एक देवी अशीही
स्टेशनवरील ब्रिजच्या एका कोपऱ्यात ती बसायची. मांडीवर... डोक्याला आणि हाताला बँडेज बांधलेला छोटा मुलगा.दोघांच्याही चेहऱ्यावर केविलवाणे भाव. मुलगा तर कायम डोळे मिटून बसलेला.जणू काही बेशुद्ध.जाणारे येणारे नव्वद टक्के प्रवासी कितीही घाईत असले तरी तिथे थांबून चकचक करीत एक रुपया तरी पुढ्यात टाकणारच.
अर्थात नेहमीच्या प्रवाश्यांना त्यांची चिंता नव्हतीच. त्यांना नेहमीची ट्रेन पकडायची चिंता ...ती वेळेवर येईल का ...?? ही चिंता .. मग चढायला मिळेल का ..?? ही पुढची चिंता ... चढल्यावर उभे राहायला जागा मिळेल का ....?? स्टेशन आल्यावर धडपणे उतरायला मिळेल का ...?? अश्या अनेक चिंता असताना तो त्या भिकाऱ्यांची चिंता का करेल??
त्या दिवशी सौ.देवीची ओटी भरायला मंदिरात गेली. जोडीला चार पाच मैत्रिणी. त्या बाईला पाहून या सर्वांच्या काळजात दयेचा पाझर फुटला. सर्वांनी देवीला अर्पण करायच्या साड्या तिला देऊन टाकल्या. त्यांचे पाहून बऱ्याच बायकांनी आपल्याकडील देवीला देण्याची भेटवस्तू तिला देऊन टाकल्या.
संध्याकाळी मी घरात शिरताच माझ्या पुढ्यात बसून हे सर्व पुराण मला सांगून झाले.आज खरे दान झाले हो ...सौचा समाधानाने फुललेला चेहरा पाहून आपल्याला चहा नाश्ता मिळणार नाही याची खात्री मला पटली.मी मुकाटपणे चपला घातल्या आणि नाक्यावरच्या टपरीवर आलो. थोड्याच वेळाने विक्रमही आला . त्याचा चेहरा पाहूनच काय झाले हे विचारायची हिंमत झाली नाही . मी शांतपणे घरातून बाहेर पडलो होतो पण विक्रमने चार शिव्या देऊनच बाहेर पडला याची खात्री झाली .
दोन दिवसांनी दसरा होता. आमच्या शेजारणीची कामवाली बाई नवीन साडी नेसुनच आज कामावर आली.तिला पाहताच सौ चमकली.काहीतरी गडबड आहे याचा अंदाज मला आला.मी हळूच कान टवकारून बसलो आणि माझा अंदाज खरा निघाला.
काही मिनिटाच सौ.कोणालातरी बडबडत घरात शिरली.मी धडधडत्या मनाने तिच्याकडे चहा मागितला.कारण तेच एकमेव कारण होते तिच्याकडून माहिती काढून घेण्याचा.तिने रागारागात चहाचा कप माझ्या पुढ्यात ठेवला.मी भीतभीतच तिला कारण विचारले तेव्हा तिने कामवालीने घातलेली साडी तिचीच आहे हे मला सांगितले.ती ज्या ठिकाणी राहते तिथे एक बाई बऱ्याच साड्या घेऊन आली आणि शंभर रुपयाला एक अश्या सर्व साड्या विकून गेली . यासर्व साड्या तिने आणि तिच्या मैत्रिणीने देवीला न देता त्या स्टेशनवरच्या भिकरणीला दिल्या होत्या .आणि तीच भिकारीण सर्व साड्या विकून गेली. माझ्या डोळ्यासमोर विक्रमचा चेहरा आला त्याच्या घरीही ही बातमी पोचणार याची खात्री होती म्हणून मी हसू दाबून मुकाटपणे चहा पिऊ लागलो .
संध्याकाळी सौ.मला घेऊन त्या ब्रिजवर गेली . ती बाई नेहमीप्रमाणे जखमी मुलाला मांडीवर घेऊन बसली होती . दोघांच्या चेहऱ्यावर तेच केविलवाणे भाव . सौ तरातरा चालत तिच्याजवळ गेली" देवीला साडी देण्यापेक्षा गरजू बाईला साडी देणे पुण्याचं काम म्हणून तुला साडी दिली. तर तू ती विकून टाकलीस ..?? असे केलेस तर कोणाचा विश्वास बसेल तुमच्यावर ....?? तुम्ही ही फसवणारे निघालात .."?? सौ. तावातावाने भांडू लागली. तशी ती भिकारीण म्हणाली .. "रागावू नका ताई .. मी साधी भिकारीण. भीक मागणे हेच माझे काम .. तुम्ही दिलेली एक साडी वर्षभर पुरली असती मला . पण तुमच्यासारख्या बर्याचजणी इथे येऊन साडी देऊन गेल्या.आहो पन्नास तरी साड्या जमा झाल्या असतील माझ्याकडे . इतक्या साड्या घेऊन मी काय करू ...?? बरे.. त्या साड्या नेसून इथे बसले तर कोणी भीक देणार नाही . रोजचा पाच सहाशेचा धंदा बुडेल. मग घरात तरी नव्या कोऱ्या साड्या कश्या ठेवायच्या ..?? म्हणून त्या गरीब वस्तीत जाऊन साड्या विकल्या . मी गरीब भिकारीण त्यामुळे साड्या फुकट देणे मला परवडणार नाही. शिवाय जास्त किमतीत विकायला गेले तर लोक संशय घेतील म्हणून मी त्या वस्तीतील गरीब स्त्रियांना परवडतील अश्या किमतीत या साड्या विकल्या . त्याही खुश मीही खुश आणि त्याचा वापर होतोय म्हणून देणारे ही खुश.."
सौ.चा राग हळू हळू निवळत गेला आणि शेवटी तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले ."चला... म्हणजे मी दिलेली साडी दोघींच्या उपयोगी पडली तर .."चेहऱ्यावर समाधान घेऊन आम्ही घरी निघालो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Thursday, October 3, 2019
एक देवी अशीही
Wednesday, October 2, 2019
द केस ऑफ द हाऊलींग डॉग..अर्ल स्टॅनलें गार्डनर
द केस ऑफ द हाऊलींग डॉग..अर्ल स्टॅनलें गार्डनर
अनुवाद ....बाळ भागवत
मेहता पब्लिकेशन
ऑर्थर कार्टराईट अतिशय अस्वस्थ होऊनच पेरी मेसनकडे आला होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या क्लिंटन फोलिचा कुत्रा रात्रभर विव्हळत होता.त्याचे विव्हळणे ऐकून ऑर्थरला वेड लागायची पाळी आली होती . खरे तर त्याला स्वतःच्या मृत्युपत्राबद्दल पेरीशी बोलायचे होते.त्यात त्याला आपली सगळी इस्टेट क्लिंटन फोलीसोबत पत्नी म्हणून राहणाऱ्या स्त्रीला द्यायची इच्छा असते.घरातील कुत्रा रात्रभर विव्हळत होता याचा इन्कार फोली आणि त्याची हाऊसकीपर करते. दुसऱ्या दिवशी तो फोलीला भेटायला त्याच्या घरी जातो तेव्हा त्याचा कुत्रा आणि तो मृत अवस्थेत सापडतात . कोणीतरी त्या दोघांचाही गोळ्या घालून खून केलेला असतो.घरात मिळालेल्या चिट्टीनुसार फोलिची पत्नी ऑर्थर सोबत पळून गेलेली असते .पेरीला खात्री आहे की विव्हळणाऱ्या कुत्र्याची माहिती काढली तर ही केस सुटू शकेल. तो या केसबाबत जसजसे जाणून घेत जातो तसंतशी नवीन माहिती त्यासमोर येते.
Sunday, September 29, 2019
दहशतवादाची कथा ....ललिता गंडभीर
दहशतवादाची कथा ....ललिता गंडभीर
ग्रंथाली प्रकाशन
विसाव्या शतकात जगभर अनेक ठिकाणी जातीय आणि धार्मिक कारणावरून हिंसक घटना घडल्या . त्यात अनेकांची होरपळ झाली . लाखो लोक निर्वासित झाले . अनेकांना आपले घरदार जमीन सोडून निर्वासित व्हावे लागले . आयुष्यभर ते ह्या घटना विसरू शकले नाहीत . त्यांच्या हृदयात या घटना कोरून राहिल्या . लेखिकेने या यातनांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे .भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते .ज्यांनी हे भोगलेय ते विरुद्ध बाजूंचा पराकोटीचा द्वेष करतात . असेच एक पाकिस्तानात राहणारे सुखवस्तू शेतकरी शीख कुटुंब आहे . भारताची फाळणी होते आणि मुस्लिम समुदायातील काही समाजकंटक त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना दिल्लीत यावे लागते . इथे आल्यावर त्यांचे होणारे हाल वाचून अंगावर काटा येतो . त्याच कुटुंबातील एका छोट्या मुलाने दरशनने सगळा हिंसाचार आपल्या डोळ्याने पहिला आहे . त्यात त्याचे वडील ही नाहीसे झालेत आणि त्या घटनेचा धक्का बसून त्याची पणजी सुन्न झाली आहे .यातूनही ते कुटुंब सावरते आणि आपल्या कष्टाने कपड्यांच्या व्यापारात जम बसविते . काही वर्षांनी त्या मुलाचे वडीलही परत येतात पण आपला एक हात गमावून . त्या मुलाच्या मनात बसलेली अढी अनुनच घट्ट होते .
त्याच वेळी कोकणातील एका छोट्या गावात एका ब्राम्हण कुटुंबात एका मुलाचा गोपाळचाजन्म झाला होता. शहरातील सगळ्या गोष्टीपासून दूर असलेल्या त्यागावात सर्व सुखाने राहत होते . स्वातंत्र्य संग्राम,हिंसाचार या गोष्टीपासून ते गाव दूर होते . गावात दोनच ब्राह्मण कुटुंबे होती . पण महात्मा गांधींचा खून झाला आणि त्याची झळ गावाला बसली . बाहेरून काही माणसे आली आणि त्यानी दोन्ही ब्राह्मण कुटुंबांची वाताहत केली .जीव वाचविण्यासाठी गोपाळ आपल्या काका काकूंसोबत दुसऱ्या गावी गेला . पण गावातील हिंसाचार त्याच्याही हृदयात कायमचा बसला .
योगायोगाने दोन्ही मुले शिक्षणासाठी दिल्लीत एकत्र येतात आणि एकमेकांचे जानी दोस्त बनतात . एक समाजसेवा आणि राजकारणाच्या माध्यमातून देश घडवायला निघतो . तर दुसरा योग्य संधीची वाट पाहत यशस्वी उद्योजक बनतो.
पंजाबात स्वतंत्र खलिस्तानची मागणी जोर धरू लागते तेव्हा दरशन त्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवितो . आपल्यावर झालेला अन्याय स्वतंत्र देश निर्माण करूनच दूर होऊ शकतो याची खात्री त्याला असते. त्याची पत्नी माया ही हिंदू आहे . त्यातच पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या होते आणि पुन्हा दंगली चालू होतात . हिंसाचाराचा डोंब उसळतो . यावेळी हिंदू विरुद्ध शीख असा सामना होतो. या हिंसाचारात कोणाची आहुती जाते ते पुस्तक वाचल्यावरच कळेल .
Friday, September 27, 2019
ट्रॅफिक आणि मुंबईकर
ट्रॅफिक आणि मुंबईकर
आजचा दिवस माझ्या आयुष्यात सुवर्णाअक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. का .....?? आहो ...पहिल्यांदाच मी बाईकवरून कामाला निघालोय.आता त्यात काय नवीन असे म्हणता ...?? माझ्यासाठी ते नवीनच हो .. मुलगा नोकरीला लागला आणि त्याने पहिली बाईक विकत घेतली . भले हप्त्यावर तर हप्त्यावर ....पण घेतली ना ...नाहीतर आम्ही ... एक घर हप्त्यावर घेतले त्याचे हप्तेच अजून फेडतोय . नंतर सर्व काही हप्त्यावरच घ्यायची सवय लागली . पाहिले घर ..मग मुलांची शिक्षणे ..आई वडिलांचे आजारपण सगळे काही हप्त्यावर चालू . पोराने मात्र बाईक घेतली हो... माझी कुठे बाईक घ्यायची ऐपत....
पहिल्या नोकरीला लागलो तेव्हा बसचे पैसे वाचावे म्हणून सेकंड हॅन्ड सायकल घेतली होती.व्यायाम आणि पैसे वाचविणे हा दुहेरी हेतू . त्याची इतकी सवय लागली की हिला बघायला ही सायकलवरून गेलो होतो.ते पाहून तिने केलेला चेहरा अजून लक्षात आहे माझ्या.शेवटी नोकरी बदलली तशी सायकल ही गेली आणि ती 7.16 ची लोकल नशिबात आली .ती अजूनपर्यंत .....आणि मुंबईकरांच्या नशिबात लोकल आली की तो निवृत्त होईपर्यंत सुटत नाही .
पण आज पोराने ऐटीत बाईकची चावी हातात दिली..म्हणाला आज जा बाईक वरून .. नशीब तरुणपणी मित्रांच्या बाईक चालवायला शिकलो होतो. मीही म्हटले जाऊ आज आरामात बाईकने . कामावर ही जरा शो शाईन करू. नाहीतरी फारच कमी मुले बापाला असा आनंद देतात.निघताना विचार आला गोखले मॅडमला विचारावे का....येतात का... ?? नको रे बाबा .. बाई उद्यापण अपेक्षेने वाट पाहत उभी राहायची ...आपण एकटेच निघू . बऱ्याच वर्षांनी बाईक चालवतोय उगाच तिच्यासमोर पचका व्हायचा .
आह.... किती मस्त वाटतेय बाईक चालवायला ....?? ह्या पोरांची खरेच मज्जा आहे. ट्रेनची कटकट नाही.. दरवाजाला लोबकळणे नाही. इतरांचे धक्केबुक्के नाही . बाईकवर टांग टाकायची आणि निघायचे.
बापरे ... हे काय .. रस्त्यावर गाड्या किती आल्यात . आणि किती हळूहळू चालल्यात. अरे किती गाड्या रिकाम्याच आहेत . काही भल्या मोठ्या गाडीत तर एकच माणूस . आहो एक दोन जणांना लिफ्ट द्या त्यांचाही वेळ वाचेल तुमचाही टाईमपास होईल . आम्ही बघा कसे अर्धा वेळ उभे राहतो आणि अर्धा वेळ दुसऱ्याला बसायला देतो . फार बरे वाटते हो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून .
च्यायला.....!! सारखा ब्रेक मारावा लागतोय. गियरही कितीवेळा बदलावा लागतोय. अरे भाऊ ... सिग्नल आहे कळत नाही का ....?? मी काय वेडा म्हणून उभा आहे का....?? नाही ..सिग्नल तोडून मी जाणार नाही .... अरे हो.... हो... कितीजण हॉर्न वाजवितायत . थांबा मी बाजूला होतो... तुम्ही जा सिग्नल तोडून . आम्ही आयुष्यात नियम पाळीतच जगलोय.. थांबा गाडी बाजूला घेतो . छान सगळेच बाईकवाले सिग्नल तोडून जातायत . ह्यांच्यासाठी सिग्नल नाही का... ?? अरे अरे सांभाळ .. ती बघ उजवीकडून स्पीडमध्ये कार आलीय .आई ग.... ठोकला तिने त्याला आणि हे काय सरळ निघून ही गेली ती ..बाईकवाल्याला काय झालंय ते पहा तरी .च्यायला आमच्या स्टेशनवर तरी बरे.... चालत्या गाडीतून कोण पडला तरी दहाजण धावत येतात..,त्याला बाजूला बसवितात पाणी देतात. चला आता.. ट्राफिक जाम होतोय तर हळू हळू . मेट्रोचे काम चालू आहे वाटते इथे . कितीवर्षं काम चालू राहणार देव जाणे . माझ्या रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवशी मेट्रोतून आलो तरी भरून पावलो. पुढच्या पिढीसाठी मेट्रो आहे म्हणतात पण आताच्या पिढीने केवळ त्यागच करावा का ...??? अर्धे आयुष्य या प्रवासातच गेलंय आणि अर्धे आयुष्य काम करण्यात .च्यायला... रिटायर्ड झालो तरी स्टेशनवर येऊन भरलेल्या लोकल बघितल्याशिवाय चैन पडणार नाही....अरे पण किती हा ट्राफिक....?? तो मूर्ख बघा .... भर ट्रॅफीकच्या गर्दीत रस्त्यावर काँक्रीट टाकतोय .. कोणत्या मूर्खाने हा सल्ला दिला असेल त्याला...?? आधीच फक्त सात फूट वाट ठेवलीय त्या मेट्रोने आणि हा त्यावर काँक्रीट टाकतोय . कानाखाली जाळ काढावसा वाटतोय .तू ये रे ....आमच्या लोकलमध्ये ....दारात उभे राहून रस्ता अडविणाऱ्यांची आम्ही कशी वाट लावतो ते बघच एकदा..
अरे बाबांनो पुढे जाल की नाही आज ...की इथेच संध्याकाळ होणार....?? बरे झाले गोखले बाईला लिफ्ट नाही दिली .परत कधीच गुड मॉर्निंग म्हटले नसते ..चला ट्राफिक सुटतेय हळू हळू . निघुया पटकन. हुश्शहहह ......आलो एकदाच ऑफिसला च्यायला.... इथे पार्किंगही फुल्ल आहे .कमाल आहे... आता पार्किंग शोधण्यात पाच मिनिटे जाणार . त्यानंतर लिफ्टला गर्दी आहेच.
आलो बुवा एकदाचा ऑफिसच्या दारात ..आज ऑफिसला येताना जणूकाही लढाई करून आल्यासारखे वाटतेय ..आयचा घो .....हे काय ......?? चार मिनिटे लेट ....?? गेला ह्या महिन्याचा राखीव लेटमार्क ही गेला .ह्या ट्रॅफीकने शेवटी एक लेटमार्क खाल्लाच माझा ......
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Monday, September 23, 2019
साहित्यिक मित्र
साहित्यिक मित्र
संतोष दिघेला कोकणातील छोट्या गावतील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनविले ही बातमी वाचून आम्हाला मुळीच आश्चर्य वाटले नाही.कारण या आधीही असे अनपेक्षित धक्के आम्हाला बसले होते.फार फार तर आता साहित्य संमेलनात साहित्यिक असतात या गोष्टीवरचा विश्वास आता उडाला.पूर्वी एकदा टम्या केळकरला आयआयटीला ऍडमिशन मिळाली तेव्हा आयआयटी फक्त हुशार मुलांसाठी असते ह्यावरचाही विश्वास उडाला होता.हुशार विद्यार्थ्यांची सीट गेली म्हणून बाजी रेवळेने उपोषणाची धमकी दिली होती.पण दुसऱ्या दिवशी उजाला बारमध्ये टम्या आणि बाजा एकत्र दिसले तेव्हा उपोषणावरचा विश्वास उडाला.
तर ही बातमी आम्हाला अचानकच कळली.दिघ्या कडून कळली असती तर आमच्या खिशातील सगळे पैसे त्याने संपविले असते.आता निदान सावध राहून आम्ही येणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्याची मनाची तयारी करून राहिलो .
मी आणि विक्रम इराण्याकडे मस्का पाव आणि चहा पिताना नेमकी पावाच्या खालच्या पेपरवर याची बातमी होती. तो तेलकट पेपर विक्रम इतक्या चवीने वाचताना पाहून मला भलतीच शंका आली पण नंतर काही न बोलता त्याने तो पेपरचा तुकडा डिशसह माझ्याकडे सरकवला.कोणतातरी कोणत्याही स्टॉलवर न दिसणारा पेपर होता तो.त्याच्या चार नंबर पेजवर बंगाली बाबांच्या जाहिरातीखाली याची बातमी होती .
संतोष दिघे साहित्यिक आहे का ...??? हाच मोठा चर्चेचा विषय ..खरे तर वादाचा विषय अशी माझी सौ म्हणते .त्याची तीन चार पुस्तके प्रकाशित झालीय असे तो इतरांना सांगतो . माझी पुस्तके सहजासहजी उपलब्ध नाहीत असेही तो म्हणतो आणि या गोष्टीला विक्रम पाठिंबा देतो. विक्रमनेच त्याचे एक पुस्तक रात्री नऊनंतर दादरच्या रेल्वे ब्रिजखली बसणाऱ्या विक्रेत्याकडून आणले होते . रातों का शहेनशहा असे त्या पुस्तकाचे नाव होते . त्याची भाषाशैली आम्हाला माहीत होतीच पण पुस्तकातील रतिक्रीडेची वर्णन आणि त्याचा कल्पनाविलास पाहून आम्ही थक्क झालो .
दिघ्या पहिल्यापासूनच मराठी भाषेत हुशार .सदा साळवीला त्याने एक प्रेमपत्र लिहून दिले होते ते वाचून कुंदा म्हात्रेची मोठी बहीण आपल्या वर्षाच्या मुलीला कमरेवर घेऊन त्याला भेटायला गार्डनमध्ये आली . आणि ते पत्र तिला नाही तर तिच्या बहिणीला आहे हे कळताच तिने मारलेली थप्पड आजही आमच्या कानात घुमतेय.मध्येच एकदा तो कवी झाला होता . पण नशा अंगात भिनल्याशिवाय कविता कागदावर उमटत नाही असा सल्ला कोणीतरी देवमाणसाने त्याला दिला . ह्याने पाजलेल्या दारूवर महिनाभर आमच्यासारख्या मित्रांनी चैन केली . पण नंतर कविता करण्याचे प्रमाण दारुप्रमाणेच अति होऊ लागले तेव्हा एकेक जण गळू लागला .
दिघेने काही मराठी मालिकांमध्ये लिखाणही केले असे ऐकून होतो . त्याचे नाव शोधण्यासाठी मी संध्याकाळी सात ते रात्री दहा पर्यंत टीव्ही समोर ठाण मांडून बसू लागलो . मित्रांसोबत नाक्यावर उभा राहणारा आपला नवरा अचानक घरी टीव्ही समोर का बसू लागलाय या शंकेने सौ ला पछाडले . बाहेरची भानगड अंगावर आली नसेल ना या काळजीने तिने घरात राहणे सोडून दिले . मेव्हणीला काम देतो असे सांगून तो आमच्या घरी दोनवेळा फुकटात जेवून गेला हे सौ अजूनही विसरली नाही . पण संतोषकडे नवनवीन युक्त्यांचा खजिना आहे . त्यामुळे अजून चारवेळा जेवून जाईल याची मला खात्री आहे .
त्याच्या संमेलनाध्यक्षपदाची बातमी वाचून मी आणि विक्रमने एकमेकांच्या तोंडाकडे पाहिले आणि निराशेने मान हलवली .आता हे संमेलन होईपर्यंत दिघ्या माझ्याकडे कमीतकमी तीन वेळा आणि विक्रमकडे चार वेळा जेवणार हे नक्की .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
द केस ऑफ द काउंटरफिट आय
द केस ऑफ द काउंटरफिट आय .. अर्ल स्टँले गार्डनर
अनुवाद .... आनंद केतकर
मेहता पब्लिकेशन
हार्टली बॅसेट या धनाढ्य उद्योगपतींचा मृतदेह त्याच्याच अभ्यासिकेत सापडलाय. अर्थात खुन्याने ती आत्महत्या आहे असा भासवायचा प्रयत्न केलाय . पण मृतदेहापाशी तीन रिव्हॉल्वर सापडली . एक त्याच्या पत्नीनेच घाबरून तिथे ठेवले आहे आणि खुनी म्हणून तिलाच अटक झालीय . पेरी मेसनकडे एक माणूस आपल्या हरवलेल्या खोट्या डोळ्यांची तक्रार करण्यासाठी आलाय आणि तो डोळा गैरमार्गासाठी वापरला जाईल असा त्याला दाट संशय आहे .बॅसेटकडे काम करणाऱ्या एकाने पैश्याची अफरातफर केलीय आणि तो पैसे देण्यास असमर्थ आहे . तर बॅसेटच्या पत्नीला त्याला सोडून जायचे आहे .बॅसेटचा सावत्र मुलगा त्याचा प्रचंड तिरस्कार करतोय . मृत असलेल्या बॅसेटच्या हातात काचेचा नकली डोळा आहे . कदाचित खुनी माणसाचाच तो असावा .
वरवर साधी सरळ वाटणारी केस खूपच गुंतागुंतीची बनली आहे . तरीही पेरी मेसन खरा खुनी शोधून काढतोच .
Sunday, September 22, 2019
वासांसी नूतानानि ..... नारायण धारप
वासांसी नूतानानि ..... नारायण धारप
साकेत प्रकाशन
खरे तर ऋषिकेश हा फारच साधा तरुण . एकटाच राहणाराया. सरळ मार्गाने नोकरी करणारा . अबोल स्वभावाचा . एके दिवशी कामावर जाताना त्याच्या बसला अपघात होतो . आणि तो जखमी होतो . हॉस्पिटलमध्ये त्याला काही विचित्र स्वप्ने पडतात . तीही पुरातन कालखंडातील असतात . त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये एक वृद्ध व्यावसायिक ऍडमिट होतो . त्याला पाहताच ऋषिकेशच्या आंतरिक शक्ती जागृत होतात . न कळत तो त्या वृद्धावर आणि त्याच्या तरुण मुलीवर आपल्या शक्तीचा प्रभाव पडून त्यांना संकटातून बाहेर पडण्यास मदत करतो .अतिशय गुंतागुंतीच्या या गुढकथेत धारपानी उत्कंठा ताणून धरली आहे . त्यामुळे वाचक शेवटपर्यंत पुस्तक वाचतात .