अतर्क्य........ संदीप दांडेकर
राफ्टर पब्लिकेशन
लेखकाचे हे पहिलेच पुस्तक .पण कुठेही ते जाणवत नाही . मानवी मन हे खूप गूढ आणि चमत्कारिक असते . खूप जणांनी यावर प्रयोग केले .आपण आपल्या मनातच वेगवेगळे अशक्य असे खेळ खेळत असतो .कधी कधी आपले मन दुहेरी व्यक्तिमत्व ही जगते . या मनाचे पट वेगवेगळ्या कथांमधून लेखकाने मांडले आहेत .गूढकथा आवडणार्यांना नक्की आवडेल असे पुस्तक .
Monday, November 13, 2017
अतर्क्य........ संदीप दांडेकर
Sunday, November 12, 2017
बिलव्हेड.......टोनी मॉरिसन
बिलव्हेड.......टोनी मॉरिसन
अनुवाद........आशा दामले
पद्मगंधा प्रकाशन
अमेरिकेतली गेल्या पंचवीस वर्षातील सर्वश्रेष्ठ कादंबरी म्हणून बिलव्हेड ओळखली जाते .ह्या कादंबरीला पुलित्झर पुरस्कार मिळाला आणि 1993 मध्ये नोबेल पुरस्कारही .यात केवळ गुलामांच्या छळाची कहाणी नसून त्यामागचा इतिहास ही शोधला आहे . अतिशय संथ कादंबरी आहे . काही ठिकाणी संदर्भ ही लागत नाही . वाचायला कंटाळा येतो
Saturday, November 11, 2017
कमलाकर अकॅडमी
मागून गाडीचा हॉर्न ऐकू आला आणि मी दचकून फुटपाथवर उडी मारली.
"कोण आहे "......? म्हणून रागाने पाहिले. तर कारमधील व्यक्ती माझ्याकडे पाहून मिश्किलपणे हसत होती.
"केके ....तू ??? मी आनंदाने ओरडलो . केके उर्फ कमलाकर कदम माझा वर्गमित्र . पण शिक्षण संपल्यावर गायब झाला . मध्ये मध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला करून घ्यायचा . पण तसा संबंध नव्हताच . मध्येच अचानक गायब झाला तो आता असा समोर आला.
"अबे भाऊ ... आहेस का जिवंत... ?? चल बस.." असे बोलून बाजूला बसविले.
इतकी नवीन गाडी .छान कपडे पाहून मी हैराण झालो. हळू आवाजात विचारले", केके.. ही गाडी तुझीच का" ? मोठ्याने हसत त्याने माझ्या खांद्यावर थाप मारली.
गाडी एका दोन मजली इमारतीसमोर थांबली आणि समोरच्या ऑफिसकडे बोट दाखवून म्हणाला ",ते माझे ऑफिस".
मी अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले . तो समजला . "चल सांगतो".असे म्हणून आत नेले.
समोर मूठ वळवलेल्या हाताचे चित्र होते आणि खाली लिहिले होते आम्ही तुम्हाला उपाशी ठेवणार नाही कमलाकर अकॅडमी.
"हे काय.... ?? मी आश्चर्याने विचारले
"बस भाऊ..,आणि चहाची ऑर्डर देऊन तो बसला . त्याच्या टेबलवर फक्त लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन होते.
"मी कार्यशाळा किंवा तुझ्या भाषेत क्लास घेतो मुलांचे."तो शांतपणे म्हणाला.
" अरे वा ...! चांगला धंदा आहे हा"..मी हसून म्हणालो.
"तसे नाही भाऊ ..माझ्याक्लासमध्ये फक्त दहावीत पस्तीस ते चाळीस टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश आहे . त्या मुलांना इतर ठिकाणी प्रवेश मिळत नाही . जरी मिळाला तरी कॉलेजमध्ये शिकविलेले कळत नाही आणि मुळात आपल्याकडे शिकला की नोकरी मिळते ,पैसा मिळतो हा समज आहे . आयटीआयमध्ये शिकले तरी मोठ्या कंपनीत नोकरी पाहिजे ही अपेक्षा.
"मग तू काय करतोस"...?? मी उत्सुकतेने विचारले .
"एक साधा प्रश्न भाऊ ..,तुझ्या घरी ट्यूबलाईट गेली तर तू काय करतोस ..??
मी नसलो तर बायको वायरमनला बोलावते आणि काम झाले की त्याला 100 रु देते". मी उत्तरलो
"बघ साधे ज्ञान असेल आणि त्याने अशी रोज दहा कामे केली तर किती कमावेल तो ?? साधारण पंचवीस हजार रु महिना" मी उत्तर दिले.
" बस ...हेच शिकवतो आम्ही त्यांना.आपल्या ओळखीचे आणि कॉलेजचे मित्र वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत .सर्वांशी माझा सोशल मीडिया आणि प्रत्यक्षातही कॉन्टॅक्ट आहे . मी त्यांना त्यांची अपेक्षा विचारतो आणि त्याप्रमाणे मुले तयार करतो आणि त्यांच्याकडे पाठवून देतो.त्यांनाही आयती मुले मिळतात आणि मुलांना काम".
"अरे पण काही कामे धोक्याची आहेत. सर्टिफिकेट लागते. त्यासाठी काय करतोस".. ??? मी तांत्रिक प्रश्न विचारला.
"इथेच तर माझे काम आहे भाऊ .मी त्यांना प्रशिक्षण देतो .त्यासाठी ही माझेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मित्र मदतीला येतात . त्यांना जसे पाहिजे तसे त्यांना घडवितात आणि परीक्षा द्यायला लावतात . तोपर्यंत त्यांना साधी कामे देऊन कामाची माहिती घ्यायला लावतात . काही ठिकाणी गरज नसते सर्टिफिकेटची तिथे आम्ही डायरेक्ट पाठवतो . उदारणार्थ डेटा एन्ट्रीला सात दिवसाचे प्रशिक्षण दिले की आठव्या दिवसापासून कामाला सुरुवात.मला फक्त इथे बसून सर्वांचा डेटा लॅपटॉपमध्ये भरावा लागतो" .केके हसत म्हणाला .
"पण मुले मध्येच सोडून गेली तर .
"जाऊदे ना.. ??? मग त्यांचे नशीब.पण आपल्याकडे दुसरा आहेच. आता आपला सत्यवान भावे माहीत आहे का ?? मोठा इंटिरियर झालाय . त्याला सतत प्लंबर .वायरमन .सुतार लागतात .मी त्याला मुले देतो .प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन ते सहा महिन्यात तयार होतात.
"अरे ...असे कितीतरी छोट्या छोट्या कामात माणसे लागतात .फक्त आपली तयारी हवी माणसे तयार करायची.जी मी करतो. दहावीनंतर सगळेच इंजिनियर डॉक्टर ,सीए बनायला गेले तर ही कामे कोण करेल . तुम्ही डॉक्टर व्हाल आणि बाथरूमचा साधा पाईप बदली करायला माणूस शोधाल . तो दहा मिनिटाच्या कामाचे दोनशे रु घेणार तुम्ही ते देणार . ही कामे करून तुम्ही उपाशी मारणार नाही . हेच आमचे बोधवाक्य.
"खरेच केके ..आपल्या लक्षातच येत नाहीत या गोष्टी .चांगल्या मार्गाने पैसे कमविणे हेच सगळ्यांचे ध्येय असते . आपापल्या कुवतीनुसार प्रत्येकाने तो कसा कमवायचा हे ठरविले पाहिजे . खरेच तुला हे कळले आणि तू दुसर्यांना मार्ग दाखवितोस .माझाही नंबर घेऊन ठेव गरज पडल्यास मीही तुझ्याकडूनच मुले घेईन .
© श्री. किरण बोरकर
Wednesday, November 8, 2017
शर्यत
"परवाची पाचशे मीटर मीच जिंकणार बरे का मित्रा".
"त्यादिवशी शंभर मिटरलाही हेच बोलला होतास. पण तिसरा आलास...."
"हो रे ...!!मध्येच ठेच लागली आणि वेग मंदावला म्हणून ".....
"आता कारणे देऊ नकोस"....
"कारणे नाहीत रे ....पण होते असे कधी कधी तरीही गेले वर्षभर मी सगळ्याच स्पर्धेत भाग घेतला.
"त्याबाबतीत तुझे अभिनंदन ...पण तुला त्रास होत नाही का.... ??
"अरे त्रास कसला ...इतके तर सहन करायला पाहिजेच . म्हणून तर तुमच्याबरोबर रोज प्रॅक्टिस करतोय .तुम्ही सांभाळून घेताय हेच महत्वाचे"
"ह्या ...!! आम्ही कसले सांभाळून घेतोय. उलट तूच किती उत्साहात सराव करतोस .एक दोन वेळा पडलास तेव्हा भीयालोच आम्ही .पण तू त्यातूनच उभा राहिलास".
"अरे हे... सर्व तुमच्यामुळे झाले .नाहीतर धावणे हे स्वप्नच राहिले असते".
"ह्या ...!! तू मनात आणलेस ना म्हणून हे सर्व .शेवटी आपल्या मनात ठरविले तेच पूर्ण होऊ शकते हे दाखवून दिलेस तू. चल आता निघुया.उशीर होईल मग मलाच बोलशील किती फास्ट चालतोस तू ???
"अरे ..हो.. हो.. हा. पाय तरी जोडून दे मला.आता आरामात बसलो. म्हणून पाय काढून ठेवला नाहीतर हल्ली खूप चावत बसतो आतून. जुना झालाय ना . त्याचा पट्टा सारखा सटकतो.पण सवय झालीय याची म्हणून ही रेस होईपर्यंत चालवतो .मग नवीन घेईनच . चल निघुया.
© श्री. किरण बोरकर
Tuesday, November 7, 2017
मित्र
"भाऊ ..... !! सध्या तुमची मैत्रीण चर्चेत आहे आपल्या विभागात".चहाचा ग्लास माझ्या हातात देऊन बंड्या मिस्कीलपणे उद्गारला आणि मी भुवया उंचावल्या.
"कोण...? मी उत्सुकतेने विचारले.
"विभावरी ...." बंड्याने उत्तर दिले. ",हल्ली सारखी एकाशी गप्पा मारताना दिसते.तिची समाजसेवा ,लिखाण थंड पडले का" ??
विभावरी उर्फ विभा आमची जुनी मैत्रीण . ती उच्चशिक्षित ,चांगले लिहिणारी शिवाय समाजसेवेची आवड असणारी तर विनीत तिचा नवरा. हाही मोठ्या कंपनीत उच्चपदावर होता . घरात सर्व सुखसोयी होत्या . माझे त्यांचे घरी येणे जाणे होते तर तेही कधी आमच्याकडे यायचे.ती स्वभावाने मोकळीच होती.
पण बंड्याचे हे बोलणे ऐकून मला राहवेना . तिच्याबद्दल कोणी असे बोलावे हे मला पटत नव्हते.
मी संध्याकाळी तिच्या घरी गेलो तेव्हा ती बाहेर जाण्याच्या तयारीत होती .मला पाहताच तिला आनंद झाला .ताबडतोब तिने कोणालातरी फोन करून आजची अपॉइंटमेंट रद्द झाल्याचे कळविले.
मी म्हणालो", अग....तू जा तुझ्या कामाला .मी नंतर येतो .
तशी ती म्हणाली", गप रे ....किती दिवसांनी आलायस . तुझ्यापुढे ते काम महत्वाचे नाही."असे बोलून बसली . हळू हळू आमच्या गप्पा रंगू लागल्या . तिच्या बोलण्यातून कुठेही जाणवले नाही की काही वेगळे घडतेय आयुष्यात .शेवटी न राहवून मी विषय काढलाच.
" विभा.... हल्ली काही वेगळेच ऐकू येते तुझ्याबद्दल ....जे मला आवडले नाही.तूच तुझ्या तोंडाने सांग.
तशी विभा हसली", मला वाटलेच.. तू हेच विचारायला आला असशील.एक सांग ..मी तुझ्याशी बोलते .विक्रमशी गप्पा मारते तेव्हा कोणाच्या मनात हा प्रश्न नाही आला ..? मग आताच का ??
"तसे नाही ...पण आपल्याला ओळखतात सर्व . आपला स्वभाव माहीत आहे सर्वाना.मी बाजू मांडली .
" हो ...पण तुम्ही पुरुष आणि मी स्त्री .माझ्याबद्दल पहिले बोलतील ".तिचा आवाज थोडा चढला.
मी विचारले", मग लोक बोलतात ते खरे आहे का "??
" तुला काय वाटते ...?? तिने उलट प्रश्न केला.
" मला नाही वाटत खरे ...म्हणून तुलाच विचारायला आलो.
तशी ती हसली " तुझ्याबद्दल हीच खात्री होती .तो माझा एक नवीन मित्र आहे . हो थोडी जास्त बोलते मी त्याच्याशी. कारण त्याचे आणि माझे काही विचार जुळतात .खरे तर तुला माहितीय मला कशाचीच कमी नाही .विनीत परिपूर्ण नवरा आहे .तो सर्व बाबतीत मला सुख देतो . शारीरिक ,आर्थिक सगळे . आमचे सेक्सलाईफ ही छान आहे . एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करीत नाही .पण हल्ली खूप बिझी झालो आम्ही . मला लिखाणाची आवड ,तशीच थोडीफार समाजसेवाही करते मी आणि त्याला या गोष्टीची अजिबात आवड नाही . त्याला शेयर बाजार ,गुंतवणूक यात इंटरेस्ट तर मला त्या गोष्टींचा तिटकारा . त्यामुळे या गोष्टी कुठे बोलणार .काही गोष्टी मैत्रिणीला सांगायला गेले तर त्या गोष्टींचा फायदा उचलतील ही भीती . एकदा एका मीटिंगमध्ये हा भेटला . त्याचा चेहरा खास नसला तरी बोलणे छान होते . मुद्देसूद बोलणे हा त्याचा प्रमुख गुण होता . वाचनाची आवड आणि समाजाबद्दल कळकळ आवडली मला . मी त्याच्याशी या मुद्द्यावर बोलू लागले आणि त्याची याविषयी असणारी माहिती पाहून चक्रावून गेले . मग त्याच्याशी बोलणे आवडू लागले मला.खूप काही होते माझ्या मनात आणि तो सर्व ऐकून घ्यायला तयार होत . म्हणून आमचे ट्युनिंग जुळले".
" बरे मग पुढे काय "..? मी विचारले .
"काही नाही ..असेच चालेल .त्याला अजून काही अपेक्षा असतील माझ्याबद्दल तर त्याणे विसरून जावे" . असे बोलून ती हसू लागली.
मी म्हटले ",जरा जपून हो ....
"अरे कसले काय भाऊ..? ज्या गोष्टी मला माझ्या कुटुंबाकडून मिळतात त्या गोष्टीसाठी मी दुसरीकडे का जाऊ . तू काळजी करू नकोस . तो फक्त माझा मित्र आहे . आताही त्यालाच भेटायला चालले होते पण तू आलास म्हणून कॅन्सल केले . शेवटी तुझी माझी दोस्ती फार जुनी.आता आला आहेस तर मस्तपैकी जेऊनच जा ",असे बोलून ती गोड हसली.
ते हास्य पाहून माझ्या मनातली भीती कुठच्याकुठे पळून गेली .
© श्री . किरण बोरकर
Friday, November 3, 2017
शोध राजीव हत्येचा ...डी. आर. कार्तिकेयन
शोध राजीव हत्येचा ...डी. आर. कार्तिकेयन
राधाविनोद राजू
अनुवाद.......... सारंग दर्शन
राजहंस प्रकाशन
21 मे 1991च्या रात्री आपल्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात श्रीपेरुम्बुदूरला सभा घ्यायची राजीव गांधींनी नक्की केले होते .अतिशय कडेकोट बंदोबस्तात सभेची तयारी झाली होती.लता आणि तिची तरुण मुलगी कोकिळाही राजीव गांधींना भेटायला उत्सुक होती .तिच्या मागेमागेच नारिंगी हिरवा सलवार कमीज घातलेली मुलगी येत होती . तिच्या हाती चंदनाचा हार होता .स्थानिक पत्रकार आणि छायाचित्रकार हरिबाबू तिथे फोटो काढत होता .कुर्ता आणि पायजमा घातलेला तरुण काही अंतरावर शांतपणे उभा होता.
राजीव गांधी पोचले अशी बातमी थडकली आणि एकच गोंधळ उडाला .इंदिरा गांधींच्या पुतळ्याला हार घालून राजीव गांधी सभास्थानी निघाले . महिलांच्या ठिकाणी येताच कोकिळाने आपली कविता त्यांना ऐकवली आणि ती सलवार कमीजमधली चष्मीस तरुणी हार घेऊन पुढे सरकली .उपनिरीक्षक अनुसयाने तिला अडवायचा प्रयत्न केला पण राजीव गांधींनी तिला येऊ दे अशी खूण केली .तिने तो हार त्यांच्या गळ्यात घातला आणि पायाला हात लावण्यासाठी वाकली आणि अचानक कान बधिर करणारा आवाज झाला .राजीव गांधी जिथे उभे होते तिथे वीस फुटाचा आगीचा लोळ उसळला. ते जिथे उभे होते तिथे त्यांची निशाणी ही शिल्लक नव्हती .राजीव गांधीसाहित पंधरा जणांचा जागीच मृत्यू झाला .पायातील लोटो च्या शूजवरून राजीव गांधींची ओळख पटली .एक राजकीय हत्येचा कट अतिशय सुनियोजित पद्धतीने रचला गेला आणि यशस्वीपणे पार पडला गेला .
दुसऱ्या दिवशीच कार्तिकेयन याना या हत्येचा तपास करण्यासाठी प्रमुख अधिकारी म्हणून नेमले गेले .दुसऱ्या दिवसापासूनच हातात काहीही धागेदोरे नसताना दिवसाचे वीस तास सलग तपास सुरू झाला .१०४४ जणांना साक्षीदार म्हणून नोंदण्यात आले .१४७७ कागदपत्र ,११८० पुरावे नोंदले गेले .पहिली अटक झाल्यापासून एका वर्षाच्या आत हत्येचा छडा लावून आरोपींवर आरोपपत्र दाखल केले गेले .अतिशय योजनाबद्ध आणि अथक परिश्रमानी कार्तिकेयन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या हत्येचा तपास लावून एक आदर्श सर्वांपुढे ठेवला.
एक मन गोठविणारी ,उदास करणारी अतिशय वेगवान सत्य तपासकथा .खरे तर हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असायला हवे कारण राजकीय हत्येचा सहसा तपास लागत नाही ही समजूत भारताने खोटी ठरवली
© श्री. किरण बोरकर
Wednesday, November 1, 2017
प्रायव्हसी
वनीताचा निरोप आला तसा मी तडक निघालो . काहीतरी घडल्याशिवाय ती मला बोलवणार नाही याची खात्री होती. नक्कीच विक्रमचा नवा घोळ असेल.
घरी गेलो तेव्हा साहेब घरी आले नव्हते . पण आशु घरी होता.आशुतोष उर्फ आशु विक्रमचा मुलगा . इंजिनियरिंगला आहे .अतिशय शांत . मी सवयीप्रमाणे आशुची चौकशी केलीं.
वनिता काळजीने बोलली "आहे बेडरूममध्ये".
"मी भेटून येतो ",असे म्हणतात ती म्हणाली ",जा.. पण दरवाजा वाजवून परवानगी घ्या आणि आत जा".
मला काहीच कळले नाही तरीही मी दरवाजा वाजवला .तोच आतून त्याचा चिडका आवाज आला "कोण आहे आता "???
अरे बापरे मी थोडा दचकलोच पण स्वतःची ओळख करून दिली तेव्हा त्याने दरवाजा उघडला ."काका तुम्ही"... ?? तो नाखुषीनेच बोलला.
"हो....!! कसा आहेस"?? असे विचारत त्याच्या हातात मिठाईचा बॉक्स दिला. इतरवेळी हौसेने खाऊ घेणार आशु यावेळी नाराजच दिसला.नाखुषीनेच त्याने तो बॉक्स हातात घेतला.
"काका सॉरी हा...!! पण बिझी आहे मी" असे म्हणत दरवाजा बंद केला.
मी चमकून वनिताकडे पाहिले .तिने रडवेला चेहरा करून माझ्याकडे पाहिले.
"काय सांगू तुला भाऊ ..,हल्ली काही दिवस हेच चालू आहे . एकटा एकटा राहतो . रूम बंद करून आत काय करतो ते कळत नाही .विचारले तर म्हणतो माझ्या प्रायव्हसीत येऊ नका.त्यादिवशी मी रागात बोलले. तर टीव्हीवरची ती नूडल्सची जाहिरात दाखवून म्हणतो बघ सर्वाना प्रायव्हसी हवी असते ती मुलगी बघ आईलाही बाहेर पाठवते रूम मधून.म्हणजे आता आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी जाहिरातींचाही आधार घेतायत.अरे..! माझे ठीक पण याच्या बापाला कळले तर हैदोस घालेल तो... तुला माहीत आहे विक्रम कसा आहे . सर्व काही करेल तो पण असले काही खपवून घेणार नाही".
" हम्म ....मी मान डोलावली . थोडे दिवस बघू आणि बोलू त्याच्याशी.अरे हे वय असेच असते"असे तिला समजावले आणि चहा पीत बसलो.
इतक्यात विक्रम आत शिरला आणि मला पाहताच खुश झाला .मोठ्याने हाक मारून वनिताला बोलावले आणि बॅग तिच्या हाती दिली" आशु कुठेय "?? आजूबाजूला पाहत त्याने वनिताला विचारले . काही न बोलता तिने त्याच्या बेडरूमकडे बोट दाखविले.
विक्रमने सरळ दरवाजा लोटला तेव्हा आशु चिडूनच बाहेर आला "काय हो 'पपा ..?? दरवाजा वाजवून येता येत नाही का".. ?? एका क्षणात विक्रमचा चेहरा बदलला . काही कळायच्या आतच त्याचा हात वर गेला आणि विजेसारखा आशूच्या गालावर आदळला. आम्ही हादरलो.... आशूच्या डोळ्यासमोर काजवे चमकले.
"बापाला शिकवतोस काय "?? विक्रम कडाडला."कोण आहेस तू ?? साधा बापाच्या पैशावर शिकणारा मुलगा . नशीब तुझे म्हणून सर्व काही जाग्यावर मिळतेय . स्वतःची बेडरूम आहे तर तुला हे थेर सुचतात .प्रायव्हसी पाहिजे तुला... ?? का ….?? कशाला... ?? इतके काय करतोस तू..??? विक्रम सुरू झाला.
मी त्याला थांबविले ",अरे तो मोठा झालाय . ताण असतो अभ्यासाचा . प्रायव्हसी हवी असते त्यांना.
"कसली घंटा प्रायव्हसी... ?? आणि अभ्यास काय हाच करतो... ?? आम्ही नाही केला.. ?? अरे आपणही इंजिनियर आहोत .बेसिक नाही बदलले ना ?? न्यूटनचे नियम तेच आहेत. याला तर स्वतंत्र बेडरूम आहे . क्लास आहे. ढुंगणाखाली गाडी आहे.तरी याना प्रायव्हसी पाहिजे. लहानपणी घरात जागा नाही म्हणून गार्डनमध्ये बसून रात्र रात्रभर अभ्यास केला . बापाकडे पैसे नाहीत म्हणून क्लास केला नाही . याना काय कळणार आमची मेहनत". बोलता बोलता विक्रमचा कंठ दाटून आला .
माझ्यासमोर येऊन हात हाती घेऊन म्हणाला" तुझे बरोबर आहे भाऊ .मुलांशी कधी या गोष्टी बोललोच नाही .आपण जे हाल काढले ते त्यांना काढावे लागू नये म्हणून त्यांना पाहिजे ते दिले.पण त्याची कदर नाही त्यांना. आजच्यासारखी कानाखाली आधीच वाजवली असती तर आजचा दिवस बघावा लागला नसता".
ते ऐकून आशु विक्रमच्या जवळ आला आणि मिठी मारून हमसाहमशी रडू लागला.
मी विक्रमला म्हटले ",बघ ....! इतकीही आपली मुले वाया गेली नाहीत.त्यांनाही कळते आपण कुठे चुकतोय आणि ते मान्य करायची तयारीही आहे त्यांची .
© श्री. किरण बोरकर