Saturday, July 4, 2020

लॉकडाऊन ...७

लॉकडाऊन... ..७
ऑफिसच्या कामानिमित्त तो परदेशात गेला होता.तसे त्याच्यासाठी हे नवीन नव्हते.महिन्या दोन महिन्यातून तो असाच कुठेतरी टूरवर जायचा.घरच्यांनाही त्याची सवय झाली होती.
यावेळी थोडे गणित बिघडले.अचानक भारतात लॉकडाऊन सुरू झाले आणि परदेशी विमानप्रवासाला बंदी आणली.
 तो तिथेच अडकला.काम तर संपले होते. इथेही लॉकडाऊन सुरू होता. त्यामुळे हॉटेलच्या बाहेर पडायला बंदी होती.
नाईलाजाने त्याचे मोबाईलवर खेळ सुरू झाले . अचानक त्याला फेसबुकची आठवण झाली या कामाच्या गडबडीत बरेच महिने त्याने फेसबुक उघडले नव्हते.आज वेळ आहे तर सर्फिंग करूया....मनात येताच त्याने फेसबुक उघडले .बापरे ...!! इतक्या नोटिफिकेशन ...??
काही महिन्यांपूर्वी त्याने एक ड्रॉईग दोन तीन ग्रुपवर पोस्ट केले होते. त्याच्या हाताला वळण होते . छान चित्र काढायचा तो .त्याच चित्रावर बऱ्याच कॉमेंट दिसल्या त्याला.आता कॉमेंट आल्या म्हणजे रिप्लाय देणे आलेच..हळूहळू तो प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय देऊ लागला. अचानक एका कॉमेंटवर तो थबकला . त्याच्या चित्रावर तिने एक छान चारोळी केली होती.जणू त्या चित्राचा अर्थ तिलाच कळला होता . त्याने तिला रिप्लाय केला ताबडतोब तिचा पुन्हा रिप्लाय आला.आता मात्र त्याला  राहवेना . त्याने तिचे प्रोफाइल चेक केले . प्रोफाइल फोटोत तर ती साधी ,सुंदर दिसत होती . योगायोगाने ती त्याच्याच शहरात राहत होती.
"अरे वा ....!! असे बोलून त्याने फेसबुक बंद केले . सहज चाळा म्हणून त्याने पेन्सिल हातात घेतली आणि बघता बघता समोरच्या पानावर सुंदर चित्र निर्माण झाले .
त्याने ते फेसबुकवर अपलोड केले . काही वेळाने मोबाईलवर नोटिफिकेशन आले . पुन्हा त्या चित्रावर तिची नवीन चारोळी होती. न राहवून त्याने तिला मेसेंजर केला . वाट पाहत असल्याप्रमाणे तिचे ताबडतोब उत्तर आले . पहिल्यांदा एकमेकांची स्तुती झाली आणि हळूहळू काही गोष्टी पर्सनलवर आल्या . तो आपल्याच शहरात राहतो इतकेच नव्हे तर आपल्या विभागात राहतो ते ऐकून ती खुश झाली . दुसऱ्या चॅटिंगमध्येच व्हाट्स अप नंबर शेयर झाले .या लॉकडाऊनमुळे एक चांगली मैत्रीण मिळाली याचा आनंद झाला त्याला .
ती एका सुखवस्तू फॅमिलीतील .घरात फक्त तीनच माणसे . त्यात मुलगा शिकायला अमेरिकेत गेला होता . नवरा बिझनेसनिमित्त राज्याबाहेर गेला होता .
दोन दिवसात परत येणार होता. पण अचानक लॉकडाऊन सुरू झाले. देशांतर्गत सर्वच प्रवास बंद झाले आणि  तिकडेच अडकला . मोठया घरात ती एकटीच . फारसे मित्र मैत्रिणी नव्हतेच .ती चारोळ्या करायची कधी कधी.... . पण वेळेअभावी तेही हल्ली जमत नव्हते.
 एकदा एका ग्रुपवर कोणीतरी छान चित्र पोस्ट केले होते . ती व्यक्ती कलाकार दिसत होती . न राहवून तिने चारोळी केली . पण बरेच दिवस त्याचा रिप्लाय आला नाही.
सकाळी सगळे आवरून तिने सहज फेसबुक उघडले तेव्हा नोटिफिकेशनमध्ये तिला त्याचा रिप्लाय दिसला . तिने परत त्यावर कॉमेंट केली . नंतर काही घडले नाहीच . दुपारी जेवून पुन्हा फेसबुक उघडले तेव्हा  त्याची नवीन पोस्ट अपलोड झाली होती .
किती छान चित्र काढतो हा ..?? त्यावर एक पटकन चारोळी केली . पुन्हा त्याची कॉमेंट आली . यावेळी तिने त्याचे प्रोफाइल चेक केले . साधारण तिच्याच वयाचा कदाचित दोन वर्षांनी लहान ,हसतमुख तरुणांचा फोटो होता . योगायोगाने तिच्याच शहरातील होता.
 इतक्यात मेसेंजर वर त्याचाच मेसेज आला . तिने रिप्लाय दिला . बोलण्यात कळले तो तिच्याच विभागात राहत होता . मग बोलता बोलता व्हाट्स अप नो ची देवाण घेवाण झाली . चला या लॉकडाऊन मुळे एक चांगला कलाकार आपला मित्र झाला म्हणून ती आनंदून गेली.
आज लॉकडाऊनला साधारण दोन महिने झाले . दोघेही आता बरेच मोकळेपणानं चॅटिंग करत होते . आहोजावो वरून कधी अरेतुरेवर आले ते कळलेच नाही . कधीतरी विडिओ चाट ही व्हायचे . तरी कधी चित्र चारोळ्या ही व्हायच्या . तसे दोघेही आपापल्या फॅमिलीसोबत कनेक्ट ही होतेच . मधेच तो काही प्रमाणात फ्लर्ट ही करायचा . तीही थोडी धीट होऊज प्रत्युत्तर करायला शिकली होती. संसारातील अडीअडचणी शेयर होत होतेच . आता कधी एकदा लॉकडाऊन संपतोय आणि कॉफी प्यायला भेटतोय असे झाले होते त्यांना .
आजच सरकारने परदेशी नागरिकांना भारतात आणण्याची घोषणा केली होती. तिसऱ्या दिवशीच्या फ्लाईटने तो भारतात परतला . योग्य त्या तपासण्या औषधे घेऊन तो घरी पोचला . कुटुंबासोबत काय बोलू असे झाले होते . दोन महिन्याची कसर भरून काढायची  होती.
 दुसऱ्या दिवशी तिचा मेसेज आला . इथेही काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल केले होते . तिने त्याला घरीच कॉफी प्यायला बोलावले . त्यालाही ते बरेच झाले . उगाच या वातावरणात बाहेर भेटण्यापेक्षा घरीच भेटलेले बरे असा विचार करून तो तिच्या घरी पोचला.
दार उघडताच समोर ती उभी होती. भडक मेकअप.  . विडिओवर दिसत होती त्याहून ती आकर्षक हॉट दिसत होती. त्यातही तो स्लीव्हलेस टॉप आणि टाईट लेगिंग तिच्या सौंदर्यात भर टाकत होता. तो आत येताच तिने प्रेमाने त्याला हग केले . पण तिच्या मिठीचा दाब जाणवून तो हडबडला. हळू हळू त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. पण कुठेतरी त्याला काही खटकत होते . तिची देहबोली ...बोलण्याची ढब.. ती नव्हती जी फोनवर होती. त्याने जी कवयित्री ..साहित्यिक चर्चा ..करणारी मैत्रीण पाहिली होती ती ही नव्हतीच आणि कॉफी की ड्रिंक....??  असे तिने विचारताच तो स्तब्ध झाला. हळू हळू तिच्या बोलण्याचा रोख त्याच्या शारीरिक संबंधावर घसरला . बोलता बोलता  ती कधी जवळ आली ते त्याच्या लक्षात आले नाही . आता तर ती खूपच बोल्ड बोलू लागली . सूचक हस्तस्पर्श होऊ लागले .तो भांबावला...
अचानक तिने त्याला घट्ट मिठी मारली काही कळायच्या आत तिचे ओठ त्याच्या ओठात गुंफले गेले .
ओह गॉड..... हे त्याला अपेक्षित नव्हते . तो तिला एक चांगली मैत्रीण समजत होता . हळुवार मनाची एक कवियत्री . वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणारी. सुशील त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे समस्येचे तिच्याकडे उत्तर असायचे . लॉकडावूनच्या काळात आपल्याला आधार देणारी एका जवळच्या मैत्रिणीप्रमाणे धीर देणारी हीच का ती .....??. प्रत्येक पुरुष स्त्रीकडे केवळ शारीरिक  सुखाचीच अपेक्षा ठेवतो का ...??  एका मित्राप्रमाणे ती त्याची मैत्रीण होऊ शकत नाही का ....?? हिने ही आपल्याला त्या दृष्टीनेच पाहिले का ...?? त्याला  एक अनपेक्षित धक्का बसला.आताचे तिचे हे रूप  पाहून त्याचा भ्रमनिरास झाला.
 तिला मिठीतुन वेगळे करून तो उठला आणि दुखऱ्या मनाने बाहेर पडला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

मुंबईकर आणि कोरोना ..१

मुंबईकर आणि कोरोना....१
आयच्या xx या चीनच्या ... वाट लावून टाकलीय सगळ्यांची .घरी बसवून ठेवलंय सगळ्या देशाला .तरी नशीब ते फॉरेनर्स दिवाळीच्या आधीच कंपनीत येऊन गेले .नाहीतर आता माझ्या हातावर  होम कॉरेंटईनचा शिक्का बसला असता आणि आख्खी बिल्डिंग माझ्यानावाने बोंब मारीत रिकामी झाली असती.त्यांची सेवा करायला ही मीच भेटलो म्हणा.....का..?? तर नवीन मशिनरी माझ्या डिपार्टमेंट मध्ये लावणार होतो ना .... ?? तुम्हाला सांगतो.. अजूनही आपण या परदेशी लोकांना खूपच डोक्यावर बसवून ठेवले आहे. त्या दिवशी त्यांच्या सिगारेट संपल्या म्हणून मला आणायला सांगितल्या त्यांनी .... मला .. या कोकणी माणसाला ....??  अरे तुमची गुलामी करण्यासाठी हा माणूस कोकणातून इथे आला नाही .चांगली दीड एकर शेती आहे माझी . नोकरीवर लाथ मारून गावी जाईन केव्हाही ...शेवटी किसन पाटील कडून विड्याचे बंडल घेऊन त्यांना दिले आणि सांगितले try new brand .. दोन दम मारताच खुश झाले . जाईपर्यंत विड्याच पीत होते . किसनचे पण भले झाले ..
तर मी काय बोलत होतो त्या चिन्यांनी कोरोना विषाणू आणला आणि आख्ख्या जगाची वाट लावली .जगाची जाऊ द्या हो पण आमच्या मुंबईची वाट लागली त्याचे काय ....?? लोकल बंद ...... अरे स्वप्नातही विचार करू शकत नाही मी ... हा आता कधी कधी 8.40 रद्द होते पण 8.44 असते ना .. तितके ऍडजस्ट करतो हो आम्ही .पण संपूर्ण लोकल बंद .... तेही 21 दिवस ...
विमानसेवाही बंद केली म्हणता... त्याने मला काय फरक पडतोय हो.. मी काय रोज रोज  विमानाने जातो का ....?? मी चाकरमानी  लोकलने प्रवास करणारा आणि ती ही चौथी सीट ... तुम्हाला सांगतो नऊ ची ड्युटी आहे माझी पण पंच 9.12 ते 9.13 च असतो . साहेब टपून बसलेत कधी ह्याचा 9.16 ला पंच होईल . पण आमच्या लोकलने कधीच मला दगा दिला नाही .
आता लोकल बंद म्हणजे देशपांडेकडून फुकट वाचायला मिळणारा सामना बंद.. सावंतच्या डब्यातील भजी पराठे बंद ... तर स्वामींच्या राजकारणावरील चर्चा ही बंद .ते सोडा ... स्टेशन मधून बाहेर पडताना समोरून हसत येणारी गोखले बाई ही दिसायची बंद ....देवा  कसली ही शिक्षा देतोय आम्हाला...
आता हे वीस दिवस घरी राहून करू काय .....?? आधीच सुट्टी घ्यायची सवय नाही . घराबाहेर थोडे जास्त फ्री असतो हो आपण . आणि काही करायचे असेल तर ऑफिसच्या नावाखाली खपून जाते .म्हणजे आता त्या दिवशीचेच बघा ना ... प्रल्हाद मोरेने आजोबा झाल्याची पार्टी दिली .एक दिवस आणि रात्र अलिबागला रिसॉर्ट बुक केले. घरी सांगितले असते तर किती हंगामा झाला असता... आहो युद्धच ... मग काय इन्स्पेशनचे  कारण सांगून पार्टीला गेलो .घरची काही कामे ही ऑन ड्युटी करता येतात .मागच्या महिन्यात समीर दादांच्या पोराचे लग्न ऑन ड्युटीच अटेंड केले होते . बँकेची कामे ही होतात . 
आजच पहिला दिवस आहे लॉकडाउनचा .. कालच पोरांना दम दिलाय बाहेर गेलात तर तंगड्या तोडून ठेवीन . पण त्यांनी माझ्याकडे विचित्र नजरेने का पाहिले तेच समजत नाही . रात्री झोपताना सौ. म्हणाली ती घरातच असतात मोबाईलवर तुम्हीच उकिरडे फुंकत असतात. च्यायला हे असं होय ...बघतोच उद्या..
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ...६

लॉकडाऊन ....६
पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केले आणि दुसऱ्या दिवशीपासूनच तो घरी बसला.
त्याची कामावरची वेळ म्हणजे सकाळी साडेसहाला बाहेर पडायचे  आणि रात्री जेवायलाच घरात शिरायचे. घरी काय चालू त्याच्याकडे लक्षच द्यायचे नाही.काम नसेल तेव्हा मित्रांबरोबर बसणे आलेच.मग रात्री जेवून बेडवर पडले की दिवसभर काय घडले याचा वृत्तांत सौ.कडून ऐकत झोपून जायचे.
 पाहिले काही दिवस छान गेले.सौ.ला नवीन नवीन पदार्थ बनवायची ऑर्डर सोडायची.मुलाच्या हातातून रिमोट हिसकावून घेऊन आवडते चॅनेल लावायचे. आईला सतत काहीतरी सूचना द्यायच्या.
काही दिवस सर्वांनी समजून घेतले पण हळूहळू सर्वांना त्रास होऊ लागला . त्याच्या घरात असल्यामुळे इतर सर्वांचा दिनक्रम बिघडला. 
हळूहळू कुरबुरी सुरू झाल्या.सासूसून किती काळ शांत राहणार...??
आता सकाळीच पहा ना... दोन कळश्या भरल्या नाही म्हणून सुरवात झाली आणि त्याचे पर्यवसान वादात झाले.झोपमोड झाली म्हणून हा मध्ये पडला.किती फालतू गोष्टींवरून वाद घालतेस म्हणत सौच्या अंगावर धावून गेला .सौ.ने तो राग मुलावर काढला . अंगावरचे पांघरूण जोरात खेचून तिने मुलाला उठविले.अचानक काय झाले हे न समजून तो डोळे चोळत उठला.मग दिवसभर घरात तणावग्रस्त स्थिती होती . हळूहळू हे रोजच होऊ लागले.घरात कोणाचेही वाद सुरू झाले की हा मध्ये पडायचा.मग त्याचा राग कोणावरही निघायचा .  
"शी. ..!!  किती छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे करतात ही ..." रिमोट मुलाच्या हातातून घेत तो पुटपुटला.
"आई सर्व आटपून बेकिंग क्लासला जाते . तिचा तिथे छान ग्रुप झाला आहे .रोज काहीतरी नवीन डिश बनवून आणते.आजी दुपारी सोसायटीच्या नानानानी पार्कमध्ये जाते . तिथे ते गाणी म्हणतात. हसतात . चहापाणी करून संध्याकाळी परत येते. माझे कॉलेज.. नंतर क्लास....  दिवस कसा जातो तेच कळत नाही .पण ह्या लॉकडाऊन मुळे सर्वच ठप्प झाले आहे .." मुलाने शांतपणे सांगितले.त्याने फक्त मान डोलावली . 
संध्याकाळी सौ.ने  त्याच्या हातात पिशवी आणि सामानाची लिस्ट दिली ."मिळेल ते घेऊन या .. "असे बोलून पुन्हा किचनमध्ये गायब झाली .'ही दिवसभर किचनमध्ये काय करते ..."?? बरेच दिवस त्याला प्रश्न पडला होता.
रस्त्यावर तर बऱ्यापैकी गर्दी होती .आयला हेच का लॉकडाऊन ...?? लोकांना कितीही समजावले तरी बाहेर पडणारच. लिस्टमधील मिळतील त्या वस्तू त्याने पटापट घेतल्या . किमती पाहून दोघीही चिडणारा याची खात्री होतीच त्याला पण इलाज नव्हताच.
कॉम्प्लेक्सच्या कोपऱ्यावर ती उभी होती.  थोडा कळकट फ्रॉक ..केसांच्या दोन वेण्या कशातरी बांधल्या होत्या . बारा वर्षापेक्षा जास्त वय वाटत नव्हते . हातात मोगऱ्याचे दहा बारा गजरे होते . पण विकत घेण्यासाठी कोणाला फोर्स करीत नव्हती. फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांना दाखवीत होती. काहीजण हसून तर काही या परिस्थिती कोण गजरे घेणार ..?? असा भाव चेहऱ्यावर आणून पुढे  जात होते.
तिने त्याच्यापुढे ही गजरे धरले . "घेणार ..."?? तिने हसून विचारले .
"अग पोरी... या परिस्थितीत कोण घेईल गजरे...?? सगळ्या स्त्रिया घरात बसून आहेत..."तोही हसत म्हणाला.
" सकाळपासून तीन चारच विकले गेले . अजून चार पाच गेले तर जेवणाची सोय होईल आमची . आमचा हाच धंदा आहे .." तिने निरागसपणे सांगितले.
तो आतून कुठेतरी हलला . हे घेऊन घरी गेलो की आणखी चार शब्द ऐकायला लागतील याची खात्री होती त्याला . पण त्या छोटीचा निरागस चेहरा समोर दिसत होता .शेवटी  त्याने तिच्याकडून चार गजरे घेतलेच . तिने सांगितलेली किंमत देऊन तो सोसायटीत शिरला.
घरी वातावरण शांतच होते. हातातली पिशवी ओट्यावर ठेवत त्याने सौ.कडे नजर टाकली. ती शांतपणे कणिक मळत होती. किती वर्षे तिची थट्टा केली नाही आपण ...?? त्याने स्वतःला प्रश्न केला. 
"बॉबी मधली डिंपल आठवली .. "तो हळूच तिच्या कानाशी कुजबुजला.तिने चमकून त्याच्याकडे पाहिले तिच्या नजरेत राग होता पण त्याच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून ती थंड झाली आणि एक हलके हसू चेहऱ्यावर उमटले.
"येताना काही घेऊन आला नाहीत ना .."?? तिने अंगठा  तोंडाशी नेऊन विचारले.
त्याने खिशातून गजऱ्याची पुडी काढून तिच्या हातात दिली.
"हे काय आता ...?? गरज होती तेव्हा कधी आणले नाही.सध्या खायला पुरेसे सामान नाही मिळत आणि तुम्हाला हे बरे सुचते.घर कसे चालवते माझे मला माहित ..." तिच्या तोंडाचा पट्टा चालू झाला आणि तो हिरमुसला होऊन बाहेर आला.
रात्रीचे जेवण शांततेत झाले. तो ताबडतोब बेडरूममध्ये जाऊन झोपला .सौ रात्री कधी येऊन बाजूला झोपली ते कळलेच नाही.
सकाळी घरातील गडबडीने त्याचे डोळे उघडले . बाहेर आई ..मुलगा..सौ यांची थट्टा मस्करी चालू होती. सगळे हसत होते. मुलगा काहीतरी सौ ला सांगत होता .न रहावून तो हॉलमध्ये आला आणि डोळे विस्फारून समोर पाहू लागला.
 समोरच सौ. नवीन साडी ,छानसा हलका मेकअप करून खिडकीजवळ उभी होती . मुलगा हातात मोबाईल घेऊन सूचना देत  वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत होता . आई  सोफ्यावर बसून कौतुकाने तिच्याकडे पाहत होती. प्रत्येक पोजमध्ये  केसात माळलेले गजरे समोर येतील याची काळजी ती घेत होती .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन नंतर ...१

लॉकडाऊन नंतर ..१
स्थळ.... मुंबईतील एक मध्यमवर्गीय वस्ती 
शंकर सुर्वे नेहमीप्रमाणे उशिराच घरी आला . लॉकडाऊन संपल्यावर त्याचे घरी उशिरा येणे चालू झाले होते.
अडीज महिने लॉकडावूनचे दिवस त्याच्या दृष्टीने भयानक होते . बायकोने सर्वांना धीर देऊन मिळेल त्या साधनात घर चालविले होते.
 आता त्याची पाळी होती . आज तो घरात शिरला तेव्हा मुलं जागीच होती . काहीतरी ऐकावे लागणार हे तो समजून गेला.
"ओ बाबा .. ह्या वर्षी गणपतीत जाऊचाना  गावात ...?? मोठ्याने विचारले.
"दरवर्षी जाताव.. मग नवीन काय ..?? छोटी म्हणाली."बाबांनी तिकीट काढलान की नाय ..?? नायतर दरवर्षी गर्दीत घुसून जाताव. माझे पाय आणि कंबर दोन दिवस दुकतत.
".या वर्षी गणपतीत गावी जाऊचा नाय.आपलो गणपती हयच..." शंकर शांतपणे म्हणाला.
 तसे बायको आणि पोराने चमकून त्याच्याकडे पाहिले.
 त्याने मुलीला जवळ घेतले.
" अडीज महिने घरात बसून होतो.कंपनी बंद . तरीही कंपनीने पगार दिला.संकटकाळी आपल्या मागे उभी राहिली . आज कंपनीला नुकसानीतुन बाहेर काढायचे आहे . त्यासाठी आम्ही चार तास जास्त काम करतोय तो ही विना मोबदला . आम्ही फक्त कष्ट करू शकतो आणि तेच करतोय कंपनीसाठी . अश्यावेळी पुन्हा सुट्टी घेऊन गावी जाणे मनाला पटत नाही . इतकी वर्षे गणपतीला जातोय . एक वर्ष नाही गेलो तर देव रागावणार नाही .  पुढचे वर्ष आहेच की . पण आज जे आपल्याला पोळी भाजी देतात त्यांना आमची गरज आहे . माझे ठीक आहे पण कंपनीत असे कितीतरी कामगार रोजंदारीवर काम करतात . त्यांना तर पैसे मिळालेच नाही . म्हणून आम्ही काही मित्रांनी बाहेरची कामे घेतली आहेत .  सुट्टीच्या दिवशी बाहेर मिळतील ती कामे करून येणारा पैसा त्यांना देणार आहोत . शेवटी गेली अनेक वर्षे आमच्या सोबत काम करतात" शंकर भावुक होऊन म्हणाला.
"ठीक आहे बाबा ... या वर्षी आम्हाला गणपती ..दिवाळीत कपडे नको . तेच पैसे त्यांच्यासाठी वापरा..".मुलगा म्हणाला.
"उद्या सकाळीच सुदामभाऊना फोन लावून सांगा यावर्षी आमाक जमुचा नाय. त्यापेक्षा चार गोणी तांदूळ जास्त पाठवा .. हयसर गरिबांक वाटू..आपल्या गरजेक जे उपयोगी पडले त्यांका देऊन नको काय ..", बायको म्हणाली.
दुसऱ्या दिवशी शंकर कामावर हजर झाला . त्याला पाहतच मी म्हणालो.." शंकर शेठ.. गणपतीला जाणार ना यावर्षी . सुट्टी टाका  पटकन .."
"साहेब यावर्षी सुट्टी नको .त्यापेक्षा आपला कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या अंबादासला सुट्टी द्या .  तो गणपती छान  रंगवतो . त्याचे काम मी करेन . बिचाऱ्याचे जास्त पैसे सुटतील...".शंकर हात जोडून म्हणाला .
मी हसत हसत त्याच्या खांद्यावर थाप मारली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ...५अ

लॉकडाऊन ...५ अ
रात्री आठची वेळ. त्या वस्तीत कमालीची शांतता होती..तशीही ती वस्ती शहरात असूनही  इतरांपासून अलगच होती.
 सामान्य माणूस त्या वस्तीपासून दूरच राहायचा . वस्तीतील माणसेही गुप्तता पाळून राहत होते.
 तसे तिथे फक्त एकच प्रकारचे लोक राहत होते .ते ना पुरुष होते ना स्त्री...
खरे आहे ... ते तेच होते .. नाव उच्चारले की सर्वसामान्य माणसाला भीती वाटायची . त्यांचे विचित्र हावभाव ,त्या विशिष्ट प्रकारच्या टाळ्या वाजवून अश्लील बोलणे . बिनधास्त वागणे.ह्यांना कुठेही फिरण्यास आडकाठी नव्हती . कोणत्याही ट्रेन बस रस्त्यावरील गाड्यामध्ये हात पसरून पैसे मागायचे . काही लोक त्यांची टिंगल करत तर काही घाबरून त्यांना पैसे देत . पण आज लॉकडाऊन मुळे ती वस्ती घरातच बसून होती .
तो ही त्याच वस्तीतील एक .. ट्रेनमध्ये फिरून टाळ्या वाजवत पैसे मागायचा . न देणार्याला ही आशीर्वाद द्यायचा  तर देणाऱ्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवयाचा . कधी कोणाच्या मागे लागणे नाही . ट्रेन बंद झाल्यामुळे तो ही घरातच बसून होता . घर म्हणजे साधी पत्र्याची खोली होती . त्यात ते चार जण होते . हे दोघे सिनियर आणि त्यांचे दोन शिष्य .
इथे फक्त एकच नाते होते गुरू शिष्याचे . प्रत्येकजण आपल्या शिष्याला आपल्या पंथाचे ज्ञान देत होता . नियम समजावून देत होता .
 लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते घरातच बसून होते . आता बाहेरील समाजाला त्यांच्याकडे लक्ष  देण्यास वेळ नव्हता . जो तो आपली सुरक्षितता जपत होता .
त्या दिवशी तो घरातून बाहेर पडला तर नाक्यावरील पोलीस त्याच्यावर धावून आला . ए चल निघ इथून ,साले आले टाळ्या वाजवायला .. तो हिरमुसला ..चेहरा पाडूनच घरी आला.
आम्हाला पोट नाही का ..?? अजूनही आम्हाला वेगळी वागणूकच मिळणार का ..?? तो विचार करू लागला .
"अण्णा उद्या तांदूळ आणावे लागतील . दोन दिवस पुरतील इतकेच आहे ..".त्याचा शिष्य डबा उघडून म्हणाला.
 आता तर बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता . तो उठला पिशवी हातात घेऊन बाहेर पडला.
आज रस्त्यावर दुसराच साहेब उभा होता . पण तो ही धावत अंगावर आला ..." चल निकल यहा से .. "काठी घेऊन तो अंगावर आला . 
"मारा मला... मारा... नागडे करून मारा .. थांबा मीच कपडे काढतो....." असे बोलून तो साडी सोडू लागला.
."ए चूप... क्या कर रही हो .. त्या साहेबाने लाजेने डोळे मिटले.
" जा.. कुठे जायचे तिकडे .." तो चिडून म्हणाला .
तीने वाण्याकडे जाऊन  रांगेत उभे राहून तांदूळ आणि साखर घेतली . येताना  पुन्हा त्या अधिकाऱ्याकडे पाहिले यावेळी तो हसत त्याच्याकडे पाहत होता . 
"एक काम करशील .."?? त्याने विचारले .
"साहेब ...दोन घास पोटाला मिळाले तर काहीही करू ....."त्याने पोटावर हात मारून उत्तर दिले .
"रोज सकाळी इथे येऊन उभे राहायचे आणि या  मॉर्निंग वॉक आणि फुकट फिरणाऱ्यांच्या मागे लागायचे. त्यांना स्पर्श न करता काहीही करून पळवून लावायचे . दुपारचे जेवण आम्ही देऊ . खूप लोड आहे इथे आमच्यावर . लोक सांगून ऐकत नाहीत . तुम्हाला तरी घाबरतील....." त्या अधिकाऱ्याने विचारले .
" आम्ही चारजण आहोत साहेब .तुम्ही सांगाल तिथे..पाहिजे तितका वेळ उभे राहू ..फक्त जेवणाचे बघा . खूप हाल होतात हो ... आमच्या वस्तीकडे कोण लक्ष देत नाही ...".तो हात जोडून म्हणाला .
"ठीक आहे . या तुम्ही चारही ....तसे तुमच्यापासून दूर राहतात सामान्य माणसे . थोडा तरी फायदा होईल . चल घेऊन ये त्यांना ... साहेबाने ऑर्डर सोडली  आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटला म्हणून तो आनंदाने घरी गेला .
त्या शोले चित्रपटात एक डायलॉग होता ठाकूर ने हिजडोंकी फौज तयार की हैं. आज हीच फौज कोरोनाच्या युद्धात खारीचा वाटा उचलण्यात सिद्ध झाली होती .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ..५

लॉकडाऊन ...५
तसा मी लॉकडाऊन फारच कडक पाळतो. पण कधीकधी नाईलाज होतो आणि खाली उतरावेच लागते.
 आताही तेच झाले. सौ.ची काही औषधे संपली आणि ती आणण्यासाठी खाली उतरलो. नशीब सोसायटीबाहेरच मेडिकल शॉप होते. मिळतील ती औषधे घेतली काही त्याच्याकडे नव्हती ..म्हटले आल्यावर फोन कर आणि परत निघालो .
तेव्हड्यात समोर तो आला . चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे मी पहिल्यांदा ओळखले नाहीच . पण ती साडी नेसायची पद्धत ,खांद्यावरील पर्स आणि मुख्य  म्हणजे ती विशिष्ट टाळी वाजवून हाक मारायची पद्धत...
" क्या भाऊ.... कैसा हैं... "?? माझ्यासमोर येऊन पुन्हा ती टाळी वाजवत तो म्हणाला.
त्याला पाहून मी उडालोच .
"तू इथे कसा ...?? आणि इथे कोण पैसे देणार तुला ...?? मी ताबडतोब सुरू झालो.
"  हो .. हो .. भाऊ ..सावकाश ... काही होणार नाही मला ...?? उलट पोलिसांच्या मदतीलाच आम्ही आलोय...?? त्याने उत्तर दिले.
 अरे वा छानच .. म्हणजे पोलिसांना ही आता तुमची गरज भासू लागली तर .....चल चहा पिणार का ...?? पण घरी नेणार नाही हा .. बाहेरच पिऊ... "मी हसत म्हणालो. 
"हा..हा..हा.. भाऊ ..!! असेही कोण आम्हाला घरात घेत नाहीत. तर या परिस्थितीत कोण घेईल ...?? पण चहा पाजाच... "तो म्हणाला.
मी सौला फोन करून थर्मासमधून चहा आणि कागदी पेले आणायला सांगितले. सोसायटीच्या गेटजवळच्या बाकड्यावर बसलो.
"मग सध्या  धंदा बंदच ना ...?? मी विचारले.
"होय भाऊ .. ट्रेन बंद ,बस बंद ,रहदारी बंद .. आम्ही तर लोकांकडे हात पसरून जगणारे .. आता लोकच दिसत नाहीत तर कोणाकडे हात पसरणार ...?? सुरवातीचे काही दिवस छान गेले पण पोटाला काहीतरी लागतेच ना .. आमच्या वस्तीतही कोण येणार ..??  स्वतःचेच करायला त्रास होतोय तर आमच्याकडे कोण येईल ....??.तो हसत म्हणाला . पण डोळ्यात वेदना दिसत होती .
"खरे आहे ..."मी सहानभूतीने म्हटले.
"पैश्याचा प्रश्न नव्हता भाऊ .. चोवीस तास आम्ही लोकांपुढे हात पसरत असतो .. 90% लोक पैसे देतात . काही घाबरून ...तर काही आशीर्वादासाठी . पण जगायला फक्त पैसेच लागतात का ...?? बाजारात गरजेच्या वस्तू कमी आहेत . डाळ भात खाऊन राहावे लागते . सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे . सामान्य माणसाचे हे हाल मग आम्ही मधलेच .. तिरस्कारणीय माणसे ..  शेवटी त्या दिवशी बाहेर पडलो . नाक्यावर पोलीस उगाच फिरणार्यांना शिक्षा करीत होते . पण चार पोलीस कितीजणांना पुरणार . लोक ऐकत नाहीत ..मॉर्निंग वॉकला बाहेर पडतात . वेळ काळ समजतच नाहीत . तो साहेब आला माझ्या अंगावर धावून मी म्हटले मारा पण वाण्याकडून डाळ साखर आणून द्या .. आणि साडी सोडू लागले तसे आजूबाजूचे सर्वच पळाले..."तो हसत म्हणाला.
मीही हसून हात जोडले .
"त्या साहेबाने पण असेच हसून हात जोडले  आणि जाऊ दिले . येताना त्याने मला बोलावले म्हणाला काय करतो घरी बसून ...?? काय करणार आम्हाला काय येतेय . तो म्हणाला  मी तुमची जेवायची सोय करतो तुम्ही आम्हाला मदत करा .. त्याने आमचा ग्रुप बनवला आणि नाक्या नाक्यावर उभे केले . जे लोक उगाच फिरत असतील त्यांना त्रास द्यायचा ,त्यांच्या मागे फिरून पळवून लावायचे . त्याबदल्यात दोन वेळचे जेवण देणार .. आयला हे तर बरे झाले ना भाऊ आमच्यासाठी . आता पाच सहा ग्रुप आहेत आमचे .पोलिसांना मदत करतात . वृद्धाना मदत करतात . सुरक्षिततेचे नियम पाळून जमेल ते करतो आम्ही .... मेलो तरी आमच्या मागे कोण आहे रडायला .... "तो मुद्दाम मोठ्याने हसत म्हणाला.
 सौ चहा घेऊन आली . मी तिची त्याच्याशी ओळख करून दिली . त्याने लांबूनच तिला आशीर्वाद दिला . मग बाकीच्या साथीदारांना बोलावून सर्वांना चहा पाजला.
इतक्यात बंड्या खाली उतरला .  त्याला पाहून चमकला.
" काय दादा कसे आहात ..?? त्याने बंड्याला हात उंचावत विचारले.
" मी मस्त .. तू काय करतोस इथे ...??  मग माझ्याकडे वळून म्हणाला .."भाऊ रक्तदान शिबिर आयोजित केलय  दिवसभरात पन्नास बाटल्या तरी गोळा करायच्या आहेत . पण या लॉकडाऊन मुळे कोण बाहेर पडत नाही हो ...?? टेन्शन आलेय ..  
 मी  खेदाने मान डोलावली.." बघू काहीतरी ..."
 तसा तो बंड्याला म्हणाला .. दादा माझे रक्त चालेल का ....?? 
"का तू माणूस नाहीस का ..?? बंड्या ताडकन म्हणाला.
 मग चला मी येतो आणि हे चार आहेतच .. फक्त जेवणाची सोय करा तीही पार्सल .वस्तीतही म्हातारे आहेत हो.त्यांची ही सोय होईल.
" जेवणाची जबाबदारी मी घेतो ... चला..." असे म्हणून बंड्या पुढे निघाला. 
तो ही उठला मला हात जोडून म्हणाला " शेवटी आम्ही ही समाजाचे देणे लागतोच ना . आज आमची वेळ आलीय ..." असे बोलून मान उंचावत बंड्याच्या मागून निघाला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ..४

लॉकडाऊन ..४
संध्याकाळी साडेसहा झाले आणि दरवाजाची बेल वाजली.त्याचक्षणी घरात एकदम शांतता पसरली.
आतापर्यंत हसत खेळत गाणी गुणगुणारी ती अचानक शांत झाली.चेहऱ्यावर भीती पसरली आणि ती आत बेडरूममध्ये पळाली. 
स्वयंपाकघरातून एक स्त्री घाईघाईत बाहेर आली...तिने दरवाजा उघडला.
दारात तो उभा होता. चेहऱ्यावर त्रासिक भाव."इतका वेळ दरवाजा उघडायला....."??  त्याने चिडून विचारले आणि आत शिरला.
" किचनमध्ये होते.. म्हणून उशीर झाला .. "बायकोने घाबरत उत्तर दिले.
"मग ती काय करतेय...."?? त्याने पुन्हा चिडून विचारले इतक्यात ती हातात पाण्याने भरलेला ग्लास घेऊन आली . त्याने रागाचा कटाक्ष टाकून त्या थरथरणाऱ्या हातातून ग्लास ओढून घेतला.ती ताबडतोब आत पळाली .
"उद्यापासुन लॉकडाऊन आहे.मी घरीच राहणार आहे.." बायकोला सांगून तो बाथरूममध्ये शिरला.तो आत शिरताच बायकोने कपाळावर हात मारला आणि आपली गरीब नजर तिच्यावर टाकली.
तो एका सरकारी खात्यात चांगल्या पदावर होता. हातात पैसा बऱ्यापैकी असल्यामुळे कधीतरी बाहेर पिणे व्हायचे . लग्न झाले आणि बायको आधुनिक विचारांची असल्यामुळे तिची कधीतरी घेण्याला हरकत नव्हती.
लग्न झाले आणि तिचा जन्म झाला  तसा तो पिसाटला. मुलगी होणे त्याला अपेक्षित नव्हते.त्यातच पुन्हा रिस्क घेऊ नका.आईला धोका होईल असे डॉक्टरांनी सांगताच तो अजून चिडला .
घरी आल्यावर बायकोला स्पष्ट सांगितले.मला ही डोळ्यासमोर नको. हिचे सर्व तूच करायचेस. माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नकोस.
 तेव्हापासून त्याचे पिणे दररोज सुरू झाले.घरी यायचे फ्रेश व्हायचे..नेहमीच्या बारमध्ये बसायचे.एक 90 चा पेग मारायचा .घरी जायचे जेवून ताणून द्यायचे . हाच रोजचा दिनक्रम झाला . रविवार असेल तर दुपारी. 
हा घरात असला की ती बेडरूममधून बाहेर पडायची नाही . आता कुठे बारावे लागले होते तिला.पण वयाच्या दहाव्या वर्षीच कळले की आपले आणि वडिलांचे संबंध ताणलेले आहेत.
कारण कळले नाही पण  नकळत्या वयातच  समजूतदार झाली ती. कारणाशिवाय वडीलांसमोर जायचे नाही .
ते असताना हळू आवाजात बोलायचे .शक्यतो समोर जायचे नाही . काही प्रॉब्लेम आला तर आईलाच सांगायचे . अश्या काही गोष्टी तिच्या मनात पक्क्या बसल्या .आणि एकदा का काही गोष्टी मनात बसल्या की पुढील गोष्टी सोप्या होतात.
लॉकडावूनचे पाहिले काही दिवस ठीक गेले.
ती आपल्या रूममध्ये अभ्यास करीत किंवा काहीतरी करीत असायची. अधूनमधून आईला मदत करायची . चुकून वडिलांच्या समोर आली तरी मान खाली घालून.
त्यानेही कधी तिला विचारले नाही.हा दिवसभर लोळत बसायचा . आता घरचा टीव्ही त्याच्या हातात गेला होता . संध्याकाळ झाली की घरचा स्टॉक बाहेर काढायचा . पण तो ही किती दिवस पुरणार ...?? शेवटी तेही संपले. 
आता मात्र त्याची चीडचीड सुरू झाली .त्यात संध्याकाळी काहीच नसल्यामुळे अजून परेशान .. बायको त्याची तळमळ पाहून तिला अजूनच जपत होती. हो कोणाचा राग कोणावर निघायचा ...?? मित्रांकडचा ही स्टॉक संपला . ती रात्र कशीबशी तळमळत काढावी लागली त्याला.
दुसऱ्या दिवशी बायकोने उठवलेच नाही.याला जाग आली तेव्हा दहा वाजून गेले होते.
काही न बोलता तो उठला. फ्रेश होऊन बाहेर आला तर  समोरच नाश्ता तयार होता. टीव्ही पाहत वेळ कसा गेला ते कळलेच नाही. संध्याकाळी बायकोने ऑर्डर सोडली . किचनच्या माळ्याची साफसफाई करूया.
 काही न बोलता त्याने मान डोलावली आणि  वर चढला . जुन्या बॅग्स ..पेपर.. काही भांडी.. सगळे खाली घेऊन तो बाहेर बसला.
"नको असलेले बाजूला काढा .. तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते..." बायकोने पुन्हा एक ऑर्डर सोडली . तो मुकाटपणे सर्व सामान चेक करू लागला.
आयला  आपल्याकडे पु. ल. ..चि .वि. जोशी. रणजित देसाई ..कुठून आले...??  त्याच्या जुन्या आठवणी चाळवल्या. 
"काय ग...!!  ही पुस्तके कोणाची आहेत ..??? त्याने ओरडून बायकोला विचारले. 
"तुमचीच आहेत ... किती वर्षे झाली त्याला ..आता ठेवा बाजूला वाचू आम्ही ... " तिने आतूनच सांगितले.
 आम्ही ....तो मनात म्हणाला मग त्याने हळूच तिच्या बेडरूमकडे नजर टाकली.दरवाज्याआडून ती त्याच्याकडे पाहत होती...भयचकित नजरेने.
 काही न बोलता त्याने पुस्तके बाजूला काढली .एके काळी त्याला  वाचनाची प्रचंड आवड होती .  किती वर्षे झाली शेवटचे पुस्तक वाचून ..?? त्याने विचार केला . चला आता वेळ आहे ..वाचून घेऊ .. 
आता संध्याकाळ वाचनात जाऊ लागली . दारूची आठवण थोड्या प्रमाणात का होईना कमी झाली.
आता त्याचे रुटीन बदलले होते .सकाळी उशिरा उठायचे . टीव्ही पाहणे , पुस्तक वाचन .मग नेमकी संध्याकाळी बायको काहीतरी काम हातात द्यायची ,. मग काम करता करता जुन्या आठवणी जागवायच्या.आपली वाचून झालेली पुस्तके ती आपल्या रूममध्ये वाचते हे त्याच्या लक्षात आले होते.
त्यादिवशी सकाळी अचानक त्याला जाग आली .काय झाले ते कळलेच नाही पण कसलातरी आवाज होता हे नक्की. डोळे उघडून पाहिले तर सहा वाजले होते.बायको ही शेजारी नव्हती.तो उठला.
तिच्या खोलीतून मंजुळ सूर ऐकू येत होते . सुरेल नाहीत पण सलग वेडेवाकडे बासरीचे सूर होते ते . त्याने हळूच तिचा दरवाजा उघडला . समोर मोबाईल ठेवून तिचे बासरी वाजवणे चालू होते . शेजारी बायको बसली होती . दरवाजात त्याला पाहताच तिची बासरी पटकन थांबली. भयचकित चेहऱ्याने ती आईच्या कुशीत शिरली.
तो काही न बोलता परत फिरला.
" रागावू नका हो ...तुम्हाला नाही त्रास होणार .आवड आहे तिला बासरी वाजवायची . मी क्लासही घातलंय . शनिवार रविवार क्लास असतो. हल्ली लॉकडाऊनमुळे तो ही बंद  मग ऑनलाईन घरीच शिकते ती .."बायको रडवेला चेहरा करून म्हणाली.
त्याने पुन्हा आत पाहिले.कोपऱ्यात ती बासरी छातीशी घट्ट धरून उभी होती . डोळ्यात भीती . कुठेतरी आतून हलला तो . इतकी भीती आपल्याबद्दल .खरच आपण इतके वाईट आहोत ..
"अजून काय काय येते तिला ...??  तसे बायकोने काही ड्रॉईग पेपर समोर केले .तिने काही चित्रे काढली होती.
"ही अशी चित्र काढतात का ..?? बोलाव तिला...तो सवयीनुसार खेकसला . 
ती खाली मान घालून त्याच्यासमोर उभी राहिली .हात पाय कापत होते तिचे.
" हे बघ..ही लाईन अशी पाहिजे .इथे डार्क कर .हा सर्कल बरोबर काढ .."?? त्याने विविध सूचना केल्या . दोघीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत उभ्या राहिल्या.
"बघता काय... मीही एकेकाळी छान ड्रॉइंग काढायचो . तीन वर्षे क्लासही केला होता . पण पुढे नाही जमले.उद्यापासून संध्याकाळी रोज दोन तास ड्रॉइंग शिकवीन मी तिला . आणि ते बासरीचे चालू राहू दे तुमचे ... "तो हसत म्हणाला .
बायकोने तिला जवळ घेत डोळे पुसले.आज लॉकडाऊन मुळे बापलेकीच्या नात्याला नव्याने सुरवात झाली हे ही नसे थोडके ....
© श्री किरण कृष्णा बोरकर