Monday, May 14, 2018

मदर्स डे

"अग... चल उठ ग. ?? किती वेळ लोळत पडशील.?? शाळेत जायचे नाही का ..?? अमृताच्या पाठीवर धपाटा मारत निमी म्हणाली " चल आता मला झोपू दे थोडा वेळ".
" आई ....! मी नाही जाणार शाळेत ..?? आज मदर डे आहे .सर्वाना आपल्या आईबद्दल बोलावे लागेल काहीतरी. मला नाही जमणार बोलायला.. ?? अमृता चिडून म्हणाली .
"का ...??काय झाले .?? तुझी आई वाईट आहे का.. ??  क्षणात हळवी होऊन निमीने तिला जवळ घेतले .
"नाही ग... तू खूप चांगली आहेस .पण शाळेत सर्वांसमोर काय सांगू .?? मला लाज वाटते" खाली मान घालून अमृता म्हणाली .
"तुला आपल्या आईबद्दल बोलायला लाज वाटते..?? याचाच अर्थ मी तुला  वाढविण्यात मोठे करण्यात कमी पडलेत बेटा...माझी छाया तुझ्यावर पडू नये म्हणून खूप काही करतेय मी.. ज्याचा त्रास किती होतो ते मलाच ठाऊक .मी अशिक्षित आणि त्यामुळे कोणावरतरी  भाबडा विश्वास टाकून मुंबईत आले आलीआणि  इथेच पडले . तुला जन्म देण्यासाठी खूप झगडा केला मी या समाजाशी ,इथल्या लोकांशी . आणि त्यात  तू मुलगी म्हणून जन्माला आलीस ते अजून त्रासाचे झाले मला . इथले लांडगे खुश झाले कारण त्यांना माझी वारसदार मिळाली होती. मी म्हातारी होईन तेव्हा तू तयार होशील हा त्यांचा अंदाज . तरीही मी डगमगले नाही . माझ्या कामाची छाया तुझ्यावर पडू दिली नाही . तुला समजू लागले तेव्हाच मी तुला सर्व कल्पना दिली . काही दिवस तुझ्या नजरेतील तिरस्कार सहन केला मी . पण तुझा विश्वासघात करण्यापेक्षा हे चांगले नाही का.. ?? मला कळतंय तुला शाळेत माझ्याबद्दल सांगायला लाज वाटते . तुझ्या काही मैत्रिणींना इथे घेऊनही येऊ शकत नाही तू . पण बेटा आपण भिकारी नाही . फुकटचे लोकांकडे हात पसरून काही मागत नाही की दुसऱ्यांच्या जीवावरही जगत नाही .इतरांसारखा मीही व्यवसाय करते .चोरी करण्यापेक्षा हे बरे नाही का ?? आज माझ्याबद्दल बोलायला लाजलीस तर आयुष्यभर खोटे बोलावे लागेल तुला ?? आणि हे सत्य बाहेर येईल तेव्हा तुझे काय होईल याचा विचार कर जरा. तुझे खरे मित्र मैत्रिणी तुला जशी आहेस तशी स्वीकारतील ..म्हणून खरे बोल. मी तुझ्यावर किती कोणते संस्कार केले ते माहीत नाही पण सत्याला नेहमी सामोरे जा हेच शिकविन तुला . आता शाळेत जा आणि जे सत्य आहे ते बोल" असे बोलून निमा डोळे पुसत आत गेली.
संध्याकाळी अमृता धावत तिच्या रूममध्ये शिरली . "थँक्स आई ....आज तुझ्यामुळे मी वर्गात बोलू शकले . सर्वाना धक्का बसला तुझ्याबद्दल ऐकून. पण नंतर टीचरने माझे अभिनंदन केले इतके धाडस दाखविल्याबद्दल.काहीजणी आता मला पाहून नाक मुरडू लागल्या तर काहीजणी अजून जवळ आल्या . आज तुझ्यामुळे मला माणसांची खरी किंमत कळली . खूप हलके वाटले बघ मला .हॅपी मदर डे आई .."असे बोलून तिने निमाला मिठी मारली.
"तू खूप चांगली मुलगी आहेस.चल आता.... आत जाऊन बस माझीही धंद्याची वेळ झाली आहे .."असे बोलून तिची छानशी पपी घेऊन निमा खिडकीत जाऊन उभी राहिली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, May 11, 2018

द पेलिकन ब्रीफ ...... जॉन ग्रिशॅम

द पेलिकन ब्रीफ ...... जॉन ग्रिशॅम
अनुवाद ........ रवींद्र गुर्जर
मेहता पब्लिकेशन
अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांची एकाच रात्री हत्या होते. एकजण पॉर्न चित्रपटगृहात चित्रपट पाहत असतो  शिवाय तो गे असतो . दुसरा म्हातारा ,व्हीलचेअर वर बसणारा  अनेक आजारांनी त्रस्त... कोण करते यांचे खून ?? डाबी शॉ एक कायद्याची विद्यार्थिनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे खून का झाले असतील याबाबत अभ्यास करून  तेरा पानी अहवाल बनविते आणि आपल्या प्राध्यापक मित्राला वाचायला देते . याचाच सर्व पेलीकन ब्रीफ असे म्हणतात .तो ते आपल्या एफ. बी. आय . मधील वकील मित्राला देतो आणि पुढे ते  राष्ट्राध्यक्षांकडे जाते .त्यानंतर काही दिवसातच शॉ आणि तिच्या मित्राचा खुनाचा प्रयत्न होतो त्यात ती वाचते पण प्राध्यापक मारला जातो . असे काय आहे त्या ब्रिफमध्ये की ज्यामुळे कोणीतरी तिच्या जीवावर उठलेत.एका निर्भय पत्रकाराच्या मदतीने शॉ या रहस्याचा भेद करते. कसा ??? ते वाचायलाच हवे .

Sunday, May 6, 2018

कॅरी मी डाऊन.... एम. जे. हायलंड

कॅरी मी डाऊन.... एम. जे. हायलंड
अनुवाद........... पुलिंद सामंत
मेहता पब्लिकेशन
जॉन इगन हा बारा वर्षाचा मुलगा . त्याला असे वाटत असते की आपण लोकांनी केलेले सत्य असत्य कथन ओळखू शकतो.आणि त्यासाठी आपले नाव गिनीज बुकमध्ये यावे.त्याच्या या अश्या वागण्याने घरातील नातेसंबंध बिघडतात . त्याचे वागणे इतके पराकोटीला जाते की तो आपल्या आईचा खून करायचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्याला कारण असते पौंगडाव्यस्थेतील मुलांची मानसिक अवस्था. या अवस्थेतील मुलांच्या मनाचा ठाव घेणारी कादंबरी .

Saturday, May 5, 2018

पहिली वेळ

तो तिला घेऊन त्या खोलीत शिरला . त्याच्यासाठी ते जग वेगळेच होते. ही त्याची पहिलीच वेळ आहे हे तिच्या अनुभवी नजरेने ओळखले होते .
"आजा ....."! असे म्हणत तिने त्याला त्या मळकट चादर असलेल्या  खाटेवर बसविले आणि त्याच्या मोबाइलवर नजर टाकून म्हणाली "मुझे एक फोन करना है ..फोन देना.
त्याने सहज आपला फोन काढून तिच्या हातात दिला . त्याच्या शेजारी झोपून तिने फोन लावला . बोलण्यातच गुंतून गेली ती . तो भोळसटाप्रमाणे तिच्याकडे पाहत बसला . काही वेळाने तिच्या लक्षात आले . तिने पटकन आवाज चढवून म्हटले" ए ....देखता क्या है??? चल चालू कर... असे म्हणून आपला परकर वर केला आणि पाय पसरले . त्या दोन्ही पायांमध्ये तो नुसता पाहत बसला . तिचा फोन चालूच होता .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, May 4, 2018

अंतिम इच्छा

सोसायटीच्या गेटमधून आत शिरलो आणि A विंग जवळून जाताना तळमजल्यावरील मोहनकाकांची हाक ऐकू आली."काय रे भाऊ ....आता आलास का कामावरून.. ??
त्यांची हाक ऐकताच मी ओशाळलो. खूप दिवसांनी आमची भेट होत होती .खरेतर ते खिडकीतच बसून असायचे नेहमी .जातायेता सर्वाना हाक मारायचे. हल्ली त्यांची तब्बेत बरी नव्हती असे ऐकून होतो. त्यामुळे बरेच दिवस त्यांची हाक ऐकू आली नाही तरीही मी चौकशी केली नाही आणि आता त्यांची हाक ऐकू येताच थोडे वाईट वाटले .घरी उशीर झाला तरी चालेल पण त्यांना भेटूनच जाऊ असा विचार करीतच त्यांच्या घरात शिरलो .
आत शिरताच सोनलने म्हणजे त्यांच्या सुनेने पाणी देऊन स्वागत केले . मोहनकाका थोडे थकलेले दिसले . "कसे आहात काका...??? मी आस्थेने विचारले.तसा त्यांनी प्रेमाने माझा हात हाती घेतला "बरा आहे ...मध्येच थोडा त्रास झाला पोटाचा .म्हणून एक छोटेसे ऑपरेशन केले.आता ठीक आहे ".
पण ते ठीक नाहीत हे त्यांच्या तब्बेतीवरून कळत होते"अतुल कुठे आहे ...?? मी आजूबाजूला पाहत विचारले. अतुल त्यांचा एकुलता एक मुलगा . मार्केटिंगमध्ये असल्यामुळे देशभर फिरत असतो .
"बाहेर गेलेत ते. येतील आता ..."आतून सोनलने आवाज दिला .
" हो ....तो आहे ना इथेच .माझ्यासाठी कुठे बाहेर जात नाही ऑपरेशन झाल्यापासून .पण रोज ऑफिसला जावे लागतेच ना... ?? किती दिवस घरी राहील..."काका हसत म्हणाले.
"काही गरज नाही घरी राहायची बाबा....मी आहे ना इथे पाहायला तुमच्याकडे "माझ्या हातात चहाचा कप ठेवत सोनल हसत म्हणाली .
"हो तर तूच तर सर्व करतेस . मुलाची सर्व कामे तूच करतेस. माझी औषधे ,पथ्यपाणी ,डॉक्टरची अपॉइंटमेंट घेणे ,त्यांच्याकडे घेऊन जाणे . आजाराची चर्चा करणे . टेस्टसाठी घेऊन जाणे. हे सर्व तूच तर करतेस .अतुलला माहीत नाही तितकी माहिती तुला आहे माझ्या आजाराची .."काका तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले . 
"हो पहातोना आम्ही ... त्यादिवशी कशी तुमच्या हाताला धरून घेऊन येत होती आणि सौ ही म्हणते काकांना मुलगा नाही तर मुलगी आहे . सोसायटीमध्ये हिची चर्चा आहे . मी तर म्हणतो आता हिने सल्लागार बनावे आजारी माणसाला कसे हँडल करावे या विषयात" मी हसून म्हणालो .
"काहीही काय बोलता भाऊ ...असे म्हणत सोनल लाजून आत पळाली.
मी हसत मोहन काकांकडे पाहिले . काका हसता हसता गंभीर झाले ."भाऊ ..तुझ्याकडे एक काम आहे माझे ... करशील.. ?? माझी अंतिम इच्छा म्हण"आणि त्यांनी आत पाहिले.
" काहीतरी काय काका .. ..अंतिम  इच्छा काय ..??? तुम्ही फक्त बोला काय पाहिजे ...ते पूर्ण करायची जबाबदारी माझी ..." मी त्यांचा हात गच्च दाबीत म्हणालो .
"भाऊ मला माहित आहे माझा आजार गंभीर आहे आणि यातून मी काही वाचत नाही . पण मी खूप आनंदात आहे . मला मरण चांगले यावे हीच माझी इच्छा आहे. मुलगा आणि सुनेने खूप काही केले माझ्यासाठी . शेवटपर्यंत करतील याची खात्री आहे . पण माझ्या मृत्यूनंतर माझे अंत्यसंस्कार सोनलने करावे अशी माझी इच्छा आहे ..." बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला .
"काका हे कसे शक्य आहे ....?? लोक काय म्हणतील..??भावकी काय म्हणेल..?? मुख्य म्हणजे अतुल काय म्हणेल .."?? मी गंभीरपणे विचारले.
"कोणी काही म्हणू नये म्हणून तुला सांगतोय .मी मेल्यावर माझ्यामागे काय चालू आहे हे मला कळणार नाही . पण केवळ अतुल मुलगा आहे म्हणून त्याला अंत्यसंस्काराचे अधिकार का ??? मी त्याला वाढविले मोठा केला ही माझी जबाबदारी आणि कर्तव्य तसेच तो उत्तमपणे माझा सांभाळ करतोय तेही त्याची जबाबदारी आणि कर्तव्य असेल . पण एक सून असून सोनलजे माझ्यासाठी करतेय त्याला तोड नाही . आज ती एका मुलाचे कर्तव्य बजावतेय . तिने माझी जबाबदारी घेऊन अतुलला बाहेरच्या गोष्टी पाहायला सांगितल्या . मग तिच्या ह्या कामाची जाण ठेवून माझे अंत्यसंस्कारही तिने करावे असे वाटते. माझी खात्री आहे अतुलला या गोष्टीचा आनंदच होईल आणि तोही पाठिंबाच देईल. पण त्यावेळी त्याला बोलता येणार नाही आणि भावकी बोलुही देणार नाही म्हणून मी तुला सांगतोय . तू तेव्हा माझी ही अंतिम इच्छा तिथे जाहीर कर. इतके काम कर भाऊ ... बोलता बोलता काकांचा कंठ दाटून आला त्यांचे अश्रू माझ्या हातावर पडले  तसा मी भानावर आलो .
"काका ....काळजी करू नका. तुमची ही इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन.." डोळ्यात येणारे अश्रू थोपवत मी बाहेर पडलो.
© श्री . किरण कृष्णा बोरकर

Thursday, May 3, 2018

पुतिन...... गिरीश कुबेर

पुतिन...... गिरीश कुबेर
राजहंस प्रकाशन
रशियाच्या साम्राज्य स्थापनेपासूनचा इतिहास गिरीश कुबेर यांनी मांडला आहे .सत्तेवर आलेल्या प्रत्येक अध्यक्षांनी आपापल्यापरीने रशियाला महासत्ता बनविण्याचा प्रयत्न केला . त्यासाठी त्यांनी भले बुरे मार्ग अवलंबिले. पण त्यातही त्यांनी भ्रष्टाचार आणि क्रूर राजकारणाचा वापर केला . बोरिस येल्त्सिन यांनी पुनित याना आपला उत्तराधिकारी नेमले . पण त्यांचा डाव फसला .पुतिन निघाले महाबेरकी आणि क्रूर.पुनित यांनी देशाची सूत्रे हाती घेताच विरोधकांचा काटा काढायला सुरवात केली .त्यांनी कसलाच विधिनिषेध बाळगला नाही.रशियाला महासत्ता बनविण्याचा ध्यास घेताना देशविदेशात त्यांनी जी पावले उचलली ती खूप वादग्रस्त ठरली .एका जगावेगळ्या व्यक्तिमत्वाची त्याच्या गुणदोषांसह करून दिलेली ओळख .

चित्रपट आणि मी

बाईकवरून झकपक कपडे घालून निघालेल्या बंड्याला विक्रमने हाक मारून जवळ बोलावले . नेहमीप्रमाणे इराण्याकडे आम्ही बसलो होतो.अर्थात आत घुसायची त्याची इच्छा दिसत नव्हती .पण नाईलाज झाला.
"अरे बाबा ....नाही तुझ्याकडून बील घेत. पण बसतरी थोडा वेळ.कुठे निघालास इतका सजून ....?? विक्रम त्याला निरखत म्हणाला.
"पिश्चर पाहायला जातोय.मैत्रिणीला घेऊन "बंड्या सहजपणे म्हणाला.
"च्यायला ....! मोठ्या मुश्किलीने वेळ मिळतो तुम्हाला. त्यातही तुम्ही समोरच्या पडद्याकडे तीन तास बघत वेळ घालवता..." ?? मी आश्चर्याने विचारले.
"ओ... भाऊ ...तुम्हाला काय कळते हो त्यातले..?? वहिनीला घेऊन किती चित्रपट पाहिले आतापर्यंत .."? बंड्या चिडून म्हणाला .
"हा..! हा ..!हा..! उत्तम प्रश्न .. विक्रम हसत म्हणाला"हा कसला तिला घेऊन सिनेमा बघतो ..?? अरे सिनेमा बघताबघता झोपी जातो तो .चित्रपट संपल्यावर शेजारचा उठवतो नाहीतर डोअरकिपर . .
तसा बंड्याही हसू लागला"भाऊ ..सांगा ना ?? तुम्ही लग्नाच्या आधी वहिनीबरोबर कुठे कुठे मजा केलीत. बोला... बोला....बंड्याने चिडवायची संधी सोडली नाही.
" गप रे ..... !हे खरे आहे मला नेहमी एकट्याला सिनेमाला जाणे आवडायचे .कारण मला चित्रपट पाहता पाहता झोप लागायची .शांतपणे झोपून जायचो मी. मग लग्न ठरले.आम्ही दोघेही नोकरी करणारे.आमचे ऑफ ही वेगळे .तेव्हा मी शिफ्टमध्ये ड्युटी करायचो आणि ती उशिरापर्यंत थांबायची . त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा तासापूरते का होईना  भेटायचो .कधी रेल्वे प्लॅटफॉर्म तर कधी तिच्या घरी जाण्याच्या रस्त्यावर . आम्हाला गप्पा मारायलाच वेळ पुरायचा नाही . शिवाय तिची आवड वेगळी माझी आवड वेगळी . थिएटरमध्ये तीन तास पडद्याकडे बघत बसण्यापेक्षा तोच वेळ एकमेकांसाठी देऊ असे ठरले .माझी झोपण्याची सवय तिला कळलीच नाही आणि लग्नानंतर परत तेच होणार. त्यामुळे आमचे असे ठरले वेळ मिळेल तेव्हा भरपूर फिरायचे .खूप गप्पा मारायच्या . स्वप्ने पहायची .ती पूर्ण करण्याचे प्लॅन करायचे. च्यायला ..! बघता बघता हेही दिवस गेले .मी बोलता बोलता भावनिक झालो . विक्रमने हसून माझ्या पाठीवर थाप मारली .
"हो भाऊ ....पण आता परिस्थिती बदलली आहे . सध्या एकमेकांना भरपूर वेळ मिळतो.फोन हातात असतो ,व्हाट्स अप वर भरपूर चॅटिंग होते . फोटो विडिओ शेयर होतात तर विडिओ कॉल ही होतात.मग प्रत्यक्षात भेट होते तेव्हा बोलायला विषयच नसतात तेव्हा  दुसरे काय करणार.... ?? हल्ली मल्टिप्लेक्समुळे हव्या त्यावेळेला चित्रपट पाहता येतो  थिएटरही छान असतात .तुमच्यावेळी असायचे तसे खुर्चीत ढेकूण नसतात आणि ए सी ही बंद नसतात.शिवाय हल्ली प्रेमापेक्षा मैत्रीचं जास्त .तेव्हा भावनिक रोमँटिक असे काही बोलायचे नसतेच . भावी आयुष्याची स्वप्नेही पहायची नसतात . प्रत्येकाला टाईमपास हवा असतो. आता जीच्याबरोबर मी सिनेमाला चाललो आहे ती फक्त माझी मैत्रीण आहे . सिनेमा पाहू ,काहीतरी खाऊ आणि आपापल्या घरी जाऊ . खरे तर ती माझी बायको बनू शकत नाही . माझ्या आणि तिच्या विचारात राहणीमानात  भरपूर फरक आहे .  तेव्हा आजची संध्याकाळ तिच्याबरोबर एन्जॉय करतो उद्यापासून ड्युटी चालूच .चला निघतो उशीर होतोय . असे बोलून बंड्या बाहेर पडला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर