SIKANDAR KA MUQADDAR
सिकंदर का मुक्कद्दर
नीरज पांडेचा चित्रपट म्हटला की काहीतरी वेगळेपणा असणारच. हा चित्रपटही आपला अपेक्षाभंग करीत नाही. सुरवातीपासूनच काहीतरी वेगळे घडणार याची खात्री आपल्याला पटते आणि शेवटपर्यंत आपल्याला अनपेक्षित धक्के बसत जातात.
गोरेगावच्या मोठ्या पटांगणात एक मोठे ज्वेलरी प्रदर्शन भरले होते. अनेक कंपन्या आपल्या मौल्यवान हिरे,दागिने घेऊन स्टॉलवर होते.पोलीस बंदोबस्त ही चोख होता.सिकंदर शर्मा साधा कॉम्प्युटर इंजिनियर.काही ज्वेलरी कंपन्यांचे कॉम्प्युटरचे काम तो करतो.आता तो ही प्रदर्शनात काही कंपन्यांचे कॉम्प्युटर चेक करायला आलाय.
अचानक पोलिसांना एका व्यक्तीचा निनावी फोन येतो .प्रदर्शनात दरोडा पडणार आहे आणि त्यांच्याकडे हत्यारेही आहेत.पोलीस आणीबाणीचा भोंगा दाबून सर्वाना एका जागी जमा करतात आणि सर्व दरोडेखोरांना ठार मारतात.पण एका कंपनीच्या स्टॉलमधून काही हिरे चोरीला जातात.
मंगेश देसाई , कामिनीसिंह त्या स्टॉलवर कामाला असतात. चौकशीसाठी इंस्पेक्टर जसविंदर सिंहची नेमणूक होते.जसविंदर सिंह हा अश्या कामात हुशार आहे .त्याचा रेकॉर्ड 100% आहे. तो नेहमी त्याच्या आतल्या आवाजाला प्राधान्य देतो. तो घटनास्थळी येऊन तपास करतो आणि मंगेश देसाई ,सिकंदर शर्मा, आणि कामिनी सिंहला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतो.
पुराव्याअभावी पुढे तिघेही निर्दोष सुटतात . सगळे इथेच संपत नाही.
आज या गोष्टीला पंधरा वर्षे उलटून गेलीत.जसविंदर सिंहची कारकीर्द त्या केसपासून उतरणीला लागली आहे.एक दिवस त्याला नोकरीतून बडतर्फ करण्यात येते .त्याच दिवशी त्याच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब होते.तो आता नेहमीच दारू पीत असतो. नेमका त्याच दिवशी सिकंदर शर्मा अबुधाबीतून मुंबईला यायला निघालाय.जसविंदर सिंहला त्याची माफी मागायची आहे .म्हणून तो त्याला हॉटेल मध्ये बोलावतो.
सिकंदर त्याला हॉटेलच्या टेरेसवर भेटतो आणि सुरू होते एक प्रदीर्घ कहाणी.ज्यात दोघांनी पंधरा वर्षे काय केले हे सांगतात आणि प्रेक्षकांना अनपेक्षित धक्के बसत जातात.
शेवटी जसविंदरसिंह सिकंदर शर्माची माफी मागतो आणि तो निरपराध होता हे कबूल करतो.
पण मग चोरीला गेलेले हिरे कुठे गेले ? मंगेश देसाई ,कामिनी सिंह, सिकंदर शर्मा निरपराधी आहेत तर खरे अपराधी कोण आहेत ?
नीरज पांडेचा आवडता जिमी शेरगिल यात इन्स्पेक्टर जसविंदर सिंहच्या भूमिकेत आहे तर त्याच्या विरुद्ध तमन्ना भाटीया कामिनी सिंह आणि अविनाश तिवारी सिकंदर शर्माच्या भूमिकेत आहेत.
शेवटपर्यंत उत्कंठा वाढविणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.