आत्महत्या
दत्तगुरू गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जनार्दन कवठेकर फारच हौशी माणूस. आपला गणपती सगळ्यात वेगळा असावा, असेच त्यांना वाटे आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही झाले होते. दरवर्षी काहीतरी वेगळेपणा आणून गणेशोत्सव साजरा करीत. उंच मूर्ती, भव्य मिरवणुका, विविध देखावे, चलचित्रे, ह्या सगळ्या त्यांच्याच कल्पना. हल्ली बाप्पाचे आगमन आठवडाभर आधीच करायचे, हीदेखील त्यांचीच कल्पना.
यावर्षीही काहीतरी भव्यदिव्य करायचे, हे त्यांच्या डोक्यात होते आणि त्याची तयारीही त्यांनी सुरू केली होती.
“ह्या जनार्दनभाऊंमुळे आपल्याला आठवडाभर आधीच खाली जायला मिळतं, बघ,” उंदीर बॅग भरत म्हणाला.
“आणि जाऊन करतोस काय? त्या रिकाम्या मंडपात एकटाच रात्रभर बसून असतोस. मूर्तिकाराला वेळ मिळेल तसा तुझा मेकअप करून जातो. कार्यकर्ते गप्पा मारत, पत्ते-कॅरम खेळत बसतात आणि तू घोरत पडलेला असतोस,” तोही आपली बॅग भरत संतापाने म्हणाला.
“पण आता तुमच्या आठवडाभर आधी जाण्याची चर्चा इथे होऊ लागलीय. या वर्षी दुर्गामातेनेही तीन दिवस आधी जाण्याची परवानगी मागितली आहे, असे ऐकून आहे,” इकडे-तिकडे पाहत उंदीर कुजबुजला.
“होय, तिचीही पाळी येईल. पण ती आपल्या इतकी सहनशील नाहीये. वेडेवाकडे प्रकार ती खपवून घेणार नाही,” तो सोंड हलवीत हसून म्हणाला. “पण यावर्षी जनार्दन कवठेकर मला कोणत्या रूपात दाखवतील, याची उत्सुकता आहे.”
आज त्याच्या आगमनाचा दिवस होता. दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त गर्दी दिसत होती. त्याच्या नावाचे टी-शर्ट, हातातील बँड, गळ्यातील मोठे लॉकेट विक्रीला ठेवले होते. यावर्षी मंडळाला प्रायोजकही भरपूर मिळाले होते, असे दिसत होते.
बंद मंडपात तो बसला होता. समोर मूर्तिकार त्याचा मेकअप करत होता. मात्र काम काही मनासारखे होत नव्हते, असेच वाटत होते.
शेवटी, “मुहूर्त निघून जातोय!” असे जनार्दन कवठेकर ओरडून म्हणाले आणि तो चमकला.
“मला मंडपातून बाहेर काढण्यासाठी मुहूर्त कधीपासून सुरू झाला?”
इतक्यात पडदा उघडला आणि त्याचा जयजयकार सुरू झाला. त्याचे दर्शन होताच उंदीर चमकला आणि जोरजोरात हसू लागला.
“साहेब, आजवर इतके अवतार घेऊन दुर्जनांचा नाश केलात. प्रत्येक वेळी मी तुमच्या मागे लपून तुमचे पराक्रम पाहिले. पण स्त्री-अवतारात तुम्ही कधी आणि कोणता पराक्रम केलात, ते सांगा?” असे म्हणत तो हसून गडाबडा लोळू लागला.
होय, यावर्षी जनार्दन कवठेकरच्या सुपीक डोक्यातून स्त्रीवेष धारण करून राक्षसाचा संहार करणारी मूर्ती बनवली होती. ती मूर्ती गरुडावर उभी होती आणि गरुड गोल पृथ्वीवर उभा होता.
“देवा, असे तुम्हाला जवळजवळ वीस दिवस उभे राहायचे आहे, लक्षात ठेवा,” प्रसादाचा तुकडा झेलून तोंडात टाकत उंदीर म्हणाला.
“अरे, आता तर हद्दच झाली! आता तर ही माणसे पौराणिक कथाच बदलू लागली आहेत. स्वतःच्या मर्जीने काहीही करू लागलेत. यांना योग्य वेळीच वठणीवर आणायला हवे,” तो संतापून म्हणाला.
त्याच्या आगमनाच्या मिरवणुकीत ढोल-ताशा पथक, बँड, लेझीम पथक, इतकेच काय, तर डीजेही वाजत होता. रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाला होता. सगळीकडे गोंधळाचे वातावरण होते.
त्याला तर संतापाने काय करू, असे झाले होते. अचानक त्याची नजर कोपऱ्यातील शाळेतील विद्यार्थ्यांवर गेली. आवाजाच्या गोंधळामुळे ती मुले भांबावून गेली होती. काही पालकांनी आपल्या दोन्ही हातांनी मुलांचे कान बंद केले होते.
अचानक एक तरुण डीजेच्या स्टेजवर चढून गेला आणि काही कळायच्या आत त्याने डीजेचा आवाज वाढविला.
आवाज वाढताच बाप्पाची मूर्ती खाली कोसळली.
“आतापर्यंत मनुष्य आत्महत्या करतात, असे ऐकून होतो. काहींना तर पाहिलेही होते. पण देवाने आत्महत्या करताना पहिल्यांदाच पाहिला मी!” उंदीर छद्मी हसत म्हणाला.
“मग काय करू? यांना शिक्षा करू?”
“अरे, वेडी भक्ती करतात ती माझ्यावर. त्यामुळे त्यांना ते स्वतःलाच कळत नाही की काय करतात. त्यांना असाच झटका द्यावा लागतो,” तो दुःखाने म्हणाला.
“तरी बरं, तुमच्या पडण्याने कोणी जखमी झाले नाही. तुमची जास्तच तोडामोड झाली, म्हणा. त्यामुळे यावर्षी इथे मुक्काम होणे कठीण दिसतंय. दुसरीकडे जाऊ,” उंदीर हात देऊन त्याला उठवीत म्हणाला.
“कोणी जखमी होणार नाही, याचीच काळजी घेऊन पडलो मी. कसेही असले, तरी माझेच भक्त आहेत ते. त्यांना शिक्षा होईल इतपत अपराध ते करत नाहीत. पण यातून काहीतरी बोध घ्यावा, हीच इच्छा.”
तो क्षणभर थांबला आणि म्हणाला,
“त्या डीजेच्या आवाजाने माझ्या मोठ्या कानांचे पडदेही फाटतील, तर इतरांची काय अवस्था होईल?”
असे म्हणत तो उंदरावर स्वार झाला.
No comments:
Post a Comment