Wednesday, December 25, 2024

भावेश जोशी सुपरहिरो

BHAVESH JOSHI SUPERHERO
भावेश जोशी सुपरहिरो
सुपरहिरो होण्यासाठी कोणत्याही दैवी शक्तीची गरज नाही.सामान्य माणूस ही सुपरहिरो बनू शकतो .फक्त त्याच्या मनात अन्यायाची चीड असावी . सामाजिक नियम पाळण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
भावेश जोशी, सिकंदर उर्फ सिकू खन्ना, आणि रजत हे तीन तरुण मित्र असेच आहेत.ते उच्चशिक्षित आहेत. त्यांनाही अन्यायाची चीड आहे.नियम तोडणाऱ्यांविरुद्ध त्यांच्या मनात राग आहे. इंसाफ नावाचे त्यांचे एक चॅनेल आहे .ते कागदाची खाकी पिशवी डोक्यावर पांघरून आपल्या परीने अन्यायाविरुद्ध लढतात.
भावेश जोशी खूपच सेन्सेटिव्ह आहे.देश हळूहळू बदलेल याची त्याला खात्री आहे.रजत घाबरट आहे पण नेहमीच त्यांना साथ देतो.पण पासपोर्ट काढताना सिकूला पोलिसांच्या भ्रष्टाचाराचा अनुभव येतो आणि त्याचा सर्व गोष्टींवरचा विश्वास उडतो. यावरून भावेश आणि त्याच्यात वाद होतो.
शहरात बऱ्याच ठिकाणी पाणी वेळेवर येत नाही.कॉर्पोरेशन चार तास पाणी सोडते पण काहींना ते पुरतच नाही.एक वरिष्ठ नागरिक भावेशला मेल पाठवतो .भावेश इंसाफ बनून त्याला भेटतो तेव्हा तो सगळी माहिती त्याला देतो.एक नगरसेवक मोठ्या पाईपलाईनमधून चोरून पाणी आपल्या टँकरमध्ये भरतो.
भावेश त्याच्या सगळ्या करामतीचा व्हिडिओ काढतो .पण ....
भावेश हे प्रकरण उघडकीस  आणेल का ?? या कामात सिकू त्याला कितपत साथ देईल ?
सुपरहिरो बनणे इतके सोपे असेल का ??
हे तर सर्वसामान्य तरुण आहेत .त्यांना धड मारामारी करता येत नाही .नगरसेवकाच्या गुंडांपुढे ते टिकतील का ?? हर्षवर्धन कपूर ,प्रियांशु पैंयुली, आशिष वर्मा ने सिकू, भावेश जोशी आणि रजत साकारले आहेत.तर चिन्मय मांडलेकरने इंस्पेक्टर सुनील जाधवची भूमिका केली आहे . निशिकांत कामात मुख्य खलनायक राणाच्या भूमिकेत आहे.
एक चांगला चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

Tuesday, December 17, 2024

कॅरी ऑन

CARRY - ON
कॅरी ऑन
ख्रिस्तमसच्या संध्याकाळी विमानतळ गर्दीने फुलून गेलेला असतो. विमानतळावर TSA चा स्टाफ आहे. TSA विमानतळावर सर्व सर्व्हिस पुरवितात. 
इथन TSA चा एक कर्मचारी. त्याची गरदोर मैत्रीण नोरा तिथेच कामाला आहे.पोलीस अकादमीत जायचे इथनचे स्वप्न आहे . तो नेहमीच काही चुका करतो त्यामुळे त्याला प्रमोशनही मिळत नाही. आजही त्याला विमानतळावर महत्वाच्या ठिकाणी ड्युटी पाहिजे पण त्याला मिळत नाही.पण त्याचा मित्र त्याला प्रवाश्यांच्या बॅग स्कॅन करायची आपली ड्युटी देतो.
प्रवाश्यांच्या बॅग स्कॅन करायची ड्युटी फारच महत्वाची असते .पण त्याचवेळी त्याला अज्ञात फोन येतो.एका विशिष्ट प्रवाश्याची बॅग स्कॅन न करता जाऊ दिली नाही तर नोराची गोळी घालून हत्या करण्यात येईल असे धमकवण्यात येते. त्याचबरोबर दोघांची संपूर्ण माहिती दिली जाते .विमानतळावरील प्रत्येक कॅमेरे त्यांनी हॅक केले आहेत.इथनच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जातेय.
त्या बॅगेत एक केमिकल बॉम्ब आहे .तो फुटला तर विमानतळावर हजर असलेला  प्रत्येकजण मारला जाईल.आणि विमानात गेला तर विमानातील सर्व प्रवासी मारले जातील.
इथनला फोनवरून सूचना मिळतात आणि त्याप्रमाणेच त्याला वागावे लागते. इथन तो बॉम्ब निकामी करेल का ? 
श्वास रोखून धरायला लावणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, December 14, 2024

रेड वन

RED ONE
 रेड वन 
असे म्हणतात ख्रिस्तमसच्या आदल्या रात्री सांताक्लोज सर्व लहान मुलांना गिफ्ट देतो.पण एकच सांताक्लोज सर्व जगात एकाच रात्री गिफ्ट कसा देईल हा प्रश्न लहानग्या जॅकला नेहमी पडत असे.
आता जॅक मोठा झालाय .त्याचा मुलगाही शाळेत जातो.जॅक एक उत्कृष्ट हॅकर आहे.पैश्यासाठी तो कोणतेही काम स्वीकारतो.असेच एकदा तो पैसे घेऊन एक साईट हॅक करतो.
पण सांताक्लोज खरोखरच अस्तित्वात आहे.त्याचे स्वतःचे अत्याधुनिक जग आहे.पण त्याची माहिती कोणालाच नाही.तो अजूनही रेनडियरच्या रथातून पृथ्वीवर येतो.ड्रीफ्ट त्याचा अंगरक्षक आणि चीफ सिक्युरिटी प्रमुख आहे.
आताही सांताक्लोजच्या जगात ख्रिस्तमसची जोरदार तयारी चालू आहे. पण जॅकने हॅक केलेल्या साईटमुळे सांताक्लोजच्या ठिकाणची माहिती त्याच्या शत्रूंना कळली आणि त्यांनी सांताक्लोजचे अपहरण केले.
ड्रीफ्ट आणि त्याची माणसे संताक्लोजला शोधायला बाहेर पडतात.सांताक्लोजने मुलांना गिफ्ट दिले नाही तर मुलांचा चांगुलपणावरचा  विश्वास उडेल याची भीती त्यांना आहे. 
ड्रीफ्ट आपल्या अत्याधुनिक उपकरणाद्वारे जॅकपर्यंत पोचतो आणि त्याला सोबत घेऊन तो सांताक्लोजच्या शोधात निघतो.त्याचा प्रवास मोठा आणि खतरनाक आहे. तो सांताक्लोजला वेळेआधी शोधेल का ? 
 सांताक्लोजचे अपहरण कोणी आणि का केलंय ??
या ख्रिस्तमसच्या काळात सहकुटुंब पहावी अशी थोडी विनोदी ,फँटसी आणि ऍक्शन फिल्म प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे .
सर्वांचा आवडता द्वायने जॉन्सन अर्थात रॉक प्रमुख भूमिकेत आहे.

Jigra

Jigra
जिग्रा
सत्या तशी लहानपणापासून धाडसी ,निडर .आपल्या लहान भावावर अंकुरवर तिचे खूप प्रेम.वडिलांना बाल्कनीतून उडी मारताना प्रत्यक्ष तिने पाहिले होते.
आता ती एका मोठ्या उद्योजगाकडे काम करते. त्यांची सर्व चांगली वाईट प्रकरणे हाताळले.अंकुर कोडिंग सॉफ्टवेअर तयार करतोय.त्याची कबीरशी चांगली मैत्री आहे आणि कबीर त्या बिझनेसमनचा मुलगा आहे.
त्यांच्याच शिफारशीवर कबीर आणि अंकुर आपल्या कामाचे प्रेझेंटेशन करायला हंशी दाओ देशात जातात.या देशाचे कायदे खूप कडक आहेत. रात्री हॉटेलवर परतत असताना पोलीस कबीर आणि अंकुरला पकडतात तेव्हा कबीरकडे ड्रग सापडते.त्या देशात ड्रगसारखा भयंकर गुन्हा नाही.ज्यांच्याकडे ड्रग सापडेल त्याला मृत्यूची शिक्षा आहे.
कबिरचा वकील कबीरचा आळ अंकुरवर घ्यायला सांगतो आणि कबीरची सुटका होते पण अंकुरला मृत्यूची शिक्षा होते.
सत्याला हे कळते आणि ती ताबडतोब हंशी दाओला निघते.अनोळखी देशात तिला पहिल्यांदा कोणीच मदत करीत नाही .या देशात अश्या गुन्ह्याला माफी नाही असेच सर्व सांगतात. जेव्हा सर्व मार्ग खुंटतात तेव्हा ती अंकुरला तुरुंगातून पळविण्याचा प्लॅन करते.
त्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या तुरुंगातून ती अंकुरला सोडवेल ?? तिला कोण मदत करेल ?तिचा नक्की प्लॅन काय आहे ??
हे पहायचे असेल तर नेटफ्लिक्सवर जिग्रा नक्की पहा.
चित्रपट पूर्णपणे आलिया भट्टचा आहे .-

Saturday, December 7, 2024

agni

AGNI
अग्नि
जो आग मे जलते है वो अमर होते है.
मुंबईचा फायरमन महादेव निगडेचे हे वाक्य.
फायरमनला नेहमीच दुय्यम स्थान दिले  जाते. माणसाच्या जीवाचे मूल्य मोजता येत नाही आणि फायरमन असे अनेकांचे जीव वाचवतात.तरीही  सिस्टीममध्ये त्यांना फारसे मानाचे स्थान नाही .पोलीस आणि सरकारी खात्यात त्यांना आदर नाही .पण ते आपले काम नेहमीच  निष्ठने आणि प्रामाणिकपणे करतात. कुठेही आग लागली किंवा दुर्घटना घडली की हातातील  जेवण , समारंभ  अर्धवट सोडून ते धावत सुटतात.
परेल फायर स्टेशनचा चीफ विठ्ठलराव धोंडूबा सुर्वे अतिशय धाडसी आणि कुशल ऑफिसर आहे.घरी त्याची पत्नी रुक्मिणी आणि मुलगा आहे.त्याचा मेव्हणा अमर सावंत पोलीस ऑफिसर आहे. लोक त्याला सुपरकॉप म्हणून ओळखतात. विठ्ठलचा मुलगा बापाला फारसा मान देत नाही पण मामाला खूप मानतो.
मुंबईत गेले काही दिवस जुन्या इमारती , हॉटेल, चित्रपटगृहात आगी लागतयात. विठ्ठल आणि त्याची टीम या आगी विझवायचा पूर्ण प्रयत्न करतायत.शेकडो लोकांचे प्राण त्यांनी वाचविले आहेत.पण नंतर या दुर्घटनांची चौकशी करताना असे आढळून येते की या आगीमागे एक विशिष्ट पॅटर्न आहे.कोणीतरी या आगी जाणूनबुजून लावल्या आहेत.
विठ्ठल आणि त्याची सहकारी अवनी पुरोहित या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतात आणि हादरवून टाकणारे सत्य समोर येते.
या चित्रपटात तुम्हाला फायरमनच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी दिसतील. रोज अग्नी देवाची पूजा करणारे फायरमन, एकमेकांची भंकस करत टोमणे मारत जेवायला बसणारे फायरमन अलार्म वाजताच जेवण टाकून धावती गाडी पकडतात.गाडी बाहेर पडली की देवापुढे दिवा लावून हात जोडणाऱ्या त्यांच्या बायका तसेच ड्युटीवरून सुखरूप परत घरी आल्यावर त्यांची दुष्ट्र काढणाऱ्या बायका पाहून त्यांच्या भावनांची जाणीव होते.
हा चित्रपट तुम्हाला फायरमनचा खरा चेहरा दाखवितो.
प्रतीक गांधीने विठ्ठलराव सुरेख साकारला आहे.त्याला आगीची मुळीच भीती वाटत नाही.तर रुक्मिणीच्या भूमिकेत सई ताम्हणकरने फिट बसली आहे.दिव्येडू अमर सावंत झालाय . जितेंद्र जोशीने महादेव निगडेची भूमिका केली आहे.
मुंबईत घडणारा हा चित्रपट आहे म्हणून तो मराठमोळा आणि आपला वाटतो .
या चित्रपटात आगीची दृश्ये खूपच छान आहेत.
माझा मुलगा या चित्रपटाच्या vfx टीममध्ये होता याचा खरच आनंद होतो.
एक वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावरचा हा चित्रपट हिंदी भाषेत प्राईम व्हिडिओवर आहे.

Thursday, December 5, 2024

लकी भास्कर

LUCKY  BASKHAR
लकी भास्कर 
माणसाने कितीही पैसे कमावले तरी ते त्याला कमीच असतात.त्याला कुठे थांबायचे ते कळत नाही आणि त्याचा शेवट वाईट होतो.
भास्कर मगधा बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर आहे .एके दिवशी सकाळी त्याच्या घरासमोर सीबीआयची गाडी उभी राहते आणि ऑफिसर त्याला बँकेत घेऊन जातात. 
त्याचे खाते चेक करतात तेव्हा त्याच्या अकाउंटमध्ये शंभर कोटी रुपये दाखवीत असतात.एका बँकेत काम करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर इतके पैसे कसे हा प्रश्न सीबीआय ऑफिसरला पडतो आणि सुरू होते भास्करची कहाणी.
बँकेत कॅशियर पदावर नोकरी करणारा भास्कर कसेबसे आपले घर चालवीत असतो.त्याची अनेकांकडे उधारी असते.ते लोक नेहमी त्याला अपमानित करत असतात.
त्याच वेळी तो इम्पोर्ट व्यवसायात शिरतो .बँकेतून पैसे चोरून तो हा धंदा करतो .पण आपण कधीतरी पकडले जाणार याची त्याला कल्पना असते म्हणून वेळेतच तो त्यातून बाहेर पडतो.
बँकेचे चेयरमन त्याला असिस्टंट जनरल मॅनेजर बनवितात .तेव्हा त्याला बिग बुल कडून शेअर मार्केटची माहिती मिळते आणि  तो आपली खेळी खेळायला सुरवात करतो .
भास्कर आपल्या खात्यात  पांढरे शंभर कोटी कसे गोळा करतो हे निश्चितपणे पाहण्यासारखे आहे.पण त्याचे शत्रू अनेक निर्माण झालेत.बिग बुल ही त्याचा शत्रू झालाय.आता सर्व भास्करला सापळ्यात अडकवायला बघतायत.
यात ते यशस्वी होतील की भास्कर त्यांना पुरून उरेल.
नाही, यात कोणताही हिंसाचार नाही .शिव्या नाहीत ,तोडफोड नाही.ही फक्त कागदावरची डोक्याने लढली जाणारी लढाई आहे.जो हरेल त्याला तुरुंगवास  निश्चित आहे.
दुलकर सलमानने नेहमीच वेगळ्या पठडीतील भूमिका केल्यात. भास्कर त्याच्या व्यतिमत्वात फिट बसतो.मीनाक्षी चौधरीने त्याच्या पत्नीची सुमतीची भूमिका केली आहे .तर टीनू आनंद, सचिन खेडेकर त्यांच्या साथीला आहेत.
पैश्याची उलाढाल कशी असते त्यात बँकेची भूमिका काय हे पहायचे असेल तर नेटफ्लिक्सवर लकी भास्कर नक्की पहा.