Tuesday, June 13, 2017

सुट्टी

  तो सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जायला बाहेर पडला . बाहेरचे धुंद वातावरण पाहून त्याचे मन मोहरले .काहीतरी विचार करून तो गल्लीच्या कोपरावर उभा राहिला .टाईमपासला मोबाइल होताच .
बरोबर तासाभराने ती बाहेर पडली . आज कसलीही घाई नसल्यामुळे काहीतरी गुणगुणतच चालली होती . तो अचानक समोर येताच तिला धक्का बसला . तशीही त्याची हीच सवय होती .
" तुम्ही ,?? ती आनंदाने चित्कारली .", अजून गेला नाहीत . उशिरा जायचे तर आधी सांगायचे तेवढेच थोडे आरामात आवरले असते ".
"हो !हो! जर शांत हो ".त्याने तिला शांत केले ." चल आज दांडी मारू दोघेही . जाऊ कुठेतरी .तुला आवडेल तिथे ".
ती त्याच्याकडे पाहत बसली .एक सुखद धक्का तिच्या चेहऱ्यावर दिसून आला .
" चल ग, काय  रोज रोज तेच तेच ..गेली भोक्सक्सक्सक्स कंपनी", त्याचा निर्धार पाहून तिलाही राहवेना .
"चल दांडी आज ". तीही उत्तरली .
दोघेही रस्त्यावर आले .समोर येणारी डबलडेकर बस पकडली .वरच्या मजल्यावर गेले. पहिली सीट पकडून बसले . त्याने दोन चाळीस रुपयाच्या तिकीट काढल्या . ती आनंदाने फुलून गेली .
"कुठे जायचे" ?? त्याने विचारले.
तशी ती लाडात म्हणाली ",जहाँ आप ले जायेंगे जनाब" .
"आज नुसते फिरू आपण आणि गप्पा मारू ", तो तिच्याकडे पाहत म्हणाला .
"ओके सर ," शेजारच्या सीटवर बसलेल्या छोट्या मुलाकडे कौतुकाने पाहत ती बोलली .
अचानक तो गंभीर झाला ." आपल्याला ही आता विचार केला पाहिजे बाळाचा",त्याने हळूच तिच्या कानात म्हटले . तिने झटकन मान वळवून त्याच्याकडे पाहिले .तिच्या डोळ्यात अविश्वास दिसत होता.
" खरच !! ती आनंदाने उद्गारली ." आई काही बोलल्या का ?? गेले दोन तीन दिवस त्या आडून आडून हा विषय काढायला बघताय . आणि आता तुझ्या मनात . म्हणजे सगळेच सिरीयस झालेत म्हणायचे या विषयावर ".तीने हसत विचारले .
"हो ग, पाच वर्षे झाली ,थोडे थांबू असे बोलत .मीच तुला अडवत होतो . दोघेही नोकरी करणारे . घरात आईबाबा .मुलाला त्यांच्याकडे सोडून जावे असे मला पटत नव्हते .आणि पुरेसा पैसे ही नव्हते . बाळाचे करावे म्हणजे चार पैसेही गाठीशी हवेत .वाटले दोन तीन वर्षात होईल व्यवस्थित पण काहींना काही घडत गेले .साठविलेले पैसे त्यात गेले .तुझी मुलाबद्दल असलेली तळमळ कळते मला. पण मी खूपच व्यावहारिक वागत होतो . आणि तुलाही गृहीत धरत होतो ".त्याचा बांध फुटला.
"जाऊदे हो !! तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवीत म्हटले ."अजून वेळ गेली नाही . मीही तुमची तडफड समजत होते . आपण कसे घर चालवतो ते कळत नाही का ? पण एक सांगू मूल  झाले की आपोआप सगळे जुळून येते . आपल्या मुलांसाठी आपली मेहनत डबल होते . पण त्यातही सुख असते नाही का ?? आणि आई बाबा आहेत तोपर्यंत झालेले चांगले . शेवटी चांगले संस्कार तेच देतील त्याला .आपले खरे सुख तर आपले मूल आहे . ते आल्याशिवाय काही पुढचे घडणार नाही . कोणास ठाऊक येणारे बाळ नवी स्वप्न ,चांगले भविष्य घेऊन येईल आपल्या घरी .असाच फक्त भविष्याचा विचार करीत बसलो तर हा सुंदर वर्तमान आपल्या हातून निघून जाईल .तिने त्याला समजवल.
"तसे नाही ग ,पण तुझे कष्ट पाहतोय मी .माहेरीही फार कष्ट काढलेस तू . इथे आल्यावर तरी ते कमी होतील अशी अपेक्षा होती माझी. फक्त काही काळ जाऊ दे असे ठरविले होते . मग राजा राणी सारखे फिरलो असतो गाडीतून ".तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला .
"ओ !! महाशय भानावर या . सध्या बसमध्ये बसायला सीट मिळाली ते भरपूर आहे . आणि इथे आल्यावर कष्ट कमी झालेच ना .दोन वेळा चांगले जेवण . आई वडिलांची माया देणारे सासू सासरे . लहान भावाची माया लावणारा दीर  आणि मुख्य म्हणजे काळजी करणारा पण बोलून न दाखवणारा प्रेमळ पती .अजून काय हवे असते स्त्रीला ??.पैसे  कसेही कमावता येतील पण हा आनंद विकत घेता येतो का ?? आज एक चांगला निर्णय घेतला आपण . आता तयारीला लागू" .असे म्हणत तिने चेहरा त्याच्या छातीत लपविला .
तिचा तो लाजरा चेहरा पाहून त्याला सुट्टीचा दिवस सार्थकी लागल्याचा आनंद झाला .
(C) श्री.किरण बोरकर

Friday, June 9, 2017

स्टील लाईफ ....जॉय फिल्डिंग

स्टील लाईफ ....जॉय फिल्डिंग .. अनुवाद .. माधव कर्वे
आपल्या दोन जिवलग मैत्रिणींबरोबर लंच करून केसी बाहेर पडली आणि भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिला उडवले .अनेक ठिकाणी फ्रॅक्चर व डोक्याला मार घेऊन केसी कोमात गेली . आई वडिलांच्या प्रचंड संपत्तीची मालकीण केसी आज असहाय्य होती . तिचा नवरा आणि अमली पदार्थाचे व्यसन असलेली तिची बहीण दोघेच तिचे नातलग . ती लवकरच शुद्धीवर येईल असे समजून तिच्या मैत्रिणी ,नातलग ,नर्सेस तिच्याशी बोलत असतात  आणि त्यांच्या बोलण्यातूनच  अनेक रहस्य उलगडायला लागतात . केसी मनाने भानावर आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ऐकतेय . या ऐकण्यातूनच तिला स्वतःविषयी एक रहस्य कळले आहे . आणि तिचा जीव परत धोक्यात आलाय . या सर्वाचा ती कशी सामना करेल ???? एक थरारक कादंबरी

मदत

ते रस्त्याच्या बाजूला उभे होते . येणाऱ्या जाणाऱ्या सिंगल बाईकरवाल्याला,रिकाम्या टॅक्सीला हात करीत होते . साधारण 58 ते 60 वय असेल त्यांचे .हातात काठी होती . एखादा अपघात झाल्याची खूण होती ती .चालायचा त्रास होत हे पाहूनच कळतच  होते . इतरांसारखा मलाही त्यांनी हात दाखविला .मीही इतरांसारखाच वागलो . एकटा असूनही मी  बाईक पुढे नेली .पण मन खात राहिले .एकटा तर चाललो होतो काय हरकत आहे त्याला लिफ्ट द्यायला .  पुढे जाऊन माझे मला राहवेना .मुकाटपणे बाईक मागे वळवली . त्यांच्या पुढे उभी केली.ते हसले .
" इथेच थोडे पुढे बँकेत .सरळ जात असाल तर ".ते हसून म्हणाले
" मी तुम्हाला हवे तिथे सोडतो .बसा आरामात " मीही हसून उत्तरलो.
ते स्वतः ला सावरत मागे बसले.
"जवळ अंतर आहे म्हणून कोणतीही टॅक्सी थांबत नाही .नाईलाजाने बाईकवाल्यांकडे लिफ्ट मागावी लागेल . मिळतो मग कोणतरी तुमच्यासारखा दयाळू कधी पटकन तर कधी बऱ्याच वेळाने.  त्यांनी मागे बसून सांगितले.
मी हसलो आणि त्यांना जवळच असलेल्या बँकेजवळ सोडले .निघताना त्यांनी माझे हात हाती घेतले.
" थँक्स "म्हणाले आणि हाथ जोडले.",फारच कमी भेटतात हो तुमच्यासारखे  अशी मदत करणारे ."
मला खरेच खूप लाजल्यासारखे झाले . मी त्यांना नमस्कार केला आणि निघालो .
आता प्रश्न असा आहे आजही खरेच वरिष्ठ नागरिक अपंग यांची अशी परिस्थिती यावी की  मदत केल्यावर त्यांनी   हात जोडून आपले  आभार मानावे . म्हणजे त्यांना आपल्यापैकी कितीजण मदत करायला धावून जातात .  आपल्यातली माणुसकी फक्त आपण सोशल मीडियावर व्यक्त करायची का ?? प्रत्यक्ष दाखवायची  वेळ आली की पाठ फिरवायची का ??
(C) श्री. किरण बोरकर

Thursday, June 8, 2017

वटपौर्णिमा

",निखिल मी कालपासून खूप विचार करून एक निर्णय घेतलाय "चहाचा कप हाती देऊन निकता म्हणाली तसा निखिलच्या हाताला कंप सुटला .अरे देवा आता ही आपली बायको नवीन काय घोळ घालणार या विचाराने तो हबकला .मागच्या वेळी भटकत्या कुत्रांवर दया येऊन तिने सर्व कुत्री सोसायटीमध्ये गोळा करून आणली आणि नंतर सोसायटीतील सर्व मोर्चा घेऊन घरी आले तेव्हा त्यांना समजावताना नाकी नऊ आले त्याच्या .
"ए बाई ,पाया पडतो तुझ्या काही निर्णय घेऊ नको. पाहिजे तर बाहेर जेवायला नेतो .तो हात जोडून म्हणाला
"अरे हा निर्णय माझा एकटीच आहे . ऐक तर, मी यापुढे वट पौर्णिमेची पूजा करणार नाही ".ती ठसक्यात बोलली .
"आयला काय बोलतेस निकी !!,ग्रेट !! खरेच मी सुटलो बघ" . निखिल हसू दाबीत म्हणाला .
"वाटलेच तु असेच बोलणार .पण मी म्हटले कशासाठी करायचे हे व्रत ?? पूर्वी ठीक होते सर्व सुखी ,आणि आर्थिकदृष्टया श्रीमंत होते .बाईला पैश्याची चणचण नव्हती . नवरा बायको एकमेकांना वेळ देता येत होता .त्यामुळे सर्वाना वाटायचे हाच पती हाच संसार सातोजन्मी लाभावा .पण आता ?? एकतर झाडे कमी . वड शोधावा लागतो . ऑफिस ला सुट्टी नसते . सकाळी लवकर उठून साजशृंगार करा मग पूजा करून आल्यावर घाईघाईने चेंज करून लोकलसाठी धावा .किती कंटाळा येतो रे  . आणि सध्या वडाची पाने ही कुठे मिळतात .आणि  हो ! पर्यावरणाचा विचार करायला नको का ?? किती पाने आणि छोट्या छोट्या फांद्या फुकट जातात .
निखिल म्हणाला," पर्यावरणाचा विचार करत असशील चांगली गोष्ट आहे . करू नकोस तू व्रत .छान कारण आहे", .
"तसे नाही रे ,मलाही आता कंटाळा आलाय हे सर्व करण्याचा . आम्हीच का सर्व करायची व्रतवैकल्ये ?? चांगला नवरा  आणि चांगला संसार मिळावा म्हणून . पण तुम्ही पुरुष तर काहीच करत नाहीत तरी आमच्यासारखी छान  हुशार बायको मिळतेच ना ??
",देवा!!  हा विचार तर मी कधीच केला नव्हता". निखिल हाथ जोडून म्हणाला.
" राहूदे राहूदे ,तसही तुम्हाला सात जन्म सहन करने फारच होतेय . सात जन्म लोकल चा प्रवास तर चुकणार नाहीच आणि दरवर्षी कोकणातच जावे लागेल होळी आणि गणपतीला .निकिता हसू दाबीत म्हणाली .
"हे बघ तू आतामाझ्या गावावर जाऊ नकोस .व्रत न करायची काही ठोस करणे दे ?? निखिल चिडून म्हणाला .
" तेच तर म्हणतेय मी याजन्मी मजेत आणि आनंदात संसार करतोय आपण  पुढच्यावेळी अजून काही वेगळे बघूया ना दोघे . एखाद्या सुपरस्टारची पत्नी असावी अशी इच्छा आहे ,तर त्याच्या पुढच्या जन्मी नेत्याची . काय हरकत आहे लाल दिव्याच्या गाडीतून फिरायला .
" अजिबात हरकत नाही .मलाही भारत सुंदरशी लग्न करायची इच्छा आहे. पुढच्या जन्मी कमीतकमी श्रवण सुंदरी तरी मिळेल ".निखिल हसत बोलला .
संध्याकाळी निखिल घरात शिरतात निकिता बशीतून गरे ,आंबा ,जांभूळ घेऊन समोर आली . तिने ते निखिलच्या हाती दिले व पाया पडली . अरे हे काय?? तू करणार नव्हतीस व्रत ??
"अरे ऑफिस मध्ये कोणी करत नाही पण मीच करते  म्हणून वेगळेपण असतो  तो का मी सोडू ? आणि त्यांच्या पंक्तीत जाऊन बसू ?? पण यावर्षी मी ऑफिसच्या ड्रेसवरच गेले. फांदी तोडायची नाही असे ठरवले मग स्टेशनबाहेरच्या वडाची पूजा केली .पानात वाण न ठेवता कागदाच्या बशीत ठेवले .आणि कामावर गेले.भावना आणि मनापासून करणे महत्वाचे नाही का ?? ती हसून बोलली .
निखिल खुश होऊन म्हणाला ",म्हणजे तुझा पुढच्या जन्मी वेगवेगळे पती मागायचा चान्स गेला .
"जाऊदे रे ,पुढच्या अनेक जन्मी ही तूच पती असशील पण वेगवेगळ्या रुपात ,कधी सुपरस्टार तर कधी नेता,तर कधी खेळाडू .मग काय हरकत आहे तुझी ?? ती लटक्या रागाने त्याच्या छातीवर गुद्दे मारीत म्हणाली.
"माझी काही हरकत नाही. मीही यावर्षी थोडे ऍडजस्ट केले .बरेच दिवस स्टेशनला जाताना एका दुकानात ड्रेस पाहत होतो त्या ड्रेसमुळे तो पुतळा छान दिसत होता म्हणून तो ड्रेस विकत घेऊन आलो तुझ्यासाठी .दरवर्षी साडी काय द्यायची तुला ?? हा घे असे म्हणून अंगावर आलेली उशी चुकवत आत पळाला.
(C) श्री. किरण बोरकर

Tuesday, June 6, 2017

टिपिकल

ऑफिसात लंच अवर संपायला आला होता . मी ,देशपांडे ,शेट्टी ,पावसकर गप्पा मारत बसलो होतो . इतक्यात वैदेही हसत आत आली .
वैदेही आमची ज्युनियर .अर्थात वयानेही आणि अनुभवानेही . पण नवीन पिढीची प्रतिनिधित्व करणारी .आल्याआल्या तिने पावसकरकडे मोर्चा वळवला .
"पावसकर तुमची बायको एकदम टिपिकल आहे हो "!!
झाले !!! आम्ही सर्व स्तब्ध होऊन पावसकरकडे पाहू लागलो.
"टिपिकल म्हणजे नक्की काय ग ?? पावसकर ने शांतपणे तिला विचारले.
"बघा ना आपण त्या दिवशी तुमच्या घरी गेलो तेव्हा आपल्यात येऊन बसली नाही . सारखी आत बाहेर करीत होती . पाणी ,खाणे ,सरबत यातच अडकून बसली होती .इतक्या छान गप्पा चालल्या होत्या आपल्या. पण येऊन सहभाग घेतला नाही "
",हे बघ बाळ " पावसकर हसून म्हणाला. तसे तिने नाक मुरडले." पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदाच आलात. त्यामुळे तुमचे योग्य स्वागत करणे हे गृहिणी या नात्याने तिचे कर्तव्य ठरते .  तुमचे स्वागत करण्यात तिचा वेळ गेला . दुसरे म्हणजे आपल्या चर्चेत तिचा काही संबंध येत नव्हता म्हणून ती आपल्यात बसून कोणाचीही ऑकवर्ड परिस्थिती होऊ नये म्हणून आलीच नाही",.
",आहो पण तिला व्हाट्स अप मेसेज पाठवते तीही खूप उशीरा कधीतरी पहाते ,चुकून कधीतरी रिप्लाय देते ",वैदेही म्हणाली
",म्हणजे ती व्हाट्स अप पाहत नाही. फेसबुक वर नाही म्हणून टिपिकल का", ??   पण ती रोज माहेरी फोन करून म्हातारीची तब्बेत विचारते .तिच्याशी प्रेमाने बोलते . ज्यांचा वाढदिवस असेल त्यांना फोन करून शुभेच्छा देते . आजारी नातेवाईकांना आठवणीने भेटायला जाते .हे सर्व ती घरातील कामे करुन करते",पावसकर हसून म्हणाला
", बरे ती कधी जीन्स ,टॉप ,टी शर्ट घालीत नाही का ??वैदेहीचा मूर्खासारखा प्रश्न .
", घालतेना ,पण बऱ्याच वेळी तिला लग्न ,पूजा ,दिवस अश्या समारंभाला जावे लागते तिथे हे शोभून दिसत नाही म्हणून बहुतेक करून साड्याच नसते . आम्ही कधी फिरायला गेलो की जीन्स घालते . पण मला तिला साडीमध्येच पाहायला आवडते म्हणून ती साडी नसते."पावसकर अतिशय शांतपणे उत्तरे देत होता .
" तिच्या कोणी मैत्रिणीवगैरे नाहीत का ? कधी त्यांच्याबरोबर पिकनिक वगैरे ",आता वैदेहीही पेटली .
", हो ते ही असते ना . पण सर्व आवरून . आपल्या मौजेखतार दुसर्यांना त्रास होऊ नये ही काळजी आणि हो ती घरचे करून ,बाहेर बँकेची कामे ही करते . आई बाबांची औषधे . मुलांचा अभ्यास ह्याही गोष्टी कराते .आणि हो ती पदवीधर आहे बर का !!! पावसकर हसून बोलला
"तसे नाही हो, वैदेही थोडी चिडून म्हणाली", पण त्या ऍक्टिव्ह वाटत नाही . सतत कामाच्या रगाड्यात अडकलेल्या वाटतात",
.म्हणजे तिने  काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे ? ती कोणाच्या हळदीला ,वाढदिवसाला गेली की आवडत्या गाण्यावर मनमुराद नाचते . आठवड्यातून दोनदा संगीताच्या क्लासला जाते . गावी गेली की समोरच्या समुद्रात झोकून देते स्वतःला . दोन तास तरी पोहते .जंगलात जाऊन रानमेवा गोळा करते . तर रात्री चिम्बोर्या पकडायला जाते .आणि मुंबईत गरज लागेल तेव्हा स्कुटर घेऊन जाते .
आम्ही मजेत वैदेहीच्या चेहऱ्याकडे पाहत होतो .तिचा चेहरा रडवेला झाला होता .शेवटी गप्प बसण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हताच  आम्हीही मनोमन पावसकर वहिनींना हाथ जोडले .
(C) श्री. किरण बोरकर

Sunday, June 4, 2017

निर्णय

काल  संध्याकाळी अवि  घरी आला होता .भाईंना जाऊन पंधरा दिवस झाले होते .  कोणालाच त्रास न देता त्यांनी प्राण सोडले होते . त्यांची अंतिम कार्यही सुरळीतपणे पार पडली होती .  अवि पहिल्यांदाच घराबाहेर पडला आणि माझ्याकडे आला .
"भाऊ ,अरे त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारतात, त्यांची चूक असो वा नसो . पण मोठंमोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना का नाही मारत" ?  त्याचा आवाज चढलेला पाहून त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काही तरी घडले हे नक्की
मी जरा काळजीनेच विचारले" काय झाले अवि ?? "काही नाही, पण आमच्या फॅमिली डॉक्टरच्या सांगण्यावरून भाईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले . बरे हॉस्पिटलही आमच्या डॉक्टरांनीच सुचविले होते .आणि भाईंना केवळ अशक्तपणा वाटत होता म्हणून विश्रांतीसाठी ऍडमिट करायचे होते .  पण त्या हॉस्पिटलमध्ये साधी अँबुलन्सची सोय नव्हती . नशीब विक्रम होता घरी . त्याने अँबुलन्सची सोय करून त्यांना ऍडमिट केले . संध्याकाळी ते तीन वाजेपर्यंत ठीक होते . पण नंतर आशूला डॉक्टरांनी सांगितले की त्यांची तब्बेत खूप नाजूक आणि सिरीयस झालीय .त्यांचा इथे इलाज होणार नाही . मोठ्या हॉस्पिटलच्या ICU मध्ये ऍडमिट करावे लागेल त्यासाठी तिथे साठ हजार भरावे लागतील .अरे आशूला काही सुचेच ना . आणि त्यांचा आजार काय आहे ते आम्हाला माहीत होते .त्यातून ते बरे होणार नव्हतेच .तरीही डॉक्टरांनी असा सल्ला का दयावा ? अरे जिथे आम्हाला कळते की भाई आजची रात्र काढू शकत नाहीत तिथे डॉक्टरांना काही कळत नाही का आणि ते ही सर्व रिपोर्ट्स हातात असताना  . त्यांना समोरच्या रुग्णाची परिस्थिती माहीत नसते का ??  तरीही ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला कसा देऊ शकतात ??. त्या दिवशी भावनिक होऊन कदाचित मी त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असते पण तिथे ते किती दिवस राहिले असते ?? आणि शेवटी भरमसाठ बिल माझ्या माथी मारून मृत भाईंना माझ्या ताब्यात दिले असते .म्हणून मी त्यांना तिथे ऍडमिट न करता सरळ घरी घेऊन आलो आणि पाहिलेस ना घरी आताच अर्ध्या तासात सर्वांसमोर प्राण सोडले त्यांनी ".
मी जवळ जाऊन अवीच्या खांद्यावर हात ठेवला. "अवि खरेच त्यादिवशी तू योग्य निर्णय घेतलास . काही वेळा आपल्याला नाजूक परिस्थितीत  मनाविरुद्ध कठोर निर्णय घ्यावेच लागतात .शेवटी भाईंना घरातच आपल्या माणसातच प्राण सोडायचे होते आणि त्यांची ही इच्छा तुम्ही पूर्ण केलीत . खरेच हल्ली डॉक्टरांकडे ही माणुसकी हा प्रकार शिल्लक राहिला नाही . पेशंट मेला  तरी दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून भरमसाठ बिल माथी मारतील .आणि अश्या बड्या हॉस्पिटलविरुद्ध काही कारवाई करायची आपली ऐपत नसते ",
. माझे बोलणे ऐकून अवि हसला .माझा हात हातात घेऊन म्हणाला", खरेच भाऊ मनावरचे मोठे ओझे उतरले . मी घेतलेला निर्णय योग्य होता हे ऐकून फार बरे वाटले मला ".

एका सैनिकांचा मृत्यू ..मार्गारेट एव्हीसन

एका सैनिकांचा मृत्यू ..मार्गारेट एव्हीसन,
     अनुवाद .. विनिता जोगळेकर
लोक मृत्यू बद्दल कितीही चांगले वाईट बोलत असले तरी आपल्या माणसांचा मृत्यू हा वाईटच असतो . त्यातही आपला तरुण मुलगा युद्धभूमीवर लढता लढता मृत्यू पावणे हे त्याच्या मातेसाठी किती दुःखदायक आहे त्याची कल्पनाच न केलेली बरी . लेखिकेचा तरुण मुलगा अफगाणिस्तानात लढाई करताना मारला गेलाय . तिला मार्क जखमी झालाय हे कळल्यापासून ते त्याच्या मृत्युपर्यन्त आणि त्यानंतर तिने अनुभवलेले क्षण त्याच्या आईने या पुस्तकात लिहून ठेवले आहे . तो कसा होता ,त्याच्याबद्दल त्याच्या सहकाऱ्यांची  मते हे सर्व तिने मोकळेपणाने लिहिले आहे . त्यावेळी प्रत्यक्ष काय आणि कसे घडले हे वाचताना आपण प्रत्यक्ष युद्धभूमीवर आहोत असे वाटते . गोळ्या झाडताना आणि गोळ्या झेलताना सैनिकांची मनःस्थिती काय असते हे वाचताना आपला थरकाप उडतो .मृत्यू नंतरची चौकशी ही एका मातेसाठी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी किती क्लेशदायक असते याचीही जाणीव हे पुस्तक करून देते . मृत्यूनंतर त्याचा कितीही गौरव झाला ,शहिद म्हणून म्हटले गेले तरी आपला तरुण मुलगा या जगात नाही आणि तो परत दिसणार नाही हे सत्य स्वीकारणे एक मातेसाठी किती अवघड आहे हे समजते .
(C) श्री. किरण बोरकर