द गन्स ऑफ नॅव्हारन ..अलिस्टर मॅकलिन ...अनुवाद अशोक पाध्ये
1961 साली प्रदर्शित झालेला" द गन्स ऑफ नॅव्हारन हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धातील एका गोष्टीवर बेतला होता . तेव्हाचा सुपरस्टार ग्रेगरी पेक ह्याने मुख्य भूमिका केली होती . खैसर या बेटावर अडकलेल्या 1200 ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्यासाठी एका चार जणांच्या पथकाची नियुक्ती होते . खैसर बेटाजवळ जाणाऱ्या बोटींना प्रमुख अडथळा होता तो नॅव्हरान बेटावरील किल्ल्यावर असलेल्या महाकाय तोफांचा .त्या तोफा नष्ट करण्यासाठी उंच कडा पार करून जाणे भाग होते . त्या तोफा नष्ट करायची कामगिरी या पथकावर सोपवली जाते . जर्मन आणि इटालियन सैनिकांच्या कडक पहाऱ्यात आणि ब्रिटिश आरमाराच्या बोटी नष्ट करण्याआधीच तो उंच कडा पार करून त्या तोफा नष्ट करणे जरुरीचे होते . अतिशय थरारक अशी कादंबरी आणि त्यावर बेतलेला चित्रपट .
Thursday, March 16, 2017
द गन्स ऑफ नॅव्हारन
Wednesday, March 15, 2017
मन वढाय वढाय .......सौ. नेहा दाबक
मन वढाय वढाय .......सौ. नेहा दाबके
कविता म्हटल्या कि आपल्या डोळ्यासमोर पाडगावकर ,करंदीकर ,कुसुमाग्रज ,हे जुने आणि सौमित्र ,चंद्रशेखर गोखले हेच आठवतात . पण त्याही पलीकडे असे काही आहेत जे सहज सोप्या भाषेत उत्तम कविता करू शकतात . सौ. नेहा दाबके या त्यातीलच एक . स्वप्नातील राजकुमार ते वास्तवातील चटके यातील प्रवास उत्तम आणि साध्या सरळ रचनेत त्यांनी मांडला आहे . मुक्तछंद प्रकारातील या कविता वाचताना खूप आनंद देतात . एका सध्या गृहिणीची रोजची धावपळ आणि त्यातून सुचलेल्या कविता या आपल्यातल्याच वाटतात . मुलीची लोकल चुकू नये म्हणून तिला गाडीवरून सोडताना होणारी मनाची घालमेल आपल्याला चटका लावते .तर रोजच्या जेवणातील वस्तू महाग झाल्या कि त्यांची चव कशी बिघडते याची मिश्किल मांडणी आणि पाणीप्रश्नावर भांडणारे नवरा बायको आपल्याला हसवून जातात . स्वप्नातील राजकुमारकडे पाहून आपण हळवेही होतो . सर्व कविता वाचून असे वाटते कि अरे ह्या तर आपल्याच आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आहे आणि किती समर्पकपणे त्या मांडल्या गेल्या आहेत . खरेच मन अस्वथ असेल तर हा कवितासंग्रह वाचून मूड रिफ्रेश करायला काहीच हरकत नाही . सध्यातरी हा खाजगी कविता संग्रह आहे पण भविष्यात उत्तम कविता वाचायला मिळतील याची खात्री वाटते . सौ. नेहा दाबके याना खूप शुभेच्छा
Monday, March 6, 2017
प्रेमविवाह
"भाऊ मी येतोय ",विक्रमचा फोन आला.
" ये पण काहीतरी घेऊन ये खायला ,घरात काही बनवणार नाही अशी सौ बोलली आहे" . मी हसत म्हणालो .
"ते महत्वाचे नाहीय ,वेगळा प्रॉब्लेम आहे"!!
त्याच्या आवाजातील काळजी ऐकून मी गंभीर झालो . विक्रम आणि इतका गंभीर ???? नक्कीच काहीतरी गंभीर प्रकरण आहे . थोड्या वेळाने तो आला आणि शांतपणे बसला .सौ हि काळजीने माझ्या बाजूला येऊन बसली .
"अरे यार, आमच्या चिंगीने घोळ केलाय "!!
" काय केले तिने" ?? मी काळ्जीनेच विचारले .
चिंगी उर्फ चैत्राली ,विक्रमाची भाची हुशार MBA झालेली. एका कंपनीत 35000 रु पगारावर काम करते . अतिशय हुशार लाघवी आणि प्रेमळ स्वभावाची .
"अरे तिचा मित्र आहे एक .बाहेरच्या जातीचा आहे . बरीच वर्षे एकमेकांना ओळखतात .तिच्या घरीही येणे जाणे आहे . त्यामुळे घरचेहि ओळखतात त्याला चांगले . त्याने हिला मागणी घातली लग्नाची ".
"अरे वा छानच आहे मग ,पुढे काय ?? मी खुश होऊन म्हटले
" पुढे तोच तर घोळ आहे . हि म्हणते मी अजून विचार केला नाही .निर्णय घेतला नाही" .
" म्हणजे काय" ?? इतकी वर्षे ओळखतात ना एकमेकांना तरी अजून निर्णय घेऊ शकत नाहीत ?? सौ. च्या आवडीचा विषय आला तेव्हा तिला कंठ फुटला .
झाले !!आता काही नाश्ता मिळणार नाही याची खात्रीच पटली.
"बघांना वहिनी तेच तर सांगतोय मी. मुलगा चांगला आहे पण संसार करायचा तर बाकीच्या गोष्टी पाहायला नको ?आज तिला दुखवायचे नाही म्हणून तिची प्रत्येक गोष्ट उचलून धरतोय तो .पण पुढे संसार आहे .त्यात हे चालणार आहे का ??
" म्हणजे ?? मी कुतूहलाने विचारले
"अरे मुलगा साधा पदवीधर ,पुढचे शिक्षण अर्धवट सोडलेले ,घरात आई वडील . वडील हार्ट पेशंट ,तर आई सतत आजारी .साधा चहा करायला जमत नाही . लहान भाऊ इंजिनीरिंग करतोय . त्यात ह्यांच्या समाजात मुली फारश्या नोकरी करीत नाहीत ".
"देवा "!!! सौ काळजीने उद्गारली .
तिचा स्वर ऐकून माझी चहाची आशाहि मावळली .
" मग कठीण आहे हो भाऊजी."
"बरे मुलगा काय करतो ?? माझा गंभीर आणि महत्वाचा प्रश्न .
" तो जॉब करीत होता साधारण 20000 रु .पगार होता नंतर शिक्षणासाठी जॉब सोडला. आता कसला तरी बिझनेस करतोय .
"कसलातरी" ??? मी चिडून विचारले.
" ए भाऊ, तू नीट विचार रे ".चहाची आशा मावळल्याबरोबर विक्रमहि चिडला होता .
" एक सांग विकी तुमचे काय मत आहे" ??
"अरे आमचा तर विरोध आहे .प्रेमविवाहला आमचा विरोध नाही पण लग्नानंतर तिची ससेहोलपट होऊ नये असे वाटते . काय काय करेल ती ?? नोकरी करेल ,सासू सासर्यांची सेवा करेल ,दिराचे कपडे धुवेल ,आणि नवर्यावर प्रेमही करेल ?? शक्य आहे का हे 24 तासात ?? बरे नोकरी सोडली तर खाणार काय हे ?? कसे भागेल यांचे ?? आणि तरीही या बाईसाहेब म्हणतात अजून निर्णय नाही घेतला .
विक्रमचा आवाज चढला .आज बाहेरच चहा नाश्ता करायचा आणि तोही माझ्याच पैशांनी हा निर्णय मी ताबडतोब घेतला . इतक्यात सौ म्हणाली" भाऊजी बरोबर आहे तुमचे. आपल्यावेळी असे नव्हते .एकत्र कुटुंब होते त्यामुळे सर्व एकमेकांना सांभाळून घ्यायचे पण हल्ली वेगळा संसार आणि तोही मोजकाच त्यामुळे नवी नवलाई संपली कि संसाराचे चटके चालू होतात . पैश्याची ओढाताण सुरु होते . पिझा बर्गर ऑर्डर करून खाणाऱ्या मुली फार काळ हे सहन नाही करू शकत . त्यात सासू सासर्यांना सांभाळणे म्हणजे कठीण हो " माझ्याकडे तिरकी नजर टाकत ठसक्यात म्हणाली .
" विक्रम फारच गंभीर विषय आहे आपण बाहेर जाऊन बोलू ". मी माझे शेवटचे अस्त्र काढले .
तशी सौ . म्हणाली," हो चला मी पण येते . बाहेरच खाऊ ,नाहीतरी मला कुठे मिळते बाहेर पडायला ".
हा ही वार फुकट गेला शेवटी .
" हे बघ विक्रम तू बहिणीला घे आणि पहिला जाऊन त्या मुलाशी चर्चा कर . त्याला तुमच्या मनातले सर्व प्रश्न विचारा .तो काय म्हणतो, कोणती आश्वासने देतो ती नीट ऐका . मग चिंगीशी बोला तिला सर्व तुमच्या शंका विचारा तिला प्रश्न करा . मग दोघांना एकत्र बसवा आणि चर्चा करा . त्यातून जो निर्णय होईल तो घेऊन तिच्या आई वडिलांशी चर्चा करा . तुम्हा दोन्ही कुटुंबात मोकळी चर्चा व्हायला पाहिजे . लपवाछापवि नको . म्हणजे उद्या काही झाले तरी दोन्ही कुटुंबाची जबाबदारी राहील.
"आणि त्यांनी नाही ऐकले तर ?? विक्रमच्या स्वरात काळजी डोकावली.
" मग नंतरची परिस्थिती आणि परिणामाना तेच जबाबदार राहतील .हे बघ विकी मुले मोठी आहेत. पण ते फक्त आताचच विचार करतायत . मुलगी द्यावी श्रीमंतकडे आणि सून आणावी गरीबाकडली असे म्हणतात . मुलीच्या संसाराची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी असे प्रत्येक आई वडिलांना वाटते . संसार केवळ प्रेमावर चालत नाही तर संस्कार आणि पैसा हि लागतो . त्यांना भविष्याची जाणीव आपण करून द्यायला पाहिजे .दूरच कशाला हिच्या मैत्रिणीच्या मुलीने प्रेमविवाह केला .छान चालू होते सगळे .मुलगीही झाली .पण आता कुरबुरी चालू झाल्या . त्यादिवशी घरी येऊन हिला म्हणाली" मावशी खूप मोठी चूक केली मी लग्न करून . तेव्हा तुम्ही या गोष्टीचा नीट विचार करावा असे वाटते आणि आपसात चर्चा करूनच हा प्रश्न सुटेल . चिंगी समजूतदार आहे म्हणून निर्णय घ्यायला उशीर होतोय. तुम्ही साथ द्या तिला .हळू हळू समजेल ती . हो! आणि कसे समजवायचे हे तुम्हीच ठरावा दुसर्यांना घेऊ नका" .
हे ऐकून विक्रम विचारात पडला .थोड्यावेळाने त्याने मान डोलावली आणि सौ. ला म्हणाला ",चला वहिनी आज बाहेर नाश्ता देतो तुम्हाला ".
(C) श्री. किरण बोरकर
Sunday, March 5, 2017
लाईम लाईट ....अच्युत गोडबोले
लाईम लाईट ....अच्युत गोडबोले - निलांबरी जोशी हॉलिवूड आणि विदेशी चित्रपटांचे आकर्षण सगळ्यांना असते .आपण अनेक प्रसिद्ध अजरामर चित्रपट पाहतो अनेक विदेशी कलाकार ,दिग्दर्शक , आपल्याला माहित आहेत आपण त्यांचे चाहते हि आहोत . पण हि माणसे कशी घडली ,त्यांच्याकडून हे चित्रपट कसे घडले त्यांची मेहनत ,त्यांचे खासगी आयुष्य कसे होते याबद्दल आपल्याला फार काही माहित नसते .पण हे सर्व आपल्याला एकाच पुस्तकात मिळाले तर ??
. लाईमलाईट मध्ये हेच आहे . विदेशी चित्रपट सुष्टीतले दिग्गज दिग्दर्शक आणि त्यांच्या हातून घडलेल्या उत्कृष्ट कलाकृती यांची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे .
स्वतःचे दुःख लपवत आणि त्या दुःखाला कारुण्याची झालर लावून जगाला खो खो हसवणारा चार्ली चॅप्लिन .तर जगातील तीन महान दिग्दर्शकाच्या पंक्तीत बसलेला पण एकही ऑस्कर न मिळविणारा थरारक ,रहस्यमय चित्रपटांचा बादशहा आल्फ्रेड हिचकॉक आणि त्याचे प्रसिद्ध चित्रपट सायको. डायल एम फॉर मर्डर . मिकी माऊसला डोनाल्ड डक सारखे कार्टून अजरामर करणारा कार्टूनचा बादशहा वॉल्ट डिस्ने . जपानी चित्रपटाला जागतिक पातळीवर नेणारा अकिरा कुरोसावा यांची सुरेख माहिती यात आहे . राशोमन सारखा महान चित्रपट आणि शोले चित्रपट ज्या चित्रपटावरून घेतला आहे तो सेव्हन सामुराई हे चित्रपट कुरोसवाच्या करकीर्दीत मनाचा तुरा रोवून उभे आहेत . त्याच प्रमाणे इंगमार बर्गमन ,सौंदर्याची खाण मर्लिन मन्रो, गॉडफादर मार्लन ब्रॅडो ,नवीन नवीन प्रयोग करणारा स्टीव्हन स्पीलबर्ग यांची माहिती हि दिली आहे .
खरेतर विदेशी चित्रपटसुष्टीचा जवळजवळ संपूर्ण इतिहास यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे .कुरोसावा चा राशोमन आपले महान दिग्दर्शक सत्यजित रे यांनी सलग तीन दिवस कोलकात्यात पहिला होता यावरूनच तो चित्रपट कसा असेल हे कळून येते .
खरेच अच्युत गोडबोले आणि निलांबरी जोशी यांचे असे पुस्तक मराठी साहित्याला दिल्याबद्दल आभार.
Friday, March 3, 2017
जेवण
आज एका माजी सहकाऱ्याचे लग्न होते म्हणून सुट्टी घेतली होती . जेवणाची कटकट मिटली म्हणून सौ. हि खुश होती .
निखिल माझ्याच डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाला होता . तीन वर्षात खूप काही शिकला . काम करता करता पुढे शिकत राहिला आणि मग हळू हळू एक एक जॉब बदलत आता मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर जाऊन बसला होता . गुरू म्हणून माझे नाव सर्वाना सांगायचं .अर्थात मी काही शिकवले नव्हते त्याला ,पण वेळोवेळो मार्गदर्शन केले होते . आज त्याचेच लग्न होते .तीन वेळा फोन करून आठवण करून दिली म्हणून सपत्नीक जाण्याचे ठरविले .
दादरमधील चांगल्या हॉलमध्ये लग्न होते . आम्ही तिथे पोचलो .तेव्हा सगळी मंडळी फेटे घालूनच वावरत होती . हॉलबाहेर नेहमीप्रमाणे फेरीवाले ,दोन चार भिकाऱ्यांची गर्दी दिसत होती . मला पाहून स्टेजवर धार्मिक विधीसाठी बसलेल्या निखिलने हात हलविला आणि शेजारच्याला खूण केली . ताबडतोब त्याचा मित्र आमच्या स्वागताला आला . मऊशार कोचावर बसून आम्ही सोहळा पाहत राहिलो . त्यांच्या आदरस्थित्त्याने सौ. एकदम खुश झाली होती . मुलीकडची बाजू हि पैसेवाले दिसत होती . सरबत आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही कौतुकाने सर्व निरीक्षण करीत होतो .
लग्न लागले आणि थोड्या वेळाने त्याचा मित्र येऊन म्हणाला "काका रिसेप्शनला वेळ आहे तो पर्यंत जेवून घ्या .
वेगवेगळे स्नॅक्स आणि सतत सरबत पिऊन माझे पोट गच्च झाले होते . पण फार वेळ बसणे बरे दिसत नाही शिवाय उशीरहि झाला असता म्हणून उठलो आणि खाली आलो . "अबब!!!, सौ कौतुकाने उद्गारली. कारण तो थाटमाट पाहून थक्क झाली . जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते .युनिफॉर्म घातलेल्या सुदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला .हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो . तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्लं नव्हता असे सर्व पदार्थ होते .
सौ . ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या ,मिळते म्हणून सर्व घेऊ नका ,मग फेकून द्याल "
मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली . थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले . अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून देण्यासाठी गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता . माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला "सर ,रागावणार नसाल तर एक सांगू ??
अतिशय सभय माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले
" हि तुमची डिश आहे ना ??
" होय, मी परत उत्तरलो .
" हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ?? म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल "
मी चकित झालो .थोडा राग हि आला . त्याच रागात बोललो "आहो थोडे राहिले अन्न ?काय हरकत आहे .नाही अंदाज आला. म्हणून काय घरी न्यायचं" ??
"रागावू नका" तो गोड हसत म्हणाला .हे मोठ्यांच लग्न आहे .पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला . हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे. बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही . कितीतरी अन्न उरणार ,मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकार्याना देऊ .आमची 25 माणसे. पण तरीही अन्न उरणारच .आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न!! त्याचे काय ?? राग मानू नका . पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार दिवस आम्ही मेहनत करतोय ,उत्कृष्ट प्रतीची भाजी ,मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..होय ,त्यासाठी आम्ही मागू तेव्हडे पैसे तुम्ही दिलेत हे मान्य आहे . पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत . आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा . म्हणून आम्ही हि शक्कल लढवली ,हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता ". का ???कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही ?? कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का ??
" आणि हो, यातील काहीही यजमानांना माहित नाही . हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका . पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा ." मला काही सुचेना काय बोलावे . थोडी लाज हि वाटली आणि पटतहि होते .
खरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकताय आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय . इतक्यात सौ .म्हणाली "बरोबर बोलताय भाऊ ,ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात . द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला . आता रात्रीचे जेवण होईल .मेहनत ,इंधन सर्व काही वाचेल . थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो .
© श्री.किरण बोरकर
Tuesday, February 28, 2017
बिट्वीन शेड्स ऑफ ग्रे....रुता सेपेटीस
बिट्वीन शेड्स ऑफ ग्रे....रुता सेपेटीस अनुवाद रवींद्र गुर्जर दुसऱ्या महायुद्धात हिटलरवरच सगळ्यांनी लक्ष केंद्रित केले होते . पण रशियाच्या स्टालिनचे काय ?? तो काय हिटलारपेक्षा कमी क्रूर नव्हता . शेजारची बाल्टिक राज्ये हळूहळू सोव्हियत संघराज्याशी जोडीत जात होता .
हि कहाणी आहे लिथुआनिया देशातील लिना आणि तिच्या कुटुंबाची ,त्यांच्यातुरुंगवासाची ,सायबेरीयातल्या प्रवासाची
एके रात्री तिला आणि तिच्या कुटुंबाला रशियन सैनिक पकडून नेतात आणि त्यांची रवानगी सायबेरिया कडे होते . गलिच्छ माणसांनी गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये कडाक्याच्या थंडीत त्यांचा प्रवास सुरु होतो . लीना धोका पत्करत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीची चित्रे काढत राहते .कदाचित ती चित्रे तिच्या वडिलांकडे पोचतील आणि त्यांचा ठावठिकाणा कळेल .6500 मैलाचा हा प्रवास भयानक आहे जणूकाही वर्षानुवर्षे चालत आहे .आजहि आपण सायबेरियाचे नाव काढले तरी घाबरतो पण तिथे काय घडले ते कोणाला माहित नाही ,तरीही लोकांना सायबेरियाची भीती आहे . मग ज्यांनी सायबेरियाचा तुरुंगवास ,छळ छावण्या अनुभवल्या आहेत त्यांचे काय ??? दुसरे जग म्हणून ओळखले जाणारे सायबेरिया आणि क्रुरकर्मा स्टॅलिन यांची ओळख या पुस्तकाने करून दिली आहे .
Monday, February 27, 2017
निषेध
वसंत व्याख्यानमालेतील शेवटचे व्याख्यान चालू होते . सभागृहातील शंभर सव्वाशे भाग्यवान श्रोत्यांत मी आणि विक्रम होतो . समोर प्रसिद्ध इतिहासकार अण्णासाहेब निंबाळकरांचे माधवराव पेशवे यांच्यावर कथाकथन चालू होते .
अण्णासाहेब म्हणजे संपूर्ण शिवकालीन इतिहास . देहभान हरपून ते बोलत होते आणि कानात प्राण ऐकून आम्ही ऐकत होतो . आता शेवटचं बाकी होता आणि अचानक सभागृहाबाहेर थोडा गोंगाट ऐकू आला . लिंक तुटल्यामुळे सर्व वैतागले .
अचानक संयोजक व्यासपीठावर आले आणि ते अण्णासाहेबांच्या कानाशी काही पुट्पुटले . अण्णांनी मान डोलावली आणि माईकपाशी येऊन कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले . आम्ही चर्चा करीतच सभागृह बाहेर आलो तर बाहेर काही तरुण मुले अण्णासाहेबांच्या नावाने शिव्या देत होती. त्यांचा धिक्कार करीत होती . मुर्दाबादचा गजर चालू होता . मला त्या गर्दीत एक चेहरा ओळखीचा वाटला ,जवळ जाऊन बघितले आणि उडालोच . त्या गर्दीत चक्क बंड्या घोषणा देत उभा होता . विक्रमचे तर टाळकेच सटकले . त्याच्या तोंडून भ ची बाराखडी चालू झाली . आम्हाला पाहून बंड्या चपापला आणि विक्रमला पाहूनतर जास्तच घाबरला .
" काय बंडोपंत ?? आज इकडे कुठे ?? विक्रम ने उपहासाने विचारले .
अजून काही वेडेवाकडे घडू नये म्हणून मी पुढे झालो आणि बंड्याला बाजूला खेचले .
"हा काय प्रकार आहे बंड्या ??तू इथे ह्यांच्यात कसा ?? मी चिडूनच म्हटले
" काही नाही सहज आलो यांच्याबरोबर टाईमपास करायला", बंड्याने चेहरा पडत उत्तर दिले .
" टाईमपास ?? Xxxxxx"!!! विक्रम संतापला
" अरे काय बोलतोस तू बंड्या ?? तुझ्याकडून हि अपेक्षा नव्हती " मीहि रागावर नियंत्रण ठेवीत बोललो .
"तसे नाही हो भाऊ ,काही मित्र आले आणी म्हणाले चल बंड्या येतोस का ??थोडे वेगळे साहस करू ,थोडा वाद निर्माण करू ,चार शिव्या देऊ" " नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे आहे मोर्चा निषेध या गोष्टी मी कधी अनुभवल्या नव्हत्या आणि आज खूप दिवसांनी फ्री होतो ,तुम्ही हि घरी नाहीत म्हणून म्हटले यांच्याबरोबर राहू.
"वा बंडोजी वा" !! विक्रम ने हाथ जोडून म्हटले ' अरे टाईमपास करायचा होता तर जा ना नटरंगमध्ये .मी शेट्टीला फोन करून सांगतो. तिथे काय हवा तो गोंधळ घाल .
झाले !! विक्रमत्याच्या नेहमीच्या आवडत्या मुद्द्याकडे वळला . मी थांबवले आणि विचारले ,"अरे बंड्या तू कोणाचा निषेध करतोयस ते माहित आहे ?? का करतोस ?? यामागे काय पार्श्वभूमी आहे ??
बंड्याने नकारार्थी मान डोलावली
"म्हणजे तुला माहीतच नाही हे आपण का करतोय "
" च्या,!!! बंड्याने मान डोलावली .
", अण्णासाहेब कोण आहेत ते तरी माहित आहे का ?? मी संयमाने विचारले
"आहो मलाच काय, इथे हजर असलेल्या बऱ्याचजणांना माहित नाही " बंड्या हसून उत्तरला.
देवा!!! मी हताश झालो" अरे तुम्हाला विषय माहित नाही ,व्यक्तीबद्दल माहित नाही तर इथे येऊन त्यांचा निषेध का करता ?? मी चिडून बोललो .
तसा बंड्या घाबरला "भाऊ चूक झाली आमची ,त्यांना इथे खूप गर्दी हवी होती आणि आम्ही रिकामे बसलो होतो ,इथे काहींना त्यांनी पैसे हि दिलेत आणि नंतर सगळ्यांना जेवण हि देणार ,मीही टाईमपास म्हणून यात सामील झालो ,मला वाटले हे काही वाईट घटनेचा निषेध करणार आहेत म्हणून साथ द्यायला आलो त्यांना .
" हे बघ बंड्या माहित असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीत पडू नको . असतील अण्णासाहेबांच्या काही गोष्टी चूक, पण ते ठरविणारे आपण कोण ?? त्यांच्याइतका आपला अभ्यासतरी आहे का ?? कि उगाच प्रसिद्धीसाठी हा स्टंट करायचा ?? आपण समाजातील चांगल्या वाईट प्रवृत्ती बद्दल भांडावे पण त्याबाबत पूर्ण माहिती तरी घ्यावी जेणेकरून समोरच्याचे तोंड बंद तरी करता येईल".
माझा चेहरा पाहून बंड्या समजून गेला आता काही खरे नाही .विक्रम परवडला पण हे नको .
सॉरी सॉरी म्हणत दूर निघून गेला . आम्हीही एकमेकांकडे बघत घराकडे वळलो.