा वाढव ग"अशी ऑर्डर सोडली.
"भाऊ आहो काय पोरी आहेत त्या . मगाशी पानाच्या टपरीवर गेलो तेव्हा त्यातली एक बया सिगारेट घेत होती . ती सिगारेट पाहूनच मी माझी छोटा गोल्डफ्लेकची ऑर्डर कॅन्सल केली .आणि झोकात सिगारेट पेटवून अशी नजर मारली......अरे घाम फुटला मला"ते ऐकून आम्ही दोघे जोरात हसलो.
" खरेच रे भाऊ, परवा माझ्याबरोबर लिफ्टमध्ये होती पण मी अंग चोरून उभा होतो . अरे तिचा रुबाब पाहून मी जनरल मॅनेजर आहे हे विसरून गेलो.विक्रम चेहरा वाकडा करीत म्हणाला.
"तसाही विकी,तू जनरल मॅनेजर वाटत नाहीस.नवरात्रीला देवीचे विसर्जन करताना थ्रीफोर्थ घालून जो नागीण डान्स करतोस त्यावरून मुळीच वाटत नाही."असे बोलून नानाना टाळी दिली.
"पण भाऊ हे प्रकरण जरा गंभीर आहे आणि त्यासाठीच मी इथे आलोय ",नाना गंभीरपणे म्हणाले. "अरे इथे या मुली राहातायत .परक्या गावातून इथे नोकरी करायला घरापासून दूर आल्या म्हणून आपलेपणाने राहायला दिले . काही दिवस ठीक होत्या.कोणाच्या अध्यातमध्यात नाहीत . आपण बरे आपले काम बरे अश्या. पण हळू हळू त्यांची राहण्याची पद्धत बदलली . रात्री बेरात्री बाहेर जाणे . सोसायटी गेटवर उभे राहून सिगारेट पिणे चालू झाले . सोडायला आलेल्या मित्रांबरोबर नको नको ते चाळे करणे सुरू झाले . कधी कधी त्यांच्या मैत्रिणी येतात दारूच्या बाटल्या घेऊन आणि रात्रभर म्युझिक लावून नाचत बसतात . त्या दिवशी कंटाळून माझी सून त्यांना सांगायला गेली तर तिच्याच अंगावर धावून आल्या ,अंगावरच्या कापड्यांचीही शुद्ध नव्हती त्यांना .काय करायचे यांचे .काल तर एक पुरुष रात्रभर घरी होता त्यांच्या . विचारायला जाण्याचीही भीती वाटते .मी दामले काकांना निरोप दिला ते येऊन बोलले तर त्यांनाही जुमानले नाही त्यांनी . भाडे दिले आहे पूर्ण मग गप बसाअशी उत्तरे मिळाली.ते तरी काय करणार.काहीच ताळतंत्र राहिला नाही याना.
"ठीक आहे ".मी विचार करू लागलो" नाना तुम्ही आधी मीटिंग घेऊन भाडेकरूसाठी नियमावली बनवा.त्याची प्रत पोलीस स्टेशन ला द्या . आणि भाड्याने फ्लॅट देण्याची पूर्तता त्या नियमानुसारच करा म्हणजे पोलीस त्यांना समजावतील .आहो तरुण पोर आहेत ती .कोणी मनाने वाईट नसते .शिवाय उच्चशिक्षित ,मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असतात . घरापासून लांब असतात म्हणून मोकळे वागतात त्यात तरुणपणाचा जोश . उगाच पोलीस स्टेशन आणि तक्रारींमुळे त्यांची कारकीर्द वाया जायची . तसे नाना म्हणाले", ते ठीक आहे भाऊ पण तरीही नाही ऐकले तर ??
" तर !!! ...मी विचार करून म्हणालो ",मग विक्रमवर सोडा ते . काय विकी बरोबर ना ???
तसाविक्रमही हसून म्हणाला ",हो मी बघतोच काय करायचे . तसेही बॉक्सिंग प्रॅक्टिस बरेच दिवस झाली नाहीच ",ते लक्षात येताच नाना जोर जोरात हसू लागले.

(C) श्री.किरण बोरकर .

Tuesday, July 4, 2017

डाय फॉर मी .... करेन रोझ

डाय फॉर मी .... करेन रोझ.. अनुवाद ..प्रा. पुरुषोत्तम देशमुख 
फिलाडेल्फियाच्या आपल्या बर्फाच्छादित निर्जन शेतात हार्लन विंचेस्टर बायकोने गिफ्ट दिलेला धातूंशोधक यंत्र घेऊन बाहेर पडला आणि त्याला एक मृतदेह सापडला .त्या शेतात अजूनही काही मृतदेह असतील असे डिटेक्टिव्ह व्हीटो याला जाणवते . त्यासाठी तो सोफी या पुरातत्व संशोधकांची मदत घेतो . आणि त्या शेतातून अनेक मृतदेह काढले जातात . मध्यमयुगीन काळात शत्रूला किंवा कैद्याला अमानुष छळ करून मारायचे तसेच त्यांना मारले गेले होते . आणि आता त्याला सोफी हवीय .... का ?? कशासाठी ???? क्रौर्याची परिसीमा गाठणारी आणि चक्रावून टाकणारी एक रहस्यकथा

Sunday, July 2, 2017

गोष्ट एका ध्यासाची एव्हरेस्ट

गोष्ट एका ध्यासाची एव्हरेस्ट .....उमेश झिरपे
आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी शून्यातून कसे उभे राहावे हे कळण्यासाठी हे पुस्तक वाचलेच पाहिजे .पुण्यातील गिरिप्रेमी या संस्थेतर्फे झिपरे यांनी एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहिले .आणि एक नव्हे तर तब्बल तेरा मराठी गिर्यारोहकांनी ही मोहीम काढली .प्रत्येक गिर्यारोहकाचे एव्हरेस्ट चढाईचे स्वप्न असते .तेरापैकी आठ जणांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवले .हजारो लोकांच्या पाठिंब्यामुळे ही मोहीम अभूतपूर्व ठरली .या मोहिमेसाठी काय काय अडचणी आल्या . पैसे कसे गोळा केले गेले . गिर्यारोहकांच्या कुटुंबियांकडून कसा होकार मिळविला गेला .हे सर्व या पुस्तकात सांगितले आहे .अतिशय सोप्या सरळ भाषेत लिहिलेले हे पुस्तक एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या मराठी गिर्यारोहकांना  मार्गदर्शक ठरेल आणि गिर्यारोहण हा खेळ समाजात रुजविण्याचे स्वप्न पूर्ण करेल .

सहवास

घड्याळात पहाटे पाचचा गजर होताच शिल्पा खडबडून जागी झाली .नंतरच्या तिच्या हालचाली सवयीनुसार घडत गेल्या.स्वतःचे आटपून ती सासूबाईंच्या खोलीत शिरली आणि रिकामे अंथरूण पाहून थरारली . कालच तर त्या गेल्या .सगळे आटपेपर्यंत रात्रीचे बारा वाजले मग ती झोपून गेली आणि सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली.
गेली तीन वर्षे सासूबाई अंथरुणावरच खिळून होत्या.त्यांच्ये सगळे करताकरता ती सवयच अंगात भिनून गेली होती.आता त्या नाहीत. त्यांची रिकामी जागा पाहूनच एक मोठी पोकळी तिला जाणवली.आता काय करायचे ??? खरेच आपण सुटलो का?? कुठेतरी एक मनाचा कोपरा हलल्यासारखा झाले.मान्य!!...की त्यांचा काही उपयोग नव्हता तिला.पण त्यांचे अस्तित्व तिला घरभर जाणवायचे.सकाळी सहा वाजल्यापासून तिची तयारी सुरू व्हायची . तिला पुसून काढा . डायपर बदला .कपडे बदला.मग चहा नाश्ता ,औषध त्या नंतर पेपरमधील ठळक घडामोडी वाचून दाखवा.मग घरातील इतर कामे.परत तिला वेगळे जेवण .ह्या धावपळीत दिवस कसा संपायचा  ते कळतच नव्हते .गेल्या तीन वर्षात सासू आणि ती जणू एकरूप झाल्या होत्या.बरे इतके करूनही म्हातारीचा मूळ स्वभाव बदलत नव्हताच .अंग हलत नव्हते पण तोंडाचा पट्टा चालूच होता.अजूनही तिला भवाने म्हणून जोरात हाक मारायची ताकद होती .डोळ्यातली जरब अजूनही कमी झाली नव्हती .रागाच्या भरात फेकून मारलेल्या तांब्याची खूण अजूनही शिल्पा आपल्या कपाळावर मिरवत होती .त्यावेळी ती नेहमी स्वप्न बघायची की एक दिवस तरी आपल्या तालावर नाचवेन मी .आणि आज गेली तीन वर्षे ती शिल्पावर अवलंबून होती. तरीही शिल्पाच्या मनात हे विचार येत नव्हते .
अर्धांगवायूचा पहिल्या झटक्यातच ती अंथरुणावर खिळली. सर्वाना वाटले आता शिल्पा वचपा काढणार.काही काळ शिल्पा ही खुश झाली पण तिच्या चेहऱ्यावरील हतबलता आणि डोळ्यातील असहाय भाव पाहून ती भानावर आली .
सुरवातीला खूप त्रास व्हायचा तिला .अंथरुणात खिळूनही सासूने तिला सहजासहजी सोडले नाही .हिलाही त्रास झालाच... सगळेच विधी अंथरुणावर ,नवरा तर फिरकायचा नाही ,मुले चेहरा वाकडा करून बाहेर पळायची .मग तिचे करता करता हिचे तोंड सुटायचे .एकदा तर बोलून गेली, पटकन देवा घेऊन जा हिला ,नाहीतर मला तरी. ....सोडव मला यातून.पण त्याचवेळी तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून ती मनोमन कळवळली .दोघींच्याही नजरेतल्या भावाने त्यांचे सासू सुनेचे नाते संपून गेले .आणि सुनेची आई आणि सासूचे मूल असे नाते तयार झाले .त्या एका क्षणाने शिल्पाने आई बनून अंथरुणावर खिळलेल्या सासूला जवळ घेतले .दोघीना स्पर्शाची भाषा आपोआप कळली .मग दोघीही एकमेकांना साथ देऊ लागल्या .एक वेगळीच अनुभुती शिल्पा अनुभवत होती .
आणि अचानक काल तो क्षण आला . नंतर मात्र सर्व काही घाईघाईत झाले .कधी एकदा हिला बाहेर काढून मोकळे होतो असे सर्वाना झाले .या घाईत शिल्पाला कोणीच विचारले नाही .सर्वांच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव .
आता तिच्या रिकाम्या अंथरूणाकडे बघून हे सर्व शिल्पाला आठवले .आता पुढे काय ...?? आयुष्य जणू रिकामेच झाल्यासारखे वाटत होते .जरी त्या अंथरुणात होत्या तरी एक आधार होता तिचा . दुपारी तिला जेवण भरवून झाले की छान गप्पा मारायच्या दोघी .मनातील सर्व गोष्टी शेअर व्हायच्य.सासूचे उपदेशाचे बोल तिला हवेहवेसे वाटायचे .कधी कधी सासू ही अल्लड तरुणीसारखी आपल्या तरुणपणीच्या गोष्टी सांगायची .हे सर्व तिला आठवले आणि खऱ्या अर्थाने तिला आयुष्यातील रिकमेपणा जाणवला .त्या रिकाम्या झालेल्या अंथरुणावर झोकून देऊन रडू लागली .

(C) श्री.किरण बोरकर