नो गॉड इन साइट .....अल्ताफ टायरवाला
अनुवाद .....अशोक पाध्ये
मेहता पब्लिकेशन
ही कादंबरी नाही .तर एक सलग कथाही नाही . हे पुस्तक आहे सर्वसामान्य माणसांचे. त्यांच्या आयुष्याचे . प्रत्येकजण एकमेकांना कनेक्टेड आहेत .प्रत्येकाचा जगण्यासाठीचा संघर्ष आहे .यात एक गर्भपात करणारा डॉक्टर आहे ,एक गरोदर कुमारिका ,तर एक बाटगा ,अशी अनेक पात्रे आहेत . प्रत्येकाचे आयुष्य दुसर्याशी जोडले गेले आहे .आणि हे सर्व मुंबईच्या सर्व कोपऱ्यात घडत असते .यातून तुम्हाला काहीही उत्तरे मिळणार नाहीत .मुंबईत हे असेच चालू राहणार हे नक्की .
Wednesday, October 18, 2017
नो गॉड इन साइट .....अल्ताफ टायरवाला
Tuesday, October 17, 2017
दिवाळी
"अरे ..!! वा..!! सावंत कुटुंबीय आज इथे.. ??? आहो बाईसाहेब ...बघा पाहुणे आले आपल्याकडे "??? आनंदाने हसत वसंतराव नीतीन सावंत कुटुंबाकडे पाहत म्हणाले.
"या ...!!!.शुभ दीपावली" काकूंही हसत बाहेर आल्या आणि सावंतांना शुभेच्छा दिल्या.
"कसे आहात बाबा ..?? आई तुम्ही कश्या " ?? नीताने विचारले.
"आम्ही मजेत.मस्त चाललंय आमचं .घे फराळ घे". काकूंनी फराळाचे ताट समोर ठेवले .
"अय्या तुम्ही केलात.. ?? कसे जमते हो तुम्हाला .?? नीता कौतुकाने विचारले.
"अग त्यात काय ?? समोरच्या चाळीतली एक गरीब बाई आहे . तिला बोलावले घरी आणि तिला मदतीला घेऊन केले .अर्धा फराळ तिला दिला .अर्धा आमच्यासाठी ठेवला." काकूंनी सहज म्हटले .
" हो ..अरे !! आम्हाला कितीसा पैसा हवाय जगायला . माझी पेन्शन येते त्यात भागते आमचे .शिवाय राहायला हे छप्पर आहे .तुला सांगतो आम्ही दोघेच राहिलो तेव्हा जाणवले आम्ही एकमेकांवर किती प्रेम करतो . अरे आमचे एकमेकांवर प्रेम करणे राहूनच गेले बघ.सकाळी आरामात उठतो मस्तपैकी फिरायला जातो . मनात येईल ते खातो .आणि ही बघ... दिवसभर पाहिजे त्या सिरीयल पाहत बसते". वसंतराव हसत म्हणाले .
"हो ...का ..!! काकू लटक्या रागात म्हणाल्या ",आणि तुम्ही समोरच्या चाळीतील मुलांना गोळा करता त्यांना शिकवता .तर कधी कधी बैठे खेळ ही चालू असतात.दिवस कसा संपतो तेच कळत नाही "आणि दोघेही हसू लागले.
नितीन आणि नीताने एकमेकांकडे पाहिले आणि म्हणाले ",चला निघतो आम्ही .येऊ पुन्हा."
"हो ..ये ..ना पुढच्या दिवाळीला डायरेक्ट "वसंतराव हसून म्हणाले.
ते त्यांना लिफ्टपर्यंत सोडायला आले .नितीनने त्यांचे हात हातात घेतले आणि भावनाविवश होऊन म्हणाला "बाबा चला ना घरी आपल्या ??? खूप सुखात राहू सर्व.झाले गेले विसरून जा ??? मी परत माफी मागतो तुमची"
तसे वसंतराव गंभीर झाले . त्यांच्या डोळ्यात कठोरपणा आला.
"सॉरी मूला... तुम्हाला मी इतर बापासारखा वाटलो असेन तर ते चुकीचे आहे.असे काही पुढे घडेल याची कल्पना करूनच मी घर माझ्याच नावावर ठेवले आणि तुम्हाला घराबाहेर काढले .माझा संसार वेगळा तुझा संसार वेगळा .दोन जनरेशनची माणसे आपण . एकमेकांशी कधीच पटणार नाही हे माहीत होते मला . सासू सुनेची मते पटणार नाहीत याचीही कल्पना होती . म्हणून आधीच सर्व तयारी केली आम्ही .एका कंपनीला आम्ही पैसे भरले ते आमच्या तब्बेतीची वेळोवेळी काळजी घेतात .जेवण करायला बाई येतेच .तिच्या मुलाला आम्ही सांभाळतो .त्याला शिकवतो .कोण म्हणतो म्हातारपणी मुलाची गरज भासते . आम्हाला तुझी गरज नाही .आहे तिथे तुम्ही सुखी राहा आणि आम्हालाही सुखी राहू दे .आज तुमच्यामुळे आम्ही प्रेमाचे दिवस पाहू शकलो.एकमेकांना समजून घेण्याइतका वेळ मिळतो आम्हाला.पाहुणा म्हणून कधीही ये .मुलगा म्हणून येऊ नकोस". वसंतरावानी हात जोडून नमस्कार केला आणि घराकडे वळले .
© श्री . किरण बोरकर
Sunday, October 15, 2017
अलाईव्ह .....पिअर्स पॉल रीड
अलाईव्ह .....पिअर्स पॉल रीड
अनुवाद .....अशोक पाथरकर
मेहता पब्लिकेशन
12 ऑक्टोबर 1972 ला हौशी खेळाडूंची रब्बीची टीम उरुग्वे हवाईदलाच्या विमानाने सांटीयागोला जाण्यास निघाली .विमानात चाळीस प्रवासी आणि पाच कर्मचारी होते .विमान अँडीज पर्वतावर आदळले. अपघात झाला तेव्हा त्यातील बत्तीसजण शिल्लक राहिले . सोबतीला खाण्यासाठी थोडी वाईन आणि काही चॉकलेट्स आणि राहण्यासाठी तुटलेल्या विमानाचा अर्धा भाग.
चिली ,अर्जेंटिना ,उरुग्वे या तिन्ही देशांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला .पण अँडीजवरील अतिशुभ्र बर्फामुळे आणि खराब वातावरणामुळे त्यांचा शोध घेण्यास अडचण येऊ लागली.काही दिवसांनी त्यातील 27 प्रवासी उरले तर नंतर फक्त सोळा .अडीज महिन्यांनी ( सुमारे बहात्तर दिवसांनी )एक चिलीयन शेतकऱ्याला गुरे चरायला घेवुन जाताना दोन माणसे दिसली . तो घाबरून पळून गेला .नंतर दुसऱ्या दिवशी परत त्याला ती दिसली आणि त्यांची यातून सुटका झाली .ते कसे जिवंत राहिले आणि सुटकेनंतरही त्यांनी काय अनुभवले याची रोमांचकारी सत्यकथा
Saturday, October 14, 2017
दिवाळी गिफ्ट
तिच्या हातातील रिमोट त्याने खेचून घेतला आणि चॅनल बदलले.तिच्या आवडीचा डान्स प्रोग्रॅम चालू होता .आज बऱ्याच दिवसांनी तिला मोकळा वेळ मिळाला होता .त्यात आवडता प्रोग्रॅम म्हणून ती खुश होती .सासूबाई ही बाहेर गेल्या होत्या तर मुले शाळेत.
पण तो अचानक आला आणि नेहमीसारखे समीकरणच बदलून गेले.चरफडत उठली आत निघून गेली.लहानपणापासूनच तिला नृत्याचीआवड गणेशोत्सव,नवरात्र सारख्या उत्सवात अगदी हौसेने भाग घ्यायची . पण परिस्थितीमुळे पुढे काही जमलेच नाही .लग्न झाले तेव्हा त्याने प्रेमाच्याभरात तुझी इच्छा पूर्ण करेन असे वचन दिले पण भर ओसरल्यावर सगळे विसरून पैश्याच्या मागे लागला.
खरेच अश्या कित्येक इच्छा..आवडी... मारल्या आपण.नंतर संसारात गुरफटून गेलो.पैश्याची कमी नाही पण पाहिजे ते सुख कुठे आहे ?? आता दिवाळीची तयारी सुरू होईल . दिवसभर जेवण आणि फराळाचे काम . तो काही मदतीला येणार नाही .आपणच करायचे . विचार करता करता केव्हा झोप लागून गेली हे कळलेच नाही.
संध्याकाळी त्याने तिला उठवले तेव्हा कळले खूप वेळ झोपलो होतो आपण . घाईघाईत चहा केला आणि सर्वाना दिला . त्याने तिला सांगितले ,चाल तयार हो आज खरेदीला जायचे आहे . काही न बोलता ती तयार झाली. सर्वांसाठी खरेदी करून रात्री घरी आले तेव्हा लक्षात आले त्याने माझ्यासाठी काहीच घेतले नाही . खिन्नपणे हसून मनात म्हणाली रोजचेच आहे . माझी किंमत काय ते लक्षात येत नाही त्याच्या.रात्री सर्व आवरून त्याच्या शेजारी येऊन झोपली . त्याने तिला अलगद मिठीत घेतले आणि पांढरेशुभ्र पाकीट हाती दिले . उघडून पाहिले तर मृणाल नृत्य क्लासची पावती होती.
आश्चर्याचा धक्का बसून ती ओरडली", हे काय नवीन"?
तो हसून म्हणाला ",तुझे दिवाळी गिफ्ट. उद्यापासून तू रोज नृत्य शिकायला जायचे . वर्षभराची फी भरली आहे.मोकळी कर स्वतःला रोजच्या या चक्रातून. काही वेळ स्वतःसाठी जग.तुझी धावपळ कळत नाही का आम्हाला ??? स्वतःचे मन .इच्छा मारून जगतेस.म्हणून आम्ही सर्वांनी ठरविले तुला नृत्याच्या क्लासला पाठवू . तासभर का होईना तुझे आयुष्य जगशील तू "
"आहो पण आता या वयात नृत्य शिकून काय करू"?? ती डोळ्यात पाणी आणून बोलली.
"आपल्याला कुठे स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. फक्त आनंद घे तुझ्या आवडीचा .तुला दिलेले वचन लक्षात आहे माझ्या.पण परिस्थितीमुळे ते वेळेवर पूर्ण करता आले नाही.पण हरकत नाही.शिकण्यासाठी वय आणि वेळ कोण पाहत नाही .स्वतःसाठी जग थोडा वेळ" . तिच्या डोळ्यातून अश्रू टपकू लागले.
त्याच्या कुशीत शिरत म्हणाली "आजची दिवाळी ही खऱ्या अर्थाने माझी दिवाळी आहे" .
© श्री . किरण बोरकर
Thursday, October 12, 2017
द अँक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर ....संजय बारु
द अँक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर ....संजय बारु
अनुवाद ....लीना सोहनी
मेहता पब्लिकेशन
संजय बारु जून 2004 ते ऑगस्ट 2008 या कालावधीत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम पाहत होते . पंतप्रधानांचा अतिशय जवळून अभ्यास केला त्यांनी.सरकारचा कारभार कसा चालतो.त्यांच्यावर दबाव कोण ?? कसे ?? टाकू शकतात.नेत्यांची सर्वसामान्य जनतेत कशी प्रतिमा उभी केली जाते .तर प्रसारमाध्यमांचा स्वतःच्या स्वार्थासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो याचे वर्णन आपल्या ओघवत्या शैलीत केले आहे .मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीत घडलेल्या महत्वाच्या घटनांचा खजिनाच लेखकाने आपल्या पुढ्यात खुला केला आहे .
Monday, October 9, 2017
नुकसानभरपाई
रविवारची दुपार म्हणजे पोटाला तड लागेपर्यंत जेवायचे आणि ताणून द्यायची हा माझा रिवाज.आजचा रविवार ही काही वेगळा नव्हता.
पण खाली गोंगाट ऐकून मला जाग आली.चिडून बाहेर आलो तर खाली मुलांचा गोंगाट चालू होता. क्रिकेटची मॅच रंगात आली होती . सगळा संताप विसरून मी मॅच पाहत बसलो.तितक्यात खाली विक्रम दिसला. मुलांच्यात बसून तोही मॅच पाहत होता. मला पाहून हात हलविला आणि खेळणार का क्रिकेट असे खुणावून विचारले.
"अरे.....!!वेड लागले का ?? यावयात क्रिकेट ?? मी नाही म्हटले.
तसे त्याने अजय ,सदा याना बोलावले .आज काय झाले कुणास ठाऊक पण सगळे गोळा झाले.क्रिकेट खेळायला. मग माझाही नाईलाज झाला . विक्रमने मॅच ठरविली जुने विरुद्ध नवे.आता मलाही उत्साह आला.
नाहीतरी या वयात या गोष्टी योगायोगानेच घडून येतात.
सुरू झाली मॅच .....खेळ आता रंगात आला . आता आमची बॅटिंग सुरू झाली . विक्रम बॅटिंग करत होता. अचानक एक बॉल त्याने सुसाट मारला आणि तोडकर काकांच्या खिडकीची काच फोडून आत शिरला.लहानपणीच्या सवयीनुसार मी पळून घरात शिरलो . नेहमीप्रमाणे मैदान क्षणात साफ झाले .
काही वेळ शांतता ......आणि अचानक नेहमीप्रमाणे काकूंचा आवाज आला ,आणि नंतर त्यांच्या खास मालवणी भाषेतल्या शिव्या ..देवा .....आज कित्येक वर्षांनी ह्या शिव्या ऐकत होतो .पण आता विक्रमचाही आवाज ऐकू येऊ लागला .म्हणजे विक्रम ही आज भांडणाचा तयारीत आहे की काय ???? मी परत बाहेर येऊन पाहिले तर खरेच की विक्रम हातात बॅट घेऊन काकुसमोर उभा होता .
"मेल्या ....घोड्यासारखो वाढलस तरी अजून अक्कल येऊंची नाय तुका ?? हातात बॅटी धरून कुठेपन बॉल मारतास ?? शिरा पडो तुझ्यावर ....!!अजून मेले छळूक बसलेत..?? ती तावातावाने भांडत होती.
सौ. माझ्याकडे चिडून पाहत होती . आता हीची सुरवात होणार हे नक्की.
तितक्यात विक्रम चिडून म्हणाला"ओ.. काकू.. ओरडू नका. भरून देऊ तुमची काच .एकच नाही तर पूर्ण खिडकीची बदलून देईन.उद्या माणूस येऊन बदलून देईल .घरी जा आता."
तशी काकू थंड झाली.थोड्या वेळाने विक्रम घरी आला.
आल्या आल्या मी चिडलो "कशाला ह्या भानगडी ?? आता नको तो खर्च" ??
" राहूदे रे ...विक्रम हसत म्हणाला." अरे लहानपणी क्रिकेट खेळताना नेहमी तोडकर काकांच्या घराची काच फुटायची आणि काकूच्या शिव्या खायचो . पण काका कधीच काही बोलायचे नाहीत.कधीच नुकसान भरपाई मागितली नाही. नाही कधी घरी तक्रार केली . आज दोघेही म्हातारे झालेत . काकांच्या पेन्शन वर घर चालतेय . मुलगी लग्न होऊन गेलीय ती किती लक्ष देणार ??? गेले महिनाभर बघतोय.. काकांच्या किचनच्या खिडकीची काच फुटलीय . दोन दिवसात नवीन काच लावणारे काका महिनाभर काच न बदलत राहातायत ?? हे काही पटत नाही . बरे त्यांना पैसे द्यावे तर घेणार नाहीत . मोठा मानी मालवणी माणूस . शेवटी ही आयडिया सुचली . आपणच काच फोडायची . पोरांना क्रिकेट खेळायला बोलावले आणि काच फोडून टाकली . आता काका आणि काकू काहीच बोलणार नाहीत . या निमित्ताने संपूर्ण खिडकीला नवीन काच लावू.....दे टाळी ....असे बोलून विक्रम ने हात पुढे केला . मी नेहमीप्रमाणे हात जोडले . सौ. तोंडावर पदर घेऊन हसू लागली.
"खरेच विकी.... खूप छान दिवस होते ते आणि खूप चांगली माणसे भेटली आपल्याला.त्यांच्याच संस्कारामुळे आपण असा विचार करू शकतो".असे बोलून त्याला मिठी मारली.
© श्री. किरण बोरकर
Sunday, October 8, 2017
चाहूल आणीबाणीची ....बी. एन. टंडन
चाहूल आणीबाणीची ....बी. एन. टंडन
अनुवाद .....अशोक पाध्ये
राजहंस प्रकाशन
लेखक हे पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव या पदावर कार्यरत होते .इंदिरा गांधीसारखी कर्तबगार स्त्री मुलावरच्या आंधळ्या प्रेमापोटी आणि स्वतःच्या दुराग्रही स्वभावामुळे देशावर आणीबाणीचे संकट कसे लादते हे लेखकाच्या डायरीतून उलगडत जाते .आणीबाणीपूर्वी प्रत्यक्षात आठ महिनेआधी ही दैनंदिनी सुरू होती .प्रत्यक्षात काय घडले...??कसे घडले..?? याचा घटनाक्रमच आपल्यासमोर उलगडत जातो .आणीबाणीबद्दल आम्हाला आणि आताच्या पिढीला फारसे माहीत नसेल . पण सत्तासंघर्ष म्हणजे काय.. ?? त्याचे देशावर होणारे भीषण परिणाम . जेष्ठ नेत्यांच्या यामागील भूमिका आपल्याला कळते .ही डायरी म्हणजे लेखकाने जनतेसमोर मांडलेले वृत्तांतकथन आहे .लोकशाहिबद्दल आदर असणाऱ्या सुजाण नागरिकांनी वाचावे असे पुस्तक