या वर्षीची राष्ट्रीय शिक्षण परीक्षा गणेशोत्सव काळातच जाहीर झाली होती.पण त्याचा आशुतोष पराडकरवर काहीच फरक पडणार नव्हता.मागच्या वर्षी परीक्षेचा फॉर्म भरून आल्यावर त्याने बाप्पाच्या पुढ्यात हात जोडले होते आणि वर्षभर फक्त अभ्यास करेन बाकी काहीही करणार नाही तेव्हा मला सांभाळून घ्यायची जबाबदारी तुझीच आहे .लक्ष ठेव असे बोलून मोकळा झाला होता.अर्थात त्यानेही तेव्हा सवयीनुसार तथास्तु बोलून मोकळा झाला होता . त्याचे तथास्तु ऐकून उंदराने मात्र कपाळावर हात मारून घेतला होता .
सर , हे मात्र अति होतेय.वर्षभर अभ्यास करणार असेही बोलतो आणि लक्ष ठेवा ,सांभाळून घ्या ,पास करा असाही दम देतो आपल्याला .नक्की काय म्हणायचे याला.अभ्यास केला तर पास होणारच ना ? हे झेन झी आपल्याला कधी आणि कसे शब्दात अडकवतील सांगता येत नाही .तो दात कोरत म्हणाला.
अरे आशुतोष चांगला मुलगा आहे आणि हुशार ही .तरीही त्याची आपल्यावर श्रद्धा आहे .आणि कोणत्याही परीक्षेला जाताना आपल्याला नमस्कार करून जायची पद्धतच आहे . बोलला असेल तो .त्याला आपल्या आशीर्वादाची गरज भासणार नाही नक्की .आणि तसाही तो फारसा उत्सुक नसतो आपले गुणगान करायला . सोड , आपण आपली तयारी करू .असे बोलून त्याने डोळे मिटले.
खरे तर राष्ट्रीय परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात .यातूनच पुढे चांगल्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होतो. विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करतात आणि यांच्याकडे येऊन आशीर्वाद ही मागतात.हा कोणालाच नाराज करीत नाही सर्वाना तथास्तु बोलून मोकळा होतो..जो मनापासून मेहनत करेल तो पास होणारच .
मंदार कानडे राष्ट्रीय परीक्षेच्या कार्यालयात क्लार्क होता.कनिष्ठ कर्मचारी पदावर असल्यामुळे त्याच्याकडे फारसे कोणी लक्ष देत नसे . वरून साधा आणि भोळा दिसणारा मंदार आतून पक्का बेरकी होता .स्मार्टफोनच्या युगात अजूनही बटनाचा फोन वापरत होता . सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर टेबलावरच्या गणपतीची पूजा करायची आणि मान खाली घालून कामाला सुरवात करायची हाच दिनक्रम .
त्या दिवशीही आल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची पूजा केली आणि हळूच आजचे काम यशस्वीपणे पार पडू दे बाप्पा असे मनात म्हणाला .त्यानेही नेहमीप्रमाणे तथास्तु म्हटले आणि पटकन जीभ चावली.
का ? आता का जीभ चावली ? तो काय करणार आहे ते माहीत आहे ना तुम्हाला ? दिसतो साधा पण काय धंदे करतो ते आपल्याशिवाय कोणालाच माहीत नसेल ." उंदीर चिडून शेपटी आपटत म्हणाला .
अरे लक्षातच आले नाही बघ.कोणी काही मागितले की तथास्तु बोलायची सवय जात नाही बघ .पण याला यावर्षी काहीही करून थांबविले पाहिजे .तो डोळे मिटून विचार करीत पुटपुटला.
होय , मंदार कानडे राष्ट्रीय परीक्षेचे पेपर आधीच काही मोठ्या क्लासेस ला विकायचा धंदा करणार होता .यावर्षी त्याला ही संधी चालून आली होती .कधी नव्हे ती सेफची चावी त्याच्याकडे आली होती .
पेपर फुटणार नाही याची खात्री सर्वाना होती .कारण त्या पेपरचे फोटो काढले तरी आज ना उद्या कळणार होते .झेरॉक्स काढणे ही धोकादायक होते आणि मंदार कानडे साधा फोन वापरत होता आणि त्याने आपले काम सोडून दुसऱ्या कामात लक्ष दिले नव्हते .त्यामुळे संचालक बिनधास्त होते.
मंदार जेव्हा जेव्हा सेफ उघडत होता तेव्हा तो काही प्रश्न आपल्या डायरीत लिहून ठेवत होता .उद्या काही बोंबाबोंब झाली तर कोणताही पुरावा सापडणार नाही अशी काळजी घेत होता. अश्या तऱ्हेने संपूर्ण पेपर लंच टाईमला बाप्पाच्या फोटोसमोरच आपल्या डायरीत लिहून काढला होता.
बघा तुमचा तथास्तु बोलण्याचा परिणाम ? छान ,आपल्या समोरच पेपर लिहून काढतोय. आता हा पेपर विकून लाखो रुपये कमवेल. देवा काहीतरी करा " उंदीर हात जोडत म्हणाला .
अरे मी काय करू ? मी देव आहे जादूगार नाही .मी काही चमत्कार करू शकत नाही " तो आपली सोंड फिरवत मिस्कीलपणे म्हणाला .
संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडताना मंदारने आठवणीने ती डायरी सोबत घेतली . गणेशोत्सव जवळ आल्यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते.हल्ली बरीच मंडळे आठवडाभर आधीच त्याला मंडपात घेऊन येत होते .बाप्पाचा आगमन सोहळा असे बॅनर ठिकठिकाणी लावून जल्लोषात स्वागत करीत होते अर्थात हे त्याला आवडत नव्हते .त्याच्या सुट्टीची चर्चा देवलोकात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत होती.तोही कंटाळला होता पुढे तर आपण इथे यायचे नाही या निर्णयावर येऊन ठेपला होता.
मंदार कानडे घाईघाईत स्टेशनकडे निघाला होता .रस्त्यातच एका बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक चालली होती.भक्तगण मोठ्या उत्साहात नाचत होते .मध्येच एकाने मंदारच्या हातात राजगिर्याच्या दोन लाडूची कागदी पिशवी दिली.बाप्पाचा प्रसाद हातात घेऊन त्याने बाप्पाकडे पाहून हात जोडले आणि क्षणभर का होईना बाप्पा आपल्याकडे बघून हसतोय याचा भास झाला . तो घाईघाईने स्टेशनमध्ये शिरला आणि लोकलने घरी आला .
घरी येताच त्याने हातातील बॅग टेबलवर ठेवील ,बाजूला रस्त्यात मिळालेला बाप्पाचा प्रसाद ठेवला त्याबाजूला आपली महत्वाची डायरी ठेवली आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये शिरला . त्याला फ्रेश व्हायला नेहमीच वेळ लागत होता .यावेळीही त्याने आपला वेळ घेतला आणि बाहेर आला .
बाहेर येताच समोरचे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला .कपाळावर हात मारून त्याने जमिनीवर बसकण मारली आणि रडू लागला .समोरच्या टेबलवर दोन उंदीर राजगिऱ्याचे लाडू आणि त्याची डायरी कुरतडून खात होते .
No comments:
Post a Comment