Tuesday, February 13, 2024

गुंटूर कारम

GUNTUR KAARAM
गुंटूर कारम
1988 साली गुंटूरला लेनिनबाबूने सत्यमच्या मिर्ची फॅक्टरी आणि गोडावूनला आग लावली.त्यात लेनिनबाबू मारला गेला आणि सत्यमला त्याच्या खुनाखाली अटक झाली.त्या वादातूनच सत्यमची बायको वसुंधरा आपल्या मुलाला रमण्णाला सोडून वडिलांकडे व्यंकट स्वामींकडे निघून गेली. 
या गोष्टीला पंचवीस वर्षे झाली.सत्यम बारा वर्षाची सजा भोगून परत आलाय.रमण्णा आता मिर्चीचा उद्योग संभाळतोय.तर व्यंकट स्वामी राजकारणात मोठा माणूस झालाय.त्याने वसुंधरला कायदा मंत्री केलंय. पण सारी सूत्र तोच हलवतोय. 
त्याने वसुंधराचे दुसरे लग्न लावून दिलय. तिला एक मुलगाही आहे.भविष्यात रमण्णाकडून आपल्या परिवाराला त्रास होऊ नये म्हणून त्याला कायदेशीररित्या फॅमिलीबाहेर काढायचा प्लॅन केलाय.त्याला रमण्णाकडून काही कागदपत्रांवर सही हवीय त्यासाठी त्याने पाणी या आपल्या वकिलाला नेमलेय.
पाणी रमण्णा भेटून त्याची सही घेण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकवेळी अयशस्वी होतो .उलट त्याची मुलगी अम्मू रमण्णाच्या प्रेमात पडते आणि त्याचा सहाय्यक बालू रमण्णाच्या बाजूने उभा राहतो.
व्यंकट स्वामी आपल्या प्लॅनमध्ये यशस्वी होईल का ? वसुंधरा आपल्या मुलाला स्वीकारेल का ? एका सहीने नाती तुटू शकतात ?? 
तुम्ही जर साऊथचे चित्रपट पाहत असाल तर नेहमीचे कलाकार आपल्या नेहमीच्या भूमिकेत आणि नेहमीच्या अभिनयात दिसतील.यात फक्त नायक बदलतो .
सुपरस्टार महेश बाबू रमण्णाच्या मुख्य भूमिकेत आहे.तर टिपिकल नायिकेच्या भूमिकेत श्रीलीला आहे.प्रकाशराज व्यंकट स्वामीच्या भूमिकेत खलनायक बनला आहे.बाकी मुरली शर्मा, रमय्या ,वेंनेला किशोर आपापल्या भूमिकेत फिट बसतात.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत हा चित्रपट आहे.

Sunday, February 11, 2024

भक्षक

BHAKSHAK
भक्षक 
वैशालीसिंहचे  पाटणात कोशीस न्यूज नावाचे चॅनेल आहे.ती आणि तिचा सहाय्यक भास्कर दोघेच ते चॅनेल चालवतात.अर्थात ते चॅनेल फारसे कोणी पाहत नाही.
त्या दिवशी रात्री तिचा खबरी एक न्यूज देऊन जातो. न्यूज करायची की नाही हे ठरविण्यासाठी तिला चौकशी करायची आहे.
मूनव्वरपूर येथे एक बालिका सुधारगृह आहे.हे सुधारगृह बन्सी साहू  नावाचा प्रतिष्ठित व्यक्ती चालवतो.त्याचे शहरात अनेक उद्योग चालतात.त्यात अनेक गैरव्यवहारही होतात.पण त्याने सगळ्यांना मॅनेज केलंय. समाज कल्याण विकास मंत्री ही त्यात सामील आहेत.
वैशालीसिंह आपल्या बालिका सुधारगृहाची चौकशी करतेय हे कळल्यावर तो तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो .पण ती त्याला दाद देत नाही. 
समाज कल्याण आणि विकास खात्यात त्या बालिका सुधारगृहाची ऑडिट फाईल अनेक महिने पडून आहे .त्यावर काहीच ऍक्शन घेतली जात नाही .तर सुधारगृहाच्या मुलीही इतर कुठल्याही सुधारगृहात पाठविल्या जात नाहीत.वैशालीसिंह हे सगळे शोधून काढते आणि समाज कल्याण विभागवार दबाव टाकण्याचा प्रयत्न करते .
शेवटी शहरात नवीन एसएसपी जसमित कौर बदली होऊन येते.पण पुराव्याशिवाय काही करता येत नाही असे तिला सांगते .पण ती वैशालीसिंहला काही मार्ग सुचविते.
वैशालीसिंह हे कारस्थान उघडकीस कसे आणते हे पाहण्यासाठी नेटफ्लिक्सवर भक्षक पहावा लागेल.
भूमी पेडणेकर आणि संजय मिश्राने वैशालीसिंह आणि भास्करची भूमिका रंगवली आहे.संथ आणि कायद्याने चालणाऱ्या चित्रपटात कुठेही हिंसा नाही .पण एकप्रकारचा तणाव चित्रपटभर जाणवत राहतो.
बन्सी साहूच्या भूमिकेत आदित्य श्रीवास्तव बऱ्याच काळाने मोठ्या भूमिकेत आहे.तर सई ताम्हणकरने छोटी पण दमदार अशी जसमित कौर उभी केली आहे.

Saturday, February 10, 2024

वॉरहॉर्स वन

Warhorse One
वॉरहॉर्स वन 
अफगाणिस्तानात धर्म प्रचार करायला गेलेली एक अमेरिकन फॅमिली अडकून पडली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत तिथून बाहेर काढायची जबाबदारी तिथे असलेल्या वॉरहॉर्स या स्पेशल फोर्स तुकडीवर येते.ते त्यांना आणायला तिथे जात असतानाच एक रॉकेट लॉंचर हेलिकॉप्टरवर आडळते आणि ती तुकडीच नष्ट होते.योगायोगाने त्यांचा प्रमुख रिचर्ड मार्को हेलिकॉप्टरमधून फेकला जातो आणि वाचतो.
तो त्या कुटुंबाला आणायला निघतो पण रस्त्यातच त्या कुटुंबाची हत्या तालिबानी करतात.त्यातून फक्त सहा वर्षाची झोया ही गोड मुलगी वाचते.रिचर्ड झोयाला घेऊन निघतो.पण बेसवर जाणे तितके सोपे नसते.तालिबानी त्यांच्या मागे लागले आहेत.ये जंगल खूपच घनदाट आहे.इथे पावलापावलावर मृत्यूचे सापळे आहेत.सुरवातीला कठोरपणे वागणारा रिचर्ड हळूहळू झोयात गुंतून जातो .ती लाघवी निरागस मुलगी आपल्या बोलण्याने रिचर्डचे मन जिंकते. 
पण एकटा रिचर्ड त्या  शेकडो तालिबान्याशी लढले का ?? झोयाला सुखरूप बेसवर पोचवेल का ?
एका सुंदर नात्याचा  वेगवान युद्धाच्या पार्श्वभूमीवर असणारा हा चित्रपट प्राईमवर हिंदी भाषेत आहे.

ती


ती
शी..!! बाबा ,आज परत उशीर होणार . हातातील ब्रेडचा तुकडा तोंडात टाकत घाईघाईने चपला पायात अडकवून ती बाहेर पडली.
पण जाताजाता आपल्या सोनुलीकडे  नजर टाकायला विसरली नाही ती. रोजचेच झाले होते तिचे ते. बिल्डिंगच्या गेटवर आली आणि वॉचमनची नजर बघून शहारली.
आता सुरु होणार होते तिचे नेहमीचे रुटीन. त्याचत्याच ओंगळवाण्या नजरा ,अंगावर येणारे धक्के . इतकी वर्ष आपण हे सहन करतोय तरी याची आपल्याला सवय का नाही झाली अजून ? तिने स्वतःलाच प्रश्न विचारला .अर्थात उत्तर मिळणार नव्हतेच.
ती तशीच पुढे निघाली तर  तो मोटारसायकलवाला समोर आला आणि लोचटपणे हसून पुटपुटला " येणार का ? सोडतो तुम्हाला ".
ती लक्ष न देताच पुढे सरकली . उत्तम शरीराची देणगी आणि सुरेख चेहरा असणे हा तिला शाप वाटू लागला होता .मनातले विचार सोडून ती ट्रेनमध्ये चढली ,धक्के खात कशीबशी स्वतःसाठी जागा करून उभी राहिली.
 स्वतःच्या विचारात गुंग असताना हळूच तिच्या हाताला शेजारणीचा स्पर्श होऊ लागला . गर्दीमुळे होत असेल म्हणून तिने लक्ष दिले नाही पण तो हात आता जास्तच धीट झाला. तिने चमकून बाजूला पहिले तर ती तरुणी तिच्याकडे पाहून हसली.त्या हास्यातच वेगळेपणा होता.एक आवाहन होते. अरे देवा..!  आता हि पण ? किळस वाटून ती दूर झाली तर दुसरीने वाट पाहत असल्यासारखी तिची जागा घेतली.
स्टेशन आल्यावर मात्र ती धावत सुटली .आज तरी लेटमार्क नको म्हणत आत शिरली .समोरच रिसेप्शनला बसलेल्या बाहुलीने कळेल न कळेल असे नाक मुरडले. कसे जमते हिला चेहऱ्यावरची एकही रेषा न हलवता फक्त नाक मुरडणे . सर्व विसरून ती हसली आणि ऑफिसमध्ये शिरली . 
हुश्श.. हुश्श..करीत ती आपल्या जागेवर बसली .दोन मिनिटांनी तिचा लेटमार्क वाचला  होता .स्वतःची पाठ थोपटून घेत तिने पाण्याचे दोन घोट घेतले आणि समोर पहिले तर शिपाई चहाचा कप घेऊन उभा होता. पण त्याची नजर मात्र बरेच काही सांगून जात होती.सवयीनुसार तिने पदर चपापला आणि चहा पिण्यास सुरवात केली.
 सगळेच पुरुष सारखेच का ? थोड्या वेळाने घरी फोन करून खुशाली विचारून घेतली आणि बॉसला भेटायला निघाली.
 दारावर टकटक करून आत शिरली आणि बॉसच्या थंड नजरेला नजर न देता उभी राहिली.त्याची नजर आपल्यातून आरपार होतेय याची जाणीव तिला होत होती.का सहन करतोय आपण ? कशासाठी ? परत प्रश्न .कामाचा रिपोर्ट करून ती बाहेर पडली.
लंचला सगळ्याजणी एकत्र आल्या मग झाला सगळा चिवचिवाट सुरु .त्या गोंधळात सर्व ती विसरून  गेली आणि जेवणाचा आनंद घेऊ लागली.बघताबघता ऑफिस संपले आणि  ती परत निघाली.
परत तेच धक्के .परत ती ट्रेन .तेच चोरटे स्पर्श .पण घरी जाण्याच्या ओढीने सर्व सहन करीत होती ती . 
 "ए ,ती बघ आली.गल्लीच्या तोंडावर उभे राहिलेल्या त्या कोवळ्या मुलांचे कंमेंट्स ऐकून तिला न कळलंत हसू आले.
खरच आपण इतकी वर्ष हे सहन करतोय पण गोष्टी याच्यापुढे कधी गेल्याच नाहीत.कोणाच्यात हिम्मत नाही पुढे येण्याची.नुसती मेलेल्या शरीरावर चोच मारून लचके तोडणारी गिधाडे आहेत हि .जिवंत माणसांवर हल्ला करण्याची यांच्यात धमक नाहीच.सर्व आठवून तिचा हुरूप परत आला . दरवाजा उघडून आता शिरली आणि" आई आली ,आई आली "असे ओरडत धावत येणाऱ्या सोनुलीला मिठीत घेऊन सर्व थकवा जाणीवा विसरून गेली.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Wednesday, February 7, 2024

थ्री ऑफ अस

Three Of Us
थ्री ऑफ अस
शैलजा आणि दिपांकर पतिपत्नी .आता ते पन्नाशीला आलेत.शैलजा घटस्फोट कोर्टात कन्सल्टंट आहे.दिपांकर इन्शुरन्स एजंट आहे. घरी दोघेच मुलगा बाहेरगावी शिकतोय .त्यामुळे नात्यात एक तणाव आल्यासारखा आहे.दोघात बोलणे कमी होतेय.त्यात शैलजाची स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. 
अचानक एक दिवस तिला आपल्या गावी वेंगुर्ल्याला जावेसे वाटते.इथे तिचे प्राथमिक शिक्षण झाले आहे.तिला त्या शाळेत जावेसे वाटते .काही जवळचे मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना ती गाव सोडल्यानंतर कधीच भेटली नाही .त्यातही तिचा एक खास मित्र आहे प्रदीप कामत .त्याला भेटायची इच्छा आहे.
नवऱ्याला सोबत घेऊन ती वेंगुर्ल्याला येते.तिथे तिची बालमैत्रीण गौरी भेटते.तिच्याकडून प्रदीप कामतचा पत्ता घेऊन त्याला भेटायला जाते.
प्रदीप कामत कुडाळला बँकेत मॅनेजर आहे.तिला अचानक बँकेत पाहून त्याला धक्का बसतो . त्यानंतर चालू होतो तिघांचा प्रवास . शाळेतील वर्गात जाऊन जुन्या आठवणी ताज्या करणे.मित्र मैत्रिणीच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना भेटणे.जुन्या दिवसात रमणे.
एक अतिशय तरल साधा संथ गतीत चित्रपट सुरू राहतो.प्रेम मैत्री यांच्या नाजूक नात्यावर चित्रपट उभा आहे.यात तिघेही एका विचित्र तणावात आहेत.आपल्या बालपणीची खास मैत्रिण आणि तिच्या नवऱ्यासोबत फिरताना एक अवघडेलपणा प्रदीपच्या चेहऱ्यावर सतत दिसून येतो .तर दिपांकर ही त्याच अवस्थेतून जातोय. शैलजा ह्या सगळ्या आठवणी मनात रुजू देतेय.
चित्रपट कोकणच्या पार्श्वभूमीवर आहे त्यामुळे कोकणातील लोकांना तो जास्त भावतो.कोकणातील निसर्ग ,देवळे ,घरे पाहून प्रत्येक कोकणी माणूस आपल्या बालपणात जातो आणि हळवा होतो.
शेफाली शहाने शैलजाची भूमिका छान केलीय.तिचे एकाकी असणे .सतत तणावात दिसणे.शून्यात राहणे छान उभे केलेय.तर स्वानंद किरकिरेने तिला सांभाळून घेणार ,तिला साथ देणारा तिला दिपांकर रंगविला आहे.पण भाव खाऊन जातो तो जयदीप अहलावत .शैलजाला अनेक वर्षांनी समोर पाहून धक्का बसणे तिच्या नवऱ्याशी बोलताना येणारा अकवर्डनेस .तिच्याशी जपून बोलणे.आता आपण लहानपणीचे मित्र मैत्रिण नाही तर मॅच्युअर्ड झालोत हे मनात ठेवून वागणे असा प्रदीप कामत छान उभा केलाय.
हा चित्रपट पाहून काहीजणांना निश्चितच पुन्हा जुन्या आठवणी जाग्या करावयाच्या वाटतील .
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

Monday, February 5, 2024

बेकी

BECKY
बेकी
बेकी तेरा वर्षाची मुलगी.आईचा आजारपणात मृत्यू झाल्यामुळे थोडी अस्वस्थ.त्यात वडील दुसरे लग्न करतायत हे मान्य नाही.तिच्याकडे दोन कुत्रे आहेत.त्यांच्यातच तिचा जीव रमतो.
तुरुंगातून चार क्रूर कैदी पळून गेलेत.ते जंगलात शिरलेत.त्याचवेळी बेकीचे वडील तिला आणि होणाऱ्या पत्नीला आणि तिच्या मुलाला घेऊन त्या जंगलातील फार्म हाऊसमध्ये आले आहेत.
 बेकी आपल्या होणाऱ्या आईला तिथे पाहून नाराज होते आणि एका कुत्र्याला घेऊन बाहेर तिच्या छोट्या घरात घेऊन जाते.इथे ते कैदी फार्म हाऊसमध्ये शिरतात आणि बेकीच्या वडिलांना कुटुंबासह ओलीस धरतात .त्यांना एक चावी हवीय ती त्या घरात लपवून ठेवलेली आहे. डोमनिक हा त्यांचा प्रमुख आहे त्याला ती चावी सापडत नाही .
ती चावी बेकीकडे आहे. बेकीला पकडण्याच्या प्रयत्नात तिचा एक कुत्रा मारला जातो.वडिलांचा प्रचंड छळ केला जातो. आता ते सगळेच तिच्या मागे लागले आहेत. पण बेकी स्वतःला वाचविण्यासाठी पळत नाही उलट त्यांच्यावर प्रतिहल्ला करते. त्यासाठी ती कोणत्या योजना करते ते पाहण्यासाठी प्राईम वर हा चित्रपट पाहायला हवा.
चित्रपटात हिंसा आहे.रक्तपात आहे.तेरा वर्षाची मुलगी त्या चारहीजणांवर कशी मात करते हे पाहण्यासारखे आहे.
चित्रपट हिंदी भाषेत प्राईमवर आहे.