Eko
इको
संरक्षण आणि नियंत्रण कधीकधी एकसारखेच दिसतात.यातच इकोचा गर्भितार्थ दडला आहे.
ती उंच टेकडीच्या माथ्यावर डोळ्यावर दुर्बीण ठेवून समोर लक्ष ठेवणारी मलेशियन म्हातारी .गूढ नजरेने तिच्याकडे पाहणारा तो तरुण आणि मागे डोळे रोखून पाहणारी ,जगातून नामशेष होत चाललेली मलेशियातील खतरनाक कुत्र्याची जात.
ही कथा आहे कुरियचनच्या शोधाची .
कुरियचन कोण आहे ?
कुरियचन एक उत्कृष्ट डॉग ट्रेनर अर्थात कुत्रांचा शिक्षक आणि हाडाचा शिकारी आहे.केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर त्याची साधारण दीडशे एकर जमीन आहे. तो नेहमीच उत्कृष्ट कुत्र्यांच्या जातीच्या शोधात आहे. त्यासाठी तो दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान मलेशियातही गेला होता .मलेशियातील एका माणसाकडे शिकारी कुत्र्याची जात आहे जी आता नष्ट होत चालली आहे .कुरियचन त्यासाठी तिथे जातो आणि अपघाताने त्याच्या पत्नीला मलाथीला घेऊन भारतात येतो.
मलाथी आता वृद्ध झालीय.ती त्या जंगतील सर्वात मोठ्या टेकडीवर एकटीच राहतेय.काही महिन्यांपूर्वी शहरात राहणाऱ्या तिच्या मुलाने पियुसला तिची काळजी घेण्यासाठी पाठविले आहे.पियुस साधारण पंचवीस वर्षाचा तरुण आत्मीयतेने मलाथीची काळजी घेतोय. घरात मलाथी ,पियुस आणि काही कुत्रे राहतात .ते कुत्रे जणू मलाथी आणि घराचे रक्षण करतायत .हे तेच मलेशियातील नामशेष होणाऱ्या उत्कृष्ट जातीचे कुत्रे आहेत.
अनेक जण कुरियाचनचा शोध घेतायत . पोलिसांना तो गुन्हेगार म्हणून हवाय तर काहीजण त्याला वैयक्तिक कारणासाठी शोधतायत. तो मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.त्याला मलाथी सोडून अजून दोन बायका आहेत.
पण त्याला शोधणाऱ्यांचा अपघाताने किंवा इतर कारणाने मृत्यू होतायत. अगदी आठ महिन्यांपूर्वी कुरियचनचा खास मित्रही कुत्र्याला घेऊन त्याला शोधायला आला होता पण दरीत पडून त्याचा मृत्यू झाला.
शेवटपर्यंत कुरियचनचा शोध लागत नाही. पण त्यामागची कारणे आपल्याला हळूहळू समजू लागतात .
हा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत गूढपणे आपल्याला गुंतवून ठेवतो.अतिशय घनदाट असे केरळ कर्नाटकातील जंगल सुंदर आहे पण तितकेच भीतीदायक आहे. कथेमध्ये कुत्र्यांचा वापर प्रभावीपणे केला आहे किंबहुना कुत्रेच चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.
मेघालयातील कलाकार बियाना मोमीनने वृद्ध मलाथीची भूमिका शांतपणे केली आहे. सौरभ सचदेवने कुरियाचन आणि संदीप प्रदीपने पियुसची भूमिका प्रभावीपणे केली आहे.
No comments:
Post a Comment