Sunday, October 16, 2016

क्रिटिकल मास ....स्टीव्ह मार्टिनी... अनुवाद ..सुदर्शन आठवले

क्रिटिकल मास ....स्टीव्ह मार्टिनी... अनुवाद ..सुदर्शन आठवले
जेनिफर कोल हि तरुण वकील वाशिंग्टनमधील एका छोट्या गावात आपला वकिली व्यवसाय करीत शांतपणे  जगतेय . एक नवा उद्योग चालू करण्यासाठी डीन बेल्डन तिची मदत घेतो .पण काही दिवसांनी त्याला ज्यूरीसमोर चौकशीसाठी बोलाविण्यात येते पण अचानक तिथे त्याचा मृत्यू होतो . गिडियन रे हा संयुक्त राष्ट्राचा आण्विक शस्त्रांचा  तज्ञ आहे .राशियातून दोन आण्विक शस्त्रे चोरीला गेल्यामुळे तो अस्वथ आहे .त्याचा पाठपूरवठा करताना त्याला ती दोन शस्त्रे कुठे पाठवली त्याचे चलन सापडते ,त्यावर बेल्डनच्या कंपनीचे नाव असते . तपासासाठी तो त्याच्या वकीलाकडे ,जोसलीन कोलकडे येतो आणि उलगडत जाते एक भयानक सत्य.  एका छोट्या गोष्टीने सुरवात झालेली हि कथा शेवटी पोचते ती प्रचंड संहार करणाऱ्या अणुबॉम्बकडे आणि हीन दर्जाच्या राजकारणाकडे

Friday, October 14, 2016

द सेव्हन्थ स्क्रोल ...विल्बर स्मिथ ..अनुवाद ..बाळ भागवत

द सेव्हन्थ स्क्रोल ...विल्बर स्मिथ ..अनुवाद ..बाळ भागवत
चार हजार वर्षांपूर्वीची  इजिप्तशियन राणीच्या कबरीचा शोध लावताना योगायोगानेच त्या कबरीजवळ अत्यंत हुशार अशा ताईताने फेरो मेमोस आणि त्याचा अफाट खजिना कुठे दडवून ठेवला आहे त्याचा नकाशा ड्युराइड आणि त्याची पत्नी रायन यांच्या हाथी सापडतो .  तेच आहे हे सेव्हन्थ स्क्रोल .त्यानंतर ड्युराइडचा खून होतो आणि त्याच्या पत्नीच्या मागे आता खुनी लागले .रायन, निकोलस ला मदतीला घेऊन त्या कबरीच्या शोधात निघते .त्यांचा हा शोध नाईल पासून एथिओपियाच्या जंगलात फिरतो . जीवावर उदार होऊन ते दोघेही ती कबर  आणि खजिना शोधून काढतात .  पण त्या खजिन्यामागे कित्येक लोक आहेत जे वेळप्रसंगी खून हि करू शकतात . एखादा चित्तथरारक चित्रपट पाहतोय अशी हि कादंबरी आपली क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवते . एकदा हाती घेतले कि खाली ठेवू नये असे पुस्तक

Tuesday, October 11, 2016

प्रसंगरंग ....अरुण घाडीगावकर

  प्रसंगरंग ....अरुण घाडीगावकर
आज मराठी रंगभूमीला १०० वर्षांची परंपरा आहे .काहीही झाले तरी शो मस्ट गो ऑन हे नाटकवाल्यांचे  प्रमुख सूत्र . कितीही अडचणी येवो पण दिलेल्या वेळेत प्रयोग झालाच पाहिजे हि परंपरा प्रत्येक नाटकवाला  पाळतोय.आपल्यासारख्या प्रेक्षकांना  समोर सादर होणाऱ्या प्रयोगमागे कितीजणांची मेहनत आहे ,त्यांनी काय काय कष्ट केले आहेत याची जाणीवहि नसते .असेच काही वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन घाडीगावकर आपल्या समोर आले आहेत . नाटकाचे विविध ठिकाणी होणारे प्रयोग तिथे येणाऱ्या अनपेक्षित अडचणी ,कलावंत आणि तंत्रज्ञांचे प्रवासात होणारे हाल . प्रयोगाची वेळ पाळताना होणारी तारांबळ , चौथ्या अंकाच्या गमती ,असे अनेक प्रसंग लेखकांनी रंगभूमीवर काम करणाऱ्या जुन्या कलावंतांच्या साहाय्याने ह्या पुस्तकात मांडल्या आहेत .सांगायला अतिशय आनंद होतो कि माझे वडील श्री. कृष्णा बोरकर यांनीही  काही आठवणी सांगून लेखकाला सहकार्य केले आहे . घडीगावकारानी अतिशय मोकळ्या मनाने पुस्तकात त्यांचे आभार मानले आहेत .

Sunday, October 9, 2016

तो

तो कंजूरमार्गाला माझ्या डब्यात शिरायचा आणि त्याची ती विशिष्ट टाळी ऐकून माझी पुस्तकात खुपसलेली मान वर जायची .जणु तो आपल्या आगमनाची वर्दी द्यायचा .मग प्रत्येकाकडे टाळी वाजवत आणि टोमणे मारत फिरायचा .जो पैसे देत नाही त्याच्यापाशी जास्तवेळ घोटाळायचा त्याला लाडीगोडी लावायचा ,स्पर्श करायचा ,जो देईल त्याला आशीर्वाद म्हणून डोक्यावर हाथ ठेवून जायचा .
माझ्याकडे येऊन टाळी वाजवली कि मी वर  पाहायचो आणि मानेनेच नाही बोलायचो ,मग तो निमूटपणे मागे फिरायचा .एकही शब्द ना बोलता .गेले वर्ष दीड वर्ष  हेच चालू होते ,पण त्याने किंवा मी तोंडातून एकही शब्द बाहेर काढला नाही.
पण त्यादिवशी कुटुंबाला घेऊन डोंबिवलीला जायचे होते .नंतर गर्दी होते म्हणून नेहमीचीच लोकल पकडली . कांजूरमार्गला त्याने डब्यात एन्ट्री केली .त्याला पाहताच बायको कानात कुजबुजली "आहो,द्या त्याला काहीतरी ,आशीर्वाद चांगले असतात त्यांचे ". मी हसून खिश्यात हाथ घातला आणि पाच रुपयाचे नाणे हातात ठेवले .नेहमीप्रमाणे तो आला पण यावेळी माझ्याकडे बघून तो काही न करता परत मागे फिरला आणि दुसरीकडे जाऊन हाथ पसरला .बायकोने माझ्याकडे डोळे वटारून पाहिले. त्यानंतर दोन दिवस सुट्टी असल्याने माझे जाणे झालेच नाही .आता उद्या बघू काय करतो तो ??????

Saturday, October 8, 2016

ब्रिडा... पाऊलो कोयलो ..अनुवाद .. प्रशांत तळणीकर

ब्रिडा... पाऊलो कोयलो ..अनुवाद .. प्रशांत तळणीकर
आपल्या सभोवतालच्या विश्वात सामावून जाणे ते अनुभवाने हि बऱ्याच जणांची इच्छा असते.त्यातीलच एक ब्रिडा. हि ते विश्व जाणून घेण्यासाठी जादूविद्येचा मार्ग स्वीकारते ,.स्वतःला चेटकीण समजू लागते. त्यात ती अनेक अनुभव घेते आणि अधिकाधिक गोंधळात पडत जाते . तिच्या लक्षात येते कि विश्व अनेक माध्यमातून आपल्याशी बोलतेय. खरे तर कादंबरी काही खास नाही .मला वाटते लेखक फक्त त्याच्या अल्केमिस्टवरच जगतोय .अल्केमिस्ट आणि इलेव्हन मिनिट्स ह्या दोनच कादंबऱ्या आवडल्या मला ,बाकीच्या सुमार वाटतात.

Friday, October 7, 2016

कर्तव्य

टेबलावरचा इंटरकॉम उचलला आणि विपुलला कॅबिनमध्ये बोलावून घेतले.विपुल वर्षभरपूर्वीच आमच्याकडे ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉईन झाला होता. आम्ही फॅक्टरीच्या मेन्टेनन्स विभागात काम करतो. तो आत येऊन समोर बसला "विपुलशेठ ,मी गमतीने बोललो " चला दसरा दिवाळी आली, आता थोडी मोठी कामे काढा मेन्टेनन्ससाठी". विपुल  तोंडातून शब्द काढेना. "काय झाले??" थोडा आवाज चढवून विचारले मी. "काही नाही सर, पण यावर्षी मी दसरा आणि दिवाळीला कामावर येणार नाही". "का ???" माझा पारा हळू हळू चढू लागला. आम्हाला हि सण नाही का?"  प्रत्येक सण फॅक्टरीत साजरा करू का?"   त्यानेही आवाज थोडा चढविला. काय मिळते येवून ?? सगळे घरी मजा मारतात, फॅमिलीबरोबर सण साजरा करतात आणि आम्ही आपले इथे पडीक. बरं एवढं करून काही एक्सट्रा फायदा मिळेल तर तेही नाही. घरी बायकोच्या शिव्या मिळतात त्या वेगळ्या"  तो पोटतिडकीने बोलत होता. "मग बाळा कशाला आलास या क्षेत्रात? साधी सरळ पदवी घेऊन कारकुनी करत बसायचे ना?? नाहीतर अजून जास्त शिकून आमच्या डोक्यावर येऊन बसायचे, आणि उठता-बसता आमची मारायची होती" मी अस्सल आमच्या मेन्टेनन्स भाषेत बोललो. आता काही क्षणातच कॅबिनचे रण क्षेत्रात रूपांतर होणार होते हे नक्की. पण तो सावरला, आणि नरमाईच्या सुरात म्हणाला ,"तसे नाही सर, पण मलाही सोशल लाईफ आहे " मीही शांत झालो. मनात म्हटले बायकोने तासलेले दिसतेय याला, आणि हसू आलं मला. कारण माझे ते तरुणपणीचे दिवस आठवले. मीही तेव्हा चिडायचो,कंटाळायचो अशा सुट्टीच्या दिवशी कामावर यायला, पण नंतर कळू लागले कि आपण जे करतोय त्यामुळे आपल्याच लोकांचा, कंपनीचा फायदा होतोय. मी हे विपुलला समजावले. "हे बघ विपुल असे प्रत्येकजण बोलू लागले तर या देशाला, समाजाला सर्विस कोण देणार ? पाणी पुरवठा करणारे सुट्टी घेऊ लागले तर या दिवशी पाणी कोण देणार, फायर ब्रिगेड वाले सण म्हणून सुट्ट्या घेऊ लागले तर आग विझवायला कोण जाणार? देशाच्या सीमेवर कोण उभे राहील जर दिवाळीला सैनिकांना सुट्टी दिली तर ?? अनंत चतुर्थीला पोलिसांना सुट्टी दिली तर बंदोबस्त कोण पाहिलं,? कायदा सुव्यवस्था कोण सांभाळेल ??" त्याला बसवले आणि शांतपणे सांगितले " हे बघ मित्रा, तू जे हे क्षेत्र तुझ्या मनाने निवडले आहेस तर प्रत्येक परिस्थीतीला हसतमुखानी सामोरं जायची तयारी ठेव. असा त्रागा करुन काही साध्य होत नसतं. जो पर्यंत तू या क्षेत्रात राहशील तो पर्यंत तुला जे आहे ते स्वीकारावे लागेल. उद्या तू आला नाहीस तर कामे थांबणार नाहीत, मी येऊन काम करेन. पण तू त्यात नापास होशील. विपुल बर्यापैकी शांत झाला होता. कॅबीनमध्ये येतना कपाळावर आठ्या घेऊन आलेला तो जाताना स्मितहास्य घेऊन गेला.

Wednesday, October 5, 2016

जिहाद ...उमेश कदम

"जिहाद" ....उमेश कदम
बाबा कदम यांचे सुपुत्र उमेश कदम यांची हि कादंबरी .अमेरिकेने मुस्लिमसमाजविरोधात पुकारलेल्या लढ्याला प्रत्युत्तर म्हणून मुस्लिमांनी उभारलेला लढा म्हणजेच जिहाद .हि कादंबरी अल कायदा आणि त्यांना समांतर असलेल्या दहशदवादी संघटना ,त्यांचे कार्य अशा विषयांवर आधारलेली आहे . या कादंबरीचा नायक हा इंग्रज आहे .पण खडतर बालपणीच्या आयुष्याला कंटाळून तो वाईट मार्गाला लागतो आणि तुरुंगातील मुस्लिम तरुणांच्या संगतीत राहून मुस्लिम धर्म स्वीकारतो . हळू हळू तो अल कायदाच्या जाळ्यात ओढला जातो . त्यांच्या अनेक दहशतवादी कारवायात भाग घेतो .जिहाद हि कादंबरी आपल्याला अफगाणिस्तान ,युरोप ,येमेन अश्या वेगवेगळ्या भागात घेऊन जाते .या कादंबरीची मांडणी अतिशय सोपी आणि सरळ आहे ,त्यामुळे वाचताना तितकी पकड घेत नाही .