बेबी डू डाय डू
त्या दोघी जुळ्या बहिणी होत्या. वय साधारण बारा वर्षे. मात्र, त्यांपैकी एक बहीण मूकबधिर होती. दोघीही झोपडपट्टीत राहायच्या. शाळा सुटल्यानंतर इकडे-तिकडे फिरत, मजेत वेळ घालवत त्या घरी परतायच्या.
बेबी मूकबधिर असल्यामुळे तिच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी, यासाठी तिच्या बहिणीने तिच्या पायाला एक छोटीशी घुंगराची घंटी बांधली होती. तिच्या आवाजावरून बेबी कुठे आहे, हे बहिणीला समजायचे.
एके दिवशी शाळा सुटल्यानंतर दोघी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडल्या. शहरातील एक मोठे पंचतारांकित हॉटेल अर्धवट बांधून बंद पडले होते. त्या दिवशी त्या दोघी तिथे गेल्या. मात्र, तिथे काही वेगळेच नाट्य घडत होते. बुरखा घातलेली एक व्यक्ती एका माणसाचा खून करत होती. योगायोगाने त्या व्यक्तीची नजर बेबीवर पडली आणि ती तिच्या मागे लागली. मात्र, बेबीच्या जुळ्या बहिणीला त्याने पकडले आणि तिचा गळा दाबून खून केला.
या घटनेला आता बरीच वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, बेबीच्या बहिणीचा खून करणारा मारेकरी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
काळाच्या ओघात बेबीचे आयुष्य पूर्णपणे बदलले. ती आता एक व्यावसायिक सुपारी किलर बनली आहे. ‘पप्पा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीने तिचा सांभाळ केला आणि तिला एक उत्कृष्ट मारेकरी बनवले. आज बेबीच्या हातून कोणतेही सावज सुटत नाही.
सिद्धू हा बेबीचा शेजारी असून संगीत शिक्षक आहे. तो बेबीवर मनापासून प्रेम करतो. दोघेही विवाहबंधनात अडकतात. सिद्धूच्या प्रेमाखातर बेबी आपले हे हिंसक आयुष्य सोडून देण्याचा निर्णय घेते. तिच्या या निर्णयाला पप्पाही संमती देतात.
मात्र, बेबीने नुकताच एका बिल्डरचा खून केलेला असतो. या घटनेमुळे तिचे गुपित उघड होण्याची शक्यता निर्माण होते. ज्याने या खुनाची सुपारी दिलेली असते, तोही बेबीच्या मागावर असतो. अशा परिस्थितीत बेबीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
या सगळ्यांना हुलकावणी देऊन बेबी नव्या आयुष्याची सुरुवात करू शकेल का? तिच्या बहिणीचा खुनी अखेर सापडेल का? तो खुनी नेमका कोण आहे? बेबी आपल्या बहिणीच्या खुनाचा बदला घेऊ शकेल का?
एका मूकबधिर मुलीचा थरारक आणि रहस्यमय प्रवास पाहायचा असेल, तर नेटफ्लिक्सवर हा चित्रपट जरूर पाहा.
या चित्रपटात हुमा कुरेशीने बेबीची भूमिका साकारली आहे. मूकबधिर असल्यामुळे तिच्या व्यक्तिरेखेला संवाद नाहीत. चंकी पांडेने ‘पप्पा’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे, तर सिकंदर खेर मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसतो.
No comments:
Post a Comment