प्रलयंकार .....रेखा बैजल
कॉन्टिनैटल प्रकाशन
ज्यूडीथ दहा वर्षाचा असतानाच जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले गेले . हा ज्यू असल्यामुळे त्याच्या कुटुंबाचे खूप हाल झाले . त्याचे आईवडील बॉम्बस्फोटात मारले गेले . मोठी बहीण जगण्यासाठी शरीरविक्रय करू लागली .अजून त्याच्या मागे दोन लहान बहिणी होत्या .शेवटी घराण्यातील एक जण जिवंत रहावा म्हणून त्याच्याआजीने नाईलाजाने त्याला भारतात पाठविले . जहाजावरील कटू अनुभव पचवत तो भारतात आपल्या काकांकडे आला . काकीचे टोमणे खात हॉटेलमध्ये फडके मारू लागला . अवकाशातील ताऱ्यांविषयीच्या आवडीमुळे तो शास्त्रज्ञ झाला . भारतीय मुलीशी प्रेमविवाह केला . शेवटी जर्मनीला जाऊन आपल्या वेड्या आजीला शोधले .आपल्या लहान बहिणींच्या मृत्यूचे दुःख पचविले . मोठ्या बहिणीचा संसार पाहिला . दुसऱ्या महायुद्धात हिटलरने केवळ 60 लाख ज्यू मारले नाहीत तर 60 लाख पिढ्या संपवून टाकल्या .
Tuesday, December 19, 2017
प्रलयंकार .....रेखा बैजल
काजळमाया ......जी. ए. कुळकर्णी
काजळमाया ......जी. ए. कुळकर्णी
पॉप्युलर प्रकाशन
जी.ए. चा नेहमीप्रमाणेच शैलीदार कथासंग्रह.एकूण चौदा कथा या संग्रहात आहेत.काहीश्या गूढ आणि उत्कंठावर्धक.पण काही कथा फारच हळुवारपणे पुढे सरकतात.उत्कंठा वाढवत शेवटच्या ओळीपर्यंत वाचकाला घेऊन जायचे ही जी. ए.ची सवय कधी कधी कंटाळा आणते.थरारक आणि गतिमान वाचायची सवय असलेल्या वाचकांना हा कथासंग्रह फारसा आवडणार नाही . पण एकूण जी. ए. प्रेमींना आवडणारा हा कथासंग्रह आहे .
Monday, December 18, 2017
एकटी
माझ्या फेसबुकवरील फ्रेंडच्या मुलीने तिच्या भावना व्यक्त केल्या .त्या त्यांनी मला शेअर केल्या . मला त्या खूप आवडल्या आणि मी त्या मराठीत भाषांतर केल्या . तुम्हालाही त्या आवडतील अशी आशा आहे .
"तू उद्या जाणार आहेस ना.. ?? चल आज आपण बाहेर जाऊ .मी छोटा भीमचा एपिसोड सोडून देतो". माझा छोटा नऊ वर्षाचा भाऊ बोलत होता .
एकुलती एक मुलगी असल्यामुळे मी एकटीच असायची .माझ्या वयाची जवळची अशी चुलत भावंडेही नव्हती . त्यामुळे एकटीनेच खाणे ,ऐशआरामात जगणे नित्याचेच झाले होते .
पण हा छोटा नटखट माझ्या आयुष्यात नवीन उर्मी घेऊन आला .आम्ही पाच ते सहा दिवस एकत्र राहिलो . पण त्यातही छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणेच भरपूर केली आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या संधी शोधत राहिलो .
तो नऊ वर्षाचा होता .मी माझ्या आजीकडे दोन दिवसासाठी राहायला आले होते.मागाच्यावेळेपेक्षा ही भेट काहीशी वेगळीच होती . यावेळी त्यांच्यातील बदल जाणवला मला .तो मला त्याचे चॉकलेट देत होता .माझ्याबरोबर त्याच्या आवडीचे टिव्ही शो सोडून फिरायला येत होता .
पण सगळ्यात सुंदर गोष्ट...... जेव्हा आम्ही संध्याकाळी फिरून घरी आलो आणि मी पुढे काय करायचे हे ठरवीत असतानाच हा छोटू मॅगीने भरलेला बाउल घेऊन समोर उभा राहिला आणि काहीही न विचारता एक घास माझ्या तोंडात भरविला .पहिला घास भरवून म्हणतो "अजिबात लाजू नकोस .हे मी आपल्या दोघांसाठीच आणले आहे .माझ्यातले तुला देणे फार आवडते मला .
तुम्हाला आता वाटेल यात काय मोठी गोष्ट आहे ..?? पण एक मुलगी.. जीला आतापर्यंत भाऊ बहिणीचे प्रेम काय ते माहीतच नाही. तिच्यासाठी फारच मोठी गोष्ट होती ती.त्याची ही छोटीशी गोष्ट माझ्या डोळ्यात पाणी आणण्यास पुरेशी ठरली.माझे डोळे पुसत तो माझ्या कुशीत शिरला .कदाचित ह्यालाच आनंद म्हणत असतील का ?? उद्या संध्याकाळी मी घरी असेंन पण भरलेले हृद इथेच ठेवून जाणार आहे .
Thursday, December 14, 2017
डिजिटल लग्न
व्हाट्सअँपवर अग्निहोत्रीसाहेबांच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण पाहून मी थोडा चकित झालो.ते माझे बॉस. त्यामुळे रोजचा संबंध.असे असूनही डिपार्टमेंटमध्ये सगळ्यांना व्हाट्सअँप वरून आमंत्रण देणे थोडे विचित्रच वाटत होते.त्यात माझे आणि त्यांचे संबंध खूप जुने आणि घरचे . निदान मला तरी त्यांच्याकडून पत्रिकेची अपेक्षा होती.थोडा नाराज होऊनच मी त्यांना केबिन मध्ये भेटायला गेलो.
मला पाहताच ते खुश झाले."या भाऊ !!.बसा..आमंत्रण मिळाले ना ..?? लग्नाला नक्की या.
मी म्हटले "हो साहेब ....आताच मेसेज आला तुमचा .पण पत्रिका छापल्या नाहीत का ...?? आपण डिपार्टमेंटमध्ये पत्रिका लावतो.नेहमीची पद्धत आहे आपली.
"वाटलेच तुम्ही विचारणार मला" ते थोडे गंभीर झाले. "भाऊ आम्ही रियाचे लग्न डिजिटल करायचे ठरविले आहे... ???
" काय ....?? डिजिटल लग्न ..?? ही काय भानगड आहे ...?? मी आश्चर्यचकित होऊन विचारले.
"आम्ही एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले आहे .संपूर्ण लग्न डिजिटल पद्धतीने होईल. तू जर मेसेज नीट पाहिलास तर तुला मेसेजमध्ये लिंक दिसेल . त्या लिंकवर तू क्लीक केलेस तर तुला काही प्रश्न विचारण्यात येतील त्या तू हजर राहणार का.. ? किती माणसे येणार.?नाही हजर राहणार तर तुझा ऍड्रेस... घरात किती माणसे आहेत ..??असे प्रश्न असतील . तू मुलीकडून असलास तर मुलीचा बँक अकाउंट नंबर.तिच्या घरचा ऍड्रेस असेल".
"हे सर्व कशासाठी.."??मी उत्सुकतेने विचारले.
"याची बरीच कारणे आहेत.काहीजणांना वेळ नसतो.काही आयत्यावेळी प्लॅन बदलतात.काहींना गर्दी .वाट पाहणे पसंद नसते .आता तू प्रत्यक्ष हजर राहणार असे तिथे नोंद केलेस तर तुम्ही सांगाल तितक्या माणसांचे जेवण ठेवण्यात येईल . अशा प्रकारे माणसांचे जेवण ठरविणे सोपे जाईल .काहीजणांना रांगेत उभे राहून आहेर देणे पटत नाही .त्यामुळे वेळ खूप जातो .म्हणून तुमचा आहेर तुम्ही डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करू शकता .काहीजणांना आहेर द्यायचा असतो पण प्रत्यक्ष हजर राहायला जमणार नसते तेव्हा त्यांनी आहेर दिला की ताबडतोब त्यांच्या घरी जेवणाचे पार्सल जाईल याची ही व्यवस्था केली आहे.
"ते कसे बुवा ...?? माझी उत्सुकता काही संपत नव्हती.
"त्या कंपनीने जी लिंक तयार केली आहे ती वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरशी जोडली आहे . तुम्ही हजर नाही राहणार असे लिहून दिले असेल आणि तरीही तुम्ही ऑनलाइन आहेर दिलात की त्याचे नोटिफिकेशन जेवणाच्या कॉन्ट्रॅक्टरला जाईल . तो तुमचा ऍड्रेस पाहून आणि किती माणसे आहेत हे पाहून जेवण तुमच्याघरी पार्सलने पाठवेल .दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण लग्न सोहळा या लिंक वरून तुम्हाला ऑनलाइन दिसेल.तुम्ही लग्न ऑनलाइन बघता आहात हे ही आम्हाला कळेल आणि त्याची नोंद होत जाईल.त्यासाठी हॉलमध्ये सगळीकडे कॅमेरे लावले आहेत" .
"पण सगळ्यांनाच हे जमणार नाही आणि तुमचे नातेवाईक प्रत्यक्ष हजर राहणारच ना"..?मी नेहमीप्रमाणे शंका काढलीच.
"हो ..जे प्रत्यक्ष हजर राहतील त्यांनाही वधूवराना भेटता येणार नाही उलट वधूवरच त्यांना खाली येऊन भेटतील . ते स्टेजवर उभे राहणार नाहीत. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहतील.त्यांच्याशी गप्पा मारतील . त्यांच्याबरोबर सेल्फी काढतील. लोकांचा वेळ ही वाचेल."
"अरे बापरे ...! हे असेही असते का ?? पण काहीजणांना वस्तुरूपात आहेर द्यायचा असेल त्याचे काय .."?? माझे प्रश्न संपत नव्हते.
"ज्यांना वस्तू द्यायच्या असतील त्यांनीही ऑनलाइन डायरेक्ट वधू वरांच्या घरी पाठवून द्याव्या. त्यासाठी पत्ताही दिला आहे . शिवाय आम्हालाही कोणाला रिटर्न गिफ्ट द्यायचे असेल तर आम्हीही त्यांच्या अड्रेसवर पाठवू म्हणजे इथे कोणाचे मानपान नको" साहेबांकडे उत्तर तयारच होते .
" ते ठीक आहे हो ...पण लग्न म्हटले की आनंद सोहळा असतो . नाचगणे असते . नटणे मुरडणे असते" मी काय साहेबांना सोडायला तयार नव्हतो.
"हो ...ते सर्व आहे . मेहंदी ,हळद वरात सर्व काही आहे . तेही कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे आणि जो हजर राहणार नाही त्यांना ते ऑनलाइन दिसेलच .आम्ही फक्त लोकांचा वेळ आणि नको त्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करतोय . माझी आई अंथरुणावर असते तिला हॉलवर आणणे शक्य होणार नाही त्यामुळे ती घरातील टीव्ही वर सर्व सोहळ्याचा आनंद घेईल."
"ठीक आहे ...असे बोलून मी उठलो.
" हे बघ भाऊ ....मला कळतंय तुम्हालाहे पटत नाही .आहो मलाही पटत नाही .पण हल्लीच्या फास्ट जीवनात लग्नासाठीही पूर्ण दिवस देणे कोणाला जमत नाही . काही स्वखुशीने येतात.तर काही इच्छा नसताना हजर राहतात . तर काही मानापमानासाठी येतात.सर्वाना खुश करण्याचा हा एक प्रयत्न आहे . त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतलीय इतकेच . मला तर भीती वाटते की आपल्या नातवंडांची लग्ने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेच होतील. नवरा नवरी तरी प्रत्यक्ष स्वतःच्या लग्नाला हजर राहतील का.." ??
मी खेदाने हसून मान डोलावली आणि केबिन बाहेर पडलो .
© श्री. किरण बोरकर
Monday, December 11, 2017
गुलजार पटकथा ........ गुलजार
गुलजार पटकथा ........ गुलजार
अनुवाद .............अंबरीश मिश्र
मेहता पब्लिकेशन
गुलजार हे फक्त कविच नाहीत तर उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आहेत . त्यांच्या नायकाचे एक वैशिष्ठ म्हणजे तो मिशिवाला असतो . विनोद खन्ना त्याचा आवडता नायक आहे असे वाटते .या पुस्तकात त्यांनी आपल्या चित्रपटाच्या तीन पटकथा सांगितल्या आहेत . तिन्ही कथा वाचताना जणू चित्रपट डोळ्यासमोर दिसतोय याची जाणीव होत रहाते .मेरे अपने ,परिचय आणि कोशिश ह्या गाजलेल्या चित्रपटाच्या पटकथा वाचायला मिळतात .
हक्क
हल्लीच व्हाट्स अपवर एक व्हिडिओ किंवा एक फोटो फिरत होता.रशियातील एक गावात एका लहान मुलीला फक्त शाळेत नेण्यासाठी सरकारने ट्रेन चालू ठेवली होती . त्या मुलीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ती ट्रेन चालू होती आणि शाळेच्या वेळेनुसार तिची वेळही बदलत राहिली.सर्वांनी रशियन सरकारचे कौतुक केले . बघा एक मुलींसाठी ट्रेन चालू ठेवले सरकार नाहीतर आपल्या इथे ......??
पण त्या दिवशी आम्ही देवगड येथील मुणगे गावातील टोपीवाला प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत भेट दिली. तेव्हा त्या शाळेत फक्त पहिली ते चौथीपर्यन्त तीनच विद्यार्थी होते . अनेकजण तीन विद्यार्थ्यांसाठी काय मदत करायची असे म्हणत होते . शाळेतील शिक्षकही बोलायचे की आम्हाला शाळेत तीन विद्यार्थी आहेत हे सांगायला देखील लाज वाटते . पण म्हणून त्या विद्यार्थ्यांचा उत्तम शिक्षणाचा हक्क हिरावून घ्यायचा का ...?? इतर विद्यार्थ्यांना जे लाभ मिळतात ते त्यांना मिळायला नको का.. ??? डिजिटल शिक्षण किंवा इ लर्निंग शिक्षणाचा त्यांचा हक्क नाही का.. ??
कोण्या एका सद्गृहस्थाने शाळेला तीन टॅब भेट म्हणून दिले. त्यावेळी आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहिला आणि त्यापासून प्रेरणा घेऊन त्या तिन्ही टॅबमध्ये पहिली ते चौथी इयत्तेचा इ लर्निंग अभ्यासक्रम इन्स्टॉल करून दिला . आज दुसऱ्या देशाने काही केले तर उदो उदो होतो पण आपल्याच देशातील परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार फारच कमीजण घेतात .
© श्री. किरण बोरकर
Tuesday, December 5, 2017
मी मुंबईकर
च्यायला ......आज परत उशीर !!. आता नेहमीची माझी सवय ह्यांना माहीत नाही का... ???? तरीही नेमक्या त्याच वेळेस हा पोरगा आत घुसला ..बरे पटकन बाहेर पडावे, ते नाही... नेहमीसारखी दहा मिनिटे घेतलीच . ऍडजस्ट करायला कधी शिकणार देव जाणे.हिला बोललो तर त्याचीच बाजू घेईल आणि पुढच्या वेळी फ्लॅट घेताना दोन बेडरूमच्या नाही तर निदान दोन टॉयलेटचा तरी घ्याअसे बोलेल. अर्थात आता ते पुढच्या जन्मात शक्य आहे म्हणा.
तर महत्वाचा मुद्दा म्हणजे नेहमीची ट्रेन गेली ...म्हणजे जागा गेली ...मित्र गेले ....नाश्ता गेला. आणि हो... ती हसून गुड मॉर्निंग म्हणणारी दीक्षितही गेली.जाऊदे.. कामावर जाणे महत्वाचे . कालच परदेशी माणसे आलीत त्यांच्या मीटिंग ची तयारी करायची आहे . मिळेल ती ट्रेन पकडून निघू तिकडून टॅक्सी मारू . त्याचे वाउचर लावू .असे मनात विचार करीतच तो स्टेशनला निघाला.
स्टेशन जवळ येताच एक वृद्ध त्याच्या समोर उभा राहिला . उभ्या रेषांचा हाफ शर्ट बाहेर असलेला ..सैलसर पॅन्ट ..आणि एकदम ओरडला "बोक्या ..... पाचवी ,सहावी ,सातवी अ वर्ग .डोळ्यात ओळ्खल्याची खूण आणि आनंद .एक क्षणात वैद्य मास्तरांचा तो तरुण चेहरा डोळ्यासमोर आला . त्यांनी मारलेला धपाटा अजून आठवतोय .ज्यांनी आम्हाला घडविले त्यात सर्वात मोठा वाटा असलेले वैद्य सर . "अरे सर ...तुम्ही ,किती दिवसांनी ?? आज उशीर झाला म्हणून तुम्ही भेटलात .पण सॉरी.... खरेच उशीर झालाय आपण पुन्हा भेटू.. बाय निघतो . त्यांना सावरायचा अवकाश न देता तो निघाला . नेहमीसारखा घाई घाईत . ब्रिजवर चढल्यावर सहज खाली पाहिले ते अजून तिथेच उभे राहून त्याच्याकडे बघत होते .चेहऱ्यावर धक्का बसल्याचे भाव येथूनही दिसत होते . काय साल लाईफ झालय ....!! इतके खाली उतरलो आपण.. की ज्यांनी घडविले त्यांच्याशी ही बोलायला वेळ नाही. वाह.... रे... मुंबई ..वाह ..!
© श्री. किरण बोरकर