COLLISION COURSE
कोलिजन कोर्स
हा एक वेगळ्याच धाटणीचा स्पॅनिश थ्रिलर चित्रपट आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे कथानक, अनपेक्षित वळणे आणि प्रत्येक प्रसंगामागे दडलेले रहस्य ही या चित्रपटाची वैशिष्ट्ये आहेत.
अर्नेस्टो हा एका बँकेचा मॅनेजर आहे. नेहमीप्रमाणे आजही तो सकाळी लवकर बँकेत येतो. दररोज बँक उघडण्याचे काम तोच करतो. त्यापूर्वी रस्त्यावरील कॉफी शॉपमधून कॉफी विकत घेणे हा त्याचा नित्यक्रम असतो. आजही कॉफी घेत असताना त्याच्या कानावर दोन व्यक्तींचे बोलणे पडते. शहरातील एका व्यक्तीला मोठी लॉटरी लागल्याची ती चर्चा असते. अर्नेस्टो त्याकडे फारसे लक्ष न देता बँकेत येतो.
त्याच्या पाठोपाठ एक वृद्ध गृहस्थ बँकेत प्रवेश करतो. आपल्यालाच मोठी लॉटरी लागल्याचे तो सांगतो. मात्र, त्याच वेळी दोन मुखवटाधारी व्यक्ती बँकेत घुसतात. ते तिघे मिळून अर्नेस्टोला बांधून ठेवतात. त्याच्याकडून कोड मिळवून ३४ क्रमांकाचा सेफ डिपॉझिट लॉकर उघडतात; पण तो लॉकर रिकामा असतो. त्यामुळे नाइलाजाने ते बँकेतील दहा लाखांची रक्कम घेऊन पळ काढतात. बाहेर त्यांचा आणखी एक साथीदार गाडी घेऊन तयार असतो. चौघेही त्या गाडीत बसून पसार होतात.
आता या गाडीत एकूण चार चोर आहेत. पेड्रो हा निवृत्त पोलीस अधिकारी आहे. त्याचा मुलगा राऊलही पोलीस अधिकारी आहे. राऊलची प्रेयसी कार्ला हीसुद्धा पोलीस दलात कार्यरत आहे. तर थॉमस हा कार्लाचा नवरा असून तो फॉरेन्सिक टीममध्ये काम करतो.
थॉमसला संशय असतो की, पेड्रोने ३४ क्रमांकाच्या लॉकरमधील हिरे चोरले आहेत. याच संशयावरून चालत्या गाडीत पेड्रो, राऊल आणि थॉमस यांच्यात जोरदार हाणामारी सुरू होते. त्याच दरम्यान गाडीचा अपघात होतो आणि त्यात पेड्रोचा मृत्यू होतो.
यानंतर चित्रपटात एकामागून एक वेगवेगळे प्रसंग उलगडत जातात. प्रत्येक प्रसंगात राऊल, कार्ला आणि थॉमस यांचा मृत्यू होतो, तर पोलीस इतरांना शिताफीने पकडतात, असे दाखवण्यात आले आहे. मात्र, या चारही प्रसंगांनंतरही एक प्रश्न अनुत्तरितच राहतो. ते हिरे नेमके कोणाकडे आहेत? आणि जे हिरे आहेत, ते खरे आहेत की बनावट?
या सगळ्या घटनांमागे आणखी एक मोठे रहस्य दडलेले असते. या चोरीतील पाचवा चोर स्वतः अर्नेस्टो असतो आणि त्याचा एक सहावा साथीदारही असतो. विशेष म्हणजे, या सहाव्या साथीदाराबद्दल अर्नेस्टोशिवाय इतर कोणालाही माहिती नसते.
चार वेगवेगळ्या प्रसंगांतून कथा पुढे सरकत असताना रहस्य अधिकाधिक गडद होत जाते. प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांच्या मनात नवे प्रश्न निर्माण करतो. या चित्रपटातील प्रत्येक लहानसहान गोष्ट, प्रत्येक कृती आणि प्रत्येक संवाद महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहताना कमालीचे लक्ष द्यावे लागते. एखादा छोटासा तपशीलही कथेला वेगळे वळण देऊ शकतो.
हा चित्रपट पाहताना मराठीतील नाना पाटेकर अभिनीत *'आपला माणूस'* या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कथानक मांडण्याची वेगळी पद्धत आणि प्रसंगांमधून उलगडत जाणारे रहस्य यामुळे दोन्ही चित्रपटांची आठवण एकमेकांशी जोडली जाते.
शेवटी मात्र एकच प्रश्न मनात घोळत राहतो...
ते हिरे नेमके कोणाकडे आहेत? खरे हिरे कोणाकडे आहेत आणि या सगळ्या खेळाचा सूत्रधार कोण आहे?
चित्रपट पाहिल्यानंतरच या प्रश्नांची उत्तरे मिळतील!