Thursday, June 15, 2023

द टेकओव्हर


द टेकओव्हर
एक कंपनी हाय टेक सेल्फ ड्राईव्ह बस लॉन्च करणार आहे.तिच्या सॉफ्टवेअर सर्टिफिकेट  क्लिअर करण्यासाठी मेल ही तरुणी आलीय.त्यांच्या सर्व्हरमध्ये जाऊन सॉफ्टवेअर चेक करताना तिला छोटा व्हायरस सापडतो जो बसमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे चेहरे स्कॅन करून त्यांचा डेटा दुसरीकडे पाठवीत असतो.
मेल ट्रोजन हॉर्स नावाचा एक सॉफ्टवेअर टाकून तो व्हायरस तात्पुरता बंद करते आणि आपल्या डेटवर निघून जाते. दुसऱ्या दिवशी रात्री तिच्यावर हल्ला होतो .नंतर एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्यात ती एका व्यक्तीचा गोळ्या झाडून खून करतेय .आता पोलीस आणि काही गुंड तिच्या मागे लागतात.
ती यातून सुटण्यासाठी आपल्या गुरुची मदत घेते.पण तो तिला वाचवेल का ??
गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ इतका स्पष्ट आहे की त्यात कोणीही चूक काढू शकत नाही.शेवटी तिलाच यातून मार्ग काढायचा आहे .
एक वेगवान हाय टेक चित्रपट आपल्याला या पाठलागात गुंतवून ठेवतो 
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, June 14, 2023

मिसिंग

मिसिंग
जून आता  अठरा वर्षाची झालीय.ती आणि तिची आई ग्रेस दोघेच राहतात..सहा वर्षाची असताना वडील ब्रेन ट्युमरने गेले.त्यांचा शेवटचा व्हिडिओ हीच तिच्याकडे असलेली वडिलांची एकमेव आठवण.
ग्रेसला आता सोशल मीडियावरून केविन नावाचा मित्र मिळालाय.ती त्याच्यासोबत कोलंबियाच्या सहलीचा प्लॅन करतेय.सोमवारी ते परत येणार आहेत त्यांनी जूनला एअरपोर्टवर बोलाविले होते.
सोमवारी जून त्यांना आणायला एअरपोर्टला गेली पण ते दोघेही आलेच नाही . तिने कोलंबियाला त्यांच्या हॉटेलमध्ये चौकशी केली तेव्हा ते सामान सोडून गेलेत असे सांगण्यात आले.
अमेरिकेत राहून  केवळ इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या मदतीने जून आपल्या आईचा कसा शोध घेत त्यातून कोणती रहस्ये बाहेर येतात हे बघण्यासारखे आहे.
इंटरनेट आणि सोशल मीडियाने आपल्या जीवनात किती खोलवर प्रवेश केलाय त्याची कल्पना आपल्याला हा चित्रपट पाहताना येते.स्पॅनिश भाषा येत नसताना जून केवळ इंटरनेटच्या मदतीने हॉटेल कर्मचाऱ्याशी स्पॅनिशमध्ये बोलते.केविन आणि ग्रेसचे पासवर्ड शोधून काढते. तासाला आठ डॉलर घेणारा एक खाजगी गुप्तहेर शोधून त्याला कोलंबियात मार्गदर्शन करते .
इंटरनेट सोशल मीडिया किती फायद्याचे आणि किती तोट्याचे आहे हे चित्रपट पाहून लक्षात येते.
चित्रपट नेटफिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Monday, June 12, 2023

द पॉईंट मेन

द पॉईंट मेन 
अमेरिकेतील ट्वीन टॉवर वर आत्मघाती हल्ला झाला आणि त्यानंतर अमेरिकासह अनेक देशांनी अफगाणिस्तान आपले टार्गेट बनविले.
अमेरिकेत यावर अनेक चित्रपट बनले गेले.अजूनही बनतायत. दक्षिण कोरियाही या लढाईत अमेरिकेसोबत होता.त्यांच्या काही तुकड्या आणि सिक्रेट सर्व्हिस एजंट्स अफगाणिस्तानात होते.
एके दिवशी दक्षिण कोरियातील साधारण 23 पर्यटकांचे तालिबानी अपहरण करतात .त्यांच्या सुटकेच्या बदल्यात दक्षिण कोरियाने आपले सैन्य माघारी घ्यावे आणि तालिबानी कैद्यांची सुटका करावी अश्या दोनच मागण्या मांडते.
आता सुरू होतो वाटाघाटीचा खेळ .दक्षिण कोरिया शांततेच्या मार्गांनी ओलिसांना सोडविण्याचा प्रयत्न करते.त्यासाठी एक शिष्टमंडळ अफगाणिस्तानात दाखल होते. त्या बरोबरच एक सिक्रेट सर्व्हिस एजंट दुसऱ्या बाजूने त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करत असतो .अफगाण सरकार तालिबानी कैद्यांना सोडण्यास नकार देते.
ओलिसांच्या सुटकेसाठी अनेक दलाल ,ब्रोकर पुढे येतात .पैश्याचा खेळ सुरू होतो.काही वेळा कोरियन शिष्टमंडळ हतबल होते.
हा अतिशय सुंदर कोरियन चित्रपट आहे.यात फार हाणामारी नाही .पण संपूर्ण चित्रपटात भीतीचे वातावरण आहे.अचानक भर बाजारात होणारा आत्मघाती हल्ला .अफगाणिस्तानातील रुक्ष ,ओसाड वातावरण  आपल्या अंगावर काटा आणतो.कोरियन सरकारची हतबलता ,शिष्टमंडळाच्या वाटाघाटी आपल्याला खिळवून ठेवते .
शेवटी शिष्टमंडळ वाटाघाटीत यशस्वी होते का ?? ओलीस सुखरूप परत येतील का ??
अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे.

Tuesday, June 6, 2023

एक वटपौर्णिमा

एक वटपौर्णिमा 
नेहमीच गजबजाट असलेल्या त्या भल्यामोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आज शांतता दिसत होती.ऑफिसमध्ये कोणीही नसले तरी मुख्य कॅबिनमध्ये दोन माणसे हजर होती..त्यातील एकाच्या चेहऱ्यावर प्रचंड वैताग दिसत होता तर दुसरा मात्र त्याच्याकडे छद्मीपणे हसत होता.
" तुला हसायला काय जाते चित्रगुप्ता , ही अशी परंपरागत वेशभूषा करून मलाच पृथ्वीवर जायचे आहे ना ? आपले खांद्यावरचे उपरणे सांभाळत आणि डोक्यावरचा मुकुट एका हाताने व्यवस्थित ठेवायची कसरत करीत ती उंच काळी आणि उग्र चेहऱ्याची व्यक्ती चिडून बोलली.
 त्या दोन व्यक्ती कोण हे आमच्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच.त्यातील एक होती चिन्मय त्रंबक गुप्त अर्थात चित्रगुप्त आणि दुसरे त्याचे साहेब यशवंत मनोहर राज अर्थात यमराज .
आज वटपौर्णिमा असल्यामुळे त्यांच्यासाठी तो खासच दिवस होता . आजच्या दिवशीच यमराजांना पारंपरिक वेशभूषा करून पृथ्वीवर जावे लागत असे.
" तुम्ही हजारो वर्षांपूर्वी केलेल्या त्या एका चुकीची शिक्षा इतकी वर्षे भोगावी लागेल याची कल्पना नव्हती मला" मान खाली घालुन पण तिरक्या नजरेने यमराजांकडे पाहत चित्रगुप्त छद्मीपणे म्हणाले.
" बघ ना , मला काय माहित भावनेच्या भरात दिलेल्या वचनाचे इतके गंभीर परिणाम होतील. बरे सध्याच्या परिस्थितीनुसार वेशभूषा करून जाईन असा अर्ज दरवर्षी देतो पण तोही फेटाळला जातो. पारंपारिक कपडे घालूनच जा अशीच वरून ऑर्डर येते .नाही रे जमत यात मला " यमराज रडकुंडीला येऊन म्हणाले.
इतक्यात बाहेर कोणीतरी मोठ्याने हंबरले.लॅपटॉपवरील स्क्रिनकडे पाहत चित्रगुप्त ओरडले "महाराज तुमचे  पारंपारिक वाहन बाहेर तुमची आठवण काढतोय ". बाहेर उभ्या असलेल्या रेड्याकडे पाहत त्यांनी आपल्या बुलेटची चावी चित्रगुप्ताकडे फेकली आणि दोरीचा फास हातात घेतला .
"खबरदार माझ्या बुलेटला हात लावशील तर "? असे  रागानेच बोलून बाहेर पडले.
इथे चित्रनगरीत एका सेटवर खूपच गडबड दिसत होती.एक माणूस सारखा हातातील घड्याळाकडे पाहत सतत मोबाईलवर बोलत होता.त्या सेटवर आज वटपौर्णिमेचे शूटिंग चालू होते. मराठी चित्रपट नाटक आणि सिरीयलमधील  प्रसिद्ध अभिनेत्री चित्रलेखा मॅडम सेटवर हजर होत्या.
चित्रलेखा मॅडम म्हणजे भारतीय स्त्रीचा आदर्श नमुना असे म्हटले जात होते.आदर्श माता आदर्श सून आदर्श मुलगी अश्या वेगवेगळ्या भूमिका तिने केल्या होत्या .अन्याय सहन करणारी ,कधीही कपट कारस्थान न करता सत्याच्या मार्गाने लढा देणारी, सर्वानी कितीही पापे केली तरी माफ करणारी  स्त्री अशी तिची प्रतिमा होती.
" काय झाले सर ? शूटिंग का खोळंबली आहे " तिने डायरेक्टरला त्रासून विचारले.
" काही नाही रेडा आणि यम यायचा आहे " डायरेक्टर हसून म्हणाला . इतक्यात मगाशी मोबाईलवर बोलणारा माणूस आपल्या सोबत यम आणि रेड्याला घेऊन आलाच.
" अरे वा डायरेक्ट मेकअप करूनच आणला की " डायरेक्टर कौतुकाने त्याच्याकडे पाहत म्हणाला आणि हा खरा रेडा आहे .बघ हो ते प्राणीमित्र इथे आले तर तुलाच सेटवरून बाहेर फेकून देईन "डायरेक्टर धमकीच्या आवाजात म्हणाला .
" चला मॅडम शूटिंगला सुरवात करू ,काय रे तुला माहीत आहे का सीन" ? त्याने यमराजकडे पाहत विचारले.
"मला सर्व माहीत आहे ".एक रागीट नजर टाकून यमराज उत्तरले .
"आयला.! पूर्ण भूमिकेत शिरूनच आलेला दिसतोय .चला सुरवात करू "डायरेक्ट  सेटवर जात म्हणाला.
रात्री नऊ वाजता चित्रलेखा आपल्या आलिशान रो हाऊसमध्ये शिरली तेव्हा पूर्ण थकून गेली होती.यावेळी  नवऱ्याचे प्राण यमाकडे मागतानाच्या सीनचे जरा जास्तच रिटेक झाले होते. तो कलाकार जास्तच यमराजाच्या भूमिकेत शिरला होता असे तिला वाटले.
त्याने तिच्याकडून अनेक प्रकारात मनधरणी करून घेतली होती.एकदातर ती चिडून त्याच्या अंगावर धावूनही गेली होती. 
अंगावरचे कपडे फेकून देतच ती बाथरूममध्ये शिरली .मस्तपैकी शॉवर घेऊन ती बाहेर पडली आणि जोरात किंचाळली. समोर तो उभा होता .तिचा नवरा ..हातात कॉफीचा फेसाळता मग घेऊन.ती कॉफी तिच्या आवडीची होती पण समोरच्याचा क्रूर चेहरा ती विसरू शकत नव्हती .
पण हा इथे कसा ? आणि इतकी वर्षे तो कुठे होता ? जगाच्या दृष्टीने तो दोन वर्षांपूर्वीच गायब झाला होता.तो परदेशात बिझनेससाठी गेलाय असेच सर्व समजून होते आणि काही न कळवता तो आज हजर झाला होता .
ती धावतच रो हाऊसच्या मागच्या बाजूला गेली . हातात फावडे घेऊन तेथील वडाच्या झाडाखाली खणू लागली .पण तिथे काहीच नव्हते.
" काही सापडणार नाही तुला "मागून आवाज आला .तिने दचकून वळून पाहिले तेव्हा तो रेड्यावर बसून तिच्याकडे पाहत होता .हातातील दोरीचा फास तो सतत गरगर फिरवीत होता .
" पण का "? तिने रडत विचारले 
"का ?? अग किती खोटी कामे करशील अजून.अन्याय सहन करणारी आदर्श स्त्री. हजारो वर्षांपूर्वीची स्त्रियांची इमेज कधी बदलणार तुम्ही. का सतत स्त्री सासू नवरा नणंद यांचा जाच सहन करणारी दाखवता. तुमच्या अश्या कामांमुळेच स्त्रीची प्रतिमा दुबळीच राहिली आहे. प्रत्यक्ष आयुष्यात तू नवऱ्याचा छळ सहन केला नाहीस आणि त्याचा खून केलास .त्याला इथेच पुरलेस आणि तो परदेशी गेलाय अशी बातमी पसरवलीस .याचीच शिक्षा म्हणून आज तुझ्या नवऱ्याला जिवंत केलेय मी .आता बघू प्रत्यक्ष आयुष्यात आदर्श स्त्री म्हणून कसा अभिनय करतेस ती "असे म्हणून यमराज गायब झाले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Tuesday, May 30, 2023

द मदर

THE MOTHER
द मदर
NETFLIX
ती  अमेरिकेच्या सैन्यदलात सर्वोकृष्ठ स्नायपर होती.निवृत्त झाल्यावर आपल्याला कोण विचारणार नाही याची तिला खात्री होती म्हणूनच तिने आपल्या बॉससोबत अनधिकृत शस्त्रास्त्रे विकण्याचा धंदा सुरू केला पण आपले पार्टनर अजून काहीतरी करतायत याची तिला शंका आली .तिची शंका सत्यात आली आणि ती हादरली.तिने गुप्तचर अधिकाऱ्यांना सगळी माहिती दिली तेव्हा ती गरोदर होती.पण तिचे पार्टनर खूपच खतरनाक होते त्यांनी तिच्यावर तुरुंगात हल्ला केला त्यात ती जखमी झाली.तिने एका मुलीला जन्म दिला .
आपल्यापासून मुलीला धोका होऊ नये म्हणून ती तिच्यापासून दूर झाली. एफबीआय अधिकारी त्या मुलीच्या प्रत्येक वाढदिवसाचे फोटो तिला पाठवीत होता .आज बारा वर्षे झाली ती आपले आयुष्य एकाकी कंठत होती.तिच्याकडे फक्त आपल्या मुलीचे फोटो होते.अचानक एक दिवस तिला आपली मुलगी संकटात आहे याची बातमी मिळते .ती मुलीला वाचविण्यासाठी पुन्हा सक्रिय होते.पण त्याचबरोबर तिचे शत्रूही तिच्या मागावर येतात आणि सुरू होतो एक थरारक प्रवास .
ती आपल्या मुलीला संकटातून बाहेर काढेल का ?? आपली खरी ओळख तिला देईल का ? 
जेनिफर लोपेझचा एक वेगवान थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्सवर

सरचिंग

Searching
Netflix
डेव्हिडची सोळा वर्षाची मुलगी मार्गोट क्लासला जाते असे सांगून गायब होते.डेव्हिड तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो पण कोणत्याही माध्यमातून तिला कॉन्टॅक्ट होत नाही . ती लॅपटॉप घरीच विसरून गेलेली असते त्यावरून तो तिच्या मित्रांना कॉन्टॅक्ट करतो पण कोणालाही ती कुठे आहे माहिती नसते.शेवटी तो पोलिसांकडे तक्रार नोंदवतो.  एक महिला ऑफिसर  तिची केस घेते आणि पोलिसांच्या पद्धतीने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.
तिथे डेव्हिडही घरी बसून गुगल ,फेसबुक ,इन्स्टाग्राम ,जीपीएस आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला अनपेक्षित धक्कादायक गोष्टी कळतात .मार्गोट जिवंत आहे का ? असेल तर नक्की कुठे आहे ? तिच्या गायब होण्यामागे नक्की कोण आहे ? याची उत्तरे हवी असल्यास सर्चीग पहावाच लागेल.
हा संपूर्ण चित्रपट कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर उलगडला गेलाय.युट्यूब विडिओ ,लाईव्ह विडिओ, गुगल सर्च इंजिनचे पेज ,तसेच फेसबुक ,इन्स्टाग्रामच्या पेज स्क्रिनवर दिसत राहतात.सोशल मीडियाचा वापर करून डेव्हिड आपल्या मुलीला कसे शोधतो हे पाहण्यासारखे आहे.
आताच्या सोशल मीडियाच्या जगात वावरणार्यांनी हा चित्रपट नक्कीच पहावा.

सिर्फ एक बंदा काफी है

सिर्फ एक बंदा काफी है
झी5
जेव्हा आरोपीचा वकील जो माजी केंद्रीय कायदा मंत्रीही होता.सरकारी वकील सोलंकीला सांगतो की आरोपीने खूप शाळा बांधल्या आहेत ,हॉस्पिटल बांधली आहेत.ते मोठे धर्म प्रसारक आहेत.तेव्हा सोलंकी वकील अतिशय शांतपणे आणि आदराने विचारतात शाळा हॉस्पिटल बांधली म्हणून बलात्कार करायचे लायसन्स मिळते का ?
चित्रपट सत्य घटनेवर आहे .कुठेही इतर गोष्टींकडे न जाता डायरेक्ट आपल्याला मूळ घटनेकडे घेऊन जातो .दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये आई वडील आणि ती तरुण मुलगी शिरते आणि नंतर ती मुलगी आपले स्टेस्टमेंट स्त्री पोलीस ऑफिसरसमोर लिहून देते.स्टेस्टमेंट लिहीत असतानाच त्या स्त्री ऑफिसरचे चेहऱ्यावरील हावभाव बदलत जातात.
नंतर कायद्यानुसार कारवाई सुरू होते. त्या प्रसिद्ध बाबाला अटक करण्यात येते. नेहमीप्रमाणे सरकारी वकिलाला आरोपी आपल्याबाजूने ओढतो पण योगायोगाने ते उघडकीस येते.
पी.सी.सोलंकी हा देवभोळा सभ्य वकील.तो सरकारी वकील बनतो.त्यांच्यापुढे बाबाला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी तो काय काय प्रयत्न करतो आणि कसे विरुद्ध पक्षाचे बेत हाणून पाडतो हे बघण्यासारखे आहे.
तब्बल पाच वर्षे चाललेला खटला .साक्षीदारांचे खून ,जामिनासाठी सुप्रीम कोर्टात चाललेली लढाई पाहून आपण सुन्न होतो.
यात फक्त आणि फक्त मनोज वाजपेयीचा पी.सी.सोलंकी आपल्यासमोर असतो.त्याचा आत्मविश्वास तर कधी डोळ्यातील भय आपल्याला गुंतवून टाकते.तो हिरो नाहीय तर सर्वसामान्य माणूस आहे. पण त्याच्याकडे कायद्याचा प्रचंड अभ्यास आहे.विरुद्ध पक्षाचे प्रत्येक पॉईंट तो कसे खोडून काढतो हे बघण्यासारखे आहे .यात अवास्तव आरडाओरड नाही .कायद्याचा सन्मान केला आहे.
चुकवू नये असा चित्रपट