Monday, March 16, 2026

द डे ऑफ द जॅकल

द डे ऑफ द जॅकल
फ्रेडरिक फोरसाईथ
अनुवाद ..स्वाती देशपांडे 
मेहता पब्लिशिंग 
फ्रांसचे अध्यक्ष चार्लस डी गॉलने अल्जेरियाला स्वातंत्र्य दिले तेव्हाच काही लष्करी अधिकारी चिडले होते.त्यांना आपल्या सैन्याने दिलेल्या बलिदानाचा तो अपमान वाटला होता आणि त्यातूनच सिक्रेट आर्मी ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. गॉल यांची हत्या करून पुन्हा अर्जेंटिना आपल्या ताब्यात घ्यायचा हेच त्यांचे ध्येय होते.
अध्यक्ष दि गोल यांच्या हत्येचे प्रयत्न ओएएस करत राहिली पण प्रत्येक वेळी ते प्रयत्न नाकाम झाले.शेवटी असा एक व्यावसायिक मारेकरी शोधायचा जो हे काम यशस्वी करेल आणि यात प्रचंड गुप्तता राखली जाईल . ओएएसच्या फक्त तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती होती.त्यांनी द जॅकल हे नाव मारेकऱ्याला दिले. 
आता जॅकल पुन्हा कोणालाच भेटणार नव्हता. ठरलेली रक्कम विशिष्ठ बँकेत भरली जाताच त्याचे काम सुरू झाले. दि गॉल यांची सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक आहे . ती भेदणे अशक्य आहे .कुठेतरी काही सेकंद अध्यक्ष उघड्यावर येतील आणि एकाच गोळीने त्यांना मृत्यू येईल असा प्लॅन जॅकलला बनवायचा आहे .त्यासाठी उत्तम प्लॅन आणि तितकीच उत्कृष्ठ बंदूक हवी.
पण पोलिसांना काहीतरी सुगावा लागलाय. अध्यक्षांच्या जीवाला धोका आहे .पण कुठे आणि कसा हेच कळत नाही .त्याचा तपास सुरू आहे .
प्रचंड कडेकोट बंदोबस्तात असलेल्या गॉलला मारण्यात जॅकल यशस्वी होईल का ?
गॉडफादर इतकीच गाजलेली ही कादंबरी इंग्रजी साहित्यात आपले वेगळे स्थान राखून आहे.यावरील चित्रपट ही प्रसिद्ध आहे.
फोरसाइथ यांचा हा जॅकल इतका प्रसिद्ध झाला की पुढे अनेक चित्रपटात त्याचे नाव घेऊ लागले.

फतेह

फतेह
Fateh
भारतात एक सरकारी संस्था आहे जी बेनामी आहे.तिचे एजंटही बेनामी आहेत.फतेहसिंह हा त्यातील एक .देशासाठी त्याने अनेक घातकी कामगिऱ्या पार पाडल्या आहेत.आता तो ही निवृत्त होऊन पंजाबमधील एका छोट्या गावात डेअरी सुपरविझरचे काम करतोय.
निमरीत ही त्याच्या शेजारी राहणारी तरुण मुलगी.तिचे मोबाईल शॉप  आहे.पण ती गावातील लोकांना खाजगी कंपनीद्वारे कर्ज देण्याचे काम करते. पण लोकांचे कर्ज फिटत नसते.यात काही मोठा घोटाळा आहे हे तिच्या लक्षात येते आणि ती दिल्लीला येते.
पण तिथे ती गायबच होते. फतेह सिंह यात लक्ष घालतो तेव्हा हा मोठा सायबर घोटाळा आहे हे त्याच्या लक्षात येते. रजा ,सत्यप्रकाश अशी मोठी माणसे यात गुंतलेली आहेत.
फतेहला पुन्हा आपले कॉन्टॅक्ट वापरून हे प्रकरण उघडकीस आणायचे आहे.याकामी त्याला खुशी मदत करते .पण दुर्दैवाने तेच यात अडकले जातात.
फतेहसिंह पुन्हा आपले जुने रूप धारण करून सर्वाना शिक्षा देईल का ? 
फतेहसिंहला पाहताना डेंझल वॉशिंग्टनच्या  इक्विलायझरची आठवण येते.
सोनू सूदने फतेहसिंहची मुख्य भूमिका केली आहे .तोच चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

Friday, February 27, 2026

द डे ऑफ द जॅकल

THE DAY OF THE JACKAL
द डे ऑफ द जॅकल
ज्यांनी फ्रेडरीक फोरसिथची सुप्रसिद्ध कादंबरी द डे ऑफ द जॅकल वाचली आहे आणि त्यावरील चित्रपट पाहिला आहे त्यांना ही सिरीज पहायची उत्सुकता असणारच. पण पाहिल्यावर थोडी निराशा नक्की होईल. मूळ कादंबरीतील जॅकल हा एकटा आणि सर्वाना अनोळखी आहे.तो कोणताच पुरावा मागे ठेवत नाही .त्याला बघितलेला कोणीच जिवंत राहत नाही.
जॅकला हा आंतरराष्ट्रीय मारेकरी आहे.त्याला मागितलेली किंमत दिली आणि नाव सांगितले की तो आपले काम पूर्ण करतोच.तो आपल्याला पाहिजे तसे शस्त्र बनवून घेतो. तो स्वतः उत्कृष्ट स्नायपर आहे. कामगिरी नसेल तेव्हा तो आपल्या पत्नीसोबत आणि एका वर्षाच्या मुलांसोबत सुखाने संसार करतोय.त्याच्या पत्नीला आपला पती नक्की काय करतो ते माहीत नाही.
एका प्रसिद्ध राजकीय नेत्याला ठार मारण्याची सुपारी जॅकलला मिळते. नेमकी तीच बातमी बियांका पुलमान या कृष्णवर्णीय महिलेला मिळते.बियांका ही MI6 ची हुशार अधिकारी आहे. कोण मरणार कोण मारणार हे तिला माहीत नाही पण हत्या होणार याची तिला कल्पना आहे.जॅकल या कामासाठी विशिष्ठ बंदूक तयार करण्याची ऑर्डर आपल्या नेहमीच्या माणसाला देतो. बियांका त्याच माणसाच्या मागावर आहे.
बियांका हत्या होण्याआधीच जॅकला पकडेल का ?
आपला पती काय करतो हे जॅकलच्या पत्नीला कळेल का ??
सिक्युरिटी मधून पास होणारी गन कशी असणार ??
हा एक थरारक शोध आहे .
जिओसिनेमावर ही सिरीज इंग्लिश भाषेत आहे.-

seven dials

Seven Dials
सेवन डायल्स
अगाथा ख्रिस्तीची कथा म्हटल्यावर ही सिरीज पाहणे मस्ट .विशेष म्हणजे ही सिरीज फक्त तीन भागात संपते.
हा काळ 1920 ते 1925 चा आहे. 
त्या मोठ्या श्रीमंत घरातील पार्टीत लेडी इलिनचा मित्र मृतावस्थेत आढळतो आणि डॉक्टर ती आत्महत्या आहे असे जाहीर करतो. तो नेहमीच गाढ झोपतो म्हणून त्याच्या मित्रांनी आठ घड्याळे गजर लावून ठेवलेली असतात तरीही तो उठत नाही.
ही आत्महत्या नसून खून आहे असा संशय लेडी इलिनला येतो आणि ती त्यादिशेने तपास सुरू करते. या तपासात तिला सेवन डायल संघटनेची माहिती मिळते.या संघटनेने खून केला आहे असा संशय तिला असतो .या तपासात तिला अनेक धक्कादायक गोष्टी कळतात आणि यामागचा सूत्रधार कोण आहे हे कळताच ती हादरून जाते.
अगाथा ख्रिस्तीने नेहमीप्रमाणे अनपेक्षित वळणे आणि धक्कादायक घटना यात मांडल्या आहेत.अगाथा ख्रिस्तीच्या वाचकांना या गोष्टीची जाणीव आहे म्हणूनच ते पडद्यावर द एन्ड आल्याशिवाय उठत नाहीत.
एक खिळवून ठेवणारी रहस्य कथा आपल्याला फक्त तीन भागात पाहायला मिळेल.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत ही सिरीज आहे.

खाकी

खाकी ..द बंगाल चाप्टर
Khakee : The Bengal Chapter
नीरज पांडेंची कलाकृती आहे म्हणजे त्यात वेगळेपणा असणारच आणि ती पाहायलाच हवी.या सिरीजमध्येही त्याने आपल्याला निराश केले नाही.
खाकीचा हा दुसरा सीजन पहिल्या सीजनप्रमाणेच थरारक आणि डावपेचांनी भरलेला आहे.पण एक प्रामाणिक पोलीस अधिकारी काय करू शकतो हे खाकीमध्ये पाहायला मिळते.
शंकर उर्फ बाघा कोलकत्ताचा डॉन .अर्थात सत्ताधारी पार्टीचा वरदहस्त त्याच्यावर आहेच. कोलकात्यातील प्रत्येक काळ्या धंद्यात त्याचा सहभाग आहे. गुन्हेगारीवर  नियंत्रण ठेवण्यासाठी एसआयटी प्रमुख म्हणून सप्तर्षी सिन्हाची नेमणूक होते.सिन्हा प्रामाणिक आणि कायद्यानुसार वागणारा पोलीस ऑफिसर आहे.तो बागाच्या ठिकाणावर धाड मारायचे सुरू करतो. म्हणून बाघाचे  विश्वासू साथीदार रणजित आणि सागोर तालुकदार  बागाच्या विरोधात जाऊन सिन्हाची हत्या करतात.
सगळे पोलीस आता बागाच्या मागे लागतात.  सत्ताधारी पक्षाचा आमदार बरून रॉय बाघाच्या जागी सागोर आणि रणजितला नेमतो. इकडे सिन्हाच्या जागी अर्जुन मैत्राची नियुक्ती होते. तो बागाचे एन्काऊंटर करतो . पण बंगालची गुन्हेगारी आता सागोर आणि रणजितच्या हातात आहे आणि त्यांना मदत करायला बरून रॉय आहे. सागोरला सत्ताधारी पक्षाचे तिकीट मिळालाय.
ही गुन्हेगारी वाढत जाणार हे लक्षात घेऊन अर्जुन एक वेगळाच डाव खेळतो आणि याची कल्पना काही मोजक्याच ऑफिसर्सना असते.
अर्जुन यात यशस्वी होईल ?? बंगालमधील रणजित आणि सागोरचे गुन्हेगारी वर्चस्व संपुष्टात येईल.
आठ भागाची ही सिरीज पाहताना आपल्या अंगावर काटा येतो.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत ही सिरीज आहे.-

कोर्ट

Court
कोर्ट 
चंद्रशेखर वय वर्षे 19  एका वॉचमनचा मुलगा. तो रस्त्यावर सिम कार्ड विकतो .बारमध्ये बियरचे प्रमोशन करतो .बाईकवरून फिरतो.त्याचे वडील त्याला चांगले शिक्षण घे म्हणून मागे लागले असतात पण तो ऐकत नाही.
त्याचवेळी जबीली त्याच्या प्रेमात पडते. ती अल्पवयीन असून कॉलेजमध्ये जाते. तिचे घराणे मोठे आहे.आजोबा प्रतिष्ठित व्यक्ती तर काका राजकारणी आणि गहू फॅक्टरीचा मालक.त्याला आपली प्रतिष्ठा महत्वाची आहे.
जबीली आणि चंद्रशेखरच्या संबंधाची त्याला कल्पना येते आणि आपले वजन आणि पैसे वापरून तो चंद्रशेखरला तुरुंगात टाकतो. 
एक प्रसिद्ध वकील दामू त्याच्या साथीला आहे. दामू आपले डावपेच वापरून चंद्रशेखरला जामीनही मिळवून देत नाही.उलट तो त्याच्यावर पोस्कॉ कायदा लावतो.
आज साधारण 78 दिवस झाले .चंद्रशेखर तुरुंगात आहे.चार दिवसांनी त्याचा निकाल आहे.निकाल त्याच्याविरुद्ध आहे हे निश्चित झालेय.
त्याचवेळी चंद्रशेखरच्या वडिलांना एक वकील अडव्होकेट मोहन रावला भेटण्याचा सल्ला देतो.शेवटचा प्रयत्न म्हणून ते मोहन रावकडे जातात.
अडव्होकेट सुर्या तेजा मोहन रावचा ज्युनियर वकील.तो हुशार आहे पण उतावळा आहे.तो ही केस ऐकून घेतो आणि मोहन रावला सांगतो. या केसमध्ये काही होणार नाही असे सांगून ते नकार देतात तेव्हा त्यांच्या नावावर ही केस स्वतः लढायची असे सुर्या तेजा ठरवितो.
सोमवारी निकाल सांगायच्या आधी तो आपले वकीलपत्र सादर करतो आणि केस लढायची तयारी करतो. 
पोस्को सारख्या कायद्याखाली अटक केलेल्या चंद्रशेखरला सुर्या तेजा सारखा नवखा कोर्टात पहिल्यांदाच उभा राहिलेला ज्युनियर वकील दामूसारख्या अनुभवी वकिलाला टक्कर देईल का ?
एक थ्रिलर कोर्टरूम ड्रामा पाहायचा असेल तर नेटफ्लिक्सवर कोर्ट हिंदी भाषेत नक्की पहा.

फुल ब्लॅक

फुल ब्लॅक ….ब्रॅड थॉर
अनुवाद ...बाळ भागवत 
मेहता पब्लिशिंग हाऊस
गुप्तहेर जगतात अनेक मोहिमा सुरू असतात.काही अति संवेदनशील असतात त्यांचे अस्तित्व कोणीही मान्य करीत नाही इतकेच नव्हे तर देशातील प्रमुख नेत्यालाही त्याची काहीच कल्पना नसते .त्याच फुल ब्लॅक असतात.
अमेरिकेतील संरक्षण मंत्रालयाने कार्लटनला खाजगी गुप्तहेर संघटना स्थापन करण्याची मंजुरी दिलीय.एफबीआय आणि सीआयए यांच्यात अंतर्गत वाद चालू आहेत ,लाल फितीचा कारभार भरपूर आहे त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्याना खूप त्रास होतोय आणि म्हणूनच ही खाजगी गुप्तहेर संघटना आहे. शोधा, गाठा आणि संपवा हे त्या संघटनेचे प्रमुख ध्येय आहे. नेव्ही सील 6 चा निवृत्त सैनिक स्कॉट हॉवर्थ त्या संघटनेचा प्रमुख एजंट आहे.
काही संघटना अमेरिकेच्या विनाशावर टपलेल्या आहेत. हॉलिवूड निर्माता एक शॉर्ट फिल्म काढतोय त्यात आर्थिक दहशतवाद हा प्रमुख विषय आहे पण ती फिल्म पूर्ण होण्याच्या आधीच त्यांच्यावर भाडोत्री सैनिकांचा हल्ला होतो .योगायोगाने तो वाचतो आणि मित्रांसोबत परागंदा होतो.
स्कॉट हॉवर्थ  उपसालाचा एक दहशतवादी तळ नष्ट करतो त्यातून त्याला अजून काही माहिती मिळते.अमेरिकेत एकाच दिवशी अनेक ठिकाणी हल्ले होणार आहेत.ते हल्ले फक्त एकदाच होणार नसून कधीही कोणत्याही दिवशी होतील आणि प्रत्येक हल्ला वेगवेगळ्या स्वरूपात असेल .
कार्लटन आणि स्कॉटला हे हल्ले थांबवून त्यामागचा प्रमुख शोधून त्याला ठार मारायचे आहे.पण ते इतके सोपे असेल का ? 
हेरगिरी ,कारस्थाने ,क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी ही कथा 
Bullet Train Explosion
बुलेट ट्रेन एक्सप्लोजन
बुलेट ट्रेन 5060B  शिन ओमोरी ते टोकियो मध्ये प्रवास करते. तशी 325 किलोमीटर प्रति तास तिचा वेग आहे. त्या दिवशी तीने प्रवासाला सुरवात केली आणि टोकियो मुख्यालयात ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला .जर ट्रेनचा स्पीड 100 किलोमीटर प्रति तासापेक्षा कमी झाला तर बॉम्ब फुटेल अशी सूचना केली गेली.
सारी यंत्रणा खडबडून जागी झाली . 
एकाही प्रवाश्याला न गमावता यातून मार्ग कसा काढता येईल हे पहायचे असेल तर तुम्हाला श्वास रोखून हा चित्रपट पहावा लागेल .
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Wednesday, February 25, 2026

द ब्लफ

The Bluff
द ब्लफ
कॅप्टन कॉनर समुद्री लुटेरा . त्याचे सोने इरसेल बोडन लुटून नेते आणि एका बेटावर आसरा घेते.तिथेच ती लग्न करते आणि आपल्या पती तिथ ,अधू मुलगा इसाक आणि नणंद एलिझाबेथ सोबत सुखाने राहतेय.  खरे तर तीही अनेक देशांना हवी असलेली एक समुद्री लुटारु आहे . तिच्या पराक्रमाच्या गोष्टी आजही समुद्री चाचाच्या मनात भीती उत्पन्न करतात.
बेटावर तिने आपल्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली आहे. तिचे काही जुने सहकारी आता त्या बेटावरचे रहिवासी झालेत.
एक दिवशी कॅप्टन कॉनर तिच्या पतीला ताब्यात घेतो आणि त्याच्याकडून तिचा ठावठिकाणा कळतो .तो आपली माणसे घेऊन बेटावर हल्ला करतो .
आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी इरसेल पुन्हा आपला जुना अवतार धारण करते .शेवटी ती ह्या बेटावरची वाघीण आहे.तिला प्रत्येक गुहा ,भुयारे आणि जंगल पाठ आहे. आता ती कॅप्टन कॉनरशी जुने वैर आठवून एका भयानक संहार करायला सिद्ध झालीय.
प्रियांका चोप्राने हॉलीवूडमध्ये स्वतःची एक्शन गर्ल म्हणून एक यशस्वी इमेज तयार केली आहे.आता ती एकट्याच्या जीवावर चित्रपट तोलून धरते. तिच्या विरुद्ध द बॉयस या सुप्रसिद्ध मालिकेतील कार्ल अर्बन उभा आहे. संपूर्ण चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. प्रियांका चोप्राचे एक्शन सीन अप्रतिम आहे.
चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, February 21, 2026

साऊथ बाय जावा हेड

साऊथ बाय जावा हेड
अलिस्टर मॅक्लीन
अनुवाद ... अशोक पाध्ये
मेहता पब्लिशिंग हाऊस
पाने..378
दुसऱ्या महायुद्धात जपान आघाडीवर होता.त्यांनी पूर्व गोलार्धातील समुद्रावर आपली पकड घट्ट केली होती.हळूहळू ते सिंगापूरही ताब्यात घेत होते.सिंगापूरमधील प्रत्येक इमारत ,समुद्रावरील जहाजे , वृद्ध, तरुण ,लहान मुले ठार करत होते. आता तर सिंगापूरमधून बाहेर पडणे अशक्यच झाले होते.
बिग्रेडियर जनरल फार्नहोमला काहीही करून ऑस्ट्रेलियाला पोचायचे आहे आणि त्यासाठी तो वाटेल ती किंमत द्यायला तयार आहे.त्याचे कारण ही तसेच आहे . त्याच्याकडे असे काही पुरावे आहेत जे योग्यवेळी ऑस्ट्रेलियाला पोचली नाहीत तर  जपान तो देशच नष्ट करेल.
वीस ते पंचवीस जखमी आणि मानसिकदृष्ट्या खचलेली सैनिकांची तुकडी  आपल्या संरक्षणासाठी आश्रय शोधत होती.त्यांनाही माघार घेण्याची ऑर्डर दिली होती .कोणत्याही परिस्थितीत  त्यांना सिंगापूरमधून  बाहेर पडायचे होते.
दोन नर्स आणि एक दोन वर्षांचा अनाथ मुलगा तिथे अडकून पडले होते .त्यांनाही सिंगापूरमधून बाहेर पडायचे आहे.
शेवटी द केरी डान्सर नावाचे छोटे जहाज त्यांना घेऊन जायला तयार झाले.हे सर्व जीवावर उदार होऊन सिंगापूरमधून बाहेर पडले .दुर्दैवाने जपानी हवाई दलाने त्या जहाजावर हल्ला केला.जहाज बुडण्याच्या बेतात असताना विरोमा ह्या तेलवाहू जहाजाने त्यांना वाचविले.
विरोमा एक बारा हजार टनी  मोठी बोट होती . फ्रँसिस फाईडहॉर्न हा तिचा कॅप्टन होता. हे जहाज ब्रिटिश कंपनीचे होते. निकोलसंन  त्या जहाजावर चीफ ऑफिसर म्हणून काम करत होता.
द केरी डान्सर जहाजवर जे जिवंत राहिले होते त्यांना घेऊन विरोमा पुढे निघाली पण ते जपान्यांच्या नजरेतून फार काळ लपू शकणार नव्हते.
विरोमाचा खडतर प्रवास आता कुठे सुरू झालाय. ह्या अफाट समुद्रावर जिथे फक्त जपानी आरमार आणि हवाई दलाचे राज्य आहे तिथे किती काळ लपून राहून प्रवास करतील ?
एक असा जीवघेणा प्रवास जो क्षणाक्षणाला मृत्यूच्या दाढेत नेतोय .नजर जाईल तिथपर्यंत फक्त समुद्र ,खायला अन्न नाही पिण्यास पाणी नाही ,अर्धे लोक जखमी तर काही भ्रमिष्ट होण्याच्या स्थितीत असलेले .
हे सर्व सुखरूप आपल्या मुक्कामावर पोचतील का ??
ही जीवघेणी भयानक समुद्र सफर तुम्हाला अनुभवायची असेल तर नक्की वाचा.

Monday, January 19, 2026

Kalamkaval

Kalamkaval
कलांकवल
इंस्पेक्टर जयकृष्णन एका केसवर काम करताना त्याला त्यासंबंधित काही अनपेक्षित गोष्टी कळतात. केरळ आणि तामिळनाडू राज्यात काही स्त्रिया बेपत्ता झाल्या आहेत.या सर्व स्त्रिया विधवा, घटस्फोटीत आणि बिनलग्नाच्या वयाने मोठ्या स्त्रिया आहेत. यासर्व घरातून स्वखुशीने बाहेर पडल्या होत्या असे प्रथमदर्शनी दिसून येते.जयकृष्णन हुशार अधिकारी आहे त्याला बाझ या टोपणनावाने ओळखले जाते.
या बेपत्ता असलेल्या सर्व स्त्रियांचा खून झालाय हे त्याच्या लक्षात येते . तो या प्रकरणाचा  तपास सुरू करतो.
खरे तर यात खुनी कोण हे आपल्याला सुरवातीलाच कळते. तो खून कसे करतो हेही आपल्याला दिसते पण तो कोण आहे हे कळताच आपण हादरून जातो.
इन्स्पेक्टर स्टॅनली दास तामिळनाडू पोलीस क्राईम ब्रँचला आहे.त्याला या प्रकरणाची बऱ्यापैकी माहीती आहे  म्हणून जयकृष्ण त्याला सोबतीला घेतो .
केरळमधून बेपत्ता झालेल्या स्त्रिया तामिळनाडूमध्ये असल्याचे पुरावे सापडतात तर तामिळनाडूमधील स्त्रिया केरळमध्ये असल्याचा संशय असतो.
एक श्वास रोखून धरणारा खुनी आणि पोलीसांचा उंदीर मांजराचा खेळ अतिशय रोमांचक होत जातो.
सोनी लिव्हवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहेत.
इन्स्पेक्टर स्टॅनली दासच्या अफलातून भूमिकेत मामूटी आहे तर त्याच्या विरोधी शांत पण अचूक खेळ खेळणारा जयकृष्णन  विनायकनने रंगविला आहे.
खरे तर याविषयावर एक वेब सिरीज आणि एक साऊथ चित्रपट ही आलेला आहे पण त्यामुळे पुढे काय होणार हे बघणाऱ्याला कळते.
मामूटी असल्यामुळे थोडी मांडणी वेगळी आहे आणि त्याचे चित्रपट पाहायला मजाच येते.

Monday, January 12, 2026

टार्गेट

टार्गेट
डेव्हिड बॅल्डासी
अनुवाद...डॉ. चंद्रशेखर चिंगरे 
बिल रॉबि आणि जेसिका रिल सीआयएला नकोसे झालेले एजंट. प्रत्यक्षात ते दोघेही फिल्डवर सर्वोत्कृष्ट आहेत. उत्तर कोरियात अमेरिकेचे एक ऑपरेशन फसते.यात जनरल पाक उत्तर कोरियातील सर्वोच्च नेत्याचा उजवा हात मानला जाणारा सामील असतो.पण फसलेल्या ऑपरेशनमुळे तो उघडा पडतो.त्याला फ्रान्सहून अमेरिकेत आणायची कामगिरी त्यांच्यावर पडते पण त्यांच्यापुढ्यात जनरल पाक आत्महत्या करतो आणि माझ्या कुटुंबियांना वाचवा असा निरोप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाना देतो.
आता जनरल पाकच्या कुटुंबाला उत्तर कोरियातील छळछावणीतून सुखरूपपणे आणायची कामगिरी पुन्हा रॉबि आणि रिलवर येते. ते यात यशस्वी होतील का ?? 
उत्तर कोरियात हुकूमशाही आहे.तिथे शिरणे आणि बाहेर पडणे अमेरिकन लोकांसाठी अवघड आहे.बिल आणि रीलला जमेल ?
चुंग चा उत्तर कोरियातील छळ छावणीतून एक प्रशिक्षित मारेकरी बनून बाहेर पडली आहे. सर्वोच्च नेत्याच्या आदेशावरून हत्या करायची हे तिचे काम.बिल आणि रिल जनरल  पाक जवळ होते हे उत्तर कोरियाला कळले होते.यामागे अमेरिका आहे हेही त्यांना कळले आहे .अमेरिकेला सर्वात मोठा धक्का देण्याचे त्यांनी ठरविले आणि या कामी चुंग चा निवड केली .चुंग चा ने बिल आणि रीलला ठार मारायचे असा आदेश दिलाय.
चुंग चा आपल्या कामगिरीत यशस्वी होईल ?
दोन देशातील सर्वोत्तम एजंटच्या या जीवघेण्या खेळात कोण बाजी मारेल ?
अमेरिका उत्तर कोरियाचा कट उधळून लावेल का ?
एक थरारक कादंबरी

Friday, January 9, 2026

स्मृती पालवी

स्मृती पालवी
अनिल हरि देशपांडे 
साहित्यसंपदा प्रकाशन
आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक आठवणी जाग्या होतात.जणू त्या आठवणींना नव्याने पालवी फुटत असते.किती छोट्या छोट्या असतात ह्या आठवणी .त्यावेळी आपण नेहमीच्या वापरातील आहेत म्हणून फारसे लक्ष देत नाही पण नंतर किती सुंदर आहेत असे समजून जातो.
अनिल देशपांडे यांचा हा ललित कथासंग्रह वाचताना आपल्याही अश्याच आठवणी आहेत हे जाणवते पण आपण त्या लिहू शकलो नाही याचे नक्कीच वाईट वाटते.लेखकाने लिहिणे किती सोपे असते हे या कथासंग्रहातून आपल्याला शिकवले आहे त्याबद्दल त्याचे आभारच मानले पाहिजे.
अतिशय सोप्या सरळ भाषेत त्यांनी या आठवणी मांडल्या आहेत.साधारण पंचेचाळीस कथा ह्या संग्रहात आहे आणि प्रत्येक कथा आपल्या सर्वांच्या आठवणींशी संबंधित आहे.
यातील कथा फार मोठ्या नाहीत. साधारण दोन ते तीन पानात कथा संपते पण वाचताना आपण त्यात रमून जातो आणि हे माझ्याही बाबतीत घडलंय याची जाणीव होते. 
पहिला पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात येतो .काहीजणांना तो त्रासदायक असतो तर काही लोकांसाठी आनंददायी .पण तो लिहून काढणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही .लेखकाने ते केलंय. प्रत्येकजण कोणत्यातरी वाहनाने प्रवास करतो लेखकाची एक सायकल होती.त्या सायकलची आठवण या पुस्तकानिमित्ताने लिहिली गेलीय.वस्तू तर सर्वांच्या कधी ना कधी हरवल्या असतील पण त्या सापडल्यावर होणारा आनंद आणि वस्तू परत करणाऱ्याचे उपकार त्यांनी वस्तू हरवली माणुसकी सापडली या लेखात शब्दबद्ध केली आहे.
चहा, काठी म्हातारपणीची, जेष्ठ नागरिक दिवस, कल्हईवाला, पहिला आंबा आशा अनेक गोष्टीतून ते आपल्याला ही आठवणीत घेऊन जातात.आपण वाचताना आपल्याच आठवणीत रमतो.
अनिल देशपांडे सरांनी स्मृती पालवी  लिहून वाचकांना  एक वेगळीच सफर घडवून आणलीय  हे निश्चित.

Thursday, January 8, 2026

इको

Eko
इको
संरक्षण आणि नियंत्रण कधीकधी एकसारखेच दिसतात.यातच इकोचा गर्भितार्थ दडला आहे.
ती उंच टेकडीच्या माथ्यावर डोळ्यावर दुर्बीण ठेवून समोर लक्ष ठेवणारी मलेशियन म्हातारी .गूढ नजरेने तिच्याकडे पाहणारा तो तरुण आणि मागे  डोळे रोखून पाहणारी ,जगातून नामशेष होत चाललेली मलेशियातील खतरनाक कुत्र्याची जात.
ही कथा आहे कुरियचनच्या शोधाची .
कुरियचन कोण आहे ? 
कुरियचन एक उत्कृष्ट डॉग ट्रेनर अर्थात कुत्रांचा शिक्षक आणि हाडाचा शिकारी आहे.केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर त्याची साधारण दीडशे एकर जमीन आहे. तो नेहमीच उत्कृष्ट कुत्र्यांच्या जातीच्या शोधात आहे. त्यासाठी तो दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान मलेशियातही गेला होता .मलेशियातील एका माणसाकडे शिकारी कुत्र्याची जात आहे जी आता नष्ट होत चालली आहे .कुरियचन त्यासाठी तिथे जातो आणि अपघाताने त्याच्या पत्नीला मलाथीला घेऊन भारतात येतो.
मलाथी आता वृद्ध झालीय.ती त्या जंगतील सर्वात मोठ्या टेकडीवर  एकटीच राहतेय.काही महिन्यांपूर्वी शहरात राहणाऱ्या तिच्या मुलाने पियुसला तिची काळजी घेण्यासाठी पाठविले आहे.पियुस साधारण पंचवीस वर्षाचा तरुण आत्मीयतेने मलाथीची काळजी घेतोय.  घरात मलाथी ,पियुस आणि काही कुत्रे राहतात .ते कुत्रे जणू मलाथी आणि घराचे रक्षण करतायत .हे तेच मलेशियातील नामशेष होणाऱ्या उत्कृष्ट जातीचे कुत्रे आहेत.
अनेक जण कुरियाचनचा शोध घेतायत . पोलिसांना तो गुन्हेगार म्हणून हवाय तर काहीजण त्याला वैयक्तिक कारणासाठी शोधतायत. तो मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.त्याला मलाथी सोडून अजून दोन बायका आहेत.
पण त्याला शोधणाऱ्यांचा अपघाताने किंवा इतर कारणाने मृत्यू होतायत. अगदी आठ महिन्यांपूर्वी कुरियचनचा खास मित्रही कुत्र्याला घेऊन त्याला शोधायला आला होता पण दरीत पडून त्याचा मृत्यू झाला.
शेवटपर्यंत कुरियचनचा शोध लागत नाही. पण त्यामागची कारणे आपल्याला हळूहळू समजू लागतात .
हा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत गूढपणे आपल्याला गुंतवून ठेवतो.अतिशय घनदाट असे केरळ कर्नाटकातील जंगल सुंदर आहे पण तितकेच भीतीदायक आहे. कथेमध्ये कुत्र्यांचा वापर प्रभावीपणे केला आहे किंबहुना कुत्रेच चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.
मेघालयातील कलाकार बियाना मोमीनने वृद्ध मलाथीची भूमिका शांतपणे केली आहे. सौरभ सचदेवने कुरियाचन आणि संदीप प्रदीपने पियुसची भूमिका प्रभावीपणे केली आहे.
जागेवरून हलू न देणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Friday, January 2, 2026

कॅशहिरो

Cashero
कॅशहिरो
सुपरहिरो म्हटला की अफाट ताकदीचा चपळ दुष्टांचा संहार करणारा डोळ्यासमोर येतो .होय, कांगसांग ऊंग हा असाच एक सुपरहिरो आहे .त्याला ही सुपर पॉवर वडिलोपार्जित मिळाली आहे पण ती पॉवर त्याला खिश्यात पैसे असले तरच वापरता येईल.जितके जास्त पैसे तितकी जास्त पॉवर. तो जसजशी पॉवर वापरतो तसतसे त्याच्या खिशातील पैसे कमी होत जातात आणि त्यापैश्याचे रूपांतर चिल्लर नाण्यात होते.
मुळात कांगसांग ऊंग साधा तरुण आहे जो आपल्या किंग मिंग सुक प्रेयसी सोबत सुखी संसाराचे स्वप्न बघतोय .पण आता सुपर पॉवर अंगात असल्यामुळे जनतेची सेवा करायची आहे आणि त्यासोबत खिशातील पैसे ही गमवायचे आहेत.
पण अशी सुपर पॉवर  असलेला कांग सांग ऊंग एकटा नाहीय. बँग युन मी ही एक तरुणी आहे जीला बन खाल्यावर सुपर पॉवर येते आणि ब्येऑन हो हा वकील आहे ज्याच्याकडे दारू प्यायल्यावर पॉवर येते.
जो ऍन च्या वडिलांना अश्या सुपर हिरोची पॉवर काढून घ्यायची आहे.त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे.जो ऍन आपल्या वडिलांना त्यासाठी मदत करतेय.आता ती कांग सांग ऊनच्या मागे लागली आहे.
खिश्यात पैसे नसताना कांग सांग ऊन त्यांच्याशी लढू शकेल का ?
अतिशय सुंदर सर्व कुटुंबांनी सोबत बसून पहायची ही फँटसी सिरीज हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

विदेशी गुप्तहेर कथा

विदेशी गुप्तहेर कथा ....पंकज कालुवाला
परम मित्र पब्लिकेशन 
गुप्तचर विभाग अर्थात हेरगिरी हा प्रत्येक देशाचा प्रमुख पाया असतो.पुरातनकाळापासून राजे महाराजांनी आपले राज्य टिकविण्यासाठी हेरगिरीचे जाळे सभोवती विणले होते.आर्य चाणक्यानी हेरगिरी कशी करावी ?हेर कसा असावा ? याची माहिती चाणक्यनितीत दिली आहे.
पंकज कालुवाला सरांचा आतंरराष्ट्रीय राजकारण आणि हेरगिरी या विषयांचा दांडगा अनुभव आहे.त्यांची हेरगिरीवर आधारित बरीच पुस्तके प्रकाशित झालीय. त्यातही त्यांचे इस्त्रायलच्या मोसादवर जास्त प्रेम आहे असे दिसून येते.
या कथासंग्रहात एकूण दहा कथा आहेत त्यात साधारण आठ कथा मोसादच्या आहेत.खरे तर इस्त्रायल देश स्थापन झाल्यापासूनच त्यांना सभोवती असलेल्या शत्रूंपासून सतत सावध राहावे लागते. जगातील सर्व अरब राष्ट्रांनी उघडपणे इस्त्रायलशी शत्रुत्व घेतले आहे आणि त्यामुळे साहजिकच मोसादला नेहमी सावध राहून शत्रूच्या देशविरोधी कारवाया हाणून पाडावी लागतात.
एखाद्या हेराला पकडताना काय काळजी घ्यावी लागते ,किती सहनशीलता लागते आणि कसे सापळे लावावे लागतात याचे बारीक वर्णन लेखकाने केले आहे. एखादी मोहीम यशस्वी करताना टेक्निकल ,नैसर्गिक अडचणी याचाही विचार करावा लागतो आणि प्रसंगावधान वापरून मोहीम पार पाडावी लागते हे ऑपरेशन नोहाज आर्क .२ आणि ऑपरेशन रुस्टर मध्ये दाखविले आहे.
आपल्या सैन्यातील बंडखोर सैनिकांना अलेक्झांडर कसे शोधून काढतो हे अलेक्झांडरचा कावा याकथेत रंजकपणे लिहिले आहे.
कालुवाला सरांची भाषा अतिशय सोपी असल्यामुळे हेरगिरीतील क्लिष्ट शब्द सहज समजून येतात.
हेरगिरी आणि साहस कथा आवडणाऱ्या वाचकांना हे पुस्तक आवडेल याची खात्री आहे.