क्रायसिस ....रॉबिन कूक
अनुवाद.... डॉ. प्रमोद जोगळेकर
मेहता पब्लिकेशन
डॉ. क्रेग बोमन आपल्या मादक मैत्रिणीबरोबर एका कार्यक्रमाला जाण्याची तयारी करत होता इतक्यात त्याच्या एका स्त्री पेशंटची प्रकृती गंभीर असल्याचा फोन आला.तो ताबडतोब आपल्या मैत्रिणीला घेऊन त्या पेशंटच्या घरी गेला तिथून त्याने तिची तपासणी करून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची सूचना केली .पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करताच तिचा मृत्यू झाला .आठ महिन्यानंतर डॉ. क्रेग बोमनवर मृत स्त्रीच्या नवर्याने अयोग्य पद्धतीने उपचार केल्याबद्दल दावा ठोकला.त्याची केस कोर्टात सोमवारी उभी राहिली आणि शुक्रवारी संपणार आहे . क्रेगची बायको अलेक्सीने आपल्या भावाला मदतीला बोलावले . डॉ .जॅक स्टेपलटन न्यूयॉर्क शहरात वैद्यकीय तपासनीस आहे आणि नेमके शुक्रवारी त्याचे लग्न आहे .तरीही तो आपल्या बहिणीला मदत करण्यासाठी बोस्टनला पोचतो आणि आठ महिन्यांपूर्वी दफन केलेल्या त्या स्त्रीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचा निर्णय घेतो . शवविच्छेदन करू नये यासाठी त्याला धमक्या येतात. त्याच्यावर प्राणघातक हल्ला होतो. तरीही तो हे कार्य पार पाडतो आणि हाती आलेले रिपोर्टपाहून चक्रावून जातो. काय आहे त्या रिपोर्ट मध्ये...???? डॉ क्रेग खरोखरच निर्दोष आहे का ...?? यामागे कोणते षडयंत्र आहे ....?? सर्वात महत्वाचे म्हणजे डॉ. जॅक स्वतः च्या लग्नाला वेळेवर उपस्थित राहू शकतील का ....?? अखेरच्या पानापर्यंत उत्कंठा वाढविणारे पुस्तक .
Sunday, November 11, 2018
क्रायसिस ....रॉबिन कूक
त्यांचीही दिवाळी .....५
त्यांची ही दिवाळी ...५
दिवाळीच्या पहिल्या दिवशी आमच्या नाक्यावर धमाल असते . मी विक्रम आणि बंड्या दरवर्षीप्रमाणे सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत उभे होतो.
इतक्यात समोरून वासुदेव आला.नेहमीप्रमाणे पालिकेचा गणवेश अंगावर होता.आम्हाला पाहून थांबला आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.पण त्याचे काहीतरी बिनसलेले दिसून येत होते.याबाबतीत विक्रम खूप हुशार ...त्याने पटकन विचारलेही.."काय रे वाश्या...!! आजपण ड्युटी का ...??
"तुम्ही रस्त्यावर कचरा टाकणे कमी करा... आपोआप आम्हालाही अश्या सणांना सुट्टी मिळेल..". वासुदेव तडकून म्हणाला.
"आता तू कचराखात्यात कामाला आहेस ही आमची चूक आहे का ....?? नशीब जास्त शिकलास नाही नाहीतर कमिशनर झाला असतास .. .."विक्रमने ताबडतोब उत्तर दिले .
"च्यायला ....इथे तुम्ही बोला.. घरी तो पोरगा बोलतो" वासुदेव चिडून म्हणाला .
"कोण बंटी ....?? मी चमकून म्हणालो .
"हो रे भाऊ .... तो सारखा चिडतो हल्ली. म्हणतो मित्र चिडवतात कचरेवाल्याचा पोरगा ..कोणत्याच सणाला घरी नसतो मी . दिवाळीला सर्वांच्या घरी जाऊन फराळ गोळा करतो त्याची लाज वाटते त्याला .आजही बोलला चालले पप्पा कचरा गोळा करायला....लोकांकडे दिवाळी मागायला.अरे डॉक्टर.. ,पोलीस ...,सणासुदीला काम करतात याचा याना अभिमान वाटतो.पण आम्ही रोज तुम्ही केलेली घाण गोळा करून नेतो याचे काही वाटत नाही त्यांना .एक दिवस सुट्टी घेतली तर कचऱ्याचे ढीग जमतील तरी आमच्याच नावाने शिव्या देतील."
"जाऊ दे रे वश्या ...पोरगा लहान आहे .मोठा झाला की कळेल त्याला" मी समजूत काढली त्याची.तो मान डोलावून निघून गेला.आम्ही शांत झालो.
काही वेळाने अचानक विक्रम उठला" भाऊ.. चल सोसायटीत राऊंड मारू .बंड्या चल एक मोठी पिशवी घे ..अर्थात विक्रमच्या ऑर्डरपुढे आम्ही मान तुकवणार हे ठरले होतेच . पिशवी घेऊन विक्रम वासुदेवच्या घरासमोर उभा राहिला आणि ओरडला "वहिनी.. दिवाळी ... विक्रमच आवाज ऐकून बंटी आणि वहिनी बाहेर आले .
"भाऊजी.. तुम्ही सगळे ... आज अचानक फराळ मागायला .."तिने तोंडावर हात ठेवून कुतूहलाने विचारले.
"हो ..अनाथाश्रमात काही फराळ द्यायचा ठरवलं आहे . म्हणून सगळ्यांकडून गोळा करतोय "तसा वहिनीने काही फराळ आणून दिला.
बंटी म्हणाला.." काका छान काम करतायत ."
"हो ना..मग तुही चल आमच्याबरोबर ."विक्रम सहज म्हणाला. तसा तो तयार झाला.आम्ही 2/3 घरात फिरून फराळ गोळा केला ,तसेच काही छोट्या मुलांचे जुने कपडे गोळा केले. मग विक्रम आम्हाला कारमध्ये बसवून निघाला.
काही वेळाने त्याने एका डम्पिंग ग्राउंडजवळ गाडी थांबवली आणि एका दिशेकडे बोट दाखवून म्हणाला "बंटी.... तो बघ तुझा बाप काय करतोय ..??
बंटीने त्यादिशेने पाहिले आणि तो आश्चर्यचकित झाला . डम्पिंग ग्राऊंडच्या एक कोपऱ्यात काही गरीब मुले बसली होती आणि वासुदेव आणि त्याचे साथीदार आपल्या पिशवीतील फराळ त्या मुलांना पेपरमधून देत होते.
"काका हे काय आहे ..."?? बंटीने आम्हाला विचारले. "अरे तुझ्या बापाला विचार न ??? सगळे तुला चिडवतात बाप कचरा गोळा करतो म्हणून .. बघ आज तो काय काय करतोय...
बंटी धावत त्याच्याजवळ गेला . बंटीला पाहून वासुदेव खुश झाला." ये रे ...हा फराळ वाट त्यांना "त्याच्या हाती फराळाची पिशवी देत वासुदेव म्हणाला .
"पण पप्पा कोण ही मुले ....?
"अरे ही अनाथ रस्त्यावर फिरणारी मुले आहेत. इथे आम्ही कचरा टाकला की धावत येऊन त्यात काही मिळते का ते शोधत बसतात . मग कोणी अर्धी खाल्लेली मिठाई टाकलेली असते तर कोणी फुटबॉल.....इथे त्यांना जगण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो बेटा. आपल्या समाजाची हिपण एक बाजू आहे . लोक अन्नाची नासाडी करतात ते फेकून देतात आणि अशी शेकडो मुले अश्या अन्नाच्या शोधात असतात. आम्ही हे रोज बघतो म्हणून त्यामुलांना निदान सणाच्या दिवशीतरी चांगले खायला मिळावे म्हणून आम्ही घरोघरी जाऊन दिवाळी मागतो . मी तुला दरवर्षी नवीन कपडे घेतो आणि तुझे जुने कपडे याना देतो . तुझी जुनी खेळणी ,पेन्सिल ,रंगीत खडू जे काही असेल ते याना देतो . आम्ही आमच्यापरीने जमेल ते करतो"" वासुदेव त्याला म्हणाला.
" पाहिलस बंटी... कचरा गोळा करणारा तुझा बाबा नक्की काय करतो ते.तो फक्त कचरा गोळा करीत नाही तर कचरा जमा होऊ नये म्हणूनही प्रयत्न करतोय. तुला प्रत्यक्ष दाखवून तुझे डोळे उघडावे म्हणून इथे घेऊन आलो. आता तुला पप्पांचा नक्कीच अभिमान वाटत असेल.." विक्रम बंटीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.
"हो पप्पा... मी चुकलो ,यापुढे मीही कमीतकमी कचरा निर्माण करायचा प्रयत्न करेन ,अन्नाची नासाडी होऊ देणार नाही.
शेवटी आमच्या विकीला प्रॅक्टिकल जमते याचा पुन्हा अनुभव आम्हाला आला
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Saturday, November 10, 2018
त्यांची ही दिवाळी ....४
त्यांची ही दिवाळी ....४
"अरे मॅडम..... अजून इथेच का तुम्ही ...?? घरी नाही गेलात ते ..?? आज दिवाळी आहे जा लवकर.." हातातील कंदील सावरत डॉक्टर रवी निमकर नर्स रेवतीकडे पाहत मिश्किलपणे म्हणाला.
"आहो सर ....जातच होते.पण या अपघातातील बॉडी आल्यात . तिघेही जागीच गेले . त्यांचे पेपर बनवत बसले . शिवाय रिलिव्हर आली नाही अजून . त्यामुळे आज डबल ड्युटी . म्हटले तुम्हाला मदत करू आज . आपल्या शिफ्ट वेगळ्या त्यामुळे एकत्र काम करायची संधी कमीच मिळते म्हणा .." तिनेही तितक्याच मिश्किलपणे उत्तर दिले आणि दोघेही हसले
"आणि हे काय ..?? कंदील कुठे लावणार आहात..........."?? तिने कुतूहलाने विचारले.
"आपल्या डिपार्टमेंटमध्ये .." शवागृहाच्या दरवाज्यावर बोट दाखवून त्याने म्हटले .
"काहीतरी काय ...?? लोक काय म्हणतील ..??.तिने डोळे वटारून म्हटले.
"काय म्हणणार .....? प्रत्येकजण आपापल्या कामाच्या ठिकाणी सजावट करतो.दिवाळी प्रत्येकजण आहे तिथे साजरी करतात..पोलिस स्टेशन,ऑफिस दुकाने सगळीकडे कंदील ,तोरणे लावतात . आता हे सरकारी हॉस्पिटलचे शवागृहच आपले ऑफिस आहे त्याला आपण तरी काय करणार . आता प्रत्येक वार्ड मध्ये कंदील लागले आहेत मग इथेच का नाही..."?? तो तिला समजावत म्हणाला.
" हो ..तेही खरेच म्हणा .. नाहीतरी तुमचे डोके कुठे कसे चालेल ते सांगता येत नाही "ती हसून म्हणाली ."होणाऱ्या बायकोला इथेच एका म्हातारीचे पोस्टमार्टेम करता करता प्रपोज केलेत ही गोष्ट आख्या हॉस्पिटलला ठाऊक आहे .चार दिवस मान खाली घालून ती नर्स काम करीत होती".
" मग काय करणार . मला आवडलेली पहिली तरुणी होती ती . पण आमच्या शिफ्ट वेगळ्या . मी घरी तर ती इथे . शेवटी एकदा तिने शिफ्ट चेंग करून घेतली आणि नेमकी माझ्या टेबलवर आली .इथेच विचारायचे कसे म्हणून संभ्रमात पडलो पण नशीब नव्वद वर्षाची म्हातारी समोर पोस्टमार्टेमसाठी आली . हिला काहीच वाटणार नाही असे समजून प्रपोज केले " रवी ती घटना आठवून हसत हसत म्हणाला .
"काय तुमची ती विचारायची पद्धत ...तुझ्या हृदयात मला स्थान मिळेल का अशी फिल्मी वाक्ये बोलत समोर आडवी पडलेल्या म्हातारीचे ह्रदय कटरने कापलात"तिने हसत हसत म्हटले.
"हो... पण तिने होकार दिलाच .आपल्या क्षेत्रात असेच असते.तरीही डीनने झापलेच मला. डॉक्टर निमकर ही काय प्रेयसीला प्रपोज करायची जागा आहे का ..?? म्हटले काय करू ...??भेटायची संधीच मिळत नव्हती . तेव्हा ते ही हसले".रवी त्या आठवणीत गुंतून गेला.
" पण नुसते हसले.... रेवती डोळे फिरवत म्हणाली कसली सूट दिली नाही .लग्नाची बोलणी ..तयारी हनिमूनची तयारी ...सगळे इथेच ठरले की ...त्यानंतर दिवाळी ही इथेच साजरी होते तुमची .."ती ठसक्यात म्हणाली .
"काय करणार दिवाळीत मृत्यू रजा घेत नाही मग आपणही का घ्यावी ....?? आणि आपण रजा घेतली तर याना मोकळे कोण करणार...??.समोरच्या बॉडीवर बोट रोखून तोम्हणाला "चला कामाला सुरुवात करू .आज बऱ्याच महिन्यांनी आपण एकत्र काम करू .."असे म्हणून दोघेही आत शिरले .वार्डबॉयला कंदील लावायला सांगून ते केबिनमध्ये आले .दोघांनी देवाला नमस्कार केला.
तो कामाला सुरुवात करणार तेव्हा अचानक तिने त्याला थांबविले "आहो ..दिवाळी आहे .घरी तर कधी या दिवशी भेटत नाही तुम्ही.आजतरी इथेच ओवाळून घेते तुम्हाला "असे म्हणून तिने देवाजवळचे तबक उचलले .
"हे काय रेवती ....इथे ओवाळणार तू ....तो आश्चर्याने म्हणाला .
"तर काय झाले ..बंद केबिन आहे ही तुमची आणि तुमचे पेशंटही उठणार नाही आता .मीच मुद्दाम आज डबल शिफ्ट घेतली .कितीवर्षं आपण वेळ मिळेल तेव्हा सण साजरे करणार...??.मागाच्यावर्षी पाडवा झाला आणि दहा दिवसांनी तुम्हाला ओवाळले मी . मान्य आहे ही जागा योग्य नाही पण सणाच्या दिवशीतरी आज एकत्र असण्याचा योग जुळून आलाय त्याचा फायदा का करून घेऊ नये आणि कामाच्या प्रति आपली निष्ठा सगळ्यांना माहीत आहे ..काय करेल तो डीन हे कळल्यावर....??? जास्तीत जास्त एक शो कॉज दोघांना देईल . सण एकत्र साजरे करतोय मग शिक्षा ही एकत्र भोगू "त्याने हसून तिला टाळी दिली . तिने त्याला ओवाळले . दोघांच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले . इतक्यात दरवाजावर टकटक झाली . वार्डबॉय दरवाजा उघडून आत आला "चला साहेब ..पेशंट वाट पाहतायत . सुरवात करू ...
"चला मिस्टर मिसेस निमकर लागा कामाला ...तो हसत तिला म्हणाला आणि दोघेही तयारीला लागले .
© श्री.किरण कृष्णा बोरकर
Wednesday, November 7, 2018
त्यांची ही दिवाळी ....३
त्यांची ही दिवाळी ...३
"बाब्या.....!! लक्ष कुठे आहे तुझे ...?? तो तीन नंबर टेबलवाला कधीपासून पाणी मागतोय .. दे त्याला लवकर..." काउंटरवर बसलेला मालक त्याच्यावर खेकसला तेव्हा तो भानावर आला.
तृप्ती हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती. त्यात आजचा दिवाळी सण...खरेदी करायला आलेले बरेचसे लोक त्या हॉटेलातच घुसत होते .त्याचे मात्र आज कामात लक्ष नव्हतेच . आणि कामात चूका घडल्या तरी फारसा फरक पडत नव्हता. बोलून चालून टेबलवर फडके मारणार पोऱ्या तो .... पण आज त्याला राहून राहून तिची आठवण येत होती . कधी नव्हे तर तिने यावेळी त्याच्याकडे काही तरी मागितले होते .
"दादा...... घरात बसून बसून कंटाळा येतो रे.. छोटासा मोबाइल आण ना... विडिओ गेम खेळायला... .नाहीतरी बाहेर जायला मिळतच नाही आपल्याला " तिची मागणी ऐकून तो मनातून हलला.काय चुकीचे होते तिचे ....?? जन्मतः पायात काहीतरी प्रॉब्लेम झाला तेंव्हापासून लंगडत चालते . जास्त चालले की त्रास होतो म्हणून घरात बसूनच असते . शाळेत जाणे हेच तिचे बाहेर पडणे . हा हॉटेलमध्ये कामाला . कधी सुट्टी नाहीच . इतरवेळी वेळेत घरी यायचा पण सण आले की ह्याचे काम वाढले . हा .....त्यात टीप जास्त मिळायची म्हणून सुट्टी न घेता काम करायचा. आई वडील लवकरच गेले तेव्हापासून बहिणीची जबाबदारी यांच्यावरच . रोजचा खर्च निघताना मुश्किल तर मोबाईल कुठून घेणार ...??आणि गरजच काय.....?? हा दिवसभर तृप्ती हॉटेलमध्ये भेटणार तर घरी बहीण आहेच..
.पण काही म्हणा ..बहिणीवर जीवापाड प्रेन होते . हॉटेलमध्ये काही उरले की स्वतः न खाता बहिणीसाठी बाजूला काढून ठेवायचा. सहकारी वेटर त्याची टर उडवायचे पण हा हसून सहन करायचा .पण आज अचानक तिने अशी मागणी केली तो विचारात पडला.
मालकालाही समजले याचे लक्ष नाही . त्याने पुन्हा त्याला बोलावले आणि सहा नंबर टेबलवर पाठविले . तिथे दोन तरुण बसले होते . याने पाणी ठेवताच त्यांनी यांच्याकडे दोन चहाची ऑर्डर दिली .दोन तीन नुकतीच खरेदी केलेली पॅकेट्स त्यांच्याजवळ दिसत होती .
"लवकर आण मित्रा.... आम्हाला निघायचे आहे"याने मान डोलावली आणि ताबडतोब दोन चहा आणल्या. त्यांनी ताबडतोब बिलही दिले आणि बाकी ठेव असे बोलून उठले . हा त्यांचे कप उचलायला गेला तेव्हा त्या टेबलवर एक बॉक्स राहिल्याचे लक्षात आले ..आजूबाजूला पाहून त्याने तो बॉक्स उचलला . त्या बॉक्समध्ये नवीन मोबाइल आहे हे त्याच्या लक्षात आले . काय करावे ....?? बहिणीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला . हा मोबाईल तिला दिला तर किती खुश होईल.. पण दुसरे मन ऐकेना .काही न करता तो काउंटरवर गेला आणि बॉक्स मालकाच्या हाती दिला.
"सहा नंबर टेबलवर कोणीतरी विसरून गेलाय..".मालकाने काही न बोलता तो बॉक्स ठेवून घेतला . थोड्या वेळाने ते दोघे घाईघाईने हॉटेलमध्ये शिरले आणि मालकाशी बोलू लागले. "बाब्या .... ..!! मालकाने आवाज देऊन त्याला बोलावले .
"हेच का ते ...."??? त्याने होकारार्थी मान डोलावली.तसे मालकाने बॉक्स त्यांच्या हाती दिला .बॉक्स पहाताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
"आहो ...यावर्षी बहिणीने मोबाईल मागितला. दहावी पास झाली ना ती ...?? म्हणून कर्ज काढून हा नवीन मोबाईल घेतला आणि इथेच विसरून गेलो . नशीब सापडला नाहीतर नुकसान झाले असते हो... खूप खूप आभार तुमचे ".असे बोलून त्याने शंभर रुपये पुढे केले . त्याने मान डोकावून घेण्यास नकार दिला . मालक ही नको म्हणाला.
दिवाळीच्या शुभेच्छा देऊन ते दोघे निघून गेले . "चला निघा ...मालक खेकसला. संध्याकाळी घरी निघताना मालकाने त्याला जवळ बोलावले .. हातात मिठाईचा बॉक्स दिला आणि ड्रॉवरमधून आपला जुना मोबाईल काढून त्याच्या हातात दिला."जा बहिणीला दे ..चार नवीन गेम टाकलेत त्यात .. खुश होईल ती .तिला गेम खेळायला मोबाईल हवाय ते कळले होते मला. अरे तुम्ही माझी माणसे आहात .आज तुझा प्रामाणिकपणा पाहिला आणि त्याचेच हे बक्षीस समज"
त्याने तो मोबाईल घेतला . घरी लवकर जाण्यातही किती आनंद असतो ते आज कळले त्याला .
© किरण कृष्णा बोरकर
त्यांची ही दिवाळी ....२
घड्याळात सकाळी पाचचा गजर झाला आणि तो अलगद उठून बसला तरीही त्याच्या सावध हालचालीने तिची झोप चाळवलीच.
"अरे....!! हे काय...?₹ तुम्ही निघालात का... ??? पहिली दिवाळी आहे आपली ."असे म्हणून तिने प्रेमाने त्याच्या गळ्यात हात टाकले.
" हो... पण मला जावेच लागेल.ड्युटी आहे माझी".तो हसत म्हणाला .नवीन लग्नाची धुंदी अजूनही त्यांच्या मनातून उतरली नव्हती.तिने लटक्या रागाने त्याच्याकडे पाहिले आणि गंभीर चेहरा करून खिडकीतून बाहेर पाहू लागली.तो हसला......अलगद तिला मिठीत घेऊन म्हणाला "तुला आधीच माहिती होते माझी ड्युटी कशी आहे तरीही हा आग्रह का.... ?? मी पडलो पोलीस.. त्यातही बॉम्बस्कॉडचा . इतर दिवशी घरी असलो तरी चालेल पण अश्यावेळी मात्र ड्युटी करावीच लागेल. सण चालू झालेत परिस्थिती अशांत आहे. आम्हीच कंटाळा केला तर इतरांचे रक्षण कोण करणार.."
"तरीही आज पहिली दिवाळी आपली ... सर्व घरी येतील आपल्या,नवीन आहे म्हणून कौतुक करतील नंतर कोण विचारणार आहे आपल्याला ..."??. तिचा तो नाराज चेहरा पाहून त्याला ही क्षणभर वाटले थांबावे घरी . नाहीतर इतक्या कडेकोट बंदोबस्तात कोण काय करेल ..?? मागचे बरेच सण असे बसूनच घालवले आज ऍडजस्ट करूया का ...?? बायकोचे मन तोडणे जीवावर आले होते . पाठवूया का जनार्दन लोकेला ....?? नको पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहे तो .हालचाली ही मंद झाल्यात त्याच्या आणि सध्याच्या बॉम्बची टेक्नॉलॉजीही समजत नाही त्याला . जाऊ दे ... आपणच जाऊ .. आज राहिलो तर पुढे ही हीच सवय लागेल. मोठ्या निग्रहानेच बायकोची मिठी सोडवली आणि निघायच्या तयारीला लागला.
दिवाळीचे दिवस असल्यामुळे खरेदीची सुरवात लवकरच सुरू झाली होती.आज त्याची ड्युटी मार्केटमध्येच होती. मोटारसायकल पार्क करून तो पोलीस स्टेशनमध्ये शिरला. कॉल येईपर्यंत जागा सोडायची नसल्यामुळे तो मोबाईल घेऊन बायकोशी चाट करीत बसला . बघता बघता दुपार झाली . सहज म्हणून मार्केटमध्ये चक्कर टाकावी म्हणून तो उठला .आता मार्केट गर्दीने नुसते फुलून गेले होते . गर्दीत मोकळेपणाने श्वास ही घेता येत नव्हता.अचानक त्याचा मोबाईल वाजला . पाहतो तर पोलीस स्टेशन मधून कॉल होता . रामेश्वर ज्वेलर्समध्ये बॉम्ब असल्याची बातमी होती .अरे हा तर समोरच आहे .....! आपल्या आता परत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बॉम्बप्रूफ जाकीट आणायला वेळ गेला असता त्याने तसेच आत शिरण्याचा निर्णय घेतला. फोनवरून त्याने मी आत शिरतोय याची माहिती वरिष्ठांना दिली. आतमध्ये गोंधळ उडाला होता कसे बसे त्यांनी दुकान रिकामे केले आणि एका काऊंटरपाशी असलेल्या त्या काळ्या बॅगेच्या दिशेने गेला . हात लावताच त्याच्या अनुभवी नजरेने त्यात जिवंत बॉम्ब असल्याचे ओळखले .आता तर जॅकेटही घालण्यास वेळ नव्हता .धडधडत्या मनाने त्याने बॅग खोलली आणि आतील बॉम्ब पाहून तो चक्रावला . अतिशय नव्या पद्धतीच्या त्या बॉम्बने तेथील शेकडो लोकांच्या चिंधड्या उडवल्या असत्या .मन एकाग्र करून तो कामाला लागला . आता त्याच्या डोळ्यापुढे फक्त तो बॉम्बच दिसत होता . आपले लग्न झालेय तरुण सुंदर बायको आपली वाट पाहतेय या जाणिवेच्या पलीकडे गेला होता तो . घड्याळाचे काटे पुढे सरकत होते तशी लोकांमध्ये अस्वस्थता वाढत होती .शेवटी काही मिनिटे बाकी असतानाच तो बॉम्ब नादुरुस्त केला आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला .सहकाऱ्यांकडे पाहून त्याने हात उंचावला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव आले . सर्वांनी टाळ्या वाजविल्या पण त्याच्या डोळ्यात मात्र चिंता दिसत होती . बहुतेक जॅकेट न घातल्यामुळे शो कॉज मिळणार तो स्वतःशी पुटपुटत तिथून निघाला.
हताश मनाने पोलीस स्टेशनमध्ये शिरला तितक्यात मागून हाक ऐकू आली "ओ साहेब....!! ऐकता का ....?? त्रासिक मुद्रेने तो वळला आणि समोरच्या म्हातार्याला पाहून शांत झाला . त्याच्याबरोबर तरुण मुलगी होती . नुकतेच लग्न झालेले दिसत होते तिचे . तो म्हातारा जवळ येऊन म्हणाला" साहेब ...तुमचे उपकार कसे मानू हेच समजत नाही . ही माझी मुलगी .. नुकतेच हिचे लग्न झाले आहे . पहिली दिवाळी म्हणून हिला काही गिफ्ट द्यायचे म्हणून त्या ज्वेलर्सच्या दुकानात गेलो होतो. आमच्या पायाखालीच ती बॅग होती .आज तुम्ही वेळेवर आला नसता तर तो बॉम्ब फुटून आमच्या चिंधड्या उडाल्या असत्या. माझे ठीक आहे हो पण आता ही परक्याची पोर . घरच्यांनी काय उत्तर दिले असते हिच्या नवऱ्याला . तुम्ही देव आहात आमच्यासाठी..." असे बोलून त्याने हात जोडले .काही न बोलता त्यानेही हात जोडले . इतक्यात फोन वाजला बायकोचा फोन पाहून चेहऱ्यावर हसू उमटले.
" येणार आहात का घरी ...."?? तिने प्रश्न केला . "नाही ...आता दिवाळी संपेपर्यंत नक्कीच नाही "तो उत्तरला.
"मीही तेच म्हणतेय .... आज तिथे तुमची गरज आहे . तुम्ही याल तेव्हा आपण दिवाळी साजरी करू .मी वाट पाहीन .. डोळ्यातील अश्रू पुसत त्याने फोन बंद केला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Monday, November 5, 2018
त्यांचीही दिवाळी ...१
"चल रे लवकर .....!! लवकरच दिवाळी सुरू होईल.."
"हो ग ....!! तयार तरी होऊ दे मला.दिवाळी आहे.चांगले दिसायला नको का ???
"हा... हा.. हा.. जोक करू नकोस ... मला काही फरक पडत नाही .. किती वर्षे अनुभवतेय तुझा सहवास ..... चल लवकर मी खूप उत्साहित झालीय ते फटाक्यांचे आवाज ऐकायला ..."
"हो ..हो .... चल निघू .."
"ओ दादा ... !! टॅक्सीवाले भाऊ ...!! चौपाटीवर चला घेऊन .. हॅपी दिवाळी तुम्हाला. चला मॅडम हात पकडा नाहीतर हरवाल त्या गर्दीत.."
"तुम्ही म्हणजे ना .... किती वर्षे जातोय दिवाळीत ..??चौपाटीवर कधी हरवले आहे का .. ?? त्या निमित्ताने तुम्ही हात धरून ठेवता .."
"चला चौपाटी आली ... किती गर्दी आहे नाही ...किती गोगांट ..?? नुसती आनंदाने फुलून गेली आहे चौपाटी ...".
"हो ना... किती छान वाटते ऐकून .. बघ बघ फाटक्या वाजू लागल्या ..खरेच यार ..ही खरी दिवाळी ..
"हो ना ...किती वेगवेगळ्या आवाजाचे फटाके लावतायत लोक.किती छान वाटते वेगवेगळे आवाज ऐकून ..."
"अरे बापरे ....हा सायरनसारखा आवाज कुठून येतोय ....काय अपघात वगैरे झालाय का ....
"नाही हो .. तुमचे आपले काहीतरीच ..हा ही फटाका आहे .. सायरन सारखा आवाज येणारा.
"अरे देवा...!! दरवर्षी काहीतरी वेगळे आवाज ऐकतोय..."
"अरे हे काय ....?? आवाज बंद का झाले ...?? इतकी शांतता कशी अचानक ..."??
"माहीत नाही ग काय झाले ...?? थांब विचारतो कोणाला तरी ... ओ भाऊ काय झाले ..?? हे अचानक शांत का .."??
"आहो दहा वाजले ..कोर्टाने आदेश दिलाय रात्री दहा नंतर फटाके वाजवू नये . पोलीस आले आणि सर्व बंद करून गेले . तुम्हाला कुठे सोडू का ...??
"नको.. नको ... आम्ही ठीक आहोत धन्यवाद".
"काय ग .... हे काय नवीन ... अग फटाक्यांचे आवाजच ऐकू आले नाही तर आपण दिवाळी कशी साजरी करणार . आपल्या आयुष्यात अश्या मार्गाने येणारा प्रकाशही आपल्यातून निघून गेला ....."
"हो ना ... आयुष्यभर डोळ्यासमोर काळोखच असतो आपल्या.पण दरवर्षी किती हौसेने आपण इथे दिवाळी अनुभवायला येतो. ही गर्दी..उत्साहाने भरलेली माणसे..,ते फटाक्यांचे विविध आवाज ..यांच्यावरच आपली दिवाळी साजरी होते . आता तोच आवाज आपल्या आयुष्यातील एका आनंदाच्या प्रसंगातून निघून गेला .आता दिवाळी कशी साजरी करायची आपण . इतरांचे ठीक आहे हो.त्यांना सगळे दिसते .. ती रोषणाई ..फटाक्यांची आतिषबाजी . पण आपले काय .. आपण त्या फटाक्यांच्या आवाजात आणि आजूबाजूच्या माणसांच्या उत्साहाने भरलेल्या वाजताच रंगून आपली दिवाळी साजरी करतो . आता पासून ते ही नाही .. चला घरी निघू
"हो चल ... सांभाळून... हात धर माझा.. मी टॅक्सीला आवाज देतो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर