हातात मेडिकल रिपोर्ट घेऊन ती खिन्न चेहऱ्याने बाहेर पडली . बाहेर मुसळधार पाऊस पडत होता . कशीबशी रेल्वे स्टेशनवर आली . ट्रेन उशिरानेच धावत होत्या . दुसरा काही पर्याय नसल्याने तिने स्टेशनवरच थांबायचे ठरविले . एक कोपऱ्यात जागा पकडून तिने आधी मनसोक्त रडून घेतले . स्टेशनवर सगळेच चिंतेत असल्यामुळे कोणीही तिच्या राडण्याकडे लक्ष दिले नाही .रात्री बऱ्याच उशिराने ट्रेन चालू झाल्या . ती आपल्या नेहमीच्या स्टेशनवर उतरेपर्यंत मध्यरात्र होऊन गेली होती .घरापर्यंत जायला रिक्षा शोधत असतानाच एक तरुणी तिच्याजवळ आली ताई कुठे जाणार तुम्ही ?? तिने प्रश्न केला . हिने कुसुम नगर असे थंड आवाजात उत्तर दिले . मीही त्याच्या जवळ राहते आपण जाऊया का एकत्र .तिने काही न बोलता मान डोलावली .अचानक एक रिक्षा समोर येऊन उभी राहिली .कोणताही विचार न करता दोघी रिक्षात बसल्या आणि रिक्षा चालू झाली . तिचा चेहरा पाहून दुसरी तरुणी काही बोलली नाही . अचानक रिक्षाने नेहमीच रस्ता सोडून वेगळेच वळण घेतले . व भाऊ इथे कुठे असे बोलेपर्यंतच दोन माणसे त्या रिक्ष्यात चढली .एक क्षणात दोघीनीही कल्पना आली काय घडणार ते .पुढे एका काळोख्या घरासमोर रिक्षा थांबली आणि अजून दोघेजण अंधारातून पुढे आले .सगळ्यांनी मिळून दोघीनीही आत उचलून आणले . हातातील पर्स कुठच्या कुठे गेल्या होत्या . भीतीने थरथर कापत दोघीही कोपऱ्यात उभ्या राहिल्या .त्या पाची जणांच्या चेहऱ्यावर वासना स्पष्ट दिसत होती .काहीतरी विचार करून ती पुढे झाली . तुम्हाला काय हवेय ?? नजर रोखत तिने विचारले . पुढे येणारे पाचही थांबले .पैसा आणि तुम्ही ..त्यातील एकाने उत्तर दिले . उद्या हे लपून राहणार नाहीत . आज ना उद्या पोलीस तुमच्यापर्यंत पोचतीलच त्यापेक्षा एक तडजोड केली तर ...? आश्चर्याने ते तिच्याकडे पाहू लागले . ती तुम्हाला पैसे देईल मी शरीर देते ... बोला . तिला हात लावायचा नाही .आम्हाला घरी सोडा नंतर . असे म्हणत तिने ओढणी खाली टाकली . सर्वांनी एकमेकांच्याकडे पाहत होकारार्थी माना डोलवल्या आणि तिच्यावर तुटून पडले .दुसरी तरुणी हताश नजरेने सर्व पाहत राहिली.सर्व आटपल्यावर दुसऱ्या तरुणीच्या पर्समधून हजार रुपये काढून घेतले . आणि नंतर दोघीना रिक्षातून घराजवळ सोडले .खाली उतरल्यावर ती दुसरीला म्हणाली मला तीन हजार हवेत . ती तिची मागणी ऐकून अवाक झाली . कसले पैसे...?? तुला त्यांच्यापासून वाचविण्याचे पैसे ... ती शांतपणे म्हणाली .नाही आहेत आता दुसरीने उत्तर दिले हरकत नाही ट्रान्सफर कर .. आम्ही हल्ली ऑनलाईन पेमेंट ही स्वीकारतो . तिच्याकडे उत्तर तयार होतेच . आम्ही म्हणजे ??? दुसरीने शंकेने विचारले . अग धंदा करते मी .रोजची चार हजाराची कमाई आहे माझी . म्हणून तर त्यांना अंगावर घेतले मी .आणि तुला वाचविले . नाहीतर त्यांनी इज्जत आणि पैसे दोन्हीही घेतले असते तुझ्याकडून .पाचजणांना काय फुकट चढवून घेतले का ???? काही न बोलता दुसरीने तिच्या अकाउंट वर तीन हजार ट्रान्सफर केले .पैसे जमा झाल्याचा मेसेज येताच ती निघाली .पण असेच जर दुसऱ्यांच्या बाबतीत झाले तर ...?? ते असेच मोकाट सुटणार का ?? दुसरीने आवाज चढवून विचारले . ती वळली तिच्या नजरेत नजर रोखून म्हणाली आता ते काही करू शकणार नाहीत . हा रिपोर्ट बघ . एड्स झालाय मला . आजच डॉक्टरकडून रिपोर्ट आणला मी . हातातील रिपोर्ट तिच्या हातात ठेवून ती शांतपणे वळली आणि चालू लागली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Saturday, July 14, 2018
रिपोर्ट
Wednesday, July 11, 2018
मंटोच्या निवडक कथा
मंटोच्या निवडक कथा
अनुवाद ..... डॉ. वसुधा सहस्त्रबुध्ये
सआदत हसन मंटो (१९२२ ते १९५५)हा उर्दू साहित्यातील जेष्ठ साहित्यकार म्हणून ओळखला जातो .त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर कथा लिहिल्या . त्यातील काही विषय अस्पर्शीत ,वादग्रस्त होते .जे वाटते ते स्पष्ट बोलणारा आणि लिहिणारा लेखक म्हणून त्याला ओळखले जाते .तो एकीकडे स्त्री पुरुष संबंधांवर तर वेश्यांच्या जीवनावर लिहितो तर तितक्याच उत्कटतेने फाळणीवर ही लिहितो.जीवनातील कटू सत्य तो आपल्यासमोर आणतो. मंटोच्या काही कथा अश्लील ठरवून त्यावर खटले ही भरले गेले .मंटोने त्यात स्वतः आपली बाजू मांडली आणि निर्दोषत्व सिद्ध केले.पण हे करताना त्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला त्यामुळे त्यांना दोन वेळा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.त्यांचे दारू पिणे ...नाटक सिनेमा पाहणे ..भटकणे....,जुगार खेळणे..काव्य- संगीत नाटकांच्या मैफिलीत बसणे हे सामान्य माणसांच्या आकलनापलीकडे होते .डॉ.नरेंद्र मोहन यांनी संपादित केलेल्या मंटो की कहानिया या पुस्तकाचा हा अनुवाद आहे .
Monday, July 9, 2018
एका शहराचं शूटिंग ..... अनंत सामंत
एका शहराचं शूटिंग ..... अनंत सामंत
मॅजेस्टिक प्रकाशन
अनंत सामंत यांचा नेहमीप्रमाणे अस्वस्थ करणारा कथासंग्रह.खरे तर यातील पहिली कथा वाचूनच आपण हादरून जातो आणि पुढे काय असेल याची कल्पना येते.मुंबई शहरात घडणाऱ्या या छोट्याछोट्या कथा आहेत.पहिली कथा मुंबईतील संवेदनशील भागात असणाऱ्या पोलीस स्टेशनची आहे . बाबरी मशीद पडल्यावर होणारी दंगल आणि तिला हाताळणारे पोलीस दल यांचा संघर्ष रंगविला आहे . त्यानंतरच्या काही कथा निरसवाण्या आहेत . एक दोन कथा विनोदी पद्धतीने मांडल्या आहेत . रस्त्यावर राहणाऱ्या चित्रकाराची कथाही चांगली पकड घेते . वाचण्यासारखा कथासंग्रह.या कथा वेगवेगळ्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या होत्या .
Sunday, July 8, 2018
उपाय
रात्री उशिराच कुशल घरी आला. नुकतेच त्याच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले होते.
कुशल एक मोठ्या कॉर्पोरेट कंपनीतमोठ्या पोस्टवर कामाला होता. त्यामुळे कामावरच जास्त वेळ जात होता. मग जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा मित्रांसोबत दोन पेग मारायचा.तसेही ऑफिसच्या पार्ट्या ,सेमिनार सतत चालू असायचे. लग्न मात्र त्याने गावाकडची मुलगी पाहूनच केले होते . शहरातील मुलींना आपले लाईफ पटणार नाही किंवा त्याही आपल्याप्रमाणेच बिझी असतील एकमेकांना वेळ दिला नाही तर चिडचिड होईल म्हणून टाळले होते .
करिष्मा शिकलेली होती आणि गावात त्यांची परिस्थिती चांगली होती त्यामुळे जॉब करायचा प्रश्न नव्हताच . कुशललाही घर सांभाळणारी बायको हवी होती . खरे तर आपली व्यसन सांभाळून घेणारी पाहिजे होती म्हणा ना .....
लग्नानंतर महिन्यांनी तो कामावर जॉईन झाला . पेंडिंग कामे पूर्ण करता करता महिना गेला . नवीन लग्न त्यामुळे ऑफिसमधूनही लवकर घरी यायचा . चांगली रूम ही घेऊन ठेवली होती . दोघेच राहायचे ते . आजकुठे त्याला थोडा आराम मिळेल होता.मग मित्रांनी आग्रह केला चल दोन पेग घेऊ .बघता बघता अकरा कधी वाजले ते कळलेच नाही . डोक्यात थोडी नशा आणि हातातील सिगारेट संपवून त्याने बेल वाजवली . आतुरतेने वाट बघत असल्याप्रमाणेच दार पटकन उघडले गेले आणि झपकन तो वास तीव्रपणे तिच्या नाकात घुसला.तोंड वाकडे करीत तिने त्याला आत घेतले. काही न बोलता तिने जेवण गरम करायला घेतले.
" अग....आता नको .. बाहेरच झालेय .मित्रांबरोबर बसलेलो.नाही म्हणता आले नाही.गप्पागोष्टीत तुला कळवायचे राहून गेले . तिने काही न बोलता जेवण तसेच फ्रीजमध्ये ठेवले आणि बेडरूममध्ये निघून गेली.थोड्यावेळाने फ्रेश होऊन तो आत आला. तिला जवळ घेतले . पण यावेळी ती नेहमीप्रमाणे मोहरली नाही . त्या वासाने तिला सारखी उलटीची भावना होऊ लागली . त्याने तिचा विचार न करता नेहमीचा कार्यभाग उरकला आणि पाठ करून झोपून गेला. ती मात्र रात्रभर तळमळत राहिली.
सकाळी नेहमीप्रमाणे दिवस सुरू झाला. काही दिवस नेहमीसारखे गेले . एक दिवस सकाळी त्याने तिला सांगितले आज जेवण बाहेरून करून येणार . तिने मान डोलावली . रात्री त्या दिवशीसारखाच तो घरी आला . हिने काही न बोलता त्याला आत घेतले . तो फ्रेश होण्यासाठी आत गेला . थोडयावेळाने बाहेर आला आणि धक्का बसून समोर पाहत राहिला . ती शांतपणे सोफ्यावर बसली होती .समोर टीपॉयवर एक ग्लास आणि शेजारी व्हिस्कीची बाटली होती . बाजूला शेंगदाण्याची डिश आणि पेप्सीची बाटली .शांतपणे तिने थोडी व्हिस्की ग्लासमध्ये भरून त्यात पेप्सी ओतला आणि त्याच्याकडे ग्लास उंचावून चियर्स केले आणि तोंड वाकडे करीत एक मोठा घोट घेतला. मग बाजूच्या ड्रॉवरमधून सिगारेट काढून ती शिलगावली आणि मोठा कश घेतला आणि ठसका लागून खोकू लागली .
"हे काय करिष्मा ....?? त्याने आवाज चढवून विचारले.
"काय म्हणजे ...?? तुम्ही हेच पिऊन आलात ना बाहेर.....?? मीही तेच पितेय... ?? फक्त घरात बसून".तिने अजून एक घोट घेऊन उत्तर दिले.त्याला काय उत्तर द्यायचे सुचले नाही.
"अग पण ती दारू आहे ..... तू का पितेस ..?? त्याने थोड्या रागात विचारले.
"तुम्ही का पिता....? तिने उलट प्रश्न केला.
"अग कामाचे टेन्शन असते ते जाण्यासाठी मित्र मित्र बसून पितो कधी कधी ....कधी ऑफिसच्या पार्ट्या असतात. बॉस आणि सिनियर असतात ते आग्रह करतात तेव्हा त्यांना खुश करण्यासाठी .तर कधी मज्जा टाईमपास म्हणून पितो"त्याने बचावाचा दुबळा प्रयत्न केला.
"एव्हढेच ना ...?? मलाही खूप टेन्शन येते हो घरी. तुमची काळजी वाटत असते.. काय करीत असाल . काय जेवला असाल ....शिवाय आईबाबांची काळजी असते . कसे असतील ते . आणि तुम्ही पिता म्हणजे ही चांगलीच गोष्ट असणार ...??म्हणून पिते मीही . शेवटी तुमच्या पावलावर पाऊल टाकून एकत्रपणे संसार करायचा असे देवाच्या अग्नीच्या साक्षीने सर्वांसमोर वचन देऊन आलेय मी ....असे म्हणत तिने तो ग्लास रिकामा केला.मग उठून उभी राहिली आणि अंगावरची साडी दूर करून हात पसरून त्याला आमंत्रण दिले "चल चालू कर पुढचा कार्यक्रम ...
काही न बोलता तो मान खाली घालून बेडरूममध्ये निघून गेला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Saturday, July 7, 2018
द डेव्हील्स अल्टरनेटीव्ह .... फ्रेडरिक फोरसिथ
द डेव्हील्स अल्टरनेटीव्ह .... फ्रेडरिक फोरसिथ
अनुवाद.....रमेश जोशी
रशियात एक शुल्लक चुकीमुळे भीषण दुष्काळ पडला आहे . जास्त गहू बाहेरून आयात करावा लागेल आणि मास्कोला अमेरिकेशिवाय पर्याय नाही .
युक्रेनच्या क्रांतीकारकांना रशियापासून स्वातंत्र्य हवेय . त्यांना एक मोठा धक्का द्यावा म्हणून केजीबीच्या प्रमुखांच्या हत्येचा कट रचला जातो आणि तो यशस्वीही होतो .
दहा लाख टन क्रूड ऑइल वाहून नेणारे जहाज फ्रेडा आपल्या पहिल्या वाहिल्या सफरीसाठी तयार झालीय . तिने जपानवरून प्रस्थान केलय .
युक्रेन क्रांतिकारकांनी आपले काम चोख बजावले पण त्यानंतर विमान अपहरण करून ते इस्त्रायलला नेताना त्यांना पकडण्यात आले आणि पश्चिम जर्मनीच्या तुरुंगात डांबण्यात आले . मास्कोने केजीबी प्रमुखाची हत्या लपवून ठेवली.
आपल्या साथीदारांना सोडविण्यासाठी युक्रेन क्रांतिकारकांनी एक वेगळीच योजना आखली. त्यांनी आयर्लंड येथे नांगर टाकून बसलेल्या फ्रेडाचे अपहरण केले . साथीदारांना सोडा नाहीतर कॅप्टनसकट तीस खलाशी आणि जहाज उडवून देऊ शिवाय दहा लाख टन क्रूड ऑइल समुद्रात सोडून देऊ अशी धमकी दिली.
ते ऑइल समुद्रात सोडले तर पर्यावरणाची आणि पाच देशांच्या समुद्रकिनार्यांची अपरिमित हानी झाली असती .
साऱ्या जगाचे लक्ष या अपहरण नाट्यकडे लागले आहे . मारेकऱ्यांना सोडू नये म्हणून रशियाचा दबाव येतोय. राष्ट्राध्यशांच्या खुर्चीला धक्का बसू शकतो .
कोण आणि कसा काढेल यातून मार्ग.
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे
शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी कादंबरी .
Monday, July 2, 2018
दादू
दादूला समोरून येताना पाहिले तसा मी उठलो .पण विक्रमने मला हात खेचून परत खाली बसविले.मग पुढे घडणाऱ्या सर्व घटनांची जबाबदारी विक्रमवर सोपवून मी शांत बसलो.दादू आमच्याकडेच येत होता. कारण विक्रमला पाहून चेहऱ्यावर पसरलेले समाधान आम्हाला स्पष्ट दिसले .
"बोला दादूशेठ ....?विक्रमने नेहमीच्या आवाजात विचारले आणि परत एका कटिंगची ऑर्डर अण्णाला दिली .मीही चान्स मारून एक नानकटाई काढून घेतली . "विक्रम... कोणी ओळखीचा फायनान्सर आहे का रे ...?? त्याने उत्सुकतेने विक्रमला विचारले.
" या क्षणी मी तुम्हाला फक्त कटिंग चहाच फायनान्स करू शकतो .नानकटाई आपल्या जबाबदारीवर खावीत"माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकून विक्रम म्हणाला .
अर्थात मला काही फरक पडणार नव्हताच .पण दादूला उत्सुकतेने विचारले "का रे फायनान्सर हवा ....?
"मी चित्रपट काढतोय माझ्या जीवनावर .....सहजपणे दादूने उत्तर दिले .
ते ऐकूनच आम्ही हबकलो.
"कारण कळेल का दादूमिया...?? आता विक्रम मूळ रुपात आला .
"हल्ली उठबस कोणीही आपल्या जीवनावर चित्रपट काढतो .माझेही आतापर्यंतचे जीवन रोमांचकारी ..धडाकेबाज ....आहे "तो जोशात म्हणाला.
"ते कसे बुवा....? माझा प्रश्न आलाच.
" बघा माझे बाबाही एक पक्षाचे कार्यकर्ते होते . मिलमध्ये ते त्यांच्या डिपार्टमेंटचे लीडर होते . त्यांनी कामगारांसाठी मारही खाल्ला आहे एकदा "
मी मान डोलावली .ह्याच्या बापाने रात्री कामावरून घरी येताना त्या केळे विकणाऱ्या बाईची छेड काढली आणि सर्वांनी त्यांना धुतला हे खरे कारण त्याला कुठे माहीत .....
"बरे अजून ..?? विक्रमचा प्रश्न .
"मीही लहानपणी कितीतरी मारामाऱ्या केल्या..... व्यसन लागली मला ... हातभट्टीच्या गुत्यावरही होतो ."त्याच्याकडे बहुतेक स्टोरी तयार होती .
"हे बाकी खरे ....तुझ्या आयुष्यात तू इतका मार खाल्ला आहेस की आपल्या एरियात कोणीच खाल्ला नसेल. आणि जी जी फुकट मिळेल ती व्यसन केलीस तू शेट्टीच्या बारमधील गिऱ्हाईकाच्या बाटलीत उरलेली दारू तू गोळा करून पियाचास ,त्याने फेकून दिलेल्या अर्धवट सिगारेटी ,विड्या तू पियाचास ते माहीत आहे मला..विक्रम हसत हसत म्हणाला .
दादू हळू हळू खुश होऊ लागला हे आम्हाला कळू लागले .
"आणि बायकांची किती लफडी आहेत माझी.. ?? असे म्हणत दादूने मला टाळी दिली .
"हो रे ....गल्लीतून जाणाऱ्या एकाही कचरावाल्या बाईला ,कामवाल्या बायकांना तू सोडले नाहीस.कितीजणी तुला पटल्या हा अभ्यासाचा विषय आहे .पण त्या दिवशी वनिता सांगत होती दादूला बाजारात एका बाईने कानफटात मारली ". विक्रम त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला.
"बघा ..! किती कीर्ती माझी ....."छाती पुढे करून दादू उत्तराला." शिवाय गणपती ,नवरात्रात मी नाटकांमधून कामे करतो.
च्यायला हेही खरे ..... गल्लीत सादर होणाऱ्याप्रत्येक नाटकात दादू आहेच की.रस्तावरून जाणार माणूस....कोपऱ्यात पेपर वाचणारा...,पोस्टमन अशी कित्येक कामे दादूने केली आहेत .
"पण दादू समाजसेवेचे काय ....? विक्रम हळूच म्हणाला .
"वहिनीला विचार ..कधीही काही आणायला हा दादू तयार असतो. त्या दिवशी मार्केटला जाऊन दोन कोंबड्या घेऊन आलो "दादूकडे उत्तर तयार होतेच. त्या कोंबड्याची कलेजी गायब होती . त्यावरून विक्रमने वनिताला किती शिव्या घातल्या असतील ते मलाच माहीत .
"या एरियात कोणताही नेता.. नगरसेवक ..येवो लोक मलाच बोलावतात . त्यांच्या चहापाण्याची सोय कोण करणार ....
"तसे नाही रे ....काहीतरी भरीव काम .. मी म्हटले .
मी लग्न केले हे मोठे काम नाही का.. ??? दादूने आम्हालाच उलट विचारले .तसे आम्ही अचानक शांत झालो . खरे आहे ...रात्रीअपरात्री कुठेही भटकणाऱ्या दादूला एक स्त्री लहान मुलीला घेऊन रेल्वे रुळाजवळ दिसली .त्याने तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले आणि तिच्याशी लग्न ही केले .खरेतर त्या एका प्रसंगाने दादूची पापे धुतली गेली . बायको मुलीबद्दल जराही बोललेले दादूला चालत नाही .
"पण मग चित्रपटात शेवटी तुला सुधारलेले दाखवावे लागेल. तू सुधारला आहेस का ..???ते ऐकून दादू विचारात पडला ."हे सुधारणे म्हणजे नक्की काय ...?? मुळात मी बिघडलेला कुठे होतो ....??? विक्रमने काही न बोलता अण्णाला पैसे दिले. हात जोडून दादूला नमस्कार केला आणि मला निघायची खूण केली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Sunday, July 1, 2018
मृत्यूवर मात ( चिटिंग डेथ )
मृत्यूवर मात ( चिटिंग डेथ )
मूळ लेखक ..... डॉ. संजय गुप्ता
संशोधक ...... कॅलिब हेलरमन
अनुवाद .....गौरी गाडेकर
मेहता पब्लिकेशन
ऍना बागनहॉम नार्वेतील बर्फाळ शिखरावर स्कीईग करायला गेली आणि अपघातात सापडली .ती बर्फात एक तासांपेक्षा जास्त वेळ अडकली होती . क्लीनिकली ती मृत होती .
माईक मर्ट्झ एका शाळेत बस ड्रायव्हर होता .एका अपघातात सापडला आणि त्याचे हृद बंद झाले .
अफगाणिस्तानातील खिंडीत डोंगरात जखमी झालेल्याना भर युद्धात वैद्यकीय मदत कशी मिळेल. भरपूर रक्तस्त्राव होऊनही तो सैनिक कसा वाचेल??? त्याचे हृदयातचे ठोके थांबवून परत चालू करता येतील का ????
अजून त्या बाळाचा जन्मही झाला नाही पण त्याच्या हृदयात प्राणघातक दोष आहे .
डॉक्टरांनी आशा सोडलेला कोमातील रुग्ण
केवळ हृदयाचे ठोके बंद पडले आणि श्वास थांबला म्हणजे माणूस मृत झाला नाही . काही वर्षांपूर्वी अश्या रुग्णाची आशा डॉक्टरांनी सोडून दिली असती .पण नवीन वैद्यकीय संशोधनामुळे आज हे जिवंत आहेत तर धडधाकट ही आहेत . लेखक प्रसिद्ध न्यूरो सर्जन आणि लेखक डॉ. संजय गुप्ता विज्ञानाचा आधार घेऊन हे चमत्कार नोंदवतात . जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा मानवी शरीराची आत काय हालचाल सुरू असते ते सर्व आपल्याला हे डॉक्टर सांगतात.