द मिरॅकल ......आयर्विग वॅलेस
अनुवाद .......जयवंत चुनेकर
मेहता पब्लिकेशन
1857 साली लुर्द या फ्रान्समधील छोट्या गावी बेर्नादेत्त या गरीब 15 वर्षीय मुलीला एका पांढऱ्या वस्त्रधारी स्त्रीने गुहेत दर्शन दिले आणि तीन रहस्ये सांगितली . त्यानंतर त्यातील दोन रहस्ये खरी ठरली .काही वर्षांनी मी पुन्हा याचठिकाणी प्रकट होईन आणि ती तारीख वेळ ही तिने सांगितली.आता तो दिवस जवळ आलाय . ती ज्या गुहेत प्रकट होते त्यातील पाण्याने कोणतेही रोग नष्ट होतात . माणूस व्याधीमुक्त बनतो अशी श्रद्धा आहे . जगभरातून अनेक लोक याप्रसंगी कुर्दला येणार आहेत .
रशियन पंतप्रधानपदाचा प्रमुख दावेदार गुप्तपणे इथे आलाय . त्यालाही स्वतःचा आजार बरा करायचा आहे . तरुणपणीच अचानक आंधळी झालेली सुंदर अभिनेत्री ही आंधळेपणा दूर होईल या अपेक्षेने आलीय . एक उद्योगपती आपल्या देखण्या प्रेयसीला घेऊन आलाय जी एक मानसोपचारतज्ञ आहे आणि तिचा या गोष्टीवर विश्वास नाही . तर एक स्वतःला क्रांतिकारी म्हणवून घेणार युवक स्फोटके घेऊन ही गुंफाच नष्ट करायला आलाय .खर्याखोट्याची शहानिशा करण्यासाठी एक पत्रकार तरुणी या सगळ्यांवर बारीक नजर ठेवून आहे .तिला फक्त सनसनाटी बातमी हवीय . हे सगळे आता कुर्दला एकत्र झालेत . आणि आता सुरू झालय उत्कंठावर्धक नाट्य .श्रध्दा अंधश्रद्धा यांचे द्वंद्व .लोकांच्या भावनांचा व्यापार . यात घडणारे रहस्य . खरोखरच ती स्त्री परत त्या गुहेत अवतीर्ण होईल ..?? लोक व्याधीमुक्त होतील.??? की ती गुंफाच स्फोटाकाने उडवून देण्यात क्रांतिकारी यशस्वी होईल ??? कोणता चमत्कार घडेल..????
Wednesday, April 4, 2018
द मिरॅकल ......आयर्विग वॅलेस
Sunday, April 1, 2018
डान्स
घरात हसतहसत शिरलेल्या विक्रमकडे पाहूनच मी समजून गेलो ह्या माणसाच्या डोक्यात काहीतरी शिजतेय.त्याने नजरेनेच मला बाहेर निघायची खूण केली. सौच्या रागीट नजरेकडे लक्ष न देता आम्ही बाहेर पडलो.
नटराजमध्ये नेहमीच्या टेबलवर बसताच विक्रमने एक विडिओ क्लिप मला दाखविली .त्या क्लीपमध्ये वहिनी आपल्या दिराच्या लग्नात नाचत नाचत त्यांना स्टेजवर घेऊन येते अशी होती.
" हे बघ .....आता ती बाई मस्त नाचते हे सांगू नकोस. या पेक्षा कितीतरी सुंदर नाचणाऱ्या बायका आपण पहिल्या आहेत".. मी विक्रमवर खेकसलो.
"च्यायला ...!! भाऊ ....प्रत्येकवेळी बाईबद्दलच बोलायला पाहिजे का.... ?? विक्रम चिडून बोलला.
त्याचे चिडणे पाहून मला बिलाची काळजी वाटू लागली आणि मी नरमाईच्या सुरात म्हटले ,"ठीक आहे बोल...
"अरे भाऊ ...आता ही नवीन पद्धत चालू झाली आहे . नवरानवरीला वेगवेगळ्या पद्धतीने स्टेजवर घेऊन येणे . आपल्या वेळी असे काही होते का ...??? वाहिनीचा हात हातात घेऊन स्टेजवर येताना तुला किती घाम फुटला होता.दोनवेळा हात झटकून टाकलास.आठवण काढली की अजूनही वहिनीचा चेहरा रागाने फुलतो"..विक्रम हसून म्हणाला.
"पुरे ...पुरे... मुद्द्याचे बोल .मी वैतागून म्हणालो.
"अरे या पुढे प्रत्येकाला नाचावे लागेल .तुला आणि वहिनीला ही मुलांच्या ,पुतण्याच्या लग्नात असेच नाचावे लागेल .विचार कर . विक्रम एखादी कडू गोळी तोंडात घेतल्यासारखे बोलू लागला.
"ठीक आहे ना.... ?? करू नाच ..त्यात काय "?? मी सहज म्हणालो.
"भाउ तो विसर्जनाच्या मिरवणुकीतला नागीण डान्स नाही करायचा आहे .दोन पेग पोटात गेल्यावर करतो तो. शेकडो लोक बघत असतात आपल्याला . व्यवस्थित डान्स केला पाहिजे" विक्रम कुजबुजला.
"आयला ....म्हणजे तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे म्हणजे.."मी दचकून म्हणालो .
"होय तर..... हातावर टाळी देत विक्रम उत्साहाने म्हणाला आणि बिलाची काळजी मिटली म्हणून मीही खुश झालो .
" हे बघ भाऊ ....आपण सर्व कॅटरर्सकडे जाऊ आणि डान्स शिकवायला आमच्याकडे शिक्षक आहेत असे सांगू . आपण वेगवेगळ्या ग्रुपला नवरानवरी समोर डान्स करायला लावू.थोडक्यात नवरानवरी स्टेजवर येताना आधी त्यांच्या फॅमिलीचीही ओळख होईल . उदा. प्रथम नवरानवरीचे छोटे भाचे ,पुतणे नाचत येतील. मग भाऊ बहीण,मग काका काकी ,मामा मामी ,शेवटी आई वडील .यांच्या मागून नवरा नवरी येतील.म्हणजे कसे एक इव्हेंट होईल तो . त्यातही कोणाचे जुळले तर फायद्याचे आहेच ना".
" अरे पण सर्वांनाच नाचायला येते का .. पुढच्या महिन्यात दिनूच्या मुलाचे लग्न आहे . दिनूचा पायाचा प्रॉब्लेम आहे ,तो नाचायला लागला की सर्व हसू लागतात . अश्यांचे कय करणार तू .."?? मी न चिडता विचारले .
"त्यासाठीच तर शिक्षक ठेवायचे ना ..!! हे बघ ..लग्न ही सहा महिने आधीच ठरलेली असतात . आणि हल्ली सगळी तयारी हॉलवर कॅटरर्स करतो.खरेदीही ऑनलाइन होते . पत्रिका कोण वाटत फिरत नाही . व्हाट्स अप वर आमंत्रण दिली जातात . आपण महिनाभर आधी त्यांना डान्स शिकवायला बोलवायचे . त्यांच्या शरीर आणि वयोमानानुसार त्यांना डान्सच्या काही स्टेप शिकवायच्या . पाहिजे तर आपले शिक्षक घरी जाऊनही त्यांच्या सोयीनुसार शिकवतील . कॉन्ट्रॅक्टरशी आधीच डील करून घेऊ त्याला किती आपले किती . लग्न आहे लोक खर्चाला मागे पुढे बघसत नाहीत . आणि हो नवरा नवरीला ही नाचत नाचत स्टेजवर यायला सांगू . त्यानापण आपले लग्न एन्जॉय करू दे की . लग्न एकदाच होते आयुष्यात . आठवणीत राहण्यासाठी ते काहीही करतील".विक्रमच्या चेहऱ्यावर तर उत्साह ओसंडून वाहत होता.
समोरून बिल घेऊन येणाऱ्या वेटरला बघत मी म्हणालो"विकी तू दूरदृष्टी असलेला माणूस आहेस . तुझ्या डोक्यातून कधी काय निघेल सांगता येत नाही. तुझ्यासारखा मित्र माझ्या आयुष्यात आहे म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो मी". असे ऐकताच त्याने वेटरच्या हातातील बील झडप मारून हातात घेतले आणि खिशातून कार्ड काढून त्याला दिले.
"बसक्या भाऊ.... तुझ्याशिवाय कोण माझे ऐकते का ..?? चल निघुया .उद्यापासुन या नवीन बिझनेस ला सुरवात करतो.आणि हो आपण नवरा नवरीला स्टेजवर किस करायला लावले तर ?? निघता निघता भाबडेपणाने विक्रमने मला प्रश्न केला .मी काही न बोलता हात जोडले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Wednesday, March 28, 2018
भय इथले ...तालिबानी सावट :प्रत्यक्ष अनुभव
भय इथले ...तालिबानी सावट :प्रत्यक्ष अनुभव
लेखक ...आतिवास सविता
राजहंस प्रकाशन
लेखिकेला कामानिमित्त चार महिने काबुलमध्ये राहण्याची संधी मिळाली . त्या वास्तव्यातील तिचे अनुभव इथे मांडले आहेत .जागोजागी वाळूच्या पोत्याआड दडलेले सशस्त्र सैनिक. त्यांच्या करड्या नजरा . हॉटेलच्या स्वच्छतागृहात झालेला गोळीबार आणि तिच्या आजूबाजूला पडलेल्या काचांचा खच . सतत जाणवत असलेली कोणाची तरी नजर . ऑफिसमध्ये कडकपणे पाळण्यात येणारे सुरक्षेचे नियम याचे लेखिकेने अचूक वर्णन केले आहे .
उसबा…......दिनेश कानजी
उसबा…......दिनेश कानजी
चंद्रकला प्रकाशन
उसबा म्हणजे दहापेक्षा जास्त तरुणांचा गट.भटकळमध्ये स्थापन झालेल्या या गटाने भारताविरुद्ध अघोषित युद्धच पुकारले. परवेझ मुसा नावाच्या इंडियन मुजाहिदीनच्या कट्टर अतिरेक्यांला आयबीने नेपाळमध्ये पकडले . त्याच्या कबुलीजबाबमधून अनेक सनसनाटी गौप्यस्फोट होत गेले .अनेक रहस्ये उलगडली गेली . शेकडो तरुणांची धरपकड झाली.भारतातून मुजाहिदीन संपली असा सर्वांचा समज झाला.तरीही डीसीपी रामसिह नेगी अस्वस्थ होते . मुसा काहीतरी लपवितोय असे त्यांना राहून राहून वाटत होते .काहीतरी मोठे कारस्थान शिजत होते . कोण आहे भारतातील मुजाहिदीनचा सूत्रधार ज्याने मुसानंतर सारी सूत्रे हाती घेतली आहेत. कोणता कट रचला आहे ...??? एक कल्पनाशक्ती आणि सत्य यांचा अनोखा मिलाफ वेगवान असलेली कादंबरी.
Sunday, March 25, 2018
रेल रोको
आजचा दिवस किती मस्त आहे.सगळे काही छान जुळून येतेय.पोराची परीक्षा संपल्यामुळे त्याची लुडबुड चालू नाही त्यामुळे आरामात आवरता आले.चला म्हणजे आज नेहमीची ट्रेन मिळणार हे नक्की. जाताजाता केबिनमधल्या गणपतीसाठी हारही घेता येईल.
आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे .या महिन्यात तसे दोन लेट झालेत पण आज वेळेवर निघालोय म्हणजे वेळेवर पोचेनच.निघताना बायको छान हसली म्हणजे आज दिवस नक्कीच चांगला जाईल. बाकी काहीही म्हणा हो.... तिच्या हास्यावरच आपण फिदा आहोत.फारच कमी वेळा बिचारीला हसायची संधी मिळते.पण हसते तेव्हा दिल खुश होतो.नाही.....नाही ...ती रागीट नाही किंवा गंभीर चेहऱ्याचीही नाही हो.... आहो कामाच्या रगाड्यात आणि आमच्या कटकटीतून तिला वेळ कुठे मिळतो हसायला. चला आज लिफ्ट पण आपल्यासाठी थांबली आहे.
अरे वा .....!!आज दीक्षित बाईही जास्तच सुंदर दिसतेय.ऑफिसमध्ये प्रोग्रॅम असेल. गुड मॉर्निंग बोलतानाही जरा जास्तच हसली. आज ट्रेनही चक्क वेळेवर आहेत . जाऊदे ही ट्रेन ..आपली नेहमीचीच ट्रेन पकडू .ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाते आणि तिकडून परत बाहेर पडेपर्यंत मागची लोकल आलेली असते.ती बरी पडते डायरेक्ट स्टेशन बाहेर जाता येते.
चला नेहमीची ट्रेन आली .देशपांडेला आज विंडोसीट मिळाली वाटते. म्हणजे दोन स्टेशननंतर आपल्याला मिळेल.च्यायला.... हे काय ...?? इथे कसा सिग्नल मिळाला हिला?? पुढचे स्टेशन तर जवळ आलेय आणि बाजूच्या फास्ट ट्रॅकवर शताब्दी ही थांबलेली दिसतेय.अरे बापरे ...!! हे काय सगळी माणसे ट्रॅकवरून चालत जातायत.लफडं झाले वाटते ....बोंबला ..सत्यानाश ...माझ्याच ट्रेनच्या नशिबात हे यावे. बघूया तर काय चालले आहे.
दरवाज्यावर किती गर्दी...?? लोकपण खूप हौशी.दरवाजावर गर्दी करून उभे आणि काय झाले ते ही सांगत नाही .ती बाई बघा... एक तर पुरुषांच्या डब्यात चढली आणि आता त्या दरवाजाच्या गर्दीत घुसून काय झाले ते बघतेय . तो मागचा तरुण सोडणार आहे का तिला... . बघा त्याचा हात कुठे कुठे फिरतोय.तो गेला की दुसरा आहेच नंबर लावून .आणि तिला तर बाहेरचे बघण्यात इंटरेस्ट...माझी नजर पाहून बघा कसा चपापला.साले हे असले लोक अशी परिस्थिती पाहतच असतात आणि संधी घेतात . पण तिला समजायला नको.
काय ....???? आंदोलन चालू आहे ..??? रेल रोको.. ?? देवा संपले सगळे. आता दोन तीन तास तरी काही घडत नाही.साली कंपनीही लांब. बस टॅक्सीने वेळ लागणार .टॅक्सीसाठी पैसे कोणाकडे आहेत.आजही लेट . तिसरा लेट. म्हणजे एक कॅज्युअल गेली.वर्षात दोन रजा रेल्वेला द्याव्या लागतातच.बसा आता गूपचूप.
काय आजी..??? खाली उतरायचे आहे का.. ? चालत परत मागे जाणार का ..?? तीन तास तरी हलणार नाही ट्रेन. थांबा उतरवतो तुम्हाला .. सावकाश हळू उतारा .ए भाऊ... आजीला सोड स्टेशनला.
हळू हळू सगळे उतरले.चला विंडो सीट पकडून पुस्तक तरी वाचू . ऑफिसला जावेच लागेल . महिना संपतोय . सगळे रिपोर्ट्स बनवायचे आहेत . पुढचे प्लॅनिंग करायचे आहे . सायबाला या सबबी चालणार नाहीत .तो काय चोवीस तास ड्युटीवर.अरे पण प्रत्येकाला आंदोलन करायला रेल्वेच सापडते का ?? आमचेही प्रॉब्लेम आहेत . आम्ही कुठे जायचे..??आज कोणाचा इंटरव्ह्यू असेल. कोणाच्या नातेवाईकांचे ऑपरेशन असेल. कोणाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जायचे असेल तर कोणाची परीक्षा असेल. कितीतरी महत्वाची कामे आज अडली गेलीत. सांगून तरी आंदोलन करा आम्ही ऍडजस्ट करू काहीतरी .
काय झाले काका... ??? बापरे... आता इथे कशी करणार तुम्ही . दरवाजात उभे राहून करणार का ..??हो बाहेर गर्दी आहेच . मग काय करायचे ??? थांबा माझ्याकडे पाण्याची बाटली आहे . अर्धी बाटली पाणी आहे . पिऊन टाकूया मग यात मोकळे व्हा. कसले उपकार हो . बाटल्या आहेत घरात भरपूर . रोज पोराला कोल्ड ड्रिंक पिण्यावरून शिव्या देतो पण आज तीच बाटली कामाला आली . ठेवा बाटली बाजूला अजून कोणाला तरी उपयोगी पडेल. होईल पाण्याची सोय कुठूनही . बघा त्या मुलाने दिली बाटली पाण्याची .काका ही मुंबई आहे . अश्यावेळी सर्वच एकत्र येतात . ही बघा बिस्किटे पण आली.आता बसा आरामात . मलाही फ़ोन आलाय ऑफिस मधून ..आरामात ये . घरीही सांगितले आहे सुखरूप आहे ट्रेनमध्ये . करा आता पाहिजे तितका वेळ आंदोलन . मी माझे पुस्तक वाचून संपवितो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Friday, March 23, 2018
लग्न
"अजूनही लग्नासाठी माझ्या मनाची तयारी झाली नाही असे मला वाटते ....?? मावशीच्या प्रश्नाला वैदेहीचे हे उत्तर ऐकून आम्ही चमकलोच.
"अरे..!! पण लग्न ठरले आहे ना तुझे ...?? आणि गेले दोन महिने त्याच्या बरोबर फिरतेस ही तू ..? तरीही अजून तयारी झाली नाही म्हणजे काय ..?? सौ.ने आवाज चढविला.
वैदेही तिची भाची.बऱ्याच प्रयत्नांनी तिचे लग्न ठरले होते. ती स्वतः एक चांगल्या कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या पोस्टवर कामाला होती. तर होणारा नवरा छोटा उद्योग करीत होता. अर्थात घरची श्रीमंती होती.अनेक स्थळे नाकारणाऱ्या वैदेहीने या स्थळाला होकार का दिला हे आम्हाला पडलेले कोडेच होते . पण वैदेहीही त्याचे उत्तर देऊ शकत नव्हती . वैदेहीची घरची परिस्थिती बेताची होती . खाऊन पिऊन सुखी परिवार म्हणतात ना ....तेच .लग्नाची बोलणी करून आम्ही तिच्या घरी आलो होतो.नेहमीप्रमाणे मी शांतपणे बसून ऐकण्याचे धोरण स्वीकारले होते . तर सौ. भाचीचे लग्न म्हणून फारच उत्साहात होती.पण बोलणी काही तिच्या मनासारखी झाली नाहीत . नवऱ्याकडील मंडळींनी आपल्या श्रीमंतपणाचा दबाव टाकून बऱ्याच गोष्टी कबुल करून घेतल्या असे तिचे म्हणणे.म्हणून शेवटी तिने हा प्रश्न विचारला.
गेले दोन महिने तुम्ही गावभर फिरतायत तरीही त्यांच्याबाबतीत तुला काहीच माहिती नाही ..?? तिने चिडून वैदेहीला प्रश्न विचारला."मग काय करता काय तुम्ही.... ?? काय बोलणी होतात तुमच्यात ??
"तसे आम्ही जनरल बोलतो .हॉटेलात जाऊन खातो.त्याच्या बाईक वरून फिरतो. अजून सिरीयस असे काही विचारले नाही. तुम्ही जे काही ठरविणार त्याला आमची मान्यता असणार आहे"वैदेहीने शांतपणे उत्तर दिले.
" हो ...तरीही शेवटी लग्न तुला करायचे आहे.संसार तुला करायचा आहे.त्या कुटुंबात तुला राहायचे आहे . मग ती माणसे कशी आहेत ?? त्यांचा स्वभाव कसा आहे ?? नवऱ्याला काय आवडते ?? तो आपल्याबरोबर संसार करण्यास सक्षम आहे ना ?? या गोष्टी पाहायला नकोत का ?? सौ. चा सूर आता समजावणीचा झाला.
"मान्य आहे मावशी ह्या गोष्टी बोलायला हव्यात. पण आम्ही अजूनही तिथपर्यंत आलो नाही. सध्या असेच जनरल बोलून एकमेकांना समजून घेतोय. होतील इतरही बोलणी हळू हळू . सध्या तरी आमच्या आवडी निवडी जुळतायत बाकी पुढे"वैदेही आता बरीच सावरली होती.
" हे बघ मुलाकडून सांगितलेल्या काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत . त्या गोष्टीवर अडून बसलो तर लग्न मोडायचा संभव आहे .म्हणून तुला विचारतेय मी" सौ.ने निर्वाणीचे शस्त्रं बाहेर काढले.
" हरकत नाही ..ज्या गोष्टीवर कोणीही ऍडजस्टमेंट करणार नाही तेव्हा ते सोडून द्यावे लागेल . मी बोलेन त्यावेळी त्याच्याशी .मार्ग निघाला तर ठीक नाहीतर सोडून. देऊ दुसरा पाहू "वैदेही शांतपणे म्हणाली तसे सौ. ने हताश होऊन माझ्याकडे पाहिले .
ते पाहून मी समजून गेलो आता माझी पाळी आलीय.मी वैदेहीला म्हणालो "सगळे काही इतके सोपे नसते.आपण जेव्हा एकमेकांना पसंद करतो तेव्हा पूर्ण भावना त्यामध्ये गुंतलेल्या असतात .मनाने एकमेकांना वरलेले असते. सासरची माणसेही आपली वाटू लागतात.अश्यावेळी सगळ्या गोष्टीत मुलाचा आणि मुलीचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे .मोठी मंडळी मुलांच्या पुढच्या आयुष्याचा विचार फार कमी करतात आणि लग्नाच्या प्रथेचा रितिरिवाजाचा विचार जास्त करतात .अश्यावेळी त्या दोघांनी खंबीर होऊन काही निर्णय घेतले पाहिजे.म्हणूनच तुम्हीही या गोष्टीत लक्ष घाला आणि काही निर्णय ठामपणे घ्या .लग्न म्हटले की खर्च आला ,मानपान आले ,रुसवे फुगवे आलेच . ते योग्यवेळी सोडविले नाहीत तर आयुष्यभर मागे लागतील तुमच्या".
" हो काका ...तुम्ही म्हणता ते खरे आहे . यापुढे मीही गंभीरपणे या विषयात लक्ष देईन आणि त्याच्याशी ही बोलेन . खरेच काही गोष्टी गंभीर बानू शकतात हे लक्षातच आले नव्हते माझ्या"असे म्हणून वैदेहीने सौ. ला मिठी मारली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
स्टिलबॉर्न... रोहिणी निलेकणी
स्टिलबॉर्न... रोहिणी निलेकणी
अनुवाद .... श्रावण मोडक
अमेय प्रकाशन
अपघात होऊन पूर्वा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि दोन डॉक्टरांच्या चर्चेतून नवीन संततीप्रतिबंधक लसीविषयी माहिती ऐकते . त्याचवेळी बंगळुरूच्या एम आर हिल्सच्या आदिवासीपाड्यात एक मुलाचा जन्म होतो. मूल जन्मतः विरुप, मृत असते . पूर्वा पंडित ही हाडाची पत्रकार आहे . ती या घटनेचा शोध घेण्याचे ठरविते. आणि पोचते डॉ. अंशुमन या तरुण डॉक्टरकडे. जो या संतती प्रतिबंधक लसीवर प्रयोग करतोय . विदेशातूनही त्याला अर्थसहाय्य मिळतेय . एम आर हिलवर आदिवासी स्त्रियांवर त्याचे प्रयोग चालू आहेत .पण लस दिलेल्या स्त्रियाही गरोदर राहातायत आणि त्यातून कृश ,विरुप ,मृत अर्भक जन्माला येतायत. का ...??? कशामुळे..??? यातील जीवघेण्या स्पर्धेमुळे बिचाऱ्या गरीब महिलांचा बळी जातोय.