Sunday, September 27, 2020

डॉटर्स डे

डॉटर्स डे
"देवा... आज पुन्हा उशीर होणार तर ...."भिंतीवरील घड्याळाकडे पाहत ती पुटपुटली मग रागारागाने आपल्या झोपलेल्या नवऱ्याकडे पाहिले आणि बाहेर पडली.
तिची सातची ड्युटी त्यामुळे सकाळी सहाला बाहेर पडावे लागे. ट्रेन मग बस..करत ती धावत ड्युटीवर जायची.
काल रात्री नवऱ्याने नवरेगिरी दाखवली त्याचा परिणाम उठण्यावर झाला. लग्नाला दहा वर्षे झाली तरी मुलबाळ नव्हतेच.त्यामुळे एकप्रकारचा तुसडेपणा तिच्या स्वभावात होता. 
ती सरकारी हॉस्पिटलच्या एका विभागात साफसफाईचे काम करायची.तिच्या तुसड्या स्वभावामुळे सर्वांच्याच नजरेतून उतरली होती.परिणाम तिच्या कामावर झाला. 
कोणीही नाक मुरडेल असा वॉर्ड तिला दिला होता. त्या वॉर्डमध्ये  मतिमंद आणि अपंग रुग्णमुली होत्या. त्या वॉर्डची आणि पेशंटची साफसफाई तिच्या गळ्यात पडली होती.
मग तीही आपला राग पेशंटवर काढायची.काम करताना सतत चिडचिड चालायची. तरी बरे त्या मुलींना हीचा राग कळत नव्हता.एकूण काय ....?? दोन्ही बाजूने छान चालले होते . 
मस्टरवर सही करून अंगावर अप्रोन चढवून ती वॉर्डमध्ये शिरली आणि तो परिचित गंध तिच्या नाकात शिरला. 
देवा....!!  तीन नंबरच्या पेशंटने आज अंथरुणातच.. शी....??? मस्तकात संतापाची तिडीक घुसून ती त्या मुलीकडे तरातरा चालत गेली.
 "किती वेळा सांगितले डायपर काढू नकोस ...ऐकत का नाहीस. तू राहशील दिवसभर अशीच हसत या घाणीत ..असे पुटपुटत तिने तिला उचलून बाजूला ठेवले . बेड स्वच्छ करून तिला आंघोळ घातली. ती मुलगी तोंडात अंगठा ठेवून खुदूखुदू हसत होती.
तीला नाही बेडवर ठेवत तर चार नंबर पेशंटने हाक दिली "मावशी ... टॉयलेट ....जन्मतः पोलियो झालेली ती मुलगी मतिमंद नक्कीच नव्हती पण तिला जागेवरून हालताच येत नव्हते . काही दिवसासाठी ऍडमिट झाली होती . दुसरीकडे जागा नाही म्हणून इथे ठेवले होते .
"येते ग बाई .. ती डाफरली..
" लवकर या नाहीतर इथेच होईल ..आणि मग तुम्हालाच करावे लागेल सर्व.." तिने हसत उत्तर दिले.
"खरे आहे ग पोरी.."असे म्हणत तिला अलगद उचलून टॉयलेटमध्ये घेऊन गेली .
प्रत्येकीची स्वच्छता आणि वॉर्डची साफसफाई करण्यात वेळ कसा निघून गेला ते समजलेच नाही तिला.
जेवणाची वेळ झाली तेव्हा आपला डबा उघडून जेवायला बसली इतक्यात एक नंबरच्या पेशंटने हातातील जेवणाचे ताट फेकून दिल्याचे पाहिले .
"मला नकोय हे .. चपाती भाजीच हवीय.. हे नकोय.." एक नंबर किंचाळून म्हणाली. इतरवेळी शांत असणारी ही मुलगी जरा काही मनाविरुद्ध झाले की संतापायची आदळआपट करायची . हातात मिळेल ती वस्तू फेकून द्यायची.हि जेवण सोडून तिच्याकडे धावत गेली . आपला डबा तिला देऊन शांत केले .पुन्हा तिला साफ केले . बेड स्वच्छ केला . मग पेशंटचे जेवणच तिने पोटात ढकलले .
"मावशी पत्ते खेळणार का ....?? पाच नंबर बेडवरची मुलगी म्हणाली . अर्थात तिच्या हातात काही नव्हते . ती रागारागाने तिच्याजवळ जाऊन बसली.
" मी नेहमी खेळते मामाशी....जो हरेल त्याने कपडे काढायचे असे ठरलंय आमचे . मीच हरते नेहमी .. आज तुम्ही खेळा  माझ्याबरोबर ..."
"देवा... ती मनात म्हणाली .. काय रे हे .... !! बरे झाले मला मूल नाही. काय ही अवस्था एकेकींची.." ती काही न बोलता तिच्या बाजूला बसली . बघ मी हरली आता काढू कपडे .. . 
"नको ग बाळा..मी सोडले तुला. चहा पिऊन खेळू "ती म्हणाली. नेहमीचे होते ते .
तितक्यात दोन नंबरची पेशंट जवळ आली.
"मावशी...सगळे कपडे घडी घालून ठेवले.अजून काही आहेत का घडी घालायला .ती अतिशय व्यवस्थित दिसत होती . टापटीप राहायची आणि हाच तिचा अवगुण होता. स्वमग्न असलेली ही मुलगी अचानक झटका आल्यामुळे इथे गेले पंधरा दिवस ऍडमिट होती .
पाहता पाहता ड्युटी संपायला आली तसे तिने प्रत्येकीजवळ जाऊन त्यांची पुन्हा तपासणी केली . स्वभावानुसार काहीतरी टोचून बोलणे सोडले नाही तिने.
 वॉर्डबाहेर पडणार इतक्यात चार नंबर ने हाक मारली "मावशी जरा थांबा की ...
त्रासिक चेहऱ्याने तिने तिच्याकडे पाहिले ."आता काय ...??  टॉयलेटला जायचे का ...??  तिने विचारले . 
"नाही पण एक काम आहे ...असे म्हणून खुर्चीवर बसलेल्या नर्सला खूण केली . 
नर्सने हसत एक बॉक्स टेबलाखालून काढला आणि तिच्यासमोर ठेवला . 
"चला या सर्वजणी.... आपल्याला केक कापायचा आहे ....असे म्हणतात सर्वजणी टेबलाभोवती गोळ्या झाल्या. चार नंबर तिचा आधार घेत व्हीलचेयरवर बसली .
बॉक्समध्ये एक छानसा केक होता आणि त्यावर लिहिलं होतं हॅप्पी डॉटर्स डे.
"मावशी...आम्ही तुमच्या मुलीच नाही का ..?? एक आई घेते त्याप्रमाणे काळजी घेता आमची. चिडचिड करता.... ओरडता... पण कर्तव्यात चुकत नाहीत तुम्ही .आम्ही तुमच्या लेकीचं आहोत.कराल का आज आमच्या बरोबर डॉटर्स डे साजरा....."??
डोळ्यातील अश्रू वाहून देत तिने सर्वांच्या हाती हात देऊन केक कापला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, September 26, 2020

अलक ....१६

अलक ....१६
बरेचजण त्याला हसरा सैतान म्हणायचे. तर काही खविस.टोचून बोलणारा..सतत दुसऱ्याची खेचत रहाणारा म्हणून तो प्रसिद्ध होता. हा माणूस सतत हसत कसा राहतो म्हणून लोक नवल करायचे.पण तो कसा आहे हे त्याच्या डोक्याखालील उशीलाच माहीत होते. आहो.. रोज रात्री त्याच्या अश्रूंने तीच तर भिजून जायची.
© श्री . किरण कृष्णा बोरकर

Friday, September 25, 2020

गिफ्ट

गिफ्ट 
"तुझ्या वयाची मला दोन मुले आहेत.." ग्लासाने चियर्स करून तो हे नेहमी म्हणायचा. मी ही हसून मान डोलवायचो. कारण रंगात आला की शेवटी बिल तोच भरणार याची खात्री असायची आम्हाला.
 तो डिपार्टमेंटमधील सर्वात जुना वर्कर.
 फॅक्टरी चालू झाली तेव्हापासून तो आहे असे इतर विनोदाने म्हणायचे.
अशिक्षित होता ...पण सही करायला यायची . पगाराचे आकडे ही समजायचे.
कोणतीही मशीन रिपेयर करण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हते.
प्रॉब्लेम काय आहे आणि तो का आला हे त्याच्याइतके अचूक कोणी सांगू शकत नव्हते . तीन जणांची टीम होती त्यांची .
माझे आणि त्याचे पहिल्या दिवसापासून ट्युनिंग जुळले . मला तो साहेब कधीच म्हणाला नाही . अर्थात माझी ती अपेक्षा नव्हती म्हणा.
 पहिल्या दिवसापासून तो मला सांगत होता .." या पाच सहा वर्षात रिटायर्ड होईन.... पण माझी सर्व्हिस तेरा वर्षे झाली तरी तो रिटायर्ड झाला नव्हता. शेवटी रिटायर्ड झाला... तरीही कंपनीने त्याला कॉन्ट्रॅक्टवर ठेवले. 
त्याची मेमरी खूप शार्प होती . जवळच्या मित्र नातेवाईकांचे वाढदिवस तर लक्षात असायचेच . पण कोणते समान कुठे ठेवले आहे हेही त्याच्या डोक्यात पक्के बसलेले असायचे . म्हातारा वर गेला तरी स्वप्नात येउन कुठल्या भंगारात काय मिळेल हे सांगेल असे आम्ही गमतीत म्हणायचो .
आमच्यावर त्याचा खूप जीव होता . अनुभवाचा खजिना होता त्याच्याकडे .
शेवटी ती वेळ आली . कंपनीने त्याला जबाबदारीतून मुक्त केले . सर्वांचा हसत हसत निरोप घेतला त्याने. 
माझा हात हाती घेऊन म्हणाला." आठवण ठेव माझी"
 मी नेहमीसारखे हसून होय.. म्हटले.
मी दिलेले गिफ्ट त्याने घेतले नाही.
" देशील रे कधीही .. तुझ्याकडून असल्या गिफ्टची अपेक्षा नाही....." काही न कळून मी गप्प बसलो .
मला मिठी मारताना अलगद  पुसलेले डोळे बऱ्याच जणांनी पाहिले .
पुन्हा रुटीन सुरू झाले. काही दिवस त्याची कमी जाणवली.
पण म्हणतात ना कोण कोणासाठी थांबत नाही . काम तर मुळीच नाही..काही दिवस आमचा कॉन्टॅक्ट होता मग कामाच्या आणि इतर गडबडीत त्याला विसरून गेलो.
आता या लॉकडाऊनमध्ये अचानक त्याचा फोन आला . काहीसा थकलेला... चिंताग्रस्त...
 मी खुश झालो . लॉकडाऊनमध्ये हाचतर सहारा होता . छान गप्पा मारल्या आम्ही. पण कुठेतरी काही सतत खटकत होते . 
इतरांचे नंबर मागितले त्याने . त्यांना व्हाट्स अँप वापरता येत नाही म्हणून एसएमएस केले.
सध्या ते मुलीसोबत राहत होते . त्यानंतर त्यांचे वेळीअवेळी फोन सुरू झाले . सुरवातीला बरे वाटत होते पण नंतर थोडा कंटाळा येऊ लागला . तेच तेच बोलणे काहीसे असंबद्ध मग कधी कधी टीव्ही बघत असताना ,वाचन करताना फोन आला की कट करू लागलो. कधी त्यांचा मिस कॉल आला की मी फोन करायचो पण त्यांच्या लक्षात राहायचे नाही .
त्या दिवशी पुन्हा त्याने फोन केला . त्याच्या पेन्शनच्या काही अडचणी आल्या होत्या . चौकशी कर अशी विनती केली . पुन्हा काही वेळाने फोन ...पुन्हा तेच..
 आज पुन्हा त्याचा फोन... मी त्याला पेन्शनविषयी सांगितले..... तो विसरला होता.
 आता मात्र मी थोडा चिडलो .आवाज चढविला . इतक्यात फोनमधून एका स्त्रीचा आवाज ऐकू आला.
" भाऊ... मी त्यांची मुलगी बोलतेय . सॉरी बाबांची मेमरी लॉस होते कधी कधी ..त्यामुळे काय बोलले ते विसरतात. पण अजूनही तुमची आठवण आहे त्यांना . खूप बोलत असतात तुमच्या विषयी .तुमचे गिफ्ट बाकी आहे म्हणे . कधीतरी नक्की द्याल असे म्हणतात . फक्त तुम्हालाच फोन करतात हो ते . बोलत राहा अधून मधून ....
 काही न बोलता मी फोन बंद केला . माझ्या डोळ्यातील दोन अश्रू मोबाईल स्क्रिनवर पडले . कदाचित हेच ते गिफ्ट होते ज्याची त्याला अपेक्षा होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, September 4, 2020

अलक ...१५

अलक...१५
कोरोनाचे निदान झाले आणि तो घरीच बसला . तेव्हापासून सतत फोनवर फोन सुरू होते.इतकेजण आपली चौकशी करतायत  सदिच्छा देतायत हे पाहून तो मनोमन खुश होता . चौदा दिवसानंतर तो दुकान उघडायला आला तेव्हा गिर्हाईक आधीच शांतपणे रांग लावून उभे होते .एका वाईनशॉपच्या मालकाची किंमत आज त्याला कळली होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, September 1, 2020

अलक ...१४

अलक.....१४
दरवर्षीचीप्रमाणे यंदाही तो भक्तांच्या आग्रहावरून आला होता.पण यावेळी त्याला भेटण्यासाठी कडक अटी होत्या. आपल्या भक्तांच्या चेहऱ्यावरील निराशा त्याला कळत होती . पण यावर्षीचे दहा दिवस मात्र खूपच शांततेत गेले होते . अगदी त्याला हवे तसे . खूप विचार करायला आणि भावी योजना आखण्यात त्याचा वेळ गेला होता . दहा दिवसानंतर तो आपल्या घरी पोचला तेव्हा चौदा दिवसासाठी त्याला कॉरनटाईन करण्यात आले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, August 21, 2020

अलक ....१३

अलक ....१३
सगळे त्याला शिव्या द्यायचे. काहीजण खविस म्हणायचे तर काही हिटलर. तो तसाच होता. शहरातील कोणताही विभाग त्याच्या हाती दिला की तो कठोरपणे कायदा राबवायचा. आताही तो ज्या विभागाचा प्रमुख होता तेथे अतिशय कडकपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली होती.रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता की फेरीवाला. तो सापडेल त्याला क्रूरपणे फटावले जात होते. शेवटी काही लोकांचा उद्रेक झालाच . बारा दिवसानंतर त्याच्यावर भयानक जीवघेणा हल्ला झाला . पण त्यामुळे लॉकडाऊन अजून कडक झाले . पण जेव्हा तो डिस्चार्ज होऊन बाहेर पडला तेव्हा विभागातील कोरोनाग्रस्त पेशंटची संख्या जवळजवळ संपली होती .
© श्री .किरण कृष्णा बोरकर

Tuesday, August 18, 2020

अलक....१२

अलक.....१२
 त्या सेलिब्रिटीच्या आत्महत्येची चौकशीसाठी आंदोलन करण्याऱ्या जमावात तो घोषणा देत होता.साऱ्या जगभर त्या आत्महत्येची चर्चा चालू होती .संध्याकाळी मिळतील ते पैसे खिश्यात टाकून तो घरी निघाला. घरी येताच छोटी धावत त्याच्याजवळ आली आणि कमरेला मिठी मारून म्हणाली "बाबा...बँकवाले येऊन गेले".त्याने हसून मान डोलावली . यावर्षीही पाऊस मनासारखा झाला नव्हता.सकाळी त्या ओसाड शेतातील झाडावर गळफास लावलेला त्याचा देह लटकत होता.त्या सेलिब्रिटीसारखी आपल्या आत्महत्येचीही चौकशी करा अशी मागणी त्याच्या खिशातील चिट्ठीत होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर