एकटेपणा
आज ऑफिसला निघायला थोडा उशीरच झाला .एकदा वेळ चुकली की पुढचे सगळेच गणित बिघडते हा आतापर्यंतचा अनुभव होताच.आता नेहमीची लोकल चुकणार , पुढे बस चुकणार ऑफिसचा लेटमार्क पडणार , ह्या गोष्टी होणारच होत्या म्हणून आता आरामातच जाऊ असा विचार करीत अण्णाच्या टपरीवर चहासाठी थांबलो.
"काय भाऊ आज उशीर झाला का "? थोडा ओळखीचं आवाज कानावर येताच चमकलो आणि वळून पाहिले तर मागे अनिकेत सिगारेट पीत उभा होता.
अनिकेत माझ्याच विंगमध्ये भाड्याने राहायला आला होता .त्याचे गाव किंवा कुटुंबाविषयी माहिती नव्हती. कधी कधी जिममध्ये जाताना दिसायचा तर कधी रात्री उशिरा बाहेर पडताना दिसायचा.पण पाहिल्यावर ओळखीचा हात दाखवायचा. त्याच्याकडे पाहून बॅचलर लाईफ छानपैकी उपभोगतोय असे वाटते.
"आज इथे "? मी थोड्या आश्चर्याने विचारले.
" मी यावेळी इथेच असतो .आज तुम्हाला उशीर झाला बहुतेक ."हातातली सिगारेट ऑफर करीत तो म्हणाला .
मी नम्रपणे नकार देत माझ्या हातातील कटिंग त्याला दिली.
आम्ही बाकड्यावर बसून गप्पा मारू लागलो.त्यातून कळले अनिकेत साधारण सदतीस वर्षाचा होता.मुंबईत एका मल्टी नॅशनल कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाला होता .
एका छोट्या शहरातून तो मुंबईत बदलीवर आला होता.तीन चार वर्षांनंतर पुन्हा प्रमोशनवर बदली होऊन दुसरीकडे जाईल असे म्हणत होता.
मी हातातील सिगारेटकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तसा हसला ."टाईमपास . कधी कधी कंटाळा आला की एखादी ओढतो.तर महिन्यातून एकदा ड्रिंक.एकटाच राहत असल्यामुळे कधी कधी एकटेपणा वाटतो तेव्हा यांची साथ घ्यावी लागते .असे त्याचे म्हणणे.
"लग्न कधी करणार "? मी सहज स्वरात विचारले.तसा तो गंभीर झाला .
सहा वर्षे झाली तो लग्नासाठी प्रयत्न करतोय पण काही गोष्टी जुळून येत नाहीत असे सांगून गप्प बसला. अशीच एक दोन वर्षे निघून गेली की पुढे लग्न जुळणारच नाही याची खात्री होती त्याला .
"भाऊ सगळे प्रकार आजमावले मी .सगळ्या अँपवर माझे नाव आहे .मूळ गावात मोठे घर आहे .तिथे आईवडील राहतात.लग्न झाले की तिथेच बदली नंतर प्रमोशन न घेता बायको आणि आई वाडीलांसोबत तिथेच राहीन .पण बऱ्याच मुलींना ते पसंत नाहीय .काहींना वेगळेच राहायचे तर काहींना स्वतःचे शहर सोडायचे नाही ,काहींना त्यांच्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी असलेला हवाय. तर काहींना काही काळ लिव्ह इन राहून पुढे लग्न करायचे की नाही हे ठरवायचे आहे. एकूण काय आता लग्न या गोष्टीवर विश्वास उडत चाललाय त्याचा.
" भाऊ , आता ठीक आहे हो .आईवडील , भाऊ बहीण सोबतीला आहेत.पण हे किती दिवस चालणार .आईवडील जिवंत आहेत तो पर्यंत ते माझी आणि मी त्यांची काळजी घेईन.भाऊ बहीण उद्या स्वतंत्र राहतील.पण हे असे पुढे एकटे राहणे कठीण होणार आहे.त्याच्या बोलण्यातून भविष्याची चिंता स्पष्ट दिसत होती.
एकटेपणा आज ना उद्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणार हे नक्की .पण ज्यांना कुटुंब आहे त्यांच्या आयुष्यात फार काळ नसतो ज्यांना कुटुंब नाही त्यांच्यासाठी मोठा आणि भीषण असतो .
मला अनिकेतविषयी वाईट वाटले.इतका सरळ साधा मुलगा पण लग्न होत नाही म्हणून दुःखी .यावर काहीतरी उपाय काय ? असा विचार करताना अचानक केके आठवला .
केके उर्फ कमलाकर कदम हा माझा जुना मित्र .त्याच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर उपाय आहे असे तो म्हणतो आणि बऱ्यापैकी ते खरे आहे. याचा अनुभव मी घेतला आहे.अनिकेत आणि केके ची एकदा भेट घडवून आणावी असे मी ठरविले आणि अनिकेत पटकन तयार झाला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी अनिकेतला घेऊन केकेच्या ऑफिसमध्ये शिरलो. दहा बाय दहा च्या खोलीत केकेने ऑफिस थाटले होते. खोलीत एक टेबल ,समोर चार खुर्च्या कोपऱ्यात पाण्याचा माठ होता. केके नेहमी सारखा लॅपटॉप समोर ठेवून बसला होता.
मला पाहताच "काय भाऊ !अशी नेहमीप्रमाणे आरोळी ठोकली आणि अनिकेतला आमचे संबंध कसे आहेत हे स्पष्टपणे दाखवून दिले.
त्याने ऑफर केलेली सिगारेट मी नम्रपणे नाकारून अनिकेतची ओळख करून दिली आणि अनिकेतने त्याचा प्रॉब्लेम सांगितला. त्याचे ऐकत असताना केके मध्येच निराशेने मान हलवत होता.थोडक्यात केके कडे ही उपाय नाही असेच दिसत होते.
"अनिकेत , मी लग्न जुळवत नाही आणि माझ्या अनुभवाने तुझे लग्न जुळले थोडे कठीण आहे. हल्ली लग्न जुळवताना दोन्हीकडून बऱ्याच अपेक्षा असतात. उच्च शिक्षणामुळे दोन्ही बाजूला चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असतात पण आपल्यावर समोरचा वरचढ होऊ नये ,अपेक्षा ठेवू नये असेच त्यांना वाटते . मुलींना पारंपरिक कामे करायची नसतात तर मुलांना ती आपल्या अधिकारात राहावी असे वाटत असते."
" थोडक्यात ह्याचे लग्न होणार नाही असे तुझे म्हणणे आहे तर" ? मी चिडूनच विचारले.
" अरे भाऊ ,चिडू नकोस .मी सत्य सांगितले.पुढे मिलेळही कोणीतरी याला अपेक्षित असणारी मुलगी" केके हसत म्हणाला.
" बरे मला सांग ,तुला लग्न का करायचे आहे "? केके थोडा सिरीयस होऊन म्हणाला. "हे बघ भारतीय समाज व्यवस्था ,लग्न संस्था , यावर बोलू नकोस ,स्पष्ट उत्तर दे" केकेने अनिकेतला विचारले .
" का म्हणजे ? एक कुटुंब असावे ,साथीदार असावी जीच्यापाशी मोकळेपणाने बोलता येईल ,सुख दुःख शेयर करता येईल ,शारीरिक सुख मिळेल.आई वडिलांची काळजी घेईल .मूल जन्माला घालून कुटुंब वाढविता येईल. एकमेकांची काळजी घेण्यासाठी आजारपणात साथ देण्यासाठी आणि मुख्य म्हणजे दोन कुटुंबे एकत्र येऊन नातेवाईल मित्र मंडळी वाढतील ." अनिकेतने उत्तर दिले.
" मग त्यासाठी लग्नच करायला हवे का "? केके नवीन सिगारेट पेटवित म्हणाला.
" अरे उद्या तो आजारी पडला तर कोण बघेल त्याला ? त्याला मनातील काही बोलायचे असेल तर कोणाशी बोलेल. आपल्याला मूल असावे असे प्रत्येकाला वाटते त्यालाही वाटत असेल . शारीरिक गरज कुठे पूर्ण करेल तो ?" मी पुन्हा चिडून म्हणालो.
" थांब तू बोलू नकोस " .मला हाताने इशारा करीत केके म्हणाला ." माझ्याकडे लग्नासाठी कोणी मुलगी नाही पण मी दुसऱ्या मार्गाने याच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतो.याची मदत करू शकतो .अर्थात यासाठी पैसे पडणारच ."
" झाले ,इथेही तुझा धंदा सुरूच " मी हात जोडीत म्हणालो.
" काय हरकत आहे ? चला तुम्ही प्रश्न विचारा. मी उत्तर देतो ". केके टेबलवर हात मारीत म्हणाला .
" ठीक आहे . उद्या ह्याला सकाळी पाच वाजता उठून बाहेरगावी जायचे आहे .त्याला सकाळी उठवून चहा नाश्ता हवाय .कपडे इस्त्री करून हवेत.आता तो काय करेल ."
" मिळेल . तुम्ही मनात आणा ते तुम्हाला मिळेल त्यासाठी बायको कशाला हवी ? हा एक नंबर आहे तिथे फोन कर .रात्री एक माणूस तुझे इस्त्रीचे कपडे घरून घेऊन जाईल. तुला सकाळी काय काय हवेय ते विचारेल.सकाळी पाच वाजता तुझ्या घराची बेल मारेल , दरवाजा उघडशील तेव्हा गरम चहा आणि नाश्ताचे पार्सल, इस्त्रीचे कपडे हातात देऊन जाईल.तुला आंघोळ घालायची असल्यास तीही घालेल .चालेल तुला" .केकेने एक नंबर त्याच्या हातात देऊन सांगितले.
" ते सर्व ठीक पण शारीरिक सुखाचे काय "? मीही टेबलवर हात मारून विचारले .
" याच नंबरवर फोन करून पाहिजे ते सांगायचे तुझ्या इच्छेप्रमाणे स्त्री पुरुष मिळतील." पुन्हा केके शांतपणे म्हणाला .
" काहीही काय , केके तू चक्क धंदा करू लागलास." मी चिडलो.
" अरे नाही रे .ह्या अनिकेतला जश्या गरजा आहेत तश्या समाजात काही स्त्रिया मुलीना ही आहेत ज्या असा प्रॉब्लेम फेस करतायत .मी फक्त त्यांना एकत्र आणतो.अरे भाऊ मी एक कंपनी चालवतो." केके हसत म्हणाला
" म्हणजे "
" हे बघ परदेशात जसा इमर्जन्सीसाठी एक नंबर असतो तसा माझ्या कस्टमरला मी एक नंबर देतो .ह्या नंबरवर तुम्हाला पाहिजे त्या सेवा मिळतील .अगदी पाहिजे त्या " केके हसत म्हणाला.आता अनिकेतसोबत मीही आश्चर्यचकित झालो.
" समजा मी आजारी पडलो किंवा अपघात झाला तरी मला मदत मिळेल का ? मी कुतूहलाने विचारले.
" होय ,तुम्हाला कोणतीही मदत मिळेल.तुम्ही योग्य चार्ज भरून एका फॉर्ममध्ये आपली माहिती अपलोड करायची .यात तुमचे आधार पॅन कार्ड असतीलच पण वजन , उंची , रक्त गट आणि इतर माहिती असेल .इमर्जन्सी म्हणून तुम्हाला हाच मोबाईल नंबर द्यावा लागेल.उद्या तुम्हाला अपघात झाला तर या नंबरवर फोन केला तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उत्तम उपचार केले जातील.चोवीस तास आमचा माणूस तुमच्याजवळ बसून असेल .तुम्हाला गप्पा मारायला मैत्रीण हवी असेल तर तीही तुम्हाला मिळेल. पण या सर्व गोष्टींना पैसे पडतील." केके हात वर करून म्हणाला.
" भाऊ , खरे तर ही कंपनी वृद्धांसाठी सुरू केलीय.त्यांच्याशी गप्पा मारायला .मेडिकल मदत करायला.त्यांना फिरायला घेऊन जायला. सर्व गोष्टींसाठी एकच कॉन्टॅक्ट असावा म्हणून सुरू केली.पण हल्ली काही विधुर ,घटस्फोटीत ,सिंगल व्यक्तींनी ही सेवा घेण्यास सुरुवात केली आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे."
" पण यासाठी लागणारे मनुष्यबळ कोठून आणतोस ? मी नेहमीचा प्रश्न विचारला.
" आपल्याकडे पोरांची कमी आहेत का ? आणि यासाठी फार शिक्षणाची गरज नाही. आम्ही योग्य ते शिक्षण त्यांना देतो आणि स्मार्ट फोन तर सर्वांना वापरता येतो.फक्त मेहनत करण्याची तयारी पाहिजे." केके चहाचा घोट घेत म्हणाला.
" अनिकेतराव तुम्ही आमची सेवा घ्या .तुम्हाला गप्पा मारायला ,जेवायला कंपनी पाहिजे तर सांगा .काय सांगावे त्यातील एकीशी तुमची मैत्री होईल आणि कदाचित लग्न ही होईल .पण नाही झाले तरी गरजेच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू याची खात्री मी देतो." असे बोलून त्याने माहितीपत्रक अनिकेतला मेल केला.
केके तुझ्या डोक्यात काय काय येईल ते सांगता येणार नाही पण ज्यांच्याकडे पैसे आहेत पण सोबतीला माणूस नाही अश्यांसाठी हे खूपच उपयोगी आहे.धन्य आहेस तू .मी हात जोडून मनापासून केकेला धन्यवाद दिले.
अनिकेत केकेची सेवा नक्की घेणार यात काहीच शंका नव्हती.
No comments:
Post a Comment