Monday, June 30, 2025

ग्राउंड झिरो

Ground Zero
ग्राउंड झिरो
बीएसएफ कमांडर नरेंद्रनाथ दुबे काश्मीरमध्ये अतिसंवेदनशील भागात ड्युटी करतोय. बीएसएफ कॉलनीत तो बायको आणि तीन मुलांसोबत राहतोय.
काश्मीरमध्ये सध्या बीएसएफच्या जवानांना एकटे असताना डोक्यात गोळीमारून ठार मारतायत .असे आतापर्यंत एकूण सत्तर जवान मारले गेलेत .कॅम्पमध्ये ही सध्या भीतीदायक वातावरण आहे. काश्मीर युवकांना ब्रेनवॉश करून एका जवानामागे पाच हजार रुपये दिले जातात आणि याचा मास्टरमाईंड गाजी नावाचा दहशतवादी आहे. हाच गाजी संसद हल्ल्यामागे आणि अक्षरधाम हल्ल्यामागचा सूत्रधार आहे .
दुबे रॉला गाजी आपल्या जवानांच्या हत्येमागे आहे आणि तो काश्मीरमध्ये लपला आहे याची माहिती देतो पण रॉ त्याच्यावर विश्वास ठेवत नाही . दुबेचा तरुण खबरी ही मारला जातो. 
दुबेला शेवटी गाझीचा पत्ता लागतो पण बीएसएफ चीफ त्याला हल्ल्याची परवानगी देत नाही .मग दुबेच आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत गाझीच्या ठिकाणावर हल्ला करायचा ठरवतो .
दुबे या मोहिमेत यशस्वी होईल का ? 
एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आपल्याला काश्मीरमध्ये ड्युटीवर असणाऱ्या जवानांच्या मनस्थितीची जाणीव करून देतो .
इम्रान हाश्मी  नरेंद्रनाथ दुबेच्या प्रमुख भूमिकेत आहे .सई ताम्हणकर ,झोया हुसेन, मुकेश तिवारी ,ललित प्रभाकर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत .
चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे .

Tuesday, June 24, 2025

flight risk

FLIGHT  RISK
फ्लाईट रिस्क
यूएस मार्शल माडोलीन हॅरिश अचानक हल्ला करून विन्स्टनला पकडते . विन्स्टन एका माफियाचा अकौंटंट आहे. त्याला त्याच्या बॉस विरुद्ध साक्ष देण्यासाठी पकडले आहे. आता ती एका खाजगी विमानातून विन्स्टनला तुरुंगात नेतेय. ते खाजगी विमान अतिशय छोटे आणि जुनाट आहे.  मोजून तीनच सीट त्यात आहेत.त्यात एक पायलट डॅरिल बूथची आहे.विमानाची यंत्रणा नीट काम करत नाही पण डॅरिल बूथ विनोदी स्वभावाचा आहे .तो सर्व काही ठीक आहे आपण सुखरूप प्रवास करणार असेच सांगतो .
विमान उड्डाण घेते आणि जीपीएस यंत्रणा बंद पडते. अचानक पायलट बूथचा स्वर खुनशी होतो. नंतर हॅरिशला कळते तो खरा पायलट नसून एक प्रोफेशनल हत्यारा आहे .त्याला विन्स्टनला मारण्याची सुपारी दिलीय. मग सुरू होतो चालू हवेत उडणाऱ्या विमानातील  थरार . 
विन्स्टनला सुखरूपपणे तुरुंगात न्यायची जबाबदारी हॅरिशची आहे .तिला विमानही कट्रोल करायचे आहे .बूथचा सामना करायचा आहे आणि विन्स्टनलाही वाचवायचे आहे .
तीन पात्रात हवेत घडणार थरार  आपल्याला नक्की आवडेल .
 मेल गिब्सन दिग्दर्शित हा चित्रपट  प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे.

Kankhajura

KANKHAJURA
कानखजुरा
कानखजुरा एक विषारी किडा आहे ज्याला शेकडो पाय असतात.
आशू , मॅक्सचा लहान भाऊ . त्यांचे पेड्रो आणि शार्दूल हे दोन मित्र. लहानपणी ते सर्व एकत्र खेळायचे .आशू बोलताना अडखळायचा तेव्हा दोघे त्याला तोतऱ्या म्हणून चिडवायचे. आशू मॅक्ससाठी काहीही करू शकतो. त्याने त्याच्यासाठी एका पर्यटकाचा खूनही केलाय आणि तुरुंगात गेला.
आज चौदा वर्षानंतर आशू तुरुंगातून सुटून आलाय .मॅक्स, पेड्रो, शार्दूल गोव्यात बिल्डर झालेत एका झोपडपट्टीचा विकास करून तिथे श्रीमंत लोकांसाठी बंगले बांधायची त्यांची योजना आहे.
मॅक्स आशूला घरी घेऊन येतो पण आपल्या कामात ढवळाढवळ करू देत नाही .शार्दूल आणि पेड्रो आशूला मूर्ख बावळट समजत आहेत .पण आशूच्या डोक्यात काय प्लॅन चालू आहेत हे त्याच्याशिवाय कोणालाच माहीत नाही .
आशू आपल्या बावळट देहबोली आणि तोतरेपणावर सर्वांचा विश्वास जिंकून हळूहळू सगळ्यांमध्ये फूट कशी पाडतो  हे बघण्यासारखे आहे .
एकमेकांविरुद्ध कान भरून फूट पाडणे हे आशूचे हुकमी अस्त्र आहे .तो समोरच्याला बोलताबोलता असा काही गुंडाळतो की तो आशुवर पटकन विश्वास ठेवतो .वेळप्रसंगी आशू स्वतः जाणून बुजून मार खातो .
ही सिरीज सोनी लिव्हवर हिंदी भाषेत आहे .
रोशन मॅथ्यू आशूच्या प्रमुख भूमिकेत आहे . मोहित रैना, निनाद कामत , उषा नाडकर्णी प्रमुख भूमिकेत आहे .

Tuesday, June 17, 2025

Eleven

Eleven
इलेव्हन
एसीपी अरविंद हुशार अधिकारी.आपल्या तर्कशुद्ध पद्धतीने तो अवघड केसेस सोडवतो.आताही शहरात विचित्र पद्धतीने खून होतायत. काहींना जाळून ठार मारले जातेय.त्यामुळे त्यांची ओळख पटत नाही. त्या व्यक्तीच्या मिसिंग तक्रारीही नाहीत. ती केस दुसऱ्याच पोलीस अधिकाऱ्याला दिली जाते.तो त्या केसचा तपास करीत असतानाच त्याचा दुर्दैवी अपघात होतो आणि केस अरविंदकडे  येते.
अरविंद त्या केसचा तपास करतो आणि काही अनपेक्षित गोष्टी त्याच्या समोर येतात. हे खून कोण आणि का करतंय हे त्याला समजते .पण यात काही धक्कादायक गोष्टी ही असतात .
कोण आहे खरा खुनी ? का करतोय तो असे खून ?
अनपेक्षित शेवट असलेली, चकित करणारी तपास कथा .
प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे.

Saturday, June 14, 2025

mercy for none

Mercy for none
मर्सि फॉर नॉन
ज्यांना प्रचंड रक्तपात , हाणामारी आवडते त्यांना ही कोरियन सिरीज नक्की आवडेल.
नाम गी जून एका माफिया गॅंगचा प्रमुख  मारेकरी आणि चेयरमनचा विश्वासू.पण ती गॅंग सोडून आता त्याला अकरा वर्ष झालीत. त्यात तो पायाने अधू आहे. आता त्याचा लहान भाऊ त्या गॅंगमध्ये आघाडीवर आहे.
कोरियात दोन प्रमुख माफिया टोळ्या आहेत. त्या दोन्ही टोळ्या एकत्र करून त्यावर राज्य करायचे असे काहींच्या मनात आहे आणि त्यासाठीच एक प्लॅन बनविला जातो ज्यात नाम गी जूनच्या भावाची हत्या होते.
आपल्या भावाची हत्या होताच नाम गी जून पेटून उठतो आणि त्याचा बदला घेण्याचे ठरवितो.अकरा वर्षानंतर तो पुन्हा गुन्हेगारी विश्वात परत येतो आणि दोन्ही गॅंगच्या मागे जातो.
ही सिरीज रक्तपाताने भरलेली आहे .यात प्रत्येक भागात प्रचंड हाणामारी आहे . सर्व गुंड सूट बूट आणि टाय घालूनच हाणामारी करतात .ते पिस्तुल वापरत नाही फक्त चाकू सुरे एकमेकांच्या शरीरात घुसवतात. यातील हिरो पन्नास लोकांशी एकटाच लढतो .
ही  रक्तरंजित सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Monday, June 9, 2025

स्टोलन

Stolen
स्टोलन 
रमण बन्सलची फ्लाईट चुकली म्हणून तो ट्रेनने यायचे ठरवितो .पठाणकोट रेल्वे स्टेशनला तो उतरणार असतो.मध्यरात्री येणारी ट्रेन थोडी लेटच आहे .त्याचा भाऊ गौतम बन्सल स्टेशनला  घ्यायला आलाय .दुसऱ्या दिवशी दिल्लीतील एका हॉटेल मध्ये त्यांचा घरगुती कार्यक्रम आहे .
झुम्पा मुंबईहून तान्ह्या बाळाला घेऊन  आलीय .  रात्र खूप झालीय म्हणून स्टेशनवर झोपली .पण तिचे बाळ कोणीतरी पळविले.त्या बाळाचे टोपरे रमणच्या हातात मिळाले म्हणून रमणवर आरोप केला .पोलिसांनीही रमणवर संशयित म्हणून पाहिले. पण रमणने एका बाईचे वर्णन केले .कदाचित तिनेच ते बाळ पळविले असावे.
गौतम त्या भानगडीतून स्वतःची आणि रमणची सुटका करू पाहतोय पण पोलीस त्यांना सोडत नाही .झुम्पाची दया येउन रमण तिला त्या बाईला शोधायला आपल्या सोबत घेतो .
झुम्पा ,रमण आणि चिडलेला गौतम त्या बाईच्या शोधात निघतात आणि सुरू होतो  एक थरारक  प्रवास .ह्या प्रवासाची गौतम झुम्पा आणि रमणने कल्पना ही केली नव्हती .
आता त्यांना बाळाचा शोध नंतर आधी स्वतःचा जीव वाचवायचा आहे .
कोण आहे या सर्वांच्या मागे ?? 
त्या स्टेशनवरून आधीही तान्ही बाळे चोरीला गेलीत.
एका गैरसमजातून सुरू झालेले हे अपहरण नाट्य एका वेगळ्याच वळणावर येऊन पोचते.
अभिजित बॅनर्जी सारखा तगडा अभिनेता गौतमच्या प्रमुख भूमिकेत आहे. शुभम वर्धन रमण आणि मीया मएलझेर झुम्पाच्या भूमिकेत आहेत.
चित्रपट ह्या तीन प्रमुख पात्रांभोवती  मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत फिरतो.
चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे .

Friday, June 6, 2025

मिसिंग यू

Missing You
मिसिंग यू
कॅट डोनोवन हुशार पोलीस अधिकारी .तिचे वडील ही पोलीस अधिकारी होते.अकरा वर्षांपूर्वी त्यांचा खून झाला आणि खुनी आता तुरुंगात शेवटच्या घटका मोजतोय. ज्या दिवशी खून झाला त्यानंतर तिचा होणारा नवरा जॉश ही गायब झालाय. 
सध्या ती एका हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेतेय .त्याच दरम्यान ती वरिष्ठांच्या नकळत वडिलांच्या खुन्याला तुरुंगात जाऊन भेटते तेव्हा तो आपण पैश्यासाठी खुनाचा आरोप अंगावर घेतला असे सांगतो. त्यात अचानक डेटिंग अँपवर तिला जॉश दिसतो.
ब्रेडन एकोणीस वर्षाचा मुलगा कॅटकडे मदत मागायला आलाय.त्याची आई गायब झालीय.तिच्या नवीन मित्रासोबत फिरायला जातेय असे ब्रेडनला सांगून गेलीय पण आता तिचा फोन लागत नाही. तिचा मित्र हा कॅटचा मित्र जॉश आहे असे ब्रेडन सांगतो.
हादरलेली कॅट या गोष्टीचा तपास करायला सुरुवात करते आणि अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात.ती नको त्या गोष्टीचा तपास करतेय म्हणून तिला सस्पेंड केले जाते तरीही ती हार मानत नाही .
शेवटी एक अनपेक्षित सत्य तिच्यासमोर येते.
ही रहस्यमय वेगवान तपासकार्याची सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Monday, June 2, 2025

Thudarum

Thudarum
थुदारम
बेंझ पूर्वी चित्रपटात फाईट मास्तर होता.आता तो बायको, मुलगा आणि मुलीसह  छोट्या गावात राहतोय.त्याच्याकडे जुनी अँम्बसीटर गाडी आहे.ती गाडी तो टॅक्सी म्हणून वापरतो .लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि छोट्या प्रवासासाठी वापरतो.त्या गाडीवर त्याचे खूप प्रेम आहे. 
एक दिवस मुलाचे मित्र ती गाडी चालवतात म्हणून तो मुलावर खूप रागावतो . तो गाडी दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये देतो पण दुसऱ्या दिवशी  पोलीस ती गाडी जप्त करतात .गॅरेजवाला त्यातून गांजा घेऊन जाताना गाडी पकडली असे पोलीस इंस्पेक्टर बेनी त्याला सांगतो आणि गाडी सोडण्यास नकार देतो.
बेंझ सिनियर इंस्पेक्टर जॉर्जकडे जातो तेव्हा जॉर्ज गाडी त्याच्या ताब्यात देतो पण काही ठिकाणी आम्हाला सोड अशी विनंती करतो.मग जॉर्ज बेनी आणि कॉन्स्टेबल सुदेश त्याच्या गाडीतून जंगलाच्या आत जातात आणि गाडीच्या डिकीतून एक प्रेत काढून जंगलात पुरतात . या गोष्टीची कुठेही वाच्यता करायची नाही असे बेंझला बजावतात.
हादरलेला बेंझ सकाळी घरी येतो तेव्हा मुलगा अजून घरी आला नाही असे त्याची पत्नी सांगते. जॉर्ज पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार करतो .
त्या रात्रीच्या जोरदार पावसात डोंगर खचतो आणि त्यातूनच एक पोत्यात बांधलेले प्रेत पोलिसांना सापडते.
कोणाचे आहे ते शव ? बेंझला मुलाचे सत्य कळेल का ? अपराधी पोलिसांना शिक्षा मिळेल का ?
सुरवातीला विनोदी वाटणारा हा चित्रपट पुढेपुढे गंभीर वळण घेत जातो आणि शेवटी अंगावर काटा आणतो .
मोहनलाल बेंझच्या प्रमुख भूमिकेत आहे .सुरवातीला साधाभोळा आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा,  पोलिसांसोबत फिरताना घाबरट आणि सत्य कळल्यावर पेटून उठणारा बेंझ मोहनलालने छान रंगविला आहे तर शोभनाने त्याची पत्नी म्हणून उत्तम साथ दिली आहे .
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.