प्रिय पत्नी
प्रेमदिनाच्या खूप खूप शुभेच्छा....!! खरे तर माझ्यासारख्या नीरस नवऱ्याकडून शुभेच्छा ते ही अश्या पत्ररूपात पाहताना तुला धक्का बसला असेल. लग्न ठरले तेव्हा इम्प्रेशन मारण्यासाठी व्हॅलेंटाईन डेला मिळालेले गिफ्ट पाहून तुला आनंदच झाला असेल . पण तो आनंद नंतर काही मिळाला नाही. इंजिनियर नवरा मिळाला याचा आनंद लग्नानंतर काही दिवसच टिकला जेव्हा पहिल्या सणाला मी इतरांसारखा घरी न राहता कामावर गेलो आणि त्यानंतर अजूनपर्यंत तेच चालू आहे.
कष्ट करून जगण्याची सवय तुला पूर्वीपासून होतीच . शिक्षण अर्धवट सोडून तू घरची जबाबदारी उचललीस स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली दिलीस .लग्नानंतर परिस्थिती बदलेल अशी तुला आशा होती . पण फारसा काही फरक पडला नाही .इथेही अडजेस्टमेंट कराव्या लागल्याच.
एक समजून घेणारा नवरा इतकीच माझी ओळख. कुठे जाणे नाही ..फिरणे नाही.. काम आणि घर हेच आयुष्य राहिले .तुझ्या आवडीनिवडी तू बाजूला सारल्यास. माझे वेळीअवेळी घरी येणे .. माझी व्यसने ..माझा मूड सर्व काही ऍडजस्ट केलेस. मला माझ्या कामात मदत करणारी सहकारी हवी होती तर तुला समजावून घेऊन हळुवारपणे प्रेम करणारा नवरा . एके दिवशी संतापून मशीनसोबत काम करता करता तुही मशीन झालायस असे बोलून गेलीस. पण त्यानंतर पुन्हा त्याविषयावर शब्द ही बोललीस नाही. माझा स्वतःचा विचार करणे ..तुला न विचारता निर्णय घेणे ... तुला गृहीत धरणे हे ही तू स्वीकारलेस.
तुझ्या खूपच कमीच अपेक्षा होत्या माझ्याबद्दल .एक ड्रेस आणून दे असे म्हणालीस आणि मी मुकाटपणे डेबिट कार्ड काढून तुझ्या हाती दिले आणि सांगितले तुझ्या आवडीचा घेऊन ये . तुझा हिरमुसलेल्या चेहऱ्याकडेही कधी लक्ष दिले नाही . पाणीपुरी खायची आहे असे सांगितलेस आणि मी रागाने शी रस्त्यावरचे काय खातेस ,असे बोलून हॉटेलात घेऊन गेलो. पण त्या एका बशीत एकप्लेट पाणीपुरी खायची काय गंमत असते आणि त्यातून तुला किती आनंद मिळतो याचा विचारच मी कधी केला नाही .
दर वर्षी व्हॅलेंटाईन डे ला काय गिफ्ट द्यायचे याचा विचार करता करता तो दिवस पार पडायचा पण तुला गिफ्ट काही मिळाले नाहीच . तिला कधी काही घ्यायला मी नाही म्हटले नाही.... असे बोलून माझी बाजू सेफ करायचो .दोघांनी मिळून चित्रपट कधी पहिला हे ही आठवावे लागते . रात्री फिरायला जायचे का ...?? असे विचारल्यावर हो म्हणायचे इतकेच माझे काम. पण तुझे आटपून येईपर्यंत माझी मध्यरात्र झालेली असते .पण खरे सांगतो मी मशीन नाही ग ... सर्व काही दिसते मला .. तुझे कष्ट ,इतरांना समजून घेण्याची धडपड ....त्याचबरोबर स्वतःच्या माहेरी लक्ष देणे... त्यांचे प्रॉब्लेम समजून ते सोडविणे हे सर्व पाहतोय मी. मी रुक्ष असलो तरी तूझा रसिकपणा अजूनही टिकवून आहेस .
खूप काही बोलायचे असते.पण ते जमत नाही म्हणून हा पत्रप्रपंच. कागदावरची अक्षरे अश्रूने पुसली जातात पण मोबाईलचे तसे होत नाही म्हणून मोबाईल वर पत्र लिहितोय . हे ही तू समजून घेशीलच.
हॅपी व्हॅलेंटाईन डे
तुझा नवरा
Friday, February 15, 2019
एक पत्र
हॅपी व्हॅलेंटाईन डे
हॅपी व्हॅलेंटाईन डे
ती बस स्टॉपवर उभी असायची तेव्हा नेमका हा तिच्यासमोरून बाईकवर बसून जायचा. दिसायला तसा काही तो हँडसम नव्हता पण चेहऱ्यावर एक निरागस हास्य विलसत असायचे. तीही हल्लीच या शहरात बदली होऊनआली होती.ऑफिस आणि सहकारी तिच्यासाठी नवीन होते सतत दोन दिवस तो तिच्यासमोरून गेला .तिसऱ्या दिवशी टी टाइम मध्ये तिला तो तिच्याच कमर्शियल कॉम्प्लेक्समधून बाहेर पडताना दिसला. तिच्याकडे एक नजर टाकून त्याने बाईक चालू केली .पण नजरेत ओळख होती .पाठीवर रेंगाळलेली तिची नजर त्याला जाणवत होती.
दुसऱ्या दिवशी त्याची बाईक तिच्याजवळ थांबली . "चला सोडतो तुम्हाला ....."त्याचे हास्य पाहून ती भारावली . काही न बोलता ती मागे बसली .कॉम्प्लेक्समध्ये बाईक पार्कजवळ येताच तिने सहज सांगितले मी पाचव्या मजल्यावर आहे . तो म्हणाला मी तिसऱ्या मजल्यावर आयटी मध्ये .ती बाय करून निघाली .टी टाईमला तिची नजर त्याला शोधू लागली . तो बाईकजवळ उभा होता"चहा पिवूया ..."? तिने सहज विचारले . तो मुकाटपणे तिच्या मागून कॉफी शॉप मध्ये शिरला. बोलता बोलता एकमेकांबद्दल बोलून झाले . मोबाईल नो शेयर झाला.
मग दुसऱ्या दिवशीपासून रोजचे वेळापत्रक चालू झाले . सकाळी एकत्र जाणे ..दुपारी चहा ..कधीतरी संध्याकाळी सिनेमा किंवा बीचवर फिरणे .एके दिवशी बोलता बोलता त्याने तिचा हात सहजपणे हाती घेतला तिनेही काही विरोध दर्शविला नाही . एक सहज झालेली कृती होती ती.
आज व्हॅलेंटाईन डे होता . तिने त्याला घरीच बोलावले होते. तिची रूम पार्टनर बाहेरच जाणार होती . बाहेर त्या गर्दीत फिरण्यापेक्षा घरीच बोलत बसू असा प्रस्ताव तिने ठेवला.सकाळीच त्याने हातात केक आणि चॉकलेट बॉक्स घेऊन तिच्या घरात प्रवेश केला . एक अनामिक हुरहूर दोघांना जाणवत होती . बोलता बोलता दोघे शरीराने कधी जवळ आले ते कळलेच नाही . संध्याकाळी काही अनिच्छेनेच घरातून बाहेर पडला.
बाहेर पडताच त्याने एक फोन केला "साहेब ...आता दुसऱ्या ऑफिसचे काम द्या मला .इथल्या डिलिव्हरीचे काम खूप कमी झालेय . थोडे लांब असले तरी चालेल पण इथे नको.."स्वतःशी हसत हसत तो घरी निघाला.
संध्याकाळी मित्रांसोबत तो नेहमीच्या बारमध्ये शिरला."चला ...आज अजून एक लिस्टमध्ये ऍड झाली.उद्यापासून दुसरीचा शोध घेऊ .समोरच्या बिल्डिंगमध्ये नुकतीच एक भाड्याने राहायला आलीय. पुढच्या व्हॅलेंटाईन डे पर्यंत तिचा नंबर लागेलच आणि नंतर तिचीही बदली होईल....चला बियर प्या आज माझ्यातर्फे .. हॅपी व्हॅलेंटाईन डे ... चियर्स ..
© श्री.किरण कृष्णा बोरकर
Sunday, February 10, 2019
रक्तरेखा.....शशी भागवत
रक्तरेखा.....शशी भागवत
सायली प्रकाशन पुणे
कर्णओज नगरीतील स्मशानातील डोंबाची अशिक्षित कन्या सावरीला कधी कधी भयानक दृश्य डोळ्यासमोर दिसतायत.
कर्णओज नगरीच्या सम्राट हृदवर्मनला आज दुसऱ्या पत्नीपासून पुत्ररत्नाचा लाभ होणार आहे .ज्योतिषाने मुलाचे भविष्य अचूक वर्तविले आहे आणि काश्मीरच्या बर्फाळ भागात खोल जमिनीच्या कुशीत दडलेली मयसभा सम्राट आपल्या मुलाला भेट देणार आहे.
मयसभेचे उत्खनन करून त्यातील अघोरी शक्ती जागृत करू नका असे थोर स्थापत्यकार अभेय मुख्य सचिवांना सांगतो पण ती राजाज्ञा आहे असे सांगून त्यास गप्प करतात .उत्खननात आपला मृत्यू निश्चित आहे हे अभेयला माहीत आहे.
मुलगा झाल्याची बातमी ऐकून सम्राट आनंदाने राणीच्या महालात जातात आणि आतील दृश्य पाहून बेशुद्ध पडतात त्यानंतर ते भ्रमिष्ट होतात.
सम्राटांची पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी दूरच्या राज्यात एका आश्रमात राजनीती ,युद्धकला यांचे शिक्षण घेतेय. ती अतिशय शूर देखणी बुद्धिवान आहे.
सम्राट भ्रमिष्ट आणि महाराणी आजारी असल्याचे ऐकून त्यांच्या अधिपत्याखाली असणारी आणि रक्तरेखेतील नातलग विशिष्ट हेतूने कर्ण ओज नगरीत दाखल झालेत.प्रत्येकाच्या मनात स्वार्थ आहे ..विशिष्ट हेतू आहे .
महालात आणि रक्तरेखेतील व्यक्तींच्या बाबतीत जे काही अनिष्ट घडतेय ते सर्व सावरी स्मशानात बसून पाहतेय पण तिला नक्की काय केले पाहिजे हे सुचत नाही .
राजबालक हे साधे बालक नाही तर अघोरी शक्तींपासून निर्माण झालेले बालक आहे . पाच वर्षांनंतर त्याच्यातील अघोरी शक्ती पूर्ण विकसित होईल आणि पृथ्वीवर फक्त अघोरी शक्तींचेच राज्य चालेल.
बालक जन्माला येतात राज्यातील होम हवन, प्रार्थना ,भजने बंद झाली आहेत.
काही सामर्थ्यवान व्यक्ती या दुष्टशक्तीपासून राज्याला आणि सम्राटांना वाचविण्याचा प्रयत्न करतायत.
कोण आहे ती व्यक्ती जी महालातील गुप्तभागात फिरून सर्वांचे संभाषण ऐकतेय आणि सम्राटांचे रक्षणही करतेय.महालातील सर्व गुप्तमार्ग त्याला ठाऊक आहेत.
कर्ण ओज नगरीतील ही अतिशय गुंतागुंतीची आणि अंगावर काटा आणणारी रक्तरेखा
Friday, February 8, 2019
व्हॅलेंटाईन डे..... उत्तरार्ध
व्हॅलेंटाईन डे..... उत्तरार्ध
आज तो डायरेक्ट तिच्या ऑफिसच्या गेटजवळच येऊन उभा राहिला. तिच्या चेहऱ्यावर येणारा आनंदाचा आश्चर्याचा धक्का त्याला पाहायचा होता. तिला असे अनपेक्षित गोड धक्के देणे आवडायचे त्याला.लग्नाआधीही अनेकवेळा तो स्टेशनवर जाऊन उभा राहायचा ..कधी कधी तिला फारच उशीर व्हायचा पण तरीही त्याला ते मान्य असायचे.
आज व्हॅलेंटाईन डे ...तिला काहीतरी सरप्राईसची अपेक्षा होती पण तो बाहेर असा समोर उभा राहील ही अपेक्षा नसणार याची त्याला खात्री होती.पण आज वेळेवर बाहेर पडली तर ठीक नाहीतर उशीर झाला तर ती डायरेक्ट घरी घेऊन जाईल याची त्याला खात्री होती.
पाच वाजले तसे हळू हळू एकेक जण बाहेर पडू लागले .थोडयावेळाने ती त्याला दिसली...मैत्रिणींच्या घोळक्यात उठून दिसत होती . तिने त्याच्याकडे पाहिले आणि एक आश्चर्य डोळ्यात उमटून गेले. मैत्रिणींच्या कानात काही कुजबुज करून ती बाहेर पडली.मैत्रिणीचे कॉमेंट ऐकून तिच्या चेहऱ्यावर लाली चढली.
"हे काय आता ..?? इथे कशाला आलात ..?? बायको काय पळून जात नव्हती....."? ती लटक्या रागाने बोलली .पण चेहऱ्यावरचा आनंद काही लपवता आला नव्हता .
"जास्त वेळ नाही हा बाहेर थांबू शकत....नंतर आवरताना घाई होते मग ...."तिने आधीच सांगितले.
" हो ग बाई .. थोडा वेळ बसू आणि निघू .."असे म्हणत त्याने टॅक्सी केली आणि पार्कात आले.
"द्या माझे गिफ्ट ....."तिने हात पुढे केला.त्याने सॅकमधून गजरा काढला आणि तिच्या केसात माळला ...."हल्ली जमते हो तुम्हाला ..कितीजणींवर ट्राय केलात.." ती डोळे मिचकावत म्हणाली.तो खदखदून हसला "आणि शेंगदाणे ..."असे म्हणत तिने हात पुढे केला.
"आज नाही आणले.. आज जे काही आणले ते फक्त तुझ्यासाठी... "असे म्हणत परत सॅकमधून एक छोटा ज्वेलरी बॉक्स काढला आणि तिच्या हातात दिला.
"हे म्हणजे फारच हो आता ..?? कुठे लॉटरी लागली की काय ..."?? असे म्हणत तिने बॉक्स उघडला . आत छान एक नेकलेस आणि इयर रिंग होत्या.
"किती छान ...ती पुटपुटली.
" अमेझॉन..... फक्त 450 रु..." तो रुबाबात म्हणाला . "असू दे .. चालेल की आम्हाला....आम्हीही पुढे एक शून्य वाढवून सांगू ...." तीही रुबाबात म्हणाली आणि दोघेही हसू लागले.पुढचा एक तास कसा गेला हे त्यांना कळलेच नाही .आज ती भरभरून बोलत होती .तो तिच्या चेहऱ्याकडे भान हरपून पाहत होता ."साले हे क्षण रोज का येत नाहीत आपल्या आयुष्यात ..."?? तो मनात विचार करीत होता . अंधार पडू लागला तशी ती सावध झाली."चला निघुया.... घरी वाट पाहत असतील.."तो नाईलाजाने उठला.त्याची नाराजी ओळखून तिने प्रेमाने त्याचे गाल ओढले.
रस्त्यात तिने श्रीखंड विकत घेतले "माझ्यातर्फे आपल्या सर्वांसाठी व्हॅलेंटाईन गिफ्ट......"असे म्हणत तिने डबा त्याच्याससमोर नाचविला.
घरात शिरताच सासू म्हणाली "अग ...आताच तुझ्या नणंदेचा फोन येऊन गेला .अर्पिताचे लग्न पक्के झालेय . तिला घरी बोलवा एकदा जेवायला आणि हो काहीतरी हातात ठेवायला गिफ्ट घेऊन या ."तिने हसून मान डोलावली.आत जाताच त्याने विचारले "काय गिफ्ट घ्यायचे ग ...??बजेट कोसळणार आपले "
तिने हसून सांगितले "काळजी करू नका..आहे आपल्याकडे."असे बोलून पर्समधून त्याने दिलेला ज्वेलरी बॉक्स काढून दाखविला.
"अरे पण हे तुझ्यासाठी आहे .... नको ते देऊ ..आपण दुसरे काही देऊ .."तो चिडून म्हणाला.
"आहो ..!! हे काय मी रोज घालणार आहे का .. ?? सध्या तीन महिने तरी आपल्याकडे काही समारंभ नाही . डायरेक्ट अर्पिताचे लग्न.मग त्याच वेळी घेऊ की छान काहीतरी आणि तुम्ही मला आवडती गिफ्ट दिली आहेच .."केसातील गजऱ्याकडे हात दाखवून ती म्हणाली "शेवटी भाचीला या निमित्ताने व्हॅलेंटाईन गिफ्ट देऊ आपल्याकडून .."असे म्हणत प्रेमाने त्याला जवळ घेतले.
© किरण कृष्णा बोरकर
Thursday, February 7, 2019
व्हॅलेंटाईन डे
व्हॅलेंटाईन डे
"तुला व्हॅलेंटाईन डेला काय गिफ्ट हवे ...."?? त्याने तिला व्हाट्स अप केला.ती समोरच स्वयंपाकघरात उभी राहून चपात्या भाजत होती.आज यायला थोडा उशीर झालेला म्हणून अंगावरची साडी न बदलतात तिने चपात्या भाजायला घेतल्या.आता कपडे बदलण्यात वेळ गेला तर पुढचे सारेच गणित चुकणार याची खात्री होती तिला .पदर खोचून एका हाताने चहाचे घुटके घेत मध्येच गरम चपातीचा तुकडा तोंडात टाकत ती चपात्या भाजत होती.मोबाईल तिच्या नेहमी बाजूलाच असायचा.हो .....कोणाचा फोन ..मेसेज आला तर शोधायची धावाधाव नको. मेसेज येताच तिने पटकन उचलून मेसेज वाचला आणि डोळे आश्चर्याने मोठे केले.तशीच नजर वळवून त्याच्याकडे पाहिले आणि भुवया उडवून काय ...??अशी खूण केली.
"हे काय आता नवीन ...."?? तिचा रिप्लाय
"बोल ग ....काहीतरी असेलच तुझ्या मनात .. ?त्याचा मेसेज .
"यावेळी शेंगदाण्याची एक पुडी घेण्याऐवजी दोन घ्या म्हणजे माझ्या वाट्याला पुरेसे येतील" तिने रिप्लाय दिला आणि स्मायली टाकले .
त्याने रागाची स्मायली दिली तसे तिने बदामाची आणि लाल ओठांची . तसा तो खुलला.
"यावर्षी काहीतरी वेगळे देतो तुला ... त्याने रिप्लाय दिला आणि तिच्याशी नजरानजर होताच त्याने पटकन डोळा मारला . तिने कावरीबावरी होत आजूबाजूला पाहिले आणि जीभ बाहेर काढून वेडावून दाखविले .
"तुम्ही यावेळी विचारलेत तेच खूप आहे माझ्यासाठी आणि तुम्ही समोर असणेच माझ्यासाठी व्हॅलेंटाईन दिवस असतो...." तिने भराभर टाईप करून रिप्लाय दिला .
"अग बाई एका वेळी एक काम कर .. ..ती चपाती करपेल ना .. मोबाईलवर काय करतेस ..?? सासूबाई लांबूनच ओरडल्या तसे तिने त्याच्याकडे डोळे वटारून पाहत मोबाईल खाली ठेवला आणि ओठांचा चंबू करून छानसे हसली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
( पुढे काय ते सुचत नाही .सुचेल तेव्हा लिहिनच )
Tuesday, February 5, 2019
प्रे- सावज...... मायकेल क्रायटन
प्रे- सावज...... मायकेल क्रायटन
अनुवाद ....डॉ. प्रमोद जोगळेकर
मेहता पब्लिकेशन
शिकारी आणि सावज या संकल्पनेवर जैविक आणि वैज्ञानिक शास्त्रज्ञ मिळून एक नवीन प्रयोग करतायत . नेवाडा येथील रखरखत्या वाळवंटात त्यांची प्रयोगशाळा आहे .त्यामुळे येत्या पन्नास ते शंभर वर्षात कृत्रीम सजीव निर्माण होतील.केवळ मानवाने निर्मिती केली म्हणून ते कृत्रीम म्हणता येतील. अन्यथा ते सजीव आहेत . ते स्वतः पुनरुत्पादन करतील. स्वतः पॉवर निर्माण करतील ..तर विचारही करतील.पण याचा जैविकसृष्टीवर होणारा परिणाम विलक्षण असेल. मानवजातीच्या मदतीसाठी जरी याची निर्मिती करण्याचा हेतू असला तरी याचे उलट ही परिणाम होऊ शकतात आणि नेमके हेच नेवाडा येथील झायमॉस कंपनीच्या प्रयोगशाळेत घडत आहे .
मानवनिर्मित नॅनोकणांचा ढग बाहेर पडला आहे .हा ढग बुद्धिवान आहे . तो स्वतः शिकू शकतो.. स्वतःसाठी पॉवर निर्माण करू शकतो..तो विचार करू शकतो...मुख्य म्हणजे तो शिकार करू शकतो.यांची पुनरुत्पादन क्षमता ही प्रचंड आहे . त्याची रचनाच शिकारी म्हणून झाली आहे आणि दर तासाला त्याची शक्ती वाढतेय .
त्याना नष्ट करण्यासाठी सध्या बेकार आणि आपल्या मुलांना सांभाळणाऱ्या जॅक या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरला बोलावण्यात आलेय. मुख्य म्हणजे जॅकची बायको ज्युलिया झायमॉस कंपनीच्या ह्या प्रोजेक्टची मुख्य अधिकारी आहे .
बघूया ते शिकारी नॅनोकण जॅकला नष्ट करता येतात का ...?? की या शिकारी ढगांचे सावज आपण ठरणार ....?? .एक श्वास रोखून ठेवणारे पुस्तक
प्रगती ....३
प्रगती .....३
आज तिच्या घरी गडबड उडाली होती.कारणच तसे होते ...आज तिला पाहायला मुलगा येणार होता.आई.. वडील ...ती ...आणि छोटी बहीण हाच तिचा परिवार.ती एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये कामाला होती.छोटी बहीण ही कमावती होती.सधन कुटुंबियांपैकी होते ते.पण आईवडील जुन्या वळणाचे.
बऱ्याच काळाने तिने साडी नेसली होती .त्या साजशृंगारात फारच देखणी दिसत होती. अर्थात तिलाही आपले हे रूप आवडले होते म्हणा. बहिणीने तर बरेच फोटो काढले होते तिचे .आणि सेल्फीही. व्हाट्स अपच्या डीपी ची महिनाभर तरी काळजी नव्हती. आरश्यात बघून स्वतः ला निखरत असतानाच आई आत शिरली."चल .....मंडळी आली आहेत. पण काही उलटसुलट बोलू नकोस . बाहेर सर्व नात्यातील बसली आहेत. सर्व काही रीतिरिवाज आणि परंपरेनुसार होईल.तू फक्त शांत बस "मनात आलेला संताप आईकडे पाहून तिने आवरला . मुकाटपणे बाहेर गेली.
मुलगा खरेच छान होता . तिला तो पहाताचक्षणी आवडला. ती समोर बसली आणि मोठ्यांची चर्चा ऐकू लागली. लग्नाचा खर्च मुलीकडून होईल. पंचवीस तोळे सोने .संसाराला लागणाऱ्या सर्व वस्तू मुलीकडून . ती मनातल्या मनात हिशोब करत होती. बापरे साधारण 20 लाखापर्यंत खर्च जातोय .आणि तोही आम्हीच करायचा ....?? सहन न होऊन ती मध्ये बोलली" मी काही बोलू का...."?? सर्वच आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले .आईने कपाळावर हात लावला.
"तू लहान आहेस अजून असे मध्ये बोलायला ..".तिचा काका म्हणाला.
"मग लग्न का करतायत माझे...." तेव्हढ्याच जोरात तिने उत्तर दिले .
मग नवऱ्यामुलांकडे पाहून तिने विचारले.." मी काही विचारू का ...?? त्याने हसून मान डोलावली .
"तुमचा पगार किती ..."? त्याने पटकन उत्तर दिले. तुमची गावी काही मालमत्ता...?? तिचा दुसरा प्रश्न..
"वडिलोपार्जित घर आहे आणि तिथे काका रहातात आम्ही जात नाही जास्त...."त्याने उत्तर दिले
"मग इथे काही मालमत्ता....??
"फ्लॅट बुक करायचा आहे पण इथे घेण्याइतपत बजेट नाही म्हणून थोडे लांबच घेणार आहे ..."त्याचा स्वर हळू हळू उतरू लागला.
"मागे कोण ..."? तिचा पुढचा प्रश्न.
"एक भाऊ आणि एक बहीण ...."त्याने सहज उत्तर दिले .
आजूबाजूला कुजबुज सुरू झाली ."ही काय पद्धत आहे ......"? मोठा काका ओरडला "आम्ही आहोत हे सर्व पाहायला .....तुला विचारण्याची गरज नाही "तिने नुसते हात वर करून त्यांना थाबवले.
"आता ह्याच प्रश्नांची उत्तरे मी देते.माझा पगार तुझ्या पगारापेक्षा 60% जास्त आहे .मला फक्त एक बहीण आहे . गावी माझ्या वडिलांनी दोन एकर जमीन स्वबळावर घेतलीआहे .मी याच विभागात दोन बेडरूमचा फ्लॅट दोन वर्षांपूर्वीच बुक केला आहे . कदाचित या एक दोन महिन्यात चावी मिळेल. इतके सर्व असताना लग्नाचा सर्व खर्च ही आम्हीच करावा.....??? का ...?? केवळ मुलीची बाजू म्हणून ..?? रीतिरिवाज आहेत म्हणून ...."? इथे बसलेले आमचे नातेवाईक किती आणि।कसली मदत करणार आहेत आम्हाला ...."??सर्व शांत बसले .
मुलगा हसला "तुझ्याकडे काय उपाय आहे यावर "??
" मी तुला एक वर्ष देते ..एका वर्षात तू माझ्यापेक्षा जास्त कमावून दाखव नाहीतर तुम्ही म्हणाल तसे आम्ही सर्व खर्च करू पण मग फक्त तू तुझ्या घरच्यांना सोडून आमच्याबरोबर नवीन घरात राहायला ये ...."
तिचा निर्णय ऐकून सगळीकडे कुजबुज सुरू झाली . मुलाचे वडील संतापले "हे काय चालू आहे ..?? पूर्वापार चालत आलेले रितिरिवाजच आम्ही पाळतोय ना ..?? काय चुकीचे मागतोय...??
"मी ही काय चुकीचे बोलतेय. पूर्वी मुलगी कमवत नव्हती .तिच्याकडे शिक्षण नव्हते .प्रत्येकाकडे शेती होती ..सोने स्वस्त होते. संसार करायला टीव्ही फ्रीज लागत नव्हते .आता सोने कशाला हवे .मी गेली कित्येक वर्षे गळ्यात एक चेन घालतेय. पंचवीस तोळे सोने घेऊन काय करू मी ..??कशाला हवे इतके सोने .आम्हा दोघांचा संसार आहे मग आम्हाला लागेल त्या वस्तू आम्ही आमच्या मनाने घेऊ . तुम्ही दिलेल्या वस्तू का गळ्यात मारून घेऊ आमच्या . आणि इतके करूनही मी माझ्या आईवडिलांना सोडून तुमच्याकडे का यायचे ..?? म्हणून म्हणते माझ्यापेक्षा वरचढ हो आणि तुमच्या रितिरिवाजप्रमाणे लग्न करा .माझ्या आईवडिलांचा कष्टाचा पैसा असा एका लग्नात घालविणार नाही मी आणि माझ्यामागे लहान बहीण ही आहे हे विसरू शकत नाही मी ..."
तिच्या या निर्णयामुळे घरात शांतता पसरली . मुलगा शांतपणे उभा राहिला "तुझी सूचना नक्कीच विचार करण्यायोग्य आहे .आम्ही विचार करून लवकरच निर्णय घेऊ "असे बोलून सर्व बाहेर पडले.
आईवडिलांनी दोन्ही मुलींना जवळ घेऊन म्हणाले "मुलगा नाही याचे कधीच दुःख नव्हते मला.. पण आज अश्या मुली आहेत याचा अभिमान वाटतो.
© श्री.किरण कृष्णा बोरकर