Black Warrant
ब्लॅक वॉरंट
आरोपीला फाशीची सुनवताना न्यायाधीश लेखी आदेश देतो त्याला ब्लॅक वॉरंट म्हणतात .
पहिल्या भागात सुनीलकुमार गुप्ताची जेल अधीक्षक म्हणून इंटरव्ह्यू घेताना जज ब्लॅक वॉरंटवर सही झाल्यावर पेनाची निब का तोडतात ? असा प्रश्न विचारला जातो आणि त्याचे उत्तर आपल्याला सातव्या भागात मिळते.
तिहार जेल भारतातील सर्वात मोठा तुरुंग. इथे दोन हजारपेक्षा जास्त कैदी आहेत, पण त्यांना सांभाळणारा स्टाफ अपुरा आहे .कारण इथे नोकरी करण्याची कोणाचीच इच्छा नाही . इथे नोकरी करणारे अधीक्षक डबल सक्तमजुरीची शिक्षा भोगतात असे म्हणतात. त्यांच्या घरीही त्यांची नोकरी हलकी समजली जाते.
सुनीलकुमार सुशिक्षित बेकार आहे. इथे जागा होती त्याने अर्ज केला .त्याला इंटरव्ह्यूला बोलावण्यात आले.
तो शांत आणि थोडा लाजरा आहे त्यामुळे जेलरसाठी योग्य नाही असेच सर्वांचे म्हणणे आहे. तिहार जेलमध्ये ही त्याला नाकारले जाते.
पण तिथे त्याला फॅशनेबल कपडे घातलेला ,सतत उंची सिगारेट ओढणारा आणि तुरुंगात कोठेही फिरणारा एक परदेशी तरुण मदत करतो आणि सुनीलकुमार गुप्ता तिहार जेलमध्ये सहाय्यक अधीक्षक म्हणून रुजू होतो. तिथे शिवराजसिंह मंगत आणि विपीन दहिया हे दोन तरुणही त्याच्यासोबत जॉईन होतात.पण ते दोघेही धाडसी , रफटफ आहेत. मुख्य अधिक्षक राजेश थोमार त्यांचा सिनियर आहे.
जेलमध्ये आल्यावर गुप्ताला कळते आपल्याला मदत करणारा दुसरा तिसरा कोणी नसून चार्ल्स शोभराज आहे.चार्ल्स शोभराज तिथे ऐशआरामात राहतोय.त्याला हवे ते दिले जातेय .त्याला तुरुंगात कुठेही फिरण्याची परवानगी आहे आणि त्याला स्वतंत्र कोठडी आहे.
तिहार जेल एक मोठे शहरच आहे. तिथे सर्व धंदे चालतात. तिथे फॅक्टरी आहे .त्यात हत्यारेही बनवली जातात.तिथे मोठ्या प्रमाणात दारूही मिळते. ड्रगही पुरविले जाते. तिथे कैद्यांच्या टोळ्या आहेत.त्यागी गॅंग, हड्डी गॅंग ,आणि सरदारजी गॅंग अश्या तीन मोठ्या टोळ्या आहेत.
तिहार जेलमध्ये साप आहेत.जो साप मारेल त्याला शिक्षेत पंधरा दिवसाची सूट मिळते.पण साप कोणी मारला यावरूनही मारामारी होतेच.
तिहार जेलमध्ये एक मोरही आहे असे म्हणतात पण तो क्वचित कोणाला दिसतो.
इथे फाशीची शिक्षा झालेल्याना वेगळ्या कोठडीत ठेवले जाते.तिथे त्यांच्या पायजम्याची नाडीही काढून घेतली जाते. त्यांच्यासाठी काळे कपडे शिवले जातात .मानेचे माप घेतले जाते .चेहरा झाकण्यासाठी खास काळा रुमाल शिवला जातो.फासावर जाणारा शेवटपर्यंत आपल्या प्राणाची भीक मागत असतो.
आज कुप्रसिद्ध गुन्हेगार रंगा आणि बिल्लाला फाशी देणार आहेत. त्याची जबाबदारी सुनीलकुमार गुप्तावर आहे.खटका ओढताच रंगा ताबडतोब मरतो पण बिल्ला बराच वेळ जिवंत असतो.
तुरुंगात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे. जेवणाच्या सामानात भ्रष्टाचार, गोधडी वाटपात भ्रष्टाचार ,कैद्याला भेटायला येणाऱ्या माणसांकडून पैसे उकळले जातात .
JNU चे विद्यार्थी सरकारविरुद्ध घोषणा देतात तेव्हा त्यांना तिहार जेलमध्ये आणले जाते पण दुसऱ्या दिवशी ते शिताफीने पळ काढतात .ते कसे पळाले हे बघण्यासारखे आहे .
तिहार जेलमध्ये चार्ल्स शोभराजला सुनीलकुमार गुप्ता विषयी सॉफ्ट कॉर्नर आहे.अडचणीच्या वेळी तो त्याला मदत करतो.शोभराजला जेलमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची खबर आहे.
शेवटी ती वेळ आलीच .पंतप्रधान इंदिरा गांधीची हत्या झाली आणि त्याचे पडसाद तिहार जेलमध्ये ही उमटले.सरदारजी गॅंग इतर गँगचे लक्ष्य बनले. जेल अधिक्षकांवर हल्ले झाले.थोमारला तर जीवे मारण्याची धमकी मिळाली.
तुरुंगात बंड होणार हे निश्चित .पण सुनीलकुमार गुप्ताच्या नेतृत्वाखाली योजना आखली गेली .पुढे काय ??
ही सिरीज पाहताना तुम्ही तिहार जेलचा एक हिस्सा होऊन जाल. फाशी जाण्याआधी कैद्यांची अवस्था पाहून तुमचा थरकाप उडेल.
सुनेत्रा चौधरी आणि सुनील गुप्ता यांच्या ब्लॅक वॉरंट कादंबरीवर ही सिरीज आहे.
कुणाल कपूरचा मुलगा आणि शशी कपूरचा नातू झहान कपूर या सिरीजचा मुख्य आकर्षण आहे.मोठ्या जबाबदारीने त्याने सुनीलकुमार गुप्ताचे काम केले आहे.
नेटफ्लिक्सवर ही सिरीज हिंदी भाषेत आहे.