Thursday, March 14, 2019

भायखळा ते बँकॉक ( मुंबईचे मराठी गुंड

भायखळा ते बँकॉक ( मुंबईचे मराठी गुंड )..एस. हुसेन झैदी
अनुवाद....उज्ज्वला बर्वे
मंजुल पब्लिशिंग हाऊस
हुसैन झैदी यांच्या डोंगरी ते दुबई या पुस्तकाचा पुढील भाग . मुंबईतील गुन्हेगारीचा सगळा इतिहास लेखकाला तोंडपाठ आहे . त्यावर त्यांनी प्रचंड संशोधन आणि अभ्यासही केला आहे . पहिल्या भागात त्यांनी दाऊदची कारकीर्द सांगितली. तर या भागात त्यांनी दाऊदचे प्रमुख प्रतिस्पर्धी आणि मराठी गुंड यांचा इतिहास लिहिला आहे . ज्या काळात मोबाईल ,स्मार्टफोन इंटरनेटसारख्या गोष्टी नव्हत्या त्याकाळी या गुंडांनी संपूर्ण मुंबईवर आपली दहशत बसवली होती.या पुस्तकात प्रामुख्याने अरुण गवळी ,छोटा राजन ,अमर नाईक ,अश्विन नाईक यांच्या कहाण्या आहेत .गिरणी कामगारांच्या संपात गुन्हेगारीची झालेली वाढ याचे प्रभावी लिखाण केले आहे .  मुंबई पोलिसांनी दिलेला लढा आणि त्यांचा भ्रष्टाचारही आपल्याला अचंबित करतो . यांच्यातील बऱ्याच चकमकी आजही हिंदी चित्रपटात दाखविल्या जातात .  मग ते बाबू रेशीमचा आर्थर रोड कारागृहात झालेला खून असो की अश्विन नाईकवर भर कोर्टात झालेला जीवघेणा हल्ला असो. गुन्हेगारांची हल्ला करायची योजनाबद्ध पद्धत पाहून अंगावर शहारे येतात .ज्यांना मुंबईचा माफियापट समजावून घ्यायचा असेल त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवे .

Sunday, March 10, 2019

धर्मांतर ... उमेश कदम

धर्मांतर ..... उमेश कदम
राजेंद्र प्रकाशन
ही कथा आहे सुदानमध्ये घडलेल्या एक खळबळजनक खटल्याची .त्याचे पडसाद जगभर उमटले होते .इथिओपियात 1973 मध्ये दुष्काळ पडला तेव्हा अल्झाम आणि मार्सेमा या मायलेकी आपल्या कुटुंबासमवेत सुदानला येतात.पण तिथल्या निर्वासित छावणीत पोहचेपर्यंत दोघीच जिवंत राहतात.तिथे त्यांची भेट आदिल या मुस्लिम तरुणाशी होते .मार्सेमा ख्रिश्चन असूनही आदिल तिच्याशी लग्न करतो. पण तरीही मार्सेमा धर्मांतर करीत नाही . घरच्यांचा विरोध असल्यामुळे आदिल मार्सेमा आणि अल्झामला घेऊन वेगळा राहतो . काही वर्षांनी तो सैन्यात दाखल होतो . निर्वासित छावणीतून बाहेर पडल्यावर सुखाचे आयुष्य उपभोगत असताना आदिल लढाईत हरवतो . पुढे मार्सेमा आपल्या मुलीला आलेमला डॉक्टर बनविते . आलेम आता सुदान मधील मोठ्या हॉस्पिटलमध्ये कामाला आहे . ती मार्को या अमेरिकन नागरिकांशी लग्न करते . मार्को जन्मापासूनच पांगळा आहे .अचानक आलेमच्या सुखी आयुष्यात भयानक वादळ येते . तिचा काका त्यांच्याविरुद्ध तक्रार करतो . त्यामुळे तिला अटक होते . सुदानमधील मुस्लिम कायद्यानुसार तिने जो अपराध केलाय त्याला देहदंडाची शिक्षा आहे आणि जो पर्यंत ती अंमलात येत नाही तोपर्यंत आरोपीला साखळदंडाने बांधण्यात येते . आलेम गरोदर असल्यामुळे तिने बाळाला जन्म दिल्यानंतर दोन वर्षांनी तिला मृत्युदंड होईल . तुरुंगात अतिशय हालाचे किळसवाणे जीवन आलेम जगतेय . तिची सुटका करण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर चालू आहेत . खुद्द पोपनी यात लक्ष घातले आहे . आंतरराष्ट्रीय  न्यायालयाने सुदानच्या अध्यक्षांचे अटक वॉरंट काढले आहे . तरीही अध्यक्ष न्यायालयीन प्रकियेत सुदान सरकार हस्तक्षेप करणार नाही असे ठासून सांगतेय . जगभरातील मानवी हक्क संघटना सुदानचा विरोध करतायत आणि आलेमच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत  . शेवटी असे काय घडले की सुदान सरकारला तिची सुटका करावी लागली . एका सत्यघटनेवर आधारलेली वाचकांना खिळवून ठेवणारी कादंबरी .

महिलादिन ..... असा ही

महिलादिन असा ही
निवारा लेडीज होस्टेलला आज गडबड.. धावपळ.. दिसत होती.जवळजवळ पंधरा लेडीज तिथे राहत होत्या . सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करणाऱ्या  बाहेरगावातील ....परराज्यातून आलेल्या. हॉस्टेल थोडे महाग आणि खाजगी होते त्यामुळे इथे राहणाऱ्या मुलीही उच्चपदावर आणि मोठ्या पगारावर काम करणाऱ्या होत्या.आज महिलादिनानिमित्त एका पार्टीचे आयोजन करणयात आले होते.
जोत्स्ना,लिंडा,माधुरी यांनी पार्टीसाठी पुढाकार घेतला होता .  हळूहळू एक एकजणी ऑफिसमधून येऊ लागल्या.
"आज पार्टीत स्पेशल काय ....?? एकीने विचारले.
"आज आपला दिवस आहे ... एकीने सिगारेट शिलगावत सांगितले .
"माझ्याकडून दोन खंबे फिक्स आहेत . मागच्या आठवड्यात एक प्रोजेक्ट पूर्ण झाला त्याचा इंसेंटिव्ह मिळाला .."लिंडाने सांगितले.
"मस्त...." सगळ्यांनी टाळ्या वाजविल्या. "आणि माझ्याकडून बियरचा बॉक्स .."एकीने डिक्लेर केले . "मग माझ्याकडून सिगारेट्स.." दुसरीने कोपऱ्यातून आवाज दिला.सर्वांनी एकच हल्लाकोळ केला.
"पण अजून काहीतरी स्पेशल पाहिजे यार....'जेनी हाताची मूठ वळवून म्हणाली .सर्व हसू लागले.
"होईल त्याचीही सोय होईल रात्री बघू ..."लिंडा हसत म्हणाली .
फ्रेश होऊन  रात्री परत सगळ्या एकत्र आल्या . ग्लास भरले गेले. सिगारेट्स पेटविल्या गेल्या.मध्येच कोणीतरी सिगारचा बॉक्स ओपन केला. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे सिगार पाहून सर्व खुश झाल्या.
इतक्यात बेल वाजली.दरवाजातच एक रुबाबदार तरुण उभा होता. टाईट ग्रीन टी शर्ट.. जीन्स.. स्पोर्ट शूज आणि अंगाला येणार मंद सुवास . दरवाजा उघडणारी त्याची हसरी मुद्रा पाहून बावरली. सुखाची एक लहर तिच्या अंगावरून गेली.
"मिस लिंडा आहेत का.... ??? मधुरपणे हसत त्याने विचारले .
काही न बोलता तिने नुसती मान डोलावली आणि आत घेतले.अर्थात लिंडाला मनोमन शिव्या द्यायला ती विसरली नाही. तो आत येताच लिंडा उठून उभी राहिली "फ्रेंड्स.....!! हे आहे  आकर्षण आजच्या महिलादिनाचे.." असे म्हणून कोपऱ्यातील डीजे चालू केला.त्याबरोबर त्या तरुणाने शरीराला झटके देत नाचायला सुरवात केली . एका कसलेल्या डान्सरप्रमाणे त्याच्या हालचाली होत्या.सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले तर काहींनी तोंडावर हात ठेवले.
" येस ....!! नेहमी पुरुष पार्टी करतात आणि स्त्रीला आणून नाचवतात .आज आपण एका पुरुषाला नाचावयाचे आहे .नाचो .... !! असे म्हणत लिंडाने दहा रुपयांच्या नोटा त्याच्यावर उडवल्या . आता सर्वजणी सावध झाल्या आणि त्यांनीही भाग घ्यायला सुरुवात केली .हळू हळू त्या तरुणांच्या अंगावरचा  एक एक कपडा दूर होऊ लागला.
अर्धी रात्र संपल्यावर लिंडाने विचारले "कोणाला हवा आहे का हा ....??? की घरी पाठवू ...."?? क्षणार्धात करिष्माने हात वर केला . ती एका मल्टिनॅशनल कंपनीत एसिक्युटिव्ह होती . दिल्लीची राहणारी . तिने हळूच त्याला डोळा मारला आणि बेडरूममध्ये घेऊन गेली. बाकीच्या रात्रभर धुडगूस घालून पहाटे झोपी गेल्या .
दुसऱ्या दिवशी दुपारी करिष्माला घरून आईचा फोन आला "तेरे लिये लडका धुंडा है .... मुंबईमें ही रहता है. किसीं अच्छे सर्विस इंडस्ट्रीमें काम करता है . दिखनेमे भी हँडसम है . फोटो और पता भेज रही हु . जाके मिल ले ....".तिने खुश होऊन व्हाट्स अप उघडला आणि काल रात्रभर आपल्याबरोबर मजा मारलेल्या तरुणाला पाहून कपाळावर हात मारला .
© किरण कृष्णा बोरकर

Saturday, March 9, 2019

महिलादिन

महिलादिन
"आज जागतिक महिलादिन आहे म्हणे...."?? चहाचा कप माझ्या हातात देताना सौ.ने विचारले.मी तात्काळ चहाचा कप तिच्या हातून घेतला आणि नंतर हो.... म्हणालो.
"म्हणजे नक्की काय.... .?? काय असते या दिवशी.. ??  माझ्याइतकेच अज्ञान माझ्या बायकोला पाहून मी आनंदलो आणि क्षणात माहीत नाही म्हणून उत्तर दिले "म्हणजे आजचा दिवस महिलांना समर्पित आहे.. त्यांचा आदर राखण्यासाठी सन्मान करण्यासाठी आजचा दिवस". मी भीतभीतच  उत्तर दिले.
" मग उद्यापासून परत आहे तेच चालू का...... ?? शेजारची अनिता पुन्हा नवऱ्याच्या शिव्या खाणार . मला उद्याही चक्कीवरून दळण आणावे लागेल.फायदा काय या महिला दिनाचा.." ती मान उडवत म्हणाली.अर्थात ती अशी मान उडवत बोलते तेव्हा कमालीची सुंदर दिसते हे मान्य करायलाच पाहिजे .
"मी काय म्हणते...!! हल्ली स्त्रिया जवळजवळ पुरुषांच्या बरोबरीने काम करतात .मूल जन्माला घालणे आणि मासिक पाळी अश्या  एक दोन गोष्टी सोडल्या तर सर्वच बाबतीत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीत आहे . मूल जन्माला घालणे हे सर्व प्राण्यांच्या बाबतीत मादीचेच काम आहे . आज सैन्यात....मेडिकल..अर्थशास्त्र अश्या विविध  क्षेत्रात स्त्रियाही पुरुषांबरोबर काम करतात. मग महिलादिन साजरा करून त्यांना वेगळे का करता..."??तिचा आवाज चढला तसा मात्र माझा धीर सुटू लागला . रात्रीचे जेवण मिळेल की नाही याची काळजी वाटू लागली.
"अग तसे नाही... पूर्वी स्त्रियाना कमी दर्जाची वागणूक मिळत होती.त्यांना हलके समजत होते.
" हो पण आता समजत नाही ना ...?? हल्ली एकीच्यामागे अनेक बायका आणि त्यांच्या संघटना उभ्या राहतात आणि स्त्रियाही पुरुषांची बरोबरी करण्यासाठी काहीही करतात . आता त्या नीलम बारमध्ये काही तरुणी रोज दारू पीत बसलेल्या असतात. बाजूला सर्व पुरुष असतात त्याचे त्यांना काहीच वाटत नाही".
"तुला कसे कळले हे ...??? मी आवाज चढवून म्हणालो.
"झाले .....!! झाले सुरू तुमचे .. इतकी वर्षे झाली बायकोवर  विश्वास नाहीच.आहो…. त्या बारच्या समोर बसलेल्या भाजीवाल्याकडून कधी कधी भाजी घेते तेव्हा दिसते ना समोर काय चालू आहे..??? मस्तपैकी त्या बायका पीत असतात. इतकेच काय काही बायका गर्दीत पुरुषांच्या अंगावरून हात ही फिरवतात म्हणे . उलट म्हणतात पुरुष जे काही काही करतात ते आम्ही करतो.लोकल ट्रेन तर बायका चालवतातच  आता तर एस टी ही चालवणार म्हणे . मग कशाला महिलांचा वेगळा दिवस.
" तू म्हणतेस ते बरोबर आहे ...पण पूर्वीपासून चालू आहेत हे दिवस आणि आपला देश पुरुषप्रधान आहे त्यामुळे महिला दिन हे वेगळेपणाचे ठरते.ते जाऊदे तू आपल्या रात्रीच्या जेवणाचे बघ".असे बोलून गुपचूपपणे बाहेर सटकलो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, March 6, 2019

बहुरूपी

बहुरूपी
अंगाला निळा रंग फासून.... गळ्यात रबराचा नाग गुंडाळून ....डोक्यावर जटांचा टोप आणि हातात त्रिशूल घेऊन तो दारोदारी फिरत होता.नेहमीचे होते ते त्याचे. कोणाचा दिवस असेल तर त्याचे वेषांतर करायचे . शनिवार मारुती... तर मंगळवारी गणपती.. हीच तर कला होती त्याच्या अंगात .हातातल्या त्रिशूळाने अंगावर येणाऱ्या कुत्र्यांना हाकलत तो घरोघरी जात होता .आज भरपूर भिक्षा मिळेल याची खात्री होती त्याला. पण पहिल्या चार घरातच भ्रमनिरास झाला.
"अरे... आज उपवास... आज खाना नही बनाया.. अशी उत्तरे ऐकू आली.म्हणजे आज काही खरे नाही तर... डोळ्यासमोर बायको आणि हात हलवून टाटा करणारी पोर आठवली.
"आज रस्त्यावर भीक मागावी लागणार नाही ना ...?? असा विचार मनात येताच तो शहारला .. तो भिकारी नव्हता तर बहुरूपी होता. आपली कला वेगवेगळ्या रुपात सादर करून त्याचे बक्षीस घेणे हेच त्यांचे काम.फिरत फिरत तो रस्त्यावर आला तसेही मोठमोठ्या सोसायटीत त्याला बंदी होती आता रस्त्यावरील माणसेच त्याचा सहारा. येणारी जाणारी माणसे त्याच्याकडे बघत पुढे जात होती .काहींनी खिश्यात हात घालून एक दोन रुपये त्याच्या हातावर ठेवले . न रहावून त्याने तांडव करायला सुरुवात केली . रिकामटेकडे उभे राहून ते पाहू लागले तर घाईघाईने जाणाऱ्यांच्या कपाळावर आठ्या आल्या . शेवटी ट्रॅफिक हवालदार आला आणि त्याने हुसकावून लावले . कंटाळून शेवटी तो देवळाजवळ आला.
आज महाशिवरात्र होती.देवळात गडबड दिसत होती . तो पायऱ्यांवर थबकला. एकाने दिलेला प्रसाद तोंडात टाकून कट्ट्यावर बसला.
"अरे वा एकदम महादेवच दिसतोस...."शेजारून आवाज आला तसे त्याने वळून बघितले .एक सहा फुटी  राकट चेहऱ्याचा माणूस त्याच्याकडे पाहून म्हणाला . बोलता बोलता तोंडातली सिगारेट काढून त्याच्यासमोर धरली.
" नको मला ..."तो म्हणाला.
" मग काय चिलीम देऊ ..?? तो खवचटपणे म्हणाला.
"मी नाही ओढत ... त्याने कसेनुसे हसत सांगितले.
" अरे सोंग घेतोस ते पूर्ण घे .. चिलीम इथे मिळत नाही नाहीतर तीच दिली असती तुला ..."असे म्हणून तो मोठ्याने हसला. "भूक लागली ....""?? त्याने मान हलवली .
"तिथे बघ... किती खायला आहे. पण ज्याला गरज आहे त्याला काहीच नाही.. गाभाऱ्यात बोट दाखवून तो म्हणाला.घे..... असे बोलून एक दुधाची पिशवी चार भाकऱ्या त्याच्या हाती दिल्या.
"पण तुम्हाला ...?? त्याने भाकरी हातात घेऊन विचारले.
" अरे मला आज भरपूर आहे .. इथे प्रत्येकाचा एक दिवस असतो.आजचा दिवस माझा आहे . असे बोलून तो उठला.
"आहो तुमचे नाव काय...??? राहता कुठे ....?? त्याने विचारले. तसा तो शांतपणे वळला नजर रोखून म्हणाला" रुद्र माझे नाव .पलीकडच्या स्मशानजवळ राहतो. कधी आलास तर ये भेटायला .."आणि दमदार पावले टाकीत चालू पडला.
हातातील वस्तू पाहून त्याला भुकेची जाणीव झाली त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचीही... लगबगीने तो घराकडे वळला.
घरात शिरताच बायकोने विचारले कुठे होतात आज इतका वेळ.... चला नमाजाची वेळ झालीय.  मी वाट बघतेय . काही न बोलता त्याने  आपला मेकअप  उतरवला आणि मुलाला घेऊन मशिदीची वाट धरली.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

द लकी लूझर..... अर्ल स्टॅनले गार्डनर

द लकी लूझर..... अर्ल स्टॅनले गार्डनर
अनुवाद.... बाळ भागवत
मेहता पब्लिकेशन
( पेरी मेसन रहस्यकथा )
पेरी मेसनला एका केसच्या सुनावणीसाठी कोर्टात प्रेक्षक म्हणून हजर राहण्यासाठी अज्ञात स्त्रीकडून फी दिली जाते. ती केस आहे हिट अँड रनची.आरोपीला याबद्दल काहीच माहिती नाही. पोलीस जेव्हा त्याच्याकडे आले तेव्हा तो झोपेतून उठला होता.दारूच्या नशेत काय घडले हे त्याला आठवत नाही. आरोपी एका प्रचंड उद्योगांचे साम्राज्य असलेल्या व्यक्तीचा पुतण्या आहे .भविष्यात तोच हे सर्व सांभाळणार आहे . त्याच्या विरुद्ध एका साक्षीदाराने प्रचंड आत्मविश्वासाने साक्ष दिली आहे आणि त्यावरूनच ती खोटे बोलतेय अशी मेसनची खात्री झालीय . काही कारणाने पुढे ती केस पेरी मेसनकडे येते . आता पेरी मेसनपुढे आरोपीला निर्दोष सोडविण्याचे आव्हान आहे . पेरी मेसन हे आव्हान स्वीकारेल . मुळात एकदा मृत्यू झालेल्या माणसाचा पुन्हा कसा मृत्यू होऊ शकतो . मग खून झालेली व्यक्ती कोण आहे . एक शुल्लकसा दुवा ही पेरी मेसनला हे कोडे सोडविण्यास मदत करेल . पण कसे .....???

Sunday, March 3, 2019

स्टेट ऑफ फिअर... मायकल क्रायटन

स्टेट ऑफ फिअर... मायकल क्रायटन
अनुवाद ..... डॉ. प्रमोद जोगळेकर
मेहता पब्लिकेशन
पर्यावरण दहाशतवाद म्हणजे नक्की काय ...??
आज जगभरातील औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायू मोठ्या प्रमाणात सोडला जातोय . त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होतेय.त्यामुळे पृथ्वीवरील बर्फ वितळून पाण्याची पातळी वाढेल .मग महापूर ..चक्रीवादळ... सुनामी ..अशी नैसर्गिक संकटाची वाढ होईल.
यात पहिला धोका आहे तो पॅसिफिक महासागरातील वानुटू या बेटाला. समुद्रसपाटीपासून अवघे काही इंच वर असलेले हे बेट प्रथम पाण्याखाली जाईल . म्हणूनच ते राष्ट्र अमेरिकेवर खटला भरण्याच्या तयारीत आहे .अमेरिकेतून सर्वात जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सोडला जातो असा त्यांचा दावा आहे . अमेरिकेतील  एन. इ.आर. एफ. ही  पर्यावरणवादी संस्था या खटल्यात  वानुटू राष्ट्राला मदत करणार आहे . पण प्रत्यक्षात हा खटला दाखल झाला नाही उलट त्या खटल्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणारे अचानक गायब झाले किंवा मारले गेले .एन .इ. आर. एफ. ने पर्यावरणाला असणारा धोका जगाला पटवून देण्यासाठी एक परिषद कॅलिफोर्नियात आयोजित केली आहे .त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे .  त्याचवेळी ह्या संकटाचा धोका किती आहे हे पटविण्यासाठी पर्यावरणवादाचे दहशतवादी कृत्रिमरित्या सुनामी लाट निर्माण करून ती कॅलिफोर्नियाच्या दिशेने जाईल अशी योजना करतात . त्यांनी निर्माण केलेली ही सुनामी आता ताशी आठशे किलोमीटर वेगाने कॅलिफोर्नियाच्या दिशेने प्रवास करतेय . जगातील पाच माणसे ह्या संकटाचा सामना करतायत . या मानवनिर्मित नैसर्गिक आपत्तीपुढे ते यशस्वी होतील का ....?? एक अतिशय वेगळा विषय थरारक आणि उत्कंठावर्धकपणाने मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे .