Saturday, June 15, 2019

द गर्ल इन रूम १०५.... चेतन भगत

द गर्ल इन रूम १०५.... चेतन भगत
अनुवाद....सुवर्णा अभ्यंकर
केशव एक आयआयटीयन ....पण तो आणि त्याचा मित्र सौरभ दिल्लीत एका कोचिंग क्लासमध्ये शिकवितायत . केशवची माजी प्रेयसी झारा एक काश्मिरी मुसलमान.जातीयतेवरून ते वेगळे झालेत . पण केशव मात्र तिला विसरला नाही .तिच्या वाढदिवसाच्या रात्री ती त्याला मेसेज करून  हॉस्टेलमधील रूम नो 105 वर पूर्वीसारखे भेटायला बोलावते.दारूच्या नशेत केशव आपल्या मित्राला घेऊन तिला भेटायला ही जातो तेव्हा तीचा खून झालेला असतो.कोण आहे तिचा खुनी ....?? आपल्या परीने केशव आणि सौरभ खऱ्या खुन्याच्या  मागावर निघतात. अत्याधुनिक इंटरनेट.. इन्स्टाग्राम.. फेसबुक यासारख्या सोशल मीडियाचा वापर करीत ते खऱ्या खुन्याला कसे  शोधून काढतात ते वाचण्यासारखेच आहे .स्मार्टफोन ,सोशल मीडिया,इंटरनेट आणि वेगवेगळे अँप आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग झाले आहेत . त्यातून आपण आपलाच  माग कसा मागे सोडतो हे यातून कळते .आपली नेहमीची शैली वापरून खुनाची अतिशय सुंदर रहस्यकथा चेतन भगत यांनी लिहिली आहे .

पहिला पाऊस ....५

पहिला पाऊस ...५
ती शिव्या घालीतच ऑफिसमध्ये शिरली. कारण ही तसेच घडत होते.आज सकाळपासूनच धड काही चालत नव्हते . सकाळी मोबाईलमध्ये नेहमीसारखा गजरच झाला नाही.पाहिले.... तर बॅटरी लो होऊन मोबाईल बंद पडला होता.नंतर बऱ्याच दिवसापासून ठरलेली मीटिंग रद्द झाली होती .तीनशे कोटीच्या कॉन्ट्रॅक्टचा प्रश्न होता...त्यात जुळवून आणलेली मीटिंग रद्द . ऑफिससाठी तयार झाली इतक्यात ड्रायव्हरचा फोन..... आज येऊ शकणार नाही बाहेर जायचे आहे फॅमिलीसोबत .. म्हणजे आम्हाला फॅमिली नाही का ....?? कामे सोडून कशी ही माणसे जाऊ शकतात फिरायला ....?? मग हिलाच कार ड्राईव्ह करीत ऑफिसला यावे लागले.त्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना हिच्या नाकी नऊ आले .. इतका त्रास असतो गाडी चालवताना ....?? नेहमी ही मागे बसून लॅपटॉपवर काम करीत असते त्यामुळे ड्रायव्हरच्या त्रासाची हिला काय कल्पना... ??? चिडलेल्या अवस्थेत ऑफिसमध्ये आली. गाडीची चावी सिक्युरिटीच्या अंगावर फेकून केबिनमध्ये शिरली . त्या थंडगार एसी मध्ये शिरताच तिला बरे वाटते . आपला एक्सिक्युटिव्ह सूट चेयर वर टाकत तिने कामाला सुरुवात केली.
तसे आज वातावरण ढगाळच होते . पाऊस कधीही येईल याची चिन्हे दिसत होती.त्यात आईने लवकर घरी ये असा निरोप पाठविला.बहुतेक हिच्यासाठी स्थळ आणले असेल . ती कॉफी पिता पिता विचार करीत होती . अठ्ठावीस वर्षे म्हणजे काही लग्नाचे वय नाही असे तिचे म्हणणे . त्यात ही हुशार आधुनिक विचारसरणीची ,कोणावाचून माझे काही अडत नाही हा स्वभाव . मेहनत करण्याची तयारी त्यामुळे स्वतःच्या व्यवसायात लवकर वर चढत गेली.
हातातली कामे संपवून ती लवकर बाहेर पडली . अर्ध्या रस्त्यात येताच  पाऊस सुरू झाला आणि ट्रॅफिक अजूनच जॅम झाले .रस्त्यावर चालणारे आज भिजतच निघाले."काय माणसे आहेत...?? वेळेची काही किंमतच नाही याना ....अशी कशी आरामात भिजत भिजत चालू शकतात.. ... "तिने संतापून शिव्या दिल्या.त्या ट्रॅफिकमधून कशीबशी थोडे पुढे येताच सिग्नलला आपला ड्रायव्हर पत्नी आणि मुलीसोबत रस्त्यावर भिजत चाललेला दिसला . सर्वच भिजत जाताना भलतेच खुश दिसत होते . या माणसाला आपण महागडा रेनकोट देतो तरीही ह्याला असे भिजायला का आवडते ....?? असा विचार करीत उद्या ड्रायव्हरला खडसवावे हे निश्चित केले . कशीबशी सोसायटीच्या गेटमधून आत शिरली आणि टेनिसचा चेंडू तिच्या कारच्या काचेवर आदळला. हे मात्र फारच झाले . तिच्या सहनशक्तीचा स्फोट झाला . तिरमिरीत ती बाहेर आली .समोर तीन चार मुले कमरेवर हात ठेवून उभी होती . एकाने नजर भिडवून तिच्याकडे बॉल मागितला .
"नीट खेळता येत नाही का.. ??? काच फुटली असती मग ...?? भरून कोण देणार  होता ... तिची तोफ चालू झाली.
"असे बघून कोण खेळते का ...?? तुम्हाला जमेल का कुठेही न लागता खेळायला ... आहे का हिंमत .... त्याने बॅट तिच्यासमोर धरून विचारले. झाले हीच स्वाभिमान दुखावला गेला.मला जमेल का विचारतो ...?? होऊन जाऊ दे आता . तिने त्याच्या हातातील बॅट हिसकावून घेतली .शर्टाच्या बाह्या वर केल्या . एकाने स्वतःच्या डोक्यावरची ओलिचिंब कॅप काढून तिच्या डोक्यावर ठेवली .ओली कॅप बघताच तिला जाणीव झाली आपण पावसात भिजतोय . काही न बोलता ती त्यांच्याबरोबर क्रिकेटच्या पिचवर चालू झाली . हळू हळू संपूर्ण सोसायटी मॅच पाहायला जमा झाली. एक आधुनिक महागडा सूट घातलेली सुंदर तरुणी पावसात भिजत लहान मुलांसोबत क्रिकेट खेळतेय हे पाहून इतरही पावसात उभे राहिले आणि त्यांना चियर अप करू लागले .सवयीप्रमाणे हिने स्वतःला त्या खेळात झोकून दिले . पावसात खेळताना हिला एक वेगळाच अनुभव येऊ लागला.कधी नव्हे तो पाऊस तिला हवाहवासा वाटू लागला . लहान मुलांच्यात तीही लहान होऊन गेली . मध्येच एक बॉल तिने सुसाट मारला आणि दुसऱ्या मजल्यावरील खिडकीची काच फोडून आत गेला.एका क्षणात रस्ता रिकामा झाला . खेळाडू सर्व साहित्य आहे तिथेच टाकून पळून गेले .ही थांबा थांबा म्हणेपर्यंत सर्व पळूनही गेले होते .स्वतःशी हसत ती ओल्या अंगाने घरात शिरली तेव्हा आईचा तोंडाचा पट्टा चालू होता.रस्त्यावर खेळतात ..... ह्या मुलांना अक्कल नाही का ....?? कसेही बॉल मारतात ... आमची ही काच फोडली आता ती भरून कोण देणार ....येऊ दे माझी मुलगी मग बघेलच ती एकेकाना . नाही सगळ्यांकडून काच वसूल करून घेतली तर नावच नाही सांगणार ती स्वतःचे .....अरे बापरे म्हणजे मगाशी ती काच फुटली ती आपल्याच खिडकीची होती तर ...... आईची नजर चुकवत ती घाईघाईत बाथरूममध्ये शिरली .खरेच यावर्षीचा पाऊस मजेदार होता .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, June 14, 2019

पहिला पाऊस ....४

पहिला पाऊस ....४
रस्त्यात पावसात भिजणाऱ्या लहान मुलांकडे ती चिमुरडी  कौतुकाने पाहत होती.मध्येच एखादा मुलगा वर पाहून तिला खाली बोलावत होता.तेव्हा ती हसून मान डोलवत नकार देत होती .
आज पहिला पाऊस..... वातावरणात छान गारवा पसरलेला होता . बहुतेकजण भिजत होते... काही नाईलाजाने... तर बरेचसे मुद्दाम.ती आपल्या बेडवर बसून खिडकीतून सगळी मजा पाहत होती.
अचानक दरवाजा उघडून तिचे वडील आत आले ..काय मॅडम भिजायचा प्रोग्रॅम आहे वाटते ...?? आज पहिला पाऊस ना ...??
" छे हो पपा .....मला नाही आवडत भिजायला.उगाच कपडे घाण .. केस ओले सुकता सुकत नाहीत .. अंगभर लागलेला चिखल ... नकोच ते .. " तिने तोंड वाकडे करीत म्हटले .पण तिची नजर काही वेगळेच सांगत होती .काही न बोलता तो आत कपडे बदलण्यासाठी गेला आणि ती परत खिडकीबाहेर पाहू लागली.इतक्यात तिचा मोबाईल वाजू लागला .. पलीकडून तिची मैत्रीण बोलत होती.
" मलाही खूप इच्छा होते ग बाहेर पावसात भिजण्याची.. पण आल्यावर सर्व पप्पानाच करावे लागते माझे .सकाळी सर्व करून जातात मग घरी आल्यावर माझी तयारी.. त्यात पुन्हा हे भिजणे आले तर पुन्हा पहिल्यापासून करावे लागेल.त्यापेक्षा इथे बसूनच बाहेरचा पाऊस एन्जॉय करेन मी. बोलता बोलता तिला हुंदका फुटला आणि डोळ्यातील अश्रू पुसत तिने मोबाईल बंद केला आणि डोळे मिटून शांत बसली.
पुन्हा एकदा दरवाजा उघडल्याचा आवाज आला .पपांसमोर आपले अश्रू दिसू नये म्हणून तिने डोळेच उघडले नाही . पण तिला आपण हवेत उचलले गेलो याची जाणीव झाली . तिने डोळे उघडून बघितले तर पप्पा हळुवारपणे तिला उचलून व्हीलचेयरवर ठेवीत होते . अलगदपणे ते तिला बिल्डिंगखाली घेऊन आले आणि पावसात उभे राहिले . अंगावर पाऊस घेताच ती मोहरली .आनंदाने हरखून जात तिने आजूबाजूच्या मुलांना हात दाखविला . मुले ही तिला पाहून खुश झाली . सर्वजण तिच्या व्हीलचेयर भोवती राऊंड करून नाचू लागले .
"हे फक्त याच वर्षी .....पुढच्या वर्षी तू तुझ्या पायाने पहिल्या पावसात नाचत येशील याचे वचन दे मला ..पप्पानी तिचा हात हाती घेऊन विचारले .
"नक्कीच पप्पा ...." ती आनंदाने डोळे पुसत म्हणाली.
आज पहिल्या पावसाने अश्रूंनाही आपल्यात सामावून घेतले होते .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, June 13, 2019

पहिला पाऊस ....3

पहिला पाऊस ....3
त्या बागेतील बाकड्यावर दोघेही शांत बसून समोर खेळणाऱ्या लहान मुलांकडे पाहत होते. त्या वृद्ध गृहस्थाच्या डोळ्यात कौतुक दिसत होते तर दुसरा मध्यमवयीन कोणत्यातरी विचारात गढून गेलेला.
" आज बहुतेक पाऊस येणार.... त्या वृद्धाने आपल्या मुलांकडे पाहून विचारले.
"ह....." नुसता हुंकार देऊन तो पुन्हा विचारात गढला.
" किती विचार करशील ....?? माझा विचार करतोयस ना ...?? वयानुसार आजारपण येणारच ....".वृद्ध हसत म्हणाला." तो तुझा मुलगा बघ ...किती आनंदाने खेळतोय.
" बाबा आज रिपोर्ट आणले तुमचे ....."तो त्या वृद्धाकडे वळून म्हणाला" तुम्हाला कॅन्सर आहे..."दोघांमध्ये एक तणाव निर्माण झाला.एक शांतता तिथे पसरली . आता गंभीर बनायची पाळी त्या वृद्धांची होती.
"शेवटी आयुष्य असेच संपणार तर ...!! आणि हे कळल्यावर तू गंभीर झालास.... "?? त्यांनी मुलाच्या खांद्यावर थाप मारून विचारले ."साल ...कसे आयुष्य गेले ते कळलेच नाही.लहानपण गरिबीत ..त्यामुळे शिक्षणासाठी मेहनत करावी लागली. मग शिक्षण संपल्यासंपल्या नोकरीच्या मागे . एकदा ती 7.42 च्या लोकलची सवय लागली ती निवृत्त होईपर्यंत काही सुटली नाही .लग्न झाले तशी संसाराची जबाबदारी अंगावर आली नंतर तुम्ही आमच्या संसारात सामील झालात . दोन मुले हवीत ही तुझ्या आईची इच्छा पण दोघांचे करताना आम्ही आमचे जगणेच विसरून गेलो . मग मुलीचे लग्न त्यानंतर तुझे .. तू पहिल्यापासून मितभाषी .. तुझी बहीण तर दगड बोलते तुला . भावना कधीच चेहऱ्यावर दाखविल्यास नाहीस . निवृत्त झाल्यावर नातवंडात रमलो . तुम्ही दोघेही नोकरी करता मग मुलांकडे लक्ष देण्याची जबाबदारी आम्ही घेतली .हल्ली थोडे अस्वस्थ वाटू लागले म्हणून टेस्ट केल्या तर त्याचा परिणाम हा कॅन्सर निघावा ......."?? असे म्हणून मोठ्याने हसले . पण काही म्हण तुला अजूनही भावना व्यक्त करता येत नाहीत . चेहरा अजूनही मक्ख... .."
"मग काय करू मी....?? तो चिडून म्हणाला "काय हसत सांगू तुम्हाला ...."??
"हसत नाही रे..... पण डोळ्यात पाणी आणून तरी कुठे सांगितलेस .....?? सोड .....जे येईल त्याला सामोरे जाऊ .त्यात तू मागे हटणार नाहीस हे माहितीय मला...."
इतक्यात वातावरणात बदल झाला . गार वारा वाहू लागला .ढग दाटून आले. काही क्षणातच पाऊस कोसळू लागला.
"ए बाळा.... इकडे ये पावसात भिजू नकोस आजारी पडशील ".तो छोट्या मुलावर ओरडला.
"अरे नको ओरडू त्याला....भिजू दे पावसात .घेऊ दे त्याला आनंद. मी ही भिजतो त्याच्याबरोबर "असे म्हणून तो वृद्ध उभा राहून पाऊस अंगावर घेऊ लागला.आजोबांना असे पावसात भिजताना पाहून छोट्याने आनंदाने टाळ्या वाजविल्या आणि अजून उत्साहाने पावसात नाचू लागला.
"बाबा तुम्ही पण ...?? तुम्ही पण लहान झालात का त्याच्यासारखे ....?? तो चिडून म्हणाला .
"हो रे ....आज कळतेय किती छोट्या छोट्या आनंदाला मुकलोय मी ... पावसामुळे 7.42 चुकली तर किती शिव्या द्यायचो पण पहिला पाऊस अंगावर घेण्याचा आनंद कधीच उपभोगला नाही मी .खरेच हा पाऊस आपले सर्व दुःख ,काळजी,चिंता धुवून काढतो आणि जगण्याची नवीन उमेद देतोय हे आज कळले. चल तू ही ये आमच्यात.. सोड त्या चिंता...,माझी काळजी ...ह्या मुलासारखे निरागस बन .अरे आम्ही आमचे आयुष्य जगलोय आता तुमची पाळी आहे . चल नव्याने जीवनाला सामोरे जा ...भावना  व्यक्त करायला शिक...." वृद्धाने आपल्या मुलांकडे हात पसरले . काही न बोलता तो उभा राहिला चेहऱ्यावर हसू आणत एका हाताने अश्रू पुसत भर पावसात आपल्या वडिलांच्या मिठीत शिरला . पहिला पाऊस इतका सुंदर असतो हे आज त्यांना कळले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, June 12, 2019

पहिला पाऊस ...२

पहिला पाऊस...२
सीमेवरच्या रणरणत्या उन्हात तो आपली mg 42  आवडती मशीनगन घेऊन उभा होता . शरीर ताठ.. नजर समोरच्या सीमेपलिकडच्या शत्रूवर रोखलेली . एक बोट गनच्या ट्रिगरवर.अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या . डोक्यावर एक फाटकी ताडपत्री. खरे तर नुकतीच नवीन लावलेली पण दिवसातून दोन वेळा तरी समोरून गोळीबार व्हायचा आणि ताडपत्रीला भोके पडायची . एक दिवस आपल्याही शरीराला अशीच भोके पडतील याची खात्री होती त्याला . पण जाताना समोरचे तीनचारजण तरी घेऊन जाऊ याची ही तितकीच खात्री होती.
"साला या गर्मीने वाट लावून टाकलीय.गावलाही अजून पाऊस नाही . यावर्षी शेतात काय लावले असेल म्हाताऱ्याने .... ?? त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी वाढत चालली होती . च्यायला हाच तर टाईमपास आहे इथे . स्वतःला प्रश्न विचारायचे आणि स्वतःच उत्तरे द्यायची. मनात विचार येताच तो स्वतःशीच हसला.नुकत्याच राऊंडला आलेल्या त्याच्या कमांडिंग ऑफिसरने ते पहिले आणि आवाज चढवून म्हणाला ..." क्या बात है जोकर ....?? बहोत खुश दिख रहे हो ... ये गर्मी अच्छी लग रही  है क्या ...."?? अचानक झालेल्या प्रश्नांच्या भाडीमाराने तो चमकला . पण समोरची नजर न काढता शरीर न वळवता "कुछ नहीं सर ... पुरानी यादे ताजी हो गयी..." असे जोरात उत्तर दिले.तसा सीओ हसला .
अचानक आभाळ दाटून आले. वातावरणात बदल होऊ लागला .. थंड वारे वाहू लागले."लगता है आज बरीश होगी...." सीओ पुटपुटला.इतक्यात पावसाला सुरवातही झाले .काही न बोलता सीओ बाहेर येऊन उभा राहिला आणि पहिला पाऊस अंगावर घेऊ लागला.
"पहिले बारीश की मजा ही कुछ और है...."तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहत तो पुटपुटला.एक विषादाची जाणीव त्याच्या नजरेत क्षणभर चमकली आणि पुन्हा त्याचा चेहरा पूर्ववत झाला.
" तुम कभी बारीशमें भीगते नहीं क्या जोकर ...." त्याने पुन्हा आवाज चढवून विचारले .
" रिलिव्हर आयेगा तो बारीशकी मजा लुंगा सर...." त्याने ही तितक्याच जोशात उत्तर दिले.
काही न बोलता  सीओ त्याच्याजवळ आला . त्याच्या हातातील mg 42 चा ताबा आपल्या हातात घेतला . "आ गया तुम्हारा रिलिव्हर ...अब जाओ बारीशमें ...."त्याच्या खांद्यावर हात टाकून तो म्हणाला.
त्याने काही न बोलता सीओच्या हातात गनचा ताबा दिला आणि जोरदार सॅल्युट मारून बाहेर पळाला. छानसे हसत तो हात फैलावून पाऊस अंगावर घेऊ लागला आणि हातातील गनच्या ट्रिगरवर बोट ठेवून आपली धारधार नजर समोर रोखत... ताठ उभे राहत सीओ आपली ड्युटी करू लागला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, June 11, 2019

पहिला पाऊस

पहिला पाऊस
शेरखान आपल्या बछड्यासोबत त्या दाट गवतात लपून बसून समोरच्या कोरड्या तळ्याकडे पाहत होता.तो जातिवंत शिकारी होता. पण त्याचा बघडा मात्र कंटाळला होता. उकाड्याने दोघेही हैराण झाले होते. समोरच्या कोरड्या तळ्यात कोणीतरी पाण्याच्या आशेने येईल आणि आपले जेवण सुटेल याच आशेवर शेरखान बसून होता . त्याचबरोबर आपल्या बछड्याला शिकारीचे ट्रेनिंग मिळेल हाही हेतू होता. पण ह्या कोरड्या उन्हाने कोणीही आपल्या घराबाहेर पडत नव्हते .साऱ्यांचे लक्ष पावसावर होते.
अचानक आभाळ दाटून आले.वातावरणात बदल झाला ...गार वाऱ्याची झुळूक वाहू लागली. थोड्याच वेळाने पावसाला सुरुवात झाली. हळू हळू सर्व प्राणी त्या पावसात भिजत तळ्याकाठी जमा होऊ लागले .सर्वच पहिल्या पावसाच्या आनंदात दिसत होते . चतुरसिंग कोल्ह्याने आकाशाकडे तोंड करून कोल्हेकुई सुरू केली. तर हत्ती अंकलने सोंड वरती करून चित्कार सुरू केला . "हीच ती वेळ ....उठ असे म्हणत शेरसिंगने आपल्या बछड्याकडे पाहिले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला . त्याचा बछडा आपली जागा सोडून दुडूदुडू धावत पाऊस अंगावर घेत त्या प्राण्यांच्यामध्ये शिरला होता . एका डुकराची शेपटी ओढत तर सशाच्या डोक्यावर टपली मारत पावसात नाचत होता.शेरखान कपाळावर हात मारत उभा राहिला.इतक्यात अंकलने त्याला पाहिले."शेरू कुठे जातोयस ....?? चाल ये ... घे पहिला पाऊस अंगावर .... आपण सगळेच या क्षणाची वाट पाहत असतो .. सगळ्यांनी त्याला आमंत्रण दिले तसा शेरखान हसला.शिकार काय उद्याही मिळेल पण पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद ह्या वर्षी पुन्हा मिळणार नाही .असे मनात म्हणत पाऊस अंगावर घेत त्यांच्यात मिसळला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, June 9, 2019

द कृष्णा की.....अश्विन संघी

द कृष्णा की.....अश्विन संघी
अनुवाद.......डॉ. मीना शेटे- संभू
अमेय प्रकाशन
भगवान विष्णूचा अवतार असणाऱ्या श्रीकृष्णाने पाच हजार वर्षापूर्वी जन्म घेतला .त्याचे पृथ्वीवरील कार्य संपताच मृत्यू झाला . सध्या कल्की हा विष्णूचा दहावा अवतार पृथ्वीवर जन्म घेणार आहे . एका मुलाच्या मनात लहानपणापासूनच तोच कल्की आहे असे बिंबविण्यात आले आहे . आता तो कृष्णाच्या चार प्रतिमांचा शोध घेतोय . ह्या चारही प्रतिमा समाजातील प्रतिष्ठित शास्त्रज्ञ इतिहास संशोधक यांच्याकडे आहेत . ती व्यक्ती त्या प्रतिमा ताब्यात घेऊन कृष्णाचा मृत्यू ज्या अवस्थेत झाला त्या अवस्थेत त्यांना ठार करते .मग सुरू होतो त्या प्रतिमेच्या मूळ उगमस्थानाचा शोध . कोठे आहे ती जागा .... ?? काय मिळणार आहे त्यातून ....?? बारा ज्योतिर्लिंग ,शिव,कृष्ण यांचा संबंध काय ....?? गझनी का सतत सोमनाथच्या मंदिरावर हल्ले करीत होता ??  त्याने शिवलिंग का फोडले ....?? भारतातील काही भागात अजूनही किरणोत्सर्ग जास्त प्रमाणात का असतो ....??
प्रसिद्ध इतिहासतज्ञ रवी मोहन सैनी या प्रकरणात गुरफटतो आणि स्वतःला निरपराध सिद्ध करण्यासाठी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरवितो . मग सुरू होतो एक थरारक पाठलाग . जो आपल्याला श्रीकृष्णाच्या काही गूढ स्थळी घेऊन जातो अगदी समुद्रात बुडालेल्या द्वारकेपासून सोमनाथच्या मंदिरापर्यंत आणि कैलास पर्वतापासून ताजमहाल पर्यंतचा हा प्रवास अतिशय उत्कंठावर्धक आणि रोमांचकारी आहे .अश्विन संघीच्या रूपाने आपल्याला भारतीय डॅन ब्राऊन भेटला आहे याची खात्री हे पुस्तक वाचून पटते .