Thursday, September 8, 2016

गणेशाचे दुखणे

"बाबा ,आज जायलाच पाहिजे का "? गणेश थोड्या नाखुषीनेचे बोलला "अरे बाळा हा रिवाज आहे ,दरवर्षी 10 दिवसाची रजा मंजूर होते ना तुला ,नाहीतर आम्ही बघ ,फक्त एकच दिवस जाऊन येतो "महादेव हसून म्हणाले ."तसे नाही हो बाबा , पूर्वी छान होते जाण्याचा दिवस जसजसा जवळ यायचा तेव्हा किती हुरहुर व्हायची ,कधी एकदा जातो आणि माझ्या भक्तांना भेटतो असे व्हायचे " काय तो टाळ मृदूंगचा ठेका धरत म्हटलेली आरती ,डोक्यावर टोपी घालून माझ्या पुढे नतमस्तक होणारे आबालवृध्द, भरजरी शालु ,पैठणी नेसून ,साजशृंगार करून हातात ओवळणीचे तबक घेऊन वाट पाहणाऱ्या माझ्या माता बहिणी ,सभोवताली दरवळणारा धूप ,स्वच्छ नीटनेटके आसन ,सर्व काही छान होते "गणेश  भावनावश होऊन बोलत होता .मग आता ?? महादेवनी थोडे हसून विचारले "काही वर्षापासून खाली जाऊच नसे असे वाटते .हल्ली काहीजण 2/3 दिवस आधीच मला न्यायाला येतात का ?? तर म्हणे ट्रॅफिक असतो ,आणि मग मनासारखे नाचायला मिळत नाही "अरे तुमच्या समाधानासाठी मला हि शिक्षा का ?? बरे तिथे नेऊन तोंडावर रुमाल टाकून बसवतात मग कोणी लक्ष देत नाही ,साधे खायला पण देत नाहीत ,समोर बसून पत्ते खेळतात आणि चहा डोसत असतात " ."अरे हे चालणारच ,महादेवना हि आता थोडा रस वाटू लागला .काळ बदलला आहे मूला "काळ बदलला म्हणून रिवाज बदलले नाहीत ना " पूर्वी मी घरा घरात जात होतो .त्यावेळी सगळे माझ्या सेवेसी असायचे ,कोणी बाहेर पडत नाही आणि स्वातंत्रलढ्यास जनजागृतीची गरज होती म्हणून लोकमान्य टिळकांनी मला घराबाहेर काढून  सार्वजनिक ठिकाणी बसविले ,तेथे इंग्रजांविरुद्ध नाटके व्हायची ,राष्टभक्तीचे पोवाडे गायले जायचे ,माझ्या पाठींब्याने लोक पेटून उठले ,स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सर्वत्र बोलू जाऊ लागले ,भक्तांना स्वातंत्रलढ्यासाठी एक नवीन दिशा मिळाली ,कित्येक शाहिरांनी माझ्या पुढ्यात पोवाडे गायले ,बालगंधर्वांनी आपल्या गाण्यांनी रात्रभर मंडप भारावून टाकला,टिळक आगरकर ,सावरकरांची अंगावर काटा आणून देशभक्ती फुलवणारी भाषणे  ऐकली.दशावतार बघितला.खूप मज्जा असायची त्यावेळी असे वाटायचे कि घरी जाऊच नये .10 दिवसांनी परत येताना डोळ्यात पाणी यायचे ,अनेक भक्त तर हमसा हमशी रडताना पहिले आहेत मी .इथे आल्यावर  खूप चुकल्या चुकल्या सारखे वाटायचे ,परत कधी जातोय याची वाट पहायचो."अरे मग आता काय झाले "?? बाबा हळू हळू लोक सर्व रिवाज विसरू लागली ,टिळक ,आगरकर ,बालगंधर्व गेले ,स्वतंत्र मिळाले मग माझा वापर करमणुकीसाठी होऊ लागला ,रात्र रात्रभर गाणी वाजवली जाऊ लागली .आजूबाजूला कोण आजारी आहे का ,म्हातारी माणसे आहेत का याचा विचारही केला जात नाही .मोठमोठे फटाके  फुटू लागले ,माझा उंदीर तर आता माझ्याजवळही राहत नाही ,माझेही कान दुखतात हो ,कारण  माणसे बदलतात मी नाही .आता तर माझा मंडप तर राजकीय पक्षांचा आयते व्यासपीठ झाले आहे .कोणीही येतो आणि माझ्या बाजूला उभे राहून मनात येईल।ते बोलतो ,आता इथे लोकांची मने पेटवली जातात पण ती आपल्याच लोकांवर वार करण्यासाठी .रात्री आरती म्हणण्याच्या नावावर जो धुडगूस  चालतो तो तर बघण्यासारखा असतो .एखादे गाणे हिट झाले कि त्या चालीवर माझी आरती सुरु होते.माझ्या नावावर हवे ते खपविले जाते .जनजागृती होतच नाही " महादेव खरेच आता विचारात पडले "बाळा ,ह्याला कुठेतरी आपण हि जबाबदार नाही का ? आपण त्यांना बुद्धी दिली पण त्यावर कॅट्रोल ठेवला नाही ,त्यांनी त्या बुद्धीचा वापर चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टीसाठी केला .पण वाईट गोष्टी लवकर पसरल्या जातात ,आपण त्यांच्यापुढे ध्येय ठेवलेच नाही ,मानव प्रगतीच करत गेला पण कुठे थांबायचे तेच अजून कळले नाही". होय बाबा खरे आहे याला आपणही जबाबदार आहोत ,भक्तांचे आपण ऐकतो आणि ताबडतोब नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध होतो .मला भेटायला येणारे सर्व सारखेच पण लोकांच्याच्या मते काही सेलिब्रेटी असतात म्हणूनही मी प्रसिद्ध होतो.10 दिवसांनी पोट भरत नाही म्हणून पुन्हा माघी गणेश नावाने पुन्हा मला बोलावण्यात येते.मला माझी सुट्टी कधीच एन्जॉय करता येत नाही ,मंडपात हल्ली काही कार्यक्रम होतच नाहीत " काय करू मी बाबा ??? आता ह्या वर्षी त्या सैराटच्या तालावर आरती ऐकायला लागेल ", तुला जावेच लागेल गणेशा नाहीतर हि लोक तुला इथे येऊन घेऊन जातील ,त्यापेक्षा तू स्वतः निघ " महादेवन निक्षूंन सांगितले आणि गणेश नाईलाजाने निघाला भक्तांना भेटण्यासाठी.

Wednesday, September 7, 2016

Saving private ryan

दुसऱ्या महायुद्धाने खूप काही दिले आणि शिकविले आपल्याला .हिटलरसारखा क्रुरकर्मा तर चर्चिलसारखा कुशल राजकारणी नेते दिले .जगाचा संपूर्ण इतिहास आणि अर्थव्यवस्था दुसऱ्या महायुद्धाने बदलली.या युद्धावर अनेक चित्रपट ,मालिका ,पुस्तके लिहिली गेली ,अजूनही बनतायत.त्यातील एक 1998 साली  बनलेला स्पीलबर्गचा" SAVING PRIVATE RYAN  "टॉम हँक्स सारखा कलाकार आणि स्पीलबर्गसारखा हरहुन्नरी दिग्दर्शक एकत्र आले कि काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण
.दुसऱ्या महायुद्धात वेगवेगळ्या ठिकाणी लाडात असलेल्या रायन बंधूंपैकी तीन मुलांच्या मृत्यूची तार एकाच दिवशी त्यांच्या आईच्या हाथी पडते ,तार टेलिग्राम तर्फे हि बातमी जनरलकडे जाते .तिचा चवथा आणि शेवटचा मुलगाहि युद्धात नाहीसा झालाय .अतिशय वरच्या पातळीवरून त्या रायनला शोधून काढून त्याला घरी पोचविण्याची जबाबदारी जॉन मिलर ( टॉम हँक्स) यावर येते .तो आणि त्याची ८ माणसे रायनचा कसा शोध घेतात हे बघायलाच हवे

Saturday, September 3, 2016

पिकनिक

नाक्यावर चहा प्यायला निघतो तोच बंड्या समोर उभा ठाकला ,होता घाईतच पण मला बघून थांबला हातात  काळी बॅग होती काय होते ते मी समजून गेलो .तरीहि विचारले "काय बंड्या ,कुठे ??  "पिकनिकला भाऊ,आज सगळे जुने मित्र पिकनिकला निघालोय,हि काय तयारी ."हातातली काळी बॅग नाचवत बोलला.मी त्याला बाजूला बसवून म्हटले "अरे वा मग काय करणार पिकनिकला ??  काय काय बघणार ? प्रोग्रॅम काय आहे ?? " ह्या ,कसला प्रोग्रॅम?? मित्राचा बंगला आहे ,संध्याकाळी जायचे ,मस्त मैफिल जमवायची.एकमेकांची खेचायची, बेहोष होईपर्यंत पियाची ."अरे छान ,मग सकाळी उठून काय करणार?? " काही नाही ,स्विमिंग पूलात उड्या मारायच्या ,तिथेही पाण्यात बसून पियाची,मग जेवायचे आणि घरी निघायचे ??
मला काहीच सुचेना ,बंड्याने पिकनिकची किती सोपी व्याख्या केली होती .मी पाठीवर  थाप मारून विचारले "अरे पण आठवड्यातून 2 वेळा पितोस ना ?तरीही तिथे जाऊन तेच करणार?? मग काय भाऊ ,त्यालाच तर एन्जॉयमेन्ट म्हणतात .माझा  चेहराच पडला .
.हयाला पिकनिक म्हणतात ?पूर्वी कुठल्यातरी नवीन ठिकाणी जायचे ,तेथील प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यायची ,त्यांची माहिती घ्यायची ,एकत्र बसून जेवण करायचे ,भविष्याबद्दल बोलायचे ,नवीन ध्येय ठरवायचे  असे काहीसे पिकनिकचे स्वरूप होते .पण हल्ली रात्रभर बसून पत्ते खेळायला मिळत नाही ,दारू पीयाला मिळत नाही ,घराचे कटकट करतात म्हणून पिकनिक काढली जाते .सर्व जण रात्री एकत्र बसतात ,दारूच्या बाटल्या रिकाम्या करत एकमेकांची चेष्टा करतात .एखादा काही चांगले काम करत असेल तर त्याला टार्गेट बनवून रात्रभर छळले जाते ,कोणी काही चांगले हेतू ,चांगले विषय मांडायला गेला तर त्याला आम्ही मजा करायला आलो आहोत आमचे डोके खाऊ नकोस असे सांगितले जाते.मला मान्य आहे कि मीही त्यातलाच आहे पण कुठेतरी हे थांबायला पाहिजे असे वाटते .काही ग्रुपमध्ये अतिशय उत्तम कारकीर्द असणारे मित्र असतात पण त्याचा फायदा ग्रुप करून घेत नाही आणि ते हि स्वताहून काही योजना आणत नाहीत .अरे आम्हाला वेळ नाही असे सांगून मोकळे होतात ,पण आठवड्यातून 2 वेळा दारू पियाला 2 तास वेळ कसा मिळतो याचे कारण देऊ शकत नाही.
उद्या रात्री बंड्या घरी येईल आणि परवा दिवसभर डोके धरून घरी झोपून राहील याची खात्री आहे मला आणि त्यालाही ते माहित आहे .पण हे समजून कोण घेईल ????
,

Wednesday, August 31, 2016

द डे ऑफ द जॅकल ...फ्रेडीक फोर्सिथ

द डे ऑफ द जॅकल ...फ्रेडीक फोर्सिथ
फ्रान्स चे द डे ऑफ द जॅकल ...फ्रेडीक फोर्सिथ
फ्रान्स चे अध्यक्ष चार्ल्स गॉल याना मारण्यासाठी बाहेरून एक माणूस पाचारण करण्यात आला आहे .जॅकेलने स्वतःची योजना आखली आहे ,सर्व सुरळीत झाले तर चार्ल्स नक्कीच मारला जाईल . पण या मार्गात अनेक अडथळे आहेत .विशिष्ट प्रकारची बंदूक या योजनेसाठी बनविली गेली आहे .चार्ल्स पर्यंत पोचताना अनेक जणांनी जॅकल कडून जीव गमावला आहे .आता जॅकल आपला हेतू पूर्ण करेल का ?? अतिशय नावाजलेली आणि थरारक अशी कादंबरी   चार्ल्स गॉल याना मारण्यासाठी बाहेरून एक माणूस पाचारण करण्यात आला आहे .जॅकेलने स्वतःची योजना आखली आहे ,सर्व सुरळीत झाले तर चार्ल्स नक्कीच मारला जाईल . पण या मार्गात अनेक अडथळे आहेत .विशिष्ट प्रकारची बंदूक या योजनेसाठी बनविली गेली आहे .चार्ल्स पर्यंत पोचताना अनेक जणांनी जॅकल कडून जीव गमावला आहे .आता जॅकल आपला हेतू पूर्ण करेल का ?? अतिशय नावाजलेली आणि थरारक अशी कादंबरी 

Thursday, August 25, 2016

कोकण आणि गणपती

आज परत एकदा शंकर माझ्यासमोर उभा होता. "साहेब, गणपतीला गावी जायचे आहे, सुट्टी हवीय." यावेळी त्याचा स्वर मवाळ होता आणि नजरही खाली झुकली होती. "अरे ,आताच तर  काविळीच्या आजारात 20 दिवस सुट्टी घेतलीस ना तू, सर्व सुट्ट्या संपल्या तुझ्या कुठून देऊ तुला सुट्टी? मी थोडा रागातच बोललो."काय करू साहेब, एकट्यालाच करावे लागते सर्व. गणपती तर आलाच पाहिजे ना.... सर्व काही इथूनच घेऊन जावे लागते." "मग इथेच का नाही आणत गणपती ??" मी विचारले "शक्य नाही साहेब, गणपती मूळ घरातच आला पाहिजे असाच रिवाज आहे "

खरेच कोकण आणि गणपती यांचे नाते अजूनही मला समजले नाही. प्रत्येक कोकणी माणसाच्या अंगात होळी आणि गणपती भिनलेले असतात त्यासाठी वाटेल ते करायची त्यांची तयारी असते. मी कधीही कोकणात माझ्या गावी गणपतीसाठी गेलो नाही पण होळीला मात्र दरवर्षी जातो. ज्या दिवशी माझे स्वतःचे घर बांधले त्याच दिवशी गावकर्यांनी सांगितले आता पालखी घरी येणार.  त्यावेळी मला झालेला आनंद मी कधीच विसरू शकत नाही. देवाना स्वतःच्या खांद्यावरून, डोक्यावरून वाजत गाजत घरी आणायचा आनंद काय असतो हे मी समजू शकतो, आणि म्हणूनच वाटेल ते झाले तरी शंकर गावी जाणारच हे माहित होते मला.

अजूनही कोकणात पारंपरिक पद्धतीनेच गणपती उत्सव साजरा केला जातो. घराची झाडलोट, दारासमोर सुबक रांगोळी, मखर आणि सजावटीसाठी रात्रभर जागरण, संपूर्ण घर शेणाने सारवलेले, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वहात असतो. गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा करणे हे केवळ कोकणातच अनुभवू शकतो .सर्व स्रीवर्ग नऊवारी नेसून,नाकात नथ आणि दागिने घालून हातात ओवाळणी तबक घेऊन गणरायाच्या वाटेकडे डोळे लावून दारात उभ्या राहतात. यजमानांचे पाय धुवून गणेशाचे स्वागत करतात, तेव्हा एका क्षणात त्यांच्या चेहर्यावरचे भाव टिपावेत. आपला लाडका लेक खूप दिवसांनी घरी आल्यावर जो आनंद त्या माऊलीला होईल तितकाच आनंद लाडक्या गणरायाचे स्वागत करताना असतो आणि आनंदानी त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावतात.

असे दुर्मिळ क्षण अनुभवायची संधी कोण वाया घालवेल?? हे सारे शहरात अनुभवता येत नाही. अजूनही कोकणात आपली संस्कृती, जुन्या रीती, परंपरा टिकून आहेत. त्या 10 दिवसात सर्व नातेवाईक, मित्र परिवार एकत्र येऊन हा सण साजरा करतात.रात्री मोजक्याच आरत्या, मग मनोरंजनाचे कार्यक्रम आणि शांतपणे लवकर झोपून परत भल्या पहाटे उठून बाप्पाची सेवा करण्यात कोकणवासीय धन्यता मानतात. मी शंकरची सुट्टी रद्द करून त्याचा हा आनंद हिरावून घेऊ शकत नाही.

Wednesday, August 24, 2016

सण

"अरे भाई ,आपला सण आहे ,आपण आपल्या पद्धतीनेच साजरा करणार " बंड्या माझ्यासमोर गोविंदा ची बनियन नाचवत बोलत होता .मी ऐकून न ऐकल्यासारखे केले ,मला माझी कामे होती तर बंड्या नुसता भटकायचा ,मिळेल ते काम करायचा .माझा सण साजरे करण्यावर कधीच आक्षेप नव्हता आणि नसणार हि .पण बंड्याच्या विधानावर आक्षेप होता .कोणीही अडविले नाही कोणाला सण साजरे करायला पण ते कसे साजरे करावे यालाही बंधने असावी.
पूर्वी ठीक होते लोक जनजागृती आणि एकत्र येण्यासाठी सण साजरे करत पण आता दुसऱ्यांच्या वरचढ कसे व्हायचे याचा विचार जास्त होऊ लागला .९ थर लावून असा काय आनंद मिळणार कि जो ५ थर लावून मिळणार नाही ??आपला मुलगा सण साजरा करायला घराबाहेर पडलाय तो संध्याकाळी धडधाकट येईल का ?? याचीच आई वडिलांना काळजी .
तीच परिस्थिती इतर सणांची. गणपती पूजेसाठी आणायचा कि उंच दाखविण्यासाठी?? माझ्या गणपतीला सेलिब्रिटी येतात म्हणून तो गणपती पावणारा?? लोक स्वतःच्या घराचा गणपती सोडून आधी सार्वजनिक गणपतीला जातात आणि नंतर अभिमानाने सांगतात पहिल्या दिवशी दर्शन घेऊन आलो
.काळ बदलत गेला आणि लोकांची मानसिकता बदलत गेली .सण  हे धार्मिक न राहता प्रसिद्धीचे कारण बनले आहेत ,लोकांच्या भावनांशी खेळून अधिकाधिक कसे प्रसिद्ध होता येईल याचा अभ्यास चालू झाला .कधी सुधारणार आजची पिढी ,कधी डोळे उघडतील त्यांचे ?? आज सण कसे साजरे करायचे हे कोर्टाला सांगावे लागते यातच आपली हार आहे.

Monday, August 22, 2016

ओल्ड सिटी हॉल ...रॉबर्ट रोटेनबर्ग ..अनुवाद अनिल काळे

ओल्ड सिटी हॉल ...रॉबर्ट रोटेनबर्ग ..अनुवाद अनिल काळे
केव्हिन ब्रेस कॅनडातील रेडिओवर कार्यक्रम करणारा  प्रसिद्ध निवेदक एक दिवस आपल्या पत्नीचा खून केल्याचे कबुल करतो ,शांतपणे पोलिसांच्या स्वाधीन होतो ,स्वताहून आपल्या वकिलाची नेमणूक करतो . शेवटी खटला उभा राहतो ,वरवर सरळ सोपा वाटणारा खुनाचा खटला अनपेक्षित वळण घेऊ लागतो ,पोलिसांना धक्कादायक पुरावे हाथी लागतात आणि शेवट वेगळाच .एका न केलेल्या खुनाच्या तपासाची कथा