Thursday, August 17, 2023

BORREGO

बोर्रेगो
BORREGO
इली एक सुंदर तरुणी .ती बॉटनिस्ट आहे. नवीन वनस्पतींची माहिती आणि अभ्यास करायला दूर दूर जाते. अलेक्स गोमेझ तिची मैत्रीण .अलेक्सचे वडील शेरीफ आहेत.
एके दिवशी इली वनस्पतीच्या शोधात दूर ओसाड प्रदेशात जाते.तिथे अचानक एक छोटे विमान क्रॅश होते.वैमानिकाला मदत करायला ती धावतच  जाते.पण वैमानिकच तिच्यावर बंदूक रोखतो आणि विमानातील वाचलेले ड्रग तिच्या गाडीत ठेवून तिला गाडीचा ताबा घेतो .
मध्येच त्यांच्या गाडीला अपघात होतो आणि ते दोघेही ड्रगच्या पिशव्या पाठीवर लादून पायी चालण्यास सुरवात करतात .एक दोनदा इली त्याच्या पासून सुटका करण्याचा प्रयत्न करते पण प्रत्येकवेळी तो वैमानिक तिला पकडतो. त्याच्या इस्पित स्थळी जायला खूप चालावे लागणार होते.तो मार्ग ही ओसाड खडकाळ आणि छोट्या छोट्या पायवाटांचा होता .
आपले ड्रग घेऊन येणाऱ्या विमानाचा अपघात झालाय हे कळताच  प्रमुख चिडतो आणि वैमानिकाच्या शोधात निघतो . 
अलेक्सचे वडील शेरीफ जोस गोमेझला या घटनेची माहिती मिळते आणि तो इलीच्या शोधात निघतो.अलेक्सही आपल्या मैत्रिणीच्या आणि वडिलांच्या शोधात निघते.
त्या वैमानिकापासून आणि ड्रगच्या प्रमुखापासून इली सुटका करून घेईल का ?? इथे प्रत्येक क्षण महत्वाचा आहे . त्या ओसाड जमिनीवर चालतानाही त्रास होतोय.
अलेक्स आणि जोस इलीला वाचविण्यासाठी वेळेवर पोचतील का ??
एक चार पात्रातील वेगवान थ्रिलर चित्रपट अमेझॉन प्राईमवर नक्की पहा.
चित्रपट हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

Wednesday, August 16, 2023

बर्ड ऑफ ब्लड

बर्ड ऑफ ब्लड
BARD OF BLOOD
कबीर आनंद बलुचिस्तानमधील एक रॉ एजंट. काही वर्षांपूर्वी एका ऑपरेशनमध्ये त्याच्या सोबत असलेला मित्र मारला गेला होता.तेव्हापासून तो रॉपासून दूर राहून एका कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी करत होता.
बलुचिस्तानमध्ये भारताचे चार रॉ एजंट पकडले गेले आणि आता ते तालिबानच्या ताब्यात होते. मुल्ला खालिद  तालिबानचा प्रमुख आहे.पण तालिबानी बलुचिस्तानात आहेत यावर आंतरराष्ट्रीय समूहाचा विश्वास नाही कारण त्यामुळे पाकिस्तान अडचणीत येऊ शकेल.आयएसआयचा मेजर तन्वीर शेहजादचा मुल्ला खालिदला पाठिंबा आहे.त्यानेच काही वर्षांपूर्वी कबीरला फसविले होते. शेहजादने पकडलेले रॉ एजंट पाकिस्तानच्या ताब्यात देण्याची विनंती तालिबानला केली.
सादिक शेख कबीर आनंदचा बॉस होता.आपल्या एजंटना फक्त कबीरच बलुचिस्तानमधून आणू शकतो याची खात्री त्यांना आहे म्हणून ते कबीरला बोलावून घेतात.पण त्यांचीही हत्या होते .
कबीर अनधिकृतपणे बलुचिस्तानात जाऊन आपल्या एजंट्सना परत आणण्याचे आव्हान स्वीकारतो आणि रॉ ऑफिसमधून इशा खन्नाला आपल्यासोबत घेतो.
हे मिशन संपूर्णपणे अनधिकृत असल्यामुळे त्याला रॉची कोणतीही मदत मिळणार नसते .तरीही ते दोघे बलुचिस्तानातील एक एजंट वीर सिंह ज्याला रॉ विसरून गेलीय त्याची मदत घेतात आणि त्याच्या मदतीने बलुचिस्तानात प्रवेश करतात.
ते तिघे मिळून पकडलेल्या एजंट्सला सोडवतील का ? या मोहिमेत प्रत्येक पावलावर संकटे आहेत .तालिबानसोबत त्यांना आयएसआयशीही सामना करायचा आहे .त्यांचे बाहेर पडायचे रस्ते ही बंद आहेत.
इम्रान हाश्मीने कबीर आनंदची भूमिका केली आहे .ही संपूर्ण सिरीज थरारक आणि उत्कंठा वाढविणारी आहे.संपूर्ण चित्रीकरण बलुचिस्तानमध्ये आहे. 
बिलाल सिद्धीकीच्या द बर्ड ऑफ ब्लड या कादंबरीवर सिरीज बेतली आहे .
नेटफिक्स वर नक्की पहा.

Tuesday, August 8, 2023

बॉयझ 2

बॉयझ 2
Boyz 2
ज्यांनी बॉयझ पाहिला आहे त्यांना धुंग्या धैर्याची धमाल मस्ती आठवत असेल .कबीरसारख्या मितभाषी मित्रात त्यांनी बदल केला आणि आयुष्याची ओळख करून दिली.आपल्याच मस्तीत जगाची पर्वा न करता जगणे हे धुंग्या आणि धैर्यालाच जमते.
आता धुंग्या  धैर्या आणि कबीर दहावी पास होऊन कॉलेजमध्ये आलेत .आल्याआल्या त्यांची सिनियरकडून रॅगिंग होते पण हे तिघेही त्यांना योग्य उत्तर देतात. पण बारावीला कबीर होस्टेलसोडून घरूनच कॉलेजला जाणे पसंद करतो.
नरु कॉलेजमधील सिनियर .अर्थात तो अनेक वर्षे कॉलेजमध्ये येतोय.त्याला ज्युनियरवर रॅगिंग करायला आवडते.पण प्रत्येकवेळी धैर्या आणि धुंग्या आडवे येतात.
एके दिवशी ज्युनियर मुलीवर नरु रॅगिंग करताना कबीरमध्ये पडतो आणि मोठी हाणामारी होते.आता कबीरही पुन्हा हॉस्टेलमध्ये राहायला येतो .
हाणामारी कमी व्हावी म्हणून नरु धुंग्या आणि धैर्याला एक चॅलेंज देतो .ते चॅलेंज पूर्ण करायचे आणि त्याचा पुरावा आणून द्यायचा असे ठरते आणि त्या चॅलेंजसाठी कबीरची आणि सिनियरकडून नरुची निवड होते .
आता हे चॅलेंज काय आहे ? ते पूर्ण करण्यासाठी कबीर आणि नरुला काय काय करावे लागेल ? हे पाहण्यासाठी बॉयझ 2 पाहायला हवा.
चित्रपटात डबल अर्थाचे संवाद आहे त्यामुळे खूप हसायला येते . 
धुंग्याच्या भूमिकेत पार्थ भालेरावने धमाल केलीय तर धैर्याच्या भूमिकेत प्रतीक लाडने त्याला उत्तम साथ दिलीय.  ओंकार भोजनेने नरुच्या भूमिका गाजवली आहे. कबीरची शांत संयमी भूमिका सुशांत शिंदेने उत्तम साकारली आहे .
प्राईमवर हा चित्रपट पाहता येईल.

Friday, August 4, 2023

12 STRONGE

12 STRONGE
12 स्ट्रॉंग
9/11 ला अमेरिकेतील वर्ड ट्रेंड सेंटरवर हल्ला झाला .त्याची जबाबदारी अल कायदाने स्वीकारली आणि अमेरिकेने अफगाणिस्तानात आपले सैन्य अल कायदाच्या मागावर पाठविले.अल कायदाला तालिबानची मदत होती.
अफगाणिस्तानात घुसून तालिबानचे तळ नष्ट करायची जबाबदारी अमेरिकेन सैन्यावर होती.स्पेशल फोर्स ODA 595  तुकडीत बारा कमांडो होते. मिच नेल्सन त्या तुकडीचा कॅप्टन होता. त्याच्यावर नॉर्दन अलाईन्सचा प्रमुख अब्दुल डोस्तूमला मजार ए शरीफ ताब्यात घेण्यासाठी मदत करायची जबाबदारी होती.
प्रत्यक्षात मजार ए शरीफला जाण्याचा मार्ग अतिशय खडतर डोंगराळ आणि पूर्ण वैराण होता. अब्दुल डोस्तूम मिच नेल्सनवर फारसा विश्वास टाकत नव्हता.मजार ए शरीफ पर्यंत पोचण्यासाठी फक्त घोडा हेच प्रवासाचे साधन होते आणि वाटेत तालिबानचे दोन तीन छोटे मोठे तळ होते. त्या तळाना नेस्तनाबूत करून पुढे सरकायचे होते.ODA 595 च्या कमांडोना घोडयावर बसून प्रवास करण्याची सवय नव्हती तरीही त्यांनी ते आव्हान स्वीकारले.
केवळ बारा कमांडोच्या ODA595 तुकडीने मजार ए शरीफ ताब्यात घेतले का ?? त्यासाठी त्यांना काय काय करावे लागले ?
एक सत्य घटनेवर आधारित अप्रतिम युद्धपट अमेझॉन प्राईमवर पहायला विसरू नका .
चित्रपट हिंदी भाषेत आहे .

Thursday, August 3, 2023

सी यू सून

C U SOON
सी यू सून 
दुबईला बँकेत नोकरी करणारा जिम सोशल साईटवर मैत्रीण शोधत असतो.बरेच प्रयत्न केल्यावर अनु सबेस्टिन नावाच्या तरुणीशी त्याची मैत्री होते.
 अनु सुरवातीपासून स्वतःविषयी फार माहिती देत नसते पण जिमी मात्र आपल्या आईशी  आणि सहकार्यांशी ओळख करून देत असतो. अनु त्याच्याशी विडिओ कॉल वर बोलते.तिच्याकडे सिम कार्ड नाहीय तर वाय फायचा वापर करून बोलते.चॅटिंग करते.
केविन जिमीचा मित्र लांबचा भाऊ .तो साऊथ आफ्रिकेत सायबर क्राईममध्ये कामाला आहे.तो जिमीला तिच्याविषयी विचारतो पण जिमीला फारसे काही सांगता येत नाही.
एके दिवशी अनु जखमी अवस्थेत जिमीला फोन करते .वडिलांनी मारले असे ती सांगते .जिमी तिला आपल्या घरी घेऊन येतो .ती जिमीकडेच राहते पण काही दिवसांनी ती जिमीला मी निघून जाते पुन्हा भेटणार नाही असा विडिओ कॉल करून गायब होते.
तिच्या गायब होण्याची तक्रार होते आणि पोलीस जिमीला घेऊन जातात.जिमी केविनला सर्व प्रकार सांगतो आणि मदतीची विनंती करतो .
आता केविनवर जबाबदारी आहे अनुला शोधून काढायची .केविन साऊथ आफ्रिकेत आहे .जिमी दुबईत आहे .जिमीची आई केरळात आहेत.कोणीही कोणाला प्रत्यक्ष भेटू शकत नाही तरीही अनुला शोधून काढायचे आहे.
 सोशल मीडिया ,गूगल सर्च ,व्हिडीओ कॉल, मेसेंजर ,अश्या गोष्टींचा वापर करून केविनया प्रकरणाच्या मुळाशी कसा जातो हे बघण्यासारखे आहे.
संपूर्ण चित्रपटात आपल्याला विडिओ कॉल स्क्रिन ,कॉम्प्युटर स्क्रिन,मोबाईल स्क्रिनवर दिसतो. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर कसा करतात हे हा चित्रपट पाहून कळते.
मिसिंग ,सरचींग या चित्रपटाच्या टाईपचा हाही साऊथ इंडियन मल्याळम भाषेतील चित्रपट आपल्याला नक्की आवडेल.सबटायटल्स इंग्रजीत असल्यामुळे भाषेची फारशी अडचण येत नाही.
यात फहाद फासील केविनच्या भूमिकेत आहे.तोच चित्रपटाचा निर्माता ही आहे.
चित्रपट अमेझॉन प्राईमवर आहे.

Tuesday, August 1, 2023

PARADISE

पॅराडाईज
PARADISE
आपल्या आयुष्यातील काही वर्षे आपण दुसऱ्याला डोनेट केली तर ?? अव्हॉन कंपनीत अशीच एक स्कीम आहे. काहीजण आपल्या डीएनएमधील काही सेल डोनेट करतात आणि त्याचा वापर इन्शुरन्स पॉलिसी म्हणून केला जातो.
मॅक्स हा अव्हॉनमधील डोनेटर एजंट .या वर्षीचा बेस्ट कर्मचाऱ्याचा अवॉर्ड त्याला मिळालाय. आपली पत्नी एलेनासोबत तो खुश आहे अजून मोठे बनायची स्वप्न पाहतोय.
अचानक एके दिवशी त्याच्या घराला आग लागते आणि ते जळून खाक होते. तुमच्याच हलगर्जीपणामुळे आग लागलीय असे सांगत इन्शुरन्स कंपनी नुकसानभरपाई नाकारते.प्रचंड कर्जामुळे दोघेही हतबल होतात .शेवटची इन्शुरन्स पॉलिसी म्हणून एलेना आपले सेल देण्याचे ठरविते जे तिने आधीच डोनेट केलेले असतात .सरासरी त्या सेलचे आयुष्य अडतीस वर्षाचे असते .
दुसऱ्या दिवशी तिच्या शरीरातून सेल काढले जातात.त्यानंतर ती अडतीस वर्षांनी एकदम म्हातारी होते.
मॅक्स तिचे सेल कोणाला दिलेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला ती तरुण मुलगी मारी थायसन सापडते.तिच्यातून सेल काढून तो पुन्हा एलेनामध्ये टाकायचे ठरवितो आणि मारीला पळवून नेतो .योगायोगाने मारी अव्हॉन कंपनीची सीइओ सोफी थाईसनची मुलगी असते .
सोफी आपल्या सशस्त्र रक्षकांसमवेत मॅक्स आणि एलेनाच्या मागे लागते.
मॅक्स एलेनाच्या आयुष्यातील अडतीस वर्षे पुन्हा परत आणून तिला तरुण बनवेल का ?
त्यासाठी त्याला कोणत्या परीक्षा द्याव्या लागतील ? 
तो मार्ग अतिशय खडतर आहे पण तो यशस्वी होईल का ??
नेटफिक्सवर हिंदी भाषेत हा चित्रपट उपलब्ध आहे .

Monday, July 31, 2023

THE COVENANT

THE COVENANT
द कॉवेनंट
अफगाणिस्तानात जेव्हा अमेरिकी सैन्य तालिबानच्या मागावर होते तेव्हा त्यांना दुभाष्याची गरज लागत होती.हे दुभाषीही त्यांना नीट पारखून घ्यावे लागत.
जॉन किंली आणि त्याची त्याची टीम अफगाणिस्तानातील शेवटच्या दौऱ्यात होती.त्यांचा दुभाषी मारला गेला होता .आता त्यांना अहमद नावाचा दुसरा दुभाषी भेटला होता.अहमद मितभाषी शांत होता त्याची निर्णय घेण्याची क्षमता होती.आत्मविश्वास होता. 
तालिबानचे हत्यारांचे कारखाने शोधणे आणि ते नष्ट करणे हे जॉनच्या तुकडीचे प्रमुख काम. साधारणतः सैनिक आणि दुभाषाचे एक ट्युनिंग जुळायला लागते.जॉनचा अहमदवर फारसा विश्वास नव्हता .कदाचित ते पहिल्यांदाच एकत्र काम करत होते म्हणून असावे.पण अहमदची जॉनला खूप मदत झाली .
एके दिवशी बेसपासून साधारण 120 किलोमीटर दूर तालिबानचा शस्त्रांचा कारखाना आहे अशी बातमी जॉनच्या तुकडीला लागते. बेसपासून साधारण तीन तासांचा प्रवास जॉन आणि त्याची तुकडी सुरू करते. 
हातघाईची लढाई होऊन जॉन तो कारखाना नष्ट करतो पण दुर्दैवाने त्याला अपेक्षित नसलेले शेकडो तालिबानी त्यांच्यावर हल्ला करतात .हा हल्ला इतका जोरदार असतो की त्यात जॉनचे सगळे साथीदार मारले जातात .पण अहमद आणि जॉन तेथून निसटतात आणि जंगलाचा आश्रय घेतात .तिथे सगळीकडे तालिबान पसरलेले असतात . ते दोघांच्याही मागावर निघतात . त्यात जॉनच्या मांडीला गोळी लागून तो भयंकर जखमी होतो .
आता अहमदवर संपूर्ण जबाबदारी आहे जॉनला सुमारे शंभर किलोमीटर दूर असलेल्या बेस कॅम्पवर घेऊन जायची .रस्तोरस्ती तालिबान सैनिक त्या दोघांच्या शोधात आहेत. त्यामुळे जॉनला गाडीने घेऊन न जाता डोंगरदऱ्यातून हातगाडीवरून खडतर मार्गाने अहमदला जॉनसोबत प्रवास करायचा आहे. अहमद जॉनला सुरक्षितस्थळी पोचवेल का ??
चित्रपट इथेच संपत नाही .तर त्यापुढचा भाग अजून रोमांचकारी आहे .तो पाहायचा असेल तर अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट जरूर पहा .
मानवी नात्यांचा आणि सदसदविवेकबुद्धी जोपासणारा सुंदर चित्रपट