Saturday, September 5, 2026

NEWTON'S 3RD LAW

NEWTON'S 3RD LAW

न्यूटनचा तिसरा नियम

“प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते.” हा न्यूटनचा तिसरा नियम. हाच नियम आपण केलेल्या कर्मालाही लागू पडतो, असे या चित्रपटातून दाखवून दिले आहे.

चित्रपटात दोन घटना समांतरपणे घडताना दिसतात.

विनयला रात्री तीन वाजता एक फोन येतो. घरात रात्रभर आई-वडिलांचे भांडण सुरू असते. त्या भांडणाला कंटाळून तो फोन घेऊन गच्चीवर जातो आणि गच्चीवरून पडून त्याचा मृत्यू होतो.

या प्रकरणाचा तपास पोलीस ऑफिसर वासुदेव करत असतो. हा मृत्यू आत्महत्या किंवा अपघात नसून खून आहे, असे सिद्ध करून तो विनयच्या वडिलांना अटक करतो.

मात्र, विनयचे वागणेही संशयास्पद असते. तो जास्त दारू प्यायल्यानंतर काही गोष्टी विसरतो. हल्लीच तो घरात एका वस्तूचा शोध घेत असतो; मात्र ती वस्तू त्याला सापडत नाही. त्याचा एकमेव मित्र कार्तिक रोज पब्लिक टेलिफोनवरून त्याला फोन करत असतो. विशेष म्हणजे, विनयच्या मोबाईलवर आलेला शेवटचा फोन कुप्रसिद्ध माफिया मर्क्युरीचा असतो.

मग विनय आणि मर्क्युरीचा नेमका काय संबंध असतो? हा प्रश्न चित्रपट पाहताना सतत मनात राहतो.

दुसरीकडे, ज्योतीचा नवरा विष्णू दुसऱ्या गावात काम करत असतो. त्यांना श्राव्या नावाची छोटी मुलगी असते. विष्णूचा फॅक्टरीत झालेल्या अपघातात मृत्यू होतो. ही बातमी ऐकल्यानंतर ज्योती श्राव्याला घेऊन रात्रीच गावाकडे निघते; मात्र वाटेत तिचाही अपघाती मृत्यू होतो आणि श्राव्या पोरकी होते.

दरम्यान, वासुदेव विनयचे नेमके कोणाशी संबंध होते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. तपासाची दिशा पुढे जात असताना तो कार्तिकला अटक करतो आणि त्यातून एक असे भयानक सत्य समोर येते, ज्याची कल्पनाही आपण केलेली नसते.

२ तास १५ मिनिटांचा हा चित्रपट आपल्याला जागेवरून हलू देत नाही. एकामागून एक घडणाऱ्या अनपेक्षित घटना पाहून आपण अक्षरशः हादरून जातो. चित्रपट जसजसा पुढे जातो, तसतसे नक्की कोणावर विश्वास ठेवायचा, हेच कळेनासे होते.

चित्रपटात जगपती बाबू, रवी वर्मा, श्रीनिवास आणि सुमंत यांसारख्या दमदार कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे.

हा चित्रपट Netflix वर हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

रहस्य, थरार आणि अनपेक्षित ट्विस्ट आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे.

No comments:

Post a Comment