हायवेवरील थरार ...... विजय देवधर
नाविन्य प्रकाशन
एकापेक्षा एक सरस खिळवून ठेवणाऱ्या तणावकथा असे म्हणता येईल.सुपरट्रेनमधील थरारनाट्य ,फ्लाईट 49 चे अपहरण ,मृत्यूपेटीत साडेतीन दिवस या अतिशय थरारक कथा आहेत .तर शोध किडन्यापर्सचा ,पॅरिसचा अट्टल गुन्हेगार ,या उत्कंठावर्धक पोलीस कथा आहेत .
Saturday, January 6, 2018
हायवेवरील थरार ...... विजय देवधर
Friday, January 5, 2018
कॉन्ट्रॅक्टर
गोष्ट काल्पनिक आहे . कोणाचाही संबंध यात येत नाही .
आज सकाळीच त्याला फोन आला.नंबर अर्थातच अनोळखी होता.पण त्याची त्याला पर्वा नव्हती.तो कधीच कोणाचे नंबर सेव्ह करीत नव्हता. सध्या मुंबई आणि महाराष्ट्रात जे वातावरण होते त्यावरून आपल्याला असे फोन येणारच याची त्याला खात्री होतीच.
"एकूण दीडशे माणसे.पन्नास रेल्वे स्टेशन.पन्नास हायवेआणि पन्नास गल्लोगल्ली फिरायला".फोनवरील व्यक्तीने त्याची अपेक्षा सांगितली.
हा फक्त ओके म्हणाला.पैसे हवालामार्फत यांच्याकडे पोचणारच होते. फोन ठेवल्यावर त्याने इतराना योग्य त्या सूचना केल्या आणि आपले काम संपविले.
त्याला आपले जुने दिवस आठवले . साधारण पंचवीस वर्षांपूर्वी काळ होता .नुकताच पदवीधर होऊन बाहेर पडला होता तो.... इतरांसारखी त्याची ही स्वप्ने होतीच.पण बाहेरच्या जगाचे आणि बेकरीचे चटके बसून तो जमिनीवर आला.एके दिवशी टपरीवर चहा पित उभा असताना समोरून कोणतातरी मोर्चा चालला होता . त्यातील एक माणूस झेंडा घेऊन त्याच्याकडे आला आणि म्हणाला "येतोस का.. ?? ह्याने पटकन नकार दिला.मग त्याने खिशातून शंभरची नोट काढून त्याच्या हातात दिली."तासभर थांब"..असे म्हणून झेंडा हातात दिला.
"तासाचे शंभर ..."??? तो काही न बोलता त्याच्या बरोबर घोषणा देत चालू लागला. तासाभराने मोर्चा संपला तसा तो माणूस त्याच्याजवळ आला आणि म्हणाला "उद्या येशील का ..??? दोनशे देईन.सांगेन तिथे चार दगड मारून पळून जायचे".
नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्याने अशीच कामे करायचे ठरविले . रोज कुठेना कुठे तरी मोर्चा ,दंगल सभा चालूच असायच्या.तिथे हजर राहिले की दोन तीनशे रुपये मिळायचेच.हळू हळू यात त्याचा जम बसू लागला.त्याने स्वतः माणसे पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले .मुंबईत बेकरांची कमी नाही आणि पैश्यांचीही कमी नाही हे त्याने अनुभवले होतेच.
आज गेली पंचवीस वर्षे तो या क्षेत्रात अनुभवी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत होता.नुसत्या एक फोनवर हजार माणसे गोळा करायची ताकद होती त्याच्यात. जोपर्यंत भारतात लोकशाही आहे तोपर्यंत आपल्या धंद्याला मरण नाही हे माहीत होते त्याला .इथे सरळमार्गी जाणाऱ्यांना ह्या गोष्टीत इंटरेस्ट नसतो म्हणून तर आमच्यासारख्यांची गरज भासते.
अचानक फोनच्या आवाजाने तो भानावर आला . समोरच्या व्यक्तीची मागणी त्याने नोंद केली आणि पुन्हा कामाला लागला .
© श्री. किरण बोरकर
Tuesday, January 2, 2018
तिचेही थर्टी फर्स्ट
आज सकाळपासूनच ती खुश होती .सकाळीच त्यांचा फोन आला होता .कुठेतरी रात्री फिरायला जाऊया . मावळत्या वर्षाची शेवटची रात्र होती ती. 31 डिसेंम्बर . कधी नव्हे ती मुले ही तयार झाली होती.
मग रात्रीची तयारी करण्यातच गुंग होऊन गेली . अंथरुणातून सासूबाई कौतुकाने तिला न्याहाळत होत्या . मध्येच खुणा करून विचारूनही झाले ...क्या बात है ..?. तशी ती लाजली आणि संध्याकाळच्या कार्यक्रमाबद्दल सासूला सांगितले. तीच तर तिची एकमेव जवळची मैत्रीण होती . आपली सर्व सुख दुःखे ती हक्काने तिला सांगायची .कधी कधी रागवायची सुद्धा .पण सासू आपल्या भावना डोळ्यातून व्यक्त करायची. त्यांची ही भाषा घरातील इतर कोणालाच कळायची नाही .पहिल्यांदा सासूचे सर्व करताना तिला खूप राग यायचा पण हळू हळू नकळत दोघींच्यात एक नातेच निर्माण झाले . आताही तिचे कारण ऐकून सासूने थम्स अपची खूण केली त्याबरोबर ती छानशी लाजली.
संध्याकाळी लवकर लवकर आवरून घेतले .सवयीनुसार सासुला काय काय केले ते सांगितले .इतक्यात मुले आली.त्यांचीही तयारी करून घेतली.
थोड्या वेळाने ते आले .आल्याआल्याच त्यांनी सर्वाना तयार व्हायचा हुकून सोडला . चहा पितापिता आईची चौकशी झाली . मग बरेच दिवसांनी मुले आणि ती समोर बसलीत पाहून त्याच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या .लहानपणी कसे आईबाबा जत्रेला घेऊन जायचे .मग बाबा गेल्यावर आईने कशी बाबांची कमतरता भासू दिली नाही . जत्रेत आईचा हात सोडून गेलो तेव्हा आईचा चेहरा कसा झाला.मोठ्या रंगात येऊन सांगू लागले .त्याचे बोलणे ऐकून तिचा जीव कासावीत होऊ लागला .निघत निघत ती त्याला थांबा थोडावेळ म्हणून आत निघून गेली .अर्धा तास झाला तशी त्यांची घाई सुरू झाली .
आणि अचानक ती व्हीलचेअरवरून सासूबाईंना घेऊन आली . साधीच पण नवीन साडी तिच्या अंगावर खुलून दिसत होती . केसांचा अंबाडाही छान बांधला होता . पण अचानक इतक्या वर्षांनी ही कुठे नेतेय..? हे न समजून चेहऱ्यावरचे कावरेबावरे भाव ही स्पष्ट दिसत होते . मुलांना आणि त्यांना बसलेला धक्का त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
"हिला कशाला त्या गर्दीत ..?? कोण लक्ष देईल तिच्याकडे ...?? काही झाले तर... ?? त्याच्या प्रत्येक प्रश्नावर सासूबाईंचा चेहरा पडत होता.
" का ...?? तुम्ही लहान असताना असले प्रश्न याना नाही पडले ते ..?? यांनी कधीच हा विचार केला नाही. उलट बाबानंतर तिने तुम्हाला फिरायला नेण्याची परंपरा खंडित केली नाही . आताच तर फार कौतुकाने ही गोष्ट आम्हाला सांगत होतात .मग आता आपण त्यांना नेऊ.मी संभाळीन त्यांना . तशीही मला सवय आहेच . केवळ म्हातारी झाली . काही हालचाल करता येत नाही म्हणून त्यांचा आनंद हिरावून घ्यायचा का.. ?? त्यांनी हा विचार केला नाही तर आपण का करावा .."?? बोलता बोलता तिने सासूबाईंच्या खांद्यावर हात ठेवले होते .
एक क्षणात वातावरण गंभीर झाले . मुले एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागली .ते हसले मुलांकडे पाहून म्हणाले "चला रे ओला बुक करा आज आणि यापुढे आपण सर्वांनीच एकत्र बाहेर जायचे. नवीन वर्षाचा हा संकल्प समजा.
हातावर पडलेल्या गरम थेंबानी ती भानावर आली आणि पाहिले सासूबाई हातावर डोके ठेवून मुक्तपणे अश्रूंना वाट करून देत होती .
© श्री. किरण बोरकर
Sunday, December 31, 2017
बंड्याचे थर्टी फर्स्ट
फूडबझारमध्ये बंड्याला पाहून मी काहीसा चकित झालो. मलाही बघून तो हसला.समोर येऊन उभा राहताच मी म्हटले"आहेस कुठे हल्ली.... ?? आणि हे काय..? थर्टी फर्स्ट ची तयारी का... ??
" काय हो भाऊ ...?? थर्टी फर्स्टला कोणी भाजी, साखर नेतो का ...?? हे सर्व घरच्यांसाठी. माझी थर्टी फर्स्ट घरीच.मी, आईबाबा आणि मनी.तुम्हीही या... विक्रम आणि वहिनींना घेऊन.मी जेवण बनविणार आहे सर्वांसाठी.मस्त बिर्याणी खाऊ घालतो तुम्हाला".बंड्याने खुले आमंत्रण दिले.
" तू ...आणि थर्टी फर्स्ट घरात ..?? शक्यच नाही.तीस तारखेपासून संध्याकाळी चालू करणारा तू ..चक्क घरच्यांसोबत नवीन वर्ष साजरे करणार.... ?? कोणी ऐकेल तर काय म्हणेल.... ?? मी अविश्वासाने बोललो.
" हो खरेच आहे भाऊ .... मागच्या एक जानेवारीला सकाळी मित्रांनी उचलून घरी आणले.नंतर दिवसभर झोपून होतो. मग संध्याकाळी बाबानी मस्त हजामत केली माझी. सोबतीला आई होतीच पण कधी नव्हे ते बहिणीनेही तोंडसुख घेतले . तिचा चेहरा पाहून खूप लाज वाटली मला स्वतःची.सर्वांची माफी मागितली पण बाबानी नवीन अट समोर ठेवली .कष्टाच्या पैश्याची किंमत तुला समजली पाहिजे असे ते म्हणाले.मग शेवटी त्यांनी सांगितले फक्त एक वर्ष तू घरची पूर्ण जबाबदारी घे.असे समज आपले चारजणाचे हे कुटुंब आता तुला चालवायचे आहे. घरात एक पैसा देत नाहीस आणि मीही मागत नाही . त्याचा परिणाम काल दिसून आलाच . आजपासून घरातील खर्चाची जबाबदारी तू घ्यायची आहेस. ती ही केवळ आर्थिक नाही तर सामाजिक आणि मानसिकही. शिक्षा म्हणून मी ते स्वीकारले .पाहिले काही दिवस काहीच वाटले नाहीं पण हळू हळू खर्च म्हणजे काय..? संसार कसा चालवतात हे समजू लागले . आई वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जा .औषधपाणी बघा. मनीचे ड्रेस ,तिचा पॉकेटमनी . रोजचे खर्च . गॅस बुकिंग . पहिल्यांदाच मला कळले घरातील लाईट बिल किती येते . एकदा तर आईच्या गोळ्या संपलेल्या. रात्री अकरा वाजता घेऊन आलो . पहिल्यांदा मजा वाटली पण मग हळू हळू कळत गेले आईवडिलांनी संसार कसा केला . बनियन ,शर्ट,चपला वरून नेहमी बाबाना बोलायचो पण आता कळू लागले ते का असे वागायचे .केवळ पैश्याचेच नाही तर नाती कशी जोडायची सांभाळायची तेही शिकलो . कोणाच्या प्रेताला,दिवसाला ,लग्नाला ,बारशाला पूजेला मलाच जावे लागले . काय करणार अटच तशी होती ना . पण आपली माणसे कोण आपले स्थान काय ते समजून आले . त्यांच्या डोळ्यात आपलेपणा दिसला .आहो मी वर्षात इतके कमावले मग बाबानी किती कमावले असेल?? लोक आपल्याबद्दल चांगले बोलतात ही भावनाच किती आनंददायी असते .बाहेर पडलो की मित्रांसोबत असतो पण घरात शिरलो की कुटुंबप्रमुख होऊन सर्व जबाबदारी स्वीकारतो .त्यामुळे छान वाटते आता.
मी हसलो"तरीच वर्षभर कुठे जास्त दिसला नाहीस .आणि आम्हाला थांगपत्ताही लागू दिलास नाहीस.पणवर्ष संपले. आता तू मोकळा झालास त्या अटीतुन . उद्यापासून परत जुना बंड्या दिसणार आम्हाला.मी मुद्दाम म्हटले .
"सॉरी भाऊ ...आता जुना बंड्या गेला . यापुढेही हीच जबाबदारी घ्यायची ठरविले आहे मी . हे सर्व करूनच बाकीचे करेन.एक सांगू इतकी वर्षे दारू पितोय पण दारूची चव काही बदलली नाही हो. मग तिच्याच मागे का धावावे सारखे .काहीतरी निमित्त काढून पियालाच पाहिजे का ?? त्यापेक्षा नवीन काही तरी शिकूया म्हणतोय . तुम्ही आहातच पाठीशी".बंड्याही हसत म्हणाला .मीही त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि फूडबाझारमधून बाहेर पडलो .
© श्री.किरण बोरकर
Monday, December 25, 2017
नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस
नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस ...जेफ्री आर्चर
अनुवाद .......अजनी नरवणे
मेहता पब्लिकेशन
हार्वे मेंटकाफ हा शेअर मार्केटमधील किडा. नवीन नवीन कंपन्या काढून त्याचे शेअर विकायचे आणि गायब व्हायचे हा त्याचा धंदा. यावेळी ही त्याने नवीन ऑइल कंपनी काढलीय. त्यासाठी त्याने डेव्हीड केसलर हा तरुण बकरा शोधलाय. डेव्हीडने चार लोकांना त्या कंपनीचे मोठे शेअर घ्यायला भाग पाडले .त्यापैकीय एक आहे स्टीफन . डेव्हीडचा वर्गमित्र आणि गणितज्ञ. दुसरा आहे अँड्रीयन .हा डॉक्टर आहे . तिसरा आहे लंडनमधील आर्ट गॅलरीचा मालक जीन पियरी आणि चौथा लॉर्ड जेम्स हा खानदानी श्रीमंत आणि व्यावसायिक नट. काही दिवसात याना कळते आपण फसवले गेलोय आणि कंगाल झालोत . कायद्यानुसार ते काहीच करू शकत नाहीत म्हणून ते एकत्र येतात आणि इतर कायदेशीर मार्गाने आपली पै न पै हार्वे मेंटकाफकडून कशी वसूल करतात त्यासाठी आपल्याकडील गुणांचा कसा वापर करतात ते वाचणे उत्कंठावर्धक आहे .कुठेही रक्तपात न करता कायद्याचा आधार घेऊन आपले पैसे कसे वसूल करावे याचा धडा हे पुस्तक देते .
Sunday, December 24, 2017
वडिलांचे कष्ट
आज बऱ्याच दिवसांनी आदेशला भेटायचे ठरविले होते . आदेश माझा आणि विक्रमचा गुंतवणूक सल्लागार . ऑफिसखाली असलेल्या कॉफीशॉपमध्ये तो मला घेऊन आला . अतिशय स्वछ आणि पॉश असे कॉफीशॉप होते ते. शेजारच्या कॉलेजमधील मुलामुलींनी शॉप गजबजलेले होते . मेनुकार्ड वरील कॉफीच्या किमती बघून मी हडबडलोच . तिथून उठून जाण्याचा विचार मनात आलासुद्धा इतक्यात आदेशने दोन कॉफी आणि केकची ऑर्डर दिलीसुद्धा .बिल ही क्रेडिट कार्डने भरून मोकळा झाला.सहज विचारले तेव्हा साडेचारशे झाले असे म्हणाला.बापरे .....!! इथली साधी कॉफीच शंभर रुपये होती.त्याच्याशी बोलत असतानाच मागून काही मुलांचा गोंधळ ऐकू आला त्यात एक आवाज ओळखीचा वाटलं म्हणून मागे वळून पाहिले तर आमच्या हर्षलचा मुलगा आर्यन . नेमक्या त्याच वेळी त्याची आणि माझी नजरानजर झाली त्याने हसून हात हलविला मीही प्रत्युत्तर केले.
काही वेळाने तो सर्व ग्रुप निघाला जाता जाता आर्यनने सर्व बिल क्रेडिट कार्डद्वारे भरल्याचे मी पाहिले . त्याने मलाही विचारले तुमचे बिल भरू का ...?? मी नकार दिला . आर्यन कॉलेजला जात होता . नोकरीही करीत नव्हता तरी त्याच्याकडे क्रेडिट कार्ड पाहून मी चक्रावून गेलो .
संध्याकाळी नेमका आर्यन खालीच भेटला." भाऊ.. आज तिथे कोणाकडे आलेलात..?? आणि तेही चक्क कॉफीशॉपमध्ये.??
मी सर्व सांगून त्याला विचारले" तू नेहमी तिथे असतोस का ...?? तर तो सहजपणे होय... म्हणाला .
"ते ठीक आहे रे ..पण किती महाग आहे ?? कोण पैसे भरतो रोज.. ??
"आम्हीच मित्र आलटूनपालटून भरतो.बाबानी क्रेडिट कार्ड दिले आहे अडीअडचणीला त्याचा उपयोग करतो..
"अरे वा ....!!. मग अजून कशा कशासाठी उपयोग करतोस क्रेडिट कार्ड चा ..?? मी हसून विचारले .
"काय भाऊ ..?? हल्ली काय कमी खर्च आहेत होय. कुठे बाहेर पडलो तर चहा नाश्ता खर्च असतोच . शिवाय ग्रुपमधील मित्रांचे वाढदिवस आहेतच .सतत खर्च होत असतात" आर्यनचे स्पष्टीकरण तयार होतेच .
"पण हे खर्च करायची गरज पडतेच का. ?? एक विचारू हा खर्च तुझ्या खिशातून नाही तर तुझ्या वडिलांच्या खिशातून जातो ना ..?? तुला माहितीय तुझ्या वडिलांनी हे पैसे कमवायला किती कष्ट केलेत ?? मी थोड्या कडक आवाजात विचारले तसा आर्यन गंभीर झाला.
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले "मला माहितीय हर्षा तुला या गोष्टी कधीच कळू देणार नाही. पण त्याने दिवसभर नोकरी केली आणि रात्र रात्र गार्डनमध्ये बसून अभ्यास केला .सकाळी सहा वाजता त्याचा दिवस सुरू व्हायचा . पेपर टाकून झाले की तो ऑफिसला जायचा . मग संध्याकाळी डायरेक्ट गार्डन मध्ये अभ्यासाला यायचा . रात्री एक वाजता घरी जाऊन जेवायचा . कोणाला त्रास होऊ नये म्हणून लाईटही न लावता मेणबत्तीच्या उजेडात जेवायचा . दुसर्यांना त्रास देणे त्याच्या स्वभावातच नव्हते . अरे पुस्तकेही शक्यतो विकत घ्यायचा नाही .अगदी गळ्याशी आले की खरेदी असायची त्याची ".बोलता बोलता जुने दिवस आठवून माझा कंठ दाटून आला.
आर्यनही भावनाविवश झाला", पप्पा मला हे कधीच बोलले नाहीत.उलट त्यांनीच हे क्रेडिट कार्ड मला दिले आणि लागेल तसे खर्च कर म्हणाले.
"हो ..कारण त्यांना जे मिळाले नाही ते तुला मिळावे म्हणून . पण तुलाच काय माझ्या मते प्रत्येक मुलाला/ मुलीला कळले पाहिजे त्यांच्या पालकांनी आज ह्या स्थानावर येण्यासाठी किती कष्ट केलेत .आज आम्हाला पैश्याचे महत्व कळतेय कारण तो आम्ही कष्टाने कमावलाय. तुम्हाला आयत मिळतोय म्हणून तुम्ही कसाही उडवू शकत नाही . वाढदिवस मित्रांच्या घरी जाऊन साजरे करा त्यानिमित्त घरच्यांशी ओळख होईल. आपल्या मुलांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत तेही पालकांना कळेल . सार्वजनिक ठिकाणी एकत्र भेटून गप्पा मारा .एक सांगतो आर्यन ..जेव्हा स्वतः कष्ट करून पैसे कमावशील तेव्हा तू नक्कीच पैसे उडवणार नाहीस याची खात्री आहे मला.
माझे बोलणे ऐकून आर्यन खजील झाला . मान खाली घालून म्हणाला" सॉरी भाऊ.. मी आतापर्यंत पप्पाना वेगळाच समजत होतो. पण तुम्ही माझे डोळे उघडलेत . यापुढे खर्च करताना नक्कीच विचार करेन.
© श्री.किरण बोरकर
Friday, December 22, 2017
गुलजार पटकथा ...….. गुलजार
गुलजार पटकथा ...….. गुलजार
अनुवाद ......... वसंत पाटील
मेहता पब्लिकेशन
पटकथा हा साहित्यातील एक प्रकार .आपण जे दृश्य पाहतो त्या दृश्यातून सांगितलेल्या कथेला पटकथा म्हणतात. छोट्या छोट्या फ्रेममधून पटकथा लिहिली जाते आणि संपूर्ण दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहते .या पुस्तकात गुलजार यांनी त्यांच्या तीन चित्रपटांच्या पटकथा मांडल्या आहेत . हुतूतू ,लिबास,आणि माचिस अतिशय संवेदनशील अश्या विषयांचे दिग्दर्शन गुलजार यांनी केले आहे . पटकथा वाचताना संपूर्ण चित्रपट डोळ्यासमोर उभे राहतात .