Friday, September 6, 2024

ट्रॅफिक

ट्रॅफिक
आज त्याचे विसर्जन होते. दहा दिवसाच्या पाहुणचारानंतर तो परत निघाला होता. हे दिवस त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असतात. खूप काही या दिवसातून शिकता येते त्याला . त्याने भक्तांचे प्रेम पाहिले तर काही भक्तांचा तिरस्कारही अनुभवला.  
एका भल्या मोठ्या उघड्या ट्रकमधून तो निघाला होता. भक्तगण चहुबाजुनी त्याचा जयजयकार करीत होते. काहीजणांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. पुढच्या वर्षी लवकर या अश्या आरोळ्यानी  संपूर्ण परिसर दुमदुमत होता.
त्याने शेजारी बसलेल्या उंदराकडे पाहिले. विविध प्रकारचे नैवेद्य खाऊन तो सुस्तवला होता. आता डायरेक्ट घरीच तो डोळे उघडणार होता. समोर नाचणाऱ्या वेगवेगळ्या कला पथकाचा आनंद घेत तो आरामात सिंहासनावर बसून आजूबाजूला नजर फिरवीत बसला होता.
त्याच्या समोरच्या ट्रकवर काहीजण वेगवेगळ्या अवतारात उभे होती.एक लोकमान्य टिळक बनले होते.तर एक छत्रपती शिवाजी महाराज, तर एक तुकाराम महाराज ,एक महिला तर देवी बनली होती . एक पेहलवान हनुमान बनला होता. 
" अरे वा !  हे सर्व खरोखरच पृथ्वीवर आलेत का ? चला भेटून येऊ ." असे आनंदाने म्हणत त्याने उंदराला उठविण्याचा प्रयत्न केला. पण त्याने डोळे मिटूनच शेपटी आपटत निषेध व्यक्त केला.
" देवा , माझेच वाहन माझ्याच गरजेला उपयोगी पडत नाही " असे पुटपुटत तो खाली उतरला आणि त्या ट्रकच्या दिशेने चालू लागला.
कोपर्यावरच्या टपरीवर चहा पीत वसंत कदम  कंटाळलेल्या चेहऱ्याने ही मिरवणूक पाहत होता.कधीकधी चेहऱ्यावरचे भाव चिडखोर बनत.एकूण हा प्रकार त्याला मान्य दिसत नव्हता. 
वसंत एम्ब्युलंस ड्रायव्हर होता. तो नास्तिक नव्हता पण जगात एक शक्ती आहे जी चांगल्याला चांगले वाईटाला वाईट असते असे तो मानीत होता.
तो आपल्या कामाशी प्रामाणिक होता. या परिसरात हॉस्पिटलची संख्या जास्त होती त्याचबरोबर गिरणगाव असल्यामुळे मराठी सण ही मोठ्या प्रमाणात साजरे व्हायचे. हे गणपतीचे दहा दिवस तर त्याला खूप त्रासाचे ठरत होते.  त्यातही हा विसर्जनाचा दिवस म्हणजे त्याच्या डोक्याला ताप होता.एखादी इमर्जन्सी आली की हॉस्पिटलमध्ये पोचताना नाकी नऊ यायचे.एकदादोनदा तर एम्ब्युलन्समध्येच पेशंटने जीव सोडला होता.आपल्या एम्ब्युलन्समध्ये कोणत्याही पेशंटचा जीव गेला की वसंताला दुःख व्हायचे.
आताही त्याने एकाला  बाप्पाच्या वेशात समोरच्या उघड्या ट्रकमध्ये चढताना पाहिले आणि तो वैतागला.
"च्यायला ,चार सोंगाडे कमी होते म्हणून की काय हा पाचवा त्यांच्यात ऍड झाला " कटिंगचे पैसे देत तो अण्णाला म्हणाला. 
"साहेब आज त्याचाच दिवस आहे .करू दे मज्जा त्यालाही ."अण्णा हसत म्हणाला.
" हो पण त्याला पाहायला पन्नासजण जमा झाले बघ . म्हणजे अजून ट्रॅफिक जाम .अश्यावेळी कोणाला हॉस्पिटलची गरज  लागली तर काय करायचे." तो चिडून म्हणाला.
" तो आहे हो .करेल सर्व व्यवस्थित " ट्रकमधील बाप्पाकडे हात जोडून अण्णा म्हणाला .
" तुला बोलायला काय झाले. तुझा धंदा जोरात चालू आहे " वसंत चिडून म्हणाला.
इथे त्याला ट्रकमध्ये चढताना पाहून सर्व खुश झाले. ह्याने वर येताच टिळकांना नमस्कार केला ." कसे आहात लोकमान्य ? अगदी पहिल्या वेळी मला घरातून उचलून बाहेर मंडपात घेऊन आलात तसेच दिसता तुम्ही "तो हात जोडत टिळकांना म्हणाला तसे सर्व हसले .
" छत्रपती शिवाजी महाराज , आज खूप वर्षांनी आपणास पाहिले. राज्याभिषेकाला मी सर्व देवांचा प्रतिनिधी म्हणून हजर होतो ते शेवटचे दर्शन " तो शिवाजी महाराजांना म्हणाला.
"काय ग ? कशी आहेस ? चेहऱ्यावर जास्तच गोडवा आहे तुझ्या .नाहीतर  चेहरा नेहमी  रागावलेला असतो " त्याने हसत देवीला विचारले.
" आम्ही ठीक आहोत रे .पण तू कुठून आलास ? आणि तू आल्यामुळे आपल्याला पैसे कमी मिळणार नाही ना " हनुमानाने इतरांना विचारले .
" पण यांच्याच मिरवणुकीत यालाच इथे भाग घ्यायला का बोलावले आणि इतका ओरिजनल बाप्पा आणला कुठून ? ह्याची सोंड ही हलतेय बघ " देवी हसत म्हणाली.
" चल आता आला आहेस तर एक सेल्फी काढू " तुकारामांनी खिश्यातून मोबाईल काढीत म्हटले. तसे सर्व खुश झाले .सगळ्यांनी त्याला मधे उभा करून वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी घेतले.
"अय्या, बाप्पाबरोबर सगळे सेल्फी घेतात बघ " खालून जाणारी एक तरुणी मोठ्याने ओरडली .
" बरे सांग ,आप्पा दादाने तुला किती पैसे कबूल केलेत ? " टिळकानी  त्याला विचारले.
" कोण आप्पा दादा ? कसले पैसे " त्याने कुतूहलाने विचारले .
" हे असा  मेकअप आणि ड्रेस घालून उभे राहायचे पैसे किती देणार आहे तुला " हनुमान थोडा आवाज चढवून म्हणाला .
" म्हणजे तुम्ही खरे नाहीत का ? "त्याने आश्चर्याने विचारले तसे सगळे हसू लागले .
" मग तू काय खरा बाप्पा आहेस का ?" देवीने हसत विचारले तसा तो ही हसू लागला .
" मला आवडते वेगवेगळी सोंगे घ्यायला .तुम्ही दिसलात म्हणून भेटायला आलो "तो प्रसंगावधान राखून म्हणाला.
"आला आहेस तर पेप्सी पिऊन जा " छत्रपती म्हणाले.
टपरीवरून निघतानाच वसंतला फोन आला. रिंगटोनवरूनच इमर्जन्सी कॉल आहे हे त्याने ओळखले.
"बाबा अचानक कोसळले ,ऍडमिट करावे लागेल .एम्ब्युलन्स हवीत " समोरची स्त्री रडवेली होऊन सांगत होती. 
" इथून एम्ब्युलन्स घेऊन येणे शक्य नाही हो . भयानक ट्रॅफिक आहे .तुम्हीच कसेही करून घेऊन या जवळपास आलात तर मी  काहीतरी करून हॉस्पिटलमध्ये आणेन त्यांना " वसंत नाईलाज झाल्यासारखा म्हणाला.
" आहो मी एकटीच आहे घरात .माझ्याकडे गाडी आहे पण मला चालविता येत नाही ." ती काळकुतीला येऊन म्हणत होती.
" ठीक आहे मी कसाही तिकडे येतो आपण तुमच्या गाडीतून त्यांना इथे आणू अड्रेस सेंड करा" असे बोलून वसंतने फोन ठेवला.
" काय झाले वसंत भाऊ ? प्रॉब्लेम आहे का ? कुठे जायचे आहे का ? माझी बाईक घेऊन जा " चावी समोर ठेवीत अण्णा म्हणाला.
" थँक्स अण्णा,  मला याचीच गरज होती " बाईकला किक मारीत वसंत म्हणाला आणि दिलेल्या पत्त्यावर सुसाट निघाला.
त्याला दिलेला पत्ता काही अंतरावरचा होता. पण रस्त्यावर गर्दी होती. मुंगीच्या वेगाने गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या . बाईक फूटपाथवरून  आणि गल्लीबोळातून चालवत वसंत दिलेल्या पत्त्यावर पोचला.
ती साधारण पंचवीस मजल्याची बिल्डिंग होती.बहुतेक रहिवासी उच्चभ्रू दिसत होते.चार मजल्याची कार पार्किंग होती.
तो घरात शिरला तेव्हा साधारण सत्तरीचा वृद्ध पलंगावर झोपला होता आणि चाळीशीची स्त्री त्याचे हातपाय चोळीत होती.
"गाडी कुठेय ? "त्याने म्हाताऱ्याला डायरेक्ट उचलत विचारले.
त्या बाईने चावी घेऊनच ठेवली होती 
"चला पार्किंगमध्ये दाखविते " ती पुढे होत म्हणाली .
त्या वृद्धाचा श्वास मंदपणे चालत होता.दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमध्ये त्यांची गाडी होती. ऐसपैस गाडी पाहून त्याला बरे वाटले.मागच्या सीटवर त्यांना झोपवून गाडी सुसाट वेगाने बाहेर काढली.
बाहेर येताच त्याने खिश्यातून मोबाईल काढून सायरन टून गाडीतील स्पीकरला लावली आणि सायरनचा आवाज करीत गाडी हॉस्पिटलच्या दिशेने निघाली.
ट्रकमध्ये बसून पेप्सी पिताना त्याला सायरनचा आवाज ऐकू आला .त्याने कान टवकारले  आणि खात्री करून घेतली.पण या गर्दीतून गाडी हॉस्पिटलपर्यंत पोचेल कशी ?? पुढे गर्दीच गर्दी दिसत होती.
त्याने आपल्या सोबत्याना ही गोष्ट सांगितली ." मग आपण काय करणार ? ट्रॅफिक पोलीस पाहून घेतील .तसेही आपले ऐकणार कोण ? "हनुमान म्हणाला .
" इथे हाच प्रॉब्लेम आहे .नेहमीच ट्रॅफिक प्रॉब्लेम असतो .मी तर शिव्या देतच गाडी चालवतो." टिळक म्हणाले.
" काहीही असो, पण आपण काहीतरी केलेच पाहिजे ?" तो चिडून म्हणाला.
" बघ तुला काय जमते का ? " देवी मोबाईलमधून डोके वर न करताच म्हणाली.
तसा हा खाली उतरला आणि "बाजूला व्हा, बाजूला व्हा" असे  गर्दी बाजूला करत ओरडू लागला .लोकांना काहीच कळेना .
" अय्या तो बघ बाप्पा ट्रॅफिक कंट्रोल करतोय."त्याच्या मागे सायरन वाजवीत येणाऱ्या वसंताच्या गाडीला पाहून एक तरुणी ओरडली.
धावता धावता त्याने एका छोट्या मुलाच्या गळ्यातून शिट्टी काढून घेतली आणि जोरजोराने वाजवीत पुढे पळू लागला .हे पाहून गर्दी मागे हटू लागली . अजून गडबड का वाढली म्हणून त्याने मागे वळून पाहिले तर टिळक छत्रपती शिवाजी महाराज ,देवी, तुकाराम महाराज ही खाली उतरून रस्ता मोकळा करीत होते.
हे पाहून गर्दीने आपोआप रस्ता मोकळा केला आणि वसंतची गाडी हॉस्पिटलच्या आवारात शिरली.
लोकांची गडबड ऐकून उंदीर जागा झाला आणि त्याला रस्त्यावर शिटी फुंकत धावताना पाहिले.
" धन्य आहे बाबा तुझी .जाताजाता  ट्रॅफिकहि मोकळे करून दिलेस "
म्हाताऱ्याला ऍडमिट करताना ट्रॅफिक मोकळा करून दिल्याबद्दल वसंत मनातून बाप्पाचे आभार मानीत होता .
© श्री.किरण कृष्णा बोरकर 

आत्मसंरक्षण

आत्मसंरक्षण
अश्विनी कोसलेकर गावात परत आली ते पुन्हा कधीच मुंबईत न जाण्यासाठी. खरेतर आपले करियर करायला कोकणातील या आपल्या छोट्या गावातून मुंबईला गेली होती. कोकणातून मुंबईला आज नाही तर गेली कित्येक वर्षे लोक जातात .काही तिथेच मुंबईकर बनून राहत तर काही निवृत्तीनंतर परत गावी येत.आपल्या छोट्या जमिनीवर पाहिजे ते पिकवत आणि आरामात पुढचे आयुष्य काढीत.
अश्विनी याला अपवाद नव्हती .ती लहानपणापासूनच हुशार. पण तिची  हुशारी अभ्यासात फारशी नाही तर कोणत्याही झाडावर सरसर चढ .सापळे लावून जनावरे पकड. तर नदीत तासनतास पालथे पडून राहा यातच दाखवली होती. गणपतीची सजावट करण्यात तिचा हात कोण धरू शकत नव्हता .दरवर्षी कोसलेकरांकडे मखर कसा असेल याचीच उत्सुकता सर्वाना असायची .
त्यालाही अश्विनीमुळेच कोसलेकरांकडे जायला आवडायचे.अश्विनी यावर्षी कसले मखर बनवेल  याची उत्सुकता त्यालाही असायची." कोसलेकराकडे  दरवर्षी नवीन घरात जाण्याचा आनंद मिळतो बघ " तो आपल्या उंदराला नेहमी म्हणायचा.
" नैवेद्य ही दरवर्षी नवीन केला तर जास्त आनंद होईल . काकूने कधीतरी माडावरून नवीन नारळ काढून त्याच्या वड्या बनवाव्या इतकीच माफक इच्छा आहे माझी किंवा त्यांनी घरात नैवेद्य बनवूच नये म्हणजे आपण सुखी होऊ " उंदीर चेहऱ्यावर कोणतेच भाव न दाखवता त्याला उत्तर द्यायचा .
दहावी झाल्यावर अश्विनी मुंबईत काकांकडे राहायला आली आणि कॉलेजात जाऊ लागली. पण वाटेतल्या कराटे क्लासकडे तिचे जास्त लक्ष होते.अर्धातास दारात उभे राहून ती कराटेचे ट्रेनिंग पाहू लागली. तिची आवड पाहून क्लासच्या सरांनी तिला काही प्राथमिक गोष्टी शिकवल्या .ती एकटी असताना त्या गोष्टींचा सराव करू लागली.
या क्लासला घरचे परवानगी देणार नाही याची तिला खात्री होती आणि सरांनीही तुला सगळ्या गोष्टी फुकट शिकवणार नाही हे आधीच स्पष्ट केले होते. पण भविष्यात तुमची फी व्याजासकट परत करेन.तिची हुशारी पाहून सरही तयार झाले.
तिचे कॉलेज पूर्ण झाले तेव्हा तिने ब्लॅक बेल्ट कमावला होता. या पाच वर्षात ती बऱ्याच गोष्टी शिकली. शेजारचे ज्यांना आपण काका मामा म्हणतो त्यांची नजर ,त्यांचे स्पर्श ती ओळखू लागली. ट्रेन, बसमधून प्रवास करताना कोणीतरी अंगलटीला येतोय, त्याचे सहेतुक बोलणे, नको त्या ठिकाणी जाणारा हात याचाही अनुभव येत होता . 
पण आता तिच्यात एक आत्मविश्वास आला होता. मग तीही कोण चिकटायला आला की हाताची कमीत कमी हालचाल करून योग्य त्या ठिकाणी प्रहार करी त्यामुळे तो आपोआप वेदना सहन करीत पुढे निघून जाई. कधीकधी तिला दुसऱ्या मुलींच्या मागे उभे राहून स्पर्श करणारे दिसत आणि त्याही काही न बोलता ते सहन करीत असताना पाहून तिच्या डोक्यात जात. 
तिचे शिक्षण पूर्ण झाले आणि मुंबईचा उबग आला. म्हणे मुंबई आणि इतर शहरे सुरक्षित आहेत. रात्री अपरात्री स्त्री एकटी कुठेही फिरू शकते . पण लहान मुली , एकट्या राहणाऱ्या,प्रवास करणाऱ्या,ऑफिसात काम करणाऱ्या  स्त्रिया यांचे काय ? त्यातर ओळखीच्याच माणसांपासून सुरक्षित आहेत का ?
तिने पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला. तसेही घरचे वातावरण जुन्या वळणाचे होते. तिला नोकरी करायला विरोधच होणार होता. मग कशाला नोकरी करायची.आणि नोकरी करताना प्रवासात इतर प्रवाश्यांचा आणि  ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचा  स्पर्श सहन करीत जगायचे का ? 
घरच्यांनी तिच्या गावी येण्याच्या निर्णयाचे स्वागतच केले. गेली पाच वर्षे ती गणपतीच्या आदल्या दिवशी घरी जायची .तिला मनासारखी सजावट करायची संधी मिळायची नाही मग ती वेगवेगळ्या प्रकारचे हार बनवून गणपतीला घालायची. रोज नवनवीन सुगंधित हार पाहून तो सुखवायचा .
या वर्षी ती घरी आली.आता तिला वेळच वेळ होता.पाच वर्षात गाव काही फारसे बदललेले नव्हते. हो पण मोबाईल संस्कृती वाढली होती. व्हाट्स अप फेसबुक इन्स्टाग्राम प्रत्येकाच्या हातात होते.  ती गेली पाच वर्षे एकच मोबाईल वापरत होती. अर्थात तीही सोशल मीडियावर होती पण जरुरी कामापूरती.
गावातील तिच्या बरोबरीची काही मुले आता तिच्यासारखीच तरुण झाली होती.बाईक घेऊन फिरायचे ,हातातील मोबाईलमधून सेल्फी काढायचे .बाजूने जाणाऱ्या तरुण मुली स्त्रियांवर कॉमेंट्स करायचे यातच वेळ जात होता त्यांचा.
तिला एका जागी नुसते बसून राहणे शक्य नव्हते .पण गावात नोकऱ्याही नाहीत. शेवटी तिने कराटेचा क्लास सुरू करायचा निर्णय घेतला .हा क्लास फक्त महिलांसाठी असेल हे ही जाहीर केले.
तिचा हा निर्णय घरच्यांनाच काय तर गावलाही आवडला नव्हता.
" कित्याक हवा ता स्वरक्षण ? आम्ही काय मेलाव काय ? लगीन होवुसतोवर आम्ही हायतच आणि लगीन झाल्यावर नवरो हाय तिच्यासाठी " गावातील जेष्ठ स्त्री पुरुषांच्या प्रतिक्रिया उमटल्या .
क्लास उघडून आठवडा झाला तरी कोण फिरकत नव्हते. नाही म्हणायला शेजारच्या दोन पाच वर्षांच्या मुली खेळायला येत होत्या.मग तीच त्यांना हळूहळू शिकवू लागली .
आता गावाला गणेशोत्सवाचे वेध लागले होते.गेल्या पाच वर्षांची कसर यावर्षी भरून काढायची हे अश्विनीने ठरविले होतेच. आणि अगदी तसाच मखर तयार केला.
यावर्षी तो अश्विनीच्या घरात शिरला आणि खुश झाला . मखर पाहून त्याला जुने दिवस आठवले. पोरीला डोके आहे चांगले. तो शेजारी डोळे मिटून बसलेल्या उंदराकडे पाहत म्हणाला .पण उंदराने डोळे उघडले नाही.
"काहींना कलेची जाणच नसते हे खरे. पण काकू प्रसादात ड्रायफ्रूट टाकणार हे ही नवीनच आहे " तो त्याला ऐकू जाईल इतक्या आवाजात पुटपुटला.
"काय म्हणता ड्रायफ्रूटस " उंदीर खडबडून जागा होत म्हणाला .
"हे बरे ऐकू येते तुला " तो हसत उत्तरला .
गणपतीची पूजा आटपून अश्विनी संध्याकाळच्या तयारीसाठी मार्केटमध्ये गेली. सण असल्यामुळे मार्केटमध्ये गर्दी जास्तच होती .तिच्यासोबत क्लासमध्ये खेळणाऱ्या छोट्या मुली होत्या.
गर्दी असली म्हणजे फायदा घेणारे असतातच . पण तो तरुण त्यांच्यामागे बराच वेळ होता. ते जातील तिथे आजूबाजूला घुटमळायचा 
मध्येच त्याने छोट्या मुलीला आईस्क्रीम देण्याचा प्रयत्न केला .पण त्यांनी झटकून टाकला . आता काहीच प्रतिकार होत नाही म्हणून त्याची भीती चेपली तो अजून धीट झाला.आपला कोपर्याचा तुटलेला दात दाखवत तो किळसवाणे हसला तशी अश्विनीच्या डोक्यात तिडीक गेली.दात ओठ खात तिने हाताचा फटका त्याच्या तोंडावर मारला . फटका खाताच तो चवताळला .रागाने तो अंगावर धावून गेला.तिने पुन्हा उजव्या पायाची लाथ त्याच्या कुशीत हाणली.आतापर्यंत मार्केटची गर्दी त्यांच्या आजूबाजूला जमा झाली होती. तिचा हल्ला पाहून सोबतच्या लहान मुलीही धीट झाल्या.कोपऱ्यात पडलेली काठी घेऊन त्यांनीही त्याच्यावर हल्ला केला.ते पाहून अश्विनी थांबली नाही तिने त्याला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली.आपले काही खरे नाही पाहून तो तरुण धावत सुटला . त्यांचे धाडस पाहून सर्वांनी टाळ्या वाजविल्या.
त्याला मखरात धडपडत शिरताना पाहून उंदीर चकित झाला." काय झाले रे ? तुझी अशी अवस्था कोणी केली ? अरे चार दिवस इथे  सुखाने राहायला येतो त्यातही तू अश्या भानगडी करतोस? चेहरा बघ कसा सुजलाय. कपाळावर ही टेंगुळ येणार बहुतेक "उंदराने प्रश्नांची तोफ सुरू केली.
" जरा गप्प बस रे ." वेदनेने कण्हत तो म्हणाला."औषधोपचार करायचे सोडून प्रश्न  कसले विचारतोस .त्या पोरीने जीव घेतला असता माझा .काय मारते ती .एकेक फटका जीवघेणा आहे तिचा .नशीब वेळीच सावध होऊन पळालो." 
" म्हणजे आता तू मारही खाऊन आलास का ? तो ही एका स्त्री कडून ? देवा आता मी कोणाचे नाव घेऊ ? हेच दिवस बघायचे बाकी होते आता. इथे येऊन इतरांना मदत करतोस हे चांगले होते. पण मारही खाऊ लागलास आता .मीच आता बाबांकडे अर्ज देऊन बदली करायची विनंती करतो . तुझ्यामुळे मीही मार खाणार एक दिवस " समईतील तेल त्याच्या अंगाला लावीत उंदीर म्हणाला.
घरी सगळ्यांनाच अश्विनीची कामगिरी समजली होती. त्यांना हे काही फारसे आवडले नव्हते. "शहरात जाऊन हेच शिकून आलीस का ? " काकू ओरडल्या. "सगळो गाव बघत होतो " कोणीतरी हळूच पुटपुटले.
" मी त्याला प्रतिकार केला ही माझी चूक झाली का" असे अश्विनीच्या मनात येत होते इतक्यात शेजारची त्या लहान मुलीची आई घरात शिरली.
"बरा झाला हो तू सोबत होतीस आणि आमच्या पोरींनीही दोन फटके मारले असे ऐकले " तिने कौतुकाने विचारले.
" ताई  आज मी होते , पण दरवेळी मी नसेन तिच्यासोबत त्यावेळी काय करेल ती " अश्विनीने डोळ्यात डोळे घालून विचारले.
" खरच की बाय .आजपासून ह्या दोघींना तूच क्लासमध्ये कराटे शिकव. उद्या त्यांनाच फायदा होईल चांगले तयार करा त्यांना " त्यांची आई म्हणाली.
" बघ रे ,  मार खाल्ल्याचा काहीतरी फायदा झाला ना ? आज दोन मुली आल्या उद्या चार येतील .आत्मसंरक्षणाचा फायदा आज ना उद्या होणारच. त्यासाठी आज थोडा मार खाल्ला तर काय हरकत आहे." वेदनेने तोंड वाकडे करीत तो म्हणाला .
आज बाप्पाचा चेहरा  सकाळपेक्षा जास्तच लाल का दिसतोय आणि समईतील तेल इतक्या लवकर कसे संपले याचाच विचार आरती म्हणताना अश्विनी करत होती.
© श्री .किरण कृष्णा बोरकर 

दशावतार

दशावतार 
मराठी सुपरस्टार विनयकुमार उर्फ विनायक सुर्वेने यावर्षी दहा दिवस गणपतीसाठी सुट्टी घेतली होती.
कोणाला सांगू नका. पण हल्ली त्याच्याकडे कामच कमी होते. वय वाढले तश्या नायकाच्या भूमिका कमी होत जातात आणि आपण वेळीच सावध होऊन चरित्र भूमिका स्विकारायला पाहिजे हे प्रत्येक कलाकाराने समजून घ्यायला हवे.
विनयकुमारही आता चाळिशीकडे झुकू लागला होता. हल्ली महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून नवीन तरुण तरुणी मराठी सिरियलसाठी येत होत्या. दोन सिरीयल केल्या की ताबडतोब चित्रपटात काम मिळत होते. शिवाय ते मानधन ही कमीच घेत होते.दिवसाला बारा ते चौदा तास काम करीत होते. विनयकुमार ह्यात कुठेही बसत नव्हता.
विनयकुमार हाडाचा कलाकार. सुरवातच त्याने गावातील दशवतारातून केली होती. शिक्षण अर्धवट सोडून तो रंगभूमीकडे वळला होता. पण मोठा भाऊ सुदामने समजावले आणि कलाकाराला शिक्षणही आवश्यक आहे असे पटवून दिले.
मग तो , दुसरा मोठा भाऊ शंकरकडे मुंबईत आला.रात्रीच्या शाळेत शिक्षण आणि दिवसा नाटकात छोटी मोठी कामे करत राहिला .अंगात कला असल्यामुळेच लवकरच चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला आणि लोकांनी त्याला सुपरस्टार केले.
विनयकुमार सुपरस्टार झाला तरी गावाला विसरला नाही. गणपतीला सर्व सुर्वे कुटुंब कोकणातील घरी एकत्र येत. एकदा तर विनायकुमारने गणपतीसाठी शूटिंगही रद्द केले होते. हे पाच सहा दिवसच असतात जेव्हा सर्वजण एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. जुने मित्र भेटतात ,  रात्रभर विविध कार्यक्रम सुरू असतात .खूप धमाल असते आणि ह्याच आठवणी वर्षभर पुरतात. 
वयानुसार विनायकुमारची कामे कमी झाली . हल्ली तो कुटुंबाला जास्त वेळ देतो .मुख्य म्हणजे गावात लक्ष देतो.
यावर्षी गावात होणाऱ्या दशवतारात काम करायचे ठरविले होते. विनयकुमार दशवतारात काम करणार ही बातमी वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने पंचक्रोशीत पसरली होती. काही मंडळांनी तर मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावले होते. खरे तर गावातून एखादा कलाकार बाहेर पडला की तो पुन्हा गावातील रंगमंचावर उभा राहील ही गोष्ट विरळच. 
विनयकुमार फक्त कामच करणार नव्हता तर अभिनय आणि इतर गोष्टींची कार्यशाळाही घेणार होता. विनयकुमारने गावी येताच सर्व गोष्टींची तयारी सुरू केली होती.
यावर्षी तोही खुश होता. तसेही सुदाम सुर्वेच्या घरी जाणे त्याला पहिल्यापासून आवडत होते.वडील गेल्यावर सुदामाने त्याच्या सर्व भावाना  कसे वाढविले .स्वतः गावात राहिला पण भावाना उच्च शिक्षण दिले. गावातील परंपरा आणि संस्कार त्यांच्या मनात बिंबविल्या. म्हणूनच  प्रत्येकवर्षी जगाच्या कोपऱ्यात कुठेही असले तरी सर्व भाऊ सहकुटुंब मला भेटायला येतात याचा त्याला खूप आनंद होत होता .पण यावेळी विनयकुमारचा दशावतार पाहायला मिळेल म्हणून जास्त खुश होता .
आताही तो सुदामच्या डोक्यावर बसून घरात शिरताना स्वतःशी हसत आणि गुणगुणत होता.
"स्वारी आज जरा जास्त खुश दिसतेय. घरी लवकर जरी आलो असलो तरी तुमचा कॅनडातील एक भक्त ट्रॅफिकमध्ये अडकला आहे . तुमच्या भक्तांकडे कितीही पैसे असू द्या पण कोकणात येताना ते वेळ विकत घेऊ शकणार नाहीत.त्यांना रस्त्यावर यावेच लागेल आणि ट्रॅफिकमध्ये अडकावेच लागेल " त्याचा उंदीर कुत्सितपणे शेपटी फिरवत म्हणाला.
"काही गोष्टी देवाला जमत नाहीत आणि तसेही मला तुझ्याशी वाद घालायची इच्छा नाही. नैवेद्य वेळेवर मिळणार नाही याची तुला जास्त चिंता आहे हे माहीत आहे मला " तो किंचित हसत म्हणाला.
"हो , मी देव आहे जादूगार नाही. हे सगळे माहीत आहे मला . पण वेळेची काही किंमत आहे की नाही. हे तुम्ही भक्तांना शिकवत नाही का ? मागच्या वर्षी मुंबईत विसर्जनाला सोळा तास लागले आणि तुम्ही एका पायावर डोक्यावर पृथ्वी घेऊन उभे. शेवटीशेवटी पाय लटपटायला लागले होते. तरी नशीब मागे शेपटीचा आधार देऊन मी उभा होतो." उंदीर फुशारकीने म्हणाला.
" तू काय करतोस हे सांगायला माझे तोंड उघडू नकोस "  तो चिडून म्हणाला. यावर्षी आपले वाहन बदला असे लेखी निवेदनच बाबांना करायचे हे पक्के केले त्याने.
" पण आज एव्हडे खुश का " ? उंदराला विचारल्याशिवाय राहवत नव्हते.
" आजपासून दशावतार सुरू होणार आहेत आणि आपला विनयकुमार त्यात काम करतोय. कित्येक वर्षांनी विनयकुमारला दशवतारात काम करताना पाहणार आहे मी " तो भूतकाळात जात म्हणाला.
" विनयकुमार ना ?? मला वाटले तुम्ही काम करणार आहात की काय ? तुमचा भरोसा नाही .हल्ली इथे येऊन मखरात बसता कुठे म्हणा. कधी पोलिसांचे कपडे धुतात, तर कधी सैनिकाला भेटायला सियाचेनला जाता, तर कधी मेलेल्यांचे पोस्टमार्टेमही करता .मागे तर एका मित्रांसोबत टपरीवर चहा पीत होतात." तो स्वयंपाकघरातील नैवेद्याकडे आशाळभूत नजरेने पाहत म्हणाला.
" आयला ! काय हरकत आहे दशावतारात काम करायला . तसेही मलाच नमन करून सुरवात करतात ना.छान आयडिया दिलीस . यावर्षी दशवतारात काम करूच .अशी संधी नेहमी येत नाही " तो खुश होऊन म्हणाला आणि उंदराने कपाळावर हात मारून घेतला.
आज त्याच्या आगमनादिवशीच दशवताराचा पहिला शो करायचे ठरविले होते. विनयकुमारने बरोबर आठ वाजता कार्यक्रम सुरू करायचा अशी सक्त ताकीद सर्वाना दिली होती. शेवटी तो प्रोफेशनल होता.
आठ वाजत आले आणि विनयकुमारला अनिलचा फोन आला . " भाऊ थोडा उशीर होईल ,एका कामात अडकलय पण कार्यक्रम सुरू व्हायचा आधी तयार होऊनच  येईन " 
झाले !  विनयकुमार चिडला.पण कार्यक्रम वेळेवर सुरू झाला आणि नमनाला सुरवात झाली .सर्व कलाकार स्टेजवर आले आणि गणपतीच्या रुपात तो ही आला.
" आज अनिल तर गणपती बाप्पा बनूनच इलो हा .पॉट कसा रे इतका वाढीवलान आणि अंगावरचे दागिने बघ ,काकूचे सगळेच दागिने पळवीलान की काय " रांगेतील दोघे कुजबुजत म्हणाले.
पयल नमन हो पयल नमन हो असे म्हणत सगळ्यांनी नमनाला सुरवात केली .पण आजचा गणपती नेहमीसारखा नाचत नव्हता . त्याचे नाचणे तालात आणि लयबद्ध होते.आपल्यासोबत तो इतरांनाही सांभाळून घेत होता .काही स्टेप तर अश्या घेतल्या की स्वतः विनयकुमारही चक्रवला.
नमन संपले सगळे आत जाऊन पुढच्या तयारीला लागले इतक्यात अनिल धापा टाकत विंगेत शिरला.
"भाऊ माफ करा थोडो उशीर झालोच " तो हात जोडून म्हणाला.
"तू नमनाला नव्हता तर तुझ्या जागी कोण होता" विनयकुमार चक्रावून म्हणाला.
" माका काय म्हायीत , दोन तीन उंदीर घरात शिरले आणि तांदळाची गोण फाडली .सगळे तांदूळ घरभर पसरले .त्यात तेल ही सांडला .बायको म्हणाली ह्या सर्व नीट करा आणि मग कुठेही जावा . तेच गोळा करीत राह्यलंय .म्हटले धा मिनिटे लेट जाऊ म्हणून तुमाक फोन करून सांगितलंय." अनिल हात जोडूनच बोलत होता.
"ओ विनयभाऊ,  नका विचार करू जास्त.तो आहे आपल्या पाठीशी उभा .आपली मान कधीच खाली जाऊ देणार नाही तो .बघा कसा उत्साह संचारला आहे सगळ्यांच्यात .चला कार्यक्रम सुरू करू." एक कलाकार  गणपतीकडे हात जोडून म्हणाला.
खरेच सर्वांच्या अंगात आज वेगळाच उत्साह संचारला होता. मोठ्या जोशातच दशवताराची सुरवात झाली .
" हे मात्र तुझे अति होतेय.तुझ्या आवडीसाठी मला कामाला लावलेस .त्या अनिलच्या घरी पाठवून तांदळाची गोण कुडतडली मी .तेलाची एक पिशवी ही फाडली .किती त्या बिचाऱ्याचे नुकसान " उंदीर रागारागात शेपटी आपटत भांडत होता.
" गप रे काही नुकसान झाले नाही .कोकणी माणूस आपल्या छंदासाठी असल्या छोट्या नुकसानीला महत्व देत नाही . अन्न ही वाया घालवणार नाही . ते तांदूळ गोळा करून ठेवणार याची खात्री होती मला.उद्या तेच तांदूळ कोंबड्यांच्या पोटात जातील बघ.आणि गोळा केलेले तेल आपल्यापुढच्या समईत जाईल." तो हसत म्हणाला.
" पण काही म्हणा,  तुम्ही नाच मस्त केलात .तुमच्यासमोर बरेच कलाकार नाचतात ते पाहूनच शिकलात का " उंदराने शेंगदाण्याचा लाडू त्याच्या समोर धरीत विचारले.
" छे रे , मला कुठे नाचता येते . पण हे नमनच असे आहे की कोणाचेही पाय थिरकतील त्यावर .किती वर्षांपासून हे नमन ऐकतोय, दशावतार पाहतोय . पण आजही त्याची गोडी कमी होत नाही बघ .किती भाग्यवान आहोत आपण असे दशावतार ,अश्या लोककला कित्येक शतके पाहतोय . मी तर संधी मिळाली तर पूर्ण दशावतार करीन म्हणतो " डोळे मिचकावत उंदराची शेपटी ओढत तो म्हणाला .
© श्री.किरण कृष्णा बोरकर 

अंत्यसंस्कार

अंत्यसंस्कार
रायगड जिल्ह्यातील पोटगाव हे मुख्य शहरापासून थोडे आतच होते. तसेही रायगड जिल्हा मुंबईपासून साधारण शंभर किलोमीटर लांब. तरीही काही गावात मात्र अजूनही शहरीकरणाची लागण झाली नव्हती. पोटगाव ही त्यातलेच. मोजून शंभर घरांचे ते गाव. बहुसंख्य एकाच भावकीतील त्यामुळे त्यांची एकी होती.
गावात सगळे सण उत्साहाने साजरे होत. सणात पूर्वापार चालत आलेल्या प्रथा परंपरा चालत असत.चाकरमानीही हटकून बहुतेक सणाला हजर राहत.
कोकण म्हटले की होळी आणि गणेशोत्सव हे मानाचे सण. जगाच्या पाठीवर कुठेही राहत असलेला कोकणी माणूस आपल्या परीने हे सण तिथे साजरे करतात तर ज्यांना शक्य असेल ते मूळ घरी म्हणजे कोकणात येऊन साजरे करतात.
गावात अनंत चोपडेकर नावाचा एकच मूर्तिकार होता. गावातील सर्व मूर्त्या तोच तयार करत असे.साधारण पन्नाशी पार केलेला अनंत उर्फ अंत्या कोण ? कुठून आला ? हे कोणालाच माहीत नव्हते. पण गेली तीस वर्षे तो गावात एकटा राहतो इतकेच सगळ्यांना माहीत होते.
एकटा जीव सदाशिव असणारा अंत्या संध्याकाळ झाली की दारूचा खंबा उघडून बसायचा.जे फुकटे होते त्यांना आयतीच संधी मिळायची . हळूहळू वय वाढत गेले तसे अंत्याच्या कामात फरक पडू लागला .
तसा अंत्या पक्का गणेशभक्त.एकदा का मूर्ती बनवायला सुरवात केली की तहानभूक हरपून कामात झोकून द्यायचा .मग दारुचेच काय पण खाण्याचेही सुचायचे नाही . 
पण हल्ली त्याचे हात थकायला लागले .गावातील लोक त्याच्याकडून मूर्ती न आणता शेजारच्या गावातून किंवा मुंबईतून आणू लागले. 
 अनंत चोपडेकरवर या गोष्टींचा काहीही फरक पडला नाही . आपल्या कलेवर त्याचा विश्वास होता.जे काही करेन ते मनापासून आणि उत्कृष्ट करेन हेच लोकांना सांगायचा. त्यामुळे गावातील मोजकीच घरे त्याच्याकडे मूर्ती बनवायला देत.
बाळा सावंत हा त्यातील एक. घरातील सर्व बाळाला अंनंत चोपडेकरकडून मूर्ती आणू नका असे सांगत . अंत्या मूर्ती बनवायला फार वेळ लावायचा. बाळाचे शेजारी तर मूर्ती विसर्जनापर्यंत तरी घरी येईल ना ? असे चेष्टेने विचारायचे. पण बाळा नेहमीच आपल्या मतावर ठाम होता. जोपर्यंत मी किंवा अनंत चोपडेकर जिवंत आहोत तोपर्यंत मूर्ती अनंतकडूनच येईल अशी प्रतिज्ञाच केली होती त्याने.
उद्या गणपती येणार म्हणून सगळा गाव खुश होता. हरतालिकेचा उत्सव गावात साजरा होत होता.आज गाव काही झोपणार नव्हते.
बाळा सावंतकडेही सर्व जागेच होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर मूर्ती वेळेत येईल ना याचेच टेन्शन होते. कारण सकाळीच अंत्याने मूर्ती बनवायला सुरवात केली होती. पण त्यानंतर  दिवसभर तो घराबाहेर दिसला नव्हता. रात्र झाली तसे बाळा अंत्याच्या घरी गेला . अंत्या मूर्तीपूढे ठाण मांडून बसला होता. 
रात्रीचे नऊ वाजले होते. मूर्तीचे साधारण नव्वद टक्के काम पूर्ण झाले होते.
" सावतानू आता मूर्ती घेऊनच जावा " बाळा सावंतला दारात पाहताच अंत्या म्हणाला.
" तू सकाळपासून जागेवरून उठलस नाय की काय ?"  बाळाने कमरेवर हात ठेवून रागात  विचारले.
" एकदा बसलंय की काम पूर्ण करूनच उठतय बघा .त्यात तुम्ही जुने गिऱ्हाईक. माझ्यावर तुमचो विश्वास असा. आतापर्यंत तुमका कधी नाराज केलंय नाय .यावर्षीची मूर्ती बघून लोका तोंडात बोटे घालतील बघा." अंत्या हसत म्हणाला.
"त्याची माका खात्री हाय .पण थोडी तब्बेतीची काळजी घे .ह्या वयात इतकी मेहनत  झेपूची नाय तुका " बाळा काळजीने म्हणाला .
शेवटी पहाटे चार वाजता मूर्ती तयार झाली. 
" बाळा भाऊ, आताच मूर्ती घेऊन जा .आता मी झोपलो तर सकाळी कधी उठेन सांगता येत नाय " थकलेल्या स्वरात अनंत म्हणाला .बाळा सावंतने ताबडतोब घरच्यांना बोलावून मूर्ती घरी नेली.
अनंतने खरोखरच मूर्तीत जीव ओतला होता.मूर्तीवरून कोणाचीच नजर हटत नव्हती. बाबा अनंताकडून का मूर्ती घेतो याचे कारण घरातील सर्वानाच पटले होते.
 पण  सकाळी अनंत चोपडेकर गेला ऐकून संपूर्ण गाव हळहळले. अर्थात  त्या हळहळीमागची कारणे वेगवेगळी होती.
काहीजण आपल्याला यापुढे स्वस्तात मूर्त्या मिळणार नाहीत याचे दुःख करीत होते. तर काहींना पैसे परत मिळणार नाहीत याचे दुःख,  तर काहींना आता त्याची स्तुती करून फुकटची प्यायला मिळणार नाही याचे दुःख.
होय अनंत  चांगला कलाकार असला तरी व्यसने होतीच. माणूस म्हणूनही खूप दिलदार होता. अनंतला लोक फक्त मूर्ती पाहिजे असे सांगत. तो त्याच्या मनाप्रमाणे तो मूर्ती घडवे आणि लोक देतील तितक्या किमतीला देत असे.
" भावानो कलेची किंमत करायची नसते" असे संध्याकाळी मैफिलीत बसल्यावर बोले. खिश्यात पैसे असले की गरजूना मदतही करत असे आणि नसले की लोकांकडून उधारही घेत असे. त्याचाच फायदा घेऊन काहीजण त्याच्याकडून दारू फुकट पिऊन जात. 
गणेशोत्सव जवळ आला की हा मूर्ती बनवायला बसायचा.त्याच्या लहरीपणामुळे लोक बाजूच्या गावातून मूर्ती आणायचे. पण  हा ज्यांना मूर्ती बनवून द्यायचा त्यांना तर तिचे विसर्जन करायचीही इच्छा होत नसे.
पण एकदा का मूर्ती बनवायला सुरवात केली की अनंत दारूला स्पर्श करत नसे. तो मोजक्याच मूर्त्या बनवायचा पण त्याही मनापासून .मूर्ती बनवताना आपल्या मनातले सर्व मूर्तीशी बोलायचा. आपली सुखदुःख त्याच्याशीच शेयर करायचा. त्याच्या कुटुंबाविषयी  कोणाला फारशी माहिती नव्हती माहिती असेल तर फक्त त्या समोर असलेल्या बाप्पाला.
आजपासून त्याचा उत्सव चालू होणार होता. हल्ली तो दोन दिवस आधीच इथे येत होता. तो येत होता की भक्त उत्साहाने त्याला आधीच घेऊन येत होते हा चर्चेचा विषय.
"आजकाल लोक खूपच उत्साही झाले आहेत. ट्रॅफिकची कारणे सांगून दोन दिवस आधीच मला मंडपात घेऊन जातात आणि तोंडावर कापड घालून कोपऱ्यात उभे करतात. " तो तयारी करत करता आपल्या उंदराशी बोलत होता.
" तुमच्या हातात आता काय राहिले आहे का ?" त्याने राजगिऱ्याच्या लाडूचा तुकडा तोडीत विचारले." मनाला वाटेल तितके दिवस तुम्हाला ठेवतील ते. त्यानिमित्ताने लोकांकडून भरपूर पैसे कमाविता येतात . पण जाऊदे आपल्यालाही चांगला नैवेद्य मिळतोच की " तो शेपटी उडवत  म्हणाला. त्याच्याही अंगावर जरीचे जॅकेट होते
" तुला नेहमी खाण्याचेच सुचते कसे ?  तुला माझे वजन सहन करता यावे म्हणून मी डायटिंग करतो . पण तू मात्र सतत खात असतोस" तो चिडून म्हणाला. 
गावात मात्र अजूनही त्याची तयारी झाली नव्हती.उद्या त्याला बाळा सावंतांकडे जायचे होते. पण दरवर्षीप्रमाणे अनंत त्याच्या हिशोबानेच चालला होता. जितका जास्त उशीर तितका उशिरा नैवेद्य हे नक्की होते. 
तो मनातल्या मनात चरफडत अंत्यासमोर बसला होता.नेहमीप्रमाणे त्याच्याशी गप्पा मारत अनंत हात चालवत होता. खरेतर दरवर्षी अनंताची नेहमीची स्टोरी ऐकून तो कंटाळला होता. ह्याच्या बडबडीतून कोणीतरी सोडवायला आले तर बरे होईल. असा विचार मनात येतोच तोच खुद्द बाळा सावंत दारात हजर झाला.चला आतातरी त्याचे काम लवकर आटपेल .
पण कसले काय ? अनंताचे तोंड दुसऱ्याच विषयावर चालू झाले. बाळाही हट्टाला पेटला होता .मूर्ती पूर्ण झाल्याशिवाय घरी जायचेच नाही असे ठरवूनच आला होता बहुतेक. 
शेवटी काम पूर्ण झाले असे अंत्याने जाहीर केले तेव्हा घड्याळात पहाटेचे चार वाजले होते. बाळा मनातून प्रचंड चिडला होता. पण शेवटी रिझल्ट पाहून त्याचा राग पळून गेला. त्याचेही  तेच झाले . पहाटे चारला अनंत त्याला पूर्ण करून उठला तेव्हा त्याने आरशात स्वतःचे रूप पाहिले आणि खुश झाला .संपूर्ण गावात त्यांच्याइतके  सुंदर कोणी नसेल याची खात्री होती. 
सकाळी तो सावंतांच्या मखरात बसला तोच अंत्या गेल्याची खबर आली.त्याच्या छातीत एकदम धस्स झाले.
आपल्या हजारो वर्षांच्या काळात मृत्यू त्याला नवीन नव्हता.त्याने स्वतः कित्येकांना ठार मारले होते. पण आज पहाटेपर्यंत जो आपल्याला घडवत होता. त्याच्या मनातले सांगत होता. तोच आता या जगातून निघून गेला होता. 
अनंत मनापासून त्याची भक्ती करायचा. तो कधीच कोणाविषयी वाईट बोलायचा नाही. आज तोच अनंत चोपडेकर आपली सर्व सिक्रेटस त्याच्याकडे सोपवून अनंतात विलीन झाला होता.
"बरे झाले बाप्पाला घरी आणले आणि तो गेला .नाहीतर ह्याला काही आणता आले नसते." कोणीतरी पुटपुटले.
" पण ह्या अंत्याचे अंतिमसंस्कार कोण करेल आता  ? कोणाला याच्या घरच्यांची माहिती आहे का ?" गावातील एक जेष्ठ नागरिक विचारत होता.
" बरा झाला हो आपल्या भावकीत नाही .नायतर आख्खो सण सुतकात गेलो असतो. सगळे गणपती देवळात बसवूक लागले असते आणि कोणाकडे जाऊक पण मिळाला नसता." दुसरा जेष्ठ नागरिक पुटपुटला.
" पण आता  या प्रेताला हात कोण लावेल ? गावात प्रत्येकाकडे गणपती बसलाय आणि पूजेची तयारी ही चालू झालीय " पुन्हा तो पहिला जेष्ठ नागरिक म्हणाला.
"आधी आपल्याकडे पूजा करून घेऊ मग काय ते ठरवू " असे ठरवून सगळे आपापल्या घरी गेले.
 इकडे मुंबईत पहाटेचे चार वाजले होते आणि बंड्याचा मोबाईल वाजला. इतक्या रात्री अनोळखी नंबरवरून  कोणाचा फोन म्हणून काळजीने घेतला.
समोरून एक व्यक्ती बोलत होती.तो आवाज भारदस्त आणि विश्वासाचा वाटत होता.  पोटगावात एका व्यक्तीचे अंत्यसंस्कार करायचे आहेत मी नाव आणि लोकेशन पाठवतो.
बंड्या आणि त्याचे काही मित्र अनाथाश्रमातील आणि वृद्धाश्रमातील अनाथ बेवारस प्रेतांचे विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार करीत होते. त्यांचे हे सामाजिक कार्य अनोखेच होते.पण ज्यांना मृत्यूनंतर कोणीच नाही त्यांना बंड्याचा आधार होता. त्याला कधीही कोणीही फोन केला की तो धावून जात असे.
आताही त्याच्या फोनवर  नाव आणि लोकेशन आले तसा तो उठला दोनतीन फोन फिरवले आणि एसटी डेपोकडे निघाला.
दुपारी नेहमीची  एसटी पोटगावात शिरली आणि त्यातून चार तरुण उतरले. गणेशोत्सवात गावात सतत कोणतरी येतच असतात. पण यावेळी हे सगळेच नवीन दिसत होते आणि त्यांनी आल्याआल्या अनंत चोपडेकराचा  पत्ता विचारला.
"अनंत चोपडेकर आजच गेले " पत्ता सांगणारा वरती बोट दाखवत म्हणाला.
"म्हणूनच आम्ही आलोय "त्यातील एक मुख्य तरुण उत्तरला.
" म्हणजे " आश्चर्याने त्याने विचारले.
" मी बंड्या आणि हे माझे मित्र ,आम्ही अंत्यसंस्काराचे काम करतो .पहाटेच मला मोबाईलवर मेसेज आला . अनंत चोपडेकर गेले. त्यांचे अंत्यसंस्कार करायला जाणार का ? त्यांच्या वारसांचा आणि नातेवाईकांचा पत्ता नाहीय आणि शोधायला वेळ ही नाहीय. मग ह्यांना घेतले आणि आलो .चला बॉडी दाखवा लवकर मोकळे होऊ" बंड्या नेहमीच्या सहजपणे म्हणाला.
" आहो असे कसे एकदम अंत्यसंस्कार  करणार  तुम्ही ? " गावातील माणसे हळूहळू गोळा होऊ लागली.
" मग तुम्ही करणार ? करा ,आम्ही निघतो "चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता बंड्या उत्तरला.
ते पाहून सगळे मागे झाले.
" तसे नाही हो .आज सण आहे ना ? प्रेताला हात लावायला सगळे घाबरतात. इथे प्रत्येकाच्या घरात गणपती बसलाय.सुतक पाळावे लागेल म्हणून कोणी पुढाकार घेत नाही " जेष्ठ नागरिक पुढे येऊन म्हणाले.
" हो का ! मी वर अर्ज करतो .सणासुदीला कोणाला वर बोलवू नका .अंत्यसंस्काराला चार माणसे ही गोळा होत नाहीत.तसेही म्हातारे झाले की नातेवाईक दूर होतातच आता सणाचे कारण मिळाले "बंड्या छद्मीपणे हसत म्हणाला.
"चला  आम्हीच करतो सर्व .तुम्ही लांबूनच पहा " बंड्या आवाज चढवून म्हणाला.
शेवटी सर्वजण अंत्याच्या  घरी आले.बिछान्यावर अंत्या वेडावाकडा पडला होता. बहुतेक झोपेतच हृदविकाराचा झटका आला असावा.कोणी हरकत घेणारे नव्हतेच त्यामुळे डॉक्टर सर्टिफिकेट मिळविण्यात कोणतीच अडचण आली नाही .
बंड्या आणि त्याच्या मित्रांनी त्याला उचलून खाली ठेवले.एक जण पाणी गरम करायला गेला. तोपर्यंत गावकऱ्यांनी अंत्ययात्रेचे सामान आणून ठेवले.अनंतच्या शेवटच्या आंघोळीची तयारी झाली. इतक्यात दरवाज्यावर तो येऊन उभा राहिला.
" मी ओमकार , अनंतमामाचा भाचा . मीच तुम्हाला मेसेज केला होता. मला माहितीय गावात  आज कोण हात लावणार नाही याला.  कोणाला तरी बोलावून प्रेताची व्हील्हेवाट लावतील. पण तुम्ही प्रेतावर अगदी धार्मिक रितिरिवाजनुसार अंत्यसंस्कार करतात. हे माहीत होते मला म्हणून तुम्हाला मेसेज केला .मला तुमची गरज आहे म्हणून तुम्हाला बोलावले." ओमकार दिसायला थोडा स्थूल होता. पण चेहऱ्यावर तेज होते.त्याच्या डोळ्यात एक अनामिक शक्ती होती ज्याने समोरचा शांत होत होता.
" मग अंत्यसंस्कार तुम्ही करणार तर " बंड्याने रोखून विचारले.
" होय "असे म्हणत ओमकार घरात शिरला.
" च्यायला माणूस कलाकार होता तर " बंड्या घरात चहूबाजूने नजर फिरवीत पुटपुटला.
मग सर्वांनी मिळून अनंत चोपडेकराच्या अंतिम यात्रेची तयारी केली. खांदा द्यायला ओमकार पुढे झाला तर बंड्याने नेहमीप्रमाणे मडके धरले.
स्मशानात ओमकारने प्रेताला अग्नी दिला आणि बंड्याचे आभार मानले.सर्वजण दुःखी अंतःकरणाने परत फिरले.
" कार्याचे काय ?" स्मशानातून परत फिरताना  बंड्याने ओंमकारला विचारले.
"नक्की ठरविले नाही . त्या दिवशी विसर्जन असेल .मलाही निघावे लागेल " ओमकार म्हणाला.
" तुमची इच्छा असेल तर आम्ही कार्य करू .आता हातात घेतलेले कार्य पूर्णच करू " बंड्या सहज स्वरात म्हणाला.
" तुम्हाला हे कसे जमते हो हे सर्व ?" ओमकारने कुतूहलाने विचारले. "आज घरोघरी गणपती आगमन झालेय .तुमच्याकडेही आला असेल ना ? तरी तुम्ही येथे आलात ?"
" समोर दिसत नसलेल्या देवाची पूजा करण्यापेक्षा आयुष्य जगून मेलेल्या माणसांची सेवा करणे जास्त चांगले नाही का ? गणपती दरवर्षी येतील ,नंतर नवरात्र सुरू होतील ,मग दसरा दिवाळी हे चालूच राहतील .पण जे उत्साहाने साजरे करणारे निघून गेले तर त्यांची आठवण कोण काढणार ? मला त्या लोकांना आनंद द्यायचा आहे जे मृत्यूनंतरही खुश असतील." बंड्या गंभीर होत म्हणाला आणि त्याला नमस्कार करून सर्व स्टॅण्डच्या दिशेने निघाले.
सावंतांच्या मखरात तो  शिरला तेव्हा उकडीचा मोदक खात बसलेल्या उंदराने नाक वाकडे केले. 
" प्रेताला जाऊन आलास तर आंघोळ करून तरी यायचे ना ? आता हा स्मशानातील वास चार दिवस जाणार नाही " तो शेपटी आपटीत रागाने म्हणाला.
" आंघोळ केली तर सर्व निघून जाईल ना ? मग अनंताने मेहनत घेऊन मला तयार केले त्याची मेहनत ही फुकट जाईल ना ? राहू दे असेच .त्यानिमित्ताने  घरी जाईपर्यंत अनंताची आठवण येत राहील."तो उदासपणे म्हणाला.
" शेवटी इथे आल्यावर अंत्यसंस्कार करायची इच्छा ही पूर्ण करून घेतलीस तर .ते तरुण कुठे सापडले तुला ? पटकन धावून आले तुझ्या मदतीला " उंदराने कुतूहलाने विचारले.
" या देशात मूलखावेगळी माणसे आहेत बघ.फक्त त्याची माहिती आपल्याला नसते.ह्याची माहिती मला एका वृद्धाश्रमात मिळाली. अनंतने भाचा मुंबईत असतो हे बोलता बोलता मला सांगितले होते. तो नक्की कुठे आहे हे त्यालाही माहीत नव्हते .मग मीच बंड्याला मेसेज केला आणि भाचा बनून पुढे गेलो. हे अंत्यसंस्कार कसे करतात आपल्याला माहीत नाही म्हणून याना मदतीला घेतले आणि अग्नी द्यायचे काम मी केले.तसेही अनंत दरवर्षी मला घडवितो  मग माझे बाबा झाले ना ते. त्यानिमित्ताने पुत्राचे कर्तव्य पार पाडले. अरे ही सर्व आपलीच माणसे आहेत.आपल्याला डोक्यावर घेऊन घरी आणतात आपल्याला निरोप देताना डोळ्यातून पाणी काढतात. मग त्यांच्यासाठी  मी इतकेही करू शकत नाही का ? चल मोदक काढ मलाही भूक लागली " उंदरांच्या हातातील मोदक हिसकावून घेत तो म्हणाला.
 रात्री आरती म्हणताना  गणपतीच्या अंगाला राखेचा विशिष्ठ वास कसा येतोय ?  असा प्रश्न सावंतांना पडला होता.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Tuesday, September 3, 2024

ग्यारः ग्यारः

ग्यारा ग्यारा 
Gyaarah Gyaarah
 साल 2001  उत्तराखंडातील एका छोट्या गावात दसरा उत्सव सुरू असतो. आठ वर्षाचा युग आर्य आणि सात वर्षाची  आदिती तिवारी दोघेही जत्रेत फिरत असताना अदितीचे अपहरण होते. त्यानंतर पाच लाख खंडणी देऊनही तिचे प्रेत नदीत सापडते. 
आज या गोष्टीला पंधरा वर्षे होतील.सरकारने पंधरा वर्ष पूर्वीच्या सगळ्या केसेस बंद करायचा कायदा काढला आहे .आदितीची आई अनेक वर्षे खऱ्या गुन्हेगारांचा शोध घ्यावा म्हणून लढतेय. आज युग आर्या पोलीस इन्स्पेक्टर झालाय.त्याने आदितीला एका स्त्रीसोबत जाताना पाहीले होते. तो आदिती प्रकरणाचा शोध घ्यायचा ठरवितो .त्याच्या हातात फक्त तीन दिवस आहे.तो सिनियर ऑफिसर वामीका रावतला पटवून देतो आणि त्या तीन दिवसात केस सोडवायचे ठरवितो.
2001 ला सबइन्स्पेक्टर शौर्य अंथवाल अदितीच्या  केसवर काम करतोय. त्यावेळी वामीका नुकतीच पोलीस फोर्समध्ये जॉईन झाली होती आणि इन्स्पेक्टर शौर्य तिचा आदर्श होता. शौर्य प्रकरणाच्या मुळाशी जातोय असे वाटत असतानाच गायब होतो .
आज 2016 चालू आहे. रात्रीचे अकरा वाजून अकरा मिनिटे होतात आणि पोलीस स्टेशन मध्ये जुना व्हॉकीटॉकी वाजतो.युग आर्या तो उचलतो तेव्हा पलीकडून सब इन्स्पेक्टर शौर्य बोलत असतो .
हे कसे शक्य आहे ?? शौर्य अंथवाल तर 2001 ला गायब झालाय आणि आता तर 2016 चालू आहे.पण हे शौर्यला माहीत नाही.पण तो युग आर्याला ओळखतो आहे. त्याच्याच टिपवर तो जुन्या मिलमध्ये पोचलाय आणि आदिती मर्डर केस चे काही नवीन पुरावे सापडले आहेत असे सांगतो.पण एक मिनिट संपताच वोकीटॉकी  बंद होतो.
हा काय प्रकार आहे .भूतकाळातील व्यक्ती वर्तमानकाळातील व्यक्तीशी कशी बोलू शकते.?
हे इथेच थांबत नाही .सब इन्स्पेक्टर शौर्य इन्स्पेक्टर युग आर्याशी 1990 आणि 1998 साली ही वेगवेगळ्या केसवर बोलतो . शौर्य आणि युग ज्याज्या वेळी वॉकीटॉकीवरून एकमेकांशी बोलतात त्यावेळी घड्याळात अकरा वाजून अकरा मिनिटे झालेली असतात आणि त्यांचे बोलणे फक्त एक मिनिटेच होणार असते.
हा सर्व गुंतागुंतीचा प्रकार जाणून घ्यायचं असेल तर झी 5 वर ग्यारह ग्यारह  हिंदी सिरीज नक्की पहा.
ही सिरीज डेहराडून मसुरीच्या पार्श्वभूमीवर चित्रित केली आहे.
कृतिका कामरा, राघव जुयल, धैर्य कारवा हर्ष छाया प्रमुख भूमिकेत आहे.आठ भागाची ही सिरीज आपल्याला गुंतवून ठेवते.

Sunday, September 1, 2024

प्रवास

प्रवास
एक जानेवारीला नवीन कॅलेंडर घरात लागले की अण्णा कोळमकर गणेश चतुर्थीवर खूण करून ठेवायचे. काहीही झाले तरी कोकणातील घरी गणपतीला जायचे हे ठरलेलेच होते. 
वयाच्या पंधराव्या वर्षी दहावी पास होऊन कोकणातील छोट्या गावातून मुंबईत शिक्षणासाठी आले . तेव्हापासून दरवर्षी फक्त गणपतीला गावी जायचे असा नियमच स्वतः ला घालून दिला होता. गावातील घरी गणेश उत्सव जोरात साजरा व्हायचा .अजूनही होतो म्हणा.
 पुढे शिक्षण पूर्ण होऊन सरकारी नोकरीत लागले. हळूहळू बढती मिळत गेली .घरात आर्थिक सुबत्ता आली .मुलेही चांगल्या शाळेत शिकली आणि घरी चार चाकी आणण्याचे स्वप्न ही पूर्ण झाले .
पण गेली काही वर्षे अण्णा गणपती मुंबईतून गावी नेऊ लागले होते.त्यावेळी गावी जाण्यासाठी फक्त लाल डब्बा म्हणजे एसटीच  उपलब्ध होती .
 अण्णांना सरकारी नोकरी लागली त्यावर्षी पासून त्यांनी मुंबईतूनच गणपतीची मूर्ती गावी नेण्यास सुरवात केली.पहिली काही वर्षे अनेकांनी कपाळावर आठ्या आणत विरोध केला.
" गावात काय चांगल्या मूर्ती बनवत नाही का ? आमच्या पवारांच्या तीन पिढ्या गणपती बनवतात आणि स्वतात विकतात ." बापू पवार  पारावर बसून चिडून  सर्वाना सांगत होते.
" चाकरमान्यांक सवयच लागली हा, साबणापासून तेलापर्यंत सर्व मुंबईसून आणूचा "म्हातारी जनाकाकू तंबाखूच्या मशेरीने दात घासत म्हणाली.
पण अण्णा कोणाचेच ऐकत नव्हते. इथल्या मूर्तिकाराला पाहिजे तशी मूर्ती बनवायची ऑर्डर द्यायची मग दोन दिवस आधी मूर्ती उचलायची आणि लाल डब्यात बुकिंग करून प्रवासाला सुरवात करायची.
पहिल्यांदा गणपती मूर्ती उघडीच असायची .अण्णांच्या शेजारच्या सीटवर बसायची.पाऊस लागू नये म्हणून अंगभर प्लास्टिक पेपर असायचा. हळूहळू कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागली तशी मूर्ती अण्णांच्या मांडीवर आली. थोडा त्रास व्हायचा पण प्रवास मजेशीर असायचा .एसटीतील सर्व प्रवासी भजन गात आरत्या म्हणत प्रवास करायचे .मुले अण्णांचा त्रास पाहून त्यांना समजवायचे पण अण्णा निश्चयापासून ढळले नाहीत.
मग रेल्वे सुरू झाली . तेव्हा प्रवास थोडा सुखकर झाला .अण्णा रात्रभर रांगेत राहून रेल्वेची तिकीट काढायचे .पाहिले काही वर्षे जनरल मग नंतर एसी .अण्णांना गणपती सोबत पाहून काही प्रवासी चेष्टेने म्हणायचे बाप्पा भाग्यवान आहे .एसीने प्रवास करतोय. पण यावेळी मूर्ती एका बॉक्समध्ये बंद झाली होती.आता ती अण्णांच्या बाजूला किंवा मांडीवर ही बसत नव्हती तर दोन सीटच्या मध्ये पायाखाली ठेवली जात होती.
आता अण्णांची मुले मोठी झाली होती.लग्न होऊन संसार ही सुरू झाला होता तर अण्णा पुढील वर्ष दोन वर्षात निवृत्त होणार होते.
मुलाने नवीन गाडी घेतली होती.गाडी मोठी होती .पूर्ण फॅमिलीचा विचार करून घेतली होती.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपतीवरून वाद झालाच .पण अण्णा बधले नाहीत.
गावी जाण्याआधी मूर्ती घरात आली .अण्णांनी मूर्ती पॅक करायला सुरुवात केली.पाहिले प्लास्टिक पेपर .मग थर्माकोलचे पॅकिंग नंतर सर्वबाजूनी चिकट टेप त्यावर कापडाची रिकामी घोण .मग एक छान लाकडी बॉक्स तयार करून मूर्ती त्यात फिट बसवली गेली. मुलाने फॅमिलीत गणपती आहे हे पूर्वीच मान्य केले होते त्यामुळे त्याच्यासाठी जागा होतीच.
दुसऱ्या दिवशी सकाळीच कोळमकर  फॅमिली  मूर्तीला घेऊन घराबाहेर पडली. पनवेलपर्यंत प्रवास सुखाचा होता.रस्त्यावर आणि समुद्रावर बांधलेल्या ब्रिजमुळे पनवेल लवकर आले पण जसा मुंबई गोवा महामार्ग सुरू झाला तशी गाडीत बसलेल्या सर्वांची हालत बेकार झाली.रस्तोरस्ती खड्डे ,ठिकठिकाणी ट्राफिक जाम . गाडी सोडून कुठे जाता येत नाही .पण इतके असूनही अण्णा शांतच होते .
पण बॉक्समध्ये बसलेला तो आता थोडा चिडला होता. चारीबाजूने बांधलेले असल्यामुळे त्याला हालचाल ही करता येत नव्हती .माझी ही अवस्था तर माझ्या मूषकाची काय हालत झाली असेल असा विचार करत त्याने बाजूला पाहिले तर तो उंदीर रागारागाने ती चिकटपट्टी कुरतडत होता.
" काय गरज आहे अण्णांना दरवर्षी मुंबईतून आपल्याला घेऊन गावी जायची ? तू काही करत का नाहीस ? पूर्वी ठीक होते पण आता तर आपल्याला बांधून घेऊन जातात.त्या पवारांकडून का आणत नाहीत आपल्याला.हल्ली पवार किती मॉर्डन मूर्त्या बनवितात.मागच्या वर्षी मला रॉबट बनविला होता आणि तुला कमांडो . तू एकदा खडसावून विचार त्यांना. या टेपमुळे अंगाला खाज सुटलीय ." त्यांने हसून मान डोलावली आणि डोळे मिटून झोपेची आराधना करू लागला.
घरी पोचल्यावर अण्णांनी बॉक्स खोलला. मूर्तीच्या हातावरचा आणि सोंडेवरचा रंग उतरला होता.काही ठिकाणी थोडी खपली निघाली होती . अण्णांनी ती नवीन रंगकाम करून बुजवून टाकली आणि मखराच्या तयारीला लागले.
रात्री सर्व झोपले असताना तो अण्णांच्या जवळ गेला. "अण्णा,  तुमची मनस्थिती मी समजू शकतो .कोकणात रोजगार नाही .पुरेशी प्रगती नाही ,भौगोलिक स्थिती नाही म्हणून बहुतेक तरुणवर्ग मुंबईत जातो. त्यांचा प्रवास नेहमीच कष्टाचा राहिला आहे.आहो त्यांना  गावाला येण्याजाण्यासाठी चांगले रस्तेही  नाहीत ना सोईसुविधा . तरीही दरवर्षी प्रत्येक कोकणी माणूस आपल्या कुटुंबाला घेऊन त्या प्रवासाचा त्रास सहन करत माझ्यासाठी इथे येतो. आज कित्येक  वर्षे कुटुंबासोबत मलाही तुम्ही इथे घेऊन येतात ते आम्ही तुझ्यासाठी किती कष्टाचा आणि त्रासाचा प्रवास करतो हे मला दाखविण्यासाठीच .आज कोकणात येणारे प्रवासी वाढले ,लोकांकडे वाहने आली पण रस्तेमात्र तेच आहेत उलट पूर्वीपेक्षा जास्तच खराब झालेत आणि या गोष्टीला मीच साक्षीदार आहे. अण्णा ,कोकणचा महामार्ग तयार होईल हे निश्चितच, पण त्यासाठी किती वेळ लागेल हे मीही सांगू शकणार नाही.जशी कोकणात तुम्ही संघर्ष करून रेल्वे आणलीत तसाच संघर्ष तुम्हाला रस्त्यासाठी करावा लागेल . पण जोपर्यंत तुम्ही मला मुंबईतून इथे आणाल तोपर्यंत मी कधीच कोणतीही तक्रार न करता तुमच्या सोबत येईन .तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल तुमची दरवर्षी माफी मागतोय मी आताही मागतोय." असे बोलून त्याने हात जोडले.
अण्णा दचकून जागे झाले तेव्हा तो कोपऱ्यात शांतपणे बसला होता. सोंडेवर आणि हातावर लावलेला नवीन रंग बाहेरच्या प्रकाशात चमकत होता.
" तू खडसावले ना त्यांना " झोपमोड झालेला उंदीर जांभई देत म्हणाला.
" कोकणातील रस्ते जोपर्यंत चांगले होत नाही आणि चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी सुखकर होत नाही तोपर्यंत अण्णांसोबत असेच यावे लागणार आपल्याला " कोपरावर नवीनच लावलेल्या मातीकडे पाहत तो उदासपणे उद्गारला.
" मग कर की रस्ते चांगले .तुला काय अश्यक्य आहे " उंदीर आवेशात म्हणाला.
" मित्रा मी देव आहे .जादूगार नाही.मी काही गोष्टी अरेंज करू शकतो पण त्या पूर्ण करणे माझ्या हातात नाही. गेली सतरा वर्षे हा महामार्ग बनतोय पण कधी पूर्ण होईल ते कोणताच देव सांगू शकत नाही.चल आराम कर कारण अण्णा विसर्जनापर्यंत आपल्याला झोपू देणार नाही" डोळे मिटत तो म्हणाला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर