Sunday, June 18, 2017

इगो

अमृता धुसफुतच घरात शिरली आणि शांतपणे चहा पीत बसलेल्या अमृतच्या समोर उभी राहिलीं.
"आणखी किती दिवस लोकांचे टोमणे खात जगू मी" तिने कमरेवर हात ठेवून विचारले .तसा अमृत चमकला .
"आता काय झाले " . हल्ली रोज तिचा मूड ऑफ असतो आणि चिडचिड चालू असते हे त्याच्या लक्षात आले होते .पण तो अश्या गोष्टीकडे लक्ष देणार माणूस नव्हता . स्वतःच्या मस्तीत राहणारा .
"अरे खाली हळदीकुंकूला गेले होते . बिल्डिंग मधल्या सगळ्या बायका विचारत होत्या कधी देणार पेढे ,बर्फी ?? काय उत्तर देऊ ?? परवा वन्स ही बोलल्या ,आते कधी बनवणार मला ?? सासू बाई तर हल्ली रोजच आडून आडून बोलतात .अरे किती जणांचेे तोंड बंद करू "?? असे म्हणत रडायला लागली .
" अरे रडतेस कशाला ?? सांगायचं आम्ही थांबलोय . तो सहज म्हणाला .
"किती वर्षे "?? ती चिडून म्हणाली", सात वर्षे झाली . वय वाढत चालली आपलीं ".
"हो का !! बघू यावर्षी ",तो सहज बोलला आणि टीव्ही बघत बसला .
ती शांत झाली त्याच्या बाजूला बसत म्हणाली", हे बघ अमृत आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ . काही प्रॉब्लेम असेल तर सोडवू . हल्ली खूप उपाय आलेत यावर . काही दोष असले तर उपाय करू" .
तसा अमृत उखडला "तुला काय म्हणायचे आहे .?? आपल्यात दोष आहे ?? म्हणजे माझ्यात दोष आहे असे म्हणायचे आहे का ?? तसे असते तर आपले संबंध घडले असते का ?? तूच तपासणी कर .तुलाच काही होत नाही . मी नाही काही करणार . असे बोलून बाहेर निघून गेला . त्याची मुक्ताफळे ऐकून अमृता हादरून गेली .
मी आणि विक्रम नेहमीप्रमाणे इराण्याकडे बसलो होतो . भाववाढ आणि शेतकऱ्यांच्या संपावर विक्रम आपली बहुमूल्य मते मांडीत होता आणि मी मुकाटपणे ब्रेड बटर खात ऐकत होतो .इतक्यात अमृत आत शिरला . त्याचा संतापलेला चेहरा बघून आम्ही समजलो याचे काहीतरी बिनसलेय . मी त्याला सवयीप्रमाणे हाक मारली आणि सवयीप्रमाणे विक्रमने दोन शिव्या मला दिल्या . नाईलाज झाल्यासारखा अमृत आमच्यात येऊन बसला .
"काय छत्रपती आज कोणावर चिडलात" ? विक्रमने छद्मीपणे विचारले.
मी त्याला नजरेने गप्प केले . चहाची ऑर्डर देऊन अमृत ला विचारले", काय झाले "?. तसा तो उसळला "अरे आमची ही,!!  मुलं पाहिजे मूल पाहिजे म्हणून मागे लागलीय . ते काय आपल्या हातात आहे . पाहिजे तेव्हा झाले . प्रयत्न तर करतोय ना ??
" मग काय चुकते तिचे ?? मी सहजपणे म्हणालो . "किती वर्षे प्रयत्न करतोयस ?? आणि किती वर्षे प्रयत्न करणार राजे ?? विक्रमने पट्टा चालवला .
"अरे आता नाही होत तर काय करू" ? अमृत चिडून म्हणाला .
"चेक करून घ्या ",मी शांतपणे म्हणालो.
"हो तिला पाहिजे तर घेईल ती. मला गरज वाटत नाही", अमृत रागात उद्गारला .
"काय हरकत आहे तुझे चेकिंग करायला .तू पुरुष आहेस म्हणून तुला काही प्रॉब्लेम नसणार का ?? की अहंकार आड येतोय."विक्रम चा तोल सुटला .
मी विक्रमला शांत केले आणि अमृतला विचारले ",खरेच तुला बाबा व्हाचंय का" ?? खरोखर तुला वाटत असेल तर तर इगो सोड . जर का खरोखर काही प्रॉब्लेम असेल तर त्यावर इलाज करता येईल . आता खूप उपचार पद्धती आल्या आहेत . दोष कोणाचाही असू शकतो .जसे इतर आजार तसाच हा आजार समजून इलाज करा . शेवटी आई होणे हा अमृताचा हक्क आहे तसाच बाप होणे तुझा . तू तिच्या एकटीवर ही जबाबदारी टाकू शकत नाहीस" .
हे ऐकून अमृत विचारात पडला शेवटी मोकळेपणाने म्हणाला," ठीक आहे जाऊ दोघेही डॉक्टरकडे ".
(C) श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment